॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ देविगीता ॥

॥ अथ अष्टमोऽध्यायः - अध्याय आठवा ॥

हिमालय उवाच -
देवदेवि महेशानि करुणासागरेऽम्बिके ।
ब्रूहि पूजाविधिं सम्यग्यथावदधुना निजम् ॥ १ ॥
हिमालय म्हणाला, हे देवाधिदेवी, हे महेश्वरी, हे करुणासागरे, हे अंबिके, आतां तूं आपला शास्त्रोक्त पूजाविधि संपूर्णपणे मला सांग. १.

श्रीदेव्युवाच -
वक्ष्ये पूजाविधिं राजन्नम्बिकाया यथाप्रियम् ।
अत्यन्तश्रद्धया सार्धं शृणु पर्वतपुङ्‌गव ॥ २ ॥
श्रीदेवी म्हणाली, हे पर्वतराजा, अंबिकेला कोणता पूजाविधि प्रिय आहे तें मी सांगते. हे पर्वतश्रेष्ठा, तूं माझें भाषण पूर्ण लक्ष देऊन ऐक. २.

द्विविधा मम पूजा स्याद्बाह्या चाभ्यान्तरापि च ।
बाह्यापि द्विविधा प्रोक्ता वैदिकी तान्त्रिकी तथा ॥ ३ ॥
बाह्य व आभ्यंतर अशी माझी दोन प्रकारची पूजा आहे. बाह्य पूजा ही वैदिकी व तांत्रिकी अशी दोन प्रकारची सांगितली आहे; ३

वैदिक्यर्चापि द्विविधा मूर्तिभेदेन भूधर ।
वैदिकी वैदिकैः कार्या वेददीक्षा समन्वितैः ॥ ४ ॥
व वैदिकी पूजा ही, हे भूधरा, मूर्तिभेदामुळे द्विविध आहे. वेददीक्षेनें युक्त असलेल्या पुरुषांनी वैदिक प्रकारानें वैदिकी पूजा करावी ४,

तन्त्रोक्तदीक्षावद्‌भिस्तु तान्त्रिकी संश्रिता भवेत् ।
इत्थं पूजारहस्यं च न ज्ञात्वा विपरीतकम् ॥ ५ ॥
व तंत्रोक्त दीक्षा ज्यांनीं घेतली असेल त्यांनी तांत्रिकी पूजेचा आश्रय करावा. अशा प्रकारचे पूजेचे रहस्य न जाणतां जो मूढ याच्या विपरीत आचरण करतो ५

करोति यो नरो मूढः स पतत्येव सर्वथा ।
तत्र या वैदिकी प्रोक्ता प्रथमा तां वदाम्यहम् ॥ ६ ॥
तो सर्व प्रकारें पतित होतो. त्यांत प्रथम जी वैदिकी पूजा सांगितली तिचें आतां विस्तृतपणे वर्णन करते. ६.

यन्मे साक्षात्परं रूपं दृष्टवानसि भूधर ।
अनन्तशीर्षनयनमनन्तचरणं महत् ॥ ७ ॥
सर्वशक्तिसमायुक्तं प्रेरकं यत्परात्परम् ।
तदेव पूजयेन्नित्यं नमेद्ध्यायेत्स्मरेदपि ॥ ८ ॥
है भूधरा, जें तू माझे अनंत मस्तकें, अनंत नेत्र व अनंत चरण यांनी युक्त, मोठें, सर्व शक्तियुक्त, प्रेरक व परात्पर असें साक्षात् श्रेष्ठ रूप पाहिलेंस, त्याचेंच नित्य पूजन करावे, ध्यान करावे व स्मरण करावे. ७-८.

इत्येतत्प्रथमाचार्याः स्वरूपं कथितं नग ।
शान्तः समाहितमना दंभाहङ्‌कारवर्जितः ॥ ९ ॥
हे पर्वता, हे अशा प्रकारचें प्रथम पूजेचें स्वरूप सांगितले. शांत, विक्षेपशून्य मनानें युक्त, दंभ व अहंकार यांनी रहित ९

तत्परो भव तद्याजी तदेव शरणं व्रज ।
तदेव चेतसा पश्य जप ध्यायस्व सर्वदा ॥ १० ॥
असा होऊन तू तत्पर व त्याचेच पूजन करणारा हो. त्या स्वरूपालाच शरण जा. त्यालाच अंतःकरणाने पहा व त्याचाच सर्वदा जप करून त्याचेंच ध्यान कर. १०

अनन्यया प्रेमयुक्तभक्त्या मद्‌भावमाश्रितः ।
यज्ञैर्यज तपोदानैर्मामेव परितोषय ॥ ११ ॥
अनन्य अशा प्रेमयुक्त भक्तीनें मद्विषयक भावनेचा आश्रय करून यज्ञांच्या योगाने यजन कर आणि तपश्चर्या व दान यांच्या योगानें मलाच संतुष्ट कर. ११.

इत्थं ममानुग्रहतो मोक्ष्यसे भवबन्धनात् ।
मत्परा ये मदासक्तचित्ता भक्तपरा मताः ॥ १२ ॥
अशा प्रकारे माझा अनुग्रह झाला असतां संसारबंधनापासून ते मुक्त होशील. जे मत्पर असतात, ज्यांचे चित्त माझ्या ठिकाणीं आसक्त असतें व जे माझे श्रेष्ठ भक्त म्हणून मान्य असतात. १२

प्रतिजाने भवादस्मादुद्धाराम्यचिरेण तु ।
ध्यानेन कर्मयुक्तेन भक्तिज्ञानेन वा पुनः ॥ १३ ॥
त्यांचा ह्या संसार-सागरांतून मी त्वरित उद्धार करते हें मी प्रतिज्ञेने सांगत आहे. कर्मयुक्त ध्यानानें किंवा भक्तियुक्त ज्ञानानें १३

प्राप्याहं सर्वथा राजन्न तु केवलकर्मभिः ।
धर्मात्सञ्जायते भक्तिर्भक्त्या सञ्जायते परम् ॥ १४ ॥
मी संपूर्णपणे प्राप्त होण्यासारखी आहे. पण केवळ कर्मानें माझी कधीच प्राप्ति होत नाहीं. धर्मापासून भक्तीची उत्पत्ति होते व भक्तीमुळे ईश्वराचा साक्षात्कार होतो. १४.

श्रुतिस्मृतिभ्यामुदितं यत्स धर्मः प्रकीर्तितः ।
अन्यशास्त्रेण यः प्रोक्तो धर्माभासः स उच्यते ॥ १५ ॥
श्रुति व स्मृति यांनी जे सांगितलेलें तो धर्म असे म्हटले आहे व याहून अन्य शास्त्रानें जे सांगितलेले त्याला धर्माभास [धर्माविषयीं भ्रांति] असें म्हणतात. १५.

सर्वज्ञात्सर्वशक्तेश्च मत्तो वेदः समुत्थितः ।
अज्ञानस्य ममाभावादप्रमाणा न च श्रुतिः ॥ १६ ॥
सर्वज्ञ व सर्वशक्ति अशी जी मी त्या मजपासून वेद उत्पन्न झाला आहे व माझे ठिकाणीं अज्ञान नसल्यामुळे श्रुति अप्रमाण नव्हे. १६.

स्मृतयश्च श्रुतेरर्थं गृहीत्वैव च निर्गताः ।
मन्वादीनां स्मृतीनां च ततः प्रामाण्यमिष्यते ॥ १७ ॥
मनु इत्यादिकांच्या स्मृति तर श्रुतीचा अर्थ घेऊनच उत्पन्न झालेल्या असल्यामुळें त्या प्रमाण आहेत, असे मानतात. १७.

क्वचित्कदाचित्तन्त्रार्थकटाक्षेण परोदितम् ।
धर्मं वदन्ति सोंऽशस्तु नैव ग्राह्योऽस्ति वैदिकैः ॥ १८ ॥
एकादे वेळीं कांहीं ठिकाणीं तंत्रोक्त अर्थाकडे दृष्टि ठेवून वेदातिरिक्त शास्त्रानें जें सांगितले असेल तोही धर्मच असे म्हणतात, पण वैदिक धर्माचा तो एक अंश असल्यामुळे वैदिकांना तो ग्राह्य नाहीं. १८.

अन्येषां शास्त्रकर्तॄणामज्ञानप्रभवत्वतः ।
अज्ञानदोषदुष्टत्वात्तदुक्तेर्न प्रमाणता ॥ १९ ॥
कारण, अन्यशास्त्रकारांच्या अज्ञानापासून उत्पन्न झाल्यामळें तीं अन्य शास्त्रें अज्ञान या दोषानें दुष्ट झालेली असतात; म्हणून त्यांच्या वचनाला प्रमाणता नाहीं. १९.

तस्मान्मुमुक्षुर्धर्मार्थं सर्वथा वेदमाश्रयेत् ।
राजाज्ञा च यथा लोके हन्यते न कदाचन ॥ २० ॥
यास्तव, मुमुक्षुने धर्माकरितां कांहीं झाले तरी वेदाचाच आश्रय करावा. ज्याप्रमाणे व्यवहारामध्ये राजाची आज्ञा कदापि कोणी अमान्य करीत नाहीं, २०,

सर्वेशाया ममाज्ञा सा श्रुतिस्त्याज्या कथं नृभिः ।
मदाज्ञारक्षणार्थं तु ब्रह्मक्षत्रियजातयः ॥ २१ ॥
त्याप्रमाणेच श्रुति ही मज सर्वेश्वरीची आज्ञा असल्यामुळे ती मनुष्याला कशी टाकता येईल ? माझ्या आज्ञेचें संरक्षण करण्याकरितांच तर २१

मया सृष्टास्ततो ज्ञेयं रहस्यं मे श्रुतेर्वचः ।
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भूधर ॥ २२ ॥
मीं ब्राह्मण व क्षत्रिय या जाति निर्माण केल्या आहेत. यास्तव, श्रुतीचे वचन हे माझे रहस्य आहे असे समजावें. हे भूधरा, ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानि येते २२

अभ्युत्थानमधर्मस्य तदा वेषान्बिभर्म्यहम् ।
देवदैत्यविभागश्चाप्यत एवाभवन्नृप ॥ २३ ॥
व अधर्माची वृद्धि होऊं लागते, तेव्हां तेव्हा मी शरीरधारी होतें. हे राजा, देव व दैत्य असा विभागही एवढ्याकरितांच झाला. २३.

ये न कुर्वन्ति तद्धर्मं तच्छिक्षार्थं मया सदा ।
सम्पादितास्तु नरकास्रासो यच्छ्रवणाद्‌भवेत् ॥ २४ ॥
जे या वैदिक धर्माचें अनुष्ठान करीत नाहींत त्यांना शिक्षा करण्याकरितां, ज्यांच्या केवळ श्रवणाने त्रास होईल असे नित्य नरक मी निर्माण केले आहेत. २४.

यो वेदधर्ममुज्झित्य धर्ममन्यं समाश्रयेत् ।
राजा प्रवासयेद्देशान्निजादेतानधर्मिणः ॥ २५ ॥
वैदधर्माचा त्याग करून जो अन्य धर्माचा स्वीकार करील त्या अधर्म्याला राजाने आपल्या देशांतून घालवून द्यावे. २५.

ब्राह्मणैर्न च संभाष्याः पङ्‌क्तिग्राह्या न च द्विजैः ।
अन्यानि यानि शास्त्राणि लोकेऽस्मिन्विविधानि च ॥ २६ ॥
ब्राह्मणांनी त्याच्याशीं भाषण करू नये व द्विजांनी (त्रैवर्णिकांनीं) त्याला पंक्तीत भोजनास घेऊं नये. या लोकामध्यें जी नानाप्रकारचीं अन्य शास्त्रे आहेत २६

श्रुतिस्मृतिविरुद्धानि तामसान्येव सर्वशः ।
वामं कापालकं चैव कौलकं भैरवागमः ॥ २७ ॥
तीं श्रुतिस्मृतिविरुद्ध असल्यामुळे निःशेष तामसी होत. नाममार्ग, कापालिकशास्त्र, कौलकशास्त्र, भैरवागम २७

शिवेन मोहनार्थाय प्रणीतो नान्यहेतुकः ।
यक्षशापाद् भृगोः शापाद्दधीचस्य च शापतः ॥ २८ ॥
इत्यादि शास्त्रे शंकरानें प्राण्यांना मोहित करण्याकरितांच निर्माण केली आहेत; त्यांत अन्य कांहीं हेतु नाही. दक्षाच्या शापानें, भृगच्या शापानें व दधीच ऋषीच्या शापानें २८

दग्धा ये ब्राह्मणवरा वेदमार्गबहिष्कृताः ।
तेषामुद्धरणार्थाय सोपानक्रमतः सदा ॥ २९ ॥
शैवाश्च वैष्णवाश्चैव सौराः शाक्तास्तथैव च ।
गाणपत्या आगमाश्च प्रणीताः शङ्‌करेण तु ॥ ३० ॥
दग्ध होऊन जे ब्राह्मण श्रेष्ठ वेदमार्गापासून भ्रष्ट झाले होते त्यांचा सर्वदा सोपानमार्गाने (म्हणजे पायरीपायरीनें) उद्धार करण्याकरिता शैव, वैष्णव, सौर, शाक्त व गाणपत्य हे आगम शंकराने निर्माण केले. २९-३०,

तत्र वेदाविरुद्धोंऽशोऽप्युक्त एव क्वचित्क्वचित् ।
वैदिकस्तद्‌ग्रहे दोषो न भवत्येव कर्हिचित् ॥ ३१ ॥
त्यांमध्ये वेदाशीं अविरुद्ध असाही भाग कोठें कोठें सांगितलेला आहे; वैदिकांनी त्याचे ग्रहण केल्यास त्यांत कांहीं दोष नाहीं. ३१.

सर्वथा वेदभिन्नार्थे नाधिकारी द्विजो भवेत् ।
वेदाधिकारहीनस्तु भवेत्तत्राधिकारवान् ॥ ३२ ॥
पण सर्वथा वेदाहून भिन्न असलेल्या गोष्टी करण्यास मात्र द्विजाला अधिकार नाहीं. असे असून जो वेदविरुद्ध गोष्टीचे आचरण करतो तो वेदाधिकारहीन होतो म्हणजे त्याचा वेदांचा व वैदिक कृत्यांचा अधिकार नष्ट होतो. ३२.

तस्मात्सर्वप्रयत्नेन वैदिको वेदमाश्रयेत् ।
धर्मेण सहितं ज्ञानं परं ब्रह्म प्रकाशयेत् ॥ ३३ ॥
यास्तव, दीर्घ प्रयत्न करून वैदिक पुरुषानें वेदाचा आश्रय करावा. धर्मासहवर्तमान असलेलें ज्ञानच परब्रह्माचा साक्षात्कार करून देते. ३३.

सर्वैषणाः परित्यज्य मामेव शरणं गताः ।
सर्वभूतदयावन्तो मानाहङ्‌कारवर्जिताः ॥ ३४ ॥
पुत्रादि सर्व एषणांचा [इच्छांचा ] त्याग करून जे मलाच शरण येतात, जे सर्वभूतांविषयीं दया बाळगतात, जे मान व अहंकार यांनी राहत असतात, ३४,

मच्चित्ता मद्‌गतप्राणा मत्स्थानकथने रताः ।
संन्यासिनो वनस्थाश्च गृहस्था ब्रह्मचारिणः ॥ ३५ ॥
ज्यांचे अंतःकरण माझ्या ठिकाणीं असतें, ज्यांची सर्व इंद्रियें व प्राणप्रवृत्ति मजकरितांच असते, जे माझ्या स्थानांचे वर्णन करण्यांत निमग्न असतात व जे संन्यासी, वानप्रस्थ, गृहस्थ किंवा ब्रह्मचारी ३५

उपासन्ते सदा भक्त्या योगमैश्वरसंज्ञितम् ।
तेषां नित्याभियुक्तानामहमज्ञानजं तमः ॥ ३६ ॥
सर्वदा भक्तिपूर्वक ऐश्वरनामक विराट् स्वरूपाची उपासना करतात, त्या नित्य उपासनेमध्यें गढून रहाणार्‍या पुरुषांचे अज्ञानापासून उत्पन्न झालेलें तम [ मोह ] ३६

ज्ञानसूर्यप्रकाशेन नाशयामि न संशयः ।
इत्थं वैदिकपूजायाः प्रथमाया नगाधिप ॥ ३७ ॥
मी ज्ञानरूपी सूर्याच्या प्रकाशाने निःसंशय नष्ट करते. याप्रमाणे, हे पर्वतोत्तमा, पहिली जी वैदिक पूजा तिचे ३७

स्वरूपमुक्तं सङ्‌क्षेपाद्‌द्वितीयाया अथो ब्रुवे ।
मूर्तौ वा स्थण्डिले वापि तथा सूर्येन्दुमण्डले ॥ ३८ ॥
स्वरूप मी तुला संक्षेपतः सांगितले. अत्तां द्वितीय पूजेचे स्वरूप सांगते. करचरणयुक्त मूर्तीचे ठिकाणीं किंवा स्थंडिलावर अथवा सूर्यचंद्रमंडलामध्यें ३८

जलेऽथवा बाणलिङ्‌गे यन्त्रे वापि महापटे ।
तथा श्रीहृदयांभोजे ध्यात्वा देवीं परात्पराम् ॥ ३९ ॥
किंवा जल, बाणलिंग, यंत्र, मोठें वस्त्र व श्रीहृदयकमल यांमध्ये, परात्पर, ३९,

सगुणां करुणापूर्णां तरुणीमरुणारुणाम् ।
सौन्दर्यसारसीमान्तां सर्वावयवसुन्दराम् ॥ ४० ॥
सगुण, करुणापूर्ण, तरुणी, अरुणाप्रमाणें लाल, सौंदर्याच्या साराची सीमा, सर्व अवयवांनीं सुंदर, ४०,

शृङ्‌गाररससम्पूर्णां सदा भक्तार्तिकातराम् ।
प्रसादसुमुखीमम्बां चन्द्रखण्डाशिखण्डिनीम् ॥ ४१ ॥
पाशाङ्‌कुशवराभीतिधरामानन्दरूपिणीम् ।
पूजयेदुपचारैश्च यथावित्तानुसारतः ॥ ४२ ॥
शृंगाररसपूर्ण, सर्वदा भक्तांच्या दुःखाने भयभीत होणारी, प्रसाद गुणांमुळे मनोहर, रमणीय, पाश, अंकुश व वरमुद्रा धारण करणारी व आनंदरूपिणी अशा देवीचें ध्यान करून, द्रव्यसामर्थ्याप्रमाणे उपचार (साहित्य) पूजा करावी. ४१-४२.

यावदान्तरपूजायामधिकारो भवेन्न हि ।
तावद्‌बाह्यामिमां पूजां श्रयेज्जाते तु तां त्यजेत् ॥ ४३ ॥
जोपर्यंत आंतर पूजेचा अधिकार प्राप्त होत नाही, तोपर्यंत या बाह्य पूजेचा आश्रय करावा; व आंतर पूजेचा अधिकार प्राप्त झाला असतां ही बाह्य पूजा सोडावी. ४३.

आभ्यन्तरा तु या पूजा सा तु संविल्लयः स्मृतः ।
संविदेवपरं रूपमुपाधिरहितं मम ॥ ४४ ॥
संवित्‌मध्यें जो लय होणे तीच आंतर पूजा होय, असे सांगितले आहे व संवित् हेच माझे उपाधिराहत श्रेष्ठ स्वरूप आहे. ४४.

अतः संविदि मद्‌रूपे चेतः स्थाप्यं निराश्रयम् ।
संविद्‌रूपातिरिक्तं तु मिथ्या मायामयं जगत् ॥ ४५ ॥
यास्तव, मद्‌रूप अशा संवित्-( ज्ञाना-) मध्ये आश्रयशून्य [ विषयरहित ] अशा मनाला स्थित करावे. संविद्‌रूपातिरिक्त असे ( जें जें कांहीं आहे ते ) सर्व जगत् मिथ्या जी माया तद्‌रूप आहे. ४५.

अतः संसारनाशाय साक्षिणीमात्मरूपिणीम् ।
भावयन्निर्मनस्केन योगयुक्तेन चेतसा ॥ ४६ ॥
तस्मात्, संसारनाशाकरितां आत्मरूपिणी जी साक्षी देवी तिचे निर्विकल्प व भक्ति पूर्ण अशा अंतःकरणाने चिंतन करावें. ४६.

अतःपरं बाह्यपूजाविस्तारः कथ्यते मया ।
सावधानेन मनसा शृणु पर्वतसत्तम ॥ ४७ ॥
आता यापुढे मी बाह्यपूजेचा विस्तार सांगते तो, हे पर्वतोत्तमा, तू एकाग्र अंतःकरणाने श्रवण कर. ४७.

॥ इति श्रीदेवीभागवते देवीगीतायां अष्टमोऽध्यायः ॥
॥ आठवा अध्याय समाप्त ॥ ८ ॥GO TOP