[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
व्यास म्हणाले, ''ब्रह्मलोकाच्या वर सर्वलोक आहे. तेच मणिद्वीप होय. तेथेच ही देवी विराजमान झाली आहे. तो लोक सर्वात विस्तृत आहे.आंबिकेने स्वतःच तो निर्माण केला. मूलप्रकृतीने स्वतःचे निवासस्थान म्हणून प्रथम त्याची उत्पत्ती केली. तो कैलास, वैकुंठ याहूनही उत्तम आहे. त्रैलोक्याच्या छत्रीप्रमाणे हा लोक आहे. हा भवसंताप नष्ट करतो.
सर्व ब्रह्मांडात हाच लोक छायारूप आहे. याच्या आश्रयाखाली सर्व ब्रह्मांडे आहेत. तो गहन व विस्तीर्ण आहे. मणिद्वीपाच्या चोहोबाजूस अमृतसमुद्र आहे. त्यात शेकडो लाटा उसळत असतात. त्यातील वाळू रत्नाप्रमाणे स्वच्छ आहे. लाटांमुळे त्यात नित्य नवीन लहरी उत्पन्न होतात. ते द्वीप अनेक ध्वजांनी युक्त आहे. समुद्रातून नित्य नावा फिरत असतात. तीरावर रत्नांचे वृक्ष आहेत. असा सुधासमुद्र तेथे आहे.
त्याच्यापुढे अत्यंत उंच व विस्तृत असा लोखंडी कोट आहे. तेथे सर्व बाजूंनी युद्धनिपुण रक्षक राहात असतात. त्याला चार द्वारे असून शेकडो द्वारपाल आहेत. देवीभक्तगणांनी कोट परिवेष्टित आहे. जे देव जगदीश्वरीच्या दर्शनास येतात त्यांचे गण व वाहने तेथे ठेवतात. कोटाच्या आतून त्यांना पायी जावे लागते.
विमानांवर शेकडो घंटांचा नाद होत असतो. घोड्यांचे खिंकाळणे, टापांचा आवाज यांनी दिशा भरून जातात. असंख्य दाटीमुळे देवीगण देवांच्या सेवकांना वेत्राने ताडण करीत असतात. त्या कोलाहलात कोणाचाही शब्द स्पष्ट ऐकू येत नाही. असा तो कोट आहे.
ठिकठिकाणी उदकांनी सरोवरे भरलेली आहेत. अनेक रत्नांच्या बागा तेथे आहेत. त्यांच्यापुढे कास्यधातूच्या मंडलाचा दुसरा कोट आहे. त्याचे शिखर आकाशास भिडले आहे. तो गोपुरे व द्वारे यांनी युक्त आहे. वृक्षांच्या सर्व जाती तेथे आहेत. फणस, बकुळ, लोध्र, कण्हेर, शिंशप, देवदारू, कांचन, आम्र, समेरू, औंट, रानवांगी, लवंग, रिंगणी, लालमुचकुंद, वेली, कंदवृक्ष, ताल, तमाल, साल, कंकोल, नागरमोत्रा, सुरंगी, पीलुवृक्ष, सार्ज, कर्षी, अश्वकर्ण, हस्तिकर्ण, तालकर्ण, डाळिंबी, गणिका, बंधुजीवा, डांबीर, काटेशेवंती, चाफा, सुवर्णवृक्ष, कालगरुवृक्ष, चंदन, खजूरी, जुई, मारवेल, ऊस, चिकाल, खैर, चिंच, बिबवा, एरंड, कुड, बिल्ववृक्ष, तुलसी, मोगरी इत्यादी वृक्षवेली तेथे आहेत.
कोकिलांच्या रवाने भरलेले, भ्रमरांच्या गुंजारवाने युक्त असे वृक्ष तेथे आहेत. अनेक पक्षी तेथे क्रीडा करतात. पारवे, पोपट, सारिका, हंस असे पक्षी तेथे सुवासिक वनात नित्य असतात. हरिणांचे कळप पळत असतात. मधाचा स्राव करणारे वन केकारवामुळे भरून गेले आहे.
कांस्यकोटापुढे ताम्रकोट आहे. तो चौकोनी व सात योजने उंच आहे. त्या कोटात कल्पवृक्षाची बाग आहे. सुवर्णाप्रमाणे तेजस्वी फळे, पत्रे व रत्ने ह्माच बिया असलेली फळे तेथे आहेत. त्यांचा सुगंध दहा योजनेपर्यंत पसरतो. त्या वनाचे रक्षण वसंतऋतू करतो. त्याला मधुश्री, माधवश्री अशा दोन भार्या आहेत. तो प्रसन्नवदन आहे.
गंधर्वांच्या गायनाने वन निनादून जाते. वसंतलक्ष्मीने युक्त असलेले ते वन कामी पुरुषांना प्रेरणा देते.
ताम्रकोटाच्यापुढे सात योजने उंचीचा शिशाचा कोट आहे. दोन कोटांच्यामध्ये संतान कल्पवृक्षाची वाटिका आहे. त्यांच्या पुष्पांचा सुवास दहा योजने पसरतो. त्यावर सुवर्णासारखी फुले येतात. अमृताप्रमाणे मधुर फळे असतात. हे राजा, त्या बागेचा नायक ग्रीष्म ॠतू असून शुक्रश्री व शुचिश्री लग दोन लयाच्या भार्या आहेत. संतापाने त्रस्त लोक त्याच्या छायेखाली बसतात. सिद्धांनी परिवेष्टित, नाना देवींनी युक्त, करकमलात ताडाचे पंखे, पुष्पमालांनी विभूषित झालेल्या शितल उदकात शरीरे चंदनद्रवाने चर्चिली आहेत, अशा बसलेल्या स्त्रियांनी तो कोट सुशोभित आहे.
त्या शिशाच्या कोटाच्या पुढे पितळेचा सुंदर कोट आहे. तोही सात योजने दीर्घ आहे. या दोन कोटांमध्ये सुंदर हरिश्चंदनवृक्षांची बाग आहे. त्या बागेचा मेघवाहन स्वामी आहे. त्याचे नेत्र विजेप्रमाणे देदीप्यमान असून जीमून हे त्याचे कवच आहे. चोहोकडे वज्रनिर्घोषद्वारा गर्जना करणारा व इंद्रधनुष्य ज्याच्याजवळ आहे असा तो वर्षत आपल्या गणांसह हजारो उदकधारांचा तेथे वर्षाव करीत असतो.
वर्षॠतूच्या नभःश्री, नभस्यश्री, स्वरस्या, रस्यमालिनी, अंबा, दुला, निरत्नी, आभ्रमंती, मेघयंतिका, वर्षयंती, चिबुणिका व वारिधारा अशा बारा शक्ती आहेत. तेथे नद्या व नद यांचे प्रवाह मोठ्या वेगाने वाहात असतात. विषयी मनुष्याच्या चित्ताप्रमाणे कलुषित उदकांनी परिपूर्ण अशी अनेक सरोवरे आहेत.
तेथे देवीप्रीत्यर्थ नानाविध कर्मे करणारे देव व सिद्ध राहतात. तेथे त्यांनी देवीस अनेक वापी, कूप, तडाग अर्पण केलेले आहेत. ते गण आपल्या स्त्रियांसह तेथे विलास करीत राहतात.
त्या पितळेच्या कोटापुढे सात योजने लांब असा एक पंचलोहाचा कोट आहे. त्याच्याजवळ मंदारवृक्षाची बाग आहे. ती अनेक पुष्पलतांनी व्यापलेली असून चित्रविचित्र पल्लवांनी सुशोभित आहे. या ठिकाणी शरदॠतु अधिकारी आहे. त्य्याच्या इषलक्ष्मी व ऊर्जलक्ष्मी अशा दोन भार्या आहेत. येथेही काही स्त्रिया नानाविध सुखसंभारासह राहतात.
पंचलोहमयापुढे सात योजने दीर्घ, देदीप्यमान व महाशृंगांनी युक्त असा रुप्याचा कोट आहे. या कोटाजवळ पुष्पांच्या गुच्छांनी युक्त अशी पारिजात वृक्षांची बाग असून त्यांची फुले दहा योजनेपर्यंत सर्व प्रदेश सुगंधी करून सोडणारी असतात. ती पुष्पे देवीकर्म करणार्या सर्व गणांस आनंदित करितात.
तेथे हेमंतऋतू अधिपती आहे. तो आपल्या सर्व गणांसह व आयुधांसह सर्व कामी जनांना आनंदित करीत असतो. सहश्री व सहस्यश्री अशा त्याच्या दोन भार्या आहेत. देवीप्रीत्यर्थ व्रत करणारे सिद्ध त्याच्याजवळ राहतात.
त्या रुप्याच्या कोटापुढे सात योजने दीर्घ असा एक सुवर्णाचा कोट आहे. तो तापलेल्या सोन्याचा केलेला आहे. त्याच्याजवळ पुष्पे व पल्लव यांनी सुशोभित अशी कदंबवृक्षांची बाग आहे. तेथे कदंबजन्य मद्याच्या हजारो धारा पडत असतात. त्यांचे यथेच्छ प्राशन केले असता आत्मानंदाचा अनुभव येतो. तेथील महोदयरूप शिशिरॠतु हा अधिपती असून त्याच्या तपःश्री व तपस्यश्री अशा दोन भार्या आहेत. हा शिशिरऋतू त्या दोन भार्यासह नानाविलास करीत तेथे राहतो. देवीप्रीत्यर्थ दान करणारे अनेक सिद्ध, स्त्रिया व इतरही तेथे असतात.
त्या सुवर्णकोटाच्या पुढे सात योजने दीर्घ व ज्याची आकृती कुंकवाप्रमाणे तांबडी आहे असा एक पुष्परागाचा कोट आहे. तेथील भूमी, वने व उपवने ही सर्व पुष्परागमय आहेत. त्या रत्नाकार वृक्षांच्या मुळाशी असलेली अळीसुद्धा पुष्परागमयच आहेत. ज्या रत्नांचा तो कोट बांधला आहे, त्याच रत्नांचे त्याच्या खाली वृक्ष, पक्षी, भूमी आहे. तेथील उदकही त्या रत्नांच्या रंगाचेच दिसते. मंडप, मंडपाचे स्तंभ, सरोवरे, कमले इत्यादि सर्व त्या रंगाचेच आहेत.
ह्याप्रमाणे हे त्या रत्नादिकांच्या कोटाविषयीचे सामान्य वर्णन मी तुला सांगितले. पहिल्या कोटापेक्षा दुसरा कोट लक्षपट तेजस्वी आहे. प्रत्येक ब्रह्मांडापेक्षा राहणारे दिक्यपाल तेथे राहतात. उंच शिखरे असलेली अमरावती नगरी या द्वीपाच्या पूर्वेकडे आहे. ती अनेक उपवनांनी सुशोभित असून तेथे महेंद्र राहतो.
स्वर्गलोकामध्ये जेवढी स्वर्गशोभा आहे त्याच्यापेक्षा हजारपट अधिक इंद्राच्या नगराची शोभा आहे. या स्थळी ऐरावतावर आरूढ झालेला, ज्याने आपल्या हातात वज्र घेतले आहे, असा तो प्रतापी समष्टिरूप इंद्र देवसैन्यासह विराजमान होत असतो. देवस्त्रियांसह शचीही तेथेच असते.
तशीच स्वर्गस्थ अग्नीच्या नगराप्रमाणे आग्नेयदिशेकडे अग्नीची नगरी आहे. तेथे स्वाहा व स्वधा यांच्यासह आपले वाहन व भूषणे घेऊन आपल्या गणांसह तो अग्नी असतो.
या द्वीपाच्या दक्षिण दिशेकडे यमपुरी आहे. तिच्यामध्ये आपल्या चित्रगुप्तप्रभूती दूतांसह तो सूर्यपुत्र यम राहतो. नैऋत्यदिशेमध्ये राक्षसांच्या नगरीत राक्षसांसह तो खडा धारण करणारा, तेजस्वी निर्ॠती आपल्या शक्तीसह राहतो.
पश्चिम दिशेकडे पाश धारण करणारा, प्रतापी, महामत्स्यावर बसलेला, मागधी व मधू या नावाचे मद्य प्राशन करणारा, वरुणराजा आपल्या शक्ती व यादोगण यांच्यासह असतो. तो वरुण तेथे आपल्या वरुणानी स्त्रीसह राहतो. वायव्यदिशेकडे वायुलोक आहे. ज्याच्या हातात ध्वज आहे व ज्याचे नेत्र विशाल आहेत, जो मृगरूपी वाहनावर आरूढ झालेला आहे, असा वायु, मरुद्गण व स्वशक्ती यांसह राहतो.
उत्तर दिशेकडे यक्षांचा लोक आहे. तेथे वृद्धी, ॠद्धी शक्तींसह व पद्मादि नऊ निधींसह तो श्रीमान कुबेर राहतो. तो आपल्या मणिभद्र, पूर्णभद्र, मणिमान, मणिकंधर, मणिभूष, मणिस्रग्वी व मणिकार्कधारक या यक्षसेनापतीसह राहतो.
ईशान्यदिशेकडे अमूल्यरत्नखचित व मोठा असा रुद्रलोक आहे. त्याचा अधिपती तो भगवान रुद्र आहे.
रागीट, ज्याचे नेत्र अतितेजस्वी आहेत, ज्याने पाठीवर बाणांचा भाता बांधला आहे, चमकणारे धनुष्य ज्याच्या डाव्या हातात आहे व ज्यांनी आपली धनुष्ये ठेवली आहेत. अशा अनेक धनुर्धर योद्ध्यांसह तो भगवान रुद्र तेथील अधिदेवता आहे. त्याच्या सभोवती त्याच्यासारखेच अनेक रुद्र असतात. त्यांच्या हातात शूलासारखी अनेक श्रेष्ठ आयुधे असतात. त्यांची तोंडे अक्राळविक्राळ असून त्यातून अग्नी बाहेर पडत असतो. त्यांपैकी कोणाला दहा, शंभर किंवा कोणाला सहस्र असे हात असतात. दहा पाय, दहा मस्तके, तीन नेत्र असे त्यांचे उग्र रूप असते.
अंतरिक्षात फिरणारे, भूमीवर फिरणारे, इ. रुद्राध्यायात जे गण सांगितले आहेत ते सर्व तेथे असतात. त्याचप्रमाणे कोटी रुद्राणी, भद्रकाली इत्यादि मातृका अनेक शक्तींसह डामर्यादि गणांनी युक्त तो भगवान रुद्र वीरभद्रादिकांसह तेथे राहतो.
जो मुंडांच्या माळा धारण करणारा, ज्याच्या अंगावर नागांची वेष्टने आहेत, ज्याचा कंठही नागांनी भूषित आहे, ज्याने व्याघ्रचर्म परिधान केले आहे. गजचर्माचे ज्याने उत्तरीय वस्त्र केले आहे, चिताभस्माने ज्याचे अंग लिप्त आहे. प्रमथादि पार्षद ज्याच्या सभोवार उभे आहेत, डमरूच्या ध्वनींनी दाही दिशा बधिर केल्या आहेत, अट्टाहासाने व आस्फोट शब्दाने अंतरिक्ष हालविले आहे, जो भूतसमुदायामध्ये प्रविष्ट झालेला व भूतांमध्येच वास करणारा असा आहे, तो भगवान ईशान महेश्वर ईशान्यदिशेचा स्वामी आहे.''