[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
व्यास म्हणाले, ''हे राजा, त्या पुष्परागमय कोटाच्या पुढे कुंकवाप्रमाणे पद्यरागमय कोट आहे व त्याच्या जवळील भूमीही तशीच आहे. तो दहा योजने लांब असून गोपुरे व द्वारे यांनी युक्त आहे. त्याच मण्याच्या स्तंभांचे शेकडो मंडप तेथे आहेत. त्या मंडपामध्ये भूमीवर बसलेल्या, अनेक आयुधे धारण करणार्या, रत्नभूषणांनी भूषित व महावीर अशा चौसष्ट कला आहेत. त्यातील प्रत्येकी करता निरनिराळा लोक आहे. आपापल्या लोकांच्या स्वामिनी अशा त्या कला त्या पद्यरागकोटाचा आश्रय करून सदा राहिल्या आहेत. पिंगलाक्षी, विशालाक्षी, समृद्धी, वृद्धी, श्रद्धा, स्वाहा, स्वधा, माया, पृथ्वी, त्रिलोकमाता, सावित्री, गायत्री, देवेश्वरी, सुरूपा, बहुरूपा, स्कंधमाता, अच्युताची प्रिया, विमला अमला, अरुणी, वारुणी, प्रकृती, सृष्टी स्थिती, सद्गती, संध्या, माता, सती, हंसी, मर्दिका, वज्रिका, परा, वेदमाता, भगवती, देवकी, कमलासना, त्रिमुखी, दुसरी सप्तमुखस्त्री, सुरासुरविमर्दिनी, लंबोष्ठी, ऊर्ध्वकेशी, बहुशीर्षा, वृकोदरी, रथरेखा, शिशिरेखा, गगनवेगा, पवनवेगा, भुवनपाला, मदनातुरा, अंगना, अनंगमथना, अनंगमेखला, अनंतकुसुमा, विश्वरूपा, सुरादिका, क्षयंकरी, अक्षोभ्या, सत्यवादिनी बहुरूपा, शुचिव्रता, उदाराख्या आणि वर्णाशी अशा त्या चौसष्ट कला आहेत. त्या सर्व कलांच्या मुखातीत जिव्हा जळत असल्यासारख्या दिसतात. त्यांच्या मुखांतून भयंकर अग्नी असल्याचा भास होतो.
'आम्ही सर्व उदक पिऊन टाकणार ! आम्ही सूर्यास खाऊन टाकतो ? वायूचे आज स्तंभन करून सोडतो ! सर्व जगास गिळून टाकतो !' असे त्या म्हणतात. त्या कलांचे नेत्र क्रोधाने लाल झालेले असतात. त्या सर्व चापबाण धारण करणार्या असून सदा युद्धास उत्सुक असतात. दाढांच्या कट् कट् शब्दांनी त्या दाही दिशा बधिर करून सोडतात. प्रत्येक कला धनुष्य-बाण व शंभर अक्षौहिणी सैन्याने युक्त असते. लक्ष ब्रह्मांडांचा नाश करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे.
त्या कोटामध्ये युद्धसामुग्री तयार असते. रथ, घोडे, हत्ती यांची तर गणनाच करता येत नाही.
ह्मा पद्मरागमय कोटाच्यापुढे गोमेदमण्यांनी केलेला व दहा योजने लांब असा कोट आहे. तेजस्वी जास्वंदीच्या पुष्पाप्रमाणे त्याचा वर्ण असून त्यातील भूमीही तशीच आहे. तेथे राहणार्या लोकांची गृहेही गोमेदानेच बांधलेली आहेत. तेथील वनश्री, उत्तम स्तंभ, वृक्ष, विहिरी व सरोवरे सुद्धा गोमेदाचीच आहेत. त्यांचा वर्णसुद्धा कुंकवाप्रमाणे ताम्रवर्ण असतो.
त्यामध्ये महादेवीरूप बत्तीस शक्ती राहतात. अनेक शस्त्रे हीच त्यांची प्रहाराची साधने आहेत. गोमेदमण्यांनी त्या सर्व भूषित झालेल्या आहेत.
प्रत्येक लोकांत राहणार्या त्या भयंकर शक्ती गोमेदकोटामध्ये त्याच्या रक्षणाकरिता तयार होऊन राहतात. त्यांचे बाहू वर्तुळ असून नेत्र सर्वकाळ क्रोधामुळे लाल असतात व 'तोडा, फोडा, जाळा' अशी वाणी त्या सतत उच्चारीत असतात. कारण त्यांचे अंतःकरण सदा युद्धाविषयी उत्सुक असते.
प्रत्येक महाशक्तीचे दहा अक्षौहिणी सैन्य आहे. प्रत्येक शक्ती एकलक्ष ब्रह्मांडांचा नाश करणारी अशी आहे.
विद्या, र्हीं, पुष्टी, प्रज्ञा, सिनीवाली, कुहू, रुद्रा, वीर्या, प्रभा, नंदा, पोषिणी, ऋद्धिदा, शुभा, कालरात्री, महारात्री, भद्रकाली, कपर्दिनी, विकृती, दंडिनी, मुंडिनी, इंदुखंडा, शिखंडिनी, निशुंभशुंभमथिनी, महिषासुरमर्दिनी, इंद्राणी, शंकरार्धशरीरिणी, रुद्राणी, नारी, नारायणी, त्रिशूलिनी, पालिनी, अंबिका व ल्हादिनी अशा बत्तीस शक्ती आहेत.
जर ह्या देवी रागावल्या तर ब्रह्मांडाचा नाशच असे समजावे. त्या केव्हाही व कोठेही पराजित होत नाहीत. त्या गोमेदमणीकोटापुढे उत्तम वज्रमण्यांनी केलेला कोट आहे. तो दहा योजने उंच, गोपुरे व द्वारे यांनी युक्त, कपाट व साखळ्या यांनी दृढ केलेला व नूतन वृक्षांनी उज्जवल आहे.
त्यातील भूमी व सर्व वस्तु हिर्याच्या आहेत. गृहे, मार्ग, गटारे, मोठ्या मार्गातील पटांगणे, मोठे वृक्ष, तळी व पक्षी हेही हिर्यांचेच आहेत. अनेक विहिरी, कूप इत्यादि सर्व पदार्थ हिर्यांचेच आहेत.
श्रीभुवनेश्वरीच्या दासी तेथे राहतात. काही पंखा धारण करतात. काहींची करकमले मद्यप्राशनपात्राने पूर्ण असतात. कित्येकींनी हातात विचित्र आरसे घेतलेले असतात. काही दासी तांबूलपत्रे घेतात, काही छत्र धारण करतात. काही चवर्या वारतात. काही अनेक वस्त्रे उचलतात. कित्येकींच्या हातात पुष्पे असतात. कित्येक कुंकवाचे लेपन करण्याकरिता कुंकमपात्र, कित्येक काजळाच्या डब्या व कित्येक शेंदूराच्या कळ्या हातात घेतात.
काही चित्रे काढणार्या, काही पादसेवन करण्यात निमग्न, काही अलंकार करणार्या आहेत. कित्येक स्वतः अनेक भूषणे धारण करणार्या असून पुष्पांची भूषणे तयार करणार्या, पुष्पांच्या योगाने शृंगार व विलासामध्ये चतुर असलेल्या परिधानीय वस्त्र नेसलेल्या असतात. देवीच्या कृपाकटाक्षामुळे ज्यांनी त्रिभुवन तुच्छ मानले आहे अशा त्या दासी शृंगारमदाने धुंद झालेल्या असून देवीप्रमाणेच आहेत.
अनंगरूपा, अनंगदमना, मदनातुरा भुवनवेगा, भुवनपालिका, सर्वशिशिरा, अनंगवेदना, अनंगमेखला अशा ह्या सर्व शक्ती आहेत. त्यांचे अंग विजेप्रमाणे चमकत असते. त्यांच्या कमरेला कमरपट्टा असतो. छुमछुम वाजणार्या तोरड्या त्यांच्या पायांत असतात. त्या बाहेरून आत व आतून बाहेर अशा धावत असतात. त्या सर्व दासी विजेप्रमाणे शोभतात. त्या सर्व कार्यामध्ये निपुण असून त्याच्या हातांत वेताच्या काठ्या असतात. अशा त्या दासी सदा त्या कोटाच्या आत येथे राहतात आणि त्या कोटाच्या बाहेर आठही दिशांना नाना वाहने व अस्त्रे यांनी विराजमान अशी त्यांची घरे असतात.
वज्राच्या कोटापुढे वैडूर्यमण्यांनी बांधलेला कोट आहे. हा दहा योजने उंच असून गोपूरे आणि द्वारे यांनी सुशोभित झाला आहे. तेथील सर्व भूमीही वैडूर्याचीच आहे. नानाप्रकारची गृहे, मार्ग, गटारे व राजमार्ग, विहिरी, कुवे, तलाव, नद्या, नद्यांचे तट, वाळू इत्यादि सर्व वैदुर्यमण्याचेच आहेत.
तेथे आठही दिशांना सर्वतः ब्राह्मी इत्यादि शक्तींचे मंडल संचार करीत असते. त्या देवी प्रत्येक ब्रह्मांडातील मातृकांच्या समष्टिरूप आहेत. त्या ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी व चामुंडा अशा सात मातृका होत व आठवी माता महालक्ष्मी होय. ब्रह्मा, रुद्र इत्यादी देवांसारखाच यांचा आकार आहे. ह्मा जगाचे कल्याण करणार्या सर्व देवी आपापल्या सैन्यासह तेथे राहतात.
ह्या कोटाच्या चारी द्वारांवर त्या महेश्वरीची वाहने अलंकारासह सज्ज केलेली असतात. कोट्यावधी हत्ती, घोडे, शिबिका, हंस, सिंह, गरूड, मयूर, बैल त्याचप्रमाणे ज्यांच्यावर आकाशाचे चुंबन करणारे ध्वज शोभत आहेत व जे पाष्णिग्राह इत्यादि अंगांनी युक्त असे कोट्यावधी रथ तेथे असतात. वाद्यांसह महाध्यजांनी सुशोभित कोट्यावधी विमानेही आहेत.
ह्या वैडूर्यमण्यांच्या कोटाच्या पलीकडे इंद्रनीलमण्यांचा कोट आहे. तोही दहा योजने उंच असून त्यातील भूमी, लहान मार्ग, गृहे, विहिरी, कुवे, तलाव इत्यादि सर्व इंद्रनीलमण्यांची आहेत.
तेथे अनेक योजने विस्तृत असे एक कमल आहे. त्याला सोळा अरा असून जणू काय दुसरे सुदर्शनच आहे. तेथे सोळा शक्तींची नानाप्रकारची स्थाने सर्व उपकरणांनी समृद्ध अशी आहेत.
कराली, विकराली, उमा, सरस्वती, श्रीदुर्गा, उषा, लक्ष्मी, शृती, स्मृती, धृती, श्रद्धा, मेधा, मती, कांती व आर्या अशा त्या सोळा शक्ती आहेत. त्यांचा वर्ण निळ्या मेघासारखा असतो. त्यांच्या हातात तलवारी असतात. त्या सगळ्या सारख्या असून त्या खेटकनामक शस्त्रेही धारण करतात. त्यांचे मन सदा युद्धामध्ये गढून गेलेले असते.
जगदीश्वरी देवीच्या ह्या सर्व सेनानी असून त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये असलेल्या शक्तीच्या अधिदेवता आहेत. भुवनेश्वरी देवीच्या भक्तीमुळेच शक्तिसंपन्न झालेल्या ह्या देवी ब्रह्मांडाचाही क्षोभ करणार्या आहेत. त्या अनेक रथांवर बसलेल्या असून त्यांच्यात अनेक शक्ती असतात.
इंद्रनीलमण्यांच्या ह्या महाकोटाच्या पुढे विस्तृत असा मोत्यांचा कोट आहे. तो दहा योजने दीर्घ आहे. त्याची भूमीही मोत्यांचीच आहे. त्याच्यामध्ये अष्टपत्री कमल आहे. तेही मोत्ये व मणी यांनी युक्त आहे. सुंदर केसरांनी सुशोभित आहे. तेथे देवीच्याच आकाराच्या, दिव्य शस्त्रे धारण करणार्या व जनांची वार्ता जाणणार्या अशा आठ मंत्रिणी आहेत. देवीप्रमाणेच त्यांचे भोग असून त्या देवींचे इंगित जाणणार्या महापंडिता आहेत.
त्या सर्व कार्यात कुशल, स्वामिनीच्या कार्यात तत्पर देवीचा मनोभिप्राय जाणणार्या, अति सुंदर व चतुर अशा आहेत. त्या ज्ञानशक्तीने सर्व प्राण्यांचा वृत्तांत जाणतात.
अनंगकुसुमा, अनंगकुसुमातुरा, अनंगमदना, अनंगमदनातुरा, भुवनपाला, गगनवेगा, शशिरेखा व गगनरेखा अशी त्यांची नावे आहेत. हा पाश, अंकुश, वर व अभय धारण करणार्या असून ह्या आठ देवींची शरीरे ताम्रवर्णी आहेत. त्यांना विश्वासंबंधी वार्ता प्रत्येक क्षणी समजत असते.
हे राजा, ह्या मोत्याच्या कोटापुढे मरकतमण्याचा कोट आहे. तो दहा योजने दीर्घ असून नाना सौभाग्याने युक्त व नाना भोगांनी संपन्न आहे. त्याची मध्यभूमी व तेथील गृहे इत्यादि सर्व मरकत मण्यांचीच आहेत. तेथेही एक षट्कोनी विस्तीर्ण कमल आहे.
हे राजा, त्याच्या कोणात राहणार्या देवता कोणत्या त्या ऐक. पूर्वकोनामध्ये तो चतुर्मुख ब्रह्मदेव गायत्रीसह असतो. तो कमंडलू माला, अभय, व दंड ही आयुधे धारण करतो व त्याचीच आयुधे ती परदेवता गायत्रीही धारण करीत असते. तेथे मूर्तिमंत सर्व वेद, नाना प्रकारची शास्त्रे, स्मृती व पुराणेही रहातात.
हे राजा, जितके ब्रह्मदेवाचे अवतार झालेले आहेत तितकेच गायत्रीचेही अवतार झाले. ते सर्व अवतार व जे व्याहृतींचे अवतार झाले ते सर्व तेथे निरंतर राहतात. त्या कमलाच्या नैर्ऋत्य कोनामध्ये शंख, चक्र, गदा व पद्म ही आयुधे जिच्या करकमलात शोभत आहेत अशी ती सावित्री विष्णूसह राहते. मस्त्य, कूर्म इत्यादि जे विष्णूचे अवतार झाले आहेत ते सर्व व जे सावित्रीचे अवतार झाले आहेत ते सर्व तेथे राहतात.
वायव्य कोनामध्ये परशू अक्षमाला, अभय व वर ही आयुधे धारण करणारे तो भगवान महारुद्र राहातो व तेथेच गौरीदेवीही असते.
हे राजा, दक्षिणामूर्ती इत्यादी जे जे रुद्राचे भेद आहेत व जे त्या गौरीचे भेद आहेत ते सर्वही तेथेच राहतात. तसेच जे चौसष्ट आगम आहेत व जे दुसरेही अनेक आगम सांगितलेले आहेत, तेही सर्व तेथेच मूर्तिमंत राहतात.
आग्नेय कोनात आपल्या एका हातात रत्नाचा कुंभ व दुसर्यात मण्यांचा करंडा घेऊन तो देवीचा निधिपिती, धननायक, सर्वगुणसंपन्न कुबेर, लक्ष्मी व अनेक यक्षसमुदाय यांच्यासह राहतो. पश्चिम कोनात रतीसह मदन असतो. तो तेथे पाश, अंकुश, धनुष्य व बाण धारण करीत नित्य विराजमान असतो. तेथे तर मूर्तिमंत शृंगार सर्वदा राहतात.
ईशान्य कोनात पुष्टिसहवर्तमान विराज राहतो. तो विघ्नहर्ता वीर, पाश, अंकुश इत्यादि आयुधे धारण करून तेथे नित्य राहतो, हे राजा, गणपतीच्या ज्या ज्या विभूती आहेत त्या सर्व आपल्या मोठ्या ऐश्वर्यासह येथे राहतात.
हे राजा, सर्व ब्रह्मादि देव प्रतिब्रह्मांडात असणार्या ब्रह्मदेवादिकांच्या समष्टी होत. हे सर्व तेथे त्या जगदीश्वरीची सेवा करीत असतात.
त्या महामरकतकोटाच्या पुढे शंभर योजने दीर्घ असा आणखी एक प्रवालाचा कोट आहे. त्याची कांती कुंकुमाप्रमाणे ताम्रवर्ण असून त्यातील मध्यभूमी व गृहादिक ही सर्व प्रवालाचीच आहेत असे म्हटले आहे. त्यामध्ये पाच महाभूतांच्या पाच स्वामिनी हृल्लेखा, गगना, रक्ता, करालिका व महोच्छुष्मा ह्मा नावांच्या पंचमहाभूतांच्याच धर्माच्या व आकाराच्या आहेत. पाश, अंकुश वर व अभय धारण करणार्या, ज्यांच्या अंगावर भूषणे आहेत व ज्या प्रत्यक्ष देवीसारख्या वेषाच्या, परिपूर्ण व नूतनयौवनामुळे गर्विष्ठ आहेत.
या प्रवालाच्या कोटानंतर एक नूतन नवरत्नांनी निर्माण केलेला, अनेक योजने विस्तीर्ण असा मोठा कोट आहे. त्या ठिकाणी आम्ना देवींची अनेक मंदिरे आहेत. ती सर्व व तलाव, सरोवरे सर्व पदार्थ, नवरत्नमयच आहेत. श्रीदेवीचे जे मुख्य अवतार आहेत ते सर्व तेथे राहतात.
हे राजा, दश महाविद्या व त्यांचे सर्व महाभेद हे सर्व तेथेच आहेत. सारांश, कोटी सूर्याप्रमाणे ज्यांची प्रभा आहे अशा त्या सर्व देवी आपल्या आवरणदेवींसह, आपल्या भूषणांसह व वाहनांसह तेथे असतात. तेथेच सात कोटी महामंत्रांच्या देवीही असतात.
हे राजा, या नवरत्नमय कोटाच्या पुढे चिंतामणिनामक रत्ननिर्मित एक मोठे मंदिर आहे. त्यातील प्रत्येक वस्तु चिंतामणीचीच केलेली आहे. त्या मंदिरातील हजारो खांब सूर्यकांतमण्यांनी, चंद्रकांतमण्यांनी व त्याचप्रमाणे विजेसारख्या तेजस्वी पाषाणांनी केलेले आहेत. त्यांच्या प्रभेमुळे त्या मंदिरातील कोणतीच वस्तु स्पष्ट दिसत नाही.