[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
व्यास म्हणाले, ''हे जनमेजया, पूर्वीच्या अध्यायात वर्णन केलेले मंदिरच देवीचे वसतिस्थान आहे. ते सर्वात मध्यभागी आहे. तेथे हजार स्तंभ असलेले चार मंडप आहेत. शृंगारमंडप, मुक्तिमंडप, ज्ञानमंडप, एकांतमंडप असे मंडप आहेत. त्यांना विविध रत्ने लावलेली आहेत. तो अनेक धूपांनी युक्त असतो.
हे चारी मंडप कोटी सूर्याच्या तेजाप्रमाणे झळकतात. त्याच्या चोहोबाजूंनी काश्मीरकमलांची बाग आहे. मोगरा, कुंद यांची उपवने आहेत. कस्तुरीमृग आहेत. रत्नपायर्यांनी युक्त महावृक्षांचे अरण्य आहे. त्यात गुंजारव करणारे थवे आहेत. सर्व बाजूंनी सुगंध दरवळत असतो. त्यामुळे मणिद्वीप सुगंधमय झाले आहे.
शृंगारमंडलाच्या मध्यभागी जगदंबा असते. सर्व श्रेष्ठ देव त्या मंडलाचे सभासद आहेत. तेथे देवतांचे सुस्वर गायन चालू असते.
श्रीदेवीच्या प्रसादाने मुक्त झालेले प्राणी मुक्तिमंडपात जातात. तिसर्या मंडपात स्वतः देवी ज्ञानोपदेश करीत असते. चवथ्यात मैत्रिणींसह रक्षणाचा विचार करीत असते.
चिंतामणिगृहाच्या मुख्यस्थानी शक्तितत्त्वाचा मंचक आहे. त्याला दहा पायर्या आहेत. ब्रह्मा, विष्णु रुद्र, ईश्वर हे त्या मंचकाचे खूर आहेत. भगवान सदाशिव हा त्या मंचकाची वरची फणी आहे. त्यावर महादेव विराजमान असतो.
आपल्या लीलेसाठी ती देवी उत्पत्तिकाली दोन प्रकारची झाली. तिचा अर्धा भाग महेश्वर होय. कंदर्पाचा गर्व हरण करण्यासाठी तो उत्पन्न झाला आहे. तो कोटिमदनाप्रमाणे सुंदर आहे. पंचमुख विभूषणांनी भूषित असा आहे. हरिण, अभय, परशू व वर हे त्याने हातात धारण केले आहेत. ती नित्य सोळा वर्षाचा असतो. कोटिसूर्याप्रमाणे तेजस्वी व कोटीचंद्राप्रमाणे शांत असा तो आहे.
त्या भगवान महेश्वराच्या डाव्या मांडीवर ती भुवनेश्वरी बसलेली आहे. तिच्या कटिसूत्राला रत्नमणी आहेत. सुवर्णात जडविलेल्या वैडूर्यमण्यांची भूषणे ती ल्याली आहे.
श्रीचक्राकार वर्णभूषणांनी तिचे मुखकमल सुंदर दिसत आहे. चंद्राप्रमाणे ललाट, तोंडल्याप्रमाणे ओष्ठ, कस्तुरी व चंदन यांच्या टिळ्यांनी झळकणारे मुख, नेत्र चंद्रसूर्यांनी युक्त असल्याप्रमाणे असे तिचे स्वरूप आहे.
शुक्राच्या चांदणीप्रमाणे स्वच्छ व स्थूल मुक्ताफळांनी युक्त अशी नासिकाभूषणे तिने ल्याली आहेत. मोत्यांच्या कंठभूषणामुळे कंठ सुशोभित दिसत आहे. चंदन, कपूर, कुंकुम यांची उटी लावल्यामुळे स्तन सुशोभित दिसत आहेत. तिने विविध शृंगार केला आहे. तिचा कंठभाग शंखाकृती असून दंत डाळिंबीच्या बियांप्रमाणे आहेत. मुकूट अमूल्य रत्नांनी युक्त आहे. भृंगपंक्तीप्रमाणे काळे केस चमकत आहेत, त्यामुळे मुखकमलाला अधिक शोभा प्राप्त झाली आहे. शरदॠतूतील चंद्राप्रमाणे मुख आल्हादकारी दिसत आहे.
गंगोदकातील भोवर्याप्रमाणे तिची नाभी सुंदर आहे माणिकांनी जडवलेल्या मुद्रिका तिने बोटात धारण केल्या आहेत. कमल पाकळ्यांप्रमाणे बोटे शोभत आहेत. पक्षरागांनी तिची प्रभा उज्जवल दिसत आहे. रत्नाची काकणे व मोत्यांच्या माळामुळे ती विभूषित दिसत असून अमूल्य पदकांच्या रांगांनी शोभायमान झाली आहे.
हे राजा, मुद्रिकांच्या प्रभेमुळे हात चकाकत आहेत. चोळीवर अनेक रत्ने गुंफली आहेत. बुचड्यावर मालतीची सुगंधित पुष्पे माळली आहेत. त्याभोवती भ्रमर गुंजारव करीत आहेत. स्तनद्वय वर्तुलाकार व एकमेकांस चिकटलेले आहे.
त्यांच्या उंचवट्यामुळे तिच्या ठिकाणी मंदता भासत आहे. वर, पाश, अंकुश, अभय यांनी चारी हात युक्त आहेत. सुकुमार, सौंदर्यखाण, सर्वस्वरूप, निष्कपट व करुणामय अशी ती देवी आहे.
तिचे भाषण वीणारवापेक्षा मधुर आहे. तिच्या सख्या, दासी, अनेक देवता तिच्या नित्य सभोवती असतात. त्या देवीची स्तुती करीत असतात. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती यांनी युक्त असलेली ती जगदंबिका महेश्वरी भगवान महेश्वराच्या मांडीवर विराजमान झाली आहे.
लज्जा, तृष्टी, पुष्टी, कीर्ती, क्षमा, दया, बुद्धी, मेधा, स्मृती, लक्ष्मी ह्मा सर्व तिच्याजवळ मूर्त रूपाने असतात. जया, विजया, अपराजित, अजिता, नित्या, विलासिनी, दोग्ध्री, मंगला, नवा ह्मा तिच्या पीठशक्ती आहेत. त्या अंबिकेची सेवा करीत असतात. तिच्या दोन्ही बाजूस शंख, पद्म असे दोन निधी आहेत. नूतन रत्ने, सुवर्ण व धातू वाहणाऱ्या अशा दोन नद्या त्या निधीपासून निघाल्या आहेत. त्या सुधासमुद्रास जाऊन मिळतात.
मांडीवर बसलेल्या महेश्वरीच्या सं. गतीमुळे महेश्वराला सुख प्राप्त झाले आहे. आता चिंतामणिरत्न मंदिराचे वर्णन सांगतो.
हे मंदिर सहस्र योजने विस्तीर्ण आहे. त्या भोवती अनेक कोट आहेत. हे मंदिर अंतरिक्षात निराधार आहे. प्रलय व सृष्टीच्या काली ते प्रसंगानुरूप विकास व संकुचन पावत असते. देवीचे वसतिस्थान असे ते चिंतामणिमंदिर संपूर्ण कांतीचा परमावधी आहे.
प्रत्येक ब्रह्मांडात देवलोक, नागलोक, मनुष्यलोक व इतर सर्व लोक असतात, तसेच देवीचे उपासकही असतात. जे देवीच्या क्षेत्रात मृत्यू पावतात ते देवीच्या संनिध येतात. तेथे घृत, दूध, दही, मध यांच्या नद्या आहेत. तसेच अमृतवाहिनी, द्राक्षरसवाहिनी, जंबुरसवाहिनी आम्ररसवाहिनी, इसुरसवाहिनी अशा हजारो नद्या आहेत.
इच्छेप्रमाणे फल देणारे वृक्ष, विपुल जलाच्या विहिरी तेथे आहेत. रोग, जरा, चिंता, क्रोध, मत्सर, काम इत्यादि विकार तेथे उत्पन्न होत नाहीत. सर्व प्राणी चिरतरुण व स्त्रीयुक्त असून सहस्र सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते नित्य देवीची भक्ती करतात. त्यातील काही सलोकता मुक्ती सामिप्य मुक्ती व सरूपता मुक्ती पावलेले आहेत.
हे राजा, सर्व ब्रह्मांडातील सर्व देवता तेथेच राहात असतात. त्या जगदीश्वरीची सेवा करतात. सात कोटी महामंत्र, महाविद्या ह्मा सर्व मूर्तस्वरूपात तेथे आहेत. त्या शिवेची उपासना करतात. अशा त्या मणिद्वीपाइतके प्रकाशमान दुसरे काहीही नाही. हे द्वीप विद्रुमरत्ने, मरकतमणी, वीज, सूर्य, यांच्या कांतीचे तसेच मुसलधार पावसाच्या सरीप्रमाणे भासते. काही ठिकाणी ते अग्नीप्रमाणे दिसते तर कोठे तप्त सुवर्णाप्रमाणे दिसते.
येथे नृत्य करणार्या मयुरांचे समुदाय आहेत. कपोत, कोकिला, मैना, पोपट यांच्या स्वरांनी ते मंडित आहे. तेथे लक्षावधी रमणीय सरोवरे आहेत. सर्वत्र रत्नकमलांनी ते भूषित आहे. सुगंधयुक्त वायूने ते परिपूर्ण आहे. चिंतामणींच्या तेजाने सर्व दिशा प्रखर तेजस्वी वाटतात.
ऐश्वर्य, शृंगार, सर्वज्ञता, तेज, उत्तम गुण, दया यांनी हे सर्व द्वीप युक्त आहे. सर्व प्रकारचे आनंद येथे वास करतात. हे सुंदर मणिद्वीप महादेवीचे श्रेष्ठ स्थान आहे.
याच्या स्मरणानेही तत्काल मुक्ती मिळते. हे जनमेजया, एकाग्र चित्ताने हे पाच अध्याय नित्य पठण करावेत. त्यामुळे भूत, प्रेत, पिशाच यांपासून बाधा होत नाही. नवीन गृह तयार करताना वास्तुशांतीचे वेळी हे अध्याय वाचावे म्हणजे कल्याण होते.