[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजय म्हणाला, ''हे भगवान, हे सर्वधर्मज्ञ, द्विजांसाठी शक्तीची उपासना सांगितली आहे. त्रिकाल संध्या व इतर उपासना नित्य असताना द्विज दुसर्या देवांची उपासना का करतात ? कोणी विष्णुभक्त, कोणी गणपतिभक्त, कोणी कापालिक, चीन्मार्ग अवलंबणारे, वल्कलधारी, दिगंबर, बौद्ध, चार्वाक वगैरे लोक वेदावर श्रद्धा नसलेले दिसून येतात. हे ब्रह्मन्, याचे कारण काय ? तार्किक पंडित वेदशास्त्रहीन असतात. आपल्या कल्याणाची इच्छा सर्वच करीत असतात. आपण मणिद्वीपाविषयी सांगितले. पण ते स्थान कसे आहे हे मला सांगा.
व्यास म्हणाले, ''हे राजा, तू उत्तम व समयोचित् प्रश्न विचारलास. तुझी वेदांवर श्रद्धा आहे.''
पूर्वी मदोन्मत्त दैत्यांनी देवांशी युद्ध केले. ते युद्ध शंभर वर्षे चालू होते. त्यात विविध प्रकारची शस्त्रास्त्रे उपयोगात आणली गेली. पराशक्तीच्या कृपेमुळे देवांनी ते जगाचा लय करणारे युद्ध जिंकले. दैत्य पाताळात गेले. तेव्हा देव अभिमानाने आपल्या पराक्रमाचे स्वतःच वर्णन करू लागले.
अहो, आम्ही इतके श्रेष्ठ असताना आमचा जय का होणार नाही ? आम्हीच सृष्टी, स्थिती, लय करतो. मग त्या दैत्यांची काय कथा ? ते शक्तीचा प्रभाव विसरले.
त्याच वेळी जगदंबा यक्षरूपाने प्रकट झाली. ते कोटीसूर्याप्रमाणे तेजस्वी, देदीप्यमान, हस्तपादरहित असे अपूर्व ध्यान पाहून देव आश्चर्ययुक्त झाले. 'हे काय आहे ?' असे विचारू लागले. हे दैत्याचे कृत्य असावे. अथवा ही मोठी मायाच असावी असा त्यांनी विचार केला. त्या यक्षाजवळ जाऊन त्याची विचारपूस करावी म्हणून देवेंद्र अग्नीला म्हणाला, ''हे अग्ने, तूच आमचे मुख आहेस. तू जा व यक्ष कोण आहे ते विचार. ''
अग्नी सत्वर त्या यक्षाजवळ गेला. तेव्हा यक्षाने विचारले, ''तू कोण आहेस ? तुझे शौर्य कसे आहे हे मला सांग.''
तेव्हा अग्नी म्हणाला, ''मी अग्नी असून मलाच जातवेदा म्हणतात. मी सर्व विश्व जाळू शकतो.''
ते ऐकून यक्षाने अग्नीसमोर एक गवताची काडी टाकली. ''तुझी एवढी दहनशक्ती असेल तर हे गवत जाळ.'' अग्नीने ते गवत जाळण्याचा खूप प्रयत्न केला. पण गवत जळले नाही. तेव्हा तो देवांकडे परत गेला. त्याने सर्व वृत्तांत देवांना सांगितला. तेव्हा देवेंद्राने वायूस तीच कामगिरी सांगितली. तो म्हणाला, ''हे वायो, तुझ्यामुळेच सर्व जग ओवले आहे. तूच सर्वांचा प्राण व शक्ती धारण करणारा आहेस. तुझ्याशिवाय त्या यक्षास जाणणारा दुसरा कोणी नाही.'' त्या गौरवयुक्त भाषणाने वायू वेगाने यक्षाजवळ गेला. यक्षाने मृदु स्वरात विचारले, ''तू कोण ? तुझी शक्ती किती आहे ते सांग.''
वायु गर्वाने म्हणाला, ''मी मातरिश्वा वायु आहे. सर्वांना चलन व ग्रहण करण्याची माझ्यात शक्ती आहे. माझ्या क्रियेमुळेच सर्व जग चलनवलन करते.''
ते ऐकून परम तेज म्हणाले, ''हे तृण तुझ्या इच्छेला येईल तिकडे ने.'' तेव्हा वायूने त्या गवतास हलविण्यासाठी सर्व शक्ती लावली, पण ते हलले नाही. तेव्हा तोही लज्जित झाला. त्याने इंद्राकडे जाऊन सर्व वृत्तांत निवेदन केला. तो खरोखरच असामान्य व दारुण यक्ष असावा असा विचार करून सर्व देव इंद्राला म्हणाले, ''तू देवांचा राजा आहेस. म्हणून तूच आता त्याला समजून घे.''
तेव्हा इंद्र गर्वाने त्या यक्षाजवळ गेला. त्याचवेळी इंद्रासमक्ष ते दिव्य तेज गुप्त झाले. त्या यक्षाशी भाषण करायला न मिळाल्यामुळे इंद्रही लज्जित झाला. तो स्वतःला तुच्छ लेखू लागला. त्याने विचार केला, 'आता देवसभेत जाऊन देवांना काय सांगावे ?' त्यापेक्षा देहत्याग केलेला बरा. कारण मान हेच श्रेष्ठ धन होय. तो नष्ट होण्यापेक्षा देह टाकलेला बरा. असा विचार करून गर्वरहित झालेला इंद्र तेथेच राहू लागला. तो ईश्वरास शरण गेला. तेव्हा आकाशवाणी झाली. ''हे इंद्रा, मायाबीज मंत्राचा जप कर व सुखी हो.
ते ऐकून इंद्राने निराहार राहून एक लक्ष वर्षे मायाबीज मंत्राचा जप केला.
तेव्हा चैत्र नवमीस मध्यान्हसमयी तेच पूर्वीचे तेज त्याच ठिकाणी प्रकट झाले. त्या तेजोमंडलात नवयौवना, जास्वंदीच्या फुलाप्रमाणे कांती असलेली, चंद्राप्रमाणे तेजस्वी, वस्त्रातून स्तनद्वय व्यक्त होत होते अशी चतुर्भुज, पाश- अंकुश- अभय, वरदांनी युक्त, रमणीय, कोमल, कल्याणरूप, इष्टदायी, सर्वांची जननी, विविध अलंकारांनी मंडित, त्रिनेत्रा, केसात मोगर्याची पुष्पे माळलेली आहेत अशी प्रसतन्नमुखी, मदनाप्रमाणे सुंदर रक्तवस्त्र परिधान केलेली, रक्तचंदनाची उटी लावलेली अशी करुणामूर्ति सर्व कारणंचे कारण असलेली, शिवा-उमा या नावाने विख्यात असलेली देवी इंद्राने पाहिली.
त्यावेळी इंद्र सद्गदित झाला. त्याने जगदीश्वरीला प्रणाम केला. भक्तीमुळे तो नतमस्तक झाला होता. इंद्राने तिची विविध स्तोत्रांनी स्तुती केली. तो म्हणाला, ''हे रूप कोणाचे आहे ? हे सुंदरी, तू येथे का आलीस ?''
इंद्राचे बोलणे ऐकून ती करुणादेवी म्हणाली, ' 'हे सर्व माझेच रूप आहे. तेच सर्वाधारभूत, सर्वसाक्षी, उपद्रवशून्य आहे. सर्व वेद ज्या पदांचे वर्णन करतात, तपे ज्यांचा निर्देश करतात, ते पद आता तुला सांगते.
ॐ हे एकाक्षरी ब्रह्म आहे. तेच र्हीं मय आहे. ही दोन बीजे म्हणजे माझा मंत्रच आहेत. कारण मीच माया व ब्रह्म या दोन भागांनी युक्त असे जग निर्माण करते. त्यातील एक भाग सच्चिदानंदरूप आहे. दुसरा मायप्रकृति असा आहे. माया हीच श्रेष्ठ शक्ती असून मीच ती मायायुक्त देवी आहे.
चंद्राच्या चांदण्याप्रमाणे माझी शक्ती अभिन्न आहे. सर्व जगाचा लय होतो तेव्हा ही मद्रूप होते. पुन्हा प्राणांचा परिपाक झाला म्हणजे ती आपले रूप व्यक्त करते. अंतर्मुख अवस्थेलाच माया म्हणतात. बहिर्मुख होऊन कार्य करणार्या मायेस तम म्हणतात. बहिर्मुख तम मायेपासून सत्त्वाची निर्मिती होते. रजोगुणही सृष्टीच्या आरंभकालीच उत्पन्न होतो. ब्रह्मा-विष्णु-महेश्वर हे त्रिगुणात्मक आहेत.
हे सुरेश्वरा, ब्रह्मदेव स्थूलदेह, हरी लिंगदेह व रुद्र कारणशरीर होय. तुरीयावस्थाही मीच आहे. तीन गुणांची साम्यावस्था ही माझी उपाधी आहे. त्यापुढे परब्रह्म आहे. तेच रूपरहित माझे स्वरूप होय. माझे रूप सगुण व निर्गुण असे दोन प्रकारचे आहे. मायारहित रूप म्हणजे निर्गुण व मायेसह रूप म्हणजे सगुण होय. अशी मी जग उत्पन्न करणारी माया असून मीच सर्व प्राण्यांना कर्माची प्रेरणा देत असते.
माझ्या भीतीने वारा वाहतो, सूर्य अंतरिक्षात गमन करतो. इंद्र, अग्नी, मृत्यु वगैरे सर्वजण आपापली कामे करतात. म्हणून मला सर्वोत्तम म्हणतात. मी प्रसन्न झाल्यामुळेच तुम्हाला युद्धात जय मिळाला. लाकडी बाहुल्यांप्रमाणे मी तुम्हाला नाचविते. केव्हा देवांचा तर केव्हा दैत्यांचा जय मीच कर्मानुरोधाने करते. पण अशा देवीस तुम्ही विसरलात व अहंकारी झालात. मोहामुळे तुमचा विवेक आच्छादित झाला. म्हणून तुमचे कल्याण व्हावे या हेतूने मी तुमच्यावरील तेज बाहेर काढून यक्षरूपाने दाखविले. तेव्हा आता गर्व सोडून तुम्ही भक्तीने मला शरण जा. कारण मीच सच्चिदानंदरूपिणी आहे.''
ती मूलप्रकृती देवी तत्काल गुप्त झाली. इकडे देवही गर्वाचा त्याग करून भगवतीची सेवा करू लागले. तिन्ही संध्यासमयी ते गायत्री जप करू लागले. अशाप्रकारे सत्ययुगामध्ये सर्वजण गायत्री जपात तत्पर राहू लागले. ॐकार व हृल्लेखा यांमध्ये ते मनाने तल्लीन झाले.
विष्णूची नित्य उपासना आहे असे वेदांनीही कुठे सांगितले नाही. त्याचप्रमाणे विष्णू व शंकर यांच्या उपासनेची दीक्षा नित्य नाही. पण गायत्रीउपासना मात्र वेदोक्त व नित्य आहे. तिच्यावाचून अधःपात होतो.
''गायत्री उपासनेमुळे ब्राह्मण कृतकृत्य होतो. त्याला इतर कसलीही अपेक्षा नसते. गायत्रीमंत्रात तादात्म्य पावलेला द्विज मुक्त होतो. मग तो अन्य उपासना करो वा न करो.''
असे मनूने स्वतः च म्हटले आहे. अशा गायत्रीस सोडून जो एकचित्ताने विष्णूची किंवा शिवाची उपासना करील तो नरकास जाईल. म्हणून हे राजा, पहिल्या युगात सर्व ब्राह्मणश्रेष्ठ गायत्रीजपामध्ये तल्लीन झाले होते व देवीच्या पदकमली एकाग्र झाले होते.