॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ देविगीता ॥

॥ अथ नवमोऽध्यायः - अध्याय नववा ॥

श्रीदेव्युवाच -
प्रातरुत्थाय शिरसि संस्मरेत्पद्ममुज्ज्वलम् ।
कर्पूराभं स्मरेत्तत्र श्रीगुरुं निजरूपिणम् ॥ १ ॥
सुप्रसन्नं लसद्‌भूषाभूषितं शक्तिसंयुतम् ।
नमस्कृत्य ततो देवीं कुण्डलीं संस्मरेद्बुधः ॥ २ ॥
श्रीदेवी म्हणाली, प्रातःकालीं उठून स्वतःच्या मस्तकीं [ ब्रह्मरंध्रांत ] उज्ज्वल कमल आहे असे चिंतन करावे; व तेथे कर्पूराप्रमाणें गौरवर्ण, अत्यंत प्रसन्न, देदीप्यमान, अलंकारांनी विभूषित व शक्तियुक्त अशा आत्मरूप श्रीगुरूंचे स्मरण करावें (म्ह० ते या कमलांत आहेत अशी कल्पना करावी). त्यांना नमस्कार करून तदनंतर शहाण्याने देवी कुंडलिनीचे स्मरण करावे. १-२.

प्रकाशमानां प्रथमे प्रयाणे
     प्रतिप्रयाणेऽप्यमृतायमानाम् ।
अन्तःपदव्यामनुसञ्चरन्ती-
     मानन्दरूपामबलां प्रपद्ये ॥ ३ ॥
ध्यात्वैवं तच्छिखामध्ये सच्चिदानन्दरूपिणीम् ।
मां ध्यायेदथ शौचादिक्रियाः सर्वाः समापयेत् ॥ ४ ॥
ब्रह्मरंध्रगमनरूप प्रथम प्रयाणसमयीं चिद्‌रूपत्वानें भासणारी, पुनः मूलाधाराकडे परत येतांना आनंदामृताने पूर्ण असणारी व सुषुम्नानामक नाडीमध्ये संचार करणारी जी आनंदरूप श्रेष्ठ शक्ति तिला मी शरण जातो. ह्याप्रमाणे ध्यान करून त्याच्या शिखेच्या मध्यभागीं सच्चिदानंदस्वरूपी जी मी त्या माझें ध्यान करावे व नंतर शौचादि सर्व क्रिया कराव्या. ३-४.

अग्निहोत्रं ततो हुत्वा मत्प्रीत्यर्थं द्विजोत्तमः ।
होमान्ते स्वासने स्थित्वा पूजासङ्‌कल्पमाचरेत् ॥ ५ ॥
नंतर ब्राह्मणोत्तमाने माझ्या संतोषार्थ अग्निहोत्राचे हवन करावें. होमाची समाप्ति झाली असतां स्वतःच्या आसनावर बसून पूजेचा संकल्प करावा. ५.

भूतशुद्धिं पुरा कृत्वा मातृकान्यासमेव च ।
हृल्लेखामातृकान्यासं नित्यमेव समाचरेत् ॥ ६ ॥
मंत्रांच्या योगानें प्रथम भूतांची शुद्धि व मातृकांचा न्यास करून नंतर हृल्लेखामातृकान्यास नित्य करावा. ६.

मूलाधारे हकारं च हृदये च रकारकम् ।
भ्रूमध्ये तद्वदीकारं ह्रीङ्‌कारं मस्तके न्यसेत् ॥ ७ ॥
मूलाधाराचे ठिकाण हकाराचा व हृदयामध्ये रकाराचा, तसेच भूमध्यभार्गीं ईकाराचा आणि ब्रह्मरंध्रामध्ये र्‍हींकाराचा न्यास करावा. ७.

तत्तन्मन्त्रोदितानन्यान्न्यासान्सर्वान्समाचरेत् ।
कल्पयेत्स्वात्मनो देहे पीठं धर्मादिभिः पुनः ॥ ८ ॥
सारांश, त्या त्या मंत्रोक्त असे सर्वही न्यास करावेत. पुनरपि आपल्या देहामध्यें धर्म, ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य हे खूर, अधर्म, अज्ञान, अविरक्ति व दारिद्य हे चारी दिशेकडील कोपरे इत्यादि प्रकारें पीठ कल्पावें. ८.

ततो ध्यायेन्महादेवीं प्राणायामैर्विजृम्भिते ।
हृदम्भोजे मम स्थाने पञ्चप्रेतासने बुधः ॥ ९ ॥
तदनंतर प्राणायामांच्या योगाने विकसित झालेल्या अंतःकरणांत ब्रह्मा, विष्णु इत्यादिकांनी युक्त असें जे माझें स्थान त्या पंचप्रेतासनावर सुज्ञानें माझे ध्यान करावें. ९.

ब्रह्मा विष्णुश्च रुद्रश्च ईश्वरश्च सदाशिवः ।
एते पञ्च महाप्रेताः पादमूले मम स्थिताः ॥ १० ॥
ब्रह्मा, विष्णु, रुद्र, ईश्वर व सदाशिव हे पांच महाप्रेत माझ्या पायांखाली आहेत. १०.

पञ्चभूतात्मका ह्येते पञ्चावस्थात्मका अपि ।
अहं त्वव्यक्तचिद्‌रूपा तदतीताऽस्मि सर्वथा ॥ ११ ॥
हे पांच भूतात्मक व अवस्थारूपही आहेत. परंतु मी सर्व प्रकारे अव्यक्त चिद्‌रूप असल्यामुळे त्यांहून निराळी आहे. त्यामुळे ते शक्तितंत्रामध्ये सर्वदा शक्तीचे आसन झालेले आहेत. ११.

ततो विष्टरतां याताः शक्तितन्त्रेषु सर्वदा ।
ध्यात्वैवं मानसैर्भोगैः पूजयेन्मां जपेदपि ॥ १२ ॥
ह्याप्रमाणे तिचे ध्यान करून मानस [कल्पित] भोगांनी [उपचारांनीं] पूजन करावे व जपही करावा. १२.

जपं समर्प्य श्रीदेव्यै ततोऽर्घ्यस्थापनं चरेत् ।
पात्रासादनकं कृत्वा पूजाद्रव्याणि शोधयेत् ॥ १३ ॥
जलेन तेन मनुना चास्त्रमन्त्रेण देशिकः ।
दिग्बन्धं च पुरा कृत्वा गुरून्नत्वा ततः परम् ॥ १४ ॥
केलेला जप श्रीदेवीला समर्पण करून, नंतर अर्घ्यस्थापन करावे. पात्रासादन (पात्रे येणे) करून अस्त्रमंत्राने मंत्रविलेल्या उदकानें पूजेच द्रव्यें शुद्ध करावींत व फट्मंत्राने स्वतःच्या भोवतीं दिग्बंध (अग्नीचा तट आहे अशी कल्पना) करून तदनंतर गुरूंना नमस्कार करावा. १३-१४.

तदनुज्ञां समादाय बाह्यपीठे ततः परम् ।
हृदिस्थां भावितां मूर्तिं मम दिव्यां मनोहराम् ॥ १५ ॥
आवाहयेत्ततः पीठे प्राणस्थापनविद्यया ।
आसनावाहने चार्घ्यं पाद्याद्याचमनं तथा ॥ १६ ॥
त्यांची आज्ञा घेऊन नंतर बाह्य पीठावर हृदयामध्ये कल्पिलेल्या माझ्या दिव्य व मनोहर मूर्तीला आह्वान करावे. नंतर त्या पीठावर प्राणप्रतिष्ठामंत्रानें तिची प्राणप्रतिष्ठा करावी. आसन, आवाहन, अर्घ्य, पाद्य, आचमन, १५-१६

स्नानं वासोद्वयं चैव भूषणानि च सर्वशः ।
गन्धपुष्पं यथायोग्यं दत्त्वा देव्यै स्वभक्तितः ॥ १७ ॥
स्नान, दान, वस्त्रें, सर्वांगावर भूषणें, गंध, पुष्प, इत्यादि यथायोग्य रीतीने आपल्या भक्तीप्रमाणे देवीला देऊन १७

यन्त्रस्थानामावृतीनां पूजनं सम्यगाचरेत् ।
प्रतिवारमशक्तानां शुक्रवारो नियम्यते ॥ १८ ॥
यंत्रस्थ आवरण देवतांची उत्तम प्रकारें पूजा करावी. ज्यांच्या हातून ही पूजा प्रतिदिवशीं होण्यासारखी नसेल त्यांनी शुक्रवारीं ती नियमानें करावी. १८.

मूलदेवीप्रभारूपाः स्मर्तव्या अङ्‌गदेवताः ।
तत्प्रभापटलव्याप्तं त्रैलोक्यं च विचिन्तयेत् ॥ १९ ॥
प्रभारूप अशा ह्या अंगदेवता आहेत असें ध्यानांत धरावे व त्यांच्या प्रभापटलानें हें त्रैलोक्य व्याप्त झाले आहे असें दृढ चिंतन करावें. १९.

पुनरावृत्तिसहितां मूलदेवीं च पूजयेत् ।
गन्धादिभिः सुगन्धैस्तु तथा पुष्पैः सुवासितैः ॥ २० ॥
नैवेद्यैस्तर्पणैश्चैव तांबूलैर्दक्षिणादिभिः ।
तोषयेन्मां त्वत्कृतेन नाम्नां साहस्रकेण च ॥ २१ ॥
कवचेन च सूक्तेनाहं रुद्रेभिरिति प्रभो ।
देव्यथर्वशिरोमन्त्रैर्हृल्लेखोपनिषद्‌भवैः ॥ २२ ॥
महाविद्यामहामन्त्रैस्तोषयेन्मां मुहुर्मुहुः ।
क्षमापयेज्जगद्धात्रीं प्रेमार्द्रहृदयो नरः ॥ २३ ॥
पुनरपि आवरणदेवींसहवर्तमान मुख्य देवीची उत्तम गंधयुक्त गंधादिक, सुवासिक पुष्पें, नैवेद्य, उदकादिकानें तर्पण, तांबूल व दक्षिणा इत्यादिकांच्या योगानें पूजा करावी. हे प्रभो हिमालया, तू केलेल्या माझ्या सहस्र नामांनीं तंत्रप्रोक्त कवचानें, 'अहं रुद्रेभिः' या देवीसूक्ताने, देव्यथर्वशिरोनामक मंत्रांनी, भुवनेश्वरीच्या उपनिषदांतील मंत्रांनीं व महामंत्रांनी मला वारंवार संतुष्ट करावे आणि पुरुषाने प्रेमार्द्र अंतःकरणाने मज जगत्कर्त्रीची क्षमा मागावी. २०-२३.

पुलकाङ्‌कितसर्वाङ्‌गैर्बाल्यरुद्धाक्षिनिःस्वनः ।
नृत्यगीतादिघोषेण तोषयेन्मां मुहुर्मुहुः ॥ २४ ॥
सात्विक भाव झाल्यामुळे ज्याच्या अंगावर काटा आला आहे, नेत्राश्रूंनी ज्याचे नेत्र भरून गेले आहेत व ज्याचा कंठ दाटला आहे अशा पुरुषानें नृत्यगीतादिजन्य घोषानें वारंवार मला संतुष्ट करावें. २४.

वेदपारायणैश्चैव पुराणैः सकलैरपि ।
प्रतिपाद्या यतोऽहं वै तस्मात्तैस्तोषयेत्तु माम् ॥ २५ ॥
वेदांनीं व सर्वही पुराणांनी ज्या अर्थीं माझे प्रतिपादन केले आहे त्या अर्थीं त्यांच्या पारायणांनी मला संतुष्ट करावे. २५.

निज सर्वस्वमपि मे सदेहं नित्यशोऽर्पयेत् ।
नित्यहोमं ततः कुर्याद्‌ब्राह्मणांश्च सुवासिनीः ॥ २६ ॥
बटुकान्पामरानन्यान्देवीबुद्ध्या तु भोजयेत् ।
नत्वा पुनः स्वहृदये व्युत्क्रमेण विसर्जयेत् ॥ २७ ॥
देहासवर्तमान आपले सर्वस्व मला नित्य अर्पण करावे. तदनंतर नित्य होम (वैश्वदेव) करावा आणि ब्राह्मण, सुवासिनी, ब्रह्मचारी व अन्य पामर यांचे ठिकाणीं देवीची भावना करून त्यांना भोजन घालावे व नमस्कार करून पुनरपि उलट क्रमानें तिचे हृदयांत विसर्जन करावे. २६-२७.

सर्वं हृल्लेखया कुर्यात्पूजनं मम सुव्रत ।
हृल्लेखा सर्वमन्त्राणां नायिका परमा स्मृता ॥ २८ ॥
हे सदाचरणी पर्वता, माझे सर्व पूजन मायाबीजमंत्राने करावे. कारण, मायाबीजमंत्र सर्व मंत्रांमध्ये श्रेष्ठ व मुख्य आहे असे शास्त्रांत सांगितले आहे. २८.

हृल्लेखादर्पणे नित्यमहं तु प्रतिबिम्बिता ।
तस्माधृल्लेखया दत्तं सर्वमन्त्रैः समर्पितम् ॥ २९ ॥
कारण, मायाबीजमंत्रामध्ये मी सर्वदा प्रतिबिंबित झालेली असतें. यास्तव, त्या मंत्राने अर्पण, केलेलें पूजन सर्व मंत्रांनी अर्पण केल्यासारखेच आहे. २९.

गुरुं सम्पूज्य भृषाद्यैः कृतकृत्यत्वमावहेत् ।
य एवं पूजयेद्देवीं श्रीमद्‌भुवनसुन्दरीम् ॥ ३० ॥
गुरूंना भूषणादिकांच्या योगानें संतुष्ट करून कृतकृत्यत्व मागावें. याप्रमाणे श्रीमद्भुवनेश्वरी देवीचें जो पूजन करतो, ३०

न तस्य दुर्लभं किञ्चित्कदाचित्क्वचिदस्ति हि ।
देहान्ते तु मणिद्वीपं मम यात्येव सर्वथा ॥ ३१ ॥
त्याला कधीहि, कोठेहि, कांहींही दुर्लभ नाहीं. व कांहीं झालें तरी तो मृत झाल्यावर मणिद्वीपाप्रत जातो. ३१.

ज्ञेयो देवीस्वरूपोऽसौ देवा नित्यं नमन्ति तम् ।
इति ते कथितं राजन्महादेव्याः प्रपूजनम् ॥ ३२ ॥
हा पुरुष देवीस्वरूप आहे असे समजावें. त्याला देव वंदन करतात. ह्याप्रमाणे, हे राजा, तुला देवीचें उत्कृष्ट पूजन सांगितले. ३२.

विमृश्यैतदशेषेणाप्यधिकारानुरूपतः ।
कुरु मे पूजनं तेन कृतार्थस्त्वं भविष्यसि ॥ ३३ ॥
याचा पूर्णपणे विचार करून आपल्या अधिकाराप्रमाणे माझे पूजन कर. त्याच्या योगाने तू कृतार्थ होशील. ३३.

इदं तु गीताशास्त्रं मे नाशिष्याय वदेत्क्वचित् ।
नाभक्ताय प्रदातव्यं न धूर्ताय च दुर्हृदे ॥ ३४ ॥
हें गीताशास्त्र जो माझा शिष्य नसेल त्याला कधींहि सांगूं नये, तसेंच अभक्ताला किंवा दुष्टबुद्धि लबाडाला देऊ नये. ३४.

एतत्प्रकाशनं मातुरुद्धाटनमुरोजयोः ।
तस्मादवश्यं यत्नेन गोपनीयमिदं सदा ॥ ३५ ॥
हे उघड करणें म्हणजे मातेचें हृदयच उघड करणें आहे. तस्मात्, मोठ्या प्रयत्नाने हे सर्वदा अवश्य गुप्त ठेवावे. ३५.

देयं भक्ताय शिष्याय ज्येष्ठपुत्राय चैव हि ।
सुशीलाय सुवेषाय देवीभक्तियुताय च ॥ ३६ ॥
हे शास्त्र ( माझा किंवा गुरूचा ) भक्त, शिष्य, ज्येष्ठ पुत्र, सच्छील, सुंदर व देवीच्या भक्तीनें युक्त असलेला पुरुष एवढ्यांनाच द्यावे. ३६.

श्राद्धकाले पठेदेतद् ब्राह्मणानां समीपतः ।
तृप्तास्तत्पितरः सर्वे प्रयान्ति परमं पदम् ॥ ३७ ॥
श्राद्धसमयीं ब्राह्मणांच्या समीप हें म्हणावें म्हणजे श्राद्धकर्याचे सर्व पितर तृप्त होऊन श्रेष्ठ पदाप्रत जातात. ३७.

व्यास उवाच -
इत्युक्त्वा सा भगवती तत्रैवान्तरधीयत ।
देवाश्च मुदिताः सर्वे देवीदर्शनतोऽभवन् ॥ ३८ ॥
व्यास म्हणाले, असे बोलून ती भगवती तेथेंच गुप्त झाली व देवीच्या दर्शनाने सर्व संतुष्ट झाले. ३८.

तता हिमालये जज्ञे देवी हैमवती तु सा ।
या गौरीति प्रसिद्धासीद्दत्ता सा शङ्‌कराय च ॥ ३९ ॥
तदनंतर हैमवती देवी हिमालयाचे ठिकाणीं उत्पन्न झाली. ती गौरी या नांवाने जगांत प्रसिद्ध आहे. तिला शंकरास दिलें. ३९.

ततः स्कन्दः समुद्‌भूतस्तारकस्तेन पातितः ।
समुद्रमन्थने पूर्वं रत्नान्यासुर्नराधिप ॥ ४० ॥
तदनंतर स्कंद उत्पन्न झाला व त्याने तारकास मारलें. पूर्वी समुद्रमंथनकालीं, हे पुरुषश्रेष्ठा, रत्नें उत्पन्न झाली. ४०.

तत्र देवैस्तुता देवी लक्ष्मीप्राप्त्यर्थमादरात् ।
तेषामनुग्रहार्थाय निर्गता तु रमा ततः ॥ ४१ ॥
वैकुण्ठाय सुरैर्दत्ता तेन तस्य शमाभवत् ।
इति ते कथितं राजन्देवीमाहात्म्यमुत्तमम् ॥ ४२ ॥
त्या वेळींही देवांनी आदरपूर्वक लक्ष्मीच्या प्राप्तीकरितां देवीची स्तुति केली व त्यांच्यावर अनुग्रह करण्याकरितां त्यापासून लक्ष्मी उत्पन्न झाली. त्यांनी ती विष्णूस अर्पण केली आणि त्यामुळे त्यांचे कल्याण झाले. ह्याप्रमाणे, हे राजा, देवीचे उत्तम माहात्म्य मी तुला सांगितले. ४१-४२.

गौरीलक्ष्म्योः समुद्‌भूतिविषयं सर्वकामदम् ।
न वाच्यं त्वेतदन्यस्मै रहस्यं कथितं यतः ॥ ४३ ॥
हे गौरी व लक्ष्मी यांच्या उत्पत्तीविषयी असल्यामुळे सर्व कामना पूर्ण करणारे आहे. ज्याअर्थी हें मी तुला सांगितले आहे त्याअर्थीं तूं ते दुसर्‍या कोणालाही सांगू नको. ४३.

गीता रहस्यभूतेयं गोपनीया प्रयत्नतः ।
सर्वमुक्तं समासेन यत्पृष्टं तत्वयानघ ।
पवित्रं पावनं दिव्यं किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥ ४४ ॥
शास्त्ररहस्य अशी ही गीता तूं प्रयत्नपूर्वक रक्षण कर, हे निष्पापा, तू जे विचारिलेंस तें मीं पवित्र, शुद्धिकर व दिव्य रहस्य तुला संक्षेपाने सांगितले आहे. आतां अधिक तुला काय ऐकण्याची इच्छा आहे ? ४४.

॥ इति श्रीदेवीभागवते देवीगीतायां नवमोऽध्यायः ॥
॥ इति श्रीमद्देवीगीता समाप्ता ॥
॥ नववा अध्याय समाप्त ॥ ९ ॥
॥ इति श्रीमद्देवीगीता समाप्ता ॥



GO TOP