॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ लघुवाक्यवृत्ति ॥


श्लोक क्र. १६ वा

॥ श्रीरामसमर्थ ॥

श्लोकः श्रद्धालुब्रह्मतां स्वस्य चिंतयेद्‌बुद्धिवृत्तिभिः । वाक्यवृत्त्या यथाशक्त्या ज्ञात्वात्वभ्यस्यतां सदा ॥ १६ ॥
श्लोकार्थ : साधकाने श्रद्धायुक्त होऊन बुद्धी (विचार) आणि वृत्ती (वृत्तीचा खल म्हणजेच अभ्यास) यांच्या साहाय्याने स्वतःच्या ब्रह्मस्वरूपाचे चिंतन करावे 'अहं ब्रह्मास्मि' या महावाक्याच्या विवरणाने आपल्या सामर्थ्यानुसार ते समजून घ्यावे आणि त्याचा सर्वकाळ अभ्यास करावा. ॥१६॥

श्रद्धालु जो येणें आपुली । स्वकीय ब्रह्मता यथार्थ निवडिली ।
लयसाक्षित्वाची प्रतीति जे बाणली । ते चिंतावी बुद्धिवृत्तीनें ॥ ५५ ॥
जो श्रद्धाळू आहे, त्याने स्वतःची ब्रह्मता योग्य रीतीने पारखली पाहिजे, त्यानंतर लयसाक्षित्वाचा अनुभव घेतला पाहिजे आणि त्याचे बुद्धिवृत्तीच्या साहाय्याने चिंतन केले पाहिजे. (५०५५)

हेचि ऐशी वाक्यवृत्ति । तेणें कडून यथाशक्ति ।
अनुक्रमें जाणून यथारीतीं । सदा अभ्यासावी ॥ ५६ ॥
हीच वाक्यवृत्ती होय. (वेदातील महावाक्याचा, 'अहं ब्रह्मास्मि' स्वरूपाचा हाच अभिप्राय होय). ती यथानुक्रम, यथारीति जाणून घेऊन नेहमी यथाशक्ति तिचा अभ्यास करावा. (५०५६)

पद : श्रद्धालुब्रह्मतां स्वस्य ।
पदार्थ : श्रद्धाळू व्यक्तीने स्वतःचे ब्रह्मस्वरूप.

श्रद्धालु जो लयसाक्षिज्ञाता । जो निरोपिला पूर्वश्लोकी आतां ।
तेणें जाणिली जे स्वकीय ब्रह्मता । विचारें की अभ्यासें ॥ ५७ ॥
श्रद्धाळू म्हणजे लयसाक्षीचा ज्ञाता, त्याचे स्वरूप आताच अगोदरच्या श्लोकात वर्णन करून सांगितले आहे, त्याला जी स्वतःची ब्रह्मता जाणवली आहे, मग ती विचाराने असो की अभ्यासाने; (५०५७)

तेचि अपरोक्ष जरी जाणिली । तरी ते दृढ अपरोक्षता नाहीं बाणली ।
कारण की संशयाची मुळी खांदली । नाहीं निपटुनी ॥ ५८ ॥
पण तीच प्रत्यक्ष अनुभवाने जरी जाणून घेतली आणि ती अपरोक्षता त्याच्या ठिकाणी अद्याप दृढ होऊन बाणलेली नसते, कारण त्याच्या मनातून संशयाचे मूळ त्याने अद्याप उपटून काढलेले नाही; (५०५८)

क्षणां ब्रह्मता आठवे वृत्ति । अहंब्रह्म लयसाक्षीची प्रतीति ।
क्षण एक उठेल मागुती । अहं देह म्हणोनी ॥ ५९ ॥
एका क्षणात वृत्ती ब्रह्मतेचे स्मरण घेते, 'अहं ब्रह्मास्मि' अशी लयसाक्षीची प्रतीती घेते आणि, लगेच दुसऱ्या क्षणी 'अहं देह' (मी देह) अशी वृत्ती त्याच्या ठिकाणी उठते, (५०५९)

आणि स्फूर्तीपासून जे बत्तीस । मिथ्यात्वें विवेचिले असतां फोस ।
तयां मागुतां नामरूपास । सत्यता येतसे ॥ ६० ॥
आणि स्फूर्तीपासून जी बत्तीस तत्त्वे निर्माण होतात, आणि जी पोकळ आहेत म्हणून विवेचनान्ती कळते, अशा तत्त्वांना देहबुद्धीने सत्यता येते. आणि पुन्हा नामरूपे सत्य वाटू लागतात. (५०६०)

म्हणसी अनात्मत्वें जें त्यागिलें । तें स्वात्मत्वें केवीं जाय घेतलें ।
आणि मिथ्यात्वें विवेचून अव्हेरिलें । तया सत्यत्व ये कैसें ॥ ६१ ॥
तू म्हणशील की, ज्यांचा अनात्मा म्हणून त्याग केला, त्याचा पुन्हा स्वतःचा आत्मा म्हणून कसा स्वीकार करण्यात येतो, आणि मिथ्या म्हणून ज्याचा विवेचनपूर्वक त्याग केला, त्यांना सत्यत्व कसे येते? (५०६१)

तरी अवधारी देह व्यापारतां । वृत्तीने इंद्रियद्वारा विषय घेतां ।
उठेल किंचित देहादि अहंता । तेणे सत्यत्वही ये सर्वां ॥ ६२ ॥
तेव्हा लक्ष देऊन ऐक. देहाचे व्यापार होत असताना, वृत्तीने इंद्रियद्वारा विषयसुख घेताना, देहादिकांबद्दल काहीशी आत्मीयता येते; त्यायोगे सगळ्या गोष्टींचे सत्यत्व वाटू लागते. (५०६२)

अमुक एक पुण्यात्मक घडलें । तेव्हां सहज वाटे म्यां चांगुलें केलें ।
हेच की देहबुद्धीसी घेतलें । स्वयें ब्रह्मत्व त्यागूनी ॥ ६३ ॥
अमुक एक पुण्यात्मक कृत्य घडले, तेव्हा सहजच वाटते की 'मी किती चांगले काम केले!' याचाच अर्थ असा की त्याने आपल्या ब्रह्मत्वाचा त्याग करून देहबुद्धीचा स्वीकार केला आहे. (५०६३)

अमुक एक पापात्मक घडे । तेव्हां सहज दुश्चितपण जोडे ।
हेंचि की देहबुद्धीचें सांकडें । घेतलें ब्रह्मत्व त्यागूनी ॥ ६४ ॥
अमुक एक पापात्मक कृत्य घडले, तेव्हा सहजच मन उद्विग्न होते. याचाच अर्थ असा की, आपल्या ब्रह्मत्वाचा त्याग करून त्याने देहबुद्धीचे संकट ओढवून घेतले. (५०६४)

हे असो वृत्तीचा अभ्यास जया । ऐसें गुप्तत्वे उत्थान होय तया ।
परी नूतन अभ्यासी जाणे जरी लया । तया तो विशेषे उठे ॥ ६५ ॥
हे राहू देत, ज्याला वृत्तीचा अभ्यास घडतो, त्याच्यासुद्धा देहबुद्धीचे गुप्तपणे असे उत्थान होत असते; आणि नवीन देहबुद्धी जशी अभ्यासाने लयाला जाते तशी ही देहबुद्धी सहजासहजी लय पावत नाही. ती विशेष प्रकाराने उत्पन्न होते. (५०६५)

विशेष म्हणिजे देह व्यापारतां । मीच असे पापपुण्याचा कर्ता ।
हें भोगणेंच लागे आवश्यकता । केलें तें न चुके ॥ ६६ ॥
विशेष म्हणजे देहाचे व्यापार होत असताना “मीच पापपुण्याचा कर्ता आहे, त्याची फळे आता मलाच भोगावी लागतील, जे केले ते कधी चुकणार नाही, अशी भावना. (५०६६)

ऐसा संशय जरी कर्तेपणाचा । तो जन्मचि पावेल अवश्य साचा ।
ब्रह्मत्व जाणोनीही अज्ञानाचा । सहसा पाश तुटेना ॥ ६७ ॥
असा कर्तेपणाचा नुसता संशय जरी आला तरी त्या साधकाला जन्म घ्यावा लागेल. कारण त्याने ब्रह्म जाणून घेतले तरी त्याच्या अज्ञानाचा पाश अद्याप सुटलेला नाही. (५०६७)

विशेषे अहंता जन्मा घाली । हें तो बोलणेंचि नको बोली ।
परी गुप्तत्वे जे अहंता घेतली । तेही प्रवाहीं पाडी ॥ ६८ ॥
विशेष अहंता त्यास पुन्हा जन्माला घालील, हे तर बोलायलाच नको, पण गुप्तपणे जी अहंता उद्भवते तीसुद्धा त्याला जन्ममरणाच्या प्रवाहात पाडते. (५०६८)

ऐशी गुप्त अथवा विशेष अहंता । उठेल जरी ब्रह्मत्व जाणतां ।
तेणेंचि मिथ्यासी येतसे सत्यता । आणि भेदही नामरूपा ॥ ६९ ॥
अशा प्रकारे ब्रह्मत्व जाणल्यानंतरही गुप्त अथवा विशेष अहंता उठली तर त्यामुळे मिथ्या गोष्टीला सत्यत्व दिले जाते. त्यामुळे नामरूपाचे भेदही निर्माण होतात. (५०६९)

ऐसा विक्षेपाचा पडेल घाला । कारण की वृत्तीसी अभ्यास नाहीं जाहला ।
म्हणोनि साधकें अगत्य पाहिजे केला । अभ्यास बोलिजे तैसा ॥ ७० ॥
अशा प्रकारे विक्षेपाचा घाला पडेल. कारण वृत्तीचा अभ्यास केलेला नसतो. म्हणून साधकाने आता सांगण्यात येईल त्याप्रमाणे अभ्यास अवश्य केला पाहिजे (५०७०)

पद : चिंतयेबुद्धिवृत्तिभिः । जे ब्रह्मता लयसाक्षी देखणी ।
जे विलक्षण सर्व सविकल्पहनी । तेचि एकतान बुद्धि वृत्तीकडूनी । अविस्मर चिंतावी ॥ ७१ ॥
पदार्थ : साधकाने बुद्धी आणि वृत्ती यांच्या साहाय्याने स्वतःच्या ब्रह्मत्वाचे चिंतन करावे. ॥१६॥ लयसाक्षित्व पाहणारी जी ब्रह्मात्मता आहे, जी सर्व सविकल्पांमधून विलक्षण आहे तिथेच बुद्धिवृत्ती एकतान करून न विसरता चिंतन करावे (५०७१)

वृत्तीची अथवा मनबुद्धीची । भलती अवस्था या उपाधीची ।
तरी आपुली ब्रह्मता जे लयसाक्षित्वाची । कदां विसरूंचि नये ॥ ७२ ॥
वृत्ती अथवा मन, बुद्धी या उपाधींची कोणतीही अवस्था असो, आपल्या लयसाक्षित्वाची जी ब्रह्मात्मता आहे तिचा मात्र केव्हाही विसर पडू देऊ नये. (५०७२)

मनबुद्धि जरी नुद्भवतां । नुसधी वृत्ती उठे निर्विकल्पा ।
तरी या वृत्तीचा मी आत्मा जाणता । हे वृत्ति मिथ्या स्मरावी ॥ ७३ ॥
मन व बुद्धी जरी उत्पन्न झाली नाहीत तरी केवळ नुसती निर्विकल्पतारूप वृत्तीच उत्पन्न होते. तेव्हा तेव्हा मी आत्मा असून या वृत्तीचा जाणता आहे व ही वृत्ती मिथ्या आहे, याचे स्मरण ठेवावे. (५०७३)

अथवा वृत्तियोगें मनबुद्धि उठे । तेव्हां मननरूप स्वप्न अंतरीं उमटे ।
तें असो वाईट कीं गोमटें । परी अहमात्मा विसरूं नये ॥ ७४ ॥
किंवा या वृत्तीमुळे मन बुद्धी निर्माण झाली तेव्हा मननरूप स्वप्न मनात उमटते. ते वाईट की चांगले असो, परंतु 'अहम् आत्मा' (मीच आत्मा आहे) याचे विस्मरण होऊ देऊ नये. (५०७४)

मी आत्मा ब्रह्म साक्षी साचा । त्याहनी मिथ्यात्वे उभारा याचा ।
वृत्ति मनबुद्धि आणि आभासाचा । वाउगा रज्जुसर्पभ्रम ॥ ७५ ॥
मीच आत्मा असून खरोखरच ब्रह्मसाक्षी आहे. त्यापेक्षा मन, बुद्धी, वृत्ती, आभास यांची उत्पत्ती खोटी असून ती रज्जूवरील सर्पाच्या भासाप्रमाणे निरर्थक आहे (५०७५)

तेचि प्रारब्ध भोगाचिये बळें । मन बुद्धि इंद्रियद्वारा उसळे ।
शुभाशुभ घेतां विषयसोहळे । परी विस्मरण पडूं नये ॥ ७६ ॥
ती मन, बुद्धी प्रारब्धामुळे उठून इंद्रियांच्या मार्गाने शुभ अशुभ विषय सुखाचे सोहळे भोगतात. ते भोगत असतानासुद्धा आपल्या ब्रह्मत्वाचे विस्मरण होऊ देऊ नये. (५०७६)

वृत्ति मनबुद्धि प्राण इंद्रिय । आणि गोलकासहित स्थूल काय ।
शब्दस्पर्शादि नाना विषय । हे विवेचिले जैसे ॥ ७७ ॥
वृत्ती, मन, बुद्धी, प्राण, इंद्रिये, स्थूल शरीर, इंद्रियांची गोलके, शब्द स्पर्शादी नाना विषय यांचे वर्णन पूर्वी केलेलेच आहे. (५०७७)

या इतुकियाही नामरूपासी । पृथक सत्व नव्हेचि सर्वांसी ।
आहे तें अस्ति भाति प्रियरूपेंसी । एकलें ब्रह्म विराजे ॥ ७८ ॥
या इतक्या सर्व नामरूपात्मक पदार्थांना स्वतंत्र सत्ता (अस्तित्व) नाहीच. अस्तित्व असलेला पदार्थ केवळ एकच अस्ति, भाति आणि प्रियरूप ब्रह्म हाच आहे. (५०७८)

तस्मात् तेंचि ब्रह्मात्मत्व आपुलें । विसरूंचि नये काही केलें ।
नामरूप जाहलेंचि नाही पहिलें । त्यावरी उमसूंच न द्यावें ॥ ७९ ॥
म्हणून आपलेही अस्तित्व ब्रह्मातत्त्व हेच आहे. त्याचे कधीही विस्मरण होऊ देऊ नये. नामरूप हे मुळात झालेच नाही. त्यामुळे त्याची उत्पत्तीच होऊ देऊ नये. (५०७९)

मग अवस्था यया बुद्ध्यादिकांची । भलतैशी असो यथारुचि ।
जागृत स्वप्न सुषुप्ति या प्रवृत्तीची । की निवृत्ति समाधीरूप ऐशी ॥ ८० ॥
मग या बुद्धी, मन, वृत्ती इ. ची अवस्था जागृती, स्वप्न, सुषुप्ती, समाधी यांमध्ये प्रवृत्तीची असो, अथवा निवृत्तीची असो, कशीही असो; (५०८०)

प्रवृत्ति म्हणिजे बहिर्मुखता । निवृत्ति म्हणजे अंतर्मुखता ।
परि हे मिथ्या आणि सत्य ब्रह्मात्मता । कदा विसरूं नये ॥ ८१ ॥
प्रवृत्ती म्हणजे बहिर्मुखता आणि निवृत्ती म्हणजे अंतर्मुखता, पण या दोन्ही वृत्ती मिथ्या असून ब्रह्मात्मताच तेवढी सत्य आहे, हे केव्हाही विसरू नये. (५०८१)

अत्यंत सुखों असो सुखी । कीं अत्यंत दुःखाने होवो दुःखी ।
अथवा प्राणांत जरी होतां शेखीं । विस्मरण न पडावें ॥ ८२ ॥
सुखातिशयाने सुखी असो, किंवा दुःखातिरेकाने दुःखी असो, किंवा शेवटी प्राणांत होण्याची वेळ आली तरीही ब्रह्मात्मतेचे विस्मरण होऊ देऊ नये. (५०८२)

क्षणएक विस्मर जरी होतां । बलात्कारें स्मरावें तत्त्वतां ।
इतुक्या विस्मरणे वाटावें चित्ता । कीं काय घात जाहला असे ॥ ८३ ॥
एक क्षणभर जरी विसर पडला तरी मोठ्या नेटाने लगेच स्मरण करावे. आणि एवढ्या अल्पकालीन विस्मरणाबद्दल सुद्धा मनात फार मोठा अपराध झाल्याप्रमाणे खंत वाटावी. (५०८३)

येथवरी प्रतिज्ञा वृत्तीने करावी । की निमिषार्ध जरी विस्मृति व्हावी ।
तरी मज गुरुहत्या संभवावी । ब्रह्महत्यादि तो अनंत ॥ ८४ ॥
वृत्तीने अशी प्रतिज्ञा करावी की अर्धा निमिष जरी विस्मरण झाले तरी मला गुरुहत्येचे पातक लागेल आणि ब्रह्महत्यांचे तर विचारूच नका. तर मला अनंत ब्रह्महत्यांचे पातक लागेल. (५०८४)

पुन्हां करुणा भाकावी गुरूसी । कीं म्यां प्रतिज्ञा केली जे ऐशी ।
हे दयाळु वा न्यावी सिद्धीसी । आपुलिया कृपे ॥ ८५ ॥
नंतर पुन्हा सदुरूंना प्रार्थना करून विनंती करावी की, “गुरू महाराज, मी तर अशी प्रतिज्ञा केली आहे. ती दयाळू होऊन आपल्या कृपेने सिद्धीस न्यावी. (५०८५)

निमिषार्थ विस्मरण न पडावें । आणि हे गुरुहत्यादि न घडावे ।
ऐसें प्राथुनिया स्मरत जावें । भयातुर होऊनी ॥ ८६ ॥
अर्ध्या निमिषाचेसुद्धा विस्मरण मला होऊ नये. आणि मला गुरूहत्येचे पातक माझ्या हातून न घडावे. अशी प्रार्थना करून त्यांना असे विनवावे की, आपल्या कृपेने मला नित्य स्मरण राहील, असे करावे. (५०८६)

ऐसा व्यापार आणि ब्रह्मात्म स्मृति । एकतान असावी भलते अवस्थेप्रती ।
जागें जाहलियापासून गाढ लागे सुप्ति । तोवरी विस्मृति न व्हावी ॥ ८७ ॥
अशा प्रकारचा व्यवहार आणि ब्रह्मात्मत्वाचे स्मरण ही दोन्ही कोणत्याही अवस्थेत एकमेकांशी सुसंवादी राहावीत. जागे झाल्यापासून ते गाढ झोप लागेपर्यंत कधीही मला विस्मरण होऊ नये. (५०८७)

जागरी अथवा कल्पनेआंत । स्मृतीचा लोटे जरी विस्मृतीरहित ।
तरी सुप्तीमाजीही अकस्मात् । स्मरणाचेंचि फळ घडे ॥ ८८ ॥
जागृती अथवा कल्पनेच्या (स्वप्नाच्या अवस्थेत) स्मरणाचे विस्मरणरहित भान अखंडपणे राहिले तर झोपेमध्येही (सुषुप्तीमध्येही) अकस्मात स्मरणाचेच फळ प्राप्त होते. (५०८८)

कारण की तेथें अन्यभाव नसे । सामान्य एकरूप निर्विकल्प असे ।
नेणीव कल्पिली होती ते नासे । अभ्यासें स्मृतीच्या ॥ ८९ ॥
कारण की सुषुप्तीच्या अवस्थेमध्ये दुसऱ्या कोणत्याही भावनेने स्मरणाची जागा घेतलेली नसते. सर्वत्र सामान्य एकरूप असे निर्विकल्पच व्यापून असते. झोपेमध्ये आपण जी नेणिवेची (म्ह. अज्ञानाची) कल्पना केली होती, ती स्मृतीच्या (स्मरणाच्या) अभ्यासाने नष्ट होते. (५०८९)

एवं स्वप्न जागृती सुप्ती समाधि । मृत्यु मूर्छा की आधि व्याधि ।
परी हे विस्मृतीच न पडावी कधीं । ब्रह्मात्मत्वाची ॥ ९० ॥
अशा प्रकारे जागृती, सुषुप्ती, समाधी, मृत्यू. मूर्छना (बेशुद्ध होणे), मानसिक विकृती (आधी) व शारीरिक विकृती (व्याधी) यापैकी कोणतीही अवस्था असो, ब्रह्मात्मत्वाची विस्मृती कधीच होऊ नये (५०९०)

ऐशिया ब्रह्मात्मत्व अनुसंधाना । संती नाम ठेविलें उपासना ।
जेथे उपास्य उपासक असेना । भेद कल्पान्तीं ॥ ९१ ॥
अशा प्रकारच्या ब्रह्मात्मत्वाच्या अनुसंधानालाच संतांनी उपासना हे नाव ठेविले आहे. त्या अनुसंधानामध्ये कल्पान्तकाळीसुद्धा उपास्य आणि उपासक असा भेद उद्भवत नाही. (५०९१)

याचि उपासनेचे प्रकार दोन । मग सगुण एक निर्गुण ।
हे साकल्य पुढे करूं वर्णन । परी श्लोकार्ध आधी अवधारा ॥ ९२ ॥
याच उपासनेचे दोन प्रकार आहेत. एक सगुण आणि दुसरा निर्गुण. त्यांचे साकल्याने पुढे वर्णन करणार आहोतच. परंतु त्याआधी प्रस्तुत श्लोकाच्या (१६ व्या) उत्तरार्धाकडे जरा लक्ष द्या. (५०९२)

श्लोकः वाक्यवृत्या यथाशक्त्या ज्ञात्वात्वभ्यस्यतां सदा ॥ १६ ॥ (उत्तरार्ध)
अर्थ : 'अहं ब्रह्मास्मि' या महावाक्याच्या विवरणाने आपल्या सामर्थ्यानुसार ते समजून घ्यावे आणि त्याचा सर्वकाळ (सदा) अभ्यास करावा. ॥१६।। (उत्तरार्ध)

वाक्यवृत्तीच्या योगेंकडून । साकल्प जाणावें लयसाक्षिज्ञान ।
तेंचि स्मरणरूप अनुसंधान । सदा अभ्यासावें ॥ ९३ ॥
वाक्यवृत्तीच्या साहाय्याने (महावाक्याच्या विवरणपूर्वक अभ्यासाने) लयसाक्षीचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घ्यावे आणि त्याचे अनुसंधानयुक्त स्मरण ठेवून त्याचा नित्य अभ्यास करावा. (५०९३)

यथाशक्त्या ऐसें जें वचन । येथे भावील कोणी भित्र ।
की जितुकें कळेल तितुकेंचि जाणून । स्वस्थ रहावें ॥ ९४ ॥
श्लोकातील यथाशक्त्या असा शब्द पाहून कोणी वेगळीच कल्पना करील. ती अशी की, जेवढे कळेल तेवढेच जाणून घेऊन स्वस्थ बसावे. (५०९४)

तरी ऐसा याचा अर्थ नव्हे । यथार्थ जाणिल्याविण समाधान न संभवे ।
तस्मात् साकल्यत्वें लागे जाणावें । अभ्यासें की विचारें ॥ ९५ ॥
तर त्याचा तसा अर्थ नाही. कारण लयसाक्षी ब्रह्मात्म्याचे यथार्थ ज्ञान झाल्याशिवाय समाधान संभवतच नाही. म्हणून जे जाणावयाचे आहे ते अभ्यासाच्या अथवा विचाराच्या साहाय्याने संपूर्णपणेच जाणून घ्यावे लागते. (५०९५)

यथा ह्मणिजे जैसा असे तैसा । जाणावाचि लागे लयसाक्षी सहसा ।
शक्ति हणिजे सामर्थ्य अभ्यासा । असाध्य तें साधावें ॥ ९६ ॥
यथाचा येथील अर्थ जसा आहे तसा. लयसाक्षी ब्रह्मात्मा जसा आहे तसाच जाणून घ्यावा लागतो. शक्ती म्हणजे सामर्थ्य, अभ्यासाने हे असाध्य कार्य साधावे. (५०९६)

सामर्थ्याविण हे लयसाविज्ञान । प्रतीतीस न ये येर होपळा लागून ।
तस्मात सामर्थ्य पाहिजे तीव्रप्रज्ञ । तोचि आकळी विचारें ॥ ९७ ॥
असे सामर्थ्य असल्यावाचून असे लयसाक्षीचे ज्ञान इतर कोणाही येरागबाळाला अनुभवता येणार नाही. म्हणून समर्थ असा साधक तीव्रप्रज्ञच असला पाहिजे. तोच तेवढा विचाराच्या साहाय्याने ते जाणू शकेल. (५०९७)

मंदप्रज्ञ पूर्वी जरी असे । परी तया अभ्यासें प्रज्ञा येतसे ।
तया प्रज्ञेच्या सामयेंचि होतसे । लयसाक्षिज्ञान ॥ ९८ ॥
एखादा अगोदर मंदप्रज्ञ असेल तरी अभ्यासाच्या साहाय्याने त्याच्या ठिकाणी प्रज्ञेचा प्रादुर्भाव होतो. आणि त्या प्रज्ञेच्या सामर्थ्यानेच त्याला लयसाक्षीचे ज्ञान होते. (५०९८)

तस्मात ऐशिया प्रज्ञेच्या शक्तीकडून । जैसा असे लयसाक्षी सच्चिद्धन ।
तैसा यथारीतीं साकल्य जाणून । पुढे अभ्यासावा दृढ ॥ ९९ ॥
म्हणून प्रज्ञेच्या सामथ्यनिच सच्चिद्घन लयसाक्षी जसा असेल तसा यथारीती (रीतीप्रमाणे) संपूर्णपणे जाणून घ्यावा आणि अभ्यासाने ते ज्ञान पक्के म्हणजे दृढ करावे. (५०९९)

आतां वाक्यवृत्ति ते हे ऐशी । मागाहून निरूपणाचे सारांशी ।
आलोढून आली जे तेचि अल्पशी । प्रतीति पुन्हां निरोपूं ॥ ५१०० ॥
आता वाक्यवृत्ती म्हणजे काय? तर यापूर्वीच्या निरूपणाच्या सारांशामध्ये जिचा विचार झाला आहे त्याचाच थोडासा अनुभव येथे पुन्हा एकदा सांगतो. (५१००)

वेदान्तीचा मुख्य विषय । प्रत्यगात्मा ब्रह्माद्वय ।
हाचि अर्थ सांगती निश्चय । चहं वेदांची वाक्यें ॥ १ ॥
वेदान्तामधील मुख्य विषय म्हणजे देहान्तर्गत प्रत्यगात्मा (कूटस्थ) हाच अद्वय (एकमेव) ब्रह्म आहे, हाच आहे. हाच चारी वेदांची महावाक्ये निश्चयपूर्वक सांगत आली आहेत. (५१०१)

सामवेदाचें वाक्य सच्छिष्यासी । श्रीगरु सांगती तें तूं आहेसी ।
तेचि साधके श्रवणमननेंसी । प्रत्यया आणावें ॥ २ ॥
श्रीगुरूंनी सच्छिष्याला सामवेदातील 'तत्त्वमसि' (ते तू आहेस) हे महावाक्य सांगितले. तेच साधकाने श्रवण मनन करून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. (५१०२)

तिन्ही अवस्था ज्या होती । आणि बत्तिसांसी जाणे ते चिती ।
तेंचि प्रज्ञानब्रह्म निश्चितीं । ऋग्वेदाचें विचारावें ॥ ३ ॥
स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था आहेत आणि जी बत्तीस तत्त्वे आहेत या सर्वांना जी जाणते ती चिती म्हणजे चिद्ब्रह्म तेच निश्चयाने प्रज्ञान ब्रह्म (प्रज्ञानं ब्रह्म) आहे, असे ऋग्वेदाचे महावाक्य सांगते, त्याचा विचार करावा. (५१०३)

अहंकारादि बत्तीस निरसून । अनुभवावें तें स्वयें आपण ।
तेंचि वाक्य अहंब्रह्मास्मि ह्मणून । यजुर्वेदाचें ॥ ४ ॥
अहंकार इत्यादी बत्तीस तत्त्वांचे निरसन करून आपण स्वतःच ज्याचा अनुभव घ्यावा तेच यजुर्वेदाचे महावाक्य म्हणजे 'अहं ब्रह्मास्मि' (मी ब्रह्म आहे) हे होय. (५१०४)

विचारें की अभ्यासें लय वृत्तीचा । करोनि स्वप्रकाश अपरोक्ष साक्षी साचा ।
हाचि अयमात्मा अथर्वणाचा । अर्थ बोले महावाक्य ॥ ५ ॥
विचाराने किंवा अभ्यासाने वृत्तीचा लय करून जे स्वयंप्रकाशी प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहे ते साक्षी तत्त्व म्हणजेच अथर्ववेदाचे महावाक्य 'अयमात्मा' (हाच आत्मा होय) हे होय. या महावाक्याचा हाच अर्थ आहे. (५१०५)

ऐशी महावाक्ये चारी एकार्थी । वेदांतविषय मुख्य परमार्थी ।
येर निरूपण बहुधा परी यदर्थी । साधावया उपकरणे ॥ ६ ॥
अशी चार महावाक्ये एकाच अर्थाची आहेत. परमार्थाचा मुख्य विषय जो वेदान्त त्याची याच अर्थाची पुष्कळ प्रकारची निरूपणे आहेत. ती सर्व हाच अर्थ सांगणारी साधने आहेत. (५१०६)

नाना युक्ति नाना दृष्टान्त । इतुक्या विषयांसी करी निश्चित ।
गुरुशास्त्रविचारें श्रवणमननयुक्त । दृढ अनुभवावें ॥ ७ ॥
यासंबंधीची निरूपणे निरनिराळ्या युक्त्या, निरनिराळे दृष्टान्त यांनी युक्त असून हाच विषय निश्चित करतात. गुरू, शास्त्रे आणि विचार यांच्या साहाय्याने श्रवण, मनन करून त्यांचा अनुभव घ्यावा. (५१०७)

ऐसें अनुभवून यथारीतीं । साधकें प्रज्ञेचिये शक्तीं ।
भलतेही अवस्थेप्रती । एकतान अभ्यासावें ॥ ८ ॥
अशा प्रकारे सांगितलेल्या रीतीनुसार साधकाने स्वतःच्या बुद्धीच्या सामान कोणत्याही अवस्थेत एकाग्रतेने त्यांचा अभ्यास करावा. (५१०८)

स्फूर्तीपासून तृणान्त नामरूप । विसर्जावें हे सर्व सविकल्प ।
एक सच्चिदानंद केवळ निर्विकल्प । अहंब्रह्मरूप स्मरावें ॥ ९ ॥
स्फूर्तीपासून तृणापर्यंतची सर्व नामरूपे सविकल्प आहेत. त्यांचे विसर्जन करून केवळ निर्विकल्प सच्चिदानंद अहं ब्रह्माचेच फक्त स्मरण करावे. (५१०९)

सामान्य वृत्तीने हेंचि घ्यावें । सच्चिद्घन स्मृतीने अवलंबावें ।
अथवा बुद्धीने दृढ निश्चया आणावें । स्मरावें विशेषेही ॥ १० ॥
सामान्य वृत्तीनेही त्याचेच ग्रहण करावे, आणि स्मरणाच्या साहाय्याने सच्चिद्घन ब्रह्माचाच स्वीकार करावा. अथवा बुद्धीने त्याविषयीचा निश्चय दृढ करावा. आणि विशेष म्हणूनही त्याचेच स्मरण करावे (५११०)

हे असो अंतरीच स्मरण । करणे हे विहितचि एकतान ।
परी वाणीसीही करावें उच्चारण । अहंब्रह्मास्मि म्हणोनी ॥ ११ ॥
हे अंतःकरणाने करावयाचे स्मरण झाले. बाह्य इंद्रियांनी सुद्धा यावरच लक्ष केंद्रित करावे. आणि वाणीनेही 'अहं ब्रह्मास्मि'चेच उच्चारण करावे. (५१११)

वाक्यार्थाचें जें का व्रत । वाणी बुद्धि किंवा वृत्तींत ।
ठेवावें म्हणोनि हे वाक्यवृत्ति निश्चित । नाम ठेविलें असे ॥ १२ ॥
महावाक्यांच्या अर्थाच्या संदर्भात आचरण करण्याचे हेच व्रत आहे. वाणी, बुद्धी किंवा वृत्तीत हेच नेहमी ठेवावे, म्हणून त्यास वाक्यवृत्ती असे नाव निश्चित केले आहे. (५११२)

तस्मात् ऐशिये वाक्यवृत्तीचें । आवर्तन कीजे साधके साचें ।
मग सामान्य विशेष की वाणीचें । असो उच्चारण ॥ १३ ॥
म्हणून अशा या वाक्यवृत्तीचे साधकाने सामान्य वृत्ती, विशेष वृत्ती किंवा वाणीचा उच्चार या सर्वात आवर्तन करत जावे. (५११३)

कवणेही प्रकारें आठवावें । अहंब्रह्मास्मीतें न विसरावें ।
नामरूप सर्वांसी नुद्भवावें । सर्व पूर्ववत असतां ॥ १४ ॥
कोणत्याही प्रकाराने का होईना, त्याचे नित्य स्मरण ठेवावे. परंतु कधीही 'अहं ब्रह्मास्मि'चे विस्मरण होऊ देऊ नये. या सर्व प्रकारात कोठेही नामरूपाची उत्पत्ती होऊ देऊ नये. सर्व पूर्ववत असतानाही नामरूपाची उत्पत्ती होऊ देऊ नये. (५११४)

हेंचि ध्यान हाचि निदिध्यास । हाचि साधका सर्वदा अभ्यास ।
बहु बोलणे तरी कासयास । हेंचि भजन वाणीचें ॥ १५ ॥
साधकासाठी हेच ध्यान असावे, त्याचाच नित्य निदिध्यास असावा, हाच अभ्यास त्याने सर्वकाळ करावा. जास्त काय सांगावे, वाणीने त्याचेच भजन करावे. (५११५)

अगा रविदत्ता हेचि उपासना । सगुण निर्गुण उभयही लक्षणा ।
ज्ञानासी इसी सहसा असेना । भेद किमपि ॥ १६ ॥
अरे रविदत्ता, हीच उपासना होय. ती सगुण असो वा निर्गुण असो, ती दोहींकडे समानच आहे. ज्ञानाच्या बाबतीत तिच्यामध्ये काहीही भिन्नता नाही. (५११६)

अहंब्रह्मास्मिरूप अनुसंधान । अविस्मर साधका एकतान ।
भेद नुठावा अमुक ह्मणून । हेचि अभेदभक्ति ॥ १७ ॥
अहं ब्रह्मास्मि' या प्रकारचे एकतान, विस्मरण न होऊ देता साधकाने अनुसंधान ठेवावे. हे अमुक आहे. या प्रकारचा भेद अजिबात उठू नये. हीच अभेदभक्ती होय. (५११७)

नामरूपाचा उद्भवचि न होतां । सर्व आहे की नाहीं न स्मरतां ।
सच्चिद्घनाकार एकरूपता । हेचि निर्गुण उपासना ॥ १८ ॥
नामरूपाची उत्पत्तीच होऊ न देता, सर्व आहे की नाही याचे स्मरण न करता सच्चिद्घनाकार एकरूपता होणे हीच निर्गुण उपासना होय. (५११८)

हे बत्तीस मिथ्यात्वे आठवणे । यामाजी सच्चिद्घनानंदा स्मरणें ।
किंचितही विस्मृति न होणे । हे सगुण उपासना ॥ १९ ॥
सर्व बत्तीस तत्त्वांना मिथ्या म्हणून आठवणे, त्यांमध्ये सच्चिद्घनानंदाचे स्मरण करणे, किंचितही विस्मरण पडू न देणे, हीच सगुण उपासना होय. (५११९)

व्यतिरेकें लयसाक्षित्वें प्रतीति । निःसंशय द्वैताची गेली भ्रांति ।
हेचि निर्गुण उपासना निश्चितीं । घडे साधका ॥ २० ॥
व्यतिरेकाने, द्वैताची भ्रांती निःशेष गेल्यानंतर लयसाक्षित्वाचा अनुभव घेणे हीच साधकांना निश्चितपणे घडणारी निर्गुण उपासना होय. (५१२०)

सर्वांमाजीं अस्ति भाति प्रिय । सहजीं असे पूर्ण अन्वय ।
नामरूप नाहींच एक अद्वय । स्मरण हे सगुण उपासना ॥ २१ ॥
सर्व पदार्थांमध्ये अस्तिभातिप्रिय अशा ब्रह्माचाच अन्वय (संबंध) सहजरीतीने आहे हे स्मरण ठेवणे, नामरूप नाहीच, आहे ते एकमेव अद्वय ब्रह्मच आहे, याचे स्मरण ठेवणे हीच सगुण उपासना होय. (५१२१)

सर्वपणाचे गुण निरसले । एक अनिर्वाच्य ब्रह्म उरलें ।
म्हणोनि तें निर्गुण ब्रह्म बोलिलें । तेंचि स्मरणे हे निर्गुण उपासना ॥ २२ ॥
सर्वपणाचे गुण नाहीसे केल्यानंतर एकमेव अनिर्वाच्य ब्रह्मच उरते. म्हणून त्याला निर्गुण ब्रह्म असे म्हणतात. त्याचेच स्मरण करणे म्हणजे निर्गुण उपासना होय. (५१२२)

सर्व हे गुणरूप असतां । या समवेत हे म्हणून नुद्भवतां ।
एकरूप सच्चिद्घनचि तत्त्वतां । हे सगुण उपासना ॥ २३ ॥
हे सर्व विश्व गुण रूप आहे. तें उत्पन्न झाल्यानंतर त्याच्याबरोबर गुण येणारच. पण त्याचे गुणरूप न आठवणे आणि हे सर्व खरे पाहता एकरूप सच्चिद्घनच आहे असे भान ठेवणे ही सगुण उपासना होय. (५१२३)

या गुणासहवर्तमान ब्रह्म स्मरावें । म्हणोनि हे सगुण उपासन म्हणावें ।
या गुणाविरहित ब्रह्मात्मत्व घ्यावें । हे निर्गुण उपासना ॥ २४ ॥
या उपासनेत ब्रह्माचे त्याच्या गुणांसह स्मरण ठेवले जाते म्हणून त्या उपासनेला सगुण उपासना म्हणतात. हे गुण वगळून जेव्हा ब्रह्मात्मत्वाचे ग्रहण केले जाते तेव्हा तिला निर्गुण उपासना म्हणतात. (५१२४)

एवं सगुण अथवा निर्गुण । हे वाउगेचि कल्पावे दोन ।
परी एकरूप अभेद परिपूर्ण । अद्वय उपासना ॥ २५ ॥
अशा रीतीने सगुण उपासना आणि निर्गुण उपासना असे भेद खोटेखोटेच कल्पावे लागतात. परंतु या दोन्ही उपासना एकरूप आणि पूर्णपणे अभिन्न आहेत. दोन्हीही अद्वय उपासनाच आहेत. (५१२५)

सर्वदा विस्मृति न व्हावी । म्हणोनि उपासना ह्मणावी ।
परी देवभक्त भिन्नता नाढळावी । कवणेही काळीं ॥ २६ ॥
सर्वकाळ आपल्या ब्रह्मरूपाची विस्मृती होऊ नये म्हणून त्यांना उपासना असे म्हटले आहे. पण केव्हाही देवभक्त असा भेद यांमध्ये आढळत नाही. (५१२६)

हे सर्व कधी उत्पन्न जाहलें । न होतां सगुण कवण बोले ।
तेणेंविण निर्गुण शब्द फोलें । होती अनायासीं ॥ २७ ॥
हे सर्व जग मुळात उत्पन्नच कधी झाले? (झालेच नाही). आणि मग त्याला सगुण असे तरी कोण म्हणेल? (कोणी म्हणू शकणार नाही). त्याला सगुण म्हणता येणार नाही तर मग त्यावाचून निर्गुण हा शब्दही त्याच्या बाबतीत व्यर्थ ठरेल. (५१२७)

मृगजळ पडिलें तेव्हांचि नसे । मग आटतां नाही म्हणणे काईसें ।
तेवीं हे उद्भवें की नासे । परी एकरूप ॥ २८ ॥
मृगजळ ज्यावेळी पडले होते, त्यावेळीच ते नव्हते. मग ते नाहीसे झाल्यावर ते नाही असे कसे म्हणता येईल? त्याप्रमाणे हे जग उत्पन्न होवो अथवा ते नष्ट होवो, ते एकरूपच आहे. (त्याच्या दोन्ही अवस्था भ्रामकच आहेत). (५१२८)

हे सर्व निरूपण मागे जाहलें । यथासांग साकल्यत्वें विवेचिलें ।
तेणेंचि रीतीं पाहिजे घेतलें । साधकें विचारें ॥ २९ ॥
हे सर्व निरूपण मागे झाले आहे. अगदी यथासांग साकल्याने त्याचे विवेचन झाले आहे. साधकाने त्याचरीतीने ते विचारपूर्वक समजून घेतले पाहिजे. (५१२९)

आतां प्रस्तुत मिथ्या या बत्तिसां । सत्यत्वें आरोप न व्हावा अल्पसा ।
आणि स्वयें ब्रह्मात्मया अखंडरसा । मिथ्यात्व सहसा न यावें ॥ ३० ॥
आता प्रस्तुत विषय हा आहे की, या बत्तीस तत्त्वांवर सत्यत्वाचा आरोप कधीही करू नये. आणि अखंडरस अशा ब्रह्मात्म्यावर मिथ्यात्व लादले जाऊ नये. (५१३०)

ब्रह्मात्मा भेदचि न व्हावा । मीपणा देहादिकांसी न यावा ।
इतुका वृत्तीसी दृढ अभ्यास रहावा । स्मरणरूप सदा ॥ ३१ ॥
ब्रह्मात्म्याचे ठिकाणी कधीही भेद वाटू नये, देहादिकांबद्दल मीपणाची भावना निर्माण होऊ नये, एवढा वृत्तीला स्मरणरूप दृढ अभ्यास झाला पाहिजे. (५१३१)

हेचि स्मरणरूप उपासना । सगुण निर्गुण उभयलक्षणा ।
विस्मरण न होतां सच्चिद्घना । ध्यावें उभय काळीं ॥ ३२ ॥
हीच स्मरणरूप उपासना होय. ती सगुण आणि निर्गुण अशी दोन प्रकारची आहे. या दोन्ही उपासनांमध्ये सच्चिद्घन अशा ब्रह्मात्म्याचे विस्मरण होऊ न देता ध्यान करावे. (५१३२)

येथें कैंचें ध्येय कैंचा ध्याता । कैंचें साध्य कैंची साधकता ।
उपास्य उपासक नाढळतां । ब्रह्म ब्रह्मीं विलसे ॥ ३३ ॥
खरे तर या उपासनेमध्ये ध्येय कोण आणि ध्याता तरी कोण? साध्य काय आणि साधकता तरी कशाला म्हणायचे? उपास्य आणि उपासक असा भेद या उपासनेमध्ये नसतोच. केवळ ब्रह्मच ब्रह्मामध्ये विलसत असते. (५१३३)

सर्व तरंगांसहित सागर । किंवा निस्तरंगरूप गंभीर ।
दोहीं काळी एकचि प्रकार । सागर सागरी ॥ ३४ ॥
तरंग उठत असलेला सागर किंवा तरंगरहित असा सागर दोन्ही अवस्थांमध्ये सागरच सागरावर क्रीडा करत असतो, असा एकच प्रकार दोन्ही अवस्थांमध्ये असतो. (५१३४)

तैसेंचि माये आदि तृणान्त जग । हे ब्रह्मात्मचित्सागरी तरंग ।
उद्भवतां निमतां चिद्घन अभंग । विलसे एकरूप ॥ ३५ ॥
त्याप्रमाणे मायेपासून ते तृणापर्यंतचे जग म्हणजे ब्रह्मात्मरूपी चैतन्याच्या सागरावरील तरंगांप्रमाणे होय. ते उत्पन्न झाले अथवा लय पावले तरी चैतन्यघन ब्रह्म अखंडपणे एकरूप राहून विलसत असते (५१३५)

ब्रह्मादि कीटकान्त जंगम । गगनादि तृणान्त स्थावर नाम ।
हे इतुकेही ब्रह्मात्मत्वीं सम । नग सुवर्ण जेवीं ॥ ३६ ॥
ब्रह्मापासून ते कीटकापर्यंतचे जंगम जग असो, अथवा आकाशापासून ते तृणापर्यंतचे स्थावर जग असो, हे सर्व ब्रह्मात्मत्वाच्या दृष्टीने दागिन्यातील सुवर्णाप्रमाणे सारखेच असते. (५१३६)

ब्रह्मरूप तोचि हा आत्मा । आत्मरूप ब्रह्म परमात्मा ।
नामरूपादि नाहींच अनात्मा । जड की चंचळ ॥ ३७ ॥
ब्रह्मरूप म्हणजेच हा आत्मा होय. आणि आत्मरूप म्हणजे ब्रह्म परमात्मा होय. नामरूप इ. जे काही आत्मरूप नसलेले जड अथवा चंचळ आहे ते मुळात नाहीच. (५१३७)

कीटक तोही ब्रह्मात्मा आपण । विष्णु तोही आपणचि पूर्ण ।
बहु कासया तृणही नव्हे भिन्न । ब्रह्मात्मया रहित ॥ ३८ ॥
कीटक हाही आपण ब्रह्मात्माच आहे आणि विष्णूदेखील आपण पूर्ण ब्रह्मात्माच आहे. फार काय सांगावे, तृणदेखील ब्रह्मात्म्यावाचून निराळे नाही. (५१३८)

आपुला देह आणि विष्णु कीटक । गगन तृणदिक ही समान एक ।
दुजा भाव नाहींच निश्चयात्मक । ब्रह्मात्मचि परिपूर्ण ॥ ३९ ॥
आपला देह, विष्णू आणि कीटक, गगन, तृण इ. सर्वच समान असून एकच आहेत. त्यांच्यामध्ये निश्चितपणे दुजाभाव नाहीच. सर्वही परिपूर्ण ब्रह्मात्माच आहेत. (५१३९)

ऐसा एकरूप आपण आपणांत । आपुलेपणे एक सबराभरित ।
उपास्य उपासकाविण उपासीत । हे घबाड उपासना ॥ ४० ॥
अशा प्रकारे आपणच आपणात एकरूपच असतो. एक आपलेपणच सर्वत्र व्यापून राहिलेले असते. उपास्य आणि उपासकावाचून येथे उपासना चालू असते. हीच घबाड उपासना होय. (घबाड = महान) (५१४०)

ऐशी अभेद भक्तीची उपासना । घडेल साधका ज्ञानसंपन्ना ।
हे पाववील सहजस्थितीसी पूर्णा । ऐंसें बोलणे नकों ॥ ४१ ॥
ज्ञानसंपन्न साधकाला या प्रकारची अभेद भक्तीची उपासना घडेल. ही उपासना त्याला सहजस्थिती प्राप्त करून देईल, हे सांगायची गरज नाही. (५१४१)

तो आधींच सर्वपणासहित । निजांगे ब्रह्म होऊन विचरत ।
तयासी बंधमोक्षाचा संकेत । उरलाचि नाही ॥ ४२ ॥
असा उपासक अगोदरच सर्वपणासहित स्वतः ब्रह्म होऊन हिंडत असतो. त्याच्या बाबतीत बंधन अथवा मोक्ष या शब्दांचा व्यवहार उरलेलाच नसतो. (५१४२)

तो साधकही सहसा म्हणों नये । तो सर्वात्मा एकरूप अद्वय ।
ध्याता ज्ञाताही ह्मणणे काय । जरी स्मरे साधकत्वें ॥ ४३ ॥
त्याला साधक असेही सहसा (एकदम) म्हणू नये. तो सर्वात्मा एकरूप अद्वय अशा अवस्थेला प्राप्त झालेला असतो. तो जरी साधकरूपाने स्मरण करत असला तरी त्याला ध्याता अथवा ज्ञाता असेही म्हणू नये. (५१४३)

ऐशी हे घबाड उपासना । इजसम दुजी असे कवणा ।
कवण मेळवील कैवल्या पूर्णा । इसी अव्हेरूनी ॥ ४४ ॥
अशी ही उपासना महान आहे. हिच्यासारखी दुसरी कोणती उपासना आहे? हिचा अव्हेर करून पूर्णकैवल्याची अवस्था कोणाला प्राप्त होऊ शकेल? (५१४४)

साकार ध्यान ज्ञानेंविण । सर्व ब्रह्मात्मा नेणतां परिपूर्ण ।
तयेसी उपासना नामाभिधान । परी कैवल्यमुक्ति अप्राप्य ॥ ४५ ॥
ज्ञान न होताच, ब्रह्मात्म्याची परिपूर्ण ओळख न पटता केवळ साकाराचे ध्यान करणे याला उपासना म्हणता येईल, पण कैवल्य मुक्ती मात्र तिच्यामुळे प्राप्त होऊ शकणार नाही. (५१४५)

हे साधकें मौनेंचि समजावें । उगेंचि कासया विस्तारावें ।
एकदेशी तें नलगेचि बोलावें । अल्प ह्मणोनी ॥ ४६ ॥
खऱ्या साधकाने हे मौनानेच समजून घ्यावे. विनाकारण विस्तार करण्याने काय फायदा होणार आहे? साकाराची ज्ञानाशिवाय केलेली ध्यानादी उपासना एकदेशी असून ती अल्प म्हणजे अपुरी आहे (५१४६)

असो सर्वात्मत्व सबराभरित । अकृत्रिम द्वैतेविण उपासीत ।
तयासी बैसणे नको निवांत । नेत्र झांकोनी ॥ ४७ ॥
तर हे असो, सर्वात्मत्व हे सबराभरित म्हणजे सर्वव्यापी आहे. त्याची द्वैत न ठेवता जो अकृत्रिम भावाने उपासना करतो, त्याला निवांतस्थळी डोळे झाकून बसण्याची आवश्यकता नाही. (५१४७)

नलगे एकांत आसनविधि । न लगे प्राणायाम समाधि ।
न लगे माळ गबाळे सोडबांधी । पुस्तकादि संबळीची ॥ ४८ ॥
त्याला एकांतात आसन घालून बसण्याची गरज नाही, त्याला प्राणायाम अथवा समाधी यांची गरज नाही. सोवळे उपरणे इ. गबाळाची सोडबांध करण्याची गरज नाही, तसेच पुस्तकांची अथवा देव ठेवायच्या संबळीची गरज नाही. (५१४८)

न लगे पूर्वोत्तर ब्राह्मी मुहूर्त । न लगे काश्यादि देश शुचिष्मंत ।
न लगे स्नानादि उपकरणे बहुत । नको आचार कर्मठाचा ॥ ४९ ॥
त्याला पूर्वोत्तर ब्राह्मी मुहूर्त नको, किंवा अतिपवित्र मानले गेलेले काशी इ. तीर्थक्षेत्रे नकोत, स्नान इत्यादी विविध उपचार नकोत, अथवा कर्मठांचा आचारधर्म नको (५१४९)

न लगे उपोषण तांबूलवर्जन । नल गे व्रत नियम देह समान ।
नलगे जप हवन तर्पण । पुरश्चरणरूप विविध ॥ ५० ॥
उपास करायचीही त्याला गरज नाही, तांबूल वर्ण्य मानण्याची गरज नाही; व्रत, नियम, देह सरळ ठेवणारे आसन नको; जप, हवन, तर्पण, पुरश्चरण इत्यादी विधींचीही त्याला गरज नाही. (५१५०)

ऐसें कोणतें नको निर्बधन । वाणीसीही नलगे मौन ।
आणि एकाग्रही नको मन । रोध वृत्तीचा ॥ ५१ ॥
असे कोणतेच निर्बध त्याला नकोत; वाणीने मौन धारण करण्याचीही त्याला आवश्यकता नाही. तसेच मन एकाग्र करण्याचीही आवश्यकता नाही. आणि वृत्तीचे निरोधन करण्याचीही गरज नाही. (५१५१)

चालतां बैसतां भाषण करितां । की अन्य भोजनादि क्रिया समस्ता ।
शयनी की पाहतां ऐकतां । स्मरण मात्र असावें ॥ ५२ ॥
आपण चालत असू, बसलेले असू, संभाषण करत असू, किंवा अन्य सर्व भोजन इ. क्रिया करत असू, शयनावर पडलेले असू, पाहात असू किंवा ऐकत असू, जे काही करत असू, त्या त्या सर्व वेळी ब्रह्मात्मत्वाचे स्मरण मात्र कायम असावे. (५१५२)

म्हणसी अन्य व्यापारी विस्मर पडे । तरी ऐसें कदापिही न घडे ।
ध्यासें स्मरतसे धडफुडें । अभ्यासें पूर्वापर ॥ ५३ ॥
तू म्हणशील की, अन्य व्यापार करत असता विस्मरण होते, तर असे केव्हाही होणार नाही. आपल्याला आपल्या विषयाचा ध्यास लागलेला असेल आणि पहिल्यापासून जर अभ्यासाची सवय लावून घेतली असेल तर त्या योगाने सर्व काही स्पष्टपणे लक्षात राहते. (५१५३)

तथापि निमिषार्ध जरी विस्मरतां । हे जीवन्मुक्तिव्रत नव्हे तत्त्वतां ।
की भंगेल फळ नव्हेल आतां । ऐसें तों नसे ॥ ५४ ॥
तथापि एक अर्ध्या निमिषाचेही विस्मरण झाले तरी हे जीवन्मुक्तिवत होणार नाही. एकदा का त्या व्रताचे फळ चुकले की, ते आता पुन्हा मिळणार नाही, इ. प्रकार येथे होत नाहीत. (५१५४)

आणि निमिषार्ध विस्मृतीनें । देहादिकां नेघे अहंपणे ।
इतुका अवसर कदा न होणे । स्मरे झडकरी ॥ ५५ ॥
आणि अर्ध्या निमिषाच्या विस्मृतीने देहादि तत्त्वे अहंता घेत नाहीत. एवढा वेळ त्यांना मिळतच नाही. कारण साधक लगेच ब्रह्मात्मत्वाचे स्मरण करतो. (५१५५)

विस्मृति कांही बाधक नसे । देहबुद्धि घेतां बाधक असे ।
तरी ते देहबुद्धि निश्चया येतसे । इतुका कैंचा अवसर ॥ ५६ ॥
तेव्हा विस्मरण साधनेला बाधक असेलच असे नाही. फक्त विस्मरणानंतर देहबुद्धीचा स्वीकार केला तर मात्र ते बाधक असते. ती देहबुद्दी आपण देह आहोत असा निश्चय करील एवढा वेळच तिला मिळत नाही. कारण ती लगेच 'अहं ब्रह्मास्मि'चे स्मरण करते. (५१५६)

तस्मात् बोलतां चालतां । सर्व व्यापार होत असतां ।
सदा स्मरावें अखंडिता । नामरूपा त्यागूनी ॥ ५७ ॥
म्हणून नेहमी बोलत असता, चालत असता, किंवा सर्व प्रकारचे व्यापार करत असता नामरूपांचा त्याग करून नेहमी अखंडितपणे स्मरण करत असावे. (५१५७)

मनबुद्धीसीही नसे बलात्कार । त्याचे रंजविणेंचि होय वारंवार ।
जैसे कवणासी गारुडादि प्रकार । पाहता सीण नव्हे ॥ ५८ ॥
असे करण्याने मन, बुद्धी यांच्यावर बळजबरीही होत नाही. उलट त्यांची नेहमी करमणूकच होते. जादूगाराचा खेळ पाहत असताना जसा शीण वाटत नाही, तसाच इथेही प्रकार होतो. (५१५८)

किंवा लेकुरासी खेळतां । आल्हादावरी आल्हाद तत्त्वतां ।
तैसा वृत्तीसि अधिक अधिकता । स्मरतां सुखचि दुणावे ॥ ५९ ॥
किंवा मुले एकदा खेळायला लागली की, त्यांना आनंदामागोमाग आनंदच मिळत जातो. त्याप्रमाणे ब्रह्मात्मत्वाचे स्मरण करत असतांना वृत्तीचे सुख अधिकाधिक वाढत जाते, ते दुणावत जाते. (५१५९)

तयासी रोध जरी असावा । तरीच स्मरणाचा त्रास घ्यावा ।
येथे लळाही पूर्ण व्हावा । आणि ध्यासही सुखाचा ॥ ६० ॥
स्मरण करताना अडथळा वाटत असता तरच स्मरणाचा त्रास वाटला असता. पण येथे आपल्या मनाची इच्छाही पूर्ण होते, आणि सुखाचाही ध्यास लागतो. (५१६०)

केव्हां एकतान तदाकार होणें । केव्हां मननरूप कीजे चिंतन ।
केव्हां तत्सुखाचें कीजे भाषण । परस्परें उभयाने ॥ ६१ ॥
केव्हा एकतान तदाकार होईन, केव्हा मी मननरूपाने त्याचे चिंतन करीन, त्या सुखाचे अनुभव सांगेन, त्या एकमेकांशी त्या सुखाचे संभाषण करीन असे होऊन जाते. (५१६१)

GO TOP