|
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो श्रीगुरु शिवशिवा । नमनें जीवत्व जीवा । नुरविसी तेथें देहभावा । कैसेनि रिघावा होईल ॥ १ ॥ श्रीगुरू शिवपार्वती यांस नमस्कार असो. भगवान नमनाने संतुष्ट होऊन जीवाचे जीवत्व राहू देत नाहीं. तेथें देहभावाचा रिघाव कोठून होणार ! १ जीवें घेउनि जीवा । देहत्व मोडूनि देहभावा । याहीवरी करविसी सेवा । हें लाघव देवा नवल तुझें ॥ २ ॥ हे देवा, जीवाचा जीव घेऊन व देहाचे देहत्व नाहींसे करूनहि त्याच्याकडून सेवा करवितोस, हें तुझे केवढे आश्चर्यकारक लाघव आहे ! २ जीव घेऊनि शंखासुरा । त्याच्या वागविसी कलेवरा । तो तूं रिघोनि मजभीतरा । माझिया शरीरा वागविसी ॥ ३ ॥ शंखासुराचा जीव घेऊन त्याच्या शरीराला जसा वागवितोस तसाच तूं माझ्यामध्येहि प्रवेश करून माझ्या शरीरालाहि वागवीत आहेस. ३ शंख मधुर ध्वनी गाजे । तो वाजवित्याचेनि वाचे । तेवीं म्यां जें जें बोलिजे । तें तें बोलणें साजे तुझेनि ॥ ४ ॥ शंख मधुर ध्वनीने गर्जना करतो, पण तो वाजविणाराच्या बळाने वाजतो. त्याचप्रमाणे मी जे जे काही बोलतो तें सर्व तुझ्यामुळेंच होय. ४ आतां माझें 'शरीर' जें चळे । तें तुझेनि आंगिकें मळें । 'कर्में' निपजतीं सकळें । सत्ताबळें तुझेनि ॥ ५ ॥ माझें शरीर जी हालचाल करिते व जी लोकिक, वैदिक कर्मे करिते तीं सर्व तुझ्याच सत्ताबळानें होतात. ५ माझे देहींचें जें 'मीपण' । तें तूंचि झालासी आपण । तुझेनि प्राणें 'प्राण' । माझाही जाण चळे देवा ॥ ६ ॥ माझ्या देहातील 'मीपणा' तूच झालास. तुझ्या क्रियाशक्तीनेच माझा क्रियाशक्ति प्राण चालतो. ६ 'दृष्टी' जें जें काहीं देखे । तें तें तुझेनि ज्ञानउन्मेखें । 'श्रवणीं' जें जें कांहीं ऐकें । तें तें नेटकें अवधान तुझें ॥ ७ ॥ तुझ्याच ज्ञानशक्तीने डोळे पहातात, कान ऐकतात, ७ 'रसना' जें जें कांहीं चाखे । तें तें तुझेनि स्वादमुखें । 'बुद्धि' जाणपणें तोखे । तेहीं अतिनिकें वेदकत्व तुझें ॥ ८ ॥ रसना रस चाखते, बुद्धि ज्ञानांने संतुष्ट होतें, ८ 'मन' मनपणें अतिचपळ । तेंही तुझेंचि आंगिक बळ । विवेका 'विवेकु' प्रबळ । अतिसोज्ज्वळ तुझेनि ॥ ९ ॥ मन संकल्पविकल्पाने चंचल होतें, विवेकशक्ति विवेचन करिते, ९ 'वाचा' जें जें कांहीं वदे । तें वाचिकत्व तुझेनि शब्दें । 'बोधु' जेणें उद्बोधे । तो तुझेनि प्रबोधें प्रबोधु ॥ १० ॥ वाणी बोलते व ज्ञानशक्ति तुझ्याच बलाने सर्व कांहीं जाणते. १० 'जागृती' जागे तुझेनि हरिखें । 'स्वप्न' स्वप्ना तुझेनि देखे । 'सुषुप्ती' सुखावे जेणें सुखें । पुर्ण संतोखें तुझेनि ॥ ११ ॥ जागृति, स्वप्न व सुषुति यांतील सर्व अनुभव तुझ्याचमुळें येतात. ११ मी जे जे 'विषय' भोगीं । तें भोक्तेपण तुझें अंगीं । तुझेनि निजसंयोगीं । मीपणें जगीं वर्तविशी मज ॥ १२ ॥ मी ज्या विषयांचा भोग घेतो, त्यांचें भोक्तृत्वहि तुलाच आहे. तुझ्या स्वरूपसंबंधानेंच तूं मला 'मी' पणाने वागवितोस. १२ माझें करूनि खांबसुत्र । तूं झालासी सुत्रधार । हालवूनियां निजसूत्र । कर्में विचित्र करविशी ॥ १३ ॥ तूं सूत्रधार झालास, मला कळसूत्री बाहुले केलेस आणि सूत्रें हालवून माझ्याकडून विचित्र कर्मे करवितोस. १३ ऐशिया श्रीजनार्दना । जग चेतवित्या चिद्घना । कृपाळुवा जगज्जीवना । नमन श्रीचरणा तुझेनि तुज ॥ १४ ॥ अशा जगचालक, चिद्घन, कृपाळू जगजीवाच्या श्रीचरणांना माझ नमन असो. १४ यापरी मजमाजीं तूं चाळिता । चाळकत्वें करविसी ग्रंथा । तेथें मी एक कवित्वकर्ता । हे जाणावी तत्वतां स्थूळबुद्धी ॥ १५ ॥ याप्रमाणे तूं माझ्यामध्यें चालक आहेस. त्या चालकत्वानेंच तूं मजकडून ग्रंथ करवितोस. पण असें असतांनाहि 'मी कवित्व करतो' हा निव्वळ भ्रम आहे. १५ एका एकु जनार्दनीं । कीं जनार्दनु एकपणीं । इये पृथक् नामांचीं लेणीं । लेऊनि एकपणीं मिरविसी तुं ॥ १६ ॥ एकनाथ जनार्दनामध्ये एकरूप आहेव जनार्दन एकपणानें-एकरूपानें एकनाथभावाला प्राप्त झाला आहे. ही भिन्न भिन्न नावाची लेणी लेवून तूं एकत्वाने मिरवीत आहेस. १६ जेवीं कनकाचें भूषण । कीं भूषणीं कनक संपूर्ण । तेवीं एका आणि जनार्दन । एकत्वें जाण जनार्दनचि ॥ १७ ॥ ज्याप्रमाणें सोन्याचे भूषण व भूषणांमध्ये ओतप्रोत सोनेंच, त्याप्रमाणें एकनाथ आणि जनार्दन हे एकत्वानें जनार्दनच आहेत. १७ ऐशी ऐकोन विनवणी । सद्गुरु तुष्टला संतोषोनी । येथें भिन्न भिन्न सोसणी । न लगे निरूपणीं करणें तुज ॥ १८ ॥ अशी ही विनंती ऐकून सद्गुरु संतुष्ट झाला आणि म्हणाला कीं, निरूपणासाठी तुला अशी भिन्न भिन्न कल्पना करावयास नको १८ जेव्हां कापुरा आगी झगटे । तेव्हांचि कापुरत्व खुंटे । सच्छिष्यासी सद्गुरु भेटे । तेव्हांचि फिटे भिन्नभेदु ॥ १९ ॥ कापुराला अग्नि लागला म्हणजे त्याचा कापुरपणा जसा खुंटतो, १९ जेणें फिटे भिन्नभेदु । तो श्रीभागवतीं निजबोधु । वसुदेवाप्रती नारदु । सांगत संवादु इतिहासाचा ॥ २० ॥ त्याप्रमाणें सच्छिष्याला सद्गुरू भेटला असतां भिन्नभाव तेव्हांच फिटतो. ज्याच्या योगाने भिन्नभाव नाहींसा होईल असाच श्रीभागवतामध्यें आत्मबोध आहे. नारद वसुदेवाला हा इतिहास सांगत आहे. २० ज्या इतिहासाचा अर्थ । परिसतां प्रगटे परमार्थ । स्वानंदबोध हृदयांत । श्रवणें सदोदित श्रोते होती ॥ २१ ॥ त्याचा अर्थ ऐकिला असतां परमार्थ प्रकट होतो व श्रोते त्याच्या श्रवणानें सदोदित संतुष्ट होतात. २१ तंव श्रोते संतसमुदावो । म्हणती कैसा नवलावो । सद्गुरुस्तवनीं ब्रह्मभावो । साधिला आवो अभेदत्वें ॥ २२ ॥ त्यांच्या हृदयात स्वानंदबोध प्रकट होतो. इतक्यांत श्रोत्यांचा संतसमुदाय म्हणाला- 'काय आश्चर्य आहे हो ! सद्गुरूचें स्तवन करीत असतांनाच तूं अभेदपणें ब्रह्मभाव साधिलास. २२ हे सद्गुरूची विनवणी । कीं ब्रह्मसुखाची खाणी । परिसतां सप्रेम बोलणीं । रिझली आयणी सज्जनांची ॥ २३ ॥ ही काय सद्गुरूची विनवणी कीं ब्रह्मसुखाची खाणी ! असें हें तुझें सप्रेम भाषण ऐकून सज्जनांची चित्तवृत्ति प्रसन्न झाली आहे. २३ या देशभाषा वाणी । उघडिली परमार्थाची खाणी । बोल नव्हती हे स्पर्शमणी । लागतां श्रवणी पालटे जीव ॥ २४ ॥ या प्राकृत भाषेंत तूंहि परमार्थाची खाणच उघडली आहेस. हे शब्द नव्हेत, तर परीस आहेत, ते कानांवर येतांच जीव जीवपण सोडून स्वरूपास प्राप्त होतो. २४ यापरी श्रीभागवतीं । अनुपम अगाध स्थिति । ते कथेची संगति । लावी सुनिश्चितीं अर्थावबोधें ॥ २५ ॥ भागवतामध्यें आत्मबोधाची अशी अनुपम अगाध स्थिति आहे. त्यांतील कथेची संगति अर्थज्ञानानें चांगल्या प्रकारे लाव.' २५ ऐकोनि संतांचें वचन । शिरीं वंदोनि त्यांचे चरण । पुढील कथानिरूपण । श्रोतीं सावधान परिसावें ॥ २६ ॥ हें संताचे वचन ऐकून व त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून पुढील कथेचे मी निरूपण करतो, तें श्रोत्यांनी सावधान चित्ताने ऐकावे. २६ येथें तृतीय अध्यायाचे अंतीं । निरूपितां तांत्रिक भक्ति । भजावें आवडेल ते मूर्ति । रायासी तदर्थी प्रश्न स्फुरला ॥ २७ ॥ तिसऱ्या अध्यायाच्या शेवटीं तांत्रिक भक्तीचे निरूपण करीत असतांना 'आवडेल त्या मूर्तीचे भजन करावे' असें जें सांगितलें आहे, त्यावरून राजाला पुढील प्रश्न स्फुरला २७ देवो एकचि त्रिजगतीं । त्याच्या किती अवतारमूर्ति । जन्म कर्म अनेक व्यक्ती । हेंचि मुनीप्रति पुसतु ॥ २८ ॥ व ' या त्रिभुवनांत देव एकच आहे, पण त्याच्या अवतारमूर्ति किती आहेत ? त्याचे जन्म व कर्मे यांचे अनेक प्रकार कसे झाले ?' असें तो मुनींना विचारू लागला. २८. श्रीराजोवाच - यानि यानीह कर्माणि यैर्यैः स्वच्छन्दजन्मभिः । चक्रे करोति कर्ता वा हरिस्तानि ब्रुवन्तु नः ॥ १ ॥ मुनीश्वरांचें अगाध ज्ञान । त्याहीवरी रसाळ निरूपण । तेंणें रायाचें वेधलें मन । प्रश्नावरी प्रश्न यालागीं पुसे ॥ २९ ॥ मुनीश्वरांचें ज्ञान अगाध होतें व निरूपण तर त्याहिपेक्षां रसाळ होतें. त्यामुळें राजाचे मन वेधले व तो प्रश्नांवर प्रश्न विचारू लागला. २९ तो म्हणे देवाधिदेवो हरि । स्वलीला कैसीं जन्में धरी । स्वेच्छा जीं जी कर्मे करी । ते अगाध थोरी मज सांगा ॥ ३० ॥ तो म्हणाला, देवाधिदेव हरि स्वलीलेने अवतार कसे धारण करतो व स्वेच्छेने कोणकोणती कर्मे करतो, ती त्याची अगाध थोरवी मला सांगा, ३० म्हणती देवा नाहीं जन्म । तेथें कैंचें पुसशी कर्म । देवो अरूप अनाम । त्यासी जन्म कर्म असेना ॥ ३१ ॥ तुम्ही कदाचित् असें म्हणाल कीं, देवाला जन्मच नाहीं तेथें कर्म कसलें विचारितोस ? देव अरूप, अनाम आहे, त्याला जन्म, कर्म नाहीं, ३१ तो 'अजन्मा' परी जन्म धरी । 'अकर्मा' परी कर्मे करी । 'विदेही' तो देहधारी । होऊनि संसारीं स्वधर्म पाळी ॥ ३२ ॥ पण तो अज असूनहि जन्म घेतो. कर्मरहित असूनहि कर्मे करतो. देहशून्य असतांना देहधारी होऊन संसारांत स्वधर्म पाळतो. ३२ त्याच्या अवतारांची स्थिति । कवण जन्म कवण व्यक्ति । किती अवतार किती मूर्ति । कृपेनें मजप्रती सांगा स्वामी ॥ ३३ ॥ त्याच्या अवतारांच्या स्थिति, जन्म कोणते, व्यक्ति कोणत्या, अवतार किती, मूर्ति किती, हें मला कृपा करून सांगा. ३३ जे कां अतीत अनागत । वर्तमान जे प्रस्तुत । ते अवतार समस्त । इत्थंभूत सांगावे ॥ ३४ ॥ जें मागें होऊन गेलें, पुढें होणार आहे व प्रस्तुत समयी आहे, तें सर्व इत्थंभूत मला सांगा. ३४ हरिचरित्र अवतारगुण । प्रतीपादन करावयाचा प्रश्न । तो सांगावया जयंतीनंदन । स्वानंदें पूर्ण 'द्रुमिल' सांगे ॥ ३५ ॥ याप्रमाणे राजाने हरीचे चरित्र व अवतारगुण यांचें प्रतिपादन करण्याविषयी प्रश्न केला. त्याचें उत्तर जयंतिनंदन द्रुमिलमुनि सांगू लागला. ३५. श्रीद्रुमिल उवाच - यो वा अनन्तस्य गुणाननन्तान् अनुक्रमिष्यन् स तु बालबुद्धिः । रजांसि भूमेर्गणयेत्कथञ्चित् कालेन नैवाखिलशक्तिधाम्नः ॥ २ ॥ ज्याची लीलाशक्ति अपरिमित । ऐशा अनंत शक्ति ज्याच्या नखांत । यालागीं तो 'अनंत' म्हणत । त्याचे गुण समस्त गणवती कोणा ॥ ३६ ॥ ज्याच्या नखांत अनंत लीलाशक्ति रहातात व त्यासाठीच त्या अपरिमित लीलाशक्तिमानाला अनंत म्हणतात, त्याच्या सर्व गुणांची गणना कोण करणार ? ३६ त्या अनंताचि गुणसमृद्धी । गणूं म्हणे तो बालबुद्धि । जेवीं का आकाशाची वृद्धि । मुंगिये त्रिशुद्धी न करवी माप ॥ ३७ ॥ मी अनंताच्या गुणांची गणना करतो. असें जो म्हणतो, तो खरोखर मंदमति होय. मुंगीला आकाशाच्या लांबीरुंदीचें माप जसे कधींहि करवत नाहीं, ३७ सागरींचें जळ संपूर्ण । केवीं गणूं शके लवण । तेवीं अनंताचे अनंत गुण । आकळी कवण निजसत्ता ॥ ३८ ॥ किंवा मीठ सागरातील सर्वजलांचें प्रमाण जाणत नाहीं, त्याप्रमाणें अनंताचे अनंत गुण आपल्या बुद्धिबलानें कोण जाणार ! ३८ पर्जन्याचिया धारा । गणितां येतील नृपवरा । पृथ्वीचिया दूर्वांकुरां । सुखें महावीरा गणितां येती ॥ ३९ ॥ पर्जन्याच्या धारा मोजतां येतील, पृथ्वीवरील दूर्वांकुरांचीहि गणना करितां येईल, ३९ वारा अफाट धांवे । तोही गणितातें पावे । निमेषोन्मेषांचे यावे । त्यांसीही संभवे गणित राया ॥ ४० ॥ अफाट धांवणाऱ्या वाऱ्याचेंहि गणित करितां येईल, डोळ्यांच्या उघड-झापीचेहि प्रमाण ठरविता येईल, ४० पृथ्वीचिया परिमाणा । काळें काळें होय गणना । परी भगवंताचिया गुणां । वेदांसहि जाणा गणित नव्हे ॥ ४१ ॥ पृथ्वीचे परिणामहि केव्हा केव्हा निश्चित करितां येईल, पण भगवंताच्या गुणांचे गणित वेदांनाहि करितां येत नाहीं. ४१ भगवंताचें नाम एक । घेतां वेद झाले मूक । त्याचे गुण गणितां सकळिक । शेषाचें मुख दुखंड झालें ॥ ४२ ॥ तेथें भगवंताचे एक नांव घेताच वेद मुके झाले. त्याच्या सर्व गुणांची गणना करितांना शेषाच्या एका जिव्हेच्या दोन जिव्हा झाल्या. ४२ त्या अनंताचे अनंत गुण । येथ गणूं शके कवण । कांहीं एक संक्षेपें जाण । सांगेन लक्षण अवतारांचें ॥ ४३ ॥ तेथें त्या अनंताचे अनंत गुण कोण सांगू शकणार ! तथापि मी आतां संक्षेपानें अवताराचें लक्षण सांगतो. ४३. भूतैर्यदा पञ्चभिरात्मसृष्टैः पुरं विराजं विरचय्य तस्मिन् । स्वांशेन विष्टः पुरुषाभिधानं अवाप नारायण आदिदेवः ॥ ३ ॥ अवतारांमाजीं प्रथमतां । 'पुरुषावतारांची' कथा । द्रुमिल झाला सांगता । ऐक तत्वतां महाराजा ॥ ४४ ॥ हे महाराजा, ऐक, असें म्हणून द्रुमिल भगवानाच्या अवतारांतील पहिल्या पुरुषावताराची कथा सांगू लागला. ४४ नारायणें आत्मशक्तीं । पंचमहाभूतें भूताकृती । सृजूनियां यथानिगुतीं । ब्रह्मांडाची स्थिति निर्माण केली ॥ ४५ ॥ नारायणाने आत्मशक्तीने भूताकार पंचमहाभूतें उत्पन्न करून क्रमाने ब्रह्मांडाची स्थिति निर्माण केली. ४५ 'विराजपुर' ब्रह्मांडा नाम । तेथ लीला प्रवेशे देवोत्तम । यालागीं 'पुरुष' हें नाम । पुरुषोत्तम स्वांशें पावे ॥ ४६ ॥ ब्रह्माण्ड हेंच विराट्पुरुषाचे शरीर आहे. त्यांत देवोत्तमानें स्वांशानें लीलेने प्रवेश केला, म्हणून त्याला पुरुष हें नांव प्राप्त झाले. ४६ त्याचेनि अंशयोगें प्रकृति । झाली प्रजांतें प्रसवती । यालागीं 'पुरुष' नामस्थिति । जाण निश्चितीं पावला ॥ ४७ ॥ त्याच्या अंशाच्या संबंधाने माया प्रजेला प्रसवली. म्हणून त्याचें पुरुष हें नांव रूढ झालें. ४७. तो अकर्तात्मयोगयुक्तीं । जग चेतवी चिच्छक्तीं । ज्याचेनि जगा जगत्वें स्फूर्ति । त्याची गुणकीर्ति दों श्लोकीं सांगों ॥ ४८ ॥ जो स्वतः अकर्ता असूनहि आपल्या योगशक्तीनें सर्व जगाला चिच्छक्ति देऊन चेतवितो व ज्याच्यामुळेच जगाची जगत्त्वानें स्फूर्ति होते, त्याची गुणकीर्ति या पुढील दोन श्लोकांनी सांगतो. ४८. यत्काय एष भुवनत्रयसन्निवेशो यस्येन्द्रियैस्तनुभृतां उभयेन्द्रियाणि । ज्ञानं स्वतः श्वसनतो बलमोज ईहा सत्त्वादिभिः स्थितिलयोद्भव आदिकर्ता ॥ ४ ॥ आदावभूच्छतधृती रजसास्य सर्गे विष्णुः स्थितौ क्रतुपतिर्द्विजधर्मसेतुः । रुद्रोऽप्ययाय तमसा पुरुषः स आद्य इत्युद्भवस्थितिलयाः सततं प्रजासु ॥ ५ ॥ त्रैलोक्य वसे जें कांही । तेंचि शरीर त्याचें पाहीं । ज्याचेनि योगें देही । ठायींच्या ठायीं वर्तती ॥ ४९ ॥ सर्व त्रैलोक्य हेंच ज्याचे शरीर आहे व ज्याच्यायोगानें सर्व देही आपापल्या ठिकाणी व्यवहार करतात, ४९ ब्रह्मादिक जे तनुधारी । त्यांच्या ज्ञानकर्मेंद्रियांची थोरी । ज्याचेनि इंद्रियेंकरीं । निजव्यापारीं वर्तती ॥ ५० ॥ ज्याच्या इंद्रियविकारांनी ब्रह्मादि जीवांची ज्ञानकर्मेंद्रिये आपापली कर्मे करतात, ५० जो जगाचे नयनांचा नयन । जो जगाच्या घ्राणांचें घ्राण । जो जगाच्या श्रवणांचें श्रवण । रसनेची जाण रसना जो कां ॥ ५१ ॥ जो जगाच्या नेत्रांचा नेत्र, घ्राणांचे घ्राण, श्रवणांचे श्रवण, रसनेची रसना, ५१ जो जगाच्या हातांचे हात । ज्याचे पाय जगाच्या पायांत । जो वाचेची वाचा निश्चित । एवं उभय इंद्रियांआंत इंद्रियें ज्याचीं ॥ ५२ ॥ हातांचा हात, पायांचा पाय, वाणीचा वाक्, याप्रमाणे प्राण्यांच्या दोन्ही प्रकारच्या इंद्रियांत ज्याची इंद्रिये आहेत, ५२ जीवाच्या ठायीं जें कां ज्ञान । तेंही त्याचेनि ज्ञानें जाण । त्यासी ज्ञानदाता नाहीं आन । स्वयें ज्ञानघन स्वभावतांचि ॥ ५३ ॥ जीवांचे ज्ञानहि ज्याच्या ज्ञानाने आहे व ज्याला ज्ञानदाता दुसरा कोणी नाहीं, जो स्वतःच ज्ञानघन आहे, ५३ ज्याचेनि प्राणें जाण । जगाचा चळे प्राण । बळ तेज क्रियाचरण । जगासी संपूर्ण ज्याचेनि ॥ ५४ ॥ ज्याच्या प्राणाने जगाचा प्राण आपला व्यापार करतो, ज्याच्या योगाने सर्व जगाला शारीरबल व मानसबल प्राप्त झालें आहे, ज्याच्यामुळें जगाचा सर्व व्यवहार चालतो. ५४ रजतमसत्वादिगुणयुक्त । उत्पत्तिस्थितिप्रळयान्त । मूळीं आदिकर्ता भगवंत । जाण तो निश्चित 'पुरुषावतार' ॥ ५५ ॥ उत्पत्ति, स्थिति व प्रलय या प्रसंगीं जो रज, सत्त्व व तम या गुणांनी युक्त होतो, तोच आदिकर्ता भगवान् पुरुषावतारआहे, असें तूं जाण. ५५ सत्वादि त्रिगुणावस्था । उत्पत्तिस्थितिलयकर्ता । तेही गुणावतारकथा । ऐक नृपनाथा सांगेन ॥ ५६ ॥ राजा, सत्त्वादि त्रिगुणावस्थेनें तोच उत्पत्ति, स्थिति लयकर्ता होतो. हीच गुणावतारकथा मी आतां तुला सांगतो. ५६ तोचि आदिकल्पीं उत्पत्ति । रजोगुणें राजसा शक्तीं । स्वयें झाला शतधृती । 'ब्रह्मा' म्हणती जयातें ॥ ५७ ॥ प्रथमकल्पांत रजोगुणाने राजसी शक्ति धारण करून सृष्टीसाठी तो स्वतः शतधृति झाला. त्याला ब्रह्मा म्हणतात. ५७ एवं ब्रह्मरूपें उत्पत्ति । सृजिता झाला राजसा शक्तीं । तेथें प्रतिपाळावया स्वधर्मस्थिति । सत्वगुणें निश्चितीं 'श्रीविष्णु' जाहला ॥ ५८ ॥ तो आपल्या राजसशक्तीने सृष्टिकर्ता बनला. त्या सृष्टीचे व स्वधर्मस्थितीचें परिपालन करण्यासाठीं सत्त्वगुणानें तोच श्रीविष्णू झाला. ५८ तो द्विजधर्मप्रतिपाळणु । यज्ञभोक्ता श्रीविष्णु । देखतां धर्माचा अवगुणु । अवतरे नारायणु नानावतारीं ॥ ५९ ॥ तो द्विजधर्माचा पालक व यज्ञभोक्ता श्रीविष्णू धर्माचा ऱ्हास झाला आहे असें पहाताच अनेक अवतार घेऊन लोकी येतो व धर्माची स्थापना करतो. ५९. तोचि ये सृष्टीचे प्रांतीं । तमोगुणें तामसा शक्तीं । स्वयें जाहला 'रुद्रमूर्ति'। सकळ कल्पांतीं निर्दाळितु ॥ ६० ॥ सृष्टीचा नियतकाल संपला असतां तामसशक्तीनें स्वतः रुद्रमूर्ति होऊन कल्पांतीं संहार करतो. ६० जो शेताची पेरणी करी । तोचि राखे देखे सोकरी । तोचि वाळलियावरी । संवगणी करी सर्वांची ॥ ६१ ॥ जो शेतकरी शेत पेरतो, तोच त्याचें रक्षण करतो व शेवटीं शेत वाळल्यावर तें सर्व कापून टाकतो. ६१ तेवीं उत्पत्तिकाळीं तोचि ब्रह्मा । स्थितिकाळीं तोचि विष्णुनामा । प्रळयाकाळींही रुद्रपमा । ये पुरुषोत्तमा तेचि नामें ॥ ६२ ॥ त्याच न्यायाने उत्पत्तिकालीं तोच ब्रह्मा, स्थितिकालीं तोच विष्णू व प्रलयकाळी तोच पुरुषोत्तम रुद्र होतो. ६९ यालागीं तो आदिकर्ता । श्रुतिशास्त्रीं दृढ वार्ता । दक्षकश्यपादिकां कर्तव्यता । त्यांसी समर्थता याचेनि ॥ ६३ ॥ म्हणूनच वेदशास्त्रादिकांत त्याला आदिकर्ता म्हटलें आहे. दक्ष, कश्यप इत्यादि प्रजापतींना याच्याच सामर्थ्यानें प्रजाकर्तृत्व आहे. ६३ यापरी विचारितां । हाचि एक सकळ कर्ता । यावांचून कर्तव्यता । अणुमात्रता नव्हे आना ॥ ६४ ॥ याप्रमाणे विचार केला असतां हाच एक सकलकर्ता आहे. याच्यावांचून दुसऱ्या कोणाला अणुमात्र कर्तव्यता नाहीं. ६४ जो सृष्टीपूर्वीं स्वयंभ असे । जेणें उत्पत्तिस्थितिप्रळयो भासे । तोचि आदिकर्ता अनायासें । तोचि निजांशें पुरुषावतारु ॥ ६५ ॥ जो सृष्टीच्यापूर्वी स्वयंप्रकाश होता व ज्याच्या- मुळें उत्पत्ति-स्थिति-प्रलय भासतात, तोच आदिकर्ता असून निजांशानें तोच पुरुषावतार होय. ६५ ऐक राया अतिविचित्र । जें परिसतां पुण्य पवित्र । तो नारायणाचा अवतार । ज्याचें चरित्र अलोलिक ॥ ६६ ॥ राजा, मी तुला आतां आश्चर्यकारक नारायणावतार सांगतो. त्याचें चरित्र विचित्र आहे व तें ऐकण्यास अति पवित्र व पुण्यकारक आहे. ६६. धर्मस्य दक्षदुहितर्यजनिष्ट मूर्त्यां नारायणो नर ऋषिप्रवरः प्रशान्तः । नैष्कर्म्यलक्षणमुवाच चचार कर्म योऽद्यापि चास्त ऋषिवर्यनिषेविताङ्घ्रिः ॥ ६ ॥ जो अजन्मा नित्य त्रिभुवनीं । जो न जन्मोनि जन्मला योनीं । तेणें धर्माची धर्मपत्नी । केली जननी दक्षकन्या 'मूर्ती' ॥ ६७ ॥ जो नित्य अज असल्यामुळें या त्रिभुवनांत वस्तुतः न जन्मताच देहवान् असल्याप्रमाणें भासणारा भगवान् त्यानें धर्माची धर्मपत्नी जी मूर्तिसंज्ञक दक्षकन्या तिला आपली जननी केली. ६७ ते मूर्तिमातेच्या उदरीं । नर-नारायण अवतारी । एकचि दोंरूपेंकरीं । धर्माच्या घरीं अवतरले ॥ ६८ ॥ त्या मूर्तिमातेच्या उदरी नर-नारायणांचा अवतार झाला. तो एकच दोन रूपे धारण करून धर्माच्या घरीं अवतरला. ६८ तेणें नारदादिकांसी जाण । निरूपिलें नैष्कर्म्यलक्षण । स्वयें आचरला आपण । तें कथन ऐक राया ॥ ६९ ॥ त्यानें नैष्कर्म्यलक्षण नारदादिकांना सांगितलें व स्वतः आचरलें. राजा, तू आतां तीच कथा ऐक. ६९ 'नारायण' म्हणसी कोणे देशीं । तो बदरिकाश्रमीं आश्रमवासी । नारद सनकादिक ऋषि । अद्यापि त्यापासीं सेवेसी असती ॥ ७० ॥ तो नारायण कोठे आहे म्हणून विचारशील, तर सांगतो. तो बदरिकाश्रमांतील आपल्या आश्रमांत रहातो. नारद, सनकादिक इत्यादि ऋषि अद्यापि त्याच्यापाशीं सेवेला असतात. ७० त्यासी स्वस्वरूपाचें लक्ष । सहजीं असे प्रत्यक्ष । ते स्वरूपनिष्ठेचा पक्ष । अलक्ष्याचें लक्ष्य प्रबोधी स्वयें ॥ ७१ ॥ त्याला स्वरूपाचे भान सहजच साक्षात् असतें, त्यामुळें तो त्या स्वरूपनिष्ठेचा पक्ष म्ह. अलक्ष्याचे लक्ष्य तो स्वतः उपदेशितो. ७१ तया स्वरूपाचा निजबोध । स्वयें पावावया विशद । अद्यापवरी ऋषिवृंद । नित्य संवाद करिताति त्यासीं ॥ ७२ ॥ त्या स्वरूपाचा अनुभव स्वतः साक्षात् घ्यावा, म्हणून ऋषींचे समूह त्याच्यापाशीं अद्यापि नित्य संवाद करतात. ७२ जें स्वरूप लक्षेना जनीं । तें विशद करूनि दे वचनीं । तेंचि अनुग्रहेंकरूनी । अनुभवा आणी तत्काळ ॥ ७३ ॥ जें स्वरूप व्यवहारांत कोणाच्याहि प्रत्ययास येत नाहीं तेंच तो आपल्या वचनांनी विशद करून सांगतो व अनुग्रहाने तत्काल अनुभवास आणून देतो. ७३ ज्ञाते बहुसाल ऋषीश्वर । त्यांमाजीं नारायण अवतार । तेथ वर्तलें जें चरित्र । अतिविचित्र ऐक राया ॥ ७४ ॥ ज्ञाते ऋषीश्वर पुष्कळ आहेत. त्यांतीलच एक हा नारायणावतार आहे. त्या अवतारांत जें अति विचित्र चरित्र घडले, तें तूं ऐक ७४ इन्द्रो विशङ्क्य मम धाम जिघृक्षतीति कामं न्ययुङ्क्त सगणं स बदर्युपाख्यम् । गत्वाप्सरोगणवसन्तसुमन्दवातैः स्त्रीप्रेक्षणेषुभिरविध्यदतन्महिज्ञः ॥ ७ ॥ ऐसा नारायणाचा प्रताप । देखोनि निष्ठा दृढ तप । तेणें इंद्रासी आला कंप । म्हणे स्वर्ग निष्पाप घेईल माझा ॥ ७५ ॥ असा नारायणाचा प्रताप, निष्ठा व दृढ तप पाहून इंद्राला कंप सुटला. तो म्हणाला-- हा निष्पाप नारायण माझा स्वर्ग घेईल ! ७५ त्याचें तप देखोनि परम । म्हणे गेलें गेलें स्वर्गधाम । इंद्रें कोपें प्रेरिला काम । अप्सरासंभ्रमसमवेत ॥ ७६ ॥ त्याचें तें दुष्कर तप पाहून ' गेलें गेलें, माझें रूपर्गस्थान गेलें' असें त्याला वाटलें व कोपाने अप्सरांच्या समूहासह त्यानें कामाला प्रेरणा केली. ७६ कामसमवेत अप्सरा । सवें वसंतही दुसरा । क्रोधु अवघियां पुढारा । जो तापसांतें पुरा नागवी सदा ॥ ७७ ॥ तेव्हां कामदेव अनेक अप्सरा, त्यांच्याबरोबर दुसरा वसंत आणि सर्व तपस्व्यांना सर्वदा पुरता नागविणारा, या सर्वांचा पुढारी, क्रोध यांना बरोबर घेऊन, नारायणाच्या बदीरकाश्रमास चालला. ७७ तीर्थोतीर्थींच्या अनुष्ठाना । क्षमा नुपजे अंतःकरणा । कोपु येतांच जाणा । करी उगाणा तपाचा ॥ ७८ ॥ निरनिराळ्या तीर्थांमध्यें केलेले अनुष्ठान अंतःकरणांत क्षमा न उपजल्यास व्यर्थ होतें व कोप येतांच सर्व तपाचा नाश होतो. ७८ क्रोधु तापसांचा उघड वैरी । तापसां नागवी नानापरी । तोही नारायणावरी । अवघ्यां अग्रीं चालिला ॥ ७९ ॥ त्यांतील क्रोध हा तापसांचा उघड वैरी आहे. तो तापसांची अनेक प्रकारे हानि करीत असतो. तोहि सर्वांच्या पुढें नारायणावर चालला. ७४. ऐशीं मिळोनि बिरुदायितें । आलीं बदरिकाश्रमा समस्तें । नारायणु तप करी जेथें । उठावलीं तेथें अतिआक्रमेंसीं ॥ ८० ॥ अशी ही सर्व मिळून नारायणाला वश करण्याचा विडा उचलून बदरिकाश्रमास आली आणि नारायण जेथे तप करीत होता, तेथें एकाएकीं मोठ्या समारंभांनी प्रकट झाली. ८० वसंतें श्रृंगारिलें वन । कोकिळा कलरवें गायन । सुगंध शीतळ झुळके पवन । पराग संपूर्ण वरुषती सुमनें ॥ ८१ ॥ वसंताने त्या वनाला शृंगारिले, कोकिळा मंजुळ शब्दाने गायन करूं लागल्या, वायु मंद, सुगंध व शीतल वाहू लागला, वृक्ष परागांनी परिपूर्ण अशा पुष्पांचा वर्षाव करूं लागले. ८१ तेथ भ्रमरांचें झणत्कार । कामिनीगायन कामाकार । हावभाव कटाक्षविकार । कामसंचार चेतविती ॥ ८२ ॥ तेथें भ्रमरांचा गुंजारव ऐकू येऊ लागला, अप्सरा कामोद्दीपक गायन करूं लागल्या, हावभाव व नेत्रकटाक्ष यांनी त्या कामविकारांना उद्दीपित करूं लागल्या, ८२ नव्हेचि कामिनीकामबाधा । पराक्रमु न चलेचि क्रोधा । तोही सांडोनियां बिरुदा । परतला नुसधा म्लानवदनें ॥ ८३ ॥ पण नारायणाला कामाची बाधा होईना. त्याच्यापुढे क्रोधाचाहि कांहीं पराक्रम चालेना, म्हणून तो क्रोध म्लान- मुख होऊन व आपलें बिरुद सोडून मुकाट्याने परतला. ८३ मग मदनें मांडोनियां ठाण । विंधी कामिनीकटाक्षबाण । तेणें घायें नारायण । अणुप्रमाण न डंडळेचि ॥ ८४ ॥ तेव्हां मदनाने वीरासन ठोकून नारायणाला कामिनी- कटाक्षरूप बाणांनी वेध केला. पण तो मुनि त्या बाणांच्या घावाने मनांत यत्किंचित्हि डळमळला नाहीं. ८४ शस्त्रें तोडितां आकाशासी । आकाश स्वयें सावकाशी । तेवीं कामें छळीतां नारायणासी । तो निजसंतोषीं निर्द्वंद्व ॥ ८५ ॥ शस्त्रानें आकाशाला तोडू लागलें असतां त्याचा अवकाश जसा अविच्छिन्न रहातो, त्याचा छेद होत नाहीं, त्याप्रमाणें कामाने नारायणाला असें परोपरीने छळले असताहि तो आपल्या आत्मसंतोषांत निर्विकार स्थिर राहिला. ८५ आग्या निजतेजसत्ता । अग्नीतेज प्राशुं जातां । तोंड जळे चवी चाखितां । तेवीं कामिनीकामता नारायणदृष्टीं ॥ ८६ ॥ एखादा मनुष्य अभिमानाने स्वतः अग्नीला खाऊ लागल्यास त्याचें तोंड जसे जळते, त्याप्रमाणें नारायणाच्या दृष्टीने कामिनींची कामना होरपळून गेली. ८६ नेणतां नारायणमहिमे । धांवोनि घाला घातला कामें । तेव्हां अवघींच पराक्रमें । स्वनिंद्य धर्मे लाजलीं ॥ ८७ ॥ नारायणाचा महिमा न जाणता कामाने त्याच्यावर धावून घाला घातला; पण तो व त्याचा परिवार या सर्वांचे पराक्रम फुकट गेल्यामुळें आपल्या निंद्य कर्मांनी ते सर्व मनांतल्यामनांत लाजले ८७ तेथ अवघीं झालीं पराङ्मुवखें । पाठमोरीं निघालीं अधोमुखें । तेव्हां त्यांची गति निःशेखें । नारायाण देखे खुंटिली ॥ ८८ ॥ व सर्व परिवारासह काम खालीं मान घालून परतला. तीं सर्व इंद्राकडे जाऊं लागली पण नारायणाने त्यांची गति कुंठित केली. ८८ इंद्रियनियंता नारायण । नेणोनि छळूं गेलीं आपण । त्यापुढोनि पुनरागमन । सर्वथा जाण करवेना ॥ ८९ ॥ नारायण हा सर्व इंद्रियांचा नियंता आहे, हें न जाणून तीं सर्व त्याला छळावयास त्याच्यापुढें आपण होऊन गेली, पण तेथून परत फिरण्याचें मात्र त्यांच्या स्वाधीन राहिलें नाहीं. ८९ मागें न निघवे निश्चितें । ऐसें जाणोनि समस्तें । थोर गजबजलीं तेथें । भयचकितें व्याकुळें ॥ ९० ॥ आपल्याला स्वस्थानी परत जातां येत नाहीं असें जाणून तीं सर्व अतिशय गडबडली व मनांत आश्चर्यचकित होऊन भयाने व्याकुळ झाली. ९० जाणोनि नारायणप्रताप । आतां कोपून देईल शाप । येणें धाकें म्लानरूप । अतिसकंप भयभीतें ॥ ९१ ॥ नारायणाचा प्रताप त्यांना कळलेला असल्यामुळें हा आपल्याला रागावून शाप देईल, या भीतीनें त्यांची मुखे कोमेजली. शरीरे कापूं लागली. ९१ ऐशी देखोनि त्यांची स्थिति । कृपेनें तुष्टला कृपामूर्ति । अणुमात्र कोपु नये चित्तीं । अभिनव शांति नारायणाची ॥ ९२ ॥ तेव्हां त्यांची ही अवस्था पाहून कृपामूर्ति नारायणाला त्यांची दया आली. त्याच्या मनांत त्यांच्याविषयीं अणुमात्रहि क्रोध आला नाहीं; उलट तो त्यांच्यावर संतुष्ट झाला. खरोखर त्याची शान्ति अपूर्व होती. ९२. विज्ञाय शक्रकृतमक्रममादिदेवः प्राह प्रहस्य गतविस्मय एजमानान् । मा भैष्ट भो मदन मारुत देववध्वो गृह्णीत नो बलिमशून्यमिमं कुरुध्वम् ॥ ८ ॥ इंद्रें केला अपराध । तरी नारायणासी न येचि क्रोध । बापु निजशांति अगाध । न मनी विरुद्ध कामादिकांचे ॥ ९३ ॥ इंद्राने जरी अपराध केला तरी नारायणाला क्रोध आला नाहीं. त्याची शांति मोठी विलक्षण खरी ! त्यानें आपल्या मनांत कामादिकांचें अनिष्ट चिंतिले नाहीं, ९३ न येचि कामादिकांवरी कोप । इंद्रासही नेदीच शाप । नारायणाच्या ठायीं अल्प । कदा विकल्प नुपजेचि ॥ ९४ ॥ त्याला कामादिकांचा क्रोध आला नाहीं व त्यानें इंद्रालाहि शाप दिला नाहीं. त्याच्या मनांत यत्किंचित्हि विकल्प आला नाहीं. ९४ अपकार्यावरी जो कोपला । तो तत्काळ कोपें नागविला । अपकार्या जेणें उपकार केला । तोचि दादुला परमार्थी ॥ ९५ ॥ अपकार करणारांवर जो रागावतो त्याचा तत्काळ नाश होतो, पण अपकार करणारावर जो उपकार करतो तोच परमार्थांमध्ये समर्थ होय. ९५ अपकार्यां उपकार करिती । त्याचे नांव गा परम शांति । ते शांतीची निजस्थिति । दावी लोकांप्रती आचरोनि ॥ ९६ ॥ आपल्या शत्रूवरहि उपकार करणें यालाच परम शान्ति म्हणतात. नारायण तीच परम शान्ति लोकांना स्वतः आचरून दाखविता झाला. ९६ परमार्थाची मुख्यत्वें स्थिति । पाहिजे गा परम शांति । ते शांतिची उत्कट गति । दावी लोकांप्रती आचरोनि ॥ ९७ ॥ मुख्य परमार्थाची सिद्धि होण्यास परम शान्ति पाहिजे. त्या शांतीचीच परम स्थिति नारायणाने लोकांना आचरून दाखविली. ९७ भयभीत कामादिक । अप्सरागण साशंक । त्यातें अभयदानें सुख । देऊनियां देख नारायण बोले ॥ ९८ ॥ काम, क्रोध व अप्सरा ही सर्व मनांत साशंक व भयभीत झाली होतीं. त्यांस अभयदानाने सुखी करून तो म्हणाला. ९८ अहो कामवसंतादिक स्वामी । कृपा करूनि आलेति तुम्ही । तुमचेनि पदाभिगमीं । आश्रमभूमी पुनीत झाली ॥ ९९ ॥ '' अहो श्रेष्ठ कामवसंतादिकहो, तुम्ही कृपा करून आलेत. तुमच्या चरणधुळीनें आमची आमश्रमभूमि पावन झाली. ९९ तुमचें झालिया आगमन । अवश्य करावें आम्हीं पूजन । हेंचि आमुचें अनुष्ठान । कांहीं बळिदान अंगीकारा माझें ॥ १०० ॥ तुमचें आगमन झालें आहे, तेव्हां तुमचे पूजन आम्ही अवश्य केलें पाहिजे. हेंच आमचे अनुष्ठान आहे. आमच्या आदरातिथ्याचा थोडासा स्वीकार करा. १०० अवो अप्सरा देवकांता । तुम्ही भेवों नका सर्वथा । येथ आलिया समस्तां । पूज्य सर्वथा तुम्ही मज ॥ १ ॥ अहो देवस्त्रियांनो- अप्सरांनो, तुम्ही अगदीं भिऊ नका. येथें आलेली तुम्ही सर्व आम्हांला पूज्यच आहात १ आश्रमा आलिया अतिथि । जे कोणी पूजा न करिती । त्यांची शून्य पुण्यसंपत्ति । आश्रमस्थिति शून्य होये ॥ २ ॥ आपल्या घरीं आलेल्या अतिथींची जो कोणी पूजा करीत नाहीं, त्याचें सर्व पुण्य, संपत्ति व आश्रमस्थिति ही सर्व नाहीशी होतात. २ तुम्हीं नांगीकारितां पूजन । कांहीं न घेतां बळिदान । गेल्या हा आश्रम होईल शून्य । यालागीं कृपा करून पूजा घ्यावी ॥ ३ ॥ तुम्ही जर माझ्या पूजेचा व उपहारादिकांचा स्वीकार न करतां गेलात तर आमचा आश्रम शून्य होईल. यासाठी कृपा करून आमच्या पूजेचा स्वीकार करा. ३ आश्रमा आलिया अतिथी । तो पूज्य सर्वांस सर्वार्थीं । अतिथि आश्रमीं जे पूजिती । ते आश्रमकीर्ति शिव वानी ॥ ४ ॥ आश्रमांत आलेले अतिथि सर्वांना सर्वप्रकारें पूज्य आहेत. ज्या आश्रमांत अतिथींचा सत्कार करतात त्या आश्रमांची कीर्ति शिव वाखाणितो. ४ व्याही रुसलिया पायां पडती । तेवीं विमुख जातां अतिथि । जे वंदोनियां सुखी करिती । ते सुख पावती स्वानंदे ॥ ५ ॥ व्याही जर रुसला तर त्याच्या पाया पडून त्याचा रुसवा घालवितात, त्याप्रमाणें अतिथि परत जात असतां त्यास वंदन करून जे त्याचा सत्कार करतात, ते स्वानंदसुखाला प्राप्त होतात. ५ व्याही रुसलिया कन्या न धाडी । अतिथि रुसलिया पुण्यकोडी । पूर्वापार जे कां जोडी । तेही रोकडी क्षयो पावे ॥ ६ ॥ व्याही जर रुसला तर तो मुलीला माहेरी धाडीत नाहीं, त्याप्रमाणें अतिथि रुसला तर अनके जन्मांत ज्या पुण्यांच्या कोटि जोडलेल्या असतात, तें सर्व पुण्य क्षय पावते. ६ वैकुंठीं ज्याची निजस्थिति । तो त्या आश्रमा ये नित्य वस्ती । जे आश्रमीं अतिथि । पूजिती प्रीतीं ब्रह्मात्मभावें ॥ ७ ॥ ज्या आश्रमांत अतिथींची ब्रह्मात्मभावानें पूजा करतात, तेथें वैकुंठांत रहाणारा भगवान नित्य वस्ती करतो'' ७ ऐसें बोलिला तयांप्रती । परी माझी हे अगाध शांति । हेही नारायणाचे चित्तीं । गर्वस्थिति असेना ॥ ८ ॥ असें तो त्यांना बोलला. परंतु माझी शान्ति अशी अगाध आहे, असा गर्व नारायणाच्या मनालाहि शिवला नाहीं. ८ ऐक राया अतिअपूर्व । असोनि निजशांति अनुभव । ज्याच्या ठायीं नाहीं गर्व । तोचि देवाधिदेव निश्चयेंसीं ॥ ९ ॥ हे राजा, अशी अपूर्व शान्ति असूनहि ज्याला त्याचा तीळभरहि गर्व नाहीं, तोच निश्चयानें देवाधिदेव जाणावा. ९ जो नित्य नाचवी सुरनरांसी । ज्या भेणें तप सांडिजे तापसीं । त्या अभय देवोनि कामक्रोधांसी । आपणापासीं राहविलीं ॥ ११० ॥ जो काम, देव व मनुष्य यांनाहि नित्य नाचवितो, ज्याच्या भीतीनें तापस आपल्या तपाला आंचवतात, त्या कामाला व त्याच्या साह्यकर्त्या क्रोधा- दिकांनाहि अभय देऊन नारायण त्यांना आपणापाशीं ठेवून घेता झाला. ११०. इत्थं ब्रुवत्यभयदे नरदेव देवाः सव्रीडनम्रशिरसः सघृणं तमूचुः । नैतद्विभो त्वयि परेऽविकृते विचित्रं स्वारामधीरनिकरानतपादपद्मे ॥ ९ ॥ एवं अभय देत नारायण । स्वमुखें बोलिला आपण । तेणें कामादि अप्सरागण । लाजा विरोन अधोमुख झालीं ॥ ११ ॥ याप्रमाणे नारायण त्यांना अभय देत स्वतः बोलला असतां कामादिक अप्सरांसह लज्जेने खालीं मान घालून बसली. ११ देखोनि निर्विकार पूर्ण क्षमा । श्रीनारायण हा परमात्मा । कळों सरलें वसंतादि कामा । त्याचाचि महिमा वर्णिती स्वयें ॥ १२ ॥ श्रीनारायणाला निर्विकार व पूर्णक्षमायुक्त पाहून तो परमात्मा आहे असें कामवसंतादिकांस कळून चुकले व तीं स्वतः त्याचाच महिमा वर्णूं लागली. १२ ऐकें नरदेव चक्रवर्ती । विदेहा सार्वभौमा भूपती । त्या नारायणाची निजस्तुती । कामादि करिती सद्भावेंसीं ॥ १३ ॥ हे चक्रवर्ति राजा, तीच कथा आतां ऐक. १३ जे सदा सर्वांतें छळिती । त्यांहीं देखिली पूर्ण शांति । तेचि शांतीची स्तुति करिती । नारायणाप्रती कामक्रोध ॥ १४ ॥ जे नेहमी सर्वांचा छळ करणारे तेच काम-क्रोध नारायणाची पूर्ण शांति पाहून त्याच्या शांतीची स्तुति करूं लागले. १४ जेणें संतोषे श्रीनारायण । त्यासी कृपा उपजे पूर्ण । ऐशिया परीचें स्तवन । मांडिलें संपूर्ण परमार्थबुद्धीं ॥ १५ ॥ ज्यायोगे नारायण संतुष्ट होईल व त्याच्या मनांत पूर्ण कृपा उत्पन्न होईल अशा प्रकारचे स्तवन त्यांनीं परमा-बुद्धीने आरंभिलें. १५ जयजय देवाधिदेवा । तुझिया अविकारभावा । पाहतां न देखों जी सर्वां । देवांमानवांमाझारीं ॥ १६ ॥ हे देवाधिदेवा, तुझा जयजयकार असो. तुझा हा निर्विकार भाव सर्व देव व मानव यांतील कोणामध्येच दिसत नाहीं. १६ मज कामाचेनि घायें । ब्रह्मा कन्येसी धरूं जाये । पराशरा केलें काये । भोगिली पाहें दिवा दुर्गंधा ॥ १७ ॥ मी जो काम त्या माझ्या व्यथेनें ब्रह्मा आपल्या कन्येला धरावयास गेला. पराशराने दुर्गूंधयुक्त मत्स्यगंधेचा दिवसा उपभोग घेतला. १७ ज्यातें योगी वंदिती मुगुटीं । जो तापसांमाजी धूर्जटी । तो शिवु लागे मोहिनीपाठीं । फिटोनि लंगोटी वीर्य द्रवलें ॥ १८ ॥ अहो, ज्याच्या चरणांवर योगी लोटांगणे घालतात व जो सर्व तपस्व्यांमध्ये श्रेष्ठ तो शंकरहि जेव्हां मोहिनीच्या मागें लागला, तेव्हां त्याची कशी त्रेधा उडाली, हें पुराणांत प्रसिद्धच आहे. १८ विष्णु वृंदेच्या श्मशानीं । धरणें बैसे विषयग्लानीं । अहल्येची काहणी । वेदीं पुराणीं वर्णिजे ॥ १९ ॥ विष्णू विषयांसाठी व्याकुळ होऊन स्मशानांत वृंदेसाठी धरणें धरून बसला. अहल्येचा कहाणी तर वेदांत व पुराणांत प्रसिद्धच आहे. १९ नारदु नायके माझी गोष्टी । त्यासी जन्मले पुत्र साठी । माझी साहों शके काठी । ऐसा बळिया सृष्टीं असेना ॥ १२० ॥ नारद माझी गोष्ट ऐकेना, पण त्याला साठ पुत्र झाले. तेव्हां माझा तडाखा सहन करील असा समर्थ या जगांत कोण आहे ? १२० जो ब्रह्मचार्यांमाजीं राजा । हनुमंतु मिरवी पैजा । तयास्तव मकरध्वजा । संगेवीण वोजा जन्मविला म्यां ॥ २१ ॥ ब्रह्मचाऱ्यांतील श्रेष्ठ हनुमान मोठ्या पैजा मारीत होता, म्हणून मीं त्याच्यापासून मकरध्वजाला उत्पन्न करविले, २१ कलंकिया केला चंद्र । भगांकित केला इंद्र । कपाटीं घातला षण्मुख वीर । जो लाडका कुमर महेशाचा ॥ २२ ॥ चंद्राला कलंकित केलें, इंद्राला भगांकित केलें आणि शंकराचा जो लाडका पुन षडानन त्याला गुहेमध्ये बसविले. २२ मज मन्मथाचा यावा । न साहवे देवां दानवां । मा तेथ इतरां मानवां । कोण केवा साहावयासी ॥ २३ ॥ मज कामाचा पराक्रम देवांना व दानवांनाहि सहन झाला नाहीं. तेथें मानवांची काय कथा ! २३ मज जाळिलें महेशें । त्यासी म्या अनंगें केलें पिसें । नवल धारिष्ट तुझ्या ऐसें । पाहतां न तिहीं लोकीं ॥ २४ ॥ महादेवाने मला जाळिलें पण मी अंगरहित असूनहि त्याला वेडे केलें. तुझ्या सारखे आश्चर्यकारक धैर्य मला त्रैलोक्यातहि कोठे दिसत नाहीं, २४ त्या मज कामा न सरतें केलें । शांतीचें कल्याण पाहालें । हें तुवांचि एकें यश नेलें । स्वभावा जिंकलें निजशांतियोगें ॥ २५ ॥ कारण अशा प्रभावशाली मज कामाचा तूं पराभव केलास व शांतीचे कल्याण उदयास आलें. खरोखर आपल्या शांतीने स्वभावतःच कामाला जिकिलें, २५ तो मी न सरता केला काम । क्रोधा आणिला उपशम । वासनेचा संभ्रम । नित्य निर्भ्रम त्वां केला ॥ २६ ॥ असें हें यश तूंच एकट्याने मिळविलेंस. माझा पराभव करून तूं क्रोधालाहि शांत केलेस. वासनेचा मोहहि तूं कायमचा घालविलास. २६ हे नारायणा तुझी निष्ठा । न ये आणिकां तपोनिष्ठां । केला अनुभवाचा चोहटा । शांतीचा मोठा सुकाळु केला ॥ २७ ॥ हे नारायणा, तुझी ही निष्ठा दुसऱ्या तपस्व्यांना साधत नाहीं. अनुभवाचा चव्हाटा करून तूं शांतीचा मोठा सुकाळ केला आहेस. २७ मागें तपस्वी वाखाणिले । म्हणती कामक्रोधां जिंकलें । त्यांसीही आम्हीं पूर्ण छळिलें । ऐक तें भलें सांगेन ॥ २८ ॥ यापूर्वी लोकांकडून वाखाणले गेलेले अनेक तपस्वी झाले. त्यांनीं कामक्रोधाला जिंकिलें असें म्हणतात. पण त्यांनाहि आम्ही पुष्कळ छळलें आहे. ती कथा आतां ऐक. २८ कपिलाऐसा तेजोराशी । क्रोधें तत्काळ छळिलें त्यासी । शापु देतांचि सगरासी । तोही क्रोधासी वश्य झाला ॥ २९ ॥ कपिलासारखा तेजस्वी, पण त्यालाहि क्रोधाने छळलें. सागराला शाप देतांना तो क्रोधाच्या वश झाला. २९ कोपु आला नारदासी । वृक्ष केलें नलकूबरांसी । गौतमें अहल्येसी । कोपें वनवासी शिळा केली ॥ १३० ॥ नारदाला क्रोध आला व त्यानें कुबेराचा पुत्र जो नलकूबर त्याला वृक्ष बनविले. गौतमाने क्रोधाने बिचाऱ्या अहल्येला वनामध्यें शिळा करून टाकलें. १३० जो सर्वदा विघ्नातें आकळी । त्या विघ्नेशातें क्रोध छळी । तेणें अतिकोपें कोपानळीं । चंद्रासी तत्काळीं दिधला शाप ॥ ३१ ॥ जो सर्वदा विघ्नहर्ता गणपति त्या विघ्नेशालाहि क्रोधाने छळलें व क्रोधाग्नीने संतप्त झालेल्या त्यानें चंद्राला तत्काळ शाप दिला. ३१ कोपु आला दुर्वासासी । शाप दिधला अंबरीषासी । देवो आणिला गर्भवासासी । क्रोधें महाऋषी छळिले ऐसे ॥ ३२ ॥ दुर्वासाला कोप आला व त्यानें अंबरीषाला शाप दिला व देवाला गर्भवास घडला. याप्रमाणे क्रोधाने ब्रह्मर्षींना छळलें. ३२ जे दुजी सृष्टी करूं शकती । तेही कामक्रोधें झडपिजेती । सागरीं पडे इंद्रसंपत्ती । हे क्रोधाची ख्याती पुराणप्रसिद्ध ॥ ३३ ॥ जे प्रतिसृष्टि करूं शकतात त्यांच्यावरहि काम-क्रोध झडप घालतात. इंद्राची संपत्ति समुद्रामध्यें पडली. अशी ही क्रोधाची ख्याति पुराणांतून प्रसिद्ध आहे ३३ इतरांची गोठी कायासी । क्रोधें छळिलें ईश्वरासी । तेणें दीक्षिता द्विजदक्षासी । शिरच्छेदासी करविता झाला ॥ ३४ ॥ अहो इतरांच्या गोष्टी कशाला हव्यात ! क्रोधाने ईश्वरालाहि छळलें. त्यानें क्रोधवश होऊन दीक्षित दक्ष ब्राह्मणाचा वीरभद्राकडून शिरच्छेद करविला. ३४ जेथ मी कामु स्वयें वसें । तेथ क्रोध वसे सावकाशें । काम क्रोध असतचि नसे । नारायणा ऐसें तुवां केलें ॥ ३५ ॥ जेथे मी रहातो तेथें क्रोधहि यथेष्ट वास करतो. पण हे नारायणा तूं आम्हांला असून नाहीसे केलें आहेस. ३५ हें परमाद्भुत तुझें वीर्य । आणिकां एवढें नाहीं धैर्य । यालागीं तुझें परिचर्य । सदा मुनिवर्य सेविती चरण ॥ ३६ ॥ हें तुझें सामर्थ्य आश्चर्यकारक आहे. इतरांमध्ये एवढे धैर्य नसतें म्हणूनच इतर मुनिवर्य वंद्य असलेल्या तुझ्या चरणाची सदा सेवा करतात. ३६ शांतीच्या चाडें देवाधिदेवा । जे नित्य करिती तुझी सेवा । ते कामक्रोधादिस्वभावा । स्मरतां तव नांवा जिंकिती सुखें ॥ ३७ ॥ हे देवाधिदेवा, शांतीच्या इच्छेने तुझी जे नित्य सेवा करतात ते तुझ्या नामस्मरणानें कामक्रोधादि स्वभावांना अनायासाने जिंकतात. ३७ जेथ सन्मानें काम पुरत । तेथ आदरें अनुग्रहो करित । काम सन्मानें जेथें अतृप्त । तेथें शाप देत अतिक्रोधें ॥ ३८ ॥ जेथे सन्मानाने काम म्ह० इच्छा पूर्ण होते तेथें तो आदराने अनुग्रह करतो. जेथे सन्मामानें तो तृप्त होत नाहीं तेथें मोठ्या क्रोधाने तो शाप देतो. ३८ यालागीं शापानुग्रहसमर्थ । ते सर्वदा कामक्रोधयुक्त । परी नवल तुझें सत्वोचित । केले अंकित कामक्रोध ॥ ३९ ॥ म्हणून जे शापानुग्रहसमर्थ असतात ते सर्वदा काम-क्रोधांनीहि युक्त असतात पण तुझें मोठे नवल आहे. तुझ्या शांतीला उचित अशाच प्रकारे तूं कामक्रोधांस अंकित केलें आहेस. ३९ मज गर्व नाहीं सर्वथा । हेही तुज नाहीं अहंता । छळवाद्यां द्यावी लघुता । अथवा उपेक्षता न करिसी ॥ १४० ॥ इतकें करूनहि 'मला गर्व नाहीं' असाहि तुला अभिमान नाहीं. आम्हां छळवाद्यांना तुच्छ लेखन तूंआमची उपेक्षाहि करीत नाहीस. ४० पृथ्वी दुःखी करिती नांगरीं । ते पिकोनी त्यांतें सुखी करी । तेवीं अपकार्यां जो उपकारी । तो मोक्षाच्या शिरीं मुगुटु ॥ ४१ ॥ पृथ्वीला नांगरून जे दुःखी करतात त्यांना धान्यरूपानें पिकून ती सुखी करते, त्याचप्रमाणें अपकारकर्त्यावर जो उपकार करतो तो मोक्षाच्या शिरावरील मुकुट होय. ४१ तुजमाजीं निर्विकार शांति । हें नवल नव्हे कृपामूर्ति । तुझ्या स्वरूपाची स्थिति । आजि निश्चितीं कळली आम्हां ॥ ४२ ॥ तुझ्यामध्यें निर्विकार शांति असणें हें कांहीं मोठेंसें आश्चर्य नाहीं. ४२ तूं निर्गुण निरुपम । मायातीत पूर्ण ब्रह्म । तुझें स्वभावें स्मरतां नाम । सकामाही काम स्पर्शों न शके ॥ ४३ ॥ हे कृपासागरा, आज आम्हांला तुझ्या स्वरूपाची स्थिति निश्चित कळली ४३ जो नित्य स्मरे तुझें नाम । त्यासी मी कामचि करीं निष्काम । क्रोधाचि करी क्रोधा शम । मोहो तो परम प्रबोध होय ॥ ४४ ॥ तू निर्गुण, निरूपम, मायातीत, पूर्णब्रह्म आहेस. तुझ्या नावाचे स्वभावतःच स्मरण केलें असतां सकाम पुरुषालाहि काम स्पर्श करूं शकत नाहीं. तुझें नांव जो नित्य स्मरतो, त्याला मी कामच निष्काम करतो, क्रोधच त्याच्या क्रोधाचा उपशम करतो आणि मोह परमप्रबोध म्ह० ज्ञान होतो. ४४ जे धीर वीर निजशांतीं । ज्यांसी परमानंदें नित्य तृप्ति । ऐशियांचिया अमित पंक्ति । पायां लागती तुझिया ॥ ४५ ॥ जे शांतीनें धीर व वीर असतात, ज्यांची परमानंदाने नित्य तृप्ति झालेली असते, अशा मुक्तांच्याहि असंख्य पंक्ति तुझ्या पायी लोटांगणें घालितात. ४५ तुज करावया नमस्कारु । पुढें सरसे महासिद्धांचा संभारु । त्यांसही न लभे अवसरु । तूं परात्परु परमात्मा ॥ ४६ ॥ तुला नमस्कार करावयास महासिद्धांचा समुदाय पुढें सरसावतो. पण त्यांनाहि अवसर मिळत नाहीं. तूं परात्पर परमात्मा आहेस. ४६ तुझिया सेवकांकडे । विघ्न रिघतां होय बापुडें । तें रिघावया तुजपुढें । कोण्या परिपाडें रिघेल ॥ ४७ ॥ तुझ्या सेवकापुढें यावयासहि विघ्न धजत नाहीं. मग तें तुझ्यापुढे कोणत्या तोंडाने येणार ! १४७. त्वां सेवतां सुरकृता बहवोऽन्तरायाः स्वौको विलङ्घ्य परमं व्रजतां पदं ते । नान्यस्य बर्हिर्षि बलीन् ददतः स्वभागान् धत्ते पदं त्वमविता यदि विघ्नमूर्ध्नि ॥ १० ॥ तापसां बहु विघ्नअपावो । आम्हीं करावा अंतरावो । हा आमुचा निजस्वभावो । नव्हे नवलावो नारायणा ॥ ४८ ॥ तापसांना अनेक प्रकारची विघ्ने करावी हा आमचा स्वभावच आहे. हे नारायणा, म्हणून त्यांत कांहीं आश्चर्य नाहीं. ४८ हृदयींचा गुप्त करोनि काम । बाह्य जप-तप-भक्तिसंभ्रम । ऐसे जे का शठ परम । विघ्नांचा आक्रम त्यांवरी चाले ॥ ४९ ॥ हृदयांतील कामादि विकार लपवून ठेवून बाहेरून जप, तप व भक्तीचे अवडंबर करणारे जे मोठे लबाड ढोंगी असतात, त्यांवरच आमच्या विघ्नांचा प्रभाव चालतो, ४९ ते आमची विघ्नस्थिति । न चलें तुझिया भक्तांप्रती । तूं रक्षिता भक्तपति । तेथें विघ्नांची गति पराङ्मुख सदा ॥ १५० ॥ पण तुझ्या भक्तापुढें आमच्या विघ्नांचें कांहीं चालत नाही. कारण तूं स्वतः ईश्वर त्यांचा रक्षण करणारा आहेस. तेथें विघ्नांची गति नेहमी कुंठितच होते. १५० माझीया निजभक्तांसी । विघ्नें कैंची म्हणसी त्यांसी । ऐक त्याही अभिप्रायासी । सांगेन तुजपासीं देवाधिदेवा ॥ ५१ ॥ 'माझ्या भक्तांवर विघ्न कसली येणार' असें जर म्हणशील तर हे देवाधिदेवा, तेंहि सांगतो, ऐक. ५१ पावावया निजपदातें । लाता हाणून स्वर्गभोगातें । जे नित्य निष्काम भजती तूंतें । नाना विघ्नें त्यांतें सुरवर रचिती ॥ ५२ ॥ स्वर्गसुखाला लाथा मारून म्ह० तुच्छ लेखून जे भक्त तुझें पद प्राप्त होण्यासाठीं निष्काम भजन करतात, त्यांच्यासाठीं देव अनेक प्रकारची विघ्नें तयार करतात. ५२ उल्लंघूनियां आमुतें । हे पावती अच्युतपदातें । यालागीं सुरवर त्यातें । अतिविघ्नांतें प्रेरिती ॥ ५३ ॥ आमचे उल्लंघन करून हे अच्युतपदाला प्राप्त होतील म्हणजे मुक्त होऊन परमात्मस्वरूप बनतील या भीतीनें देव त्यांच्या मार्गांत अनंत विघ्नें आणितात. ५३ बळी नेदूनि आम्हांसी । हे जाऊं पाहती पूर्णपदासी । येणें क्षोभें इंद्रादिक त्यांपासीं । नाना विघ्नांसी मोकलिती ॥ ५४ ॥ आम्हांला आमचे हविर्भाग न देता हे पूर्णत्वाला जाऊं पहातात, म्हणून इंद्रादि देवांचा क्षोभ होऊन ते अनेक विघ्ने त्यांकडे पाठवितात. ५४ या लागीं त्यांच्या भजनापासीं । विघ्नें छळूं धांवतीं आपैसीं । विघ्नीं अभिभव नव्हे त्यांसी । तू हृषीकेशी रक्षिता ॥ ५५ ॥ यासाठीं विघ्नें आपण होऊनच त्यांना छळावयाला धांवतात. पण तूं हृशीकेश रक्षण करणारा असतां ते विघ्नांकडून पराभव पावत नाहींत. ५५ सांडूनि सकाम कल्पना । जे रतले तुझ्या चरणा । त्यांस आठही प्रहर जाणा । तूं नारायणा रक्षिसी ॥ ५६ ॥ जे सकाम कल्पना सोडून तुझ्या चरणीं रत होतात, त्यांचे तूं नारायण आठहि प्रहर रक्षण करतोस. ५६ भक्त विघ्नीं होती कासाविसी । धांव धांव म्हणती हृषीकेशी । तेव्हां तूं धांवण्या धांवसी । निष्ठुर नव्हसी नारायणा ॥ ५७ ॥ भक्त जेव्हां विघ्नानें कासावीस होतो, तेव्हां 'हे हृषीकेशा धाव' असा तो धांवा करतो. तेव्हां त्याच्या हांकेला तूं धांवून जातोस. कारण तूं निष्ठूर नाहीस. ५७ विघ्न न येतां भक्तांपासीं । आधींच भक्तसंरक्षणासी । तूं भक्तांचे चौंपासीं । अहर्निशीं संरक्षिता ॥ ५८ ॥ भक्तांजवळ विघ्न येण्याच्या आधींच तूं रात्रंदिवस त्यांचें चोहोबाजूंनी रक्षण करीत असतोस. ५८ विघ्न छळूं धांवे सकोप । तंव विघ्नीं प्रगटे तुझें स्वरूप । यालागीं भक्तांसी अल्प । विघ्नप्रताप बाधूं न शके ॥ ५९ ॥ विघ्न रागाने त्याचा छळ करण्यास धांवूं लागलें म्हणजे त्या विघ्नांतच तुझें स्वरूप प्रकट होतें; त्यामुळें तुझ्या भक्तांना विघ्नाचा प्रताप किंचित्ही बाधत नाहीं. ५९ कामें छळावें हरिभक्तांसी । तंव हरि कामाचा हृदयवासी । तेव्हां विघ्नचि निर्विघ्न त्यांसी । भय भक्तांसी स्वप्नीं नाहीं ॥ १६० ॥ काम जो हरिभक्तांना छळावयास जातो तो हरीच कामाच्या हृदयांत वास करतो. त्यामुळे तें विघ्नच निर्विघ्न होऊन तुझ्या भक्ताला स्वप्नांतहि त्याचें भय बाधत नाहीं. १६० विघ्न उपजवी विरोधु । तंव विरोधा सबाह्य गोविंदु । मग विरोध तोचि महाबोधु । स्वानंदकंदु निजभक्तां ॥ ६१ ॥ विघ्न विरोध उत्पन्न करते, पण गोविंद त्या विरोधाला अंतरबाह्य व्यापून रहातो; त्यामुळें विरोधच महाबोध बनतो. तो तुझ्या भक्ताला आनंदाचा कंदच वाटतो. ६१ ज्यासी तुझ्या चरणीं भावार्थु । त्यासी विघ्नीं प्रगटे परमार्थु । ऐसा भावबळें तूं समर्थु । साह्य सततु निजभक्तां ॥ ६२ ॥ तुझ्या चरणांवर ज्याचा भाव असतो त्याला विषयातहि परमार्थ स्पष्ट दिसतो. याप्रमाणे आपल्या भक्तांच्या भावबळानें तूं समर्थ सतत त्यांचा साह्यकर्ता होतोस. ६२ यापरी समर्थ तूं संरक्षिता । ते जिणोनि विघ्नां समस्तां । पाय देऊनि इंद्रपदमाथां । पावती परमार्था तुझिया कृपें ॥ ६३ ॥ तूं रक्षण करणारा समर्थ असल्यावर तुझे भक्त सर्व विघ्नांना जिंकून इंद्रपदावरहि पाय देऊन तुझ्या कृपेने परमपदाला प्राप्त होतात. ६३ देवो संरक्षिता ज्यासी । विघ्नें छळूं धांवती त्यासी । मा सकामाची गती कायसी । विदेहा म्हणसी तें ऐक ॥ ६४ ॥ देव त्यांचें रक्षण करतो. अहोपण, देव ज्यांचा रक्षक असतो त्यांनाहि छळावयाला विघ्ने धांवतात. मग जे सकाम पुरुष असतात त्यांची गति काय विचारावी ! असें म्हणशील तर हे राजा, ऐक. ६४ विषयकाम धरोनि मनीं । इंद्रादि देवां बळिपूजनीं । जे भजले यागयजनीं । देव त्यांलागोनी न करिती विघ्न ॥ ६५ ॥ मनांत विषयांची इच्छा धरून जे इंद्रादि देवतांना हविर्भाग देतात, जे यज्ञयागादि करतात, त्यांना देव विघ्न करीत नाहींत. ६५ इंद्र याज्ञिकांचा राजा । सकाम याज्ञिक देवांच्या प्रजा । यज्ञभाग अर्पिती वोजा । पावल्या बळिपूजा न करिती विघ्न ॥ ६६ ॥ इंद्र यज्ञ करणारांचा आहे. कामना ठेवून यज्ञ करणारी सर्व त्याची प्रजा आहे. ते उत्तम यज्ञभाग त्याला अर्पितात आणि असे भाग मिळाल्यावर देव त्यांना विघ्न करीत नाहींत. ६६ म्हणसी कामादिक विटंबिती । ते निष्काम कदा नातळती । सहज कामा वश असती । सदा कर्मे करिती सकाम ॥ ६७ ॥ आतां कामादिक त्याची विटंबना करतात म्हणून म्हणशील तर सांगतो. निष्काम पुरुषाच्या वाटेला ते कधींहि जात नाहींत. जे स्वभावतःच कामवश असतात व सर्वदा सकामकर्में करतात ६७ जे मज कामासी वश होती । ते तप वेंचोनि भोग भोगती । जे आतुडले क्रोधाच्या हातीं । ते वृथा नागवती तपासी ॥ ६८ ॥ व जे मज कामाच्या वश होतात ते तपाचा व्यय करून भोग भोगतात आणि जे क्रोधाच्या हातीं सांपडतात ते व्यर्थ आपल्या तपाला आचवतात. १६८. क्षुत्तृट्त्रिकालगुणमारुतजैव्ह्यशैश्न्यान् अस्मानपारजलधीनतितीर्य केचित् । क्रोधस्य यान्ति विफलस्य वशं पदे गोः मज्जन्ति दुश्चरतपश्च वृथोत्सृजन्ति ॥ ११ ॥ प्राणायामें प्राणापानीं । निजप्राणतें आकळोनी । वात वर्ष शीत उष्ण साहोनी । जे अनुष्ठानीं गुंतले ॥ ६९ ॥ प्राणायामाने प्राण व अपान त्यांच्या गतींचा निरोध करून, प्राणाला स्वाधीन करून घेऊन वायु, वृष्टि, शीत, उष्ण, यांस सहन करून जे अनुष्ठानांत गुंततात, ६९ क्षुधे तृषेतें नेमूनी । जिव्हा शिश्न आकळोनी । मज कामातें जिंतिलें मानूनी । निष्कामाभिमानी उन्मत्त ॥ १७० ॥ सुधा व तृषा यांचें नियमन करून, जिव्हा, उपस्थ यांना स्वाधीन ठेवून, मज कामाला जिकिलें आहे असें मानून निष्कामत्वाच्या अभिमानाने उन्मत्त होतात, १७० अल्प अपमानाहातीं । जे क्रोधासी वश होती । ते शाप देऊनि तपसंपत्ती । व्यर्थ नागविती निजनिष्ठा ॥ ७१ ॥ ते अल्प अपमानानेंहि क्रोधवश होतात व शाप देऊन तपःसंपत्ति फुकट गमावतात. ७१ सकामाच्या अनुष्ठाना । मज कामसंगें स्त्रक्चंदना । भोग भोगिती स्वर्गांगना । अमृतपाना प्राशिती ॥ ७२ ॥ सकाम अनुष्ठानानें ते स्वर्गातील फुलांच्या माळा, चंदन, अप्सरा व अमृत इत्यादि भोग मज कामाच्या आसक्तीने भोगतात; ७२ त्या मज कामातें उपेक्षिती । आणि क्रोधासी वश होती । ते निजतपा नागवती । शापदीप्ति अनुवादें ॥ ७३ ॥ पण जे मज कामाची उपेक्षा करतात, ते क्रोधाला वश होतात व घोर शाप देऊन आपल्या तपाला आचवतात. ७३ जे अपार सागर तरती । ते गोष्पदोदकीं बुडती । तेवीं मज कामातें जिणोनि जाती । तेही नागविजेति निजक्रोधें ॥ ७४ ॥ जे अपार सागर तरून जातात तेहि जसे गायीच्या उमटलेल्या पावलांत बुडावे तसे मज कामाला जिंकून जातात व क्रोधाकडून स्वतःला नागवून घेतात. ७४ मज कामाची अपूर्ण कामवृत्ति । तेचि क्रोधाची दृढ स्थिति । काम क्रोध अभक्तां बाधिती । हरिभक्तांप्रती तें न चले ॥ ७५ ॥ मज कामाची कामवृत्ति पूर्ण न होणें हीच क्रोधाची दृढस्थिति आहे. पण ते दोघेहि अभक्तांना पीडा देतात. हरिभक्तापुढें त्यांचें कांही चालत नाहीं ७५ तुझ्या भक्तांप्रती जाण । न चले कामक्रोधादि बंधन । तो तुं भक्तपती नारायण । तुज आमुचें कामपण केवीं बाधी ॥ ७६ ॥ आणि तुझ्या भक्तांपुढेहि जर कामक्रोधादिकांचें कांहीं चालत नाहीं, तर भक्तपति जो तूं नारायण त्या तुला आमची पीडा कशी होणार ! ७६ नेणतां तुझा महिमा । आम्ही करूं आलों निजधर्मा । तुजपासीं नित्य निजक्षमा । पुरुषोत्तमा कृपाळुवा ॥ ७७ ॥ तुझा महिमा न जाणता आम्ही तुझ्यापाशी आमच्या स्वभावानुरूप वागावयास आलों. पण हे कृपाळू पुरुषोत्तमा, तुझ्यापाशी नित्य क्षमा आहे. १७७. इति प्रगृणतां तेषां स्त्रियोऽत्यद्भुतदर्शनाः । दर्शयामास शुश्रूषां स्वर्चिताः कुर्वतीर्विभुः ॥ १२ ॥ अपकार्यां उपकार करिती । या नांव 'निर्विकार निजशांति' । तेचि शांतिची परिपाकस्थिति । विघ्नकर्त्याप्रती हरि दावी ॥ ७८ ॥ अपकार करणारांवर उपकार करणें यासच निर्विकार शांति म्हणतात. त्या शांतीचीच परिपक्व अवस्था कामादि विघ्नकर्त्यांस हरीने दाखविली. ७८ सांगोनियां आपुली स्थिती । कामादिक स्तुति करिती । तंव परमाश्चर्य देखती । स्त्रिया अत्यद्भुती अकस्मात ॥ ७९ ॥ तेव्हां आपआपली स्थिति सांगून कामदिक जो स्तुति करीत आहेत, तोच त्यांनीं एक मोठे आश्चर्य पाहिले. त्यांना तेथें अति अद्भुत स्त्रिया अकस्मात् दिसल्या. ७९ स्वरूप वैभव अळंकार । श्रियेह्ंनियां सुंदर । सेवेलागीं अतितत्पर । सदा सादर सावधानें ॥ १८० ॥ त्यांचें स्वरूप व भूषणें लक्ष्मीपेक्षांहि सरस होतीं. त्या नारायणाच्या सेवेला तत्पर होत्या. १८० नवल लाघव नारायणा । कैसें यां दखविलें विंदाना । तया स्त्रियांखालीं स्वर्गांगना । दिवा खद्योत जाण तैशा दिसती ॥ ८१ ॥ नारायणाची लीला अगाध आहे. त्यानें हा चमत्कार कसा दाखविला, पहा. त्या स्त्रियांच्या पुढें देवांगनाहि, दिव्यापुढें जसा काजवा, तशा निस्तेज झाल्या. १८१. ते देवानुचरा दृष्ट्वा स्त्रियः श्रीरिव रूपिणीः । गन्धेन मुमुहुस्तासां रूपौदार्यहतश्रियः ॥ १३ ॥ या स्त्रिया देखोनि दिठीं । कामु मूर्च्छित पडिला सृष्टीं । वसंत घटघटां लाळ घोंटी । क्रोधाची दृष्टी तटस्थ ठेली ॥ ८२ ॥ या स्त्रिया दृष्टीस पडताच, काम भूमीवर मूर्च्छितच पडला. वसंत घटाघट लाळ घोटूं लागला. क्रोधाचे डोळे ताठले. ८२ भ्रमर विसरले झणत्कार । कोकिळा विसरल्या पंचम स्वर । प्राण विसरला संचार । देवानुचर भुलले ॥ ८३ ॥ भ्रमर गुंजारव विसरले. कोकिळा आपला पंचम स्वर विसरल्या. प्राण संचार विसरला व देवानुचर भुलून गेले. ८३ देखोनि त्यांचिया स्वरुपासी । अप्सरा दिसती जैशा दासी । अत्यंत लज्जा झाली त्यांसी । काळिमेसी उतरल्या ॥ ८४ ॥ त्यांच्या स्वरूपापुढें अप्सरा दासी शोभू लागल्या. त्यांना अत्यंत लाज वाटून त्यांची तोडे काळवंडली. ८४ त्यांचे अंगींचा सुगंध वातु । तेणें भुलला वसंतु । मलयानिल झाला भ्रांतु । त्यांचा अंगवातु लागतां ॥ ८५ ॥ त्या स्त्रियांच्या अंगाचा जो परिमल सुटला होता त्यानें वसंत भुलला, त्यांच्या अंगवायूचा सुगंधयुक्त स्पर्श होतांच मलय पर्वतहि भ्रांत झाला. ८५ नारायणाची विद्या कैसी । जे भुलवूं आले आपणासी । भुली पाडिली तयांसी । योगमायेसी दावूनि ॥ ८६ ॥ जे आपल्याला भुलविण्यास आले त्यांसच योगमाया दाखवून ज्याने भुलविलें, त्या नारायणाची विद्या-योगसामर्थ्य किती अद्भुत असलें पाहिजे ! ८६ सुंदरत्वें रंभा तिलोत्तमा । जिया मंदरमथनीं जिंतिलिया रमा । रमेहूनियां उत्तमा । उत्तमोत्तमा अतिरुपें ॥ ८७ ॥ रंभा, तिलोत्तमा इत्यादि अप्सरा फार सुंदर म्हणून प्रसिद्ध आहेत; तरी समुद्रमंथनाच्या वेळीं उत्पन्न झालेल्या रमेने आपल्या सौंदर्यानें त्यांना जिंकलें. पण नारायणाने उत्पन्न केलेल्या या स्त्रिया त्या रमेहूनहि निरुपम होत्या. १८७. तानाह देवदेवेशः प्रणतान्प्रहसन्निव । आसामेकतमां वृङ्ध्वं सवर्णां स्वर्गभूषणाम् ॥ १४ ॥ तें अतिआश्चर्य देखोन । झाले कामादिक मूर्च्छापन्न । तयांप्रति नारायण । काय हांसोन बोलिला ॥ ८८ ॥ तें अत्यंत आश्चर्य पाहून कामादिकांस मूर्च्छेनें घेरलें. तेव्हां त्यांना नारायण हसून बोलला. ८८ आम्हीं अवश्य पूजावें तुम्हांसी । कांहीं अर्पावें बलिदानासी । संतोषावया इंद्रासी । यांतील एकदी दासी अंगीकारा तुम्हीं ॥ ८९ ॥ आम्ही तुमचे पूजन अवश्य करावे. तुम्हांला कांहीं आहेर द्यावा. इंद्राला संतोषविण्यासाठीं यांतील एखाद्या दासीचा तुम्ही स्वीकार करा. ८९. यांचें सौंदर्य अतिथोर । म्हणाल होईल अपमानकर । तुम्हांसमान जे सुंदर । तिचा अंगीकार करावा तुम्हीं ॥ १९० ॥ पण 'यांचें सौंदर्य अनुपम आहे. ते आमच्या अपमानाला कारण होईल,' असें जर तुम्हांला वाटत असेल, तर तुमच्यासारखीच जी सुंदर असेल तिलाच स्वीकारा. १९० म्हणाल यांत नाहीं हीन । अवघ्या सौंदर्यें संपुर्ण । कोणी न दिसे आम्हांसमान । केवीं आपण अंगीकारावी ॥ ९१ ॥ किंवा 'यांत रूपाने हीन कोणीच नाही. सगळ्याच सौंदर्यपूर्ण आहेत. आमच्या योग्य कोणीच दिसत नाहीं. मग कसा अंगीकार करावा !' ९१ जरी नाहीं तुम्हांसमान । सकळ सौंदर्यें अतिसंपन्न । तरी एकीचें करावें वरण । होईल भूषण स्वर्गासी ॥ ९२ ॥ असें जर म्हणाल, तर 'तुमच्या अनुरूप नसली तर नसली; सगळ्याच जर लावण्यसंपन्न असल्या, तर त्यांपैकीं एकीची तरी निवड करा, म्हणजे ती स्वर्गलोकाला भूषण होईल.' ९२ ऐसें नारायणाचें वचन । ऐकोनि हरिखलीं संपुर्ण । करूनियां साष्टांग नमन । मस्तकीं वचन वंदिलें ॥ ९३ ॥ असें नारायणाचें वचन ऐकून त्या सर्वांना फार हर्ष वाटला आणि त्यांनीं साष्टांग नमस्कार करून त्याचे शब्द शिरसा वंद्य केले. ९३. ओमित्यादेशमादाय नत्वा तं सुरवन्दिनः । उर्वशीमप्सरः श्रेष्ठां पुरस्कृत्य दिवं ययुः ॥ १५ ॥ इन्द्रायानम्य सदसि श्रृण्वतां त्रिदिवौकसाम् । ऊचुर्नारायणबलं शक्रस्तत्रास विस्मितः ॥ १६ ॥ ऐकोनि नारायणवचन । मस्तकांबुजी करूनियां नमन । उर्वशी पुढां सून । कामादि गण निघाले वेगीं ॥ ९४ ॥ याप्रमाणे नारायणाचें वचन ऐकून त्याच्या चरणांवर मस्तक ठेवून कामादिगण उर्वशीला पुढें घालून परत जाण्यास त्वरेने निघाले. ९४ नारायणांचे ऊरूस्पर्शी । उभी होती नारायणापाशीं । तेंचि नांव झालें तिसी । म्हणती 'उर्वशी' स्वर्गांगना ॥ ९५ ॥ नारायणापाशीं त्यांच्या मांडीला स्पर्श करून उभी होती, म्हणून तिला उर्वशी हें नांव पडलें व उर्वशीला स्वर्गांगना म्हणूं लागले. ९५ ते देवांचे देवदूत । स्वर्गा पावले समस्त । मग शक्राचे सभेआंत । सांगती अद्भुत नारयणशक्ति ॥ ९६ ॥ ते सर्व देवदूत स्वर्गाला जाऊन पोचले आणि इंद्राच्या सभेत नारायणाच्या अद्भुतशक्तीचे वर्णन करूं लागले. ५६ तिहीं नारायणाचें चरित्र । सांगितलें अतिपवित्र । तेणें अवघेचि सुरवर । झाले थोर विस्मित पैं ॥ ९७ ॥ त्यांनीं नारायणाचें अत्यंत शुद्ध चरित्र सांगितले, तें ऐकून सर्व देव अत्यंत विस्मित झाले. ९७ इंद्रें देखोनि उर्वशी । तिसी भुलला अहर्निशीं । बाहेर यावें सभेसी । हें वर्षानुवर्षी नाठवे ॥ ९८ ॥ उर्वशीला पाहून तर इंद्र इतका मोहित झाला कीं, वर्षांनुवर्षे तो सभेत जाण्याचेंहि विसरला. ९८ हे प्रथमावतारवार्ता । जे कां नारायणाची कथा । पुढील अवतार आतां । नृपनाथा अवधारीं ॥ ९९ ॥ ही नारायणाच्या पहिल्या अवताराची कथा आहे. हे राजा, आतां या पुढील अवतारांचा अपूर्व वृत्तांत ऐक. ९९ ऐक राया अतिअपूर्व । छळवादियां पूजा सर्व । करून दाखवी स्वयमेव । 'पूर्णानुभव' या नांव ॥ २०० ॥ आपल्याला छळणारांचाहि सत्कार करणें, हें पूर्णावस्थेचे मुख्य लक्षण आहे. तूं कदाचित् यावर म्हणशील कीं, २०० (आशंका) भावें करितां भगवद्भजन । यापरी इंद्र करी विघ्न । नारायण चैतन्यघन । तेणें विघ्नें संपूर्ण पराभविलीं ॥ १ ॥ प्रेमाने भगवद्भजन करूं लागलें असतां इंद्र पूर्वोक्त प्रकारे विघ्न करतो. नारायण चैतन्यघन असल्यामुळें त्यानें त्या सर्व विघ्नांचा पराभव केला, २०१ मा बाळ्याभोळ्यां करितां भक्ति । ऐशीं विघ्नें जैं छळूं येती । तै कदा नव्हे भगवत्प्राप्ति । ऐसा विकल्प चित्तीं झणीं धरिशी ॥ २ ॥ पण इतर सामान्य भाळेभोळे लोक भक्ति करूं लागले असतां जेव्हां त्यांना अशीं विघ्ने छळूं लागतात, तेव्हां भगवत्प्राति होणें केव्हांहि शक्य नाहीं ! पण असा विकल्प तूं मनांत धरू नकोस. २०२ ब्रह्मादिकां सर्व भूतां । भ्रुकुटिमात्रें ज नियंता । त्या भगवंतातें भजतां । विघ्नें सर्वथा बाधूं न शकती ॥ ३ ॥ ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत सर्व भूतांचे नुसत्या नेत्रकटाक्षानें नियमन करणारा जो भगवान त्याचें भजन करूं लागलें असतां विघ्ने कांहीं करूं शकत नाहींत. २०३ ज्याचेनि इंद्रा इंद्रपण । तो भावें भजतां श्रीनारायण । भक्तांसी विघ्न करी कोण । हरि रक्षण निजभक्तां ॥ ४ ॥ ज्याच्यामुळें इंद्राला इंद्रत्व प्राप्त होतें त्या नारायणाचीच प्रेमाने भक्ति करणारांस विघ्ने कोण करणार ! हरि स्वभक्तांचा रक्षक आहे. २०४ इंद्रमुख कामादिक । विघ्नें छळिती सकळ लोक । त्यांचाही नारायण चाळक । तो भक्तांसी देख स्पर्शीं नेदी ॥ ५ ॥ इंद्रादिक व कामादिक सर्व लोकांना विघ्नांच्या द्वारा छळतात. पण नारायण त्यांचाहि चालक आहे. तो भक्तांना विघ्नांचा स्पर्श होऊं देत नाहीं. २०५ विघ्नांसी भुलविलें जेणें संपूर्ण । तो नित्य स्मरतां नारायण । आपधाकें विघ्ने पळतीं जाण । भक्तसंरक्षण हरिनामें ॥ ६ ॥ त्यानें विघ्नांसहि पूर्णपणे भुलविलें. त्या नारायणाचें नित्य स्मरण करीत असतां विघ्ने धाकाने पळून जातात. हरिनामानेंच भक्तांचे संरक्षण होतें. २०६ करावया निजभक्तकैवार । देवो धरी नानावतार । त्याच्या अवतारांचें चरित्र अतिविचित्र अवधारीं ॥ ७ ॥ भक्तांचा कैवार घेऊन देव अनेक अवतार घेतो. त्याच्या अवताराचे अति विचित्र चरित्र तूं ऐक. २०७. हंसस्वरूप्यवददच्युत आत्मयोगं दत्तः कुमार ऋषभो भगवान् पिता नः । विष्णुः शिवाय जगतां कलयावतिर्णः तेनाहृता मधुभिदा श्रुतयो हयास्ये ॥ १७ ॥ सनकादिक ब्रह्मनंदन । तिहीं पित्यासी केला प्रश्र्न । प्रश्नखंडणमिसेजाण । केलें ब्रह्मज्ञान 'हंसावतारें' ॥ ८ ॥ सनकादिक ब्रह्मकुमारांनीं पित्याला प्रश्न केला व त्यांच्या त्या प्रश्नाचें उत्तर देण्याच्या निमित्तानें हरीनं हंसावतार घेऊन आत्मयोग सांगितला. ३०८ नित्य स्मरतां हरीचें नाम । महाविघ्नें होतीं भस्म । त्याचे अवतारसंभ्रम । उत्तमोत्तम अवधारीं ॥ ९ ॥ ज्या हरीचे नित्य नामस्मरण केलें असतां महाविघ्नेंहि जळून भस्म होतात, त्याचें उत्तमोत्तम अवतारकृत्य ऐक. २०९ ज्याचेनि नामें पळे कृतांतु । ज्याचेनि नामें जन्ममरणां घातु । तो अवतारु 'श्रीदत्तु' । मूर्तिमंतु परब्रह्म ॥ २१० ॥ ज्याचे नांव ऐकतांच कृतांत काळहि पळू लागतो, ज्याच्या नामस्मरणानें जन्म-मरण नाहीसें होतें, तो श्रीदत्त अवतार साक्षात् परब्रह्मच आहे. २१० नैष्ठिक ब्रह्मचारी निश्चितीं । ज्यासी स्वप्नीं नाहीं वीर्यच्युति । यालागीं 'कुमार' म्हणती । अवतारमूर्ति सनकादिक ॥ ११ ॥ जे नैष्ठिक ब्रह्मचारी, ज्यांच्या ब्रह्मचर्यांचा भंग खप्नांतहि होत नाहीं, म्हणून ज्यांना कुमार म्हणतात, ते सनकादिकहि भगवदवताररूपच आहेत. २११ आणि आमुचा जो कां पिता । 'ऋषभ' नारायण ज्ञाता । तोही अवतार नृपनाथा । जाण तत्वतां भगवन्मूर्ति ॥ १२ ॥ आणि नारायणाला जाणणारा आमचा पिता जो ऋषभ, तोहि भगवानाचाच अवतार जाणावा. २१२ इहीं नामीं-रूपीं संपूर्ण । अवतारीं अवतरे नारयण । जो जगाचा प्रतिपाळण । स्वांशें श्रीकृष्ण अवतरे ॥ १३ ॥ हे राजा, ऋषींच्या रूपाने तो नारायणच अवतीर्ण होतो. जो जगाचा प्रतिपालन करणारा श्रीकृष्ण तोच नेहमी स्वांशानें अवतार घेतो. २१३ तोचि स्वयें गा श्रीकृष्ण । मधुकैटभ निर्दाळून । नामें जो कां 'मधुसूदन' । तोचि अवतरून 'हयग्रीव' झाला ॥ १४ ॥ तोच स्वतः श्रीकृष्ण हयग्रीव अवतार घेऊन मधुककैटभ राक्षसांचा नाश करून मधुसूदन नांवानें प्रसिद्ध झाला. २१४ तेणें शंख मर्दून पुढती । उध्दरिल्या बुडाल्या श्रुती । आणोनि दिधल्या ब्रह्ययाहातीं । जाण निश्चितीं वेदरक्षणा ॥ १५ ॥ त्यानेंच पुढें शंखासुरादि राक्षसांना मारून व बुडालेल्या श्रुतींचा वेदरक्षणासाठीं उद्धार करून त्या ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केल्या. २१५. गुप्तोऽप्यये मनुरिलौषधयश्च मात्स्ये क्रौडे हतो दितिज उद्धरताम्भसः क्ष्माम् । कौर्मे धृतोऽद्रिरमृतोन्मथने स्वपृष्ठे ग्राहात्प्रपन्नमिभराजममुञ्चदार्तम् ॥ १८ ॥ तेणेंचि 'मत्स्यावतारें' । प्रलयकालांबुमहाभारें । मनूसगट रक्षिलें धरे । निजनिर्धारे औषधींसीं ॥ १६ ॥ त्यानेंच मत्स्यावतारामध्ये प्रलयकाळच्या जलाच्या महाभारानें भालेल्या पृथ्वीचे मनु व वनस्पती यांसह रक्षण केलें. २१६ तेणेंचि 'कमठावतारा' । स्वपृष्ठीं धरूनि गिरिवरा । मंथोनिया क्षीरसागरा । अमृत सुरवरां अर्पिलें ॥ १७ ॥ कूर्मावतारांत त्यानेंच आपल्या पाठीवर मंदरपर्वताला धारण करून क्षीरसागराचे मंथन करून, देवांना अमृत अर्पण केलें. २१७ श्वेतवाराह महामूर्ति । धरेनें केली पूर्ण भक्ति । तिसी उध्दरोनि कृपामूर्ति । अभिनव शांति अर्पिली ॥ १८ ॥ (हिरण्याक्ष दैत्यानें पृथिवी रसातळास नेली तेव्हां) त्या प्रभूनेंच 'वराह' अवतार धारण केला. त्या श्वेतवराहमूर्तीची पृथिवीदेवीनें पूर्ण भक्ति केली. तेव्हां त्या दैत्याला मारून पृथ्वीचा उद्धार केला (तिला वर काढलें) व परम शांति दिली. २१८ तेणे आर्तत्राणा तांतडी । वैकुंठींहून घालोनि उडी । 'गजाचें ग्राहबंधन तोडी' । उध्दरिलें आवडीं गजेंद्रातें ॥ १९ ॥ दीनांच्या रक्षणासाठीं गडबडीने वैकुंठांतून उडी टाकूनहि गजेंद्राला नक्राच्या मिठीतून सोडविले व त्यानेंच आवडीने त्याचा उद्धार केला. २१९. संस्तुन्वतोऽब्धि पतितान् श्रमणानृषींश्च शक्रं च वृत्रवधतस्तमसि प्रविष्टम् । देवस्त्रियोऽसुरगृहे पिहिता अनाथा जघ्नेऽसुरेन्द्रमभयाय सतां नृसिंहे ॥ १९ ॥ मार्कंडेयो एके वेळीं । बुडतां अकाळप्रळयजळीं । तेणें स्मरतां वनमाळी । तारी तत्काळीं 'वटपत्रशायी' ॥ २२० ॥ एकदा मार्कंडेय ऋषि प्रलयकाळच्या महापुरात बुडत असतां त्यानें भगवान् वनमाळीचे स्मरण केलें. त्याबरोबर वटपत्रावर शयन करणाऱ्या भगवानाने तत्काळ त्याला तारलें. २२० शाळिग्राम पूजितां ऋषीश्वरीं । नळ वानरु ते अवसरीं । देवपूजा टाकी सागरीं । चेष्टा वानरी स्वभावें ॥ २१ ॥ ऋषीश्वराने शालिग्रामाची पूजा केली असतां नळ नांवाच्या वानराने आपल्या स्वभावानुरूप ती पूजा समुद्रांत फेकून दिली. २२१ तें देखोनि ऋषीश्वरीं । 'शिळा न बुडोत तुझ्या करीं' । ऐसा शाप ते अवसरीं । क्षोभेंकरीं दिधला ॥ २२ ॥ तें पाहून ऋषीश्वराने 'तुझ्या हातून शिळा बुडणार नाहीं' असा रागाने शाप दिला. २२२ तैं शाळिग्राम सागरोदरीं । तरतां देखिले ऋषीश्वरीं । काढावया रिघतां भीतरीं । लहरीकरीं निर्बुजले ॥ २३ ॥ तेव्हां शालिग्राम सागरावर तरंगतांना दिसले आणि ऋषीश्वर ते काढावयास समुद्रांत शिरले. पण समुद्राच्या लाटांत सांपडून घाबरले. २२३ ते काळीं ऋषीश्वरीं । 'आर्तिहरण' स्तविला हरि । तेथ अवतरोनि श्रीहरि । ऋषीतें तारी पूजेसहित ॥ २४ ॥ तेव्हां सर्वांच्या दुःखाचे निवारण करणाऱ्या हरीची त्यांनीं स्तुति केली. त्याबरोबर श्रीहरी तेथें अवतरला व त्यानें त्या पूजेसह ऋषींना तारलें. २२४ वृत्र वधिला वज्रघातें । ते ब्रह्महत्या इंद्रातें । तेणें दोषें तो अंधतमातें । जाण पां निश्चितें बुडत होता ॥ २५ ॥ इंद्राने वृत्रासुराला वज्राघाताने मारिलें, त्यामुळें त्याला ब्रह्महत्या लागली. त्या दोषाने तो अंधतमनामक नरकांत निश्चयानें बुडत होता. २२५ तेथ अवतरोनि श्रीअनंतें । चतुर्धा वांटूनि ते हत्येतें । शुध्द केलें इंद्रातें । कृपावंतें कृपाळुवें ॥ २६ ॥ इतक्यांत श्रीअनंत तेथें अवतरला आणि त्याची ब्रह्महत्या स्त्रिया, नद्यांचे नूतन जल, अग्नि व गोमुख अशा चार ठिकाणी वाटून देऊन कृपाळु देवाने इंद्राला शुद्ध केलें. २२६ जिणोनियां अमरपुरें । हिरोनि देवांचीं अंतौरें । तीं कोंडोनियां समग्रें । मुरें महा असुरें एकंदर केलें ॥ २७ ॥ देवांची नगरे जिंकून त्यांची अंतःपुरें हिरावून घेऊन त्यांतील सर्व स्त्रियांना मुर दैत्याने कोंडून, आपल्या स्वाधीन ठेविले २२७ तो मुरमर्दन श्रीहरि । यालागीं नांवें 'मुरारि' । देवस्त्रिया काढोनि बाहेरी । देवांच्या करीं अर्पिता झाला ॥ २८ ॥ पण श्रीहरीने त्याला मारलें. म्हणूनच त्याला 'मुरारि' हें नांव प्राप्त झालें. त्या मुरारीने मुर दैत्याला मारून देवस्त्रियांना त्याच्या बंदींतून सोडवून देवांच्या स्वाधीन केलें. २२८ जो असुरांमाजीं चूडामणी । जो द्वेषियांमाजीं अग्रगणी । तो हरिनाम ऐकतां कानीं । अतिक्षोभें मनीं प्रज्वळों लागे ॥ २९ ॥ जो असुरांचा शिरोमणि, द्वेष्ट्याचा अग्रणी, कानाने हरीचे नांव ऐकतांच मनांत अति क्षुब्ध होऊन ज्याच्या अंगाचा भडका उडत असे, २२९ जो पूर्ण क्रोधाचा उदधि । जो अविवेकाचा महानिधि । जो हरि स्मरे त्या पुत्रातें बाधी । गर्वमदीं उन्मत्त ॥ २३० ॥ जो क्रोधाचा पूर्णसागर, अविवेकाचा महानिधि, हरीचे स्मरण करणाऱ्या आपल्या पुत्रालाहि ज्याने अतिशय छळलें, जो अभिमानमदानें उन्मत्त झालेला हिरण्यकशिपु, २३० तो हिरण्यकशिपु नखधारीं । स्वयें निवटी 'नरकेसरी' । जो निजभक्तांचा कैवारी । अभयकारी साधुंचा ॥ ३१ ॥ त्याला स्वतः नृसिंहरूप धरून आपल्या नखाच्या धारांनी मारलें. साधूंना अभय देणाऱ्या व आपल्या भक्तांचा कैवार घेणाऱ्या हरीनें ही व अशीच आणखीहि अनेक अवतारकार्यें केली. २३१. देवासुरे युधि च दैत्यपतीन् सुरार्थे हत्वान्तरेषु भुवनान्यदधात्कलाभिः । भूत्वाथ वामन इमामहरद्बलेः क्ष्मां याञ्चाछलेन समदाददितेः सुतेभ्यः ॥ २० ॥ समुद्रमंथनाच्या शेवटीं । क्षीरसागराचे तटीं । सुरां असुरां कळी मोठी । अमृतासाठीं मांडली ॥ ३२ ॥ समुद्रमंथनाच्या शेवटीं क्षीरसागराच्या तारीवर देव व असुर यामध्ये अमृतासाठी मोठा कलह माजला. २३२ तेव्हां अमृत विटे जें देखोनि । तो अवतारु घेतला मोहिनी । तेणें असुरां सुरापानी । अमृतदानी देवांसी ॥ ३३ ॥ तेव्हां ज्या रूपाला पाहून अमृतहि फिके पडते, तें मोहिनीचे रूप भगवानाने घेतलें व त्या मोहिनीच्या अवताराने असुरांना सुरापान व देवांना अमृत दिलें. २३३ तेथ चोरूनि घेतां अमृतग्रासा । निवटिला राहूचा घसा । त्याच्या कबंधावरी म्हाळसा । वास नेवासा स्वयें केला ॥ ३४ ॥ त्यावेळीं राहू चोरून अमृताचा घोट घेत असतांना त्याचा शिरच्छेद केला व त्याच्या धडावर स्वतः म्हाळसेच्या रूपाने निवास केला. २३४ सुरसाह्य नारायणु । द्वारके कुश निर्दाळूनु । का लवणासुरमर्दूनु । अवतरे आपणु 'कुमार' रूपें ॥ ३५ ॥ देवांचा साह्यकर्ता नारायण द्वारकेमध्यें कुशाचें निर्दालन करून, लवणासुराला मारून आपण स्वतः कुमाररूपानें अवतीर्ण झाला. २३५ ऐसा मन्वंतरामन्वंतरीं । निजभक्तकाजकैवारी । सुरकार्यार्थ श्रीहरि । नाना अवतारीं अवतरे स्वयें ॥ ३६ ॥ याप्रमाणे प्रत्येक मन्वंतरांत आपल्या भक्तांचा कैवारी श्रीहरी देवांच्या कार्यासाठी स्वतः नानाप्रकारचे अवतार घेतो.२३६ तो सुरसाह्य जगज्जीवन । स्वयें कुब्ज झाला 'वामन' । अंगें याचक होऊन । देवांचा अपमान उतरला जेणें ॥ ३७ ॥ तो देवांचा साह्यकर्ता जगज्जीवन स्वतः वामनबटूचें रूप घेऊन याचक झाला आणि त्यानें देवांचा अपमान भरून काढला २३७ दानें दाटुगा बळी । त्यासी देवांचेनि नव्हे कळी । मग त्रिविक्रमरूपें आकळी । याञ्चाछळें बळी छळिला जेणें ॥ ३८ ॥ बळि दानाच्या योगाने समर्थ होता, त्याच्याबरोबर देवांना युद्ध करवेना, तेव्हां त्रिविक्रमरूपानें त्यानें त्रिभुवन व्यापिले व याचनेच्या निमित्तानें बळीला ठकविलें, २३८ तरी भावबळें बळी प्रबळु । तेणें देवो केला द्वारपाळु । विष्णु सत्व पाहे छळछळूं । शेखीं दासांचा दयाळु दास्य करी स्वयें ॥ ३९ ॥ पण बळीची भावना प्रबल होती. त्या सामर्थ्याने त्यानें श्रीहरीला द्वारपाळ केलें. याप्रमाणे विष्णू आपल्या भक्ताना छळून छळून त्यांचें सत्त्व पहातो व शेवटीं त्या भक्तांचाच दास होऊन स्वतः त्यांचें दास्य करूं लागतो. २३९ यापरी बळीचा छळ । करूनि घेतलें दिङ्मं डळ । तेणें अमरगण सकळ । अर्पूनि तत्काळ सुखी केले ॥ २४० ॥ याप्रकारे बळीचा छळ करून नारायणाने त्याच्यापासून सर्व त्रैलोक्य हिरावून घेतलें व तें देवांना अर्पण करून त्यांना सुखी केलें. २४०. निःक्षत्रियामकृत गां च त्रिःसप्तकृत्वो रामस्तु हैहयकुलाप्ययभार्गवाग्निः । सोऽब्धिं बबन्ध दशवक्त्रमहन्सलङ्कं सीतापतिर्जयति लोकमलघ्नकीर्तिः ॥ २१ ॥ तो देवाधिदेवोत्तमु । स्वयें झाला 'परशुरामु' । तेणें क्षत्रियांचा पराक्रमु । केला निर्धर्मु निजप्रतापें ॥ ४१ ॥ तो पुरुषोत्तम देवाधिदेव स्वतः परशुराम झाला आणि त्यानें आपल्या प्रतापाने सर्व क्षत्रियांचा पराक्रम फुकट घालविला. २४१ तो गोब्राम्हणकैवारी । सहस्त्रार्जुनातें संहारी । सहस्त्र भुजांची कांडोरीं करी । केली बोहरी दानवकुळा ॥ ४२ ॥ त्या गोब्राह्मणांच्या कैवारी नारायणाने सहस्रार्जुनाच्या हजारों भुजांचे तुकडेतुकडे करून त्याचा संहार केला. दानवकुळाचा नाश केला. २४२ जमदग्नीचा कोपाग्नि । परशुरामतेजें प्रज्वळूनि । हैहयकुळ जाळुनि । आहाळिली अवनी क्षत्रियांची ॥ ४३ ॥ जमदग्नीचा कोपाग्नि परशुरामाच्या तेजाने प्रज्वलित झाला व त्या अग्नीनें हैहयकुळाला जाळून पृथ्वीवरील क्षत्रियकुलें २४३ तेणें तीन सप्तकें वीररसु । देऊनि क्षत्रियमद बहुवसु । त्या रोगाचा केला नाशु । धरेचे ईशु धरामर केले ॥ ४४ ॥ एकवीस वेळां पोळून टाकिलीं. आपल्या वीररसाने क्षत्रियांच्या फार दिवसांच्या मदरूपी रोगाचा नाश केला आणि ब्राह्मणांना पृथ्वीचे स्वामित्व दिलें. २४४ जो अवतारांचें मूळ पीठ । जो वीरवृत्ति अतिउद्भट । तो अवतारांमाजीं श्रेष्ठ । अतिवरिष्ठ 'श्रीराम' ॥ ४५ ॥ श्रीराम सर्व अवतारांचा आदिपुरुष, पराक्रमी, वीर व सर्व अवतारांमध्यें श्रेष्ठ आहे. २४५ पापें पळती रामनामें । नामांकित वंदिजे यमें । गणिकेचीं कर्माकर्में । श्रीरामनामें निर्दळिलीं ॥ ४६ ॥ रामनामाने पापें पळून जातात. रामनाम घेणारांस यमहि वंदन करतो. श्रीरामनामानें गणिकेच्याहि पापाचा नाश केला. २४६ नामें कळिकाळासी धाक । यमदूतां न मिळे भीक । रामनामगजरें देख । पळे निःशेख जन्ममरण ॥ ४७ ॥ रामनामाचा कळिकाळाला धाक वाटतो. यमदूतांना कोणी भीक घालीत नाहीं. रामनामाचा गजर जन्म-मरणालाहि निःशेष नाहींसे करतो. २४७ जो देवांचे बंद सोडी । नवग्रहांची बेडी तोडी । जेणें रामराज्याची रोकडी । उभविली गुढी तिन्ही लोकीं ॥ ४८ ॥ तो देवांचा बंदिवास सोडवतो, नवग्रहांची बेडी तोडतो, त्यानें रामराज्याची कीर्ति तिन्ही लोकी पसरली आहे. २४८ ज्याचेनि शिळा तरती सागरीं । असुर मारिले वानरीं । जेणें सुवर्णाची नगरी । वोपिली पुरी शरणागतासी ॥ ४९ ॥ ज्या रामनामाच्या सामर्थ्यानेंच समुद्रात शिळा तरतात व वानर असुरांना मारू शकतात, ज्याने सोन्याची लंकानगरी शरणागत बिभीषणाला नजर केली, २४९ जो प्रतापाचा मरिगळा । जेणें सेतु बांधिला अवलीळा । चरणीं उध्दरिली शिळा । जो निजजिव्हाळा निजभक्तां ॥ २५० ॥ जो प्रतापाची जणुंकाय मूर्तीच, ज्याने लीलेने सेतु बांधविला, शिला होऊन पडलेल्या अहल्येचा नुसत्या चरणस्पर्शाने उद्धार केला, जो आपल्या भक्तांना जीव कीं प्राण वाटतो २५० तो अवतार मूर्तिमंत । राया अद्यापि असे वर्तत । हा संवाद त्रेतायुगांत । द्रुमिल सांगत विदेहासी ॥ ५१ ॥ तो साधार अवतारी राम, हे राजा, अद्यापि या पृथ्वीवर वसत आहे. त्रेतायुगांत ही कथा द्रुमिलानें विदेहराजाला सांगितली. २५१ यालागीं श्रीराम राम । नित्य जपे जो हें नाम । तो पुरुषांमाजीं पुरुषोत्तम । कर्माकर्म-अतीत तो ॥ ५२ ॥ यासाठीं जो कोणी 'श्रीराम श्री जयराम' हें नाम नित्य जपतो, तो मनुष्यांतील श्रेष्ठ पुरुष कर्म व अकर्म यांना उल्लंघून जातो. २५२ तें रामनाम अवचटें । भीतरीं रिघे कर्णपुटें । तैं कळिमळांचीं मळकटें । नामोद्धाटें नासती ॥ ५३ ॥ असें हें रामनाम, कोणत्याहि निमित्तानें जरी कानांवर पडलें तरी कळिमळाचे दोष नामोच्चाराच्या सामर्थ्यानेंच नाश पावतात. २५३ ऐशी रामनामाची ख्याती । जगदुद्धारें केली कीर्ती । धन्य धन्य जे परिसती । धन्य जे गाती रामचरित ॥ ५४ ॥ अशी रामनामाची ख्याति आहे, त्यानें जगदुद्धाराने आपली कीर्ति पसरली. जे रामचरित्र ऐकतात व गातात ते धन्य होत. २५४. भूमेर्भरावतरणाय यदुष्वजन्मा जातः करिष्यति सुरैरपि दुष्कराणि । वादैर्विमोहयति यज्ञकृतोऽतदर्हान् शूद्रान् कलौ क्षितिभुजो न्यहनिष्यदन्ते ॥ २२ ॥ आतां भावी अवतारवार्ता । तुज मी सांगेन नृपनाथा । श्रीकृष्णावतारकथा । परमाद्भुता विचित्र ॥ ५५ ॥ हे राजा, आतां मी तुला भावी अवतारांचा वृत्तान्त सांगतो. श्रीकृष्णावताराची कथा अत्यंत विचित्र व अद्भुत आहे. २५५ जो परेहून परात्परु । जो कां अजन्मा अक्षरु । जो श्रुतिशास्त्रां अगोचरु । तो पूर्णावतारु 'श्रीकृष्ण' ॥ ५६ ॥ जो परावाणीहून अगदीं पलीकडे आहे, जो अज, अक्षर व वेदशास्त्रांचा अविषय, तो हा श्रीकृष्ण पूर्णावतारच होय. २५६ जेथें नाममात्र रिघों न लाहे । जेथें रूपाची न लभे सोये । ज्या ब्रह्मत्व अंगीं न साहे । तो अवतार पाहें श्रीकृष्ण ॥ ५७ ॥ जेथे रामाचा प्रवेश होत नाहीं, रूपाला अवकाश मिळत नाहीं, ज्याच्या स्वरूपी ब्रह्मत्वहि संभवत नाहीं, तो हा श्रीकृष्ण अवतार होय. २५७ जो वर्णाश्रमांसी नातळे । ज्यासी ईश्वरत्वही वोंविळें । जो अज अव्यय स्वानंदमेळें । तो अवतारु स्वलीलें श्रीकृष्णनाथु ॥ ५८ ॥ जो वर्णाश्रमांच्या मर्यादेत सांपडत नाहीं, ज्याला ईश्वरत्वाचाहि स्पर्श सहन होत नाहीं, जो अज, अव्यय व स्वरूपाने स्वानंद तोच हा स्वलीलेने श्रीकृष्णनाथ अवतार होय. २५८ ऐसा गुणधर्मकर्मातीतु । तो अवतारु श्रीकृष्णनाथु । प्रगटला यदुवंशाआंतु । स्वयें जगन्नाथु स्वइणच्छें ॥ ५९ ॥ याप्रमाणे हा श्रीकृष्णाचा अवतार गुण, धर्म व कर्म यांनी रहित आहे. स्वतः जगन्नाथ स्वेच्छेने यदुवंशांत प्रकट झाला. २५९ जैसें खळाळ कल्लोळ चंचळ । भासे परी तें केवळ जळ । काळी भरडी पांढरी चोळ । परी ते केवळ वसुधाचि ॥ २६० ॥ ज्याप्रमाणें पाण्याचे तरंग अतिशय चंचल भासतात, पण तें सर्व पाणीच असते. माती काळी, लाल, पांढरी इत्यादि अनेक रंगांची असते, पण ती केवळ पृथ्वीच. २६० जे गोडी नाबदरासीं । तेचि वेगळी रवेयासी । तैसा अवतार यदुवंशीं । पूर्णांशेंसीं श्रीकृष्ण ॥ ६१ ॥ साखरेच्या खड्याला जी गोडी असते, तीच त्याच्या कणाला; त्याचप्रमाणे श्रीकृष्ण हा यदुवंशांतील पूर्णावतार होय. २६१ जैसा दीपु लावितां तत्क्षणीं । सवेंचि प्रगटे तेजाची खाणी । तैसा उपजतांचि बाळपणीं । अभिनव करणी स्वयें केली ॥ ६२ ॥ दीप लावताच त्याचे तेज जसे चहूकडे फाकते, त्याप्रमाणें श्रीकृष्णाने उपजतांच बालपणी विचित्र करणी केली. २६२ जें ब्रह्मादिक देवां नव्हे । तें बाळलीलास्वभावें । करूनि दाविलें आघवें । देवाधिदेवें श्रीकृष्णें ॥ ६३ ॥ जें ब्रह्मादिकदेवहि करूं शकले नाहींत, तें सर्व या देवाधिदेवानें बाललीलेने अनायासाने करून दाखवले. २६३ वणवा गिळिला मुखें । पर्वत उचलिला नखें । पूतनेचें स्तन विखें । प्याला निजमुखें जीवासगट ॥ ६४ ॥ मुखाने वणवा गिळिला, नखाने पर्वत उचलिला आणि पूतनेचे प्राण विषासह प्राशन केलें. २६४ जेणें वत्सहरणमिसें । स्त्रष्ट्यासही लाविलें पिसें । जो वत्सवत्सपवेशें । झाला सावकाशें एकाकी एक ॥ ६५ ॥ गोवत्सांचा अपहार करणें या निमित्तानें त्यानें ब्रह्मदेवालाहि वेड लाविलें. स्वतः एक व अद्वितीय असतांनाहि गायींची सर्व वासरे व गोप या सर्वांचा वेश घेतला. २६५ अघ चिरिला जाभाडा । काळियाच्या कुटिल्या फडा । यमलोकीं घेऊनि झाडा । आणिला रोकडा गुरुपुत्र जेणें ॥ ६६ ॥ अघासुराचा जाभाडा चिरला, काळियाची फडा कुटली. यमलोकीचा झाडा घेऊन गुरुपुत्राला जशाचा तसाच परत आणला. २६६ जे प्रजा पीडूनि कर घेती । जयां नावडे धर्मनाती । ऐसे राजे भारभूत क्षितीं । नेणों किती निर्दाळिले ॥ ६७ ॥ प्रजेला पिडून कर घेणारे, धर्म व नीति यांचा द्रोह करणारे असे पृथ्वीला भारभूत राजे त्यानें किती मारले याची गणनाच नाहीं. २६७ एकां सैन्यें एकां स्वांगें । एकां वधवी आन प्रयोगें । एकां गोत्रकलहप्रसंगें । अग्रपूजायोगें एकांसी ॥ ६८ ॥ कित्येकांना सैन्याच्या हातून, कित्येकांना स्वतः आपल्या हाताने, दुसऱ्या कित्येकांना आणखी कांहीं उपाय योजून कौरव व इतर क्षत्रिय यांना भूमीसाठी कलह उत्पन्न करून व शिशुपालाला अग्रपूजेच्या निमित्तानें त्यानें मारविलें. २६८ अधर्मा लावील सीक । धर्माचें वाढवील बिक । हें अवतारकौतुक । राया तूं आवश्यक देखशील पुढां ॥ ६९ ॥ श्रीकृष्णानें अधर्माला शिक्षा करून धर्माचें तेज वाढविले. हे राजा, त्याचें हें अवतारकौतुक तूं, पुढें अवश्य पहाशील. २६९ जैं जैं लोटेल अहोरात्र । तैं तैं करील नवें चरित्र । तया कृष्णसुखासी पात्र । भक्त पवित्र होतील ॥ २७० ॥ जशी जशी अहोरात्र लोटेल, तसें तसें तो नवे नवे चरित्र दाखवील. केवळ पवित्र भक्तच त्या कृष्णसुखाला पात्रा होतील. २७० साधूंसी स्वानंदसोहळा । नित्य नवा होईल आगळा । ते श्रीकृष्णाची लीला । देखसी डोळां नृपनाथा ॥ ७१ ॥ श्रीकृष्णाची ती लीला म्ह० साधूंचा अवर्णनीय व नित्य नवा असा स्वानंदसोहळाच होय. तूं तो आपल्या डोळ्याने पहाशील. २७१ तोचि बौद्धरूपें जाण । पुढां धरील दृढ मौन । तेव्हां कर्माकर्मविवंचन । सर्वथा जाण कळेना ॥ ७२ ॥ हे भूपते तोच भगवान पुढें बौद्धरूपाने दृढ मौन धरील. तेव्हां कर्म व अकर्म यांचें विवेचन कोणालाहि कळेनासे होईल. २७२ तो तटस्थपणें सदा । प्रवर्तवील महावादा । तेणें वादमिसें सदा । वाढवील मदा महामोहातें ॥ ७३ ॥ तेव्हा तो तटस्थ राहून सर्वदा महावादाला प्रवृत्त करील आणि त्या वादाच्या मिषाने तो सर्वदा मद व महामोह यांना वाढवील. २७३ मोह उपजवील दुर्घट । एक कर्मी करील कर्मठ । एक होतील कर्मभ्रष्ट । न कळे चोखट निजात्महित ॥ ७४ ॥ तो दुर्घट मोह उत्पन्न करील. दांभिकांकडून कर्म करवील. कित्येक तर कर्मभ्रष्टच होतील. आत्महित कोणतें हें चांगल्याप्रकारें कोणालाच कळणार नाहीं. २७४ कैसें माजवील मत । वेद मिथ्या मानित । वेदविहिता नातळत । तो जाण निश्चित महामोहो ॥ ७५ ॥ वेदांना अप्रमाण मानून वेदविधींना उल्लंघून केवळ महामोहात्मक मत तो जगांत माजवील. २७५ मोहें केला सर्वांसी छळ । एकां ज्ञानाभिमान प्रबळ । ते कर्म निंदिती सकळ । त्यागिती केवळ जाड्य म्हणौनी ॥ ७६ ॥ मोह सर्वांचा छळ करील. कित्येकांना ज्ञानाचा प्रबळ अभिमान होईल. सर्व लोक कर्मांची निंदा करून, तें केवळ जाड्य आहे, असें समजून त्याचा त्याग करतील. २७६ ऐशिये वर्ततां मोहस्थिती । पुर्ण कळीची होय प्रवॄत्ती । तेव्हां नीच ते राजे होती । प्रजा नागविती चोरप्राय ॥ ७७ ॥ मोहाची स्थिति इतक्या पूर्णावस्थेस आली असतां कलियुगाची प्रवृत्ति होईल. त्यानंतर नीच लोक राजे होतील व चोरांप्रमाणें प्रजेला नागवितील. २७७ शूद्राहूनि अतिकनिष्ठ । राजे होती परम श्रेष्ठ । वर्णावर्ण करिती भ्रष्ट । अतिपापिष्ठ अधर्मी ॥ ७८ ॥ शूद्रांहूनहि अति निकृष्ट असलेले लोक अति श्रेष्ठ राजे होऊन ते वर्ण, आश्रम व इतर जाति यांना भ्रष्ट करितील. कलि- युगांत असे अति अधर्मी व मोठे पापी राजे होतील. २७८ अपराधेंवीण वितंड । भलेत्यांसी करिती दंड । मार्गस्थांचा करिती कोंड । करिती उदंड सर्वापहरण ॥ ७९ ॥ अपराधावांचूनच वाटेल त्याला मनसोक्त दंड करितील. सन्मार्गस्थांचा कोंडमारा करतील. लोकांच्या सर्वस्वाचा भयंकर अपहार करतील. २७९ अबळांचे निजबळ राजा । तो राजाचि स्वयें नागवी प्रजा । ऐसा अधर्म उपजे क्षितिभुजां । तें गरुडध्वजा न साहवे ॥ २८० ॥ वस्तुतः राजा हें दुर्बळाचे बळ आहे, पण कलियुगांत स्वतः तो राजाच प्रजेला नागवील. राजांमध्यें पुढें असा अधर्म उद्भवेल व गरुडध्वजाला तो सहन होणार नाही. २८० जेव्हां स्वधर्माचें जिणें । अधर्में निलाग गांजणें । यालागीं श्रीनारायणें । अवतार धरणें 'कल्की' नामा ॥ ८१ ॥ अधार्मिक लोक स्वधर्भनिष्ठांना अशा रीतीनें छळू लागले असतां श्रीनारायण कल्कीअवतार धारण करील २८१ तो शस्त्रधारा प्रबळ । नष्ट राजे निर्दाळील सकळ । महामोहाचें मूळ । स्वयें समूळ उच्छेदील ॥ ८२ ॥ व आपल्या प्रबल शस्त्रधारेनें अशा दुष्ट राजांचा संहार करून महामोहाला समूळ उपटून टाकील. २८२ तेव्हां धर्माची पाहांट फुटे । सत्यासी सत्व चौपटे । तेव्हां वेदोक्त विधान प्रगटे । स्वधर्मराहाटें राहटती सर्व ॥ ८३ ॥ त्यावेळीं धर्माची पहाट होईल, सत्याचा चौपट उत्कर्ष होईल, वेदोक्त विधान प्रकट होईल व सर्व लोक स्वधर्माने वागू लागतील. २८३. एवंविधानि जन्मानि कर्माणि च जगत्पतेः । भूरीणि भूरियशसो वर्णितानि महाभुज ॥ २३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥ जयाचीं गा अनंत नामें । अनंत अवतार अनंत जन्में । अनंत चरित्रें अनंत कर्में । अनंतोत्तमें हरिकीर्ती ॥ ८४ ॥ हे राजा, ज्या भगवानाची नामें, अवतार, जन्म, चरित्रे व कर्में ही सर्व अनंत आहेत व ज्या हरीची सर्वोत्तम कीर्तिहि अनंत आहे. २८४ अगाध भगवंताचा महिमा । त्याच्या पार नाहीं जन्मकर्मा । त्याचा अनुष्टुप् हा महिमा । तुज म्यां नरोत्तमा निरूपिला येथें ॥ ८५ ॥ त्या अनंताचा महिमा काय वर्णावा ! त्याच्या जन्मकर्मांना सीमा नाहीं. तथापि हे राजा, मीं तुला हा त्याचा महिमा थोडक्यांत सांगितला आहे. २८५ ऐशीं अवतारचरित्रनामें । परिसतां विचित्र कर्में । राजा अत्यंत सप्रेमें । मनोधर्में निवला ॥ ८६ ॥ भगवानाचे हे अवतार, विचित्र कर्मे व चरित्रनामें ऐकून राजाच्या अंतःकरणाला प्रेमाचा पाझर फुटला. त्याचे सर्व मनोधर्म शांत झाले. २८६ जे जे अवतारीं देवो सगुण । जाहला परी निर्गुणाचे गुण । प्रकट करीतचि आपण । कर्माचरण स्वयें दावी ॥ ८७ ॥ ज्या ज्या अवतारमध्यें देव सगुण झाला, त्या त्या अवतारात तो आपल्या निर्गुणाचे गुण प्रगट करीतच स्वतः कर्माचरण करून दाखविता झाला. २८७ धन्य धन्य ते हरिगण । जे वर्णिती भगवद्गुण । ज्यांचेनि वचनें संपूर्ण । निवे अंतःकरण श्रोत्यांचें ॥ ८८ ॥ जे भगवद्गुणांचें वर्णन करतात व ज्यांच्या वचनाने श्रोत्यांचें अंतःकरण शान्त होतें ते हरिभक्त धन्य धन्य होत. २८८ श्रोत्यांचें अवधान निवे । तेथ वक्ता स्वानंदसुख पावे । ग्रंथ वोसंडे स्वभावें । साहित्यगौरवें रसाळ ॥ ८९ ॥ श्रोत्यांची वृत्ति शांत झाली कीं, वक्त्याला परम संतोष होतो आणि श्रोता व वक्ता या दोघांचीहि वृत्ति तन्मय झाली असतां ग्रंथ सर्व साहित्यगुणांनीं युक्त असा होऊन स्वभावतःच सरस ओघाने वाहूं लागतो. २८९ जेवी चंद्रकरें साचा । मुखबंध सुटे चकोरांचा । तेवीं एका जनार्दनाचा । संतकृपा वाचा फुटली त्यासी ॥ २९० ॥ चंद्रकिरणांनीं चकोराची तोंडे जशी उघडतात, त्याप्रमाणें श्रीजनार्दनस्वामी व इतर संत यांच्या कृपेने या एकनाथाला वाचा फुटली आहे. २९० जेवीं सूर्यकिरणस्पर्शें । कमळकळी स्वयें विकासे । तेवीं संतकृपासौरसें । ग्रंथु विकासे अर्थावबोधें ॥ ९१ ॥ सूर्यकिरणांचा स्पर्श होतांच जसा कमळाचा कळा आपोआप फुलतो, त्याप्रमाणें संतांच्या कृपाप्रसादाने हा ग्रंथ अर्थज्ञानाने आपोआप विकास पावत आहे. त्यांच्याच कृपेने खरोखर श्रीमद्भागवताचा हा अर्थ आपोआप बाहेर पडत आहे. २९१ तेचि कृपेनें तत्वतां । अर्थिलें श्रीभगवता । आतां पंचमाध्यायीं कथा । सावध श्रोतां अवधारिजे ॥ ९२ ॥ आता पांचव्या अध्यायांतील कथा श्रोत्यांनी सावधान मनाने ऐकावी. २९२ राजा प्रश्न करील गोड । जो परिसतां पुरेल कोड । साधकांची उपशमेल चाड । होय निवाड धर्माधर्माचा ॥ ९३ ॥ राजा जे गोड प्रश्न करील. तो ऐकून श्रोत्यांचे कोड पुरतील, साधकांची साधनेच्छा पूर्ण होईल व धर्माचा निवाडा होईल. २९३ जेथ भजना भजनहातवटी । प्रश्नोत्तरें कथा गोमटी । अतिशयें रसाळ गोठी । जेणें सुटे गांठी अधर्माची ॥ ९४ ॥ त्यांत भजनाला भजनाची हातवटी साधेल. प्रश्नोत्तर रूपानेच ती कथा फार सुंदर होणार आहे. त्यांतील गोष्टीहि अतिशय रसाळ आहेत. त्या ऐकून अधर्माची गांठ आपोआप सुटेल. २९४ तें उत्तमोत्तम निरूपण । भरीत संतांचे श्रवण । जनार्दनकृपा पूर्ण । एका जनार्दन सांगेल ॥ ९५ ॥ तें उत्तमोत्तम निरूपण संतांच्या श्रवणांना भरून काढील. श्रीजनार्दनाच्या कुपेनें हा एका जनार्दन तें पूर्णपणे सांगेल. २९५ अंगी वारियाचेन संचरणें । घुमारा घुमों लागे तेणें । तेवीं एकाजनार्दनें । कविता करणें निजांगें ॥ २९६ ॥ अंगांत जसा पिशाचाचा संचार व्हावा आणि मग त्यानें घुमावयाला लागावे त्याप्रमाणें एका जनार्दनानें स्वतःच हें कवित्व करणें आहे. २९६ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे एकाकारटीकायां निमिजायंतसंवादे चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥ इति श्रीमद्भागवतपुराणांतील एकादशस्कंधाचा परमहंससंहितेमधला श्रीधर-एकनाथविरचित टीकानुसार विष्णुशर्मकृत सान्वयार्थ-भावार्थासह निमिजायंतसंवादांतील मायाकर्मब्रह्मनिरूपण नांवाचा चवथा अध्याय समाप्त झाला. |