|
श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्गुरु देवा उदारा । म्हणतां कृपण तूं खरा । मागतें आपुलिया घरा । दुजेपणें दारा येवों नेदिसी ॥ १ ॥ हे ओंकाररूप सद्गुरुदेवा ! तुला नमस्कार असो. 'तूं मोठा उदार आहेस' असे म्हणावें, तर खरोखर तूं कृपण आहेस. कारण, आपल्या घरी मागण्यास आलेल्या याचकाला तूं दुजेपणानें दारापर्यंतसुद्धा फिरकू देत नाहीस ! १. अवचटें मागतयासी । जैं भेटी होय तुजसी । तैं घोट भरूं धांवसी । देखतांचि घेसी जीवें त्यातें ॥ २ ॥ तुझी व मागणाऱ्याची अकस्मात् जेव्हां भेट होते, तेव्हां त्याला तूं गिळावयाला धावतोस, आणि त्याला पाहतांच त्याच्या जीवासहित आत्मसात् करून टाकतोस २. जे जे मागों येती तुजपासीं । ते बांधोन ऐक्यतेमाजीं सूदसी । शेखीं त्यांचे सोडवणेसी । भेटी दुसर्यातसी स्वप्नींही नव्हे ॥ ३ ॥ जे जे कोणी तुझ्यापाशी मागावयास येतात, त्यांना बांधून तूं आपल्या ऐक्यरूपांत दडपून देतोस. त्यांची सोडवणूक करावयाला स्वप्नांतसुद्धा दुसऱ्याची भेट होत नाहीं ३. अणुमात्र तुझी प्राप्ती । अवचटें चढे ज्याचे हातीं । त्याचिये संसारसंपत्ती । सर्वस्वें निश्चितीं नाडिसी तूं ॥ ४ ॥ तुझी अणुमात्र प्राप्ति ज्याच्या हाताला अकस्मात् चढते, त्याची संसारसंपत्ति तूं खरोखरच सर्वस्वेकरून नागवून सोडतोस ४. मैंदाचा विडा घेतां । तो प्रवर्ते आपुले घाता । तेवीं तुझी प्रसन्नता । झालिया जीविता स्वयें नाशी ॥ ५ ॥ ठगाचा विडा खाल्ला तर तो आपल्याच घातास कारणीभूत होतो, त्याप्रमाणें तुझी प्रसन्नता झाली तर, ती दुसऱ्याचा जीवच नाहींसा करते ५. जे जे तुजपें मागों आले । ते ते सर्वस्वें नागवले । शेखीं नागवे तुवां केले । निर्लज्ज झाले तिहीं लोकीं ॥ ६ ॥ जे जे तुझ्यापाशी मागावयाला आले, ते ते सर्वस्वी नागवलेच. शेवटी त्यांना तूं नागवे उघडे केल्यामुळे, ते त्रिभुवनांत निर्लज्जपणानें भटकू लागतात ६. ऐशी तुझी निर्वाणगती । त्या तुझी उदार कीर्ती । घडे म्हणशी कैशा रीतीं । ते अगाध स्थिति अवधारीं ॥ ७ ॥ अशी तुझी निर्वाणस्थिति असतांना, तूं उदार आहेस अशी कीर्ति कशी होणार ? असें म्हणशील तर तोही चमत्कार ऐक ७. मागें उदार वाखणिले । तेही आपणियांऐसे केले । मग सर्वस्व आपुलें । दान दिधलें दातृत्वें ॥ ८ ॥ पूर्वी उदार म्हणून ज्यांची कीर्ति वर्णन केलेली आहे, त्यांनाहीं तूं आत्मसदृशच करून टाकलेंस. आणि मग त्यांस औदार्यानें आपले सर्वस्व अर्पण केलेंस ८. षड्गुणैश्र्वर्यवैभवेंसीं । आपणियातें दाना देसी । दिधलें तें घेवों नेणसी । कदाकाळेंसीं कल्पांतीं ॥ ९ ॥ षड्गुणैश्वर्य-वैभवासहवर्तमान स्वतःलाच तूं दान देऊन टाकले आहेस. आणखी ते दिलेले दान तूं कल्पांतीही परत घेत नाहींस ९. आपणियां दिधलें दान । यालागीं तूं दासां अधीन । मग त्यांचेनि छंदें जाण । सर्वस्वें आपण नाचसी ॥ १० ॥ स्वतःचेच दान केलेले असल्यामुळें तूं दासांच्या आधीन होऊन राहतोस. आणि म्हणून मग तूं सर्वस्वी त्यांचाच छंदानुवर्ति होऊन नाचतोस १०. बळीनें सर्वस्व केलें दान । शेखीं तूं झालासि त्याअधीन । त्याचें द्वारपाळपण । अद्यापि आपण चालविसी ॥ ११ ॥ बळीनें सर्वस्व दान केले, पण शेवटीं तूं त्याच्याच आधीन झालास, आणि अद्याप त्याच्या दाराची स्वतः राखण करीत आहेस ११. धर्में अर्पिलें अग्रपूजेसी । शेखीं तूं त्याची सेवा करिसी । नाना संकटें स्वयें सोशिसी । अंगें काढिसी उच्छिष्टें ॥ १२ ॥ धर्मानें तुला अग्रपूजा अर्पण केली; पण शेवटीं तूंच त्याची सेवा करूं लागलास. त्याच्याकरतां स्वतः अनेक प्रकारची संकटें सोसलींस; इतकेच नव्हे, तर आपल्या हातानें त्याच्या घरची उष्टींसुद्धा काढलींस १२. तुझा निजभक्तु अंबऋषी । त्याचे गर्भवास तूं सोशिसी । तुज गौळिये राखिती हृषीकेशी । शेखीं त्या गोपाळांसी रक्षिलें ॥ १३ ॥ तुझा आवडता भक्त अंबरीषराजा; त्याचे गर्भवास तूं आपल्या आंगावर घेतलेस. हे हृषीकेशा ! गौळ्यांनी तुझें संगोपन केले, पण अखेर त्यांचे संरक्षण करणारा तूंच १३. एवं स्वस्वरूप द्यावयासी । उदारत्व तुजपासीं । हें न ये गा आणिकांसी । हृषीकेशी कृपाळुवा ॥ १४ ॥ तात्पर्य, भक्तांना स्वस्वरूप देण्याचे औदार्य, एक तुजपाशींच आहे. हे दयाळा हृषीकेशी ! हें सामर्थ्य इतरांना नाहीं १४. तो तूं परम उदार ऐसा । राया रंका समभावें सरिसा । भावो तेथ भरंवसा । तूं आपैसा आतुडसी ॥ १५ ॥ असा तूं परम उदार असून राजाला व रंकाला सारखाच आहेस. जेथे भाव असतो तेथे निश्चयपूर्वक आपोआप सांपडतोस १५. त्या तुझिया प्राप्तीलागीं । कपाटें सदा सेविती योगी । एक ते झाले भोगविरागी । एक ते त्यागी सर्वस्वें ॥ १६ ॥ त्या तुझ्या प्राप्तीसाठी योगी सदासर्वदा गिरिकंदरांत जाऊन बसतात. कोणी भोग सोडून देऊन विरक्त होतात, आणि कोणी तर सर्वस्वाचाच त्याग करतात १६. एक हिंडती दशदिशे । एक तुजलागीं झाले पिसे । परी तुझी भेटी स्वप्नींही दिसे । ऐसा न दिसे क्षण एक ॥ १७ ॥ कोणी दाही दिशा भटकत फिरतात; कोणाला तुझ्याकरतां वेड लागते; पण तुझें क्षणभरही दर्शन स्वप्नांतसुद्धा त्यांना होत नाहीं १७. ऐशियाही तुझी प्राप्ती । सुलभ असे एके रीतीं । जरी संतचरणीं रंगती । अतिप्रीतीं सप्रेम ॥ १८ ॥ तथापि अशांनासुद्धा तुझी प्राप्ति एका रीतीनें सुलभ आहे. ते जर संतचरणी अत्यंत भक्तिभावानें व निस्सीम प्रेमानें रंगून जातील, तर त्यांस तुझी प्राप्ति सहज होईल १८. संतचरणीं जो विनटला । तो निजप्राप्तीसी पावला । संतस्वरूपें अवतरला । स्वयें संचला परमात्मा ॥ १९ ॥ संतचरणांच्या ठिकाणी जो रंगून जातो, त्याला आत्मप्राप्ति सहज होते. कारण, सर्वव्यापक परमात्मा संतस्वरूपानें अवतीर्ण झालेला असतो १९. यालागीं जीं जीं संतांची रूपें । तीं तीं श्रीहरीचीं स्वरूपें । म्हणौनि संतांचिये कृपे । अतिसाक्षेपें अर्जावें ॥ २० ॥ ह्याकरतां संतांची जी जी रूपे आहेत, ती ती श्रीहरीचींच रूपें होत. म्हणून संतांची कृपा संपादन करण्यासाठी मोठ्या उत्कंठेनें प्रयत्न करावा २०. ते ज्ञानार्थाचे परम पिसे । यालागीं ग्रंथाचेनि मिसें । त्यांचे चरण अनायासें । सावकाशें वंदीन ॥ २१ ॥ त्यांना ज्ञानार्थांचे फार वेड; म्हणून ह्या ग्रंथाच्या निमित्तानें मी सहज त्यांचे चरणांची सेवा करीन २१. संतकरुणावलोकन । तें मज नेत्रींचें अंजन । चरणकृपा पाहतां जाण । श्रीजनार्दन प्रकाशे ॥ २२ ॥ संतांची कृपादृष्टि हेच माझ्या डोळ्यांचे अंजन आहे. त्यांच्या चरणकृपेचा उदय होतांच श्रीजनार्दन प्रगट होतो २२. तया जनार्दनाचिये सेवे । गुरुत्वाचेनि आडनांवें । रिघलों निजस्वभावें । जीवेंभावें भजनासी ॥ २३ ॥ त्या श्रीजनार्दनाच्या सेवेला गुरुत्वाचे आडनांव देऊन निजस्वभावानुसार जीवाभावानें भजनाला पुढे सरसावलों आहे २३. भज्य-भजक-भजना । एके अंगी त्रिविध भावना । दावूनियां जगज्जीवना । जनीं जनार्दना निजभक्ती ॥ २४ ॥ भज्य, भजक व भजन ह्या विविध भावना एकाच चिदात्मस्वरूपी असलेल्या दाखवून जगज्जीवनाची निजभक्ति जनींजनार्दनांत करता येते २४. हे अभेदभक्ती चोखडी । परम ऐक्यें भजनगोडी । अधिकाधिक चढोवढी । वाढे आवडी निजभक्तां ॥ २५ ॥ शुद्ध अभेदभक्ति ती हीच. हीत परम ऐक्याच्या योगानें भजनाला अधिकच गोडी येते, आणि भक्तांची आवडी अधिकाधिक वृद्धिंगत होते २५. देवो आपली सर्वस्वजोडी । वेंची भक्तांचिये वोढी । ऐशी अभेदभक्तीची गोडी । पढिये गाढी गोविंदा ॥ २६ ॥ भक्तांच्या प्रेमासाठी देव आपले सर्वस्व खर्च करतो. अशी अभेद भक्तीची गोडी आहे. ती गोविंदाला फारच प्रिय आहे २६. यालागीं भक्तांचा शरीरभार । स्वयें वागवी श्रीधर । आपुलेनि अंगें परपार । पाववी साचार निजभक्तां ॥ २७ ॥ म्हणूनच भक्तांच्या योगक्षेमाचा भार श्रीधर स्वतः वागवितो; आणि तशा भक्तांना तो स्वतः भवसागराच्या पैलथडीला नेऊन पोचवितो २७. 'निजभक्तांचा' देहभावो । निजांगें वागवी देवाधिदेवो । तरी अभक्तांचा देहो । वागवावया पहा हो काय आन आहे ' ॥ २८ ॥ 'आपल्या भक्तांचा देहभाव (भार) देवाधिदेव आपण स्वतः वागवितो, तर मग अहो ! अभक्तांचा देह वागवावयाला दुसरा कोणी आहे की काय ? २८. भक्तां नाहीं देहअोहंता । यालागीं देवो वागविता । पूर्ण देहाभिमान अभक्तां । त्यांसी अतिबध्दता या हेतू ॥ २९ ॥ (असें म्हणाल तर सांगतों की) भक्तांना अहंता नसल्यामुळे, देवालाच तो वागवावा लागतो आणि अभक्तांना पूर्ण देहाभिमान असल्यामुळें त्यांच्या अतिबद्धतेस तेच कारण होते २९. यालागीं जो निरभिमान । तोचि भगवभ्दक्त संपूर्ण । ज्याच्या अंगीं देहाभिमान । त्यासी भक्तपण कदा न घडे ॥ ३० ॥ याकरतां जो निरभिमान असतो, तोच पूर्णपणे भगवद्भक्त होय. ज्याच्या अंगी देहाभिमान आहे, त्याला भक्तपणा कधीच घडावयाचा नाहीं ३०. निजभक्त तारितां कौतुकें । त्याची रोमावळी केवीं दुखे । निर्भय करोनि पूर्ण हरिखें । देवो निजमुखें निजभक्तां तारी ॥ ३१ ॥ देव निजभक्ताचे लीलेनें रक्षण करीत असल्यामुळें त्याच्या केसालाही धक्का लागत नाही. तो मोठ्या आनंदानें आपल्या भक्तांना निर्भय करून निजसुख देऊन तारतो ३१. यालागीं निरभिमानता । जे विनटले भक्तिपंथा । ते पावो देवोनि विघ्नांचे माथां । पावती तत्वतां भगवत्पद ॥ ३२ ॥ ह्याकरतां निरभिमानपणानें जे भक्तिमार्गाला लागतात, ते विघ्नांच्या माथ्यावर पाय देऊन निश्चयेंकरून भगवत्पदाला पोचतात ३२. भक्तांची ऐशी स्थिती । तरी अभक्तां कवण गती । तेचिं पुसावया नृपती । प्रश्नार्थी प्रवर्ते ॥ ३३ ॥ यानंतर राजानें, भक्तांची स्थिति अशी आहे तर मग अभक्तांची काय गति होते हें विचारण्याकरता प्रश्नास सुरवात केली ३३. पंचमामाजीं निरूपण । अभक्तांची गति लक्षण । युगीं युगीं पूजाविधान । सांगेल पावन हरीचें ॥ ३४ ॥ ह्या पांचव्या अध्यायांत अभक्तांचे लक्षण व त्यांची गति यांचे निरूपण करून, निरनिराळ्या युगांत श्रीहरीचे पवित्र पूजाविधान कसकसे असते, तेही सांगणार आहेत ३४. अवतारचरितपुरुषार्थु । सांगोन संपला चतुर्थु । आतां अभक्तांचा वृत्तांतु । राजा पुसतु मुनीसी ॥ ३५ ॥ अवतारचरित्रे व पराक्रम सांगून चवथा अध्याय संपविला. आतां मुनींना अभक्तांची लक्षणे राजा विचारीत आहे ३५. श्रीराजोवाच । भगवन्तं हरिं प्रायो न भजन्त्यात्मवित्तमाः । तेषामशान्तकामानां क निष्ठाविजितात्मनाम् ॥ १ ॥ राजा म्हणे जी मुनिवरा । जो भगवभ्दजनीं पाठिमोरा । ऐशिया अभक्ता नरा । कोण दातारा गति त्यासी ॥ ३६ ॥ राजा म्हणाला, " हे दयानिधि मुनिश्रेष्ठ हो ! भगवद्भजनाला जो पाठमोरा होतो, अशा अभक्त मनुष्याला कोणती गति प्राप्त होते ? ३६. जे कामालागीं अतिउभ्दट । जे सक्रोध क्रोधें तेजिष्ठ । ते अतिलोभें लोभिष्ठ । जे परम श्रेष्ठ प्रपंची ॥ ३७ ॥ जे कामामुळें मदांध झालेले; क्रोधानें संतप्त झालेले; अतिलोभानें लोभिष्ठ बनलेले; आणि प्रपंचात सर्वदा गढून गेलेले ३७; जे गर्वाचे अग्रगणी । जे अहंकाराचे चूडामणी । जे विकारांची प्रवाहश्रेणी । जे उघडली खाणी विकल्पांची ॥ ३८ ॥ तसेच जे गर्वाचे केवळ पुतळे व अहंकाराचे शिरोमणि, विकारांचे लोंढे, आणि विकल्पांची उघडलेली खाणच ३८; ज्यांचे सद्बुपध्दिआड आभाळ । महामोहाचें सदा सबळ । जे छळणार्थी अतिकुशळ । जे अतिप्रबळ प्रलोभें ॥ ३९ ॥ ज्यांच्या सदबुद्धीच्या आड महामोहाचे गडद आभाळ आलेले, जे कपट करण्यांत अतिकुशल, जे अतिलोभानें ग्रासलेले ३९; दिवसा न देखती निश्र्चितें । ते अंधारीं देखणीं दिवाभीतें । तेवीं नेणोनि परमार्थतें । जे अतिज्ञाते प्रपंचीं ॥ ४० ॥ जे दिवसाढवळ्या दिसत नाहीं ते धुबडे अंधारांत पहातात, त्याप्रमाणें जे परमार्थात आंधळे असून प्रपंचामध्यें मात्र मोठे पंडित ४०, जे नेणती आत्महित । ज्ञान विकूनि काम पोसित । ऐसे जे कां अभक्त । त्यांची गति निश्र्चित सांग मज ॥ ४१ ॥ ज्यांना आत्महित कळत नाहीं आणि ज्ञान विकून काम वाढवीत असतात; असे जे अभक्त, त्यांना खरोखर गति कोणती, हे मला सांगावे ४१. तुम्हांऐसे सद्बुध्दी । चालते बोधाचे उदधी । भाग्यें लाधलों ज्ञाननिधी । हा प्रश्न त्रिशुध्दी सांगवा ॥ ४२ ॥ आपल्यासारखे बुद्धिमान् व चालते बोधाचे महासागर, आज माझ्या भाग्यानेंच मला मिळाले आहांत; ह्याकरतां निश्चयेंकरून एवढ्या प्रश्नाचे उत्तर सांगावें" ४२. राजा साक्षेपें बहुवस । पुसे अभक्तगतिविन्यास । तो सांगावया 'चमस' । सावकाश सरसावला ॥ ४३ ॥ याप्रमाणें राजानें अभक्तांची दशा काय असा प्रश्न मुद्दाम विचारला तेव्हां त्याचे उत्तर सांगण्यासाठी (नवयोग्यांपैकी आठवा योगी) 'अवमस' (नांवाचा) मोठ्या आनंदानें पुढे सरसावला ४३. श्रीचमस उवाच । मुखबाहूरुपादेभ्यः पुरुषस्याश्रमैः सह । चत्वारो जज्ञिरे वर्णा गुणैर्विप्रादयः पृथक् ॥ २ ॥ य एषां पुरुषं साक्षाद् आत्मप्रभवमीश्वरम् । न भजन्त्यवजानन्ति स्थानाद्भ्रष्टाः पतन्त्यधः ॥ ३ ॥ जो कां जगाचा जनकु । मुख्य गुरुत्वें तोचि एकु । त्यासी न भजे जो अविवेकु । तो नाडला लोकु सर्वस्वें ॥ ४४ ॥ (चमस म्हणाला) सर्व जगाचा जो जनक, तोच एकमेव मुख्य गुरु होय; त्याला जो अविवेकी पुरुष भजत नाही, तो सर्वस्वास नाडला म्हणून समजावें ४४. पुरुषापासूनि जन्मले जाण । चार्हील आश्रम चार्ही४ वर्ण । त्यांचे उत्पत्तीचें स्थान । ऐक संपूर्ण नृपनाथा ॥ ४५ ॥ चारही आश्रम आणि चारही वर्ण त्या मूळ पुरुषापासूनच जन्मास आले आहेत. हे राजाधिराजा ! त्यांच्या उत्पत्तीचे स्थान सांगतो ते ऐकून घे ४५. मुखीं वेदविद ब्राह्मण । बाहूं जन्मले राजन्य । उरूं जन्मले वैश्यवर्ण । चरणीं जन्मस्थान शूद्रवर्णा ॥ ४६ ॥ मुखापासून वेदवेत्ते ब्राह्मण जन्मास आले; बाहूंपासून क्षत्रिय जन्मले; मांड्यांपासून वैश्यवर्ण उत्पन्न झाला आणि शूद्रवर्णांचे जन्मस्थान चरण होत ४६. मूळीं अवघे तीन गुण । गुणयोगें वर्ण जाण । त्रिगुणीं चारी वर्ण । जन्मलक्षण घडे कैसें ॥ ४७ ॥ मुळांत गुण तर तीनच आहेत; आणि गुणांच्या योगानेंच वर्ण झालेले आहेत; तेव्हां तीन गुणांमधून चार वर्ण कसे जन्मास आले ? ४७. सत्वगुणें शुध्दे ब्राह्मण । सत्वरजमिश्रें राजे जाण । रजतमें वैश्यवर्ण । केवळ तमोगुण शूद्रवर्ण ॥ ४८ ॥ (तर सांगतात) शुद्ध सत्त्वगुणानें ब्राह्मण झाले; सत्त्व आणि रज ह्यांच्या मिश्रणानें राजे म्हणजे क्षत्रिय झाले; रज आणि तम मिळून वैश्यवर्ण झाला; आणि तमोगुणानें शूद्रवर्ण झाला ४८. क्षत्रिय वैश्य आणि ब्राह्मण । द्विजन्मे हे तिन्ही वर्ण । त्यांसी गायत्री वेदाध्ययन । शूद्र ते जाण संस्काररहित ॥ ४९ ॥ ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे तीन वर्ण 'द्विजन्मे' म्हणजे उपनयनसंस्कारामुळें दोनदां जन्मास येणारे, त्यांना गायत्री मंत्राचा आणि वेदाध्ययनाचा अधिकार आहे; शूद्र मात्र संस्काररहित आहेत असें तूं समज ४९. ब्रह्मचर्य आणि गार्हस्थ्य । तिहीं वर्णां अवश्य प्राप्त । चहूं आश्रमां आश्रयभूत । जाण निश्र्चित ब्राह्मण ॥ ५० ॥ ब्रह्मचर्याश्रम आणि गृहस्थाश्रम हे ह्या तिन्ही वर्णांना अवश्य प्राप्त होतात. पण ब्राह्मण मात्र चारही आश्रमांना आश्रयभूत असतात, हे लक्षात ठेव ५०. गार्हस्थ्य पुरुषाच्या चरणीं । ब्रह्मचर्य हृद्य स्थानीं । वक्षःस्थळीं वसती वनी । शिरोमणि संन्यास ॥ ५१ ॥ गृहस्थाश्रम हा त्या विराट पुरुषाच्या चरणस्थानी, ब्रह्मचर्याश्रम हृदस्थानी; वानप्रस्थाश्रम वक्षःस्थानी आणि संन्यासाश्रम हा शिरःस्थानी असतो ५१. हे ब्राह्मणादि वर्ण पहा हो । ज्यापासोनि जन्मप्रभवो । तो न भजतां देवोधिदेवो । उत्तमदेहो अधःपाती ॥ ५२ ॥ अहो ! असें पहा की, ह्या ब्राह्मणादि वर्णांना ज्याच्यापासून जन्म प्राप्त होतो, त्या देवाधिदेवाला जर भजलें नाही, तर प्राप्त झालेला उत्तम देह अधःपातास जातो ५२. पूर्वोत्तरमीमांसा दोनी । नानाशास्त्रार्थकडसणी । स्वरूप बोलती निर्वचूनी । एवं शब्दज्ञानीं अतिचतुर ॥ ५३ ॥ पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा, तसेच नाना शास्त्रांतील विचार, त्यांचे स्वरूप व सिद्धांत इत्यादि सांगण्यामध्यें पटाईत; सारांश शब्दपांडित्य करण्यांत मोठे चतुर ५३; यापरी जे पंडीत । ज्ञानभिमानें अतिउन्मत्त । तेणें अभिमानेंचि येथ । भजनीं निश्र्चित विमुख केले ॥ ५४ ॥ अशा प्रकारचे जे पंडित, ते ज्ञानाभिमानानें अत्यंत उन्मत्त झालेले असतात; आणि खरोखर त्या अभिमानामुळेच ते भजनाला विन्मुख होतात ५४. एक अज्ञानी सर्वथा । स्वप्नीं नेणती परमार्था । ते नेणपणेंचि तत्वतां । श्रीजगन्नाथा न भजती ॥ ५५ ॥ कोणी निखालस अज्ञानी असतात, ते स्वप्नांतही परमार्थाला ओळखीत नाहीत. ते खरोखर अज्ञानपणामुळेच श्रीजगन्नाथाला भजत नाहींत ५५. शेळी उंसाची चवी गाढी । नेणोनि पाचोळा करांडी । तेवीं नणोनि हरिभक्तीची गोडी । अज्ञानें बापुडीं विषयलुब्ध ॥ ५६ ॥ उसाच्या गोडीची लज्जत शेळीला माहीत नसल्यामुळे, ती पालाच कुरतडूं लागते. त्याप्रमाणें हरिभक्तीची गोडी न समजल्यामुळेच बिचारे अजाण लोक विषयालाच लंपट होऊन राहतात ५६. आलोडूनि वेदशास्त्रार्थ । ज्ञातपणें जे पंडित । गर्वें हेळसिती भक्तिपंथ । अतिउन्मत्त ज्ञातृत्वें ॥ ५७ ॥ परंतु वेदशास्त्रार्थाच्या अवलोकनानें आपल्याला ज्ञाते समजून जे पंडितपणा मिरवितात, ते गर्वानें भक्तिमार्गाची हेटाळणी करतात. ज्ञानाभिमानानें ते अतिशय उन्मत्त झालेले असतात ५७. जेवीं ज्वरिताचें मुख । दूध मानी कडू विख । तेवीं ज्ञानगर्वें पंडित देख । ठेले विमुख हरिभजनीं ॥ ५८ ॥ ज्वरिताचे मुख ज्याप्रमाणें दुधाला कडू विष मानते, त्याप्रमाणें ज्ञानाच्या गर्वानें पंडित लोक हरिभजनाला विन्मुख होतात ५८. यापरी ज्ञानाभिमानी । विमुख झाले हरिभजनीं । ते जरी वर्णामाजीं अग्रगणी । तरी अधःपतनीं पडतील ॥ ५९ ॥ अशा प्रकारे ज्ञानाच्या अभिमानास पेटून जे हरिभजनाला पराङ्मुख होतात, ते चतुर्वर्णांमध्यें जरी श्रेष्ठ असले, तरी अधःपतनांतच पडतात ५९. हो कां वर्णांमाजीं अग्रगणी । जो विमुख हरिचरणीं । त्याहूनि श्वपच श्रेष्ठ मानीं । जो भगवद्भजनीं प्रेमळु ॥ ६० ॥ फार काय सांगावें ? वर्णामध्यें श्रेष्ठ (ब्राह्मण) असून जो हरिचरणाला विन्मुख असतो, त्याच्याहून भगवद्भजनांत प्रेमळ असलेला चांडाळसुद्धा श्रेष्ठ होय ६०. आम्ही मुक्त हें मानुनी । जे विमुख भगवभ्दजनीं । ते पचिजती अधःपतनीं । तिर्यग्योनीं जन्ममरणें ॥ ६१ ॥ 'आम्ही मुक्त आहोत' असें मानून जे भगवद्भजन करीत नाहीत, ते पश्वादि योनीत जन्ममरणाचे फेरे घेत अधःपतनांतच पडतात ६१. मनुष्यदेहीं जे भजननष्ट । ते होती गा स्थानभ्रष्ट । अधःपातें भोगिती कष्ट । अतिउभ्दट यातना ॥ ६२ ॥ मनुष्यदेहास येऊनही जे ईश्वरभजन करीत नाहीत, ते स्थानभ्रष्ट होऊन अधःपतनानें अत्यंत कष्ट व घोर यातना भोगतात ६२. ज्ञानाभिमानें जे न भजती । ते प्रौढपतनीं पचिजती । अज्ञानांही तेचि गती । सर्वथा नृपती म्हणों नये ॥ ६३ ॥ ज्ञानाभिमानानें जे भजन करीत नाहीत, त्यांचा भयंकर अधःपात होतो; तर हे राजा ! अज्ञानांनासुद्धा तीच गति होईल असें मात्र निखालस समजू नको ६३. दूरे हरिकथाः केचिद् दूरे चाच्युतकीर्तनाः । स्त्रियः शूद्रादयश्चैव तेऽनुकम्प्या भवादृशाम् ॥ ४ ॥ एका पित्याचे दोघे अर्भक । एक प्रबुध्द एक बाळक । पित्यासी अवमानितां देख । तादी जनक प्रबुध्दासी ॥ ६४ ॥ एकाच बापाची दोन मुले; पैकी एक जाणते व एक नेणते; त्यांनी पित्याचा अपमान केला तर तो त्या जाणत्यालाच मारतो ६४. बाळक पित्याचे माथां चढे । जरी लाता हाणे तयाकडे । तरी त्यासी दोषु न घडे । दोषांचें सांकडें सज्ञानासी ॥ ६५ ॥ पण तान्हें मूल पित्याच्या डोक्यावर चढले, त्यानें पित्याला लाथासुद्धा मारल्या, तरी त्याला दोष लागत नाही. दोषांचे खापर जाणत्याच्या माथ्यावर ६५. ज्ञात्यांपासोनि भजन ठाके । ते कवळिजती महादोखें । अज्ञानें तरती भाविकें । साधुकृपामुखें अनुगृहीतां ॥ ६६ ॥ ज्ञात्यांकडून भजन राहिले, तर त्यांना महादोष ग्रासून टाकतात. आणि अज्ञानी परंतु भाविक असतात ते, साधूंच्या कृपानुग्रहानें तरून जातात ६६. अज्ञाना नाहीं विशेष बाधु । तो साधुविश्र्वासें होय शुध्दु । ज्ञानाभिमानियां भाव विरुध्दु । यालागीं सुबुध्दु दोष बाधी ॥ ६७ ॥ अज्ञान्याला विशेष दोष नसल्यामुळें तो साधूवर विश्वास ठेवल्यानेंच शुद्ध होतो. ज्ञानाभिमान्याचा भाव विरुद्ध असतो, ह्यामुळें त्यालाच दोषांची बाधा होते ६७. अज्ञानी विश्र्वासें साधु वंदी । ज्ञानाभिमानीं दोहोंतें निंदी । यालागीं त्यातें त्रिशुध्दी । अवश्य बाधी अतिदोष ॥ ६८ ॥ अज्ञानी हा विश्वास ठेवून साधूला वंदन करतो. आणि ज्ञानाभिमानी असतो, तो दोघांचीही निंदा करतो. म्हणूनच खरोखर त्याला हटकून दोषांची अतिशय बाधा होते ६८. साधुविश्र्वासें अज्ञान फिटे । ज्ञानाभिमानियां विकल्प मोठे । त्यांसी विश्र्वास कदा न घटे । अभिमानहटें अधःपात ॥ ६९ ॥ साधूवर विश्वास ठेवल्यानें अज्ञान नाहीसे होते; पण ज्ञानाभिमान्यांना अतिशय तर्कवितर्क असतात, त्यामुळें त्यांचा विश्वास कोणावरच बसत नाही. अभिमानाच्या हट्टानेंच त्यांना पतन प्राप्त होते ६९. एवं विचारितां नेटेंपाटें । अहंतेचें बंधन मोठें । अभिमानऐासें नाहीं खोटें । दुजें वोखटें त्रिलोकीं ॥ ७० ॥ ह्याचा नीट विचार केला तर असे दिसून येते की, अहंतेचे बंधन मोठे असते. अभिमानासारखें खोटें आणि वाईट त्रिभुवनांत दुसरे काही नाहीं ७०. अभिमानु ईश्र्वरा बाधी । तोहो शबळ कीजे सोपाधी । अभिमानें देहबुध्दी । बाधक त्रिशुध्दी सुरनरांसी ॥ ७१ ॥ अभिमान हा प्रत्यक्ष ईश्वरालासुद्धां बाधक होतो. अभिमानामुळेच ईश्वर 'शबल' (मायोपाधीनें युक्त) होतो. अभिमानानें देहबुद्धि उत्पन्न होते आणि तीच सुरनरांना बाधक होते ७१. यालागीं जे अज्ञान जन । ज्यांसी नाहीं ज्ञानाभिमान । तेही विश्र्वासल्या संपूर्ण । साधु सज्जन अनुग्रहो करिती ॥ ७२ ॥ ह्याकरतां जे लोक अज्ञान असतात, ज्यांना ज्ञानाभिमान नसतो, त्यांनी जर साधुसज्जनांवर पूर्ण विश्वास ठेवला, तर ते त्यांच्यावर अनुग्रह करतात ७२. ज्यासी म्हणती नीच वर्ण । स्त्रीशूद्रादि हीन जन । ज्यासी कां दूरी शास्त्रश्रवण । ज्यासी दूरी श्रवण वेदोक्त ॥ ७३ ॥ ज्यांना नीच वर्णाचे म्हणतात ते शूद्र व स्त्रिया इत्यादिक, ज्यांना शास्त्रश्रवणाचा किंवा वेदश्रवणाचा अधिकार नाहीं असे ७३; त्यांसी जाहलिया सभ्दाव संपूर्ण । ते होतु कां हीन जन । परी संतकृपेसी आयतन । विश्र्वासें पूर्ण अधिकार झाला ॥ ७४ ॥ पण त्यांच्या ठिकाणी जर पूर्ण सद्भाव उत्पन्न झाला, ते मग कनिष्ठ जातीचे कां असेनात, संतांच्या कृपेला पात्र होतात. तितका अधिकार त्यांना एका विश्वासानेंच प्राप्त होतो ७४. ऐसे पूर्ण भावार्थी । त्यांसी तुम्हांऐशा साधुसंतीं । अनुग्रहोनि तारिती । कृपामूर्ती कृपाळु ॥ ७५ ॥ (जनक राजा म्हणाला) पूर्ण भावार्थी असतात, त्यांना हे कृपामूर्ति ! हे दयाळो ! तुम्हांसारखेच साधुसंत अनुग्रह देऊन तारतात ७५. अज्ञानी यापरी तरती । परी ज्ञानभिमान ज्यांच्या मतीं । ते ब्रह्मादिकां न तरती । त्यांचीही स्थिति मुनि सांगे ॥ ७६ ॥ (चमसमुनि म्हणाला) ह्याप्रमाणें अज्ञानी तरतात; परंतु ज्यांच्या मनामध्यें ज्ञानाभिमान भरलेला असतो, ते ब्रह्मदेवादिकांनासुद्धा तारवत नाहीत. त्यांचीही स्थिति मुनि सांगत आहे ७६ विप्रो राजन्यवैश्यौ वा हरेः प्राप्ताः पदान्तिकम् । श्रौतेन जन्मनाथापि मुह्यन्त्याम्नायवादिनः ॥ ५ ॥ अज्ञान जे नीच वर्ण । भावें धरोनि संतचरण । निजविश्र्वासें संपूर्ण । जन्ममरण निरसिती ॥ ७७ ॥ जे अज्ञान व हीन वर्णाचे असतात, ते संतांचे पाय धरून आपल्या पूर्ण विश्वासाच्या योगानें जन्ममरण चुकवितात ७७. येर द्विजन्मे जे कां तिन्ही । स्वभावें प्राप्त हरिचरणीं । आम्ही अधिकारी वेदाज्ञानी । जन्मभिमानी अतिगर्वी ॥ ७८ ॥ बाकीचे व्रतबंधामुळें दोनदां जन्म पावणारे म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, हे स्वाभाविकपणे हरिचरणाकडे पेंचलेले असतात; परंतु अधिकारी काय ते आम्ही, वेदांचे ज्ञान आम्हांलाच आहे, अशी आपल्या जन्माची आढ्यता बाळगूनच ते गर्वानें ताठून जातात ७८. जन्माभिमान कर्माभिमान । अग्रपूज्यत्वें पूज्याभिमान । अल्पमात्र वेदींचें ज्ञान । तो वेदाभिमान वाढविती ॥ ७९ ॥ आमचे जन्म उच्च; आमचे कर्म उच्च; आम्ही अग्रपूजेचे अधिकारी; असा पूज्यत्वाचा अभिमान वेदांतील ज्ञान पाहूं गेलें तर तात्पुरतेच; पण तोच वेदाभिमान अगदी शिखरावर नेऊन ठेवतात ७९. ज्यासी प्राप्त उपनयन । ज्यासी प्राप्त गायत्री पूर्ण । ज्यासी हरीचें आवडे भजन । त्याचे धरितां चरण हरि भेटे ॥ ८० ॥ मौंजीबंधनाचा व गायत्रीमंत्राचा ज्यांना पूर्ण अधिकार; ज्यांना हरीच्या भजनाची आवड ज्यांचे पाय धरले असता हरीची भेट होत असते ८०; ऐसे उत्तम जे ब्राह्मण । त्यांसी वेदावादें ज्ञानाभिमान् । तेणें गर्वें पडे मोहन । तेंचि निरूपण विशद सांगे ॥ ८१ ॥ असे जे उत्तम ब्राह्मण, त्यांनाहीं वेदवादेंकरून ज्ञानाचा अभिमान होतो आणि त्याच गर्वामुळें त्यांना मोह पडतो. तेंच निरूपण चमसमुनि स्पष्ट करून सांगत आहे ८१. कर्मण्यकोविदाः स्तब्धा मूर्खाः पण्डितमानिनः । वदन्ति चाटुकान् मूढा यया माध्व्या गिरोत्सुकाः ॥ ६ ॥ न कळे विधिविधानमंत्र । कोणे कर्मीं कैसें तंत्र । नेणोनियां गर्व थोर । ताठा अपार ज्ञातृत्वाचा ॥ ८२ ॥ विधि, विधान, मंत्र काही एक कळत नाहीं; कोणत्या कर्माला कोणते तंत्र, हेही कळत नाही. असे असून गर्व मोठा आणि ज्ञातेपणाचा ताठा तर काही विचारूच नये ८२. गारोडियासी विद्या थोडी । परी सर्वांगीं बिरुदें गाढीं । कां जाणी जाणपणें जोडी । कडोविकडीं आसनपूजा ॥ ८३ ॥ गारुड्यापाशी विद्या थोडीच असते, पण साऱ्या अंगावर चांद, ताईत, पदकें वगैरेंची गर्दीच गर्दी असते. त्याप्रमाणें जाणता जाणतेपणाच्या डौलानें आसन-पूजादिकांचीच रेलचेल करून सोडतो ८३. देऊनि पतंगाचे ढाळ । स्फटिकाअंगीं माणिक कीळ । तैसे मूर्खही केवळ । मिरविती प्रबळ ज्ञानाभिमानें ॥ ८४ ॥ पतंग नांवाच्या तांबूस रंगाच्या लाकडाच्या शिजविलेल्या पाण्याची पुढे देऊन स्फटिकाला ज्याप्रमाणें माणकाचें तेज आणावे, त्याप्रमाणें शुद्ध मूर्ख असणारेही ज्ञानाचा खोटा अभिमान बाळगतात ८४. आपण विधान नेणती । शेखीं सज्ञानाही न पुसती । कर्म आपमतीं करिती । लौकिकीं स्फिती वाढवावया ॥ ८५ ॥ आपल्याला विधान माहीत नसते आणि जाणत्यालाही ते विचारून घेत नाहीत. लोकांत प्रतिष्ठा वाढविण्याकरता आपल्याच मतानें कर्म करतात ८५. मिथ्या मधुर शब्दें चाटुक । जे भोगीं अणुमात्र नाहीं सुख । तरी इहमुत्र भजविती लोक । अप्सरादिक भोगलिप्सा ॥ ८६ ॥ खोट्या गोड गोड शब्दांनी वाचाळपणा मात्र करतात, व भोग भोगण्यांत लवमात्रही सुख नाही, अशा.. अप्सरादिक भोगासाठी लाळ घोटणाऱ्यांना इहलोकच्या व परलोकच्या नादाला मात्र लावतात ८६. येथ भोग भोगावे चोखडे । आणि पुढें स्वर्गभोग जोडे । येणें वचनें बापुडे । यागाकडे धांवती ॥ ८७ ॥ 'येथे उत्तमोत्तम भोग भोगावेत; आणि पुढे तर स्वर्गसुख ठेवलेलेच आहे,' अशा वचनाला भुलून बिचारे यज्ञ करण्याकडे धाव घेतात ८७. कर्ता सर्वस्वें नागवो । परि आचार्यत्व आम्हां येवो । ऐशी यांची बुध्दि पहा हो । यागप्ररोहो आरंभिती ॥ ८८ ॥ कर्ता खर्चाखाली सर्वस्वी बुडाला तरी चिंता नाही, पण आपल्याकडे आचार्यपणा यावा अशी त्यांची बुद्धि असते. तशा बुद्धीनें यज्ञाचा खटाटोप ते आरंभितात ८८. पावावया अतिप्रतिष्ठा । नाना कर्मांच्या कर्मचेष्टा । करूनि दाविती खटपटा । कर्मारंभु मोठा आरंभुनी ॥ ८९ ॥ आपली अतिशय प्रतिष्ठा वाढावी, म्हणून नाना प्रकारच्या कर्मचेष्टा करून कर्मारंभाचा मोठा समारंभ मांडून दांडगी खटपट करून दाखवितात ८९. ना तरी जैसा मद्यपानी । मद्यरसा अमृत मानी । या वचनगोडिया मद्यपानीं । प्रवर्तिजे जनीं स्वादलिप्सा ॥ ९० ॥ किंवा असें पहा, दारूबाज जसा दारूच्या रसाला अमृत समजतो, आणि त्याचे बोलणे गोड वाटून स्वाद घेण्याच्या इच्छेनें इतर लोक मद्यपान करण्याला प्रवृत्त होतात ९०; तें सेविलिया काय जोडे । थिती सावधानता बुडे । मग दुर्भगत्व रोकडें । पिशाचत्व गाढें अंगीं वाजे ॥ ९१ ॥ पण ते घेतल्यापासून होते काय ? तर आपले असलेले देहभान नाहीसे होते; आणि तत्काळ करंटेपणा व पिशाचत्वाचा संचार अंगांत होतो ९१. तैसें केवळ पतनात्मक । त्या नांव म्हणती स्वर्गसुख । जाणोनि प्रवर्तती ते मूर्ख । फळकामुक अभिलाषी ॥ ९२ ॥ तद्वत् अधःपतनात्मक सुखालाच स्वर्गसुख असें नांव देतात. आणि मूर्ख, लोभी व फलाच्या इच्छेला लंपट झालेले असतात ते जाणून बुजून त्या कामाला प्रवृत्त होतात ९२. उंडणी लंघू न शके भिंतीसी । तरी चढों रिघते सायसीं । चढतां पडे आपैसी । तेवीं स्वर्गसुखासी दृढ पतन ॥ ९३ ॥ अळी काही भिंतीचे उल्लंघन करू शकत नाही, तरी चढावयाचा प्रयत्न करतेच; आणि चढतां चढतां आपोआप खाली पडते. तसेंच स्वर्गसुखालाही पतन निश्चित आहे ९३, कर्माभिनिवेशपडिपाडें । कामलोभ दृढ वाढे । तेणें दांभिक करणें घडे । क्रोधाचें चढे महाभरितें ॥ ९४ ॥ कर्माच्या आसक्तीनें काम व लोभ अतिशयच वाढतात. आणि त्यामुळें ढोंग करणे भाग पडतें आणि त्या ढोंगामध्यें क्रोधाचे तर काय भरतेंच येऊन आदळतें ९४. रजसा घोरसङ्कल्पाः कामुका अहिमन्यवः । दाम्भिका मानिनः पापा विहसन्त्यच्युतप्रियान् ॥ ७ ॥ ते काय करितील बापुडे । शुध्द सत्वें सांडिलें फुडें । मग रजोगुणें कामाकडे । झाले धडफुडे अतिकामी ॥ ९५ ॥ पण त्याला ते बिचारे तरी काय करतील ? त्यांचे शुद्ध सत्त्वच मुळी नाहीसे झालेले असते. त्यामुळें ते रजोगुणानें कामाकडे येऊन खरोखर अत्यंत कामासक्त बनून राहतात ९५. तेव्हां उर्वशीच्या अतिआवडी । स्वर्गभोगाची अतिगोडी । यालागीं यागपरवडी । पुण्याची जोडी जोडूं धांवे ॥ ९६ ॥ तेव्हां अप्सराभोगांची इच्छा दांडगी लागून स्वर्गसुखाची अत्यंत गोडी वाटते; म्हणून यज्ञाचा प्रकार आरंभून पुण्याची जोड जोडावयाला धावाधाव करतात ९६. तेथ मंत्रतंत्रद्रव्यशुध्दी । नाहीं यागयजनविधी । तेणें स्वर्ग नव्हेचि त्रिशुध्दी । ठकले दुर्बुध्दी अविहिताचारें ॥ ९७ ॥ तेव्हां मंत्रतंत्रशुद्धि, द्रव्यशुद्धि, किंवा यज्ञयागाचा विधीही ते पहात नाहीत. त्यामुळें स्वर्गप्राप्ति तर होत नाहींच, पण उलट ते दुर्बुद्धि धारण करणारे लोक, त्या अविधि कृत्यानें ठकले मात्र जातात ! ९७. तया अलब्ध कामासाठीं । सर्वांर्गीं क्रोधु उठी । जेवीं परिपाकापाठीं । धरी कडुवटी आंबिलकांजी ॥ ९८ ॥ आंबील अथवा पेज पक्की शिजल्यानंतर शिळी झाल्यावर जशी कडवट होते, त्याप्रमाणें त्यांची ती इच्छा म्ह. काम पूर्ण झाला नाहीं की क्रोध त्यांच्या सर्वांगामध्यें भडकतो ९८. जंव जंव पिकिजे कोरिफडें । तंव तंव कडूपण गाढें । तैसा कामनाशापुढें । क्रोध वाढे अत्युग्र ॥ ९९ ॥ किंवा कोरफड जसजशी पिकत जाते तसतसा तीत कडूपणा वाढत जातो; त्याप्रमाणें कामाचा भंग झाला की क्रोध भयंकर माजतो ९९. क्रोध काळिया-नाग खरा । देतु द्वेषाचा फुंफारा । घाली पूज्यतेच्या आकारा । धुधुःकारा साधुनिंदेचा ॥ १०० ॥ ऐसा क्रोधाचा वसौटा । होय तमाचा चोहटा । मग दंभाचे नाणवठां । हीनकसाचा खोटा विकरा मांडी ॥ १ ॥ क्रोध हा खरोखर काळसर्प आहे. तो द्वेषाचे फूत्कार सोडीत असतो. तो पूज्यतेचे वेटाळे घालून बसतो व साधुनिंदेचे उसासे टाकतो ! क्रोधाचे वसतिस्थान असें आहे. ह्या स्थानावर तमाचा चव्हाटा भरतो व दंभाच्या सराफकट्यावर हिणकसाचा खोटा विकरा मांडतो १००-१०१. मग जो जो भेटे भेटे प्राणिया । त्यासी अभिचारयोगक्रिया । लावूनि बाहेर मुद्रिया । पापाचारें पापिया प्रवृत्ति मांडी ॥ २ ॥ मग जो जो मनुष्य भेटेल, त्याला जारणमारणादि प्रयोगाचा नाद लावून, खेचरी, भूचरी इत्यादि बाह्य मुद्रा दाखवून पापकर्मानें पापाची प्रवृत्ति वाढवितो २. स्वधर्माचा फोडोवाडें । प्रतिपदीं पाडा पढे । अधर्माची खाणी उघडे । समूळ कुडें कर्माचरण ॥ ३ ॥ स्वधर्माचा पाढा पदोपदीं वाचतो; पण अधर्माची खाण उघडून निखालस खोटें कर्माचरण करूं लागतो ३. तेणें पापाचार पिके । गगनचुंबित जाहलीं टेंकें । मग अधमोत्तम एकें तुकें । घालिती यथासुखें अधर्मघालणी ॥ ४ ॥ त्यामुळें पापाचाराचे पीक पिकून त्याची गगनचुंबित डोंगरासारखी रास होते. तेव्हां बरें व वाईट एकाच तोलानें अधर्माच्या तराजूत तोलतात ४. तेथ ठाणें देऊनि अभिमाना । वाढविती ज्ञानाभिमाना । मग निंदिती साधुजना । विपुळाती सज्जना उपहासयुक्त ॥ ५ ॥ अभिमानाला आश्रय देऊन ज्ञानाभिमान वाढवितात. आणि मग साधुजनांची निंदा करतात व सज्जनांना उपहासयुक्त पाहिजे ते बोलतात ५. जगीं सर्वत्र पाहती दोष । तथापि देखिल्याही निर्दोष । तरी करूनियां उपहास । करिती सावकाश असदारोपणें ॥ ६ ॥ जगांत सर्वांच्या ठिकाणी ते दोषच पाहतात. तशांतूनही कोणी निर्दोषी दिसलाच, तर त्याची थट्टा करून त्यावर नसते आरोप लादतात ६. यापरी अभिमानविदां । पापबुध्दीची दृढ बाधा । सहजानुवादें सदा । साधुनिंदा अनुवादती ॥ ७ ॥ ह्याप्रमाणें अभिमानास चढलेले असतात, त्यांना पापबुद्धीची दृढ बाधा होते. ते सहज बोलू लागले तरी सदोदित साधूंची निंदाच बोलत असतात ७. जे कां हरीतें आवडती । जे सदा करिती हरिभक्ती । त्यांतें सदा उपहासिती । अनुवादती गुणदोष ॥ ८ ॥ जे श्रीहरीला आवडतात, जे निरंतर हरीची भक्ति करतात, त्यांचा हे नेहमी उपहास करतात. त्यांचे गुणही दोषरूपानेंच बोलत असतात ९. द्विज स्मरती हरिनाम । त्या नांव म्हणती अधर्म । ऐकोनि हरिकीर्तनसंभ्रम । म्हणती हें परम महापाप ॥ ९ ॥ ब्राह्मण हरीचें नामस्मरण करूं लागले तर त्याला 'अधर्म' असे हे म्हणतात. नामसंकीर्तनाचा गजर ऐकून हे त्यास 'महापाप' असे म्हणतात ९. ऐसा जो हरिनामातें निंदी । हरिकीर्तनीं दुर्बुध्दी । तो खळ जाणावा त्रिशुध्दी । भजनापवादी दुर्जन ॥ ११० ॥ असा जो हरिनामाची निंदा करणारा असेल, हरिकीर्तनाविषयीं दुर्बुद्धि धरणारा असेल, तो खरोखर दुष्ट व भजनवैरी चांडाळ म्हणून समजावें ११०. वदन्ति तेऽन्योन्यमुपासितस्त्रियो गृहेषु मैथुन्यपरेषु चाशिषः । यजन्त्यसृष्टान्नविधानदक्षिणं वृत्त्यै परं घ्नन्ति पशूनतद्विदः ॥ ८ ॥ स्त्रीकामें अतिकामुक । मैथुनापरतें नाहीं सुख । येणें भ्रमें काममूर्ख । स्त्रिया आवश्यक उपासिती ॥ ११ ॥ स्त्रीकामानें अगदी वेडावलेले, मैथुनापरतें सुखच नाहीं अशा भ्रमास्तव कामासक्तीनें मूर्ख बनलेले लोक निश्चयानें स्त्रियांचीच उपासना करतात ११. यापरी मंदबुध्दी । कैसे संवादती शब्दीं । मनुष्यजन्में हेचि सिध्दी । नाना भोगविधी भोगाव्या स्त्रिया ॥ १२ ॥ अशा प्रकारे मूर्ख लोक शब्दपांडित्यानें चातुर्य दाखवून सांगतात की, नाना प्रकारच्या भोगविधीनें स्त्रियांचा उपभोग घ्यावयाला मनुष्यजन्म हीच एक मोठी सिद्धि आहे १२. जें स्त्रीभोगीं सद्यसुख । तें त्यागविती ते अतिमूर्ख । वैराग्यमिसें लोक । ठकिले देख महामूढीं ॥ १३ ॥ स्त्रीसमागमांत हें प्रत्यक्ष सुख मिळते, ते सोडावयाला लावतात ते महामूर्ख होत. त्या महामूर्खांनी वैराग्याच्या मिषानें पुष्कळ लोकांना ठकविलें आहे १३. सांडूनि गृहभोग अंगना । जयां वैराग्यें उभ्दट भावना । ते निजकर्में दंडिले जाणा । नागवूनि वना दवडिले दैवें ॥ १४ ॥ घरांतील अनेक प्रकारचे भोगविलास आणि सोन्यासारखी स्त्री सोडून ज्यांना वैराग्याची उत्कट इच्छा होते, त्यांना त्यांचे कर्मच शिक्षा करतें; आणि दैवच त्यांना नागवून वनाला पाठवितें ! १४. काय गृहश्रमीं देव नसे । मग वना धांवताति पिसे । साचचि देव वनीं वसे । तरी कां मृग ससे न तरती व्याघ्र ॥ १५ ॥ गृहस्थाश्रमांत काय देव नाहीं ? म्हणून वेड्यासारखे वनांत धावतात ? देव जर खरोखर वनांतच असता, तर हरणे, ससे, आणि वाघ का तरून जात नाहीत ? १५. घालोनियां आसनें । देवो भेटता जरी ध्यानें । तरी बकाचीं पाळिंगणें । कां पां तत्क्षणें नुध्दरती ॥ १६ ॥ आसन घालून ध्यान केल्यानेंच जर देव भेटता, तर बगळ्यांचे कळप तत्क्षणी कां बरें उद्धरून जात नाहीत ? १६. एकान्त रहिवास विवरीं । तेथचि भेटता श्रीहरी । तरी न तरोनियां उंदिरीं । कां पां घरोघरीं चिंवताती ॥ १७ ॥ एकांतांत गुहेमध्यें राहून जर देव भेटता, तर बिळांत राहाणारे उंदीर तरून न जातां घरोघरी चिंवचिंव करीत कां फिरले असते ? १७. देवो सर्वज्ञ चोखडा । तेणें पशुपक्षियां केला जोडा । तोही लोकीं मानूनियां वेडा । त्यागाचा गाढा पाडिला मोळा ॥ १८ ॥ देव मोठा सर्वज्ञ आहे. त्यानें पशुपक्ष्यांचा जोडाजोडाच निर्माण करून ठेवला आहे; पण त्या परमेश्वरालाच लोकांनी वेडा ठरवून सर्वसंगपरित्यागाचा मोठा बडेजाव करून ठेवला आहे ! १८. 'आनंदा उपस्थ एकायतन' । हें देवाचें वेदवचन । तेंही न मानूनि अज्ञान । त्यागाचें संपूर्ण मांडिती बंड ॥ १९ ॥ 'आनंदाचे स्थान काय ते एक जननेंद्रिय' हे देवाचेंच वेदांतील वचन आहे, पण अज्ञानी लोक त्यालाही धाब्यावर बसवून त्यागाचंच मोठे बंड माजवितात १९. मैथुनीं परम सुख । देवेंचि रचिलें देख । तेंही त्यागोनियां मूर्ख । वीतरागें लोक संन्यासी होती ॥ १२० ॥ मैथुनामध्यें परमानंद हा देवानेंच करून ठेवलेला आहे; पण मूर्ख लोक त्याचाही त्याग करून वैराग्य घेऊन संन्यासी होतात ! १२०. जे जगामाजीं केवळ पिशी । ते स्वयें होती संन्यासी । देवें दंड देऊनि त्यांसी । लाविलें भिकेसी दारोदारीं ॥ २१ ॥ जगांत जे केवळ वेडे असतात, तेच स्वतः संन्यासी होतात. देवच त्यांना दंड देऊन दारोदार भीक मागावयाला लावतो २१. त्यागोनियां निजस्त्रियेसी । कर्मत्यागें होती संन्यासी । तो स्त्रीशाप बाधी त्यांसी । मागतां भिकेसी पोट न भरे ॥ २२ ॥ आपल्या स्त्रियेला टाकून देऊन कर्म सोडून जे संन्यासी होतात, त्यांना तो स्त्रीशापच बाधून पोटभर भिक्षाही मिळत नाहीं २२. हातावरी पावले दंड । खांडमिशा केलें मुंड । हिंडती भगवीं गुंडगुंड । हा स्त्रीशापें वितंड विटंबु केला ॥ २३ ॥ हा त्यांना हातावरचा दंड आहे. मिशा बोडून मुंडन करणे आणि भगवे गुंडाळून भटकावयाला लावणे, एवढी घोर विटंबना स्त्रीशापामुळें झाली २३. घेऊनियां दोहीं हातीं । उदंड गांडीसी लाविती माती । त्रिकाळ जळीं बुडविजती । ऐसी स्त्रीशापें ख्याती लाविली त्यांसी ॥ २४ ॥ दोहों हातांत खूपशी माती घेऊन ती ढुंगणाला लावतात, आणि तिन्ही त्रिकाळ पाण्यामध्यें बुड्या मारतात. अशीही शिक्षा त्यांना स्त्रीशापानेंच दिलेली आहे २४. लंगोटी लाविली गांडीसी । झोळीं लाविली हातासी । त्याहीवरी दंड देऊनि त्यासी । स्त्रीशापें संन्यासी लाविले भिके ॥ २५ ॥ ढुंगणाला लंगोटी लावून दिली; व हातांना झोळी लावून दिली; त्यावर आणखी दंड देऊन स्त्रीशापानें संन्याशांना भीक मागायला लावलें ! २५. स्त्रीसुखापरतें नाहीं सुख । स्त्रीत्यागापरता नाहीं दोख । हेंचि नेणोनियां मूर्ख । दंडिले अनेक वैराग्य त्यागें ॥ २६ ॥ स्त्रीसुखासारखें सुख नाहीं आणि स्त्रीत्यागासारखें पातक नाही; हेंच न समजल्यामुळें अनेक मूखांनी वैराग्यरूपानें सर्वसंगपरित्याग करून शासन करून घेतले आहे २६. स्त्रीसंगेंवीण विविध भोग । ते जाणावे अतिउद्वेग । निजभाग्यें जे सभाग्य साग्ड़ । ते स्त्रीयोगें भोग भोगिती नाना ॥ २७ ॥ एका स्त्रीसंगाशिवाय दुसरे कितीही सुखोपभोग असले तरी ते उद्वेगरूपच होत. सुदैवानें जे भाग्यसंपन्न असतात, तेच स्त्रीसंगतीनें अनेक प्रकारचे सुखविलास भोगतात २७. हेंचि देवाचें प्रसन्न होणें । जे सदा इष्ट भोग भोगणें । ते भोग जेणें त्यागणें । तेंचि क्षोभणें देवाचें ॥ २८ ॥ सदासर्वदा इच्छित भोग भोगावयास मिळणे हाच देवाचा प्रसाद होय. आणि ते भोग टाकणे हाच देवाचा क्षोभ होय २८. स्त्रियादि भोग त्यागिले रोकडे । पुढें निजमोक्ष हें वचन कुडें । यापरी भोळे लोक बापुडे । वैराग्यवादें फुडें नाडिले येथ ॥ २९ ॥ स्त्रियादि प्रत्यक्ष असलेले भोग टाकून देऊन पुढे आपल्याला मोक्ष मिळणार असे म्हणणेच मुळी खोटें आहे. वेदांतांतील वैराग्यवादानें भोळे बिचारे लोक अगदी नाडले गेले आहेत २९. ऐसाऐसिया अनुवादा । करिती परस्परें संवादा । म्हणती त्यागाची बुध्दि कदा । आम्हांसी गोविंदा देऊं नको ॥ १३० ॥ इत्यादि चर्चा परस्परांत करून म्हणतात की, "हे गोविंदा ! आम्हांला मात्र त्यागाची बुद्धि कधी देऊ नकोस १३०, त्याग करोनि भीक मागणें । यापरीस भलें मरणें । मुक्ति देखिली नाहीं कोणें । आपदा भोगणें जग देखे ॥ ३१ ॥ सर्वस्वाचा त्याग करून भीक मागावी, त्यापेक्षा मरण आलेले बरे; मुक्ति ही कोणीच पाहिलेली नाही, पण सध्यांची विपत्ति मात्र साऱ्या जगाच्या दृष्टीस पडते ३१. कोणासी तरी मुक्ती । कोठें तरी देखिजेती । तरी ते साच मानूं येती । मिथ्या वदंती वैराग्यत्यागा ॥ ३२ ॥ कोणाला तरी मुक्ति प्राप्त झालेली, कोठे तरी दृष्टीस पडली असती, तर ती खरी आहे असे मानतां येते; पण तसे मुळीच नाही; त्याअर्थी वैराग्यानें सर्वस्वाचा त्याग करावा म्हणतात तें व्यर्थ आहे" ३२. ऐशी सदा त्यागाची करूनि निंदा । भोग भोगावे म्हणती सदा । ऐसऐ शिया आशीर्वादा । देती सदा स्वाध्यायासी ॥ ३३ ॥ अशी त्यागाची निंदा करून सदासर्वदा भोग भोगावे असेंच ते म्हणतात; आणि अशा त-हेचेच आशीर्वाद परस्परांस देतात ३३. स्त्रीसुख परम मानून । स्वयें सदा होती स्त्रैण । मग जागृती सुषुप्ति स्वप्न । स्त्रियेचें ध्यान अहर्निशीं ॥ ३४ ॥ स्त्रीसुख हेच अत्यंत श्रेष्ट असे मानून स्वतः सदासर्वदा स्त्रैण बनून राहतात. मग काय ? जागृतींत, स्वप्नांत व सुषुप्तीत रात्रंदिवस स्त्रियेचेंच ध्यान ! ३४. नाहीं सग्दुरूचें भजन । नाहीं वृध्दासी पूजन । नाहीं अतिथींसी अन्न । स्त्रीआधीन सर्वस्वें ॥ ३५ ॥ सद्गुरूचे भजन नाहीं, वाडवडिलांचे पूजन नाहीं, अतिथीला अन्न नाहीं; सर्वस्वी स्त्रियेच्या आधीन ३५. स्त्रियेचें दुखवूं नेदी मन । कदा नुल्लंघी स्त्रियेचें वचन । नित्य स्त्रियेचें अनुसंधान । सभ्दावें उपासन स्त्रियेचें सदा ॥ ३६ ॥ स्त्रीचें मन दुखू द्यावयाचें नाहीं; स्त्रीचे वचन कधी उल्लंघन करावयाचें नाहीं; नित्य स्त्रीचंच अनुसंधान धरून वागावयाचें. सदासर्वदा सद्भावानें स्त्रीचीच आराधना करावयाची ३६. नाहीं कुळदेवता कुळवृत्ती । नाहीं पिता-माता-सग्दुरुभक्ति । संपत्ति वोपी स्त्रियेहातीं । आपण सर्वार्थीं तीअधीन वर्ते ॥ ३७ ॥ कुलदेवता नाहीं, कुलवृत्ति नाही, माता, पिता, किंवा सद्गुरु ह्यांची भक्ति नाही, पैसाअडका सारा बायकोच्या हातांत देऊन आपण सर्वस्वी तिच्या आधीन होऊन वागावयाचे ३७. ते स्त्रीभोग भोगावयासी । धनार्जन अर्जावयासी । यागु आरंभी जीविकेसी । केवळ दंभेंसीं उदरार्थ ॥ ३८ ॥ असे हे स्त्रीलंपट लोक स्त्रीभोग भोगण्यासाठी द्रव्यार्जन करावें म्हणून केवळ दंभाने, उदरंभरणाकरतांच यज्ञयागाला आरंभ करतात ३८. पूर्वश्लोकार्ध - यजन्त्यसृष्टान्नविधानदक्षिणं वृत्त्यै परं घ्नन्ति पशूनतद्विदः ॥ यागें व्हावी सर्वसिध्दि । हेही नाहीं दृढ बुध्दि । रोकडिये जीविकावधि । उपाय त्रिशुध्दी हाचि केला ॥ ३९ ॥ यज्ञानें आपणास सर्व प्रकारची सिद्धि मिळावी असाही त्या दांभिकाच्या मनांत हेतु नसतो. फक्त तात्कालिक निर्वाहाचे साधन व्हावे, एवढीच त्यामध्यें युक्ति योजलेली असते ३९. यज्ञदीक्षेची प्रतिष्ठा । तेणें पूज्य होईन वरिष्ठां । अग्रपूजा माझा वांटा । ऐशिया उत्कंठा आदरी यागु ॥ १४० ॥ यज्ञाची दीक्षा घेतली-यज्ञकंकण हातांत बांधलें-की माझी प्रतिष्ठा वाढेल, मी मोठमोठ्या लोकांनाहीं पूज्य होईन, अग्रपूजेचा मान माझ्या वाट्याला येईल, अशा उत्कट हेतूनेंच तो यागाला आरंभ करतो १४०. ऐशिया नाना विवंचना । आधीं संकल्पूनि मना । मग प्रवर्ते यागयजना । जोडावया धना कृतनिश्र्चयो ॥ ४१ ॥ निर्वाहाचे व प्रतिष्ठेचे अनेक विचार मनामध्यें आधीच योजून ठेवतो, आणि मग यज्ञयाग सुरू करतो. पण ह्या कामांत खोर्यानें पैसा ओढीन हाच त्याचा कृतनिश्चय असतो ४१. न पाहे विधिविधाना । नाहीं आदरु मंत्रोच्चारणा । न करी अन्नसंपादना । कोरडे कणां हवन मांडी ॥ ४२ ॥ विधिविधानाकडे त्याची नजर नसते. शुद्ध मंत्रोच्चाराबद्दल आदर नसतो. अन्नही न शिजवितां कोरड्या धान्यानेंच तो हवन करतो ४२. मी यज्ञ करितों अंगें । ऐसें जगापासीं सांगे । आणि तेणें यागयोगें । चालवी प्रसंगें जीविकायोगु ॥ ४३ ॥ मी स्वतः यज्ञ करतो आहे असे साऱ्या जगाला सांगत सुटतो आणि त्या यज्ञाच्या निमित्तानें आपला योगक्षेम तो चालवितो ४३. स्वयें नेणती विधिविधाना । आणि न पुसती सज्ञाना । परी पशूंचिया हनना । प्रवर्तती जाणा शठ नष्ट दंभें ॥ ४४ ॥ स्वतःला विधिविधान माहीत नसावयाचे आणि जाणत्यालाही विचारावयाचें नाहीं ! पण असले शठ, नष्ट, ढोंगी लोक पशूला मारावयाला मात्र उद्युक्त होतात ४४. मग तेथींचा पुरोडाश । सेविती यथासावकाश । आम्ही पवित्र झालों निर्दोष । ऐसाही उल्हास लागती करूं ॥ ४५ ॥ त्यांतील पुरोडाश-म्हणजे त्या पशूच्या मांसाचा हवनद्रव्यशेष खुशाल ग्रहण करतात; आणि आम्ही पवित्र झालों, निर्दोष झालों, अशीच घमेंड मिरवितात ४५. गौणता आवाहनविसर्जना । तेथ कैंची पूजा दक्षिणा । सत्पात्राची अवगणना । करिती हेळणा ज्ञानगर्वें ॥ ४६ ॥ देवतेच्या आवाहनविसर्जनालाच जिकडे ठावठिकाण नाहीं, तिकडे पूजा कशाची आणि दक्षिणा कशाची ? आपल्या ज्ञानाच्या गर्वानें सत्पात्राचा अनादर व अवहेलना मात्र करतात ! ४६. केवळ जीविकेच्या आशा । करूं लागती पशुहिंसा । आम्ही याज्ञिक या आवेशा । पिटिती ठसा तिहीं लोकीं ॥ ४७ ॥ केवळ उपजीविकेकरतांच पशूची हिंसा करूं लागतात, आणि आम्ही याज्ञिक-यज्ञकर्ते-असा त्रैलोक्यामध्यें टेंभा मिरवितात ४७. केवळ जीविकेचिया दुराशा । अविधी करिती पशुहिंसा । मज दोष होईल ऐसा । कंटाळा मानसा कदा नुपजे ॥ ४८ ॥ फक्त उपजीविकेच्या दुराशेनें अविधीनें हिंसा करतात. ह्यामुळें मला पातक लागेल, अशी त्यांच्या मनाला कधी खंतीही वाटत नाहीं ! ४८. श्रिया विभूत्याभिजनेन विद्यया त्यागेन रूपेण बलेन कर्मणा । जातस्मयेनान्धधियः सहेश्वरान् सतोऽवमन्यन्ति हरिप्रियान् खलाः ॥ ९ ॥ यापरी वर्ततां स्थिती । त्याहीवरी झालिया संपत्ती । तैं गर्वाचा भद्रजाती । तैशिया उन्नतीं डुलों लागे ॥ ४९ ॥ असा क्रम चालू असतो. त्यावरही आणखी संपत्ति मिळाली, तर मग विचारूच नका, मस्ती आलेल्या हत्तीसारखा गर्वानें तो डुलूच लागतो ४९. कां लेंडिये आला लोंढा । वाहवी वाळलिया लेंडा । कां मर्कटाचिया तोंडा । मदिरेचा भांडा सांपडे जैसा ॥ १५० ॥ किंवा ओढ्याला लोंढा आला म्हणजे त्यानें जशी वाळलेली लेंडके वाहून न्यावी, किंवा माकडाच्या तोंडाला जसें दारूचे भांडे लागावें १५०, तैसा मी एकु ज्ञाता फुडा । म्हणौनि नाचे तडातडां । सज्ञान आम्हांपुढां । कवण बापुडा आन आहे ॥ ५१ ॥ त्याप्रमाणें खरा ज्ञाता काय तो एक मी, असे म्हणून तडातड नाचावयास लागतो. आमच्यापुढे ज्ञानी असा बिचारा दुसरा आहे तरी कोण ? ५१. ऐशियाहीवरी अदृष्टता । रत्नें मोतिलगा वस्तुजाता । गजवाजिनृयानप्राप्तता । तेणें गर्वें इंद्रमाथां मोचे फेडी ॥ ५२ ॥ इतक्याही उप्पर दैवयोगानें सोनें, मोती, रत्नें असल्या मौल्यवान् वस्तु भांडारखान्यांत भरल्या; आणि हत्ती, घोडे, मेणे पालख्या दारांत झुलू लागल्या तर मग काय ? गर्विष्ठपणानें इंद्राच्या मस्तकावरही लाथा मारण्यास तयार होतो ५२. यज्ञीं यागस्वाहाकारीं । इंद्र आमुची आशा करी । त्याची आम्हांहूनि थोरी । कैशापरी मानावी ॥ ५३ ॥ "यज्ञयागामध्यें आपल्याला स्वाहाकार मिळावा म्हणून इंद्र आमचीच आशा करीत राहतो, तर मग तो आमच्यापेक्षा थोर तरी काय म्हणून मानावा ?" ५३. मग शिष्य-सुहृत्-सज्जनीं । परिवारिल्या सेवकजनीं । मजसमान त्रिभुवनीं । समर्थ कोणी असेना ॥ ५४ ॥ ह्यानंतर शिष्य लोक, आप्त इष्ट व इतर, सज्जन आणि सेवकजन यांचा सभोंवतीं गराडा पडला म्हणजे माझ्यासारखा त्रिभुवनांत कोणी समर्थ नाही, असे तो मानूं लागतो ५४. जैशी कां कांटीभोंवतीं हरळी । तैशी शिष्यांची मांदियाळी । ते महिमेच्या गर्वमेळीं । मानी पातांतळीं ध्रुवमंडळ ॥ ५५ ॥ काटेरी झाडाच्या सभोवार जशी हरळी म्हणजे गवत वेष्टून राहते, त्याप्रमाणें आपल्याभोंवतीं शिष्यांचा गराडा पाहिला म्हणजे त्या आढ्यतेच्या गर्वात ध्रुवमंडळही आपल्या पायाखालीच आहे असें तो समजतो ५५. जैसें विंचुवा विष थोडें । परी प्रबळ वेदनेसी चढे । तेवीं विद्या थोडी परी गाढें । गर्वाचें फुडें अतिभरितें ॥ ५६ ॥ विंचवाला विष थोडेच असते, पण त्याच्या वेदना भयंकर असतात; त्याप्रमाणें ह्याला विद्या थोडी, पण गर्व किती अगदी भरून उतूं येतो ! ५६. तो अज्ञानामाजीं सर्वज्ञता । मिरवी आपुली योग्यता । जेवीं अंधारीं खद्योता । सतेजता झगमगी ॥ ५७ ॥ अंधारांत काजवा जसा आपल्या तेजाची चमक दाखवितो, तसा अज्ञानी लोकांत तो आपली सर्वज्ञता आणि प्रतिष्ठा मिरवू लागतो ५७. अल्पज्ञाता विद्येसाठीं । वाचस्पती नाणी दृष्टीं । जेवीं मुंगी पांखासाठीं । गरुडाचे पृष्ठीं पाय देवों पाहे ॥ ५८ ॥ पंख फुटलेली मुंगी ज्याप्रमाणें गरुडाच्या मस्तकावर पाय देऊ पहाते, त्याप्रमाणें हा अल्पज्ञ आपल्या अल्पशा विद्येच्या गर्वांत बृहस्पतीलासुद्धा जुमानीत नाहीं ५८. निखळ तांबियाचें नाणें । देवों रिघे दामोक्यायेसणें । तेणें आपुलेनि दातेपणें । मानी ठेंगणें बळीतें ॥ ५९ ॥ निव्वळ तांब्याचे पै-पैशाएवढे लहान नाणे दान देऊन औदार्यामध्यें बळीलासुद्धा आपल्यापुढे तो कमी मानतो ५९. कर्ण दातृत्वें मानिजे फुडा । तोही न मांडे आम्हांपुढां । प्रत्यहीं भारसुवर्णहुडा । उपजे तेणें गाढा दाता कर्णु ॥ १६० ॥ तो म्हणतो-दातृत्वामध्यें कर्ण हा मोठा समजतात, पण तोसुद्धा आमच्यापुढे टिकावयाचा नाही. कारण कर्णाला दररोज एक 'भार' म्ह. ८००० तोळे सुवर्णाचा ढीग आयता मिळत असे, म्हणून त्याच्या दातृत्वाचा एवढा बडेजाव ? १६०. आम्ही निजार्जितें वित्तें । दान देवों सत्पात्रातें । मा दातृत्वें कर्णातें । विशेषु येथें तो कायी ॥ ६१ ॥ आम्ही तर स्वकष्टार्जित द्रव्य संपादन करून ते सत्पात्राला दान देतो, मग आमच्यापेक्षा कर्णाच्या दातृत्वांत विशेष ते काय ? ६१. सदा अपकारुचि जोडे । त्यासीही अल्प उपकारु घडे । इतुकियासठीं न उकल पडे । सर्वस्व रोकडें बुडवी-सदा ॥ ६२ ॥ सर्वदा अपकारच घडावयाचा; त्याच्या हातून कधी थोडासा उपकारही घडत असतो, पण तेवढ्यानें त्याची समजूत भलती होऊन (आत्मस्तुतीने) तो पुण्यसर्वस्व गमावून बसतो ६२. एवं अल्प दानासाठीं । दातृत्वाचे त्रिकुटीं । मेघाच्यापरी अतिउभ्दटीं । स्वमुखें उठी गर्जतु ॥ ६३ ॥ अशा रीतीनें एवढ्याशा दानानें दातृत्वाची शेखी मिरवून आपल्याच तोंडानें त्याबद्दल मेघाप्रमाणें गर्जना करीत सुटतो ६३. बरवेपणाचेनि पांगें । मदनासी विटावों लागे । सौंद्र्य माझेनि अंगें । दुजें मजजोगें असेना ॥ ६४ ॥ आपल्या सौंदर्याच्या अभिमानानें तो मदनालासुद्धा वेडावू लागतो. सौंदर्य काय ते एक माझ्याच अंगांत आहे; माझी बरोबरी करणारे दुसरें कोणीच नाहीं असे तो म्हणतो ६४. कीं कावळा बरवेपणासाठीं । राजहंसा नाणी दिठीं । कां आस्वली मानी पोटीं । मीही गोमटी सीतेपरीस ॥ ६५ ॥ कावळा आपल्या सौंदर्यापुढे राजहंसालासुद्धा तुच्छ लेखतो; किंवा आस्वली आपल्या मनांत म्हणते की, मी सीतेपेक्षाही सुंदर ! ६५. तेवीं बरवेपणाचा जाण । थोर चढे देहाभिमान । जेवीं देखोनि हिरवें रान । म्हैसा संपूर्ण उन्मादे ॥ ६६ ॥ अथवा हिरवें रान पाहिलें म्हणजे रेडा जसा उन्माद पावतो, त्याप्रमाणें आपल्या सौंदर्याचा त्याला अभिमान चढून ताठा भरलेला असतो ६६. यावरी कांहीं एक पराक्रम । केलिया न मानी तीनही राम । जेवीं गोग्रहणीं संग्राम । शौर्यधर्म उत्तराचा ॥ ६७ ॥ इतक्या उपर त्याच्या हातून जर का एकादा पराक्रम घडला, तर मग काय विचारतां ? श्रीराम, परशुराम आणि बलराम, हे तिन्ही राम आपल्यापुढे कांहींच नाहीत असे म्हणतो ! जणों काय गोग्रहणांतील युद्धांत उत्तरानें केलेले शौर्याचे प्रदर्शन ! ६७ कां अंगींचेनि माजें । रानसोरु न मानी दुजें । तैसा बळाचेनि फुंजें । स्वयें गर्जे मुसमुसितु ॥ ६८ ॥ किंवा अंगच्या बलोन्मादानें रानडुक्कर जसा दुसऱ्या कोणालाही जुमानीत नाही, त्याप्रमाणें बलगर्वानें बडबडत राहून सदा मुसमुसत असतो ६८. ते आधींच म्हणविती सज्ञान । त्याहीवरी 'याज्ञिक' हें महिमान । तें याज्ञिक कर्माचरण । दाविती आपण लोकांप्रती ॥ ६९ ॥ असे लोक आधीं आपणच आपल्याला ज्ञाते म्हणवीत असतात; त्यांत आणखी 'याज्ञिक' म्हणून प्रसिद्ध होतात. त्यामुळें स्वतः यज्ञकर्म करून लोकांना दिपवून सोडतात ६९. आलिया धनिक जनांप्रती । आपुली स्तविती कर्मस्थिती । मग कर्ममुद्रा नानायुक्ती । स्वयें दाविती लौकिका ॥ १७० ॥ भेटायला आलेल्या श्रीमान् लोकांपाशी आपल्या कर्मस्थितीची बढाई सांगतात; आणि लौकिक वाढण्यासाठी अनेक युक्तिप्रयुक्तींनी कर्माच्या मुद्रा म्ह. प्रकार लोकांना दाखवितात १७०. ऐशियाही कर्माचारा । ज्ञातृत्वाचा गर्व पुरा । जेवीं दिवाभीतु अंधारा । निघे बाहेरा घुंघातु ॥ ७१ ॥ अशा मिथ्या कर्माचारांतही ज्ञातृत्वाचा पूर्ण गर्व भरलेला असतो. अंधारांत दिवाभीत म्ह. घुबड ज्याप्रमाणें 'धूं धूं' करीत बाहेर पडतें, (त्याप्रमाणें अज्ञजनांत हे आत्मस्तुतीनें घुमत बसतात) ७१. अजांचें लेंडोरें पेटे । तेथ ज्योतिज्वाळा कदा नुमटे । परी धुरकटलें धुपधुपी मोठें । धुवें थिकटे दिग्मंडळ ॥ ७२ ॥ शेळीच्या लेंड्या पेटल्या, तर ज्वाळा अशी कधीच निघत नाही, पण धूप घातल्याप्रमाणें जिकडे तिकडे धूरच धूर होऊन दाही दिशा धुंद होऊन जातात ७२. यापरी नाना दंभोपाधीं । अतिगर्वाच्या उन्मादीं । अंध जाहली सद्बुपध्दी । तो साधूतें निंदी हरिहरांसहित ॥ ७३ ॥ ह्याप्रमाणें अनेक प्रकारच्या दांभिक कृतीनें आणि गर्वाच्या प्रचंड उन्मादानें त्यांची सद्बुद्धि आंधळी होऊन ती साधूंचीच नव्हे तर त्याबरोबर हरिहरांचीसुद्धा निंदा करीत सुटते ! ७३. जेवीं दाटलेनि काविळें । दृष्टीतें करी पिंवळें । मग देखों लागे सकळें । आचूडमूळें पीतवर्ण ॥ ७४ ॥ ज्याप्रमाणें कावीळ झाली म्हणजे ती दृष्टीच पिवळी करून सोडते, मग नखशिखान्त सगळे पिवळेच दिसू लागते ७४; तेवीं निंदोपाधी अतिगर्वीं । मंद जाहली प्रज्ञाछवी । मग निर्दुष्टीं दोष लावी । शुध्दातें भावी अतिमलिन ॥ ७५ ॥ त्याप्रमाणें निंदावृत्तीनें व गर्वातिशयानें त्यांच्या बुद्धीचे तेज मंद होऊन जाते, व त्यामुळें ते निर्दोष्यालाही दोष देऊ लागतात आणि निष्पाप असतात त्यांना पापी समजतात ७५. जो योगियांच्या मुगुटीं । ज्यातें म्हणती धूर्जटी । त्याची पाहतां राहाटी । दिसे शेवटीं अतिमंद ॥ ७६ ॥ (ते म्हणतात)-जो सर्व योग्यांचा मुकुटमणि, ज्याला 'धूर्जटी' (म्हणजे शंकर) म्हणतात, त्याचे वर्तन पाहिले तरीसुद्धा शेवटीं मलीनच दिसते ७६. रागें उमा घेतली आगी । यालागीं याज्ञिकाचें शिर भंगी । सकामु तरी मोहिनीलागीं । नग्न लागवेगीं पाठीं लागे ॥ ७७ ॥ रागामुळें उमेनें (पार्वतीने) अग्नीत उडी टाकली म्हणून त्यानें याज्ञिकाचा (दक्षप्रजापतीचा) शिरच्छेद केला, आणखी तो कामांध तर इतका की,मोहिनीसाठी नागवा होऊन तिच्या पाठीमागें घावत सुटला ! ७७. विष्णु सदाचा कपटी । कांहीं न देखों शुध्द दृष्टीं । वृंदा पतिव्रता गोमटी । तेणें केली शेवटीं व्यभिचारिणी ॥ ७८ ॥ विष्णु तर नित्याचाच कपटी, त्याच्यांत चांगले असें कांहींच दिसत नाही. वृंदा बिचारी केवढी पतिव्रता ! तिलासुद्धा शेवटी त्यानें व्यभिचारिणी करून सोडली ! ७८. जेथ विष्णु व्यभिचारवासी । ते वृंदेच्या वृंदावनापाशीं । जट्याळ गांठ्याळ मिळती राशी । केवीं साधुत्व त्यांसी मानूं आम्ही ॥ ७९ ॥ असा व्यभिचारी विष्णु, ज्या वृंदेच्या वृंदावनामध्यें वास करतो, त्या वनांत जटादाढीवाले लोक जमतात त्यांना तरी आम्ही साधु कसें मानावे ? ७९. साधु मानूं सनत्कुमार । त्यांसीही वैकुंठीं क्रोध थोर । शब्दासाठीं हरिकिंकर । जयविजय वीर शापिले ॥ १८० ॥ सनत्कुमारांना साधु म्हणावें, तर त्यांनासुद्धा वैकुंठांत मोठा क्रोध आला व एक दोन अधिक उणे शब्द बोलल्याबद्दल श्रीहरीचे सेवक जे जयविजय वीर, त्यांना त्यांनी शापून टाकलें ! १८०. श्रेष्ठ मानूं चतुरानन । तोही निलागचि हीन । उमा नोवरी देखोन । म्हणतां 'सावधान' वीर्य द्रवलें ॥ ८१ ॥ आतां ब्रह्मदेवाला श्रेष्ठ म्हणावें, तर तोही हीन व निर्लज्ज होय. शंकराच्या लग्नांत पार्वती नवरीला पाहून 'सावधान' म्हणतांच त्याचे वीर्यस्खलन झाले ! ८१. नारद ब्रह्मचारी निजांगें । तोही कृष्णदारा स्वयें मागे । तो कृष्णें ठकविला तत्प्रसंगें । साठी पुत्र वेगें स्त्रानीं व्याला ॥ ८२ ॥ नारद मोठा ब्रह्मचारी, पण त्यानेही स्वतः कृष्णाची स्त्री मागितली. त्या वेळी कृष्णानेही त्याला चांगलेच फसविलें. तो स्नान करीत असतां (नारदाची नारदी बनून) साठ पुत्र व्याला ! ८२. ज्यातें म्हणती सत्य 'धर्म' । तोही केवळ अधर्म । गोत्रवधाचा संभ्रम । हा पूर्ण अधर्म धर्मासी ॥ ८३ ॥ ज्या युधिष्ठिराला मूर्तिमंत 'धर्म' असे म्हणतात, तोही निखालस अधर्मच होय. कारण गोत्रजांच्या हत्येचा प्रयत्न त्यानें केला, हा पूर्ण अधर्म त्या धर्मानें केला ८३. व्यास तरी तो जारपुत्र । तेणेंचि कर्में पराशर । द्वेषिया वसिष्ठ-विश्र्वमित्र । अतिमत्सर परस्परें ॥ ८४ ॥ व्यास तर जारिणीचा पुत्र, आणि त्याच कर्मामुळें पराशरही हीन ठरतो. वसिष्ठ आणि विश्वामित्र ह्या परस्परांतील द्वेष आणि मत्सर तर काही पुसूच नये ८४. साधु म्हणों दुर्वास ऋषी । तो छळूं गेला अंबरीषासी । पितृद्रोह प्रल्हादासी । साधुत्व त्यासी केवीं मानूं ॥ ८५ ॥ दुर्वास ऋषीला साधु म्हणावें, तर तो अंबरीषाला छळावयाला गेला होता. प्रल्हादानें उघड उघड पितृद्रोह केला, तेव्हां त्याला तरी साधु कसे मानावें ? ८५. एवं वाखाणिले पुराणीं । तेही साचे न मानती मनीं । मा आतांचे वर्तमानीं । साधु कोणी असेना ॥ ८६ ॥ ह्याप्रमाणें पुराणांतरी ज्यांची वाखाणणी केलेली आहे, त्यांनासुद्धा मनांतून ते साधु मानीत नाहीत, मग वर्तमानकाळांत साधु कोणीच नाहीत, असे त्यांना वाटले तर त्यांत काय आश्चर्य ? ८६. ऐकोनियां अचाट गोष्टी । येरें धांवती येरांपाठीं । एक करिती तोंडपिटी । अतिचावटी उदरार्थ ॥ ८७ ॥ (त्यांचे म्हणणे) "काहीं तरी अद्भुत गोष्टी ऐकून आंधळेपणानें एकाच्या मागे एक धावत असतात, कोणी तोंडाची पाटिलकी करून पोटासाठी पाहिजे ते बरळतात ! ८७; एक मुद्रावंत आसनीं । एक बसती बकध्यानी । परी सत्य माने मनीं । ऐसा साधु कोणी असेना ॥ ८८ ॥ तर कोणी आसनावर बसून मुद्रा लावतात; कोणी बकासारखें ध्यानही धरून बसतात; परंतु खरोखर मनाला पटेल असा एकही साधु कोणी नाहीं" ८८. ऐशी आपुलियाचि युक्तीं । साक्षेपें साधूंतें निंदिती । साधु असती हे वस्ती । अणुमात्र चित्तीं असेना ॥ ८९ ॥ असे आपआपल्या परीनें जाणून बुजून ते साधूची निंदा करतात. जगांत कोणी साधु आहेत ही गोष्ट त्यांच्या मनांत वसतच नाहीं ८९. जे जे हरीचे पढियंते । ते ते नावडती तयांतें । जेवीं दाखवितां दर्पणातें । क्षोभे निजचित्तें निर्नासिक ॥ १९० ॥ नकट्यापुढे आरसा नेला म्हणजे त्याची पायाची आग मस्तकास जाते, त्याप्रमाणें (साधूंचे नांव काढतांच ह्यांचे पित्त खवळतें) हरीचे जे अत्यंत आवडते, ते ह्यांचे अगदी नावडते होतात ! १९०. ज्या ईश्र्वराचेनि वर्तिजती । तो ईश्र्वरु आहे हें न मानिती । तो ईश्र्वर आहे कोणे स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन राया ॥ ९१ ॥ ज्या ईश्वराच्या सत्तेनें हे वागत असत, तो ईश्वर आहे हे ते कबूलच करीत नाहीत. हे राजा ! असा तो ईश्वर असतो तरी कसा, हे तुला सांगतों ऐक ९१. सर्वेषु शश्वत्तनुभृत्स्ववस्थितं यथा खमात्मानमभीष्टमीश्वरम् । वेदोपगीतं च न शृण्वतेऽबुधा मनोरथानां प्रवदन्ति वार्तया ॥ १० ॥ जो सर्व भूतांचे ठायीं । निरंतर अंतर नाहीं । समसाम्यें सर्वदा पाहीं । उणापुरा कदाही कल्पांतीं नव्हे ॥ ९२ ॥ जो सर्व प्राणिमात्रांमध्यें भेदभावरहित सदासर्वदा अखंड भरलेला असतो; जो सर्वांत समसमानपणानें राहतो; कधी कल्पांतीही अधिक उणा होत नाहीं ९२. जो सर्वांमाजीं असे सर्वदा । परी सर्वपणा नातळे कदा । जेवीं पद्मपत्र जलस्पंदा । अलिप्त बुब्दुदा असोनि संगें ॥ ९३ ॥ जो सर्वामध्यें सर्वकाळ राहतो, पण सर्वपणा त्याला कधीच शिवत नाहीं; ज्याप्रमाणें कमलपत्र जलांत असूनही ते त्या जलस्पर्शापासून निखालस अलिप्त असतें . ९३; तेवीं असोनि सकळ जनीं । घसवटेना जनघसणीं । नभ जैसें अलिप्तपणीं । नरचूडामणी सबाह्य ॥ ९४ ॥ त्याप्रमाणें सर्व लोकांमध्यें असूनही लोकव्यवहाराचा संबंध त्याला नसतो; हे राजेश्वरा ! आकाश ज्याप्रमाणें सर्व पदार्थाला अंतर्बाह्य व्यापलेले असूनही अलिप्त असते ९४, तैसें अलिप्तपण न मोडे । परी रची अनंत ब्रह्मांडें । तें ब्रह्मांड अंडें प्रचंडें । वागवी उदंडें अकर्तात्मयोगें ॥ ९५ ॥ त्याप्रमाणें अलिप्तपणा न मोडतांच तो अनंत ब्रह्मांडांची रचना करतो; आणि अकर्तेपणानेंच तसली ती प्रचंड आणि अनंत ब्रह्मांडे आपल्या स्वरूपांत वागवितो ९५. यालागीं तो 'अंतर्यामी' । अभिधान बोलिजे नित्य निगमीं । जो सर्वांच्या हृद्य ग्रामीं । चेतनानुक्रमीं लक्षिजे ॥ ९६ ॥ म्हणूनच त्याला वेदामध्यें नेहमी 'अंतर्यामी' ह्या नांवानें उल्लेखतात. तोच सर्वांच्या हृदयमंदिरांत असलेल्या चेतनत्वाच्या योगें ओळखला जातो ९६. त्या ईश्र्वरातें नित्य ध्यातां । कां आवडीं नाम मुखीं गातां । तरी अभीष्ट मनोरथां । होय वर्षता अखंडधारीं ॥ ९७ ॥ अशा त्या ईश्वराचे निरंतर ध्यान केलें, आवड धरून मुखानें नाम घेतले, तर तो अभीष्ट मनोरथपूर्वीचा अखंड वर्षाव करतो ९७. त्या ईश्र्वराच्या गातां गोष्टी । सर्व अनिष्टां होय तुटी । जो देखतांचि दृष्टीं । स्वानंदसृष्टि तुष्टला वर्षे ॥ ९८ ॥ त्या ईश्वराच्या कथा गाइल्या असतां सर्व संकटांचा नाश होतो. जो दृष्टीनें पाहिला असतां प्रसन्न होऊन स्वानंदसृष्टीचा वर्षाव करतो ९८. एवं सुखदाता तोचि शास्ता । जो कां अंतकाचा नियंता । अकाळें काळही सत्ता । ज्या भेणें सर्वथा करूं न शके ॥ ९९ ॥ तात्पर्य, सुखदाताही तोच आणि शास्ताही तोच. काळाचाही नियंता तोच, त्याच्या भयानें भलत्याच वेळी काळही आपली सत्ता चालवू शकत नाहीं ९९. श्र्वासोच्छ्वातसांचिया परिचारा । ज्या भेणें नेमस्त वाजे वारा । ज्याचेनि धाकें धरा । न विरवे सागरा जळीं असतां ॥ २०० ॥ ज्याच्या भयानें प्राण्यांचे श्वासोच्छ्वास नियमित चालतात, ज्याच्या भयानें वायूसुद्धा आकाशांत अगदी बेतानें व प्रमाणांत वाहतो, ज्याच्या धाकानें पृथ्वी पाण्यामध्यें असतांही समुद्राला विरवितां येत नाहीं २००; ज्याचे आज्ञेवरी जाण । सूर्य चालवी दिनमान । ज्याचे पुरातन आज्ञेभेण । समुद्र आपण रेखा नुल्लंघी ॥ १ ॥ ज्याच्या आज्ञेवरून सूर्य हा दिनमान योग्य रीतीनें चालवितो आणि ज्याच्या पुरातन आज्ञेच्या धाकानें समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करीत नाहीं १; ज्यातें सदा गायिजे वेदीं । जो वाखाणिजे उपनिषदीं । ज्याची पवित्र कीर्ति दुर्बुध्दी । स्वयें त्रिशुध्दी नायकती कदा ॥ २ ॥ वेद ज्याचे सर्वदा गायन करतात, उपनिषदें ज्याचे वर्णन करतात, त्याची पवित्र कीर्ति दुष्टबुद्धि लोक कानांनी कधी ऐकतही नाहीत ! २. ज्याचें नाम स्मरतां जाण । सकळ दोषां निर्दळण । ज्याचे कृतांत वंदी चरण । जन्ममरण विभांडी ॥ ३ ॥ ज्याच्या नामाचे केवळ स्मरण करतांच सर्व पातकांचा संहार होतो; यमसुद्धा ज्याच्या पायीं लागतो; आणि जो भक्तांचे जन्ममरण निवारण करतो ३, ज्याची कथा कर्णपुटीं । पडतां विकल्पांचिया कोटी । निर्दळूनि उठाउठी । पाडी मिठी परब्रह्मीं ॥ ४ ॥ ज्याचें चरित्र कर्णपुटांत पडल्याबरोबर विकल्पांच्या कोटीच्या कोटि रसातळास जाऊन हां हां म्हणतां परब्रह्माशी ऐक्य होतें ४, यापरी जो पवित्र मूर्ती । ज्यालागीं वेद सदा वर्णिती । अभाग्य नायकती त्याची कीर्ती । वार्ता करिती मनोरथांच्या ॥ ५ ॥ अशा प्रकारे जो पवित्रतेची केवळ मूर्ति, ज्याचे वेदही सर्व काळ स्तवन करतात, त्याची कीर्ति हे अभागी लोक श्रवण न करतां केवळ मनोरथाच्या गोष्टी बोलत बसतात ! ५. अस्वल आपुलिया गुणगुणा । नायके वाजतिया निशाणा । तेवीं नायकोनि हरीच्या गुणा । विषयसंभाषणा आदरें वदती ॥ ६ ॥ अस्वल आपल्या गुरगुरण्यामध्येंच दंग असते, तेव्हां त्याला रणभेरीही ऐकू येत नाही; त्याप्रमाणें हरीचे गुणानुवाद न ऐकतां, मोठ्या आवडीनें विषयाच्याच गप्पा मारीत बसतात ६. यालागीं ते अतिमंद । अविनीत सदा स्तब्ध । विषयांलागीं विषयांध । अतिलुब्ध लोलुप्यें ॥ ७ ॥ म्हणूनच ते अति मूर्ख, उद्धट व सर्वकाळ सुस्त व विषयासाठी विषयांध होऊन अत्यंत लुब्ध झालेले असतात ७. लोके व्यवायामिषमद्यसेवा नित्या हि जन्तोर्न हि तत्र चोदना । व्यवस्थितिस्तेषु विवाहयज्ञ सुराग्रहैरासु निवृत्तिरिष्टा ॥ ११ ॥ वेदें न करितां प्रेरणा । विषयांवरी सहज वासना । स्वभावें सकळ जनां । सदा जाण सर्वांसी ॥ ८ ॥ वेदांनी प्रेरणा केली नसतांही सर्व लोकांची सदासर्वकाळ विषयावर वासना सहजच असते ८. मांससेवना मद्यपाना । मिथुनीभूत मैथुना । ये अर्थीं सर्व जनां । तीव्र वासना सर्वदा ॥ ९ ॥ मांसभक्षण, मद्यपान व स्त्रीसंग यांविषयी लोकांना सदासर्वकाळ तीव्र वासना असतेच ९. तेथें सेव्यासेव्यपरवडी । विवंचना कोण निवडी । लागली विषायांची गोडी । ते अनर्थकोडी करितील ॥ २१० ॥ त्यांत सेवन करण्यास योग्य कोणते व अयोग्य कोणते, ह्याचा विचार करीत बसणार कोण ? विषयांची एकदां गोडी अथवा चटक लागली, की ते लोक अनर्थ करावयाला मागे युढे पहाणार नाहीत २१०. आगी लागलिया कापुसा । विझवितां न विझे जैसा । तेवीं विषयवंता मानसा । विवेकु सहसा उपजेना ॥ ११ ॥ कापसाला आग लागली म्हणजे ती जशी विझतां विझत नाही, त्याप्रमाणें विषयलंपट पुरुषाच्या मनांत सहसा विवेक उत्पन्न होत नाहीं ११. झाल्या लोलिंगत बडिशा । निजमरण विसरे मासा । कां मुठी चणियांच्या आशा । नळीमाजीं । आपैसा वानरू अडके ॥ १२ ॥ गळाच्या आमिषाला मासा भुलला की तो आपल्या मरणाला विसरतो; किंवा मूठभर हरभऱ्याच्या आशेनें वानर जसा आपोआप नळीमध्यें अडकतो १२; दूध मिळालिया मांजर । न म्हणे द्विजअंत्यजघर । तेवीं विषयउरन्मत्त नर । न करिती विचार सेव्यासेव्य ॥ १३ ॥ किंवा दूध मिळालें म्हणजे हे घर ब्राह्मणाचे आहे की अंत्यजाचें ह्याचा विचार जसे मांजर करीत नसते, त्याप्रमाणें विषयानें उन्मत्त झालेले पुरुषही सेव्यासेव्याचा विचार करीत नसतात ! १३. कां खवळल्या विषयचाडें । योनिसंकरु घडेल पुढें । यालागी वेदें चोखडे । वर्णाश्रमपाडें विभाग केले ॥ १४ ॥ अशा प्रकारच्या तीव्र विषयवासनेनें लोक तुफान झाले असतां पुढे वर्णसंकर होईल, म्हणून वेदानें वर्ण व आश्रम ह्याप्रकारे विभाग करून ठेवले १४. जैसें अफाट पृथ्वीचें अंग । तेथें सप्तद्वीपें करूनि विभाग । मग भिन्नाधिकारें चांग । धरा साग्ड़ आक्रमिली ॥ १५ ॥ पृथ्वीचा पृष्ठभाग अफाट असल्यामुळें तिचे सप्तद्वीपात्मक विभाग करून त्या निरनिराळ्या विभागावर निरनिराळे अधिकारी नेमून तिची व्यवस्था केली १५. कां अनावृत मेघजळा । धरणें धरूनि घालिजे तळां । मग नेमेंचि ढाळेढाळां । पिकालागीं जळा काढिजे पाट ॥ १६ ॥ किंवा, पाऊस चहूंकडे अस्ताव्यस्त पडतो, ते पावसाचे पाणी धरणे बांधून तलावांत सांठवितात. मग त्याच युक्तीनें पिकासाठी हळुहळू पाट फोडतात १६. आणि पवना नादाकारा । साधूनि कीजे वाजंतरा । मग जेवीं नाना ध्वनि मधुरा । वाजविजे यंत्रा सप्त स्वरें ॥ १७ ॥ अथवा नादाकार वायूला स्वाधीन ठेवता येईल असे वाद्य तयार करतात, आणि मग ते ज्या प्रमाणें नाना प्रकारच्या मधुर ध्वनीनें सप्तसुरांत वाजविले जातें १७; तैसें उच्छृंखळां विषयांसी । वेदें नेमिलें नेमेंसीं । तेचि वेदाज्ञा ऐशी । ऐक तुजपासीं सांगेन ॥ १८ ॥ त्याप्रमाणें विषयाच्या नादानें लोक उच्छृंखल होतील, त्यांच्यासाठी वेदानें नियम घालून दिले आहेत. ती वेदाज्ञा कशी आहे, ती तुला सांगतों ऐक १८. आवरावया योनिभ्रष्टां । मैथुनीं विवाहप्रतिष्ठा । लावूनियां निजनिष्ठा । वर्णवरिष्ठा नेमिले ॥ १९ ॥ योनिभ्रष्टांना आळा घालावा म्हणून स्त्रीसंगासाठी लग्नसंस्काराचे बंधन घालून वर्णविशेष ठरविले, व त्यांच्यावर नियंत्रण घातले १९. ब्राह्मण जातां रजकीपासीं । ते तंव कडू न लगे त्यासी । रजक जातां ब्राह्मणीपाशीं । तिखट त्यासी ते न लगे ॥ २२० ॥ ब्राह्मण परटिणीपाशी गेला, तर ती कांहीं त्याला कडू लागत नाहीं; किंवा परीट ब्राह्मणीपाशी गेला, म्हणून ती त्याला काही तिखट लागत नाहीं २२०. भलती स्त्री भलता नर । मैथुनीं होय वर्णसंकर । तो चुकवावया प्रकार । विवाहनिर्धार नेमिला वेदें ॥ २१ ॥ परंतु भलतीच स्त्री आणि भलताच पुरुष ह्यांचा संग झाला तर वर्णसंकर होतो (शुद्ध बीजसंस्कार मोडतात.) तो प्रकार टाळण्याकरतां वेदानें विवाहाचा नेम लावून दिलेला आहे २१. धर्मपत्नीपाणिग्रहण । विवाह नेमिला सवर्ण । तेथें सप्तम पंचम त्यजून । स्वगोत्रीं लग्न करूं नये ॥ २२ ॥ धर्मपत्नी करण्यासाठी पाणिग्रहण करावयाचे तर सजातीयांचाच विवाह व्हावयास पाहिजे असा निश्चय ठरविला आहे. त्यांतही स्वगोत्रामध्यें लग्न करूं नये; परगोत्रांतही सप्तम पंचम टाकून (म्हणजे बापापासून सात व आईपासून पांच पिढ्या सोडून) लग्न करावे २२. तीन्ही वेद तीन्ही वर्ण । वेदें सांडूनियां जाण । सवेद आणि सवर्ण । पाणिग्रहण नेमिलें ॥ २३ ॥ तीन वर्ण व तीन वेद सोडून देऊन म्हणजे त्यांत मिश्रता न करतां सवेद आणि सवर्ण ह्यामध्येंच पाणिग्रहण करावे असें वेदानें ठरवून ठेवले आहे २३. कन्या सवेद सवर्ण । जीसी नाहीं रजोदर्शन । तेही पित्यापासीं याचून । करावें लग्न विधानोक्त ॥ २४ ॥ सवेद आणि सवर्ण असून जिला रजोदर्शन झालेले नाही, अशी कन्या पित्यापाशी याचना करूनच तिच्याशी यथाविधि लग्न करावें २४. धर्म-अर्थ-कामाचरण । अन्यत्र न करावें आपण । ऐशी वाहूनियां आण । पाणिग्रहण वेदोक्त ॥ २५ ॥ धर्म, अर्थ आणि कामाचरण आपण अन्य स्त्रीच्या ठिकाणी करणार नाही, अशी शपथ घेऊनच वेदोक्त रीतीनें तिचे पाणिग्रहण करावे लागते २५. करितां वधूवरां पाणिग्रहण । साक्षी द्विज-देव-हुताशन । इतर स्त्रिया मातेसमान । स्वदारागमन नेमिलें वेदें ॥ २६ ॥ वधूवरांनी पाणिग्रहण करतांना ब्राह्मण, देव व अग्नि हे साक्षीला असतात; म्हणून इतर स्त्रिया मातेसमान मानल्या पाहिजेत. वेदानें स्वस्त्रीगमनच पुरुषाला नेमून दिले आहे २६. एवं नेमूनियां विवाहासी । वेदरायें दिली आज्ञा ऐशी । सांडूनि सकळ स्त्रियांसी । स्वदारेपाशीं मैथुन ॥ २७ ॥ अशा प्रकारे विवाहाचा नेम लावून देऊन वेदराजानें अशी आज्ञा दिली आहे की, इतर सर्व स्त्रियांना वर्ज करून आपल्या स्वतःच्या स्त्रीशीच रममाण व्हावें २७. दिवा मैथुन नाहीं स्त्रियांसी । रात्रीं त्यजूनि पूर्वापर प्रहरांसी । मैथुन स्त्रियेपासीं । मध्यरात्रीसी नेमस्त ॥ २८ ॥ दिवसां स्त्रीसंग करूं नये; रात्रीमध्येंही पहिला व शेवटचा प्रहर सोडून मध्यरात्रीला संग करणे उक्त आहे २८. नेमिलें स्वदारामैथुन । तेंही अहोरात्र नाहीं जाण । प्रजार्थ स्त्रीसेवन । ऋतुकाळीं गमन नेमस्त ॥ २९ ॥ संग करणे तो स्वस्त्रीशीच असें ठरविले असले तरी, तोसुद्धां अहोरात्र करणे उक्त नाही. फक्त प्रजोत्पत्तीकरतांच स्त्रीसंग करावा, व तोही ऋतुकाळी करणेच प्रशस्त आहे २९. ऋतुकाळीं ज्यां स्त्रीगमन । ते पुरुष ब्रह्मचारी पूर्ण । वेद निवृत्तिपर जाण । त्यागरूपें आपण भोगातें नेमी ॥ २३० ॥ ऋतुकाळीच* जे स्वस्त्रीशी गमन करतात, ते पुरुष खरोखर ब्रह्मचारीच होत. सारांश, वेद हे निवृत्तिपरच आहेत. त्यांनी त्यागाचे बीज ठेवून भोग नेमले आहेत २३०. ( * ऋतुकाळ म्ह. स्त्री ऋतुमती झाल्यानंतर १६ दिवसपर्यंत; त्यांतही पहिले ४ दिवस व ११ वी आणि १३ वी रात्र वर्ज करून; एकादशी, अमावास्या, शिवरात्रि इत्यादि पर्वकाळ व मूळ-मघा-रेवती ही नक्षत्रे वर्ज करावयाची. यांत सुप्रजाजननशास्त्राचे रहस्य आहे.) 'आत्मा वै पुत्रनामासि' । पुत्र झालिया स्त्रियेसी । संग करूं नये स्त्रीपासीं । शनैःशनैः विषयांसी त्यागवी वेद ॥ ३१ ॥ आत्मा वै पुत्रनामासि'-पुत्राच्या रूपानें आपणच जन्मास येतो; म्हणून स्त्रियेला पुत्र झाल्यानंतर तिच्याशी संग करू नये. अशा प्रकारे सांगून वेद हा हळुहळू विषयाचा त्याग करवितो ३१. सेवावया आमिषा । वेदें नेमु केला कैसा । न घडावया पशुहिंसा । संकट आयासा स्वयें द्योती ॥ ३२ ॥ आतां मांसभक्षणासाठी वेदानें कसा नेम घातला आहे पहा. पशुहिंसा होऊ नये म्हणून तींत अनेक संकटें व आयास आपणच सांगून ठेवले आहेत ३२. आवडीं खावया मांसा । अथवा स्वर्गाचिया आशा । जे करिती पशुहिंसा । तयां पुरुषां अधःपतन ॥ ३३ ॥ जिभेच्या आवडीनें मांस खाण्याकरतां, किंवा स्वर्गाच्या आशेनेंही जे कोणी पशूचा वध करतील त्या पुरुषांना नरकवास प्राप्त होतो ३३. निष्काम कर्मीं पशुहिंसा । करी तरी तो निष्काम कैसा । तेथ निगमाचा नेमु ऐसा । मुख्य अहिंसा सर्व धर्मीं ॥ ३४ ॥ निष्कामकर्म म्हणून पशूचा वध केला, तर तो निष्काम कसचा ? म्हणून वेदाचे सांगणे असें की, सर्व धर्मामध्यें अहिंसा हीच मुख्य आहे ३४. नित्य न करावया मांसभक्षण । यज्ञीं पुरोडाशसेवन । तेंहि परिमित जाण । स्वेच्छा मांसादन वारिलें वेदें ॥ ३५ ॥ रोज रोज मांसभक्षण करतां येऊं नये, म्हणून यज्ञामध्यें राहिलेलें अवशेष ग्रहण करावयाचें; तेसुद्धा अगदी परिमित असे सांगून वेदानें यथेष्ट मांसभक्षणाचा निषेधच केला आहे ३५. याग करूनि 'सौत्रामणी' । प्रवर्तावें सुरापानीं । हे वेदाज्ञा जो सत्य मानी । तो स्वधर्माचरणीं नागवला ॥ ३६ ॥ (आतां मद्यपानावरचे नियंत्रण सांगतात)- 'सौत्रामणी' नावाचा यज्ञ करून मग मद्यपान करावे अशी वेदाची आज्ञा जो सत्य मानतो, तो स्वधर्माचरणांत नागवला असे समजावें ३६. जे कर्मीं मद्यपान घडे । तो स्वधर्म म्हणतां जीभ झडे । लोलुपते भुलले बापुडे । वेद विषयांकडे वोढिती ॥ ३७ ॥ कारण ज्या कर्मामध्यें मद्यपान घडते, तो स्वधर्म असें म्हटलें असतां जीभ झडून जाईल. बिचारे लंपटपणानें भुललेले लोक वेदांना विषयाकडे ओढतात ३७. यागु करितां सोत्रामणी । स्वयें न व्हावें मद्यपानी । तें यज्ञशेष अवघ्राणीं । परी सर्वथा वदनीं घालूं नये ॥ ३८ ॥ 'सौत्रामणी' यज्ञ केला तरी आपण स्वतः मद्यपान करूं नये, ते यज्ञात अवशेष राहिलेले मद्य हुंगावें, पण तोंडांत म्हणून कधीही घालू नये ३८. हे विषयांचें त्रिविध विंदान । मैथुन-मांसभक्षण-सुरापान । यदर्थीं निवृत्तीचि प्रमाण । हें मनोगत पूर्ण वेदाचें ॥ ३९ ॥ मैथुन, मांसभक्षण आणि सुरापान हे विषयांचे तीन प्रकार आहेत; त्यांचा त्याग करावा हाच निश्चितार्थ होय. त्याग हाच वेदाचा खरा हेतु आहे ३९. विषयांपासूनि निवृत्ती । वेद विभागें हेंचि द्योती । परी धरावी विषयासक्ती । हे वेदोक्ति सर्वथा न घडे ॥ २४० ॥ वर्णाश्रमविभागाच्या योगें वेद हा विषयांपासून निवृत्त व्हावे असेंच सांगतो. विषयासक्ति धरावी असें तो कधीच सांगत नाहीं २४०. वेंचोनियां निजधन । करोनियां विवाह यज्ञ । सेवावें मद्य-मांस-मैथुन । हें वेदवचन कदा न घडे ॥ ४१ ॥ आपले द्रव्य खर्च करून विवाह व यज्ञ करावे, आणि मद्य मांस, मैथुन सेवावें असें वेदवचन मुळींच संभवत नाहीं ४१. धनं च धर्मैकफलं यतो वै ज्ञानं सविज्ञानमनुप्रशान्ति । गृहेषु युञ्जन्ति कलेवरस्य मृत्युं न पश्यन्ति दुरन्तवीर्यम् ॥ १२ ॥ नायकोनि भगवत्कथा । ज्ञानाभिमानी नाडले तत्वतां । धनें परमार्थ यावा हाता । तोही स्वधर्मता न लाविती धर्मीं ॥ ४२ ॥ ज्ञानाभिमानी लोक भगवंताची कथा न ऐकल्यामुळें नागवले जातात. वास्तविक द्रव्याच्यायोगें परमार्थ हाताला चढावयाचा, पण ते स्वधर्मानुसार द्रव्याचा विनियोग धर्माकडे करीत नाहीत ४२. विषयांचिया कामना । सर्वस्वें वेंचिती धना । तेंचि धर्मार्थ वेंचितां जाणा । सांडिती प्राणा कवडीसाठीं ॥ ४३ ॥ विषयोपभोगाकडेच खर्च करतात. तेच द्रव्य धर्माकडे खर्चावयाचे झाल्यास कवडीसाठी प्राण सोडतात ! ४३. जया धनाचेनि पांगें । हा धर्मचि आलासे निजांगें । जेवीं पायाळाचेनि योगें । महानिधि वेगें आतुडे हातीं ॥ ४४ ॥ द्रव्याच्या स्वरूपानें प्रत्यक्ष धर्मच स्वतः येऊन राहिलेला असतो. पायाळूच्या साहाय्यानें ज्याप्रमाणें द्रव्याचा ठेवा हाती लागतो, त्याप्रमाणें द्रव्यानें धर्म हस्तगत होतो ४४. बीज तेथें सद्रुम फळ । चंदन तेथें परिमळ । जळाचे ठायीं केवळ । नांदती सकळ रसस्वाद ॥ ४५ ॥ बीज असते, तेथें झाडासहित फळ असते. जिकडे चंदन तिकडे परिमळ असतो. त्याचप्रमाणें जलामध्यें सारे रसस्वाद नांदत असतात ४५. देह तेथ असे कर्म । रूप तेथ वसे नाम । धन तेथ उत्तमोत्तम । सकळ धर्म सदा वसती ॥ ४६ ॥ देह असतो तेथें कर्म असते; रूप असते तेथें नाम असते; त्याप्रमाणेच द्रव्य असते तेथे सारे उत्तमोत्तम धर्म राहात असतात. ४६. जेवीं एकादशीव्रतयोगें । जागरीं गीतनृत्यपांगें । तुष्टला देवो लागवेगें । आतुडे धनयोगें निजभक्तां करीं ॥ ४७ ॥ एकादशीव्रताच्या निमित्तानें गीत-नृत्य करीत जागरण केल्याच्यायोगे संतुष्ट झालेला देव द्रव्यामुळेच निजभक्तांच्या हातांत सांपडतो ४७. तेवीं धनाचिया पाठोवाठीं । परम धर्मेंसी पडे गांठी । धर्म तेथ उठाउठी । ज्ञानाची भेटी विज्ञानेंसीं ॥ ४८ ॥ ह्याप्रमाणें धनाच्या मागोमाग परम धर्म पदरी पडतो. आणि जेथें धर्म असतो, तेथे ज्ञानासहित विज्ञान भेटते ४८. चंद्रास्तव वाढती कळा । जीवनास्तव जिव्हाळा । तेवीं धनास्तव सोज्जळा । धर्माचा सोहळा धार्मिकां घरीं ॥ ४९ ॥ चंद्रामुळेच कला वाढतात; जीवनामुळें जिव्हाळा वाढतो; त्याप्रमाणेच धर्मशील मनुष्याच्या घरी धनामुळेच धर्माचा सोहळा दृष्टीस पडतो ४९. धर्म तेथ शुध्द ज्ञान । ज्ञान तेथ विज्ञान । विज्ञान तेथ समाधान । शांति संपूर्ण नांदे तेथ ॥ २५० ॥ धर्म असतो तेथें शुद्ध ज्ञान असते; ज्ञान असतें तेथें विज्ञान राहाते; आणि विज्ञान असते तेथे समाधान व सारी शांति नांदत असते २५०. एवढें फळ ज्या धनापासीं । तें मूर्ख वेंचिती विषयांसी । देहलोभें भुललीं पिसीं । अंगीच्या मृत्यूसी विसरले ॥ ५१ ॥ एवढे फळ ज्या द्रव्यापासून मिळते, तें मूर्ख लोक विषयविलासांत खर्च करून टाकतात ! देहलोभानें माणसें खुळी होऊन जातात व आपल्या मृत्यूला विसरतात ५१. जळते घरीं ठेवा ठेवणें । मरत्या देहा सुरवाड करणें । तो नागवला वेदु म्हणे । तें वेदाचें बोलणें नायके कोणी ॥ ५२ ॥ जळत्या घरांत ठेव ठेवणारा व मरत्या देहाला शृंगार करणारा ठार बुडतो असें वेद म्हणतो, पण तें वेदाचे बोलणे कोणी ऐकत नाहीं ५२. उपजलेनि दिवस-दिवसें । देहातें काळु ग्रासीतसे । हें नित्य नवें मरण कैसें । देहलोभवशें विसरले ॥ ५३ ॥ जन्मल्यापासून दिवसेंदिवस देहाला काळ ग्रासीतच असतो. देहलोभाच्या आधीन होऊन हे नित्य नवे मरण लोक कसे बरें विसरतात ? ५३. ज्याचे त्या देखतां कैसा । काळु गिळी बाळवयसा । मग तारुण्याची दशा । मुरडूनि घसा ग्रासी काळ ॥ ५४ ॥ ज्याच्या त्याच्या डोळ्यांदेखत काळ हा बाल्यदशा ग्रासून टाकतो; आणि मग तारुण्यदशेची मान मुरगळून तीही गिळून टाकतो ५४. गिळोनियां तारुण्यपण । आणी वार्धक्य कंपायमान । ऐसें काळाचें विंदान । दुर्धर पूर्ण ब्रह्मादिकां ॥ ५५ ॥ तारुण्य गिळल्यानंतर थरथर कांपविणारे वार्धक्य तो देतो. असें हें काळाचे कृतिकौशल्य ब्रह्मदेवादिकांनासुद्धा दुर्धर अथवा अगम्य आहे ५५. जयाचेनि चपेटघातें । मरण आणी अमरांतें । मा मूर्ख तेथें जीवितातें । अक्षय चित्तें दृढ मानिती ॥ ५६ ॥ त्याच्या एका चपेट्यासरशी अमर अशा देवांनासुद्धा मृत्यु येतो; तेथें मूर्ख लोक आपले जीवित अक्षय आहे असें निश्चयपूर्वक समजतात ! ५६. मूळीं देहचि तंव अनित्य । मा तेथींचे भोग काय शाश्र्वत । परी धन वेंचूनि विषयार्थ । भुलले जाणा भ्रांत स्त्रीलोभें ॥ ५७ ॥ मुळी देहच जर अशाश्वत आहे, तर मग त्याचे भोग कसे शाश्वत असणार ? पण विषयांकरतां द्रव्य खर्चून स्त्रीलोभानें लोक भुलून भ्रांत झाले आहेत ५७. ऐसे नश्र्वर भोग जगीं । ते भोगावया रिघावें स्वर्गीं । तदर्थ प्रवर्तती यागीं । लागवेगीं भोगेच्छा ॥ ५८ ॥ असे हे ह्या जगांतील भोग नाशवंत आहेत, म्हणून ते भोगावयाला स्वर्गातच जावे, अशा भोगांच्या इच्छेनें ते यज्ञ करूं लागतात ५८. सुख भोगावया वेगीं । पतंगु जेवीं उडी घाली आगीं । तेवीं इहामुत्रभोगीं । पतनालागीं पावती ॥ ५९ ॥ सुख मिळावे म्हणून पतंग जसा आगीत उडी घालतो, त्याप्रमाणें हे लोक इह व परलोकच्या भोगासक्तीनें अधःपतन पावतात ५९. स्त्री-आमिष-मद्यपान । हे वेदोक्त भोग जाण । तेथ केवीं घडे पतन । तें वेदविधान नेणती मूर्ख ॥ २६० ॥ 'स्त्री, मांस आणि मद्यपान हे भोग तर वेदोक्त आहेत, तेव्हां त्यामुळें पतन कसे ?' असे म्हणणाऱ्या मूर्खाना खरे वेदविधान कळत नसते २६०. यद्घ्राणभक्षो विहितः सुरायाः तथा पशोरालभनं न हिंसा । एवं व्यवायः प्रजया न रत्या इमं विशुद्धं न विदुः स्वधर्मम् ॥ १३ ॥ वेदविहित कर्माचरण । तेथ सर्वथा नव्हे पतन । जेथ चुके वेदविधान । तेथें पावे पतन सज्ञान ॥ ६१ ॥ वेदविहित कर्माचरण केल्यास त्यापासून कधीच पतन घडावयाचे नाही; परंतु वेदविधानांत जर चूक झाली, तर मोठा ज्ञाता असला तरीसुद्धा त्याला पतन घडतें ६१. वेदींच्या अर्थवादासरिसा । मनीं बांधोनि भोगाशा । यज्ञमिषें पशुहिंसा । भोगलिप्सा करूं धांवती ॥ ६२ ॥ वेदांतील अर्थवाद (स्तुतिवाद) ऐकून मनांत सुखविलासाची आशा धरतात व भोगाशेनें लोक यज्ञाच्या निमित्तानें पशुहिंसा करावयाला धावतात ! ६२. वेदें बोलिलें 'आलभन' । त्या नांव म्हणती पशुहनन । हें सकाम मानिती विधान । निष्कामा हनन कदा न घडे ॥ ६३ ॥ वेदानें 'आलभन' सांगितले आहे, त्याला हे पशुहनन असें नांव देतात ! हे सकामांचेंच विधान आहे. निष्काम लोक पशुहिंसा कधीच करावयाचे नाहींत ६३. निष्कामासी यागयजन । स्वधर्मार्थ करावे यज्ञ । तेथ पशूचें आलभन । सर्वथा हनन करूं नये ॥ ६४ ॥ निष्काम लोकांचे यागयजन म्हणजे केवळ स्वधर्माप्रीत्यर्थच म्हणून सांगितले आहे. त्यांत पशूचे नुसते आलभन करावयाचें, वध असा कधीच करूं नये ६४. पशूचें करूं नये हनन । देवतोद्देशें अंगस्पर्शन । या नांव बोलिजे 'आलभन' । हें यज्ञाचरण निष्काम ॥ ६५ ॥ पशूचा वध करावयाचा नाही; तर देवतेप्रीत्यर्थ त्याच्या अंगाला स्पर्श करावयाचा; ह्याचंच नांव 'आलभन'; आणि हेच निष्काम यज्ञाचरण ६५. हरिश्र्चंद्राच्या यागीं । शुनःशेप-पशुप्रसंगीं । तेणें घावो लागों नेदितां अंगीं । वेदोक्त प्रयोगीं यज्ञसिध्दी केली ॥ ६६ ॥ हरिश्चंद्राच्या यज्ञामध्यें (वरुणाला बळी देण्यासाठी)-'शुनःशेप' नावाचा एका ऋषीचा मुलगा आणला होता, त्या वेळी (विश्वामित्राने) त्याच्या अंगावर घाव लागू न देतां वेदोक्त प्रयोगानेंच यज्ञसिद्धि केली ६६. वेदोक्त मंत्रभागार्थ । देव सुखी करोनि समस्त । आपण झाला निर्मुक्त । हा ऋग्वेदार्थ ब्राह्मणीं ॥ ६७ ॥ वेदोक्त मंत्रांनींच साऱ्या देवांना संतुष्ट करून शुनःशेप मुक्त झाला, असा ऋग्वेदार्थ ऐतरेय ब्राह्मणामध्यें सांगितलेला आहे ६७. यापरी पशुघात । यज्ञीं न लगे निश्र्चित । तो हरिश्र्चंद्र यागार्थ । पशुघात निवारी ॥ ६८ ॥ म्हणून यज्ञामध्यें मुळींच पशूचा घात करावा लागत नाही. हरिश्चंद्रानें यज्ञाकरतां पशूचा वध वर्ज्य केला होता ६८. तेथ मीमांसकांचें मत । देवतोद्देशें जो पशुघात । या नांव 'आलभन' म्हणत । स्वर्गफलार्थ आवश्यक ॥ ६९ ॥ ह्यावर मीमांसकांचे असें मत आहे की, देवताप्रीत्यर्थ पशु मारणे, ह्यालाच 'आलभन' म्हणावयाचे, आणि स्वर्ग मिळण्याकरता हें आवश्यकच आहे ६९. केवळ मांसभक्षणार्थ । जे करिती पशुघात । हिंसादोष तेथें प्राप्त । ऐसें बोलत मीमांसक ॥ २७० ॥ केवळ मांसभक्षणाकरतांच जे पशु मारतात त्यांनाच हिंसेचे पातक लागते, असें मीमांसक बोलतात २७०. देवतोद्देशें पशूंचा घात । तेणें स्वर्गभोग होय प्राप्त । तोही भोगक्षयें क्षया जात । तेणें हिंसा प्राप्त याज्ञिकां ॥ ७१ ॥ परंतु देवताप्रीत्यर्थ पशूचा घात केल्यानें स्वर्गभोगांची प्राप्ति झाली तरी तो स्वर्गभोग काही काळानें तत्प्रापक कर्मक्षयाबरोबर नाश पावतो. म्हणून यज्ञ करणारालाही हत्याच घडते ७१. याग करितां 'सौत्रामणी' । पुरोडाश घ्यावा अवघ्राणीं । परी प्रवर्तावें सुरापानीं । हें वेदविधानीं असेना ॥ ७२ ॥ आतां 'सौत्रामणी' यज्ञ केला तर पुरोडाश म्हणजे यज्ञांतील अवशेष, त्याचा फक्त वास घ्यावा असे सांगितले आहे; परंतु मद्याचे प्राशन करावे असें वेदाच्या विधानांत मुळीच सांगितले नाहीं ७२. एवं जेथें पशुहनन । तें कर्म सदोष पूर्ण । यालागीं तेथ अधःपतन । बोलिलें जाण याज्ञिकांसी ॥ ७३ ॥ तात्पर्य, ज्यांत पशूचा वध होतो, ते कर्म सदोष होय. त्यामुळें यज्ञकर्त्याला अधःपतन सांगितलेले आहे ७३. वेदें विहिलें पाणिग्रहण । तें प्रजार्थ स्वदारागमन । परी रत्यर्थ नित्य मैथुन । हे वेदाज्ञा जाण असेना ॥ ७४ ॥ वेदानें पाणिग्रहणाचा म्ह. लग्नाचा विधि सांगितलेला आहे, तो फक्त प्रजोत्पत्तीकरतां स्वस्त्रीशी गमन करावे म्हणून. परंतु केवळ रतिसुखाकरतां प्रतिदिवशी स्त्रीसंग करावा, अशी काही वेदाची आज्ञा नाहीं ७४. मद्य-मांस-मैथुनप्रसंग । स्वइरच्छा न करावया भोग । वेदें द्योतिला विवाह याग । भोगत्यागनियमार्थ ॥ ७५ ॥ मद्य, मांस व मैथुन ह्यांचा स्वेच्छेनें मनसोक्त उपभोग न घ्यावा म्हणून, अर्थात् स्वच्छंद भोगावर नियंत्रण घालण्यासाठी वेदानें विवाहविधि व यज्ञविधि सांगून ठेवले आहेत ७५. नेणोनि ऐसिया शुध्द घर्मा । यागमिषें अधर्मा । प्रवर्तानि काम्य-कर्मा । भोग संभ्रमा भोगिती मूर्ख ॥ ७६ ॥ अशा शुद्ध धर्माला न जाणतां यज्ञाचे निमित्त करून मूर्ख लोक अधर्मालाच प्रवृत्त होतात व काम्य कर्म करून भोगसंभ्रम भोगतात ७६. ये त्वनेवंविदोऽसन्तः स्तब्धाः सदभिमानिनः । पशून् द्रुह्यन्ति विश्रब्धाः प्रेत्य खादन्ति ते च तान् ॥ १४ ॥ नेणोनि शुध्द वेदविधानातें ।अतिगर्वाचेनि उध्दतें । आपणियां मानूनि ज्ञाते । अविधी पशूतें घातु करितीं ॥ ७७ ॥ गर्वातिशयानें खरे वेदविधान काय आहे ते समजून न घेतां आपणच काय ते शहाणे असे समजून अविधीनें पशूचा घात करतात ७७. केवळ अभिचारमतें । पावोनि सकळ भोगातें । ऐशिया मानोनि विश्र्वासातें । स्वेच्छा पशूतें घात करिती ॥ ७८ ॥ केवळ जारणमारणादि कुत्सित प्रयोगानें सारे भोग प्राप्त होतात असाच मनांत विश्वास बाळगून स्वेच्छेनें पशूचा घात करतात ! ७८. अविधी पशूतें वधिती । त्या याज्ञिकांचे देहांतीं । मारिले पशू मारूं येती । झळकत काती घेऊनियां ॥ ७९ ॥ अशा प्रकारे आडमार्गानें किंवा विनाकारण जे पशूंचा वध करतात, ते यज्ञकर्ते मरण पावले म्हणजे तेच पशू (स्वर्गाच्या वाटेवर) तीक्ष्ण सुरी घेऊन त्यांना मारावयाला येतात ७९. एवं निमालिया याज्ञिकांसी । भक्षिले पशु भक्षिती त्यांसी । जैसें सेविलें विष प्राणियांसी । ग्रासी प्राणांसी समूळ ॥ २८० ॥ तात्पर्य, प्राण्यानें खाल्लेले विष जसें त्याच्या प्राणाला ग्रासून टाकते, तसे यज्ञ करणारे मरण पावले म्हणजे त्यांनी ज्या पशूंना भक्षण केलेले असते, तेच त्यांना परलोकी भक्षण करतात २८०. द्विषन्तः परकायेषु स्वात्मानं हरिमीश्वरम् । मृतके सानुबन्धेऽस्मिन्बद्धस्नेहाः पतन्त्यधः ॥ १५ ॥ परमात्मा जो श्रीहरी । तो अंतर्यामी सर्व शरीरीं । तेथ पराचा जो द्वेषु करी । तेणें द्वेषिला हरि निजात्मा ॥ ८१ ॥ परमात्मा असा जो श्रीहरि, तो सर्वांच्या शरीरांत अंतर्यामीरूपानें राहातो, त्यामुळें दुसऱ्याचा जे द्वेष करतात त्यांनी आपल्याच हृदयस्थ परमात्म्याचा द्वेष केला असें होतें ८१. परासी जो करी अपघातु । तेणें केला निजात्मघातु । त्यासी सकुटुंब अधःपातु । रौरवांतु ते बुडती ॥ ८२ ॥ सारांश, दुसऱ्याचा जे घात करतात ते आपला स्वतःचाच घात करून सकुटुंब अधःपाताला जातात, आणि रौरव नरकांत पडतात ८२. ये कैवल्यमसम्प्राप्ता ये चातीताश्च मूढताम् । त्रैवर्गिका ह्यक्षणिका आत्मानं घातयन्ति ते ॥ १६ ॥ सज्ञानी स्वतां तरती । अज्ञानी सज्ञानां शरण येती । तेणें त्यांसी कैवल्यप्राप्ती । त्यांच्या वचनोक्तिविश्र्वासें ॥ ८३ ॥ जे ज्ञानी असतात ते स्वतःच तरतात आणि अज्ञानी असतात ते सज्ञान्यांना शरण येतात, त्यामुळें त्यांच्या भाषणावर विश्वास ठेवल्यानें त्यांस मोक्षप्राप्ती होते ८३. जे अज्ञान ना सज्ञान । ज्यांसी केवळ ज्ञानाभिमान । ज्यांचें विषयीं लोलुप मन । ते पुरुष जाण आत्मघाती ॥ ८४ ॥ परंतु जे अज्ञानीही नव्हेत आणि सज्ञानीही नव्हेत, ज्ञानाची फक्त घमेंड बाळगतात, त्यांचे मन विषयावर लुब्ध होत असते. असे ते पुरुष आत्मघातकी जाणावे ८४. साधावया अर्थ काम । जे करिती अभिचारधर्म । हें त्रैवर्णिक घोर कर्म । आत्मघाती परम ज्याचें त्यासी ॥ ८५ ॥ केवळ अर्थ व काम साधण्याकरता जे अभिचारकर्म म्ह. जारण-मारण-उचाटणादि करतात, ते त्रैवर्णिक (द्विज) असले तरी त्यांचें तें कर्म त्यांनाच आत्मघातास कारण होते ८५. देहाचिया गोमटिया । जे करिती अभिचारक्रिया । तेणें कर्में आपआ पणियां । सृजिला राया निजघातु ॥ ८६ ॥ हे राजा ! शरीराच्या सुखासाठी जे अभिचारकर्मे करतात, ते त्या कर्मानेंच आपला आपण घात करून घेतात ८६. जो स्वयें बैसली खांदी तोडी । तो खांदीसहित पडे बुडीं । तेवीं काम्यकर्माच्या वोढी । क्रियेसी रोकडीं अधःपात ॥ ८७ ॥ बसलेली खांदी जो (मागच्या बाजूनें) आपली आपण तोडतो, तो त्या खांदीसहवर्तमान खाली पडतो, त्याप्रमाणें काम्यकर्माच्या आसक्तीनें त्याचा तत्काळ अधःपात होतो ८७. एत आत्महनोऽशान्ता अज्ञाने ज्ञानमानिनः । सीदन्त्यकृतकृत्या वै कालध्वस्तमनोरथाः ॥ १७ ॥ काम क्रोधी अतिअभ्दुत । क्रूरकर्मी जे अशांत । तिहीं आपआीपणिया अनहित । निजात्मघात जोडिला ॥ ८८ ॥ अत्यंत कामासक्त, अतिशय संतापी व क्रूरकर्मी आणि अशांत असे लोक आपला आपणच घात व अकल्याण करून घेतात ८८. स्वयें कर्म करिती अविधी । तेचि म्हणती शुध्द विधी । अज्ञान तेंचि प्रतिपादी । ज्ञान त्रिशुध्दी म्हणोनियां ॥ ८९ ॥ स्वतः अविधीनें कर्म करतात आणि तोच शुद्ध विधि असे म्हणतात. अज्ञानालाच 'ज्ञान' म्हणून प्रतिपादन करतात ८९. ते काम्यकर्मीं छळिले । कां महामोहें आकळिले । गर्वदंभादि भेदें खिळिले । काळसर्पें गिळिले सद्बु<ध्दीसीं ॥ २९० ॥ जे काम्य कर्मांनी फसले गेले, जे महामोहानें कवटाळले, जे गर्वदंभादिकांनी जखडले जाऊन ज्यांच्या सद्बुद्धीला काळसर्पानें गिळून टाकले २९०; गर्वादिज्वरितमुखें । गोडपणीं कडू ठाके । विषप्राय विषयसुखें । अतिहरिखें सेविती ॥ ९१ ॥ गर्वादि ज्वरामुळें ज्यांच्या तोंडाला गोड असेल ते कडू वाटू लागले, तेच विषासारखी मारक असलेली विषयसुखें मोठ्या आनंदानें सेवन करतात ९१. ऐशा विषयांलागीं पहाहो । आप्त मानूनि निजदेहो । रचूनि नाना उपावो । अर्थसंग्रहो स्वयें करिती ॥ ९२ ॥ आणखी असें पाहा, असल्या विषयासाठी आपल्या देहालाच, आप्त मानून व नाना प्रकारच्या युक्ति प्रयुक्ति रचून स्वतः द्रव्यसंग्रह करतात ९२. हित्वात्ममायारचिता गृहापत्यसुहृत्स्त्रियः । तमो विशन्त्यनिच्छन्तो वासुदेवपराङ्मुखाः ॥ १८ ॥ मरणेंसी झटें घेत । श्री मेळविती श्रीमंत । गृह दारा पुत्र वित्त । नाना वस्तुजातसंग्रहो ॥ ९३ ॥ मृत्यूशी टक्कर देत देत श्रीमंत लोक द्रव्य मिळवितात; घरदार, बायका, मुले अशा अनेक वस्तुसमुदायाचा संग्रह करतात ९३. ऐसे भोग आयासयुक्त । सांडूनि ज्ञानगर्वी समस्त । ज्ञानाभिमानें नेइजेत । अंधतमांत अतिगर्वें ॥ ९४ ॥ असे कष्टानें मिळविलेले सारे भोगविलास सांडावे लागून, ज्ञानाचा गर्व वाहणाऱ्या लोकांस, त्यांचा ज्ञानाभिमान अंधतमस नावाच्या नरकांत नेऊन सोडतो ९४. जेथ अंधाराचे डोळे । होऊनि ठाकती आंधळे । तेथ मोहरात्रीचें काळें । अंधतममेळें अधिक कांटे ॥ ९५ ॥ जेथे अंधाराचे डोळेसुद्धा आंधळे होऊन जातात, तेथें मोहरूप रात्रीचा काळोख त्या अंधतमांत मिळाल्यामुळें अधिकच भयंकर होतो ९५. जया अंधारातें प्रकाशूं येतां । निखिळ काळा होय सविता । जेथ गाढ मूढ अवस्था । अतिमौढ्यता स्वयें पावे ॥ ९६ ॥ त्या अंधाराला प्रकाशित करण्याला सूर्य आला, तरी तोसुद्धा काळाभोर होऊन जावयाचा ! जेथे गाढ मूढ अवस्था अत्यंत मूढतेला प्राप्त होते ९६, जेथ सुषुप्तीसी झोंप लागे । आळसु आळसिजे सर्वांगें । तेथ घर बांधोनि निजांगें । निंदा क्रोध दोघे सदा वसती ॥ ९७ ॥ जेथें सुषुप्तीलाही झोप लागते; जेथें आळसाचे सर्वांग आळसून जाते; तेथें निंदा व क्रोध दोघेही घर बांधून कायमची वस्ती करून बसतात ९७. तेथ भजनविमुख नरां । अधःपतन अभिमानद्वारा । जेवीं अथावीं पडिला चिरा । तेवीं बाहेरा निघों न शके ॥ ९८ ॥ तेथें भजनाला विन्मुख होणाऱ्या पुरुषांचा अभिमानाच्या द्वारें अधःपात होतो. खोल डोहात पडलेला दगड जसा कधीच बाहेर निवू शकत नाही, तसे तेही तेथून कधी बाहेर पडूं शकत नाहींत ९८. जे वासुदेवीं सदा विमुख । ज्यासीं हरिभजनीं नाहीं हरिख । त्यांची दशा हे अधोमुख । अतिदुःखें दुःख भोगिती ॥ ९९ ॥ जे वासुदेवाला सर्वदा विमुख असतात, ज्यांस हरिभजनांत संतोष वाटत नाही, त्यांची ही अशी अधोमुख दशा होऊन ते अत्यंत दुःखानें तडफडत राहतात ९९. ऐशी अभक्तांची गति । सांगितली आहाच स्थिति । वांचूनि त्यांची दुर्गति । वाग्देवता भीती स्पष्ट वदतां ॥ ३०० ॥ अशा प्रका अभक्तांची दशा थोडक्यांतच सांगितली. बाकी, त्यांच्या दशेचे साद्यंत वर्णन करण्याला वाग्देवतेलाही भिति वाटते ३००. अभक्तांची गति बोलणें । यापरीस चांग मुकें होणें । प्राणु जावो कां सर्व प्राणें । परी ते दोष कोणें बोलावे ॥ १ ॥ अभक्तांची गति सांगण्यापेक्षा मुके झालेले बरे. कारण, प्राण गेलेले पतकरले, पण त्यांच्या दोषांचा उच्चार करणे नको ! १. राया तुझिया प्रश्नकाजीं । हे दशा बोलणें पडे आजी । येर्हतवीं अभक्तवादें आम्हांमाजीं । वाचेची पांजी विटाळली नाहीं ॥ २ ॥ राजा ! तूं प्रश्नच केलास, म्हणून त्यांच्या स्थितीबद्दल आज एवढे बोलगे भाग पडले. नाहीं तर आजपर्यंत आम्हांपैकी कोणीच अभक्तांच्या वर्णनानें जिभेचे टोंक विटाळलेले नाहीं ! २. यावरी आतां नृपनाथा । वक्ता आणि समस्त श्रोतां । राम-स्मरणें तत्वतां । वाचेसी प्रायश्र्चित्ता सवें कीजे ॥ ३ ॥ हे राजाधिराजा ! आतां ह्यापुढे मी वक्ता आणि आपण श्रोते ह्यांनी मिळून 'राम राम राम राम' असे म्हणून वाणीला प्रायश्चित्त दिले पाहिजे ३. ऐकोनि अभक्तांची गती । अतिशयेंसीं दुःखप्राप्ती । राजा कंटाळला चित्तीं । यालागीं निश्र्चितीं हरिनाम स्मरे ॥ ४ ॥ ह्याप्रमाणें अभक्तांची दशा ऐकून राजाला अत्यंत दुःख वाटले, आणि मनांत तो फार कंटाळला व त्यासाठी स्वस्थ मनानें हरीचें नाम स्मरूं लागला ४. ज्या स्मरविलें हरीतें । तोचि यासी पुसों येथें । युगायुगीं भक्त त्यातें । कोणे विधीतें भजन करिती ॥ ५ ॥ ज्या हरीचे ह्यांनी स्मरण करावयास लावलें, त्या हरीविषयींच आतां ह्याला विचारूं, असें म्हणून, हरीचे भक्त युगायुगामध्यें कोणत्या प्रकारे त्याचे भजन करतात, असा त्यानें प्रश्न केला ५ श्री राजोवाच । कस्मिन् काले स भगवान् किं वर्णः कीदृशो नृभिः । नाम्ना वा केन विधिना पूज्यते तदिहोच्यताम् ॥ १९ ॥ ज्याचेनि स्मरणें तत्वतां । कर्माकर्में नुधाविती माथा । त्या भगवंताची कथा । माझिया हितालागीं सांगा ॥ ६ ॥ (राजा म्हणाला)-खरोखर ज्याच्या स्मरणानें कर्माकर्में मस्तक वर उचलू शकत नाहीत, त्या भगवंताची कथा केवळ माझ्या हिताकरतां सांगावी ६. जो परमात्मा श्रीहरी । तो सृष्ट्यादि यगयुगांतरीं । कोणें नामें रूपें वर्णाकारीं । भक्त कैशापरी पूजिती ॥ ७ ॥ तो परमात्मा श्रीहरि सृष्टीच्या आरंभी, युगयुगांतरी कोणत्या नामान, कोणत्या रूपानें व कोणत्या वर्णानें अवतरतो ? तसेच भक्त कोणत्या रीतीनें त्याची पूजा करतात ? ७. आणि ते काळींच्या प्रजा । कैसेनि यजिती अधोक्षजा । कवणे विधीं करिती पूजा । तें योगिराजा सांगिजे ॥ ८ ॥ त्याचप्रमाणें तत्कालीन लोक त्या अधोक्षजाचे यजन कसे करतात ? कोणत्या पद्धतीनें पूजा करतात ? हे योगिराज ! हें सारें मला आपण सांगावें ८. तुमचे मुखींचें कृपावचन । त्यापुढें अमृतही गौण । वचनें परमानंद पूर्ण । जन्ममरण उच्छेदी ॥ ९ ॥ तुमच्या तोंडच्या कृपायुक्त भाषणापुढे अमृतसुद्धा फिके पडेल. आपल्या भाषणानें पूर्ण परमानंद प्राप्त होऊन जन्ममरणाचा निखालस निरास होतो ९. त्याहीमाजीं भगवग्दुण । युगानुवर्ती नारायण । त्याचें भजनपूजनविधान । कृपा करून सांगिजे स्वामी ॥ ३१० ॥ त्यांतही स्वामी ! युगधर्माप्रमाणें वागणारा नारायण, त्याचे गुणानुवाद व त्याच्या भजनपूजनाचा विधि कृपा करून मला सांगावा ३१०. ऐकोनि रायाचें वचन । संतोषले अवघे जण । जाणोनि हरिगुणांचा प्रश्न । कनिष्ठ 'करभाजन' बोलता झाला ॥ ११ ॥ हे राजाचे भाषण श्रवण करून सर्वांसच संतोष झालो. हा हरिगुणांचा प्रश्न असें जाणून कनिष्ठ बंधु 'करभाजन' नांवाचा योगी बोलू लागला ११. श्रीकरभाजन उवाच । कृतं त्रेता द्वापरं च कलिरित्येषु केशवः । नानावर्णाभिधाकारो नानैव विधिनेज्यते ॥ २० ॥ नाना वर्ण नानाकारें । नाना नाम नानोपचारें । कृता-त्रेता-द्वापरें । भक्त निर्धारे केशवु यजिती ॥ १२ ॥ कृत, त्रेता आणि द्वापर ह्या युगांमध्यें भक्त हे नाना वर्णांनी, नाना आकारांनी, नाना नामांनी व नाना प्रकारच्या उपचारांनी केशवाचे यजन करीत असतात १२. 'क'कार ब्रह्मा 'व'कार विष्णु । 'श'कार स्वयें त्रिनयनु । केशव तो गुणविहीनु । प्रकाश पूर्ण तिहींचा ॥ १३ ॥ 'क'कार म्हणजे ब्रह्मदेव; 'श'कार म्हणजे शंकर आणि 'व'कार हा विष्णु. वस्तुतः 'केशव' निर्गुण; तो तिहींचाही पूर्ण प्रकाशक १३. केशव केवळ अर्धमात्रा । न ये व्यक्ताव्यक्त उच्चारा । व्याप्येंवीण व्यापकु खरा । सबाह्याभ्यंतरा एकत्वें ॥ १४ ॥ केशव केवळ अर्धमात्रा होय. ती व्यक्ताव्यक्त उच्चाराला येऊ शकत नाही. सबाह्यांतरी एकत्वानेंच असल्यामुळें तो खरोखर व्याप्याशिवाय व्यापक आहे १४. तोचि युगपरत्वें रूप नाम । भजनविधि क्रियाधर्म । भक्त पूजिती पुरुषोत्तम । तो अनुक्रम अवधारीं ॥ १५ ॥ तोच युगपरत्वे भिन्न भिन्न नाम-रूपें धारण करतो. त्या पुरुषोत्तमाची भक्तलोक नाना प्रकारच्या भजननिधि-क्रियाधर्मानें पूजा करतात. तो अनुक्रम सांगतों ऐक १५. कृते शुक्लश्चतुर्बाहुर्जटिलो वल्कलाम्बरः । कृष्णाजिनोपवीताक्षान् बिभ्रद् दण्डकमण्डलू ॥ २१ ॥ कृतयुगीं श्र्वेतवर्णधर । जटिल चतुर्भुज वल्कलांबर । दंडकमंडल्वंकित कर । अजिन ब्रह्मसूत्र अक्षमाला हातीं ॥ १६ ॥ कृतयुगांत गौरवर्ण, जटाधारी, चतुर्भुज, वल्कल नेसलेला, हातांत दंडकमंडलु धारण करणारा, मृगचर्म, यज्ञोपवीत, हातांत रुद्राक्षाची माला १६, ब्रह्मचर्यें दृढव्रत । ये चिन्हीं चिन्हांकित । परमात्मा मूर्तिमंत । भक्त यापरी यजिती ॥ १७ ॥ कडक ब्रह्मचर्यव्रत धारण करणारा, अशा लक्षणांनी युक्त असलेल्या मूर्तिमंत परमात्म्याचे कृतयुगांतील भक्त पूजन करतात १७. मनुष्यास्तु तदा शान्ता निर्वैराः सुहृदः समाः । यजन्ति तपसा देवं शमेन च दमेन च ॥ २२ ॥ ते काळींचे सकळ नर । सदा शांत निवैर । समताबुध्दी निरंतर । सुहृन्मित्र परस्परें ॥ १८ ॥ त्या कालांतील सर्व लोक सदासर्वदा शांत, निर्वैर, निरंतर समदृष्टि ठेवणारे व परस्पर सुहृद् व मित्र असे असत १८. तैं तपें करावें देवयजन । त्या तपाचें मुख्य लक्षण । शम-दम साधूनि संपूर्ण । भगवभ्दजन स्वयें करिती ॥ १९ ॥ त्या वेळी तपेंकरूनच देवाची उपासना करतात. त्या तपाचे मुख्य लक्षण म्हणजे शम-दम संपूर्णपणे साधून स्वतः भगवद्भजन करतात १९. तैं देवाचें नामोच्चरण । दशधा नामीं नामस्मरण । तेंचि नाम कोण कोण । ऐक सावधान नृपनाथा ॥ ३२० ॥ हे राजा ! त्या वेळी देवाचे नामस्मरण दहा नामांनी करीत असतात. ती दहा नांवें कोणती, ती सांगतों, नीट लक्ष देऊन ऐक ३२०. हंसः सुपर्णो वैकुण्ठो धर्मो योगेश्वरोऽमलः । ईश्वरः पुरुषोऽव्यक्तः परमात्मेति गीयते ॥ २३ ॥ हंस सुपर्ण वैकुंठ । धर्म योगेश्र्वर श्रेष्ठ । अमल ईश्र्वर वरिष्ठ । पुरुष अव्यक्त नामपाठ परमात्मा म्हणती ॥ २१ ॥ हंस, सुपर्ण, वैकुंठ, धर्म, श्रेष्ठ योगेश्वर, अमल, वरिष्ठ ईश्वर, पुरुष, अव्यक्त आणि परमात्मा अशा नांवांचा ते जप करतात २१. ते काळींचे भक्त श्रेष्ठ । या नामांचा नामपाठ । गायन करिती घडघडाट । भवसंकट निर्दाळिती ॥ २२ ॥ त्या काळचे मोठमोठाले भक्त ह्याच नामांचा पाठ घालून उच्च स्वरानें गायन करतात; व त्यायोगे संसारभयाचा नाश करतात २२. हें कृतयुगींचें यजन । तुज सांगितलें संपूर्ण । आतां त्रेतायुगींचें भजन । मूर्तीचें ध्यान तें ऐक ॥ २३ ॥ ही कृतयुगांतील उपासना तुला सविस्तर सांगितली. आतां त्रेतायुगांतील भजन व मूर्तीचे ध्यान सांगतों ऐक २३. त्रेतायां रक्तवर्णोऽसौ चतुर्बाहुस्त्रिमेखलः । हिरण्यकेशस्त्रय्यात्मा स्रुक्स्रुवाद्युपलक्षणः ॥ २४ ॥ त्रेतीं यज्ञमूर्तिं पुरुषोत्तमु । रक्तवर्ण ज्वलनोपमु । पिंगटकेश निर्धूमु । देवदेवोत्तमु चतुर्बाहू ॥ २४ ॥ त्रेतायुगामध्यें पुरुषोत्तम हा यज्ञमूर्तिस्वरूपांत असतो. त्याचा वर्ण निर्धूम अग्नीच्या ज्वालेसारखा लालभडक; केस पिंगट; आणि त्या देवाधिदेवाला हात चार २४; तया यज्ञपुरुषा निर्मळा । त्रिगुणांची त्रिमेखळा । वेदत्रयीचा पूर्णमेळा । मूर्तीचा सोहळा तदात्मकचि ॥ २५ ॥ त्या निर्मळ यज्ञपुरुषाला त्रिगुणांची तीन पदरी मेखला; आणि तीन वेदांच्या परिपूर्ण ऐक्याचेच ते स्वरूप असल्यामुळे, त्याच्या मूर्तीचा घाटही तत्सदृशच असतो २५. स्त्रुक-स्त्रुवा-पाणिग्रहण । हेंचि तयाचें उपलक्षण । त्रेतायुगीं नारायण । येणें रूपें जाण निजभक्त ध्याती ॥ २६ ॥ हातांमध्यें स्रुक्, स्रुवा इत्यादि यज्ञपात्रे घेतलेली, हेच त्या यज्ञमूर्तीचे उपलक्षण होय. त्रेतायुगांत भक्तलोक नारायणाचे ह्या स्वरूपानें ध्यान करतात २६. तं तदा मनुजा देवं सर्वदेवमयं हरिम् । यजन्ति विद्यया त्रय्या धर्मिष्ठा ब्रह्मवादिनः ॥ २५ ॥ तैंचे जे मनुष्य जाण । त्रिवेदीं करिती भजन । सर्वदेवस्वरूप हरि पूर्ण । यापरी यजन त्रेतायुगीं ॥ २७ ॥ त्या वेळचे मनुष्य तीन वेदांनी नारायणाचे भजन करतात. श्रीहरि हा पूर्ण सर्वदेवस्वरूप असल्यामुळें त्रेतायुगांतील भजन अशा प्रकारचे असते २७. त्रेतायुगीं सर्वही नर । वेदोक्तीं नित्य सादर । सर्वही भजनतत्पर । धर्मिष्ठ समग्र अतिधार्मिक ॥ २८ ॥ त्रेतायुगांतील सारे लोक वेदवचनावर परम श्रद्धा ठेवणारे व भजनशील असून धर्मावर निष्ठा ठेवणारे धार्मिक असे असतात २८. ते धर्मिष्ठ धार्मिक जन । अष्टधा नामीं नामस्मरण । गजरें करिती सदा पठण । तें नामाभिधान ऐक राया ॥ २९ ॥ ते धर्मिष्ठ धार्मिकजन आठ प्रकारच्या नामांनी नित्य नामस्मरणाचा घोष करतात. हे राजा ! ती नामें कोणतीं तें ऐक २९. विष्णुर्यज्ञः पृश्निगर्भः सर्वदेव उरुक्रमः । वृषाकपिर्जयन्तश्च उरुगाय इतीर्यते ॥ २६ ॥ विष्णु यज्ञ पृश्निजन्म । सर्वदेव उरुक्रम । वृषाकपि जयंतनाम । उरुगाय परम नामें स्मरती ॥ ३३० ॥ विष्णु, यज्ञ, पृश्निगर्भ (सुतपा प्रजापतीची पत्नी 'पृश्नि, तिचा पुत्र म्हणून पृश्निगर्भ), सर्वदेव, उरुक्रम, वृषाकपि, जयंत, उपाय, ह्या श्रेष्ठ नामांनी त्याचे स्मरण चालतें ३३०. द्वापरीं भगवध्द्याउन । ते युगींचें पूजाविधान । भक्त कैसें करिती भजन । नामस्मरण तें ऐक ॥ ३१ ॥ आतां द्वापरयुगामध्यें भक्त भगवंताचें ध्यान, नामस्मरण व भजन कसे करतात तेंही ऐक ३१. द्वापरे भगवाञ्श्यामः पीतवासा निजायुधः । श्रीवत्सादिभिरङ्कैश्च लक्षणैरुपलक्षितः ॥ २७ ॥ द्वापरीं घनश्यामवर्ण । अतसीपुष्पप्रभासमान । पीतांबरपरिधान । श्रीवत्सचिन्हअंपकित ॥ ३२ ॥ द्वापरामध्यें मेघासारखी नीलकांति; जवसाच्या फुलासारखा अंगाचा रंग, पीतांबर परिधान केलेला, आणि श्रीवत्स चिन्हानें विराजमान ३२; शंख-चक्र-पद्म-गदा । चारी भुजा सायुधा । इहीं लक्षणीं गोविंदा । लक्षिती सदा निजभक्त ॥ ३३ ॥ त्याचप्रमाणें शंख, चक्र, गदा, पद्म ही चार आयुधे धारण केलेली, अशा लक्षणांनी, भगवंताचे भक्त सदासर्वकाळ श्रीहरीचें ध्यान करतात ३३. तं तदा पुरुषं मर्त्या महाराजोपलक्षणम् । यजन्ति वेदतन्त्राभ्यां परं जिज्ञासवो नृप ॥ २८ ॥ शशांकछत्र मणि चामर । राजलक्षणीं राजोपचार । यापरी द्वापरींचे नर । अतिसादर पूजेसी ॥ ३४ ॥ चंद्रासारखे शुभ्र छत्र व रत्नखचित चामर, इ. राजलक्षणयुक्त राजोपचार अर्पण करून द्वापरयुगांतील लोक अत्यंत भक्तिभावानें पूजा करतात ३४. शीघ्र पावावया परात्पर । वैदिक तांत्रिक पूजा मिश्र । तत्वजिज्ञासु करिती नर । भजनतत्पर या रीतीं ॥ ३५ ॥ परात्पर असा परमात्मा त्वरित पावावा म्हणून त्याची ते वैदिक व तांत्रिक अशी मिश्रपूजा करतात. अशा रीतीनें तत्त्वजिज्ञासु पुरुष भगवंताचे भजन करतात ३५. ते काळीचें नामस्मरण । जेणें होई कलिमलदहन । त्या नामांचें अभिधान । ऐक सांगेन नृपनाथा ॥ ३६ ॥ कलिमलदहन करणारे असे जे त्या काळचे नामस्मरण, त्या नामांचा प्रकारही राजा तुला सांगतों ऐक ३६. नमस्ते वासुदेवाय नमः सङ्कर्षणाय च । प्रद्युम्नायानिरुद्धाय तुभ्यं भगवते नमः ॥ २९ ॥ नारायणाय ऋषये पुरुषाय महात्मने । विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नमः ॥ ३० ॥ 'वासुदेवा' तुज लोटांगण । 'संकर्षणा' तुज नमन । 'प्रद्युम्रा' प्रणाम पूर्ण । अभिनंदन 'अनिरुध्दा' ॥ ३७ ॥ 'वासुदेवा' तुला लोटांगण घालतों; 'संकर्षणा' तुला नमन करतों, 'प्रद्युम्ना' तुला प्रणाम करतों, 'अनिरुद्धा' तुला अभिवादन करतों ३७. 'नारायणा' ऋषिवरा । 'महापुरुषा' सुरेंद्रा । 'विश्र्वरूपा' विश्र्वेश्र्वरा' । महात्म्या श्रीवरा नमन तुज ॥ ३८ ॥ त्याचप्रमाणें "हे ऋषीश्वरा नारायणा ! हे सुरेंद्रा महापुरुषा ! हे विश्वरूपा ! हे विश्वेश्वरा ! हे महात्म्या श्रीवरा ! तुला नमस्कार असो ३८. 'सर्व भूतीं तूं भूतात्मा' । तुज नमो पुरुषोत्तमा । द्वापरीं ऐशिया नामां । नृपोत्तमा सदा स्मरती ॥ ३९ ॥ हे सर्वभूतात्मन् पुरुषोत्तमा ! तुला नमस्कार असो" द्वापरयुगामध्यें हे राजाधिराजा ! अशा नामांनी त्याचे नित्य स्मरण करतात ३९. त्या नामांच्या पाठा । तेणें देवासी संतोष मोठा । वेगीं सांडोनि वैकुंठा । धावे अवचटा कीर्तनामाजीं ॥ ३४० ॥ त्या नामांच्या घोषानें देवाला मोठा संतोष होतो. आणि तो अकस्मात् वैकुंठ सोडून त्या नामकीर्तनामध्यें त्वरेनें धावत येतो ३४०. इति द्वापर उर्वीश स्तुवन्ति जगदीश्वरम् । नानातन्त्रविधानेन कलावपि तथा शृणु ॥ ३१ ॥ यांहीं नामीं स्तुतिस्तवन । द्वापरींचे करिती जन । आतां कलियुगींचें भजन । तंत्रोक्त विधान ऐक राया ॥ ४१ ॥ द्वापरांतील लोक ह्याच नामांनी स्तुतिस्तवन करतात. आतां हे राजा ! कलियुगांतील भजन आणि तंत्रोक्त विधान सांगतो ऐक ४१. कृष्णवर्णं त्विषाकृष्णं साङ्गोपाङ्गास्त्रपार्षदम् । यज्ञैः सङ्कीर्तनप्रायैर्यजन्ति हि सुमेधसः ॥ ३२ ॥ कलियुगीं श्रीकृष्णदेवो । वर्णूं कृष्णवर्णप्रभावो । प्रभा इंद्रनीळकीळ-समुदावो । मूर्ती तशी पहा हो शोभायमान ॥ ४२ ॥ कलियुगांतील देव श्रीकृष्ण; ह्याकरतां त्या कृष्णकांतीच्या प्रभावाचे वर्णन करूं ! इंद्रनील मण्यांच्या कांतीचा समूह तेजःपुंज दिसावा, तशी त्याची देदीप्यमान कांति ४२. मूर्ति सर्वावयवीं साग्ड़ । वेणुविषाणादि उपांग । चारी भुजा पराक्रमी चांग । आयुधें अव्यंग शंखचक्रादिक ॥ ४३ ॥ त्याची मूर्ति सर्व अवयवांनी रेखल्यासारखी परिपूर्ण असून मुरली, शृंग इत्यादि उपांगेंही त्याच्या सन्निध असतात. चारही भुजा मोठ्या पराक्रमी असून त्या चारही हातांत शंखचक्रादि सर्वांगसुंदर अशी आयुधे शोभतात ४३. पृष्ठभागीं निजपार्षद । नंदसुनंदादि सायुध । कलियुगीं प्रज्ञाप्रबुध्द । यापरी गोविंद चिंतिती सदा ॥ ४४ ॥ पाठीमागे नंद-सुनंदादि सेवक सशस्त्र उभे. कलियुगामधील ज्ञाते अशा रीतीनें श्रीकृष्णाचे नेहमी चिंतन करतात ४४. मधुपर्कादिक विधान । साग्ड़ केलें जें पूजन । तेंही मानोनियां गौण । आवडे कीर्तन कलियुगीं कृष्णा ॥ ४५ ॥ मधुपर्कादिक विधानानें जें यथासांग पूजन केले जातें तेंसुद्धा गौणच मानून कलियुगामध्यें श्रीकृष्णाला कीर्तनच फार आवडते ४५. नवल कैसें राजाधिराजा । कीर्तन तेचि महापूजा । ऐशी आवडी अधोक्षजा । कीर्तनें गरुडध्वजा उल्हासु सदा ॥ ४६ ॥ हे राजाधिराजा ! हे केवढें आश्चर्य आहे पहा की, श्रीकृष्णाला कीर्तन हीच मोठी पूजा वाटते. इतकी कृष्णाला कीर्तनाची आवड. त्याच्या योगानेंच त्या गरुडध्वजाला नेहमी आनंद वाटतो ४६. कीर्तन पढियें गोविंदा । यालागीं सन्मानी नारदा । तो कृष्णकीर्ती पढे सदा । नामानुवादा गर्जतु ॥ ४७ ॥ श्रीकृष्णाला कीर्तन प्रिय आहे, म्हणूनच तो नारदाला फार मान देतो. कारण, तो निरंतर श्रीकृष्णाचीच कीर्ति गात असतो व त्याच्याच नामाचा घोष करीत असतो ४७. कीर्तन करितां नामानुवाद । संकटीं रक्षिला प्रल्हाद । कीर्तनें तुष्टे गोविंद । छेदी भवबंध दासांचा ॥ ४८ ॥ नामसंकीर्तन केल्यामुळेच प्रल्हादाचे संकटांतून त्यानें संरक्षण केले. कीर्तनानें श्रीहरीला संतोष होतो, आणि तो भक्तांचा भवबंध तोडून टाकतो ४८. गजेंद्रें नामस्मरण । करितां पावला नारायण । त्याचें तोडोनि भवबंधन । निजधामा आपण स्वयें नेला ॥ ४९ ॥ गजेंद्रानें नामस्मरण करतांच त्याला नारायण पावला. त्याचे संसारबंधन तोडून त्यानें त्याला स्वतः वैकुंठास नेले ४९. अधमाधम अतिविखटी । तोंडा रामु आला अवचटीं । ते गणिका कीं वैकुंठीं । कृष्णें नामासाठीं सरती केली ॥ ३५० ॥ नीचांतली नीच, अत्यंत पातकी, अशी गणिका म्ह. वेश्या होती. तिच्या तोंडाला अकस्मात् रामनाम आले. तेवढ्या नामोच्चारासाठी श्रीहरीनें तिला वैकुंठांत राहण्यास योग्य केली ३५०. महादोषांचा मरगळा । अतिनष्ट अजामेळा । तोही नामें निर्मळ केला । प्रतापु आगळा नामाचा ॥ ५१ ॥ साऱ्या पातकांचा मूर्तिमंत पुतळा, महानष्ट असा अजामिळ तोसुद्धा नामानेंच पवित्र करून सोडला. ह्याप्रमाणें नामाचा प्रताप अद्भुत आहे ५१. नामें विनटलीं गोविंदीं । ते संकटीं राखिली द्रौपदी । नाम तोडी आधिव्याधी । जाण त्रिशुध्दी दासांची ॥ ५२ ॥ नामस्मरणानें गोविंदाच्या स्वरूपांत तल्लीन झाली त्या द्रौपदीला त्यानें संकटांतून मुक्त केली. खरोखर नाम हें भक्तांच्या आधिव्याधि नाहींशा करून टाकणारे आहे ५२. अंतरशुध्दीचें कारण । मुख्यत्वें हरिकीर्तन । नामापरतें साधन । सर्वथा आन असेना ॥ ५३ ॥ अंतःकरणाच्या शुद्धीला मुख्यत्वेकरून हरिकीर्तन हेच कारण आहे. चित्तशुद्धीला नामासारखे दुसरे साधन नाहींच ५३. कीर्तनीं हरीची आवडी कैशी । वत्सालागीं धेनु जैशी । कां न विसंबे जेवीं माशी । मोहळासी क्षणार्ध ॥ ५४ ॥ कीर्तनांत हरीला कशी आवड असते ? तर वासराला जशी गाय, किंवा मोहळाला जशी मधमाशी एक क्षणभर सोडून राहत नाहीं ५४. तेवीं नाम स्मरतया भक्ता । अतिशयें आवडी अच्युता । दासांची अणुमात्र अवस्था । निजांगें सर्वथा निवारी स्वयें ॥ ५५ ॥ त्याप्रमाणें नामस्मरण करणाऱ्या भक्ताची श्रीहरीला अत्यंत आवड असते. भक्ताला अणुमात्र दुःख झाले, तरी ते तो आपणहून स्वतः निवारण करतो ५५. यालागी हरिकीर्तनीं गोडी । जयासी लागली धडफुडी । त्यासी नाना साधनांच्या वोढी । सोसावया सांकडीं कारण नाहीं ॥ ५६ ॥ ह्याकरतां ज्याला हरिकीर्तनाची खरी खरी गोडी लागली, त्याला इतर साधनांच्या नादांत पडून संकटे सोसण्याचे कारणच नाहीं ५६. ज्यासी कीर्तनीं कथाकथनीं । चौगुण आल्हाद उपजे मनीं । तो उध्दरला सर्व साधनीं । पवित्र अवनी त्याचेनी ॥ ५७ ॥ ज्याला हरीच्या नामसंकीर्तनांत आणि हरीचे गुणानुवाद सांगण्यांत मनामध्यें चौपट आल्हाद होतो, तो सर्व साधनें केल्याप्रमाणें होऊन उद्धरतो. इतकेच नव्हे, तर त्याच्या योगानें सारी पृथ्वीच पवित्र होऊन जाते ५७. एकचि जरी नाम वाचे । सदा वसे श्रीरामाचें । तरी पर्वत छेदोनि पापाचे । परमानंदाचें निजसुख पावे ॥ ५८ ॥ एक श्रीरामाचे नामच जर वाणीमध्यें निरंतर राहील, तर ते पातकांचे पर्वत चूर करून परमानंदाचे सुख प्राप्त करून देईल ५८. आवडीं करितां हरिकीर्तन । हृद्यीं प्रगटे श्रीजनार्दन । त्याहोनि श्रेष्ठ साधन । सर्वथा आन असेना ॥ ५९ ॥ प्रेमानें हरिकीर्तन केले असतां हृदयामध्यें श्रीहरि प्रगट होतो; त्याच्याहून श्रेष्ठ असें दुसरें साधन काहीच नाहीं ५९. थोर कीर्तनाचें सुख । निष्ठा तुष्टे यदुनायक । कीर्तनें तरले असंख्य । साबडे लोक हरिनामें ॥ ३६० ॥ श्रीहरीला कीर्तनाचे सुख फार मोठे वाटते. कीर्तन निष्ठेनें भगवान् संतुष्ट होतो. कीर्तनानें आणि हरिनामानें भोळे भाबडे असंख्य लोक तरून गेले आहेत ३६०. यालागीं कीर्तनाहूनि थोर । आन साधन नाहीं सधर । मा कवण हेतू पामर । कीर्तन नर निंदिती ॥ ६१ ॥ ह्यासाठी कीर्तनापेक्षा थोर असें प्रबळ साधन दुसरे कोणतेच नाही. मग कोणत्या हेतूनें नीच लोक त्याची निंदा करतात बरें ? ६१. एवं नामकीर्तनीं विमुख । ते स्वप्नींही न देखती सुख । कीर्तनद्वेषें मूर्ख । अतिदुःख भोगिती ॥ ६२ ॥ ह्याप्रमाणें नामकीर्तनाला जे विन्मुख होतात, त्यांना स्वप्नांतसुद्धा सुख मिळत नाही. मूर्ख लोक कीर्तनाचा द्वेष करून अत्यंत विपत्ति मात्र भोगतात ६२. ज्यांचे हृद्यींू द्वेषसंचार । जळो जळो त्याचा आचार । सर्व काळ द्वेषी नर । दुःख दुस्तर भोगिती ॥ ६३ ॥ ज्यांच्या हृदयांत द्वेषानें संचार केला, त्यांच्या आचाराला धिक्कार असो. द्वेष करणारे लोक निरंतर अति दुःसह दुःखच भोगीत असतात ६३. कलियुगीं जे बुध्दिमंत । ते नामकीर्तनीं सदा निरत । गौरवूनि नाम स्मरत । हर्षयुक्त सप्रेम ॥ ६४ ॥ कलियुगामध्यें जे बुद्धिमान् पुरुष असतात ते नामसंकीर्तनांतच सदा सर्वकाल मग्न असतात. ते मोठ्या आनंदानें त्या नामाचाच गौरव करून मोठ्या प्रेमानें त्याचे स्मरण करतात ६४. ; नाना अवतार अतिगहन । त्यांत श्रीराम कां भगवान् कृष्ण । यांचें चरित्र अतिपावन । त्यांचें चरणवंदन सांगत ॥ ६५ ॥ मोठमोठाले असे अनेक अवतार आहेत. त्यांत श्रीरामचंद्र आणि भगवान् श्रीकृष्ण ह्यांचेच चरित्र अत्यंत पवित्र आहे. त्यांच्याच चरणाला वंदन करावे, ह्याबद्दल सांगतात ६५. ध्येयं सदा परिभवघ्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् । भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् ॥ ३३ ॥ लय लक्षें ध्यानलक्षणें । देव देवी ध्येय ध्यानें । तृणप्राय केलीं जेणें । हरिचरणस्मरणें तत्काळ ॥ ६६ ॥ वृत्तिलय, प्रत्यगात्मानुसंधान, देव-देवता ह्यांचे ध्यान, सगुण-निगुण ध्येय इत्यादि सर्व एका हरिचरणस्मरणानें तत्काल तृणप्राय करून सोडली ६६. यालागीं ध्यानासी तें वरिष्ठ । ध्यातां छेदी कल्पनादि कष्ट । भक्तांचें अतिअभीष्ट । मनोरथ इष्ट सदा पुरवी ॥ ६७ ॥ म्हणून ध्यान करण्याला तेच म्ह. हरिचरणच एक श्रेष्ठ आहे. त्याचें ध्यान हे कल्पना आदिकरून सारे कष्ट दूर सारून, भक्तांचे अत्यंत अभीष्ट असे मनोरथ सर्वकाल परिपूर्ण करते ६७. नित्य ध्यातां हरीचे चरण । करी भक्तदेहरोगदुःखहरण । इतुकेंच राया नव्हे जाण । करी निर्दळण भवरोगा ॥ ६८ ॥ हे राजा ! नित्य हरीच्या चरणाचे ध्यान केले असतां भक्ताच्या देहांतील रोगांचेच दुःख नाहीसे होते असे नाही, तर ते भवरोगाचेही दुःख दूर करते ६८. भक्तांचे पुरवी मनोरथ । ते तूं म्हणसी विषययुक्त । परमानंदें नित्य तृप्त । निववी निजभक्त चरणामृतें ॥ ६९ ॥ भक्तांचे मनोरथ पूर्ण करतें असें म्हटले, ह्यावरून ते मनोरथ विषयात्मक असतील असें तूं म्हणशील, तर तसे नव्हे. हरिचरणामृत हे भगवद्भक्ताला निर्विषय अशा परमानंदानें नित्य तृप्त करून सोडते ६९. वानूं चरणांची पवित्रता । शिवु पायवणी वाहे माथां । जे जन्मभूमी सकळ तीर्थां । पवित्रपण भक्तां चरणध्यानें ॥ ३७० ॥ त्या चरणांच्या पवित्रतेचे वर्णन काय करावे ? त्याचे तीर्थ प्रत्यक्ष शंकरही मस्तकावर धारण करतात. हरीचे चरण म्हणजे साऱ्या तीर्थांची जन्मभूमीच होय. म्हणून त्या चरणांच्या ध्यानानें भक्तालासुद्धा पवित्रपणाच येतो ३७०. अवचटें लागल्या चरण । पवित्र झाले पाषाण । मा जे जाणोनि करिती ध्यान । त्यांचें पवित्रपण काय वानूं ॥ ७१ ॥ अकस्मात् चरण लागल्यामुळें पाषाणसुद्धा पवित्र होऊन गेले. मग जे जाणूनबुजून त्यांचे ध्यान करतात, त्यांच्या पवित्रपणाचे वर्णन किती करावें ? ७१. जो सदा शत्रुत्वें वर्ततां । जेणें चोरून नेली निजकांता । त्याच्या बंधू शरणागता । दिधली आत्मता निजभावें ॥ ७२ ॥ जो रावण सर्वकाळ शत्रुत्वानें वागला, ज्यानें त्याची प्रत्यक्ष स्त्री चोरून नेली, त्याचा प्रत्यक्ष बंधु शरण आला असता त्याला निजभावानें आत्मता देऊन सोडली ७२. कोरडी आत्मतेची थोरी । तैशी नव्हे गा नृपकेसरी । देऊनि सुवर्णाची नगरी । अचळतेवरी स्थापिला ॥ ७३ ॥ हे राजाधिराजा ! त्याला कोरडी म्ह. केवळ आत्मताच दिली नाही, तर सोन्याची नगरीही देऊन त्याला अढळपणानें स्थापन केले ७३. यालागीं शरणागतां शरण्य । सत्य जाण हरीचे चरण । यापरतें निर्भय स्थान । नाहीं आन निजभक्तां ॥ ७४ ॥ म्हणून शरणागताला शरण जाण्याला योग्य असेच खरोखर हरीचे चरण आहेत. भगवद्भक्तांना त्यासारखे दुसरें निर्भय स्थानच नाहीं ७४. भक्तांची अणुमात्र व्यथा । क्षण एक न साहवे भगवंता । प्रल्हादाची अतिदुःखता । होय निवारिता निजांगें ॥ ७५ ॥ भक्ताला किंचितही दुःख झाले तरी ते भगवंताला क्षणभरही सहन होत नाही. प्रल्हादाचे दुःसह दुःख त्यानें स्वतः जाऊन निवारण केले. ७५. दावाग्नि गिळूनि अंतरीं । गोपाळ राखिले वनांतरीं । पांडव जळतां जोहरीं । काढिले बाहेरी विवरद्वारें ॥ ७६ ॥ दावाग्नि पोटामध्यें गिळून टाकून वनांत गोपाळांचे संरक्षण केले. पांडव लाक्षागृहांत जळत असतां विवरद्वारांतून त्यांना बाहेर काढले ७६. करूनि सर्वांगाचा वोढा । नित्य निवारी भक्तांची पीडा । जो कां भक्तांचिया भिडा । रणरंगीं फुडां वागवी रथु ॥ ७७ ॥ जो आपले सर्वांग झिजवून निरंतर भक्तांची पीडा निवारण करतो; जो भक्तांच्या प्रेमास्तव रणांगणामध्यें स्वतः रथ हांकतो ७७; ते चरण वंदितां साष्टांगीं । भक्तां प्रतिपाळी उत्संगी । ऐसी प्रणतपाळु कृपावोघीं । दुसरा जगीं असेना ॥ ७८ ॥ अशा त्याच्या चरणाला साष्टांग नमस्कार घातला असता, तो भक्ताला आपल्या मांडीवर घेऊन त्याचा प्रतिपाळ करतो. असा शरणागताचे रक्षण करणारा दयाशील जगामध्यें दुसरा कोणी नाहीं ७८. तरावया भवाब्धि प्रबळ । चरणांची नाव अडंडळ । अनन्यशरण सकळ । तारी तत्काळ चरणानुरागें ॥ ७९ ॥ प्रचंड संसारसमुद्र तरून जाण्याला हरिचरणाचीच अढळ नौका आहे; अनन्यशरण येतील त्या सर्वांना तो चरणकृपेनें तारून नेतो ७९; ते महापुरुषाचे श्रीचरण । शरणागता निजशरण्य । ज्यांचें सनकादिक ध्यान । करिती अभिवंदन सभ्दावें ॥ ३८० ॥ शरणागतांस अत्यंत आश्रयभूत असे जे त्या महापुरुषाचे चरण, ज्यांचे सनकादिकही ध्यान व अभिनंदन करतात ३८० अगाध चरणांचें महिमान । वानितां वेदां पडिलें मौन । ब्रह्मा सदाशिव आपण । करितां स्तवन तटस्थ ठेले ॥ ८१ ॥ अशा त्या चरणांचा अगाध महिमा वर्णन करतांना वेदांनासुद्धा मौन पडलें, ब्रह्मदेव व शंकरसुद्धा स्वतः स्तवन करता करता तटस्थ होऊन राहिले ८१. अगम्य अतर्क्य श्रीचरण । जाणोनि ब्रह्मादिक ईशान । साष्टांगें अभिवंदन । करूनियां स्तवन करिती ऐसें ॥ ८२ ॥ ते श्रीकृष्णाचे चरण केवळ अतर्क्य व अगम्य आहेत. हे जाणून ब्रह्मदेव व ईशान म्हणजे शंकर इत्यादिक साष्टांग नमस्कार करून त्यांचे (चरणारविंदांचे) स्तवन करूं लागले ते असें ८२. त्यक्त्वा सुदुस्त्यजसुरेप्सितराज्यलक्ष्मीं धर्मिष्ठ आर्यवचसा यदगादरण्यम् । मायामृगं दयितयेप्सितमन्वधावद् वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् ॥ ३४ ॥ जे राज्यश्रियेकारणें । अमर लोलंगत मनें । तें राज्य श्रीरामें त्यागणें । वचनाकारणें पित्याच्या ॥ ८३ ॥ जें राज्यवैभव मिळविण्यासाठी देवांनीही लाळ घोंटावी, असले राज्य श्रीरामचंद्रानें एका पित्याच्या वचनाकरतां टाकून दिले. ८३. श्रीराम धर्मिष्ठ चोख । पितृवचनप्रतिपाळक । उभ्दट राज्य सांडोनि देख । निघे एकाएक वनवासा ॥ ८४ ॥ श्रीराम हा खरा खरा धर्मनिष्ठ, आणि पितृवचनाचे पालन करणारा होता. म्हणून एवढे मोठे राज्य सोडून एकटा वनवासाला निघून गेला ८४. वनवासा चरणीं जातां । सवें घेतली प्रिया सीता । येणें बोलें स्त्रीकामता । श्रोतीं सर्वथा न मानावी ॥ ८५ ॥ वनवासाला पायीं जात असतांही प्रिय सीतेला बरोबर घेतले, म्हणून श्रोत्यांनी त्याला स्त्रीलंपट मात्र समजू नये ८५. तरी केवळ स्त्री नव्हे सीता । ते निजभक्त जाण तत्वतां । सांडूनि राजभोगा समस्तां । सेवेच्या निजस्वार्था वना आली ॥ ८६ ॥ कारण सीता केवळ स्त्री नव्हती; भगवंताची तो निस्सीम भक्त होती. म्हणून सारे राजभोग सोडून देऊन श्रीरामाच्या सेवेच्या स्वार्थानें तिनें रामाबरोबरचा वनवास पत्करला ८६. राज्यीं असतां रघुवीरें । दास्य दासां वांटलें अधिकारें । ते मी एकली एकसरें । सेवा वनांतरीं अवघीचि करीन ॥ ८७ ॥ कारण राज्यावर असतांना रामचंद्रांनी आपली सेवा साऱ्या सेवकांना त्यांच्या त्यांच्या अधिकाराप्रमाणें वाटून दिली होती, ती सारीच सेवा वनामध्यें मी एकटीच करून राहीन ८७. ते सेवा यावया हाता । सकळ सेवेच्या निजस्वार्था । चरणचालीं चालोनि सीता । आली तत्वतां वनवासासी ॥ ८८ ॥ असा हेतु मनांत धरून सेवा घडावी आणि आपण कृतार्थ व्हावे ह्याकरतांच खरोखर पायांनी चालत सीता वनवासाला गेली ८८. कैसें श्रीरामसेवेचें सुख । चरणीं चालतां नाठवे दुःख । विसरली मायामाहेरपक्ष । अत्यंत हरिख सेवेचा ॥ ८९ ॥ श्रीरामाच्या सेवेचे सुख काय सांगावें ? पायानें चालतांना तिला दुःखाची आठवणसुद्धा झाली नाही. मायेचे माहेरही ती विसरली. इतका तिला सेवेचा आनंद वाटत होता ८९. ऐशिया मनोगत-सभ्दावा । वना आली करावया सेवा । श्रीराम जाणे भक्तभावा । येरां देवां दानवां कळेना ॥ ३९० ॥ अशा मनांतील परिपूर्ण भक्तीनेंच ती वनामध्यें सेवेसाठी आली होती. ती भक्ताची भक्ति, एक श्रीरामचंद्रच जाणणारे, इतर देवांना किंवा दानवांना ती कळणार नाहीं ३९०. निजभक्तांचें मनोगत । जाणता एक रघुनाथ । कां श्रीरामसेवेचा स्वार्थ । जाणती निजभक्त भजनानंदें ॥ ९१ ॥ निजभक्तांचे मनोरथ जाणावे रघुनाथानेच; तसेच त्याच्या सेवेचा स्वार्थ भजनानंदानें जाणावा त्याच्या भक्तांनींच ९१. भगवभ्दजनाचें सुख । भक्त जाणती भाविक । भावेंवीण भजनसुख । अनोळखी अभाविकां ॥ ९२ ॥ भगवद्भजनाचे सुख काय असतें तें एक भाविक भक्तच जाणतात. भावावांचून ते भजनसुख अभाविकांना कळत नाहीं ९२. पूर्ण भाविक भक्त सीता । हें कळलेंसे रघुनाथा । यालागीं तिचिया वचनार्था । होय धांवता मृगामागें ॥ ९३ ॥ सीता ही पूर्ण भाविक भक्त आहे, हे श्रीरघुनाथाला कळलेले होते, म्हणूनच ते तिच्या बोलण्यावरून मृगाच्या मागे धावत गेले ९३. मायिक मृगाचें सुवर्णभान । जरी जाणे रघुनंदन । तरी भक्तलळे पाळण । करी धावन मृगामागें ॥ ९४ ॥ त्या मायिक मृगाचा मिथ्या सोनेरीपणा जरी श्रीराम पूर्णपणे जाणून होते, तरी भक्ताचे लळे पुरविण्याकरतां ते त्या मृगाच्या मागे धावले ! ९४. बाळकाचेनि छंदें जाण । जेवी माउली नाचे आपण । तेवीं मायामृगापाठीं धावन । करी रघुनंदन निजभक्तवाक्यें ॥ ९५ ॥ बाळकाचा छंद पुरविण्याकरतां ज्याप्रमाणें आई आपण नाचूं लागते, त्याचप्रमाणें आपल्या भक्ताच्या सांगीवरून रामही या कपटमृगाच्या मागे धावले ९५. जो राम वानरांच्या गोष्टी । ऐकतां विकल्प न धरीं पोटीं । तो सीतेच्या वचनासाठीं । धांवे मृगापाठीं नवल कायी ॥ ९६ ॥ वानरांच्या गोष्टी ऐकतांनासुद्धा ज्या रामचंद्राच्या मनांत कधी विकल्प येत नसे, तो सीतेच्या बोलण्यावरून मृगाच्या मागे धावला, ह्यांत नवल ते काय ? ९६. भलतैसें भक्तवचन । मिथ्या न म्हणे रघुनंदन । यालागीं निजचरणीं धावन । करी आपण मृगामागें ॥ ९७ ॥ भक्ताचे बोलणे, मग ते कसलेही असो, राम खोटें म्हणतच नव्हता. म्हणून तो आपण आपल्या पायांनी धावत मृगाच्या मागे गेला ९७. एवं भक्तवाक्यें उठाउठी । जो पायीं धांवे मृगासाठीं । ज्याचे चरणरेणु अणुकुटी । वंदिती मुकुटीं शिवादि सर्व ॥ ९८ ॥ जो आपल्या भक्ताच्या बोलण्यावरून तत्काळ मृगाच्या मागे पायांनी धावत गेला, ज्याच्या पायाची धूळ शंकरादि सारे देव आपल्या मस्तकावर वंदन करतात ९८, तो मृगामागें धांवतां जाण । पावन केले पाषाण । त्याच्या चरणां अनन्य शरण । अभिवंदन सभ्दावें ॥ ९९ ॥ तो मृगामागे धावत असतां त्यानें पाषाणसुद्धा पावन करून सोडले. त्याच्या चरणाला अनन्यभावानें शरण जाऊन परमभक्तीनें वंदन करूं या ९९. एवं महापुरुषाचे चरण । अभिवंदनें करिती स्तवन । कलियुगीं कीर्तनें जन । परम पावन नित्ययुक्त ॥ ४०० ॥ अशा प्रकारे त्या महापुरुषाच्या चरणाला अभिवंदन करून सर्व देव त्याचे स्तवन करूं लागले. कीर्तनानें कलियुगांतील लोकही परम पावन होऊन नित्यमुक्त होतात ४००. एवं युगानुरूपाभ्यां भगवान्युगवर्तिभिः । मनुजैरिज्यते राजन्श्रेयसामीश्वरो हरिः ॥ ३५ ॥ एवं कृतादि-कलियुगवरी इहीं नामीं रूपीं अवतारीं । सभ्दावें तैंच्या नरीं । भजिजे श्रीहरी श्रेयार्थ ॥ १ ॥ अशा प्रकारे कृतयुगापासून कलियुगापर्यंतचे लोक स्वहिताकरतां श्रीहरीचे ह्या नामांनी, ह्या रूपांनी व ह्या अवतारलीला गायनांनी भक्तिपुरस्सर भजन करतात १. त्यांमाजीं कलियुगाची थोरी । वानिजे सभ्दावें ऋषीश्र्वरीं । येथें हरिकीर्तनावरी । मुक्ती चारी वोळगण्या ॥ २ ॥ त्यांतसुद्धा मोठमोठ्या ऋषींनी कलियुगाची थोरवी फारच वर्णन केलेली आहे. कारण, ह्या युगांत हरिकीर्तनामुळेच चारही मुक्ति दासी होऊन राहिलेल्या असतात २. कलिं सभाजयन्त्यार्या गुण ज्ञाः सारभागिनः । यत्र सङ्कीर्तनेनैव सर्वस्वार्थोऽभिलभ्यते ॥ ३६ ॥ अवधारीं राया सर्वज्ञा । धन्य धन्य कलियुग जाणा । जेथ सर्व स्वार्थ हरिकीर्तना-। नामस्मरणासाठीं होती ॥ ३ ॥ हे सर्वज्ञ राजा ! ऐक. कलियुग हे अत्यंत धन्य होय. कारण, त्यांत हरिकीर्तन आणि नामस्मरण येणेकरूनच सर्व मनोरथ सिद्धीस जातात ३. कलियुगीं दोष बहुत । केवीं कीर्तनें होय स्वार्थ । तेथें दोषत्यागें जे गुण घेत । ते नित्यमुक्त हरिकीर्तनीं ॥ ४ ॥ कलियुगामध्यें पातकें फार होतात. तेव्हां केवळ कीर्तनानें स्वार्थ कसा साधतो ? तर तेथे दोषांचा त्याग करून गुणांचेच जे ग्रहण करतात, ते हरिकीर्तनानें नित्यमुक्त होतात ४. हरिकीर्तनें शुध्द चित्त । दोषत्यागें गुण संग्रहीत । ऐसे सारभागी कलियुगांत । परममुक्त हरिकीर्तने ॥ ५ ॥ हरिकीर्तनानें चित्त शुद्ध झाल्यामुळें दोषांचा त्याग करून गुणांचे ग्रहण केले जाते. अशा प्रकारे सारग्रहण करणारे लोक कलियुगामध्यें हरिकीर्तनानेंच परममुक्त होतात ५. कलीच्या गुणांतें जाणते । नामें मोक्ष जोडणें येथें । जाणोनि करिती कीर्तनातें । ते जाण निश्र्चितें नित्यमुक्त ॥ ६ ॥ कलीचे गुण जाणणारे लोक नामानेंच येथे मोक्ष मिळतो हे लक्षात घेऊन कीर्तनच करतात; आणि ते खरोखर नित्यमुक्त होतात ६. कलियुगीं हेंचि सार । नाम स्मरावें निरंतर । करिती नामाचा निजगजर । ते मुक्त नर नृपनाथा ॥ ७ ॥ कलियुगामध्यें निरंतर नामस्मरण करावें, हेच काय तें सार आहे. हे राजेंद्रा ! नामाचा जे नित्य घोष करतात, ते पुरुष मुक्तच होतात ७. संमत श्लोक - ध्यायन् कृते यजन्यज्ञैस्त्रेतायां द्वापरेऽर्चयन् । यदाप्नोति कलौ संकीर्त्य केशवम् ॥ कृतयुगीं शमदमादिसाधन । त्रेतायुगीं वेदोक्त यज्ञ । द्वापरीं आगमोक्त पूजन । तंत्रविधान विधियुक्त ॥ ८ ॥ कृतयुगांत शमदमादि साधन; त्रेतायुगांत वेदोक्त यज्ञ; आणि द्वापरयुगांत आगमोक्त तंत्रविधानयुक्त पूजन हें साधन आहे ८. यापरी त्रियुगीं जना । परम संकट साधना । करितांही परी मना । अणुमात्र जाणा उपरमु नव्हे ॥ ९ ॥ ह्याप्रमाणें तिन्ही युगांतील लोकांना, परम संकटाची साधनें केली तरी मनाला अणुमात्रही शांति प्राप्त होत नाहीं ९. तीं अवघींच साधनें । कलीनें लाजविलीं कीर्तनें । जेथ गातां नाचतां आपणें । वश्य करणें परमात्मा ॥ ४१० ॥ पण कलीनें कीर्तनाच्या योगानें त्या साऱ्याच साधनांना लाजविलें. परमात्म्याला कीर्तनांत गात नाचत वश करून घेता येते ४१०. आखरीं हुंबळी गुणें । ऐकतां गोवळांचें गाणें । देव भुलला जीवेंप्राणें । त्यांसवें नाचणें स्वानंदें ॥ ११ ॥ 'आखरीं' म्हणजे गांवाबाहेर गुरे एकत्र करण्याच्या जागेत, अथवा यमुनातीरावरील वाळवंटांत हुंबरी-हमामाचा खेळ खेळतांना गवळ्यांच्या पोरांची ती प्रेमाची गाणी ऐकून देव अगदी भुलून जातो व त्यांच्याबरोबर आनंदानें नाचू लागतो ११. कृष्णा कान्हो गोपाळा । या आरुष नामांचा चाळा । घेऊन गर्जती वेळोवेळां । तेणें घनसांवळा सुखावे ॥ १२ ॥ कृष्णा, कान्ह्या, गोपाळा ! अशा लाडक्या पण वेड्यावाकड्या नामांचा चाळा घेऊन गवळ्यांची मुले वेळोवेळां गर्जना करतात; त्याच्या योगानें तो घनश्याम सुखावतो १२. तेणें सुखाचेनि संतोषें । देवो परमानंदें उल्हासे । एवं कलियुगीं कीर्तनवशें । भक्त अनायासें उध्दरती ॥ १३ ॥ त्या सुखाच्या भरानें देवाला परमानंदाची उकळी येते. तात्पर्य, ह्याप्रमाणें कलियुगांत कीर्तनाच्या योगानें भक्त अनायासेंच उद्धरून जातात १३. कीर्तनआयवर्तनमेळीं । जळती पापांच्या वडवाळी । भक्त उध्दरती तत्काळीं । हरिनामें कलि दाटुगा ॥ १४ ॥ कीर्तनाची आवर्तनें चालू झाली म्हणजे पातकांच्या राशी दग्ध होऊन जातात, आणि भक्तांचा तत्काल उद्धार होतो. हरिनामामुळें कलीला मोठेपणा आला आहे १४. कलियुगीं हेचि थोरी । नामसंकीर्तनावारी । चहूं वर्णां मुक्त करी । तेथ न विचारी स्त्री शूद्र ॥ १५ ॥ कलियुगाची हीच थोरवी आहे की, नामसंकीर्तनाच्या योगानें चारही वर्ण मुक्त होतात. त्यांत स्त्रिया किंवा शूद्ध असा विचार राहात नाहीं १५. वेदु अत्यंत कृपणु जाला । त्रिवर्णांचे कानीं लागला । स्त्रीशूद्रादिकांसी अबोला । धरूनि ठेला अद्यापि ॥ १६ ॥ वेद अत्यंत कृपण होऊन तीन वर्णांच्याच (ब्राह्मणक्षत्रिय-वैश्य ह्यांच्याच) कानाशी लागला. स्त्री-शूद्रांशी त्यानें अबोला धरला, तो अद्याप कायमच आहे १६. तें वेदाचें अतिन्यून । उध्दरीं हरिनामकीर्तन । स्त्री शूद्र अंत्यज जन । उध्दरण हरिनामें ॥ १७ ॥ त्या वेदाची ही मोठी उणीव हरिनामकीर्तनानें काढून टाकली. कारण, हरीच्या नामानें स्त्री, शूद्र, किंवा अंत्यज लोकसुद्धा उद्धरून जातात १७. कीर्तनें स्वधर्मु वाढे । कीर्तनें स्वधर्मु जोडे । कीर्तनें परब्रह्म आतुडे । मुक्ति कीर्तनापुढें लाजोनि जाय ॥ १८ ॥ कीर्तनानें स्वधर्म जोडतो; कीर्तनानेंच स्वधर्म वाढतो; कीर्तनानेंच परब्रह्म प्राप्त होते; फार काय सांगावे ? मुक्तीसुद्धा कीर्तनापुढे लाजून जाते १८. कीर्तनानंदें चारी मुक्ति । हरिभक्तांतें वरूं येती । भक्त त्यांतें उपेक्षिती । तरी पायां लागती दास्यत्वें ॥ १९ ॥ कीर्तनाच्या आनंदामुळें चारही मुक्ति हरिभक्तांना वरण्यास येतात; पण भक्त त्यांना धुडकावून लावतात; तरी त्या दासी होऊन त्यांच्या पायाला लागतातच १९. एवढी कलियुगीं प्रचीती । कीर्तनाची परम ख्याती । राया जाण गा निश्र्चितीं । विकल्प चित्तीं झणें धरिसी ॥ ४२० ॥ हे राजा ! कलियुगामध्यें एवढा साक्षात्कार आहे. कीर्तनाची ख्याति खरोखर मोठी आहे ह्याबद्दल तूं मनामध्यें यकिंचितही विकल्प धरूं नकोस ४२०. कृतत्रेताद्वापारासी । निषेधु नाहीं नामासी । कलियुगीं नामापाशीं । चारी मुक्ती दासी स्वयें होती ॥ २१ ॥ कृतयुग असो, त्रेतायुग असो, की द्वापरयुग असो, नामाला केव्हांच निषेध नाही; पण कलियुगांत चारही मुक्ति, नामापाशी स्वतःच दासी होऊन राहतात (हा ह्यांत विशेष गुण आहे) २१. न ह्यतः परमो लाभो देहिनां भ्राम्यतामिह । यतो विन्देत परमां शान्तिं नश्यति संसृतिः ॥ ३७ ॥ जे जन्ममरणांच्या आवर्तीं । पडिले संसारी सदा भ्रमती । त्या प्राणियां कलियुगाप्रती । कीर्तनें गती नृपनाथा ॥ २२ ॥ हे राजेश्वरा ! जे कोणी जन्ममरणाच्या भोवऱ्यात सांपडून संसारामध्यें गिरक्या खात असतात, त्या प्राण्यांना कलियुगामध्यें कीर्तनानेंच सद्गति प्राप्त होते २२. कलियुगीं कीर्तनासाठीं । संसाराची काढूनि कांटी । परमशांतिसुखसंतुष्टीं । पडे मिठी परमानंदीं ॥ २३ ॥ कलियुगामध्यें कीर्तनानेंच संसाराचे कुंपण उखडून जाऊन शांतिसुखाच्या अनुभवानें परमानंदाला मिठी पडते २३. ऐसा कीर्तनीं परम लाभु । शिणतां सुरनरां दुर्लभु । तो कलियुगीं झाला सुलभु । यालागी सभाग्यां लोभु हरिकीर्तनीं ॥ २४ ॥ असा कीर्तनामध्यें मोठा लाभ आहे. देवांना किंवा मानवांना (इतर युगांत) कष्ट करूनसुद्धा तो प्राप्त होत नाही. पण कलियुगांत तो सुलभ झाला आहे. म्हणूनच भाग्यवान् लोक हरिकीर्तनाचा मोठा लोभ धरतात २४. 'कीर्तनास्तव चारी मुक्ती । भक्तांपासीं वोळंगती । हें न घडे ' कोणी म्हणती । ऐक ते स्थिती नृपनाथा ॥ २५ ॥ कीर्तनामुळें चारही मुक्ति येऊन भक्तांच्या गळी पडतात. कोणी म्हणतील की, असे घडावयाचें नाहीं; तर राजा ! त्याची स्थिति म्हणजे उपपत्ति सांगतों ऐक २५. कीर्तनीं हरिनामाचा पाठा । तेणें देवासी संतोष मोठा । वेगीं सांडोनि वैकुंठा । धांवे अवचटा कीर्तनामाजीं ॥ २६ ॥ कीर्तनामध्यें हरिनामाचा घोष चालतो, त्यामुळें देवाला मोठा संतोष होतो; आणि तो वैकुंठ सोडून त्वरेनें कीर्तनामध्यें धावत येतो २६. हरिकीर्तना लोधला देवो । विसरला वैकुंठा जावों । तोचि आवडला ठावो । भक्तभावो देखोनी ॥ २७ ॥ देव आपल्या गुणकीर्तनाला अतिशय लुब्ध असतो. तो वैकुंठाला जावयाचेंच विसरतो. भक्ताची भक्ति पाहून त्याला तेंच स्थान आवडते २७. जेथ राहिला यदुनायक । तेथेचि ये वैकुंठलोक । यापरी मुक्ति 'सलोक' । कीर्तनें देख पावती भक्त ॥ २८ ॥ अर्थात जेथें यदुनायक राहतो, तेथेच वैकुंठलोकही येतो, ह्याप्रमाणें भक्त कीर्तनानेंच 'सलोकता' मुक्ति प्राप्त करून घेतात असे समज २८. नामकीर्तन-निजगजरीं । भक्तां निकट धांवे श्रीहरी । तेचि 'समीपता' मुक्ति खरी । भक्तांच्या करीं हरिकीर्तनें ॥ २९ ॥ नामकीर्तनाच्या गजरामुळे, श्रीहरि भक्तांच्या समीप धावून येतो. हीच 'समीपता' मुक्ति होय. हरिकीर्तनानेंच भक्तांच्या हाताला ती चढते २९. कीर्तनें तोषला अधोक्षज । भक्ता प्रत्यक्ष गरुडध्वज । श्याम पीतवासा चतुर्भुज । तें ध्यान सहज ठसावे ॥ ४३० ॥ कीर्तनानें भगवान् संतुष्ट झाला म्हणजे भक्ताला तो प्रत्यक्ष दर्शन देतो. त्याचे श्यामसुंदर पीतांबरधारी ध्यान भक्ताच्या मनामध्यें सहज ठसते ४३०. भक्तु कीर्तन करी जेणें ध्यानें । तें ध्यान दृढ ठसावें मनें । तेव्हां देवाचीं निजचिन्हें । भक्तें पावणें संपूर्ण ॥ ३१ ॥ ज्या ध्यानानें भक्त कीर्तन करतो, तेंच ध्यान मनामध्यें दृढतर ठसते त्या वेळी देवाची रूपलक्षणे भक्ताला प्राप्त होतात ३१. श्याम चतुर्भुज पीतांबरधारी । शंखचक्रादि आयुधें करीं । हे 'सरूपता' भक्तातें वरी । कीर्तनगजरीं भाळोनी ॥ ३२ ॥ श्यामसुंदर, चतुर्भुज, पीतांबर धारण करणारा, शंखचक्रादि आयुधें हातांत, अशी जी 'सरूपता' ती कीर्तनगजराला भुलून भक्ताला माळ घालते ३२. तेव्हां देव भक्त समसमान । समान अवयव सम चिन्ह । भावें करितां हरिकीर्तन । एवढें महिमान हरिभक्तां ॥ ३३ ॥ तेव्हां देव आणि भक्त समसमान होतात. दोघांचे अवयव सारखे व दोघांची आयुधा-लंकारादि चिन्हेंही सारखीच. भक्तिभावानें हरिकीर्तन केले असतां हरिभक्तांना एवढा महिमा प्राप्त होतो ३३. दोघां एकत्र रमा देखे । देवो कोण तेंही नोळखे । ब्रह्मा नमस्कारीं चवके । देवो तात्विकें न कळे त्यासी ॥ ३४ ॥ लक्ष्मी जेव्हा दोघांना एके ठिकाणी पाहाते, तेव्हां देव कोणता व भक्त कोणता हे तीही ओळखू शकत नाहीं ! ब्रह्मदेवसुद्धा नमस्कार करतांना बिचकतो. देव खरा कोणता हे त्यालासुद्धा कळत नाहीं ३४. भावें करितां हरिकीर्तन । तेणें संतोषे जनार्दन । उभयतां पडे आलिंगन । मिठी परतोन सुटेना ॥ ३५ ॥ शुद्ध भावानें हरिकीर्तन केले असतां जनार्दनाला संतोष होतो. देव-भक्तांना आलिंगन पडते व ती मिठी पुन्हा कधी सुटत नाहीं ३५. तेव्हां सबाह्यांतरीं । देवो प्रगटे चराचरीं । दुजें देखावया संसारीं । सर्वथा उरी उरेना ॥ ३६ ॥ तेव्हां सबाह्यांतरी चराचरांत देव प्रगट होऊन राहतो. त्याला संसारांत दुसरें असें दिसावयाला काहींच राहात नाहीं ३६. वृत्ति स्वानंदीं निमग्न । परतोनि कदा नव्हे भिन्न । 'सायुज्यमुक्ति' या नांव पूर्ण । जेणें दुजेपण असेना ॥ ३७ ॥ ह्याप्रमाणें वृत्ति स्वानंदांत मग्न होऊन पुन्हा कधीही भिन्न होईनाशी झाली, म्हणजे तिलाच 'सायुज्यमुक्ति' असे म्हणतात. तिच्यामध्यें भिन्नभाव कसला तो राहातच नाहीं ३७. ऐशी लाहूनि पूर्ण सायुज्यता । तो जैं करी हरिकथा । ते कथेची तल्लीनता । जीवां समस्तां अतिप्रिय ॥ ३८ ॥ अशी पूर्ण सायुज्यता संपादन करून तो जेव्हां हरिकथा करूं लागतो, तेव्हां त्या कथेची तल्लीनता सर्व प्राण्यांना अत्यंत प्रिय होते ३८. यापरी हरिकीर्तनापासीं । चारी मुक्ती होती दासी । भक्त लोधले हरिभजनसी । सर्वथा मुक्तीसी न घेती ॥ ३९ ॥ अशा रीतीनें हरिकीर्तनापाशीं चार्ही मुक्ति दासी होऊन राहतात; म्हणून भक्त हे हरिभजनालाच लुब्ध होऊन जातात; मुक्तीला ते मुळीच घेत नाहीत; ३९. एवं योगयागादि तपसाधनें । पोरटीं केलीं हरिकीर्तनें । कलियुगीं नामस्मरणें । जड उध्दारणें हरिकीर्तनीं ॥ ४४० ॥ ह्याप्रमाणें योग, याग, तप इत्यादि साधनांना, हरिकीर्तनानें अगदी पोरकी करून सोडली आहेत ! कलियुगामध्यें नामस्मरणानें आणि हरिकीर्तनानेंच जडजीवांचा उद्धार होतो ४४०. कृतादिषु प्रजा राजन्कलाविच्छन्ति सम्भवम् । कलौ खलु भविष्यन्ति नारायणपरायणाः ॥ ३८ ॥ क्वचित्क्वचिन्महाराज द्रविडेषु च भूरिशः । ताम्रपर्णी नदी यत्र कृतमाला पयस्विनी ॥ ३९ ॥ कावेरी च महापुण्या प्रतीची च महानदी । ये पिबन्ति जलं तासां मनुजा मनुजेश्वर । प्रायो भक्ता भगवति वासुदेवेऽमलाशयाः ॥ ४० ॥ कीर्तनासाठीं चारी मुक्ति । हेचि कलियुगीं मुख्य भक्ति । यालागीं इंद्रादि देवपंक्ति । जन्म इच्छिती कलियुगीं ॥ ४१ ॥ कीर्तनामुळें चारही मुक्ति प्राप्त होतात, म्हणून कलियुगांत ही कीर्तनभक्तिच मुख्य आहे. ह्याकरतांच इंद्रादि देवगणसुद्धा कलियुगामध्यें जन्म होण्याची इच्छा करतात ४१. स्वर्ग नव्हे भोगस्थान । हें विषयाचें बंदिखान । कलियुगीं सभाग्य जन । जन्मोनि कीर्तन हरीचें करिती ॥ ४२ ॥ स्वर्ग हें भोगाचे स्थान नव्हे, तर तो एक विषयांचा बंदिखानाच आहे. म्हणून भाग्यवान् जीव कलियुगांत जन्म घेऊन हरीचे कीर्तन करतात ४२. जेथीच्या जन्मा देव सकाम । तेथ कृतादि युगींचे उत्तमोत्तम । प्रजा अवश्य वांछिती जन्म । कीर्तनधर्म निजभजना ॥ ४३ ॥ कलियुगांतील जन्माची स्वर्गातील देवही जर इच्छा करतात, तर कृतादि युगांतील उत्तमोत्तम लोक कीर्तनधर्मरूप भजनासाठींच मुद्दाम जन्माची इच्छा करतील ह्यांत काय आश्चर्य ? ४३. कृतयुगींचे सभाग्य जन । यागीं पावले स्वर्गस्थान । तेही कलियुगीचें जाण । जन्म आपण वांछिती ॥ ४४ ॥ कृतयुगांतील भाग्यवान् लोकांनी यज्ञयाग करून स्वर्गाचें स्थान मिळविले; पण तेसुद्धा कलियुगांतील जन्माची इच्छा करतात ४४. कृत त्रेत आणि द्वापर । तेथीलही मुख्य नर । कलियुगीं जन्म तत्पर । निरंतर वांछिती ॥ ४५ ॥ कृत, त्रेत, आणि द्वापर, ह्या तीनही युगांतील श्रेष्ठ पुरुषसुद्धा कलियुगांत जन्म घेऊन येण्याची नेहमी इच्छा करतात ४५. तैंचे लोक करिती गोष्टी । चारी पुरुषार्थ कीर्तनासाठीं । कलियुगीं हे महिमा मोठी । धन्य धन्य सृष्टीं कलियुग ॥ ४६ ॥ त्या काळचे लोक आपसांत बोलत असतात की, कीर्तनामुळें चारही पुरुषार्थ साध्य होतात हाच कलियुगाचा महिमा आहे. आणि ह्याकरतांच सृष्टीमध्यें कलियुग मोठे धन्य होय ४६. जे असती धन्यभागी । ते जन्म पावती कलियुगीं । ऐसें कलीच्या जन्मालागीं । नर-सुर-उरगीं उत्कंठा ॥ ४७ ॥ जे खरे भाग्यवान् असतात, तेच कलियुगांत जन्म पावतात. तात्पर्य, कलियुगांत जन्म येण्यासाठी देवांना, मानवांना व उरगांनाहीं उत्कंठा लागून राहिलेली असते ४७. तरावया दीन जन । कलीमाजीं श्रीनारायाण् । नामें छेदी भवबंधन । तारी हरिकीर्तन सकळांसी ॥ ४८ ॥ दीन दुबळ्यांचा उद्धार व्हावा म्हणून कलियुगांत श्रीनारायण नामस्मरणानेंच संसारबंधन तोडून टाकतो. सारांश, हरिकीर्तन सर्वांनाच संसारांतून तारतें ४८. यालागीं कलिमाजीं पाहीं । श्रध्दा हरिकीर्तनाच्या ठायीं । जन तरती सुखोपायीं । संदेहो नाहीं नृपनाथा ॥ ४९ ॥ ह्याकरतां राजा ! हे पहा की, कलियुगामध्यें हरिकीर्तनाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली असतां लोक अनायासें तरून जातात, ह्याविषयी संशय नको ४९. कलियुगीं बहुसाल नर । होतील नारायणीं तत्पर । भक्तीचें भोज विचित्र । स्त्रीशूद्र माजविती ॥ ४५० ॥ कलियुगामध्यें अनेक प्रकारचे लोक नारायणाची उपासना करतील, आणि स्त्रिया व शूद्रही भक्तीचा महिमा माजवितील ४५०. विशेषें द्रविड देशाचे ठायीं । अतिशयें भक्ति वाढेल पाहीं । तेथेंही तीर्थविशेष भुयी । ते ते ठायीं अतिउत्कट ॥ ५१ ॥ विशेषकरून द्रविड देशामध्यें अतिशय भक्ति वाढेल. त्यांतूनही जेथें नामांकित तीर्थांची स्थानें असतील, तेथें तर भक्तीला ऊत येईल ५१. ताम्रपर्णीच्या तीरीं । हरिभक्तीची अगाध थोरी । कृतमालेच्या परिसरीं । उत्साहेंकरीं हरिभक्ति नांदे ॥ ५२ ॥ ताम्रपर्णी नदीच्या तीरावर हरिभक्तीचा महिमा फारच मोठा आहे; कृतमालेच्या सभोवार तर हरिभक्ति फारच उल्हासानें नांदत असते ५२. निर्मळजळा पयस्विनी । जीचिये पयःप्राशनीं । वृत्ति वाढे हरिचरणीं । दृढ भगवद्भजनीं बुध्दी ॥ ५३ ॥ निर्मल जलाची नदी; तिचें जल प्राशन केले असतां श्रीहरिचरणावरील प्रेम वाढत जाते, आणि भगवद्भजन करण्याची बुद्धि दृढ होते ५३. देखतां कावेरीची थडी । पळती पापांचिया कोडी । जेथ श्रीरंग वसे आवडीं । तेथें भक्ति दुथडी उद्भट नांदे ॥ ५४ ॥ कावेरी नदीचा नुसता तीर पाहतांच पापांच्या राशी पळून जातात. जेथें (कावेरीतीरावर) श्रीरंग आवडीनें राहतो, तेथें भक्तीचा प्रवाह दुथडीनें भरून वाहतो ५४. प्रतीचीमाजीं देतां बुडी । चित्तशुध्दि जोडे रोकडी । भजन वाढे चढोवढी । भक्तीची गुढी वैकुंठीं उभारे ॥ ५५ ॥ प्रतीची नदीमध्यें बुडी मारली असतां तत्काल चित्तशुद्धि होते. आणि भजन चढाओढीनें वाढत जाऊन भक्तीचा झेंडा वैकुंठापर्यंत चढतो ५५. ऐकें नरवरचूडामणी । या पंचनदींचिया तीर्थस्त्रानीं । अथवा पयःप्राशनीं । भगवद्भजनीं दृढ बुध्दी ॥ ५६ ॥ हे राजराजेश्वरा ! ऐक. ह्या पांच नद्यांत तीर्थात स्नान केले असतां, अथवा त्यांचे उदक प्राशन केले असतां भगवद्भजनामध्यें बुद्धि स्थिर होते ५६. या तीर्थांचें केल्या दर्शन । होय कलिमलक्षालन । केल्या स्त्रान पयःप्राशन । भगवद्भजन उल्हासे ॥ ५७ ॥ ह्या तीर्थांचे दर्शन घेतल्यास कलिमलाचे क्षालन होते. आणि स्नान किंवा जलप्राशन केल्यास भगवद्गजन करण्याला उल्हास येतो ५७. दर्शन स्पर्शन स्त्रान । या तीर्थींचें करितां जाण । वासुदेवीं निर्मळ भजन । नित्य नूतन दृढ वाढे ॥ ५८ ॥ ह्या तीर्थांचे दर्शन, स्पर्शन, किंवा स्नान केले असतां वासुदेवाचे शुद्ध भजन करण्याची नित्य नूतन इच्छा वृद्धिंगत होते ५८. यापरी जे भगवद्भक्त । ते ऋणत्रयासी निर्मुक्त । सुरनरपितरां पंगिस्त । हरिभक्त कदा नव्हती ॥ ५९ ॥ अशा प्रकारचे जे भक्त असतात, ते देव, ऋषि आणि पितर ह्या तिघांच्याही ऋणांतून मुक्त होतात. देवांचे, ऋषींचे, किंवा पितरांचे ते कधीही पांगळे होऊन राहात नाहीत ५९. देवर्षिभूताप्तनृणां पितॄणां न किङ्करो नायमृणी च राजन् । सर्वात्मना यः शरणं शरण्यं गतो मुकुन्दं परिहृत्य कर्तम् ॥ ४१ ॥ शरणागता निजशरण्य । मुकुंदाचे श्रीचरण । सद्भावें रिघाल्या शरण । जन्ममरण बाधीना ॥ ४६० ॥ शरणागताला शरण्य म्हणजे आश्रयभूत अथवा संरक्षक असे एक श्रीमुकुंदाचेच चरण आहेत. त्याला निस्सीम भावानें शरण गेल्यास जन्ममरण बाधत नाहीं ४६०. जेथ बाधीना जन्ममरण । तेथें देव-ऋषि-आचार्य-पितृगण । यांच्या ऋणांचा पाड कोण । ते झाले उत्तीर्ण भगवद्भजनें ॥ ६१ ॥ ज्याला जन्ममरणाचीच बाधा लागत नाही, त्याला देव, ऋषि, आचार्य, आणि पितर ह्यांचे ऋण कसे लागू होईल ? ते भक्त भगवद्भजनानेंच उद्धरून जातात ६१. जो विनटला हरिचरणीं । तो कोणाचा नव्हे ऋणी । जेवीं परिसाचिये मिळणीं । लोह काळेपणीं निर्मुक्त ॥ ६२ ॥ हरिचरणाच्या ठिकाणी जो रंगून गेला, तो कोणाचाच ऋणी राहात नाही. ज्याप्रमाणें परिसाचा स्पर्श झाला की लोखंड काळेपणापासून सुटते ६२, सकळ पापांपासूनी । सुटिजे जेवीं गंगास्त्रानीं । तेवीं विनटल्या हरिचरणीं । निर्मुक्त त्रैऋणीं भगवद्भक्त ॥ ६३ ॥ गंगेचें स्नान केले असतां ज्याप्रमाणें सर्व पापांपासून मुक्तता होते, त्याप्रमाणें हरिचरणाच्या ठिकाणी वृत्ति रंगली असतां भगवद्भक्त ह्या ऋणत्रयीपासून मुक्त होतो ६३. भावें करितां भगवद्भक्ती । सकळ पितर उध्दरती । ऋषीश्र्वरां नित्य तृप्ती । भगवद्भक्ति-स्वानंदें ॥ ६४ ॥ भावपूर्वक भगवद्भक्ति केली असतां साऱ्या 'पितरांचा' उद्धार होतो. भगवद्भक्तीच्या आनंदानें 'ऋषि' नित्य तृप्तच होतात ६४. स्वानंदें भगवद्भक्ती । तेणें सर्व भूतें सुखी होती । पुत्रें केल्या भगवद्भक्ती । आप्त उध्दरती मातापितरें ॥ ६५ ॥ भगवद्भक्तीच्या आनंदानें सर्व प्राणिमात्र सुखी होतात. पुत्रानें भगवद्भक्ति केल्यास त्याची मातापितरे आणि आप्तइष्टसुद्धा उद्धरून जातात ६५. सकळ देवांचा नियंता । अतिउल्हासें त्यातें भजतां । देवऋणाची वार्ता । भगवद्भक्तां बाधीना ॥ ६६ ॥ सर्व देवांचा नियंता जो श्रीहरि, त्याचे अत्यंत उल्हासानें भजन केले असतां, देवऋणाची गोष्ट भगवद्भक्ताला कधीही बाधत नाहीं ६६. ज्यांसी अनन्य भगवद्भजन । ते कदा नव्हती कर्माधीन । कर्म ज्याचे आज्ञाधीन । त्या हरीसी शरण जो झाला ॥ ६७ ॥ जे अनन्यभावानें भजन करणारे आहेत, ते कधी कर्माच्या अधीन होत नाहीत; कारण कर्म ज्याच्या अधीन असते, त्या हरीलाच तो शरण गेलेला असतो ६७. तो नव्हे कर्माचा सेवक । नव्हे देवांचा पाइक । नव्हे प्राकृताचा रंक । अनन्य भाविक हरिभक्त ॥ ६८ ॥ अनन्यशरण हरिभक्त, तो कर्माचा सेवक नव्हे, किंवा देवांचाही चाकर नव्हे. प्राकृत जनाचा तर दास नव्हेच नव्हे ६८. जो हरीचा शरणागत । तो कोणाचा नव्हे अंकित । कर्माकर्मीं तो अलिप्त । नित्यमुक्त ऋणत्रयासी ॥ ६९ ॥ जो हरीला शरणागत झाला, तो कोणाचाच अंकित नव्हे. तो कर्माकर्मापासून अलिप्त असून ऋणत्रयांतून नित्यमुक्तच असतो ६९. वासुदेव सर्वां भूतीं । हे दृढ ठसावे प्रतीती । यालागीं अलिप्त कर्मगती । सकळ ऋणनिर्मुक्ती भगवभक्तां ॥ ४७० ॥ सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी वासुदेवच भरलेला आहे, अशी दृढ प्रतीति त्याला असते म्हणून भगवद्भक्त हे सर्व कर्मापासून अलिप्त असून सकल ऋणांतूनही मुक्त होतात ४७०. स्वपादमूलम्भजतः प्रियस्य त्यक्तान्यभावस्य हरिः परेशः । विकर्म यच्चोत्पतितं कथञ्चित् धुनोति सर्वं हृदि सन्निविष्टः ॥ ४२ ॥ सांडूनि देहाच्या अभिमाना । त्यजूनि देवतांतरभजना । जे अनन्य शरण हरिचरणां । ते कर्मबंधना नातळती ॥ ७१ ॥ देहाचा अभिमान सोडून व इतर देवांचे भजन टाकून देऊन जे हरिचरणांनाच अनन्यशरण जातात, त्यांना कर्मबंधन स्पर्श करीत नाहीं ७१. यापरी जे अनन्य शरण । तेचि हरीसी पढियंते पूर्ण । हरिप्रियां कर्मबंधन । स्वप्नींही जाण स्पर्शों न शके ॥ ७२ ॥ ह्याप्रमाणें जे अनन्यशरण असतात, तेच हरीचे पूर्ण आवडते होत. आणि जे असे हरीचे आवडते असतात त्यांना कर्मबंधन स्वप्नांतही स्पर्श करूं शकत नाहीं ७२. राया म्हणसी 'भगवद्भक्त । विहितकर्मीं नित्यनिर्मुक्त ' । ते जरी विकर्म आचरत । तरी प्रायश्र्चित्त न बाधी त्यांसी ॥ ७३ ॥ हे राजा ! आतां तूं म्हणशील की, भगवद्भक्त हे विहित कर्माचरणामुळें नित्य मुक्त असतात; पण सांगतो की, त्यांनी जरी असत्कर्म केले, तरी त्यांना प्रायश्चित्ताचे बंधन नाहीं ७३. जेवीं पंचाननाचें पिलें । न वचे मदगजांचेनि वेढिलें । तेवीं हरिप्रियीं विकर्म केलें । त्यांसी न वचे बांधिलें यमाचेनि ॥ ७४ ॥ ज्याप्रमाणें सिंहाचा छावा मत्त हत्तींकडून वेढला जात नाही, त्याप्रमाणें हरीच्या भक्तांनी अकर्म केले तरी त्यांना यमाच्यानें बांधवणार नाहीं ७४. स्मरतां एक हरीचें नाम । महापातक्यां वंदी यम । मा हरीचे पढियंते परम । तयां विकर्में यम केवीं दंडी ॥ ७५ ॥ हरीचे एक नामस्मरण केलें, आणि तो महापातकीही असला, तरी त्याला यम येऊन वंदन करील. मग हरीचे जे परम आवडीचे भक्त असतात, त्यांना अकर्माबद्दल यम कसा दंड करील ? ७५. आशंका ॥ 'वेदाज्ञा विष्णूची परम । वेदें विहिलें धर्माधर्म । भक्त आचरतां विकर्म । केवीं वेदाज्ञानेम न बाधी त्यांसी ' ॥ ७६ ॥ आशंका ] वेदाज्ञा म्हणजे साक्षात् विष्णूचीच आज्ञा होय; त्या देवानेंच धर्म आणि अधर्म सांगितलेले आहेत; मग भक्तांनी विकर्माचरण केले तर, वेदाज्ञेचा नेम त्यांना कसा बाधणार नाहीं ? ७६. जेवीं रायाचा सेवक आप्त । ति द्वारपाळां नव्हे अंकित । तेथ रायाचा पढियंता सुत । त्यांचा पंगिस्त तो केवीं होय ॥ ७७ ॥ समाधान ] ज्याप्रमाणें राजाचा प्रिय सेवकही पहाऱ्यावरील शिपायाच्या अंकित होत नाही, तर मग राजाचा आवडता मुलगा ह्या द्वारपाळांच्या अंकित कसा होईल ? ७७. हरिनामाचें ज्यासी स्मरण । वेद त्याचे वंदी चरण । मा जो हरीचा पढियंता पूर्ण । त्यासी वेदविधान कदा न बाधी ॥ ७८ ॥ त्याप्रमाणें हरिनामाचें ज्याला नुसते स्मरण असते, त्याच्या चरणाला वेद वंदन करतो, तर मग हरीचा जो पूर्ण आवडता असेल, त्याला वेदाचे विधान केव्हाही बाधणार नाहीं (हे काय सांगितले पाहिजे ?) ७८. भक्तापासूनि विकर्मस्थिती । कदा न घडे गा कल्पांतीं । अवचटें घडल्या दैवगतीं । त्या कर्मा निर्मुक्ति अच्युतस्मरणें ॥ ७९ ॥ आतां भक्तांकडून निषिद्ध कर्म कल्पांतीही घडावयाचें नाहीं; परंतु दैवयोगानें कदाचित् घडलेच, तर अच्युतस्मरणानेंच त्या कर्मापासून त्याची मुक्तता होते ७९. बाधूं न शके कर्माकर्म । ऐसा कोण भागवतधर्म । ते भक्तीचें निजवर्म । उत्तमोत्तम अवधारीं ॥ ४८० ॥ कर्माकर्म बाधूं शकत नाहीं असा भागवतधर्म तरी कोणता ? (असे विचारशील तर) त्या भक्तीतील उत्तमोत्तम वर्म आतां तुला सांगतो ऐक ४८०. त्यजूनि देहाभिमानवोढी । सर्वां भूतीं हरिभक्ति गाढी । तो कर्माकर्में पायीं रगडी । मुक्ति पाय झाडी निजकेशीं ॥ ८१ ॥ देहाभिमानाची ओढ झुगारून देऊन सर्व प्राणिमात्रांमध्यें ज्याची हरिभक्ति दृढ असते, तो कर्माकर्मांना पायांखाली तुडवितो; मुक्ति आपल्या केसांनी त्याचे पाय झाडते ८१. तो ज्याकडे कृपादृष्टीं पाहे । त्याचें निर्दळे भवभये । तो जेथ म्हणे राहें । तेथें लाहे मुक्तिसुख ॥ ८२ ॥ तो ज्याच्याकडे कृपादृष्टीनें पाहतो, त्याचे संसारभय तत्काल नाहीसे होते; आणि तो जेथें म्हणेल तेथे लगोलग हरीची भक्ति ठाण देऊन राहाते ८२. त्याचेनि अनुग्रहकरीं । देव प्रगटे दीनाच्या अंतरीं । त्याच्या कर्माकर्माची बोहरी । स्वयें श्रीहरी करूं लागे ॥ ८३ ॥ त्याच्या अनुग्रहानें दीन जनांच्या अंतःकरणांत देव प्रगट होतो; आणि त्याच्या कर्माकर्मांचा निरास स्वतः श्रीहरिच करूं लागतो ८३. जेवीं प्रगटल्या दिनमणी । अंधार जाय पळोनी । राम प्रगटल्या हृद्यमभुवनीं । कर्माकर्मधुणी सहजचि ॥ ८४ ॥ ज्याप्रमाणें सूर्य उगवला म्हणजे अंधार पळून जातो, त्याप्रमाणें हृदयमंदिरांत राम प्रगट झाला की, कर्माकर्मांचा सहजच निरास होतो ८४. भगवंताची नामकीर्ति । याचि नामें परम भक्ति । भक्तीपाशीं चारी मुक्ति । दासीत्वें वसती नृपनाथा ॥ ८५ ॥ हे राजश्रेष्ठा ! भगवंताच्या नामाची कीर्ति, हिचेच नाम परमभक्ति होय. भक्तीपाशी चारही मुक्ति दासीप्रमाणें राबत असतात ८५. ऐकोनि भक्तीची पूर्ण स्थिती । रोमांचित झाला नृपती । आनंदाश्रु नयनीं येती । सुखावलिया वृत्तीं डुल्लतु ॥ ८६ ॥ (शुकाचार्य परीक्षितीला सांगतात-)ही भक्तीची पूर्ण स्थिति अथवा महिमा ऐकून राजाच्या अंगावर रोमांच उभे राहिले; नेत्रांतून आनंदाश्रु वाहूं लागले व तो आनंदवृत्तीनें डोलूं लागला ८६. आंगतां वैदेहाची स्थिती । नारदु सुखावे निजचित्तीं । तो उल्हासें वसुदेवाप्रती । सांगे समाप्ति इतिहासाची ॥ ८७ ॥ जनकराजाची ही स्थिति सांगतांना नारद मनामध्यें अत्यंत सुखभरित झाला. आणि त्या भरातच त्यानें वसुदेवाला त्या इतिहासाची समाप्ति सांगीतली ८७. श्रीनारद उवाच । धर्मान् भागवतानित्थं श्रुत्वाथ मिथिलेश्वरः । जायन्तेयान् मुनीन् प्रीतः सोपाध्यायो ह्यपूजयत् ॥ ४३ ॥ नारद इतिहास सांगतु । तेवींच आनंदें डुल्लतु । तेणें आनंदें बोलतु । भक्तीचें मथितु वसुदेवाप्रती ॥ ८८ ॥ नारद इतिहास सांगू लागला, तसाच आनंदानें डुलूंही लागला; आणि त्याच आनंदाच्या भरांत वसुदेवाला भक्तीचे रहस्य सांगता झाला ८८. यापरी जयंतीसुतीं । भगवंताची उद्भट भक्ती । सांगितली परम प्रीतीं । मिथिलेशाप्रती निजबोधें ॥ ८९ ॥ (नारद म्हणाला)-याप्रमाणें जयंतीपुत्रांनी, जनकराजाला परम प्रीतीनें स्वानुभवपुरःसर भगवंताची श्रेष्ठ भक्ति सांगितली ८९. ऐकोनि त्यांचिया वचना । सुख जाहलें विदेहाचिया मना । मग अतिप्रीतीं पूजना । जयंतीनंदनां पूजिता झाला ॥ ४९० ॥ त्यांचे भाषण ऐकून जनकराजाच्या मनाला आनंद वाटला. तेव्हां अत्यंत प्रेमानें त्या जयंतीपुत्रांचे त्यानें पूजन केले ४९०. श्रवणें जाहली अतिविश्रांती । तेणें पूजेलागीं अतिप्रीती । विदेहा उल्हासु चित्तीं । स्वानंदस्थितीं पूजिता झाला ॥ ९१ ॥ श्रवणानें अत्यंत समाधान झाल्यामुळें पूजा करावयालाही त्याला अत्यंत प्रेम वाटले. तेव्हां जनकराजानें त्या आनंदाच्या भरांत मोठ्या भक्तिभावानें त्यांची पूजा केली ९१. पूजेचा परम आदरु । जयंतीनंदना केला थोरु । उपाध्याय जो अहल्याकुमरु । तेणेंही अत्यादरु पूजेसी केला ॥ ९२ ॥ अयंतीपुत्रांची (कवि-हरि-अंतरिक्ष इत्यादि नवयोग्यांची) राजानें परमादरानें पूजा केली. अहल्येचा पुत्र शतानंद हा राजाचा उपाध्याय होता. त्यानेही मोठ्या आदरानें पूजा सांगितली व स्वतःही केली ९२. ततोऽन्तर्दधिरे सिद्धाः सर्वलोकस्य पश्यतः । राजा धर्मानुपातिष्ठन्नवाप परमां गतिम् ॥ ४४ ॥ यापरी ते भागवतश्रेष्ठ । नवही जण अतिवरिष्ठ । समस्तां देखतांचि स्पष्ट । झाले अदृष्ट ऊर्ध्वगमनें ॥ ९३ ॥ अशा प्रकारे ते नऊही जण अत्यंत श्रेष्ठ भगवद्भक्त त्यांच्या देखत आकाशमार्गानें वरवर जात अदृश्य झाले ! ९३. ते भागवतधर्मस्थितीं । अनुष्ठूनि भगवद्भक्ती । राजा पावला परम गती । पूर्णप्राप्ती निजबोधें ॥ ९४ ॥ त्या भागवतधर्मानें वागून तशा प्रकारची भगवद्भक्ति करून, पूर्णानुभवानें तो जनकराजाही उत्तम गति पावला ९४. भावें करितां भगवद्भक्ती । देहीं प्रगटे विदेहस्थिती । ते पावोनि नृपती । परम विश्रांती पावला ॥ ९५ ॥ सद्भावानें भगवद्भक्ति केली असतां देहामध्यें असूनही विदेहस्थिति प्राप्त होते. ती जनकराजाला प्राप्त झाल्यामुळें तो परम विश्रांतीला पोचला ९५. त्वमप्येतान् महाभाग धर्मान् भागवतान् श्रुतान् । आस्थितः श्रद्धया युक्तो निःसङ्गो यास्यसे परम् ॥ ४५ ॥ सकळ भाग्यांचिया पंक्ती । जेथें ठाकल्या येती विश्रांती । ते वसुदेवा भाग्यस्थिती । तुझ्या घराप्रती क्रीडत ॥ ९६ ॥ वसुदेवा ! सर्व भाग्यांच्या पंक्ति आपोआप जेथे विश्रांति घेण्याला येतात, ती भाग्यस्थिति तुझ्या घरी खेळू लागली आहे ९६. वसुदेवा तुझेनि नांवें । देवातें 'वासुदेव' म्हणावें । तेणें नामाचेनि गौरवें । जनांचे आघवे निरसती दोष ॥ ९७ ॥ वसुदेवा ! तुझ्याच नांवामुळें देवाला 'वासुदेव' म्हणतात. वासुदेवनामाच्या प्रभावानें जनांच्या सर्व दोषांचे निरसन होते ९७. येवढ्या भाग्याचा भाग्यनिधि । वसुदेवा तूंचि त्रिशुध्दि । तुवां भागवतधर्माचा विधि । आस्तिक्यबुध्दीं अवधारिला ॥ ९८ ॥ हे वसुदेवा ! एवढ्या भाग्याचा भाग्यनिधि खरोखर एक तूंच आहेस. तूं भागवतधर्माचा विधि भक्तिपूर्वक श्रवण केलास ९८. श्रध्देनें केलिया वस्तुश्रवणा । मननयुक्त धरावी धारणा । तैं निःसंग होऊनियां जाणा । पावसी तत्क्षणा निजधामासी ॥ ९९ ॥ श्रद्धापूर्वक परमात्मस्वरूपाचे श्रवण केल्यानंतर मननपूर्वक त्याची धारणा धरली पाहिजे. असे केल्यानें तूं सर्व संगापासून म्हणजे बंधनापासून मुक्त होऊन तत्काल निजधामाला पोंचशील ९९. जया निजधामाच्या ठायीं । कार्य कारण दोन्ही नाहीं । त्या परम पदाचे ठायीं । निजसुखें पाहीं सुखरूप होसी ॥ ५०० ॥ ज्या निजधामाच्या ठिकाणी कार्य किंवा कारण दोन्ही नसतात; त्या परमपदामध्यें तूं निजसुखाचा अनुभव घेऊन सुखस्वरूपच होऊन राहशील ५०० युवयोः खलु दम्पत्योर्यशसा पूरितं जगत् । पुत्रतामगमद्यद्वां भगवानीश्वरो हरिः ॥ ४६ ॥ तुम्हां दांपत्याचिये कीर्ती । यशासी आली श्रीमंती । तुमचे यशें त्रिजगती । परमानंदें क्षिती परिपूर्ण झाली ॥ १ ॥ तुम्हां दांपत्याच्या कीर्तीनें श्रीमंती यशास आली आहे. कारण, तुमच्या यशानें त्रिभुवन भरून गेले आहे. सर्व पृथ्वी परमानंदानें पूर्ण भरली आहे १. ज्यालागीं कीजे यजन । ज्यालागीं दीजे दान । ज्यालागीं कीजे तपाचरण । योगसाधन ज्यालागीं ॥ २ ॥ ज्याच्याकरतां यज्ञयाग करावयाचे, ज्याच्याकरतां दानधर्म करावयाचा; ज्याच्याकरता तपाचरण करावयाचें; ज्याच्याकरतां योगसाधन करावयाचे २, जो न वर्णवे वेदा शेषा । जो दुर्लभ सनकादिकां । त्या पुत्रत्वें यदुनायका । उत्संगीं देखा खेळविसी ॥ ३ ॥ ज्याचें वेदांना किंवा शेषालाही वर्णन करवत नाहीं; सनकादिकांनाहीं जो दुर्लभ; त्या श्रीकृष्णाला तुम्ही पुत्राच्या नात्यानें मांडीवर खेळविता ३. जो कळिकाळाचा निजशास्ता । जो ब्रह्मादिकांचा नियंता । जो संहारकाचा संहर्ता । जो प्रतिपाळिता त्रिजगती ॥ ४ ॥ कलिकालाचा जो शास्ता; ब्रह्मदेवादिकांचा जो नियंता; जो संहारकर्त्यांचाही संहारकर्ता; जो त्रिभुवनांचा पालनकर्ता ४; जो सकळ भाग्याचें भूषण । जो सकळ मंडणां मंडण । षडूगुणांचें अधिष्ठान । तो पुत्रत्वें श्रीकृष्ण सर्वांगीं लोळे ॥ ५ ॥ सर्व भाग्यांचें जो भूषण; जो सर्व शोभेची शोभा; षड्गुणांचें जो अधिष्ठान; तो श्रीकृष्ण पुत्राच्या रूपानें तुमच्या सर्वांगावर लोळतो ना ! ५. दर्शनालिङ्गनालापैः शयनासनभोजनैः । आत्मा वां पावितः कृष्णे पुत्रस्नेहं प्रकुर्वतोः ॥ ४७ ॥ परब्रह्ममूर्ति श्रीकृष्ण । सादरें करितां अवलोकन । तेणें दृष्टि होय पावन । डोळ्यां संपूर्ण सुखावबोधु ॥ ६ ॥ परब्रह्ममूर्ति श्रीकृष्णाचे अवलोकन केले असतां दृष्टि पावन होते; डोळ्यांना सुखाचा अनुभव येतो ६. कृष्णमुखींचीं उत्तरें । प्रवेशतां कर्णद्वारें । पवित्र झालीं कर्णकुहरें । कृष्णकुमरें अनुवादें ॥ ७ ॥ कृष्णाच्या तोंडचे शब्द कानाच्या द्वारे आंत शिरले, की कर्णरंध्रे पवित्र होतात ७. आळवितां श्रीकृष्ण कृष्ण । अथवा कृष्णेंसीं संभाषण । तेणें वाचा झाली पावन । जैसें गंगाजीवन संतप्तां ॥ ८ ॥ श्रीकृष्णा, हे कृष्णा, अशा हांका मारतांना किंवा कृष्णाबरोबर बोलतांना, संतप्ताला गंगाजल शांत करते त्याप्रमाणें तुमची वाणीही शांत व पुनीत होऊन जाते ८. नाना यागविधीं यजिती ज्यातें । तेथ न घे जो अवदानातें । तो वारितांही दोंहीं हातें । बैसे सांगातें भोजनीं कृष्ण ॥ ९ ॥ ज्याच्यासाठी अनेक प्रकारचे यज्ञयाग करतात, पण तेथेही जो यज्ञभाग घेत नाहीं, तो श्रीकृष्ण तुम्ही नको नको म्हणून दोन्ही हातांनी ढकलून घातला तरी तुमच्याजवळ येऊन जेवावयाला बसतो ९. दुर्लभु योगयागीं । तो वेळ राखे भोजनालागीं । मुखींचें शेष दे तुम्हांलागीं । लागवेगीं बाललीला ॥ ५१० ॥ जो योगयागांनीसुद्धा सांपडावयाचा नाही, तो श्रीकृष्ण तुमच्या घरी जेवणाची वेळ राखत बसतो. आणि बाळलीलेनुसार आपल्या तोंडांतला घांस पटकन तुमच्या तोंडात घालतो ५१०. तेणें संतप्त संतोखी । तोही ग्रास घाली तुम्हां मुखीं । तुम्हां ऐसें भाग्य त्रिलोकीं । नाहीं आणिकीं अर्जिलें ॥ ११ ॥ संतप्तांचा ताप निवविणारा तो भगवान् श्रीकृष्ण, तुमच्या तोंडात घास घालतो. अर्थात् तुम्हांइतके भाग्य त्रैलोक्यांत दुसरे कोणीही संपादन केलेले नाहीं ११. तेणें कृष्णशेषामृतें । रसना विटों ये अमृतातें । मा इतर रसा गोड तेथें । कोण म्हणतें म्हणावया ॥ १२ ॥ त्या कृष्णाच्या उच्छिष्टामृतानें जिव्हा अमृतालासुद्धा विटेल, मग इतर प्राकृत रसांना त्यापुढे गोड कोण म्हणणार ? १२. तेणें श्रीकृष्णरसशेषें । अंतरशुध्दि अनायासें । जें नाना तपसायासें । अतिप्रयासें न लभे कदा ॥ १३ ॥ अनेक प्रकारचे तपःसायास करून अत्यंत कष्ट सोसले तरी अंतरशुद्धि लाभत नाही, ती श्रीकृष्णरसावशेषानें अनायासेंच लाभते १३. देतां कृष्णाशीं चुंबन । तेणें अवघ्राणें घ्राण पावन । चुंबितांचि निवे मन । स्वानंद पूर्ण उल्हासे ॥ १४ ॥ कृष्णाला चुंबन देतांना त्याच्या तोंडाच्या वासानें घ्राणेंद्रिय पावन होऊन जाते; आणि त्याचे चुंबन घेतांना मन शांत होऊन स्वानंदोर्मीनें उचंबळून येते १४. तुम्हां बैसले देखे आसनीं । कृष्ण सवेग ये धांवोनी । मग अंकावरी बैसोनी । निजांगमिळणीं निववी कृष्णु ॥ १५ ॥ तुम्ही आसनावर बसलेली पाहून कृष्ण दुडदुड धावत येतो, आणि मांडीवर बसून आपले अंग तुमच्या अंगास लावून तुम्हांला निववितो १५. तेणें श्रीकृष्णाचेनि स्पर्शें । सर्वेंद्रियीं कामु नासे । तेणें कर्मचि अनायासें । होय आपैसें निष्कर्म ॥ १६ ॥ त्या श्रीकृष्णाच्या अंगाला अंग लागण्यानें सर्व इंद्रियांतील काम नाहीसा होतो; त्यायोगें कर्म आपोआप निष्कर्म होते १६. सप्रेमभावें संलग्न । देतां श्रीकृष्णासी आलिंगन । तेणें देहाचें देहपण । मीतूंस्फुरण हारपे ॥ १७ ॥ प्रेमभावानें श्रीकृष्णाला कडकडून आलिंगन दिले असतां देहाचें देहपण जाऊन मी तूं हे स्फुरण नाहींसें होतें १७. शयनाच्या समयरूपीं । जना गाढ मूढ अवस्था व्यापी । ते काळीं तुम्हांसमीपीं । कृष्ण सद्रूपीं संलग्न ॥ १८ ॥ निजल्या वेळी सर्व लोकांना गाढ मूढ अवस्था व्यापून टाकते; पण त्या वेळी कृष्ण सद्रूपी संलग्न होऊन तुमच्या सन्निध असतो १८. योगी भावना भावून । कर्म कल्पिती कृष्णार्पण । तुमचीं सकळ कर्में जाण । स्वयें श्रीकृष्ण नित्यभोक्ता ॥ १९ ॥ योगी लोक भावना करून कर्में कृष्णार्पण केल्याची कल्पना करतात. (त्यांनी अर्पण केली, पण श्रीकृष्णानें ती अंगीकारली की नाहीं हे कसे कळणार ?) पण तुमची सारी कर्में श्रीकृष्ण आपण होऊन अर्पण करून घेतों (अंगीकारितो) १९. पुत्रस्नेहाचेनि लालसें । सकळ कर्में अनायासें । स्वयें श्रीकृष्ण सावकाशें । परम उल्हासें अंगीकारी ॥ ५२० ॥ पुत्रप्रेमाच्या आवडीनें श्रीकृष्ण स्वतः तुमच्या साऱ्या कर्मांचा अनायासेंच मोठ्या उल्हासानें स्वीकार करतो आहे ५२०. तुमची पवित्रता सांगों कैसी । पवित्र केलें यदुवंशासी । पुत्रत्वें पाळूनि श्रीकृष्णासी । जगदुध्दारासी कीर्ति केली ॥ २१ ॥ तुमची पवित्रता काय सांगावी ? श्रीकृष्णाचे पुत्रभावनेनें पालन करून साऱ्या यदुवंशाला तुम्ही पवित्र करून सोडलेत; व जगदुद्धारार्थ कीर्ति करून ठेवलीत २१. नाम घेतां 'वसुदेवसूनु' । स्मरतां 'देवकीनंदनु' । होय भवबंधच्छेदनु । ऐसें पावनु नाम तुमचें ॥ २२ ॥ 'वसुदेवपुत्र' तसेच 'देवकीनंदन' असें नामस्मरण केले असतां संसारबंधन तुटून जाते. इतके तुमचें नांव पवित्र आहे २२. तुम्ही तरा अनायासीं । हें नवल नव्हे विशेषीं । केवळ जे का कृष्णद्वेषी । ते वैरी अनायासीं विरोधें तरती ॥ २३ ॥ तुम्ही अनायासें तरून जाल, ह्यांत फारसें नवल नाहीं; पण जे निखालस श्रीकृष्णाचा द्वेष करणारे ते वैरीसुद्धा विरोध भक्ति करून अनायासानें तरून जातात २३. वैरेण यं नृपतयः शिशुपालपौण्ड्र शाल्वादयो गतिविलासविलोकनाद्यैः । ध्यायन्त आकृतधियः शयनासनादौ तत्साम्यमापुरनुरक्तधियां पुनः किम् ॥ ४८ ॥ शिशुपाल दंतवक्र । पौंड्रक-शाल्वादि महावीर । कृष्णासीं चालविती वैर । द्वेषें मत्सरें ध्यान करिती ॥ २४ ॥ शिशुपाल, पौंड्रक, शाल्व आदिकरून मोठमोठ्या वीरांनी कृष्णाशी शत्रुत्व धरले होते. द्वेषामुळें व मत्सरामुळें त्यांना त्याचें ध्यान लागून राहिले होते. त्याची मूर्ति त्यांना रात्रंदिवस डोळ्यांपुढे दिसत होती २४. घनश्याम पीतांबर कटे । विचित्रालंकारीं कृष्णु नटे । गदादि आयुधीं ऐसा वेठे । अतिबळें तगटे रणभूमीसी ॥ २५ ॥ मेघासारखी श्यामकांति असलेला; कटीला पीतांबर कसलेला; चित्र विचित्र अलंकार घालून नटलेला; गदा वगैरे आयुधांनी सज्ज झालेला; असा तो शौर्यानें रणभूमीवर शत्रूकडे पाहात उभा असतो २५. ऐसें वैरवशें उद्भट । क्रोधें कृष्णध्यान उत्कट । ते वैरभावें वरिष्ठ । तद्रूपता स्पष्ट पावले द्वेषें ॥ २६ ॥ उत्कट वैरभावामुळें श्रीकृष्णाकडे महाक्रोधानें ते पहात असत. क्रोधानें व द्वेषानें का होईना, त्यांना त्याचे अखंड ध्यान लागल्यानें ते तद्रूपता पावले २६. कंसासी परम भयें जाण । अखंड लागलें श्रीकृष्णध्यान । अन्नपान शयनासन । धाकें संपूर्ण श्रीकृष्ण देखे ॥ २७ ॥ कंसाला परमभयामुळें श्रीकृष्णाचें अखंड ध्यान लागून राहिले. त्या धाकानेंच त्याला खातां पितां निजतां उठतां जिकडे तिकडे श्रीकृष्णच दिसू लागला २७. कंसास् उर भयावेशें । शिशुपाळादिक महाद्वेषें । सायुज्य पावले अनायासें । मा श्रध्दाळू कैसे न पावती मोक्ष ॥ २८ ॥ कंसासुर महाभयामुळें व शिशुपालादिक महान् द्वेषामुळें अनायासे सायुज्यतेला पोंचले. मग श्रद्धाळू लोकांना मोक्ष कसा नाहीं प्राप्त होणार ? २८ तुम्ही तरी परम प्रीतीं । चित्तें वित्तें आत्मशक्तीं । जीवें वोवाळां श्रीपति । पायां ब्रह्मप्राप्ति तुमच्या लागे ॥ २९ ॥ तुम्ही तर अत्यंत प्रेमभावानें चित्त, वित्त, जीव, प्राणसुद्धा श्रीकृष्णावरून ओवाळून टाकीत आहां. त्यामुळें ब्रह्मप्राप्ति तुमच्या पायाला लागत आहे २९. पूर्ण प्राप्ति तुम्हांपासीं । ते तुमची न कळे तुम्हांसी । बालक मानितां श्रीकृष्णासी । निजलाभासी नाडणें ॥ ५३० ॥ पूर्ण प्राप्ति तुमच्या जवळ आहे, पण ती तुमची तुम्हाला कळत मात्र नाही. तुम्ही श्रीकृष्णाला आपला बाळक समजतां, त्यामुळें निजलाभाला नागवत आहां ! ५३०. मापत्यबुद्धिमकृथाः कृष्णे सर्वात्मनीश्वरे । मायामनुष्यभावेन गूढैश्वर्ये परेऽव्यये ॥ ४९ ॥ तुम्ही बाळकु माना श्रीकृष्ण । हा भावो अतिकृपण । तो परमात्मा परिपूर्ण । अवतरला निर्गुण कृष्णावतारें ॥ ३१ ॥ तुम्ही श्रीकृष्णाला पुत्र समजता, ही तुमची भावना अति क्षुद्र आहे. तो परिपूर्ण निर्गुण परमात्माच कृष्णस्वरूपानें अवतरला आहे ३१. यासी झणें म्हणाल लेकरूं । हा ईश्र्वराचा ईश्र्वरु । सर्वात्मा सर्वश्र्वरु । योगियां योगींद्रु श्रीकृष्ण ॥ ३२ ॥ त्याला आपण लेकरूं समजू नका; हा ईश्वराचाही ईश्वर आहे; हा श्रीकृष्ण सर्वांहून श्रेष्ठ, सर्वात्मा, सर्वेश्वर, आणि योग्यांतील श्रेष्ठ योगी आहे ३२. हा अविकारु अविनाशु । परात्परु परमहंसु । इंद्रियनियंता हृषीकेशु । जगन्निवासु जगदात्मा ॥ ३३ ॥ हा अविकारी, अविनाश, परात्पर, परमहंस, इंद्रियनियंता हृषीकेश असून जगन्निवासी जगदात्मा आहे ३३. मायामनुष्यवेषाकृती । हा भासताहे सकळांप्रती । गूढऐमश्र्वर्य महामूर्ती । व्यापक त्रिजगतीं गुणातीतु ॥ ३४ ॥ हा मायात्मक झाल्यामुळें सर्वांना मनुष्यरूपधारी भासतो आहे; त्याचे ऐश्वर्य अत्यंत गूढ आहे. तो गुणातीत असून त्रिभुवनांत व्यापलेला आहे ३४. भूभारासुरराजन्य हन्तवे गुप्तये सताम् । अवतीर्णस्य निर्वृत्यै यशो लोके वितन्यते ॥ ५० ॥ काळयवनादि असुर । कां जरासंधादि महावीर । अथवा राजे अधर्मकर । अतिभूभार सेना ज्यांची ॥ ३५ ॥ काळयवनादि असुर, जरासंधादि महावीर किंवा अधर्म करणारे इतर राजे, ज्यांची सेना पृथ्वीला भारभूत झालेली आहे ३५, तो उतरावया धराभार । धर्म वाढवावया निर्विकार । संतसंरक्षणीं शार्ग्ड़धर । पूर्णावतार श्रीकृष्ण ॥ ३६ ॥ पृथ्वीवर झालेला तो भार उतरण्याकरता, निर्विकार धर्म वाढविण्याकरतां, व साधूंचे संरक्षण करण्याकरतां झालेला, शार्ङ्गधर श्रीकृष्ण हा भगवंताचा पूर्णावतार आहे ३६. प्रतिपाळावया निजभक्तांसी । सुख द्यावया साधूंसी । अवतरला यदुवंशीं । हृषीकेशी श्रीकृष्ण ॥ ३७ ॥ भक्तांचा प्रतिपाळ करण्यासाठी व साधूंना सुख देण्यासाठी यदुवंशामध्यें भगवान् श्रीकृष्णरूपानें अवतरले आहेत ३७. तो असुरगजपंचाननु । सज्जनवनआसनंदघनु । तुमच्या उदरीं श्रीकृष्णु । अवतार पूर्णु पूर्णांशेंसीं ॥ ३८ ॥ तो असुररूप हत्तींचा संहार करणारा सिंह, व सज्जनरूप वनावर आनंदाची वृष्टि करणारा मेघ, असा श्रीकृष्ण तुमच्या पोटी परिपूर्ण अंशानें अवतार घेऊन आला आहे ३८. उध्दरावया त्रिजगती । थोर उदार केली कीर्ती । ज्याच्या अवताराची ख्याती । पवाडे पढती ब्रह्मादिक ॥ ३९ ॥ ज्यानें त्रिभुवनाचा उद्धार करण्याकरतां फारच थोर व उदार कीर्ति करून ठेवली आहे; ज्याच्या अवताराची कीर्ति ब्रह्मदेवादिकसुद्धा गात आहेत ३९; तरावया अतिदुस्तर । ज्याची कीर्ति गाती सुरनर । परमादरें ऋषीश्र्वर । कृष्णचरित्र सर्वदा गाती ॥ ५४० ॥ अत्यंत दुस्तर असा संसारसागर तरून जाण्याकरतां ज्याची कीर्ति सुरनर गात आहेत; आणि मोठमोठे ऋषीही ज्याचें चरित्र मोठ्या भक्तिभावानें सर्वकाळ गात असतात ५४०; ज्याचें नाम स्मरतां भक्त । कळिकाळ नागवत । तो अवतार श्रीकृष्णनाथ । तुम्हांआंत प्रगटला ॥ ४१ ॥ ज्याचे नामस्मरण केलें असतां भक्त कलिकाळाला नागवतात; तो श्रीकृष्ण-अवतार तुमच्यामध्यें प्रगट झाला आहे ४१. श्रीकृष्ण परब्रह्मैकनिधी । त्यासी पाहूंनका बाळबुध्दीं । इतुकेन तुम्ही भवाब्धी । जाणा त्रिशुध्दी तरलेती ॥ ४२ ॥ श्रीकृष्ण म्हणजे एकमेवाद्वितीय परब्रह्माचा निधि आहे. त्याला मूल म्हणून समजू नका. इतकें केलेत की, तुम्ही संसारसमुद्र खास तरलांच म्हणून समजा ४२. ऐशी श्रीकृष्णअरवतारकथा । नारद वसुदेवा सांगतां । शुक म्हणे गा नृपनाथा । विस्मयो समस्तां थोर झाला ॥ ४३ ॥ अशी श्रीकृष्णावताराची कथा नारदांनीं वसुदेवाला सांगितली. शुक म्हणाले, हे परीक्षिती राजा ! त्यायोगें सर्वांना मोठा विस्मय वाटला ४३. श्रीशुक उवाच । एतत् श्रुत्वा महाभागो वसुदेवोऽतिविस्मितः । देवकी च महाभागा जहतुर्मोहमात्मनः ॥ ५१ ॥ निमिजायंत मुनिगण । इतिहास पुरातन जीर्ण । कृष्ण परमात्मा ब्रह्म पूर्ण । नारद आपण निरूपी हर्षें ॥ ४४ ॥ याप्रमाणें जनक व नवयोगी ह्यांचा पुरातन जुना इतिहास, व कृष्णपरमात्मा हा पूर्ण ब्रह्म आहे, इत्यादि वृत्तांत नारदांनी मोठ्या आनंदानें सांगितला ४४. शुक म्हणे परीक्षिती । ऐकोनि नारदवचनोक्ती । देवकीवसुदेवो चित्तीं । अतिविस्मितीं तटस्थ ॥ ४५ ॥ शुक म्हणतात, हे परीक्षिति राजा ! तें नारदाचे भाषण ऐकून वसुदेव व देवकी ही उभयताही मनामध्यें अगदी आश्चर्यचकित होऊन गेली ४५. तया नारदाचेनि वचनें । कृष्ण परमात्मा बोलें येणें । देवकी वसुदेव निजपनें । दोघें जणें विस्मित ॥ ४६ ॥ कृष्ण हा परमात्मा आहे असें नारदाचे वचन ऐकून देवकीवसुदेव आपल्या मनांत विस्मित होऊन तटस्थ झाले ४६. तीं परम भाग्यवंत दोन्ही । जो पुत्रस्नेहो होता श्रीकृष्णीं । तो सांडोनियां तत्क्षणीं । कृष्णपरब्रह्मपणीं निश्र्चयो केला ॥ ४७ ॥ ती दोघेही मोठी भाग्यवान् होती. यामुळें श्रीकृष्णाच्या ठिकाणी तो आपला पुत्र म्हणून जी भावना होती, ती त्यांनी तत्क्षणी सोडून दिली. आणि कृष्ण हा साक्षात् परब्रह्मस्वरूप आहे, अशी भावना निश्चित केली ४७. श्रीकृष्णीं ब्रह्मभावो । धरितां निःशेष मोहस्नेहो । हृद्यीं्चा निघोनि गेला पहा हो । बाप नवलावो भाग्याचा ॥ ४८ ॥ अहाहा ! त्यांच्या भाग्याची अपूर्वता काय सांगावी ? श्रीकृष्णाच्या ठिकाणी ब्रह्मभावना धरतांच हृदयांतील चटसारा मोह व स्नेह लागलाच निघून गेला ४८. इतिहासमिमं पुण्यं धारयेद्यः समाहितः । स विधूयेह शमलं ब्रह्मभूयाय कल्पते ॥ ५२ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥ जो निमिजायंतसंवादु । वसुदेवा सांगे नारदु । हा इतिहास अतिशुध्दु । जीवशिवभेदुच्छेदकु ॥ ४९ ॥ हा जो निमि-जायंतांचा संवाद नारदांनी वसुदेवाला सांगितला, तो इतिहास अत्यंत पवित्र असून जीवशिवांतील भेद नाहीसा करणारा आहे ४९. सावधानपणें श्रोता । तल्लीन होऊनि तत्वतां । हे इतिहासाची कथा । सादरता जो परिसे ॥ ५५० ॥ ही इतिहासाची कथा जो श्रोता खरोखर लक्ष देऊन व तल्लीन होऊन भक्तिभावानें श्रवण करील ५५०, तेणें सकळ पुण्यांचिया राशी । श्रवणें जोडिल्या अहर्निशीं । तो गा पुरुषु अवश्यतेसी । ब्रह्मप्राप्तीसी सत्पात्र ॥ ५१ ॥ त्यानें रात्रंदिवस श्रवणाच्यायोगेंच सर्व पुण्यांच्या राशी जोडल्या म्हणून समजावें. असा तो पुरुष ब्रह्मप्राप्तीला अवश्यमेव पात्र होतो ५१. सार्थक एक एक पद । परिसतां होय अंतर शुध्द । यालागीं पावे ब्रह्मपद । परमानंद निजबोधें ॥ ५२ ॥ अर्थासहवर्तमान ह्यांतील एक एक शब्द जरी ऐकला, तरी अंतःकरण शुद्ध होते; व त्यामुळें त्याला परमानंदानुभवरूप ब्रह्मप्राप्ति होते ५२. हे 'पंचाध्यायी' म्हणणें घडे । पंचवक्त्र चंद्रचूडें । एकादशाचें ज्ञान गाढें । वर्णावया फुडें ध्वज उभविला ॥ ५३ ॥ हिला 'पंचाध्यायी' म्हणतात. ही शंकराची पंचमुखेंच होत. एकादश स्कंधांतील गूढ ज्ञान वर्णन करण्याकरतां ही ध्वजाच उभारली आहे ५३. हे पंचाध्यायी नव्हे जाण । एकादशाचे पंचप्राण । उपदेशावया शुध्द ज्ञान । सामोरे आपण स्वभक्तां आले ॥ ५४ ॥ ही नुसती पंचाध्यायी नव्हे, तर एकादश स्कंधाचे हे पंचप्राणच शुद्ध ज्ञानाचा उपदेश करण्याकरतां आपल्या भक्तांना स्वतः सामोरे आलेले आहेत ५४. हे पंचाध्यायी नव्हे केवळ । पंचम आलापे शुककोकिळ । एकादश वसंतकाळ । भक्त-अलिकुळ आलापवी स्वयें ॥ ५५ ॥ ही केवळ पंचाध्यायी नव्हे, तर शुकाचार्यरूपी कोकिलाचे हे पंचमस्वराचे गायन आहे. एकादशस्कंध हा वसंतऋतु आहे व तो भक्तरूप भ्रमरांचा गुंजारव करवीत आहे ५५. हाही नव्हे प्रकार । हे शर्करा पंचधार । चाखों धाडिली सत्वर । ज्ञानगंभीर निजभक्त ॥ ५६ ॥ पण असाही प्रकार नव्हे, तर हा खडीसाखरेचा पंचकोनी खडाच ज्ञानगंभीर निजभक्तांना चाखण्याकरता पाठविला आहे ५६. हे पंचाध्यायी नव्हे सिध्द । एकादशाचे पंच गंध । भक्त आंवतावया शुध्द । धाडिली प्रसिध्द गंधाक्षता ॥ ५७ ॥ खरोखर ही पंचाध्यायीही नव्हे; तर ही एकादश स्कंधांतील पंच-गंधांची गंधाक्षताच भक्तांना आमंत्रण देण्यासाठी पुढे वाजत गाजत पाठविलेली आहे ५७. एकादश अतिविवेकी । यावया पंचाध्यायी पालखी । पुढें धाडिली कवतुकीं । निजभक्तविखीं कृपाळुवें ॥ ५८ ॥ निजभक्ताविषयी अत्यंत कृपाळू अशा भगवंतानें एकादशाचा पुढील ज्ञानगंभीर भाग ऐकण्यास येण्यासाठी आनंदानें ही पालखीच पुढे पाठविली आहे ५८. हे कृष्ण-उध्दवअुर्धमात्रा । अर्धोद्योप महायात्रा । ते यात्रेलागीं हांकारा । पंचाध्यायी खरा साधकां करी ॥ ५९ ॥ एकादश स्कंध ही कृष्णउद्धवरूप अर्धमात्रा आहे; अर्धोदय पर्वकाळाची महायात्रा आहे; ह्या यात्रेस येण्यासाठी साधकांना पंचाध्यायी ही दौंडी वाजवून बोलावीत आहे ५९. श्रीकृष्णउाध्दवमेळा । देखोनि ब्रह्मसुखाचा सोहळा । तो सांगों आली कळवळा । भक्तांजवळां पंचाध्यायी ॥ ५६० ॥ श्रीकृष्ण-उद्धवाच्या मेळ्यांतील ब्रह्मसुखाचा सोहळा पाहून, पंचाध्यायी ही मोठ्या कळकळीनें भक्तांजवळ सांगण्यासाठी आली आहे ५६०. अहंकाराचें मेट होतें । तें उठवूनि श्रीकृष्णनाथें । केलें आत्मतीर्थें मुक्तें । अभयहस्तें उध्दवासी ॥ ६१ ॥ अहंकाराचें नाके होते तें श्रीकृष्णनाथांनी उठविलें व आपल्या अभय हस्तानें आत्मस्वरूपी तीर्थ उद्धवाला स्नान करण्यासाठी मोकळे केले ६१. ते मुक्ततीर्थनवाई । पुढें सांगों आली पंचाध्यायी । संसारश्रांत जे जे कांहीं । ते धांवा लवलाहीं विश्रांतीसी ॥ ६२ ॥ त्या मुक्ततीर्थाचा नवलाव सांगावयाला पंचाध्यायी पुढे आली आहे. जे जे कोणी संसारानें श्रांत झालेले असतील, त्यांनी त्यांनी विश्रांतीसाठी लौकर धाव घ्यावी असे ती सांगते ६२. कृष्णउ्ध्दवगोडगोष्टी । हे निर्विकल्प कपिलाषष्ठी । ते पर्वकाळकसवटी । सांगों उठाउठीं पंचाध्यायी आली ॥ ६३ ॥ कृष्णाच्या व उद्धवाच्या गोडगोड गोष्टी ऐकावयास मिळणे, हा खरोखर कपिलाषष्ठीचा योग आहे. पर्वकाळची कसवटी (कसोटी) सांगण्यासाठी घाईघाईनें ही पंचाध्यायी आली आहे ६३. उध्दवालागीं भवसागरीं । उतरावया पायउधतारीं । भागवतमिषें श्रीहरी । सुगम सोपारी पायवाट केली ॥ ६४ ॥ उद्धवाला भवसमुद्रातून पायउतारानें उतरण्यासाठी श्रीकृष्णानी भागवताच्या रूपानें ही सुलभ आणि सोपी पायवाट करून दिली आहे ६४. पव्हणियाहूनि पायउीतारा । भागवतमार्ग अतिसोपरा । तो मार्गु दावावया पुरा । हांकारी स्त्रीशूद्रां पंचाध्यायी ॥ ६५ ॥ पोहून जाण्यापेक्षां पायउतार केव्हाही बरा; भागवतधर्ममार्ग ही अतिशय सोपी वाट आहे. तो मार्ग सारापुरा दाखवून देण्यासाठी, पंचाध्यायी ही स्त्रीशूद्रांना हाका मारीत आहे ६५. पुढील निरूपणआावडी । अतिशयें वाढे चढोवढी । ते कृष्णवाक्यरसगोडी । पंचाध्यायी फुडी साधावया सांगे ॥ ६६ ॥ पुढील निरूपणांतील गोडी, उत्तरोत्तर अधिकाधिक वाढतच जाईल. ती कृष्णवाक्यरसाची गोडी चाखून घ्या असें ही पंचाध्यायी सांगत आहे ६६. कृष्णउद्धवसंवादीं । होईल परब्रह्म-गवादी । साधकमुमुक्षांची मांदी । धांवे त्रिशुध्दी निजसुखार्थ ॥ ६७ ॥ कृष्णउद्धवसंवादामध्यें परब्रह्माचे अन्नछत्रच सुरू होईल. तेथे स्वतःच्या सुखाकरतां साधक आणि मुमुक्षूच्या झुंडीच्या झुंडी धाव घेतील ६७. परब्रह्म झालें सावेव । स्वरूपसुंदर ज्ञानगौरव । मनोहर रूपवैभव । स्वर्गींचे देव पाहों येती ॥ ६८ ॥ निरवयव परब्रह्मच कृष्णरूपानें सावयव होऊन आले आहे. त्याचे स्वरूपसुंदर ज्ञानगौरव व मनोहर रूपाचे वैभव पाहण्याकरता स्वर्गातील देव येणार आहेत ६८. तो देवांचा स्तुतिवादु । सवेंचि उध्दवाचा निर्वेदु । कृष्णउध्दवमहाबोधु । जेणें परमानंदु वोसंडे ॥ ६९ ॥ त्या देवांनी केलेले स्तुतिस्तोत्र, त्याबरोबरच उद्धवाचे वैराग्य, आणि कृष्णउद्धवाचें ज्ञानमय भाषण, की ज्याच्यामुळें परमानंदच उसळून यावयाचा ६९; ते पुढील अध्यायीं कथा । रसाळ सांगेन आतां । अवधान द्यावें श्रोतां । ग्रंथार्था निजबोधें ॥ ५७० ॥ ती रसभरित कथा पुढील अध्यायांत सांगेन. तर आतां श्रोत्यांनी निजबोधाच्या दृष्टीनें ग्रंथार्थाकडे लक्ष द्यावें ५७०. स्वयें वावडी करूनि पूर्ण । तिसी उडविजे जेवीं आपण । मग उडालेपणें जाण । आपल्या आपण संतोषिजे ॥ ७१ ॥ ज्याप्रमाणें सारी वावडी आपणच तयार करून ती आपणच उडवावी, आणि ती चांगली उडाली म्हणजे आपल्या आपणच संतोष मानावा ७१; तेवीं मजनांवें कविता । करूनि स्वयें सग्दुरु वक्ता । एवं वदवूनियां ग्रंथार्था । श्रोतेरूपें सर्वथा संतोषे स्वयें ॥ ७२ ॥ त्याप्रमाणें माझ्या नांवानें कविता करून सद्गुरु आपणच वक्ता होतो. अशा रीतीनें ग्रंथाचा अर्थ सांगून, आपणच श्रोत्यांच्या रूपानें आनंद मानतो ७२. तो एकपणेंवीण एकला एका । दुजेनवीण जनार्दनु सखा । तेणें पुढील ग्रंथआएवांका । विशदार्थें देखा विवंचिला ॥ ७३ ॥ एकपणावांचून एकटेपणानें असणारा एका (एकनाथ) आणि दुसरेपणाशिवाय असणारा सखा जनार्दन, त्यानेंच पुढील ग्रंथाचा विचार स्पष्ट करून सांगितला आहे ७३. नातळोनि दुजेपण । एका जनार्दना शरण । धरोनि श्रोत्यांचे चरण । पुढील अनुसंधान पावेल ॥ ७४ ॥ दुजेपणाला न शिवतां एकनाथ जनार्दनाला शरण आहे. श्रोत्यांचे चरण धरून तोच पुढील अनुसंधान (कथानक) सांगेल ७४. एका जनार्दन नांवें देख । दों नांवीं स्वरूप एक । हें जाणे तो आवश्यक । परम सुख स्वयें पावे ॥ ७५ ॥ नावें दोन असली तरी स्वरूप एकच आहे हें जो लक्षात घेईल, तो स्वतःही परम सुख पावेल ७५. एकाजनार्दना शरण । त्याची कृपा परिपूर्ण । पंचाध्यायी निरूपण । झाली संपूर्ण जनार्दनकृपा ॥ ५७६ ॥ एका हा जनार्दनाला शरण असल्यामुळे, त्याची त्याच्यावर पूर्ण कृपा आहे. त्या जनार्दनाच्या कृपेनेंच हे पंचाध्यायीचें निरूपण समाप्त झाले ५७६. इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे एकाकार-टीकायां वसुदेवनारदसंवादे पंचमोऽध्यायः ॥ ५ ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ५२ ॥ ओव्या ५७६ ॥ अध्याय पांचवा समाप्त |