[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
व्यास म्हणाले, ''हे प्रभो, काही कालानंतर प्राण्यांच्या कर्मामुळे इंद्राने वृष्टी केली नाही. त्यामुळे अनावर दुष्काळ पडला. घरोघर प्रेते साचू लागली. क्षुधेने व्याकुल झालेले लोक घोडे व डुकरे भक्षण करू लागले. इतकेच नव्हे तर माणसांची प्रेतेही ते खाऊ लागले. बालास माता, स्त्रीला पुरुष असे एकमेकांस भक्षण करू लागले. तेव्हा सर्व ब्राह्मणश्रेष्ठांनी विचार केला.''
'जो अत्यंत तपोनिष्ठ आहे असा गौतम ब्राह्मण आमचे दुःख नाहीसे करील. म्हणून सर्वांनी त्याच्या आश्रमात जावे. तो गायत्रीमंत्रतत्पर असून सांप्रत फक्त तेथेच सुकाळ आहे.'
असा विचार करून ब्राह्मण आपला परिवार घेऊन गौतमाश्रमात गेले. पूर्व, दक्षिण, पाश्चात्य, उदीच्च इत्यादी सर्व देशांतून प्राणी तेथे येऊन राहिले. इतक्या विप्रांना पाहून गौतमाने नमस्कार केला, विविध उपचारांनी त्यांचे पूजन केले व त्यांना आगमनाचे कारण विचारले. तेव्हा ब्राह्मणांनी सर्व वृत्तांत गौतमास सांगितला. ते ऐकून गौतम ऋषी म्हणाले, ''हे आपलेच घर समजा. मी आपला दास आहे. मी जिवंत असताना आपणाला चिंता करण्याचे कारण नाही. खरोखर सर्वांच्या दर्शनाने पुण्य प्राप्त झाल्यामुळे मी आज धन्य आहे. आपला मजवर अनुग्रहच झाला आहे. आपण संध्या-जप-तत्पर होऊन खुशाल येथे राहावे.''
अशारीतीने सर्वांचा आदर करून नतमस्तक होऊन मुनीने गायत्रीची प्रार्थना केली - '' हे देवी, हे महाविद्ये, हे वेदमाते, हे गायत्री, तुला नमस्कार असो. हे व्याहृतीमंत्ररूपिणी, हे ऱ्हींकाररूपिणी, तुला नमस्कार असो. हे स्वहा स्वधारुपे तुला नमस्कार असो, हे तिन्ही अवस्थांच्या साक्षी, हे तुर्यावस्थेहून भिन्नरूप, तू सूर्यमंडलात राहणारी आहेस. तू प्रातःकाली बालरूपी रक्तवर्णा, मध्यान्हसमयी तरुणी, संध्याकाली कृष्णवर्णा वृद्धा होतेस, अशा तुला नमस्कार असो. हे सर्व भूतांच्या अरणीत असणार्या देवी, मला क्षमा कर.''
असे म्हणून ऋषीने देवीची स्तुती केली. तेव्हा देवीने प्रत्यक्ष दर्शन दिले व सर्वांचे पोषण होणारे पात्र त्याला अर्पण केले. ती अंबा मुनीला म्हणाली, ''तुझी इच्छा पूर्ण करणारे हे पात्र तू घे.''
असे म्हणून श्रेष्ठ कला देवी गायत्री गुप्त झाली. त्या पात्रातून पर्वतप्राय अन्नराशी उत्पन्न झाल्या. षड्रस, तृणे, भूषणे, वस्त्रे, यज्ञसाहित्य, विविध पात्रे असे सर्व आवश्यक ते त्यातून निर्माण झाले. तेव्हा मुनीने सर्वांना बोलावून ते सर्व दिले. गाई, महिषी हे पशूही त्या पूर्णपात्रातून उत्पन्न झाले. स्रुक व स्रुवा हे यज्ञसंभार त्याने ब्राह्मणांना दिले. मुनीच्या आज्ञेने सर्वांनी यज्ञ केला. तेव्हा ते स्थान स्वर्गाप्रमाणे झाले.
त्रैलोक्यात आढळणारी प्रत्येक सुंदर वस्तु ही त्या गायत्रीच्या पूर्णपात्रातून उत्पन्न झाली आहे. सर्व स्त्रिया भूषणांनी विभूषित झाल्या. मुनी देवांप्रमाणे भासू लागले. त्या मुनीच्या आश्रमात नित्य उत्सवच सुरू झाला. रोग व दैत्य यांचे भय नष्ट झाले. तो आश्रम शंभर योजने विस्तृत होता. पण तो स्वतः मात्र आत्मनिष्ठ होऊन राहिला. तेथे विविध यज्ञ झाल्यामुळे देव तृप्त झाले. प्रसन्न होऊन ते मुनीची स्तुती करू लागले.
अशारीतीने निगर्वी गौतममुनीने सर्वांचे बारा वर्षे पालन केले. तेथे त्याने गायत्रीचे श्रेष्ठ स्थानच निर्माण केले. त्या ठिकाणी सर्वजण भक्तीने जगदंबेची पूजा व पुरश्चरणे करू लागले.
एकदा वीणा वाजवीत व गायत्रीचे गुणगान गात नारद तेथे आला व मुनींच्या समवेत बसला. सर्वांनी अत्यादराने त्याची सेवा केली. तेव्हा गौतमाची तो स्तुती करू लागला. तो म्हणाला, ''हे ब्रह्मर्षे, देवसभेत देवेंद्राने तुझी स्तुती केली. तुझे यश ऐकून तुला पाहण्यासाठी मी येथे आलो आहे. खरोखरच जगदंबेच्या प्रसादामुळे तू धन्य आहेस.''
असे म्हणून नारद गायत्री मंदिरात गेला. त्याने जगदंबेचे दर्शन घेतले व तिची विधियुक्त स्तुती करून तो देवलोकी गेला.
पुढे तेथे मुनींच्या आश्रयाने राहिलेल्या काही ब्राह्मणांस मुनीचा मत्सर वाटू लागला. त्याला अपयश येईल असे काही तरी करावे असा त्यांनी विचार केला. पुढे बर्याच कालाने पृथ्वीवर वृष्टी झाली. सर्वत्र सुभिक्ष झाले. पण सर्व ब्राह्मण मात्र गौतम मुनीला शाप देण्याच्या विचारात होते. त्यांनी मरावयास टेकलेली एक गाय मायेनेच उत्पन्न केली. ती मुनीच्या होमाचे वेळी होमशाळेत गेली. गौतमाने हुं हुं म्हणून तिचे निवारण केले. पण त्याच वेळी गायीने प्राण सोडला. ते पाहून द्विज म्हणाले, '' या ब्राह्मणाने गोहत्या केली.''
तेव्हा मुनीही आश्चर्ययुक्त झाला. त्याने डोळे मिटून ध्यानाने सर्व प्रकार जाणला. त्यामुळे प्रलयकाली रुद्राला जसा क्रोध येतो तसा त्या मुनीला क्रोध आला. त्याचे नेत्र लाल झाले. त्याने हे कृत्य करणारांना शाप दिला. तो म्हणाला, ''हे नीच ब्राह्मणांनो, वेदमाता गायत्री, तिचा जप, मंत्र व ध्यान याविषयी तुम्ही विमुख व्हाल. वेद, वेदोक्त यज्ञ, वेदवार्ता यातही तुम्ही विमुख रहाल. शिव, शिवमंत्र, शास्त्रे तुम्हाला पराङ्मुख होतील. मूलप्रकृती श्रीदेवीचे ध्यान, तिची कथा या तुम्हाला वर्ज्य होतील. देवीमंत्र, तिचे स्थान, अनुष्ठान यात तुम्ही मागे रहाल. देवीचा उत्सव, कीर्तन, देवीभक्ताची संगती, देवीपूजा याविषयी तुम्ही निरुत्साही व्हाल. तुम्हाला शंकराचा उत्सव व भक्ती करण्याची इच्छा होणार नाही. रुद्राक्ष, बिल्वपत्र, भस्म याविषयी तुम्ही विमुख व्हाल. श्रौत, स्मार्त आचार, ज्ञान यावर तुमची श्रद्धा राहणार नाही.
अद्वैत ज्ञान, शम-दम इत्यादि साधने, नित्यकर्म, अनुष्ठाने, अग्निहोमाची साधने, शाखेचे अध्ययन, प्रवचन याबद्दल तुमच्या मनात श्रद्धा राहणार नाही. कृच्छ्रचान्द्रायण, प्रायश्चित्त कर्म याविषयी तुम्ही आदरशून्य व्हाल.
देवीला सोडून तुमची अन्य देवांवर श्रद्धा बसेल. तुम्ही शंखचक्रादिकांनी अंकित व्हाल. कापालिक मतात आसक्त होऊन बौद्धशास्त्रात निमग्न व्हाल. तुम्ही पाखंडी होऊन माता, पिता, कन्या, पुत्र इत्यादीचा विक्रय कराल. इतकेच नव्हे तर तुम्ही भार्येलाही विकाल.
वेदांचा विक्रय, तीर्थांचा व्यापार, धर्मांचा विक्रय तुम्ही कराल. कामशास्त्र, कापालिक मत, बौद्ध भगिनी शास्त्र यावर तुमची श्रद्धा बसेल. तुम्ही माता, कन्या, भगिनी यांच्याशी गमन कराल. तुमच्या वंशात जन्मलेल्या स्त्रिया, पुरुष हेही तुमल्याप्रमाणेच होतील.
पण आता अधिक बोलून काय होणार ? मूलप्रकृती, ईश्वरी, परमात्मा अशी गायत्री तुमच्यावर कुद्ध होईल. अंधकूप वगैरे नरकात तुम्ही सतत राहाल.''
अशाप्रकारे शाप देऊन तो महात्मा गायत्रीच्या दर्शनाला गेला. त्याने तिला वंदन केले. या ब्राह्मणांच्या कृत्यामुळे तीही विस्मित झाली. ती मुनींना म्हणाली, ''भुजंगाला दूध पाजले तरी विषवृद्धीच होते. म्हणून कर्मगती तशी असल्यामुळे तू शांती कर.''
ते ऐकल्यावर देवीला नमस्कार करून गौतममुनी आपल्या आश्रमाकडे आला. इकडे शापामुळे दग्ध होऊन ब्राह्मण वेदविद्या विसरले. त्यांना गायत्री आठवेना. तेव्हा लज्जित होऊन ते नतमस्तक होऊन उभे राहिले.
''प्रसन्न व्हा, प्रसन्न व्हा.'' असे म्हणून त्यांनी मुनीची प्रार्थना केली. तेव्हा तो कृपाळू मुनी म्हणाला, माझे शब्द असत्य होणार नाहीत. यास्तव कृष्णावतार होईपर्यंत तुम्ही कुंभीपाक नरकात जाल. कलियुगात भूलोकी तुमचा जन्म होईल. तेव्हा मी सांगितलेले सर्व प्रकार घडतील. त्यातून तुमची मुक्तता व्हावी अशी इच्छा असेल तर गायत्रीची सेवा करा.''
प्रारब्ध असे म्हणून व असा विचार करून तो गौतमऋषी शांत झाला. हे जनमेजया, म्हणूनच कृष्ण स्वस्थानी गेल्यावर कलियुगास आरंभ झाला. तेव्हा ते शापदग्ध ब्राह्मण कुंभीपाक नरकातून बाहेर पडून भूलोकी जन्मास आले. ते अव्यक्त अशा मूल प्रकृतीस जाणत नाहीत. कोणी कापालिक म्हणजे मानवी मस्तकांच्या हाडाने खानपानादि व्यवहार करणारे झाले, तर कोणी कौलिक म्हणजे शाक्त झाले. कोणी बौद्ध, कोणी जैन झाले. हे सर्व पंडित असूनही दुराचारी झाले.
परखीलंपट, दुराचारी असे ते कर्मानुसार पुन्हा कुंभिपाक नरकात पडतील. म्हणून परमेश्वरीची सेवा करावी. विष्णु अथवा शिवाची उपासना नित्य नसून शक्तीची उपासना नित्य आहे. तिच्या वाचून पुरुषाची अधोगती होते.
हे निष्पाप, तूर विचारलेस म्हणून तुला हे विस्ताराने सांगितले. आता मूलकारण भुवनेश्वरीच्या उत्कुष्ट मणिद्वीपाचे वर्णन ऐक. अनेक वृक्षजाती तेथे आहेत. फणस, बकुल, लोघ्र, कण्हेर, शिंशप, देवीदास, कांचन, आम्र, सुमेरू, औंट, रानवांगी, लवंगा, रिंगणी, साल, मुचकुंद, वेली, कुंदवृक्ष, ताल, तमाल, कंकोल, नागरमोथा, सुरंगी, पिलुवृक्ष, सार्ज, कर्पूर, अश्वकर्ण, हस्तिकर्ण, तालपर्ण, डाळिंब, गणिका, बंधुजीवा, जंवीर, काटेशेवंती, चाफा, सुवर्णवृक्ष, कालगरुवृक्ष, चंदन, खजूरी, जुई, मारवेल, उरू, चिकाल, खैर, चिंच, बिबवा, एरंड, कुडा, बिल्ववृक्ष, तुलसी, मोगरी इत्यादी वृक्ष-वेली तेथे आहेत.''