[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्रीनारद म्हणाले, ''गायत्रीसहस्रनाम मी श्रवण केले. आता दीक्षाविधी सांगा. कारण त्यावाचून कोणालाही अधिकार प्राप्त होत नाही.''
श्रीनारायण म्हणाले, ''मन शुद्ध झालेल्य्या शिष्यांची दीक्षा मी तुला सांगतो. जिच्यामुळे देव, अग्नी, गुरु यांना पूजेचा अधिकार प्राप्त झाला. जी दिव्य ज्ञान देते, पापांचा क्षय करते, तीच दीक्षा होय. ती बहुफल देते. पण गुरु व शिष्य दोघेही शुद्ध असावे लागतात.
गुरूने यथाशास्त्र नित्यकर्म करावीत. हातात कमंडलू घेऊन मौन व्रत स्विकारून नदीतीराहून घरी यावे व योगमंडपात उत्तम आसनावर बसावे. आचमन-प्राणायाम करावा. फट् या अस्त्रमंत्राने गंध व पुष्पमिश्रित उदक मंत्रावे. अस्त्रमंत्राचा उच्चार करीत मंडपाच्या द्वारापर्यंत प्रोक्षण करावे. नंतर पूजा करावी. द्वाराच्या वरील बाजूस गणभान, लक्ष्मी व सरस्वती यांचे पूजन करावे.
दाराच्या उजव्या बाजा गंगा, विघ्नेश यांचे पूजन करावे. डाव्या बाजूला क्षेत्रफळ, यमुना व उंबर्यावर अस्त्रदेवतेचे पूजन करावे. सर्व काही देवीमय आहे असे चिंतून जपाने अंतरिक्षातील विध्नांचा नाश करावा. पायाच्या आघातांनी भूमीवरील विघ्नांचा नाश करावा. नंतर कुंभस्थापना करावी. अर्घ्या नैर्ऋत्य दिशेस वास्तूच्या स्थानी प्रजापती याची पूजा करावी. पंचगव्य करावे. मूलमंत्राचा जप करून अस्त्रमंत्राने सर्वत्र प्रोक्षण करावे.
नंतर शिष्याने गुरूस नमस्कार करावा. मृदु आसनावर बसावे. पूर्वेकडे तोंड करून देवतेचे ध्यान करावे. देवमंत्राने ऋषी वगैरेंचा न्यास करावा. ऋषींच्या मस्तकावर, छंदाचा मुखात, देवतेचा हृदयी, बीजाचा गुह्यस्थानी, पायावर शक्तीचा न्यास करावा. तीन टाळ्यांनी दिव्य, अंतरिक्ष, भीम या तीन विध्यांचा नाश करावा. नंतर दिग्बंध करावा. मूलमंत्राचे स्मरण करून प्राणायाम करावा. देहावर मातृकांचा न्यास करावा.
ॐ अं नमः असे म्हणून मस्तकावर न्यास करावा. अंगावर मूलमंत्राचा षड्न्यास करावा. अंगुष्ठ, अंगुली, हृदय अशा क्रमाने नमः, स्वाहा, वषट्, हुं, वैषट् फट् इत्यादी पदांनी व प्रणवाने युक्त सहा मंत्रांनी षडंगन्यास करावा. नंतर शरीरात शुभ आसनाची कल्पना करावी. दक्षिण स्कंधावर धर्माचा, डाव्या स्कंधावर ज्ञानाचा न्यास करावा. डाव्या मांडीवर वैराग्य, उजव्या मांडीवर ऐश्वर्य यांची स्थापना करावी. मुख्य प्रदेशी अधर्माचे ध्यान करावे.
हे मुने, वामकुक्षी, नाभी व दक्षिणकुक्षी, यावर अज्ञानाय नमः, अधर्माय नमः, व अवैराग्याय नमः म्हणून न्यास करावा.
हे मुनिश्रेष्ठा, मुनिवर्यांनी धर्मादिक आसनाचे पाद मानले आहेत व अधर्मादिक ही त्याची गात्रे आहेत. हृदयकमली मृदु आसनावर अनंताचा न्यास करावा. त्याचे ठायी शुद्ध प्रपंचरूपी कमलाची भावना करावी व त्यावर मंत्रज्ञाने उत्तरोत्तर कलायुक्त सूर्य, चंद्र व अग्नीची स्थापना करावी.
सूर्याच्या बारा कला, इंदूच्या सोळा व अग्नीच्या दहा आहेत. त्या कलांनी युक्त अशी त्यांची भावना करावी. त्यांच्यावर सत्व, रज व तम यांची स्थापना करावी व त्यावर आत्मा, अंतरात्मा, परमात्मा व ज्ञानात्मा यांची स्थापना करावी. ह्याप्रमाणे पीठाची कल्पना करावी.
पुढे 'अमुकासनाय नमः' या मंत्राने साधकाने आसनाची पूजा करून त्यामध्ये परांबिकेचे ध्यान करावे. नंतर कल्पसूत्रोक्त विधीने देय मंत्राच्या देवतेची मानस उपचारांनी यथाविधी पूजा करावी.
नंतर देवीला आनंद देणाऱ्या अशा मुद्रा दाखवाव्या त्या मुद्रांच्या योगाने देवीस आनंद होतो. नंतर आपल्या समोर डाव्या बाजूकडे गंधाने प्रथम षटकोनी, त्यावर वर्तुळ व त्यावर चौकोनी मंडल करावे. मध्यभागी त्रिकोणी चक्र लिहून शंखमुद्रा दाखवावी व त्या षट्कोनी चक्राच्या सहाही अंगांची पुष्पादिकांच्या योगाने पूजा करावी. अग्नेय दिशेकडील कोनापासून आरंभ करून षडंग पूजा करावी.
नंतर शंखाचे आधारपात्र घेऊन अस्त्रमंत्राने त्या पात्राचे प्रोक्षण करून मंडलामध्ये ठेवावे नंतर 'मं वह्निमंडलाय दशकलात्मने दुर्गादेव्यर्घ्यपात्राय नमः' असा मंत्र शंखाच्या आधारपत्राची स्थापना करताना म्हणावा.
आधारचक्रामध्ये पूर्वदिशेकडून आरंभ करून प्रदक्षिणाक्रमाने अग्निमंडळामध्ये असलेल्या अग्नीच्या दहा कलांची पूजा करावी.
मूलमंत्राने प्रोक्षण केलेल्या शंखास मूलमंत्राचे स्मरण करीत त्या आधारावर प्रस्थापित करावे. 'अं सूर्यमंडलाय द्वादशकलात्मने दुर्गादेव्यर्घ्यपात्राय नमः' असा
मंत्र म्हणावा, व ' शंखाय नमः ' असे म्हणून शंखाचे प्रोक्षण करावे व त्यामध्ये सूर्याच्या बारा कलांची पूजा करावी. तपिनी इत्यादी सूर्याच्या बरा कलांची यथाक्रमाने मातृकांच्या विलोमक्रमाने उच्चार करून पूजा करावी.
हे नारदा, मूलमंत्रही विलोमकच म्हणावा. तो शंख जलाने भरावा व त्यावर चंद्राच्या कलांचा न्यास करावा. 'उं सोममंडलाय षोडशकलात्मकाय दुर्गादेव्यर्घाघृताय नमः ' असा हा ह्रन्मंत्रात मंत्र सांगितला आहे. ह्मा मंत्राने अंकुशमुद्रेने जलाची पूजा करावी. त्या जलात तीर्थाचे आवाहन करून आठ वेळा मंत्राचा जप करावा. षडंगांचा जलामध्ये न्यास करून मानसोपचारांनी उदकाचे पूजन करावे. आठ वेळा मूलमंत्राचा जप करावा. त्याला मत्स्यमुद्रेने आच्छादित करावे. दक्षिणदिशेत शंखाची प्रोक्षणी ठेवावी. त्यामध्ये शंखोदक घालून त्याने सर्व पूजासाहित्यावर प्रोक्षण करावे. आपला देह पवित्र आहे अशी भावना करावी.
आपल्यासमोर वेदीवर सर्वतोभद्रमंडल लिहून साळीच्या तांदुळांनी त्याचा मध्यभाग भरावा. त्यावर दर्भ पसरून त्यावर लक्षणयुक्त कूर्च ठेवावा. आधारशक्तीपासून आरंभ करून पीठापर्यंत पूजा करावी.
नंतर न फुटलेला घट घेऊन त्याच्या आतील भाग अस्त्रमंत्राने धुऊन तीनपदरी व तांबड्या सुताने त्याला वेष्टित करावे. नऊ रत्ने ज्याच्या गर्भामध्ये आहेत अशा त्या कूर्चासह त्याची गंधादिकांनी पूजा करून तारमंत्राने गुरूने त्याची पीठावर स्थापना करावी.
नंतर कुंभ व पीठ ही दोन्ही एक आहेत अशी भावना करून क्षकारापासून मातृकांचा उलट जप करीत तीर्थोदकाने घट भरावा. नंतर मूलमंत्राचा जप करीत त्यात देवतांचे पूजन करावे. अश्वत्थ, फणस, आंबा यांच्या कोवळ्या पल्लवाने कुंभाचे मुख आच्छादित करावे. नंतर फल व अक्षता यांनी पूर्ण असे एक पात्र घेऊन ते दोन तांबड्या वस्त्रांनी वेष्टित करून त्याची कुंभावर स्थापना करावी. पुढे प्राणप्रतिष्ठा मंत्राने त्याची प्राणप्रतिष्ठा करावी. आवाहन मुद्रा करून परदेवतेस संतुष्ट करावे. परमेश्वरीचे ध्यान व स्वागत करावे.
नंतर देवीस प्रथम पाद्य द्यावे. पुढे अर्घ्य, आचमनीय, मंधुपर्क व अभ्यंगासह स्नान घालावे. तांबडी, रेशमी, व निर्मल अशी दोन वस्त्रे अर्पण करावी. नानाप्रकारच्या मण्यांनी भूषित अशा माला घालाव्या. मंत्रयुक्त अशा र्ही मं ऱ्हीं, ऱ्हीं मां र्हीं इत्यादि मातृकांची योजना करून देवीच्या अंगावर न्यास करावा व चंदनादिकांनी पूजा करावी.
हे मुने, पुढे कर्पूरयुक्त कालगरूपासून निघालेला धूप दाखवावा. त्यात काश्मीरचंदन व कस्तुरीही पुष्कळ घालावी. कुंदकरवीरादि पुष्पे देवीस अर्पण करावी. पुष्कळ अगरू, वाळा, चंदन, मध, साखर इत्यादिकांनी मिश्रित असा धूप देवीस अति प्रिय आहे.
अनेक दीप दाखवून नैवेद्य अर्पण करावा. प्रत्येक द्रव्यसमर्पणाच्या वेळी प्रोणीतील उदक सोडावे. त्यावाचून देवीस द्रव्य समर्पण करू नये. नंतर देवीची षडंगपूजा व कल्पसूत्रोक्त रीतीने आवरण पूजा करावी. नंतर वैश्वदेव करावा. देवीच्या दक्षिण भागी स्थंडिल करून त्यावर अग्नी घालून मूर्तिस्थ देवतेचे आवाहन करावे व क्रमाने तिची पूजा करावी. ओंकार व्याहृतीचा उच्चार करून मूलमंत्राने हवन करावे. प्रथम घृतासह पायसाच्या पंचवीस आहुती देऊन पुन्हा व्याहृतीच्या योगाने हवन करावे. पुढे गंधादिकांच्या योगाने देवीची उत्तरपूजा करून तिची पीठावर योजना करावी. अग्नीचे विसर्जन करून हवीच्या योगाने सर्वतः बलिदान करावे. नंतर देवतेच्या पार्षदांची गंधपुष्पादि पंचोपचारांनी पूजा करून देवीस तांबूल, छत्र, चामर अर्पण करावे.
नंतर मंत्राचा हजार वेळा जप करावा. देवीस जपाचे समर्पण करून मार्जन करावे. पुढे पूर्वी जेथे कर्कराची स्थापना केली होती त्या ईशान्यदिशेस म्हणजे मंडपाच्या ईशान्येस जेथे पूर्वी केर गोळा करून ठेवला होता त्या केरावर कर्करीची स्थपना करावी. तिच्यावर अस्रदेवता दुर्गेचे आवाहन करून तिची पूजा करावी. 'रक्षण कर' असे म्हणून अस्र मंत्राचा जप करीत सर्व प्रदेशावर कमलनालातून सोडलेल्या जलाचे प्रदक्षिण सेक करावा. पुन्हा कर्कराची स्वस्थानी स्थापना करून अस्त्रदेवतेली पूजा करावी.
गुरूने वाणीचे नियमन करून शिष्यासह भोजन करावे. त्या रात्री अवश्य त्याच वेदीवर निजावे.
आता होमकाली स्थंडिलाचा किंवा कुंडाचा संस्कार विधियुक्त कसा करावा ते यशाशास्त्र सांगतो.
कुंड किंवा स्थंडिल प्रथम मूलमंत्र उच्चारून ते पाहावे; अस्त्रमंत्राने त्याचे प्रोक्षण करावे व त्या मंत्रानेच ताडन करावे. नंतर कवचाने त्रिवार अभ्युक्षण करावे.
तदनंतर पूर्वेकडे व उत्तरेकडे अग्न करून चारी बाजूस तीन तीन रेखा ओढाव्या. प्रणवाने त्यांच्यावर सेक करून पूर्वीप्रमाणे आधारशक्तीपासून आरंभ करून पीठमंत्रापर्यंत देवीच्या पीठाचे पूजन करावे. त्या पीठावर परम कारण अशा त्या श्रीशिवशक्तीचे आवाहन करून शांतपणे गंधादि उपचारांनी त्यांची पूजा करावी. त्या पीठावर ऋतुस्नात, शंकरास आलिंगन दिलेल्या व कामातुर अशा श्रीदेवीचे ध्यान करावे.
नंतर पात्राने अग्नी घेऊन त्या कुंडात किंवा स्थंडिलावर त्याची स्थापना करावी. त्या अग्नीतील काही भाग क्रव्यादांश म्हणून नैऋत्यदिशेकडे टाकून देऊन पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यास संस्कृत करून रंबीजाने वन्हीचा उच्चार करावा. त्यामध्ये चैतन्याची योजना करून त्यास प्रणवाने अभिमंत्रित करावे.
नंतर गुरूने सात वेळा धेनुमुद्रा दाखवावी. अस्रमंत्राने त्याचे रक्षण करून हुंमंत्राने त्याला झाकून टाकावे. अशा रीतीने चंदनादिकांनी पूजा केलेल्या त्या अग्नीचे उल्मुक घेऊन त्याने कुंडावर तीन वेळा प्रदक्षिणामार्गाने फिरवावे. गुडघे भूमीस टेकून प्रणवाचा जप करावा. शिवाचे ते बीज आहे. म्हणून त्या अग्नीस देवीच्या योनीमध्ये ठेवावे. नंतर जगदंबा देवी व देव यास आचमन घालावे. हे सर्वज्ञ चित्पिंगल ' हन हन, दह दह, पच पच, ज्ञापय स्वाहा' असा मंत्र म्हणून अग्नी प्रज्वलित करावा.
प्रज्वलित, हुताशन व जातवेदा असा जो अग्नी त्यास मी वंदन करितो. तो सुवर्णाच्या वर्णाचा असून तो निर्मल, चांगला पेटलेला व सर्वतोमुख असा आहे.
ह्या मंत्राने न्या अग्नीची आदराने स्तुती करावी. नंतर गुरूने षडंगावर वन्हिनाममंत्रांचा न्यास करावा. सहस्रर्चि, स्वस्तिपूर्ण, उत्तिष्टपुरुष, धूमव्यापी, सप्तजिव्ह व धनुर्धर ह्या सहा नावांनी क्रमाने न्यास करावा. हृदयादि पूर्वोक स्थानी त्यांचा न्यास करावा. नंतर सुवर्णाच्या वर्णाचा, त्रिनेत्र शक्ती, स्वस्तिक, अभयमुद्रा कमलामध्ये स्थित, वरमुद्रा धारण करणारा व परम मंगलरूप अशा अग्नीचे ध्यान करावे. पुढे मंत्रज्ञ ब्राह्मणाने कुंडाच्या मेखलेवरील भागाचे परिसिंचन करावे.
पुढे दर्भांनी परिस्तरण घालावे. पारधी ठेवावा. पुढे तिकोनी, षट्कोनी, वर्तुळ, अष्टपत्र व भूपुर या आकाराचे यंत्र अग्निसंस्थापनेपूर्वी कुंडात लिहावे. त्याच्यामध्ये पुढील मंत्राने अग्नीची पूजा करावी.
''भो वैश्वानर जातवेद इहावहा हे लोलिताक्ष, सर्व कर्माणि साध्य स्वाहा'' हे लोहिताक्षी, हे जातवेद, हे वैश्वानरा, येथे ये व माझी सर्व कर्मे पूर्ण कर अशी प्रार्थना करून व वन्हिजाया जी स्वाहा तिचा शेवटी उच्चार करून या मंत्राने अग्नीची पूजा करावी. नंतर सातही कोनांमध्ये हिरण्या, गगना, रक्ता, कृष्णा, सुप्रभा, बहुरूपा व अतिरक्ता अशा ह्या सात अग्नीच्या जिव्हा आहेत अशी भावना करून कमलांच्या केसरांमध्ये अंगपूजा करावी. दलांच्या ठिकाणी शक्ती व स्वस्तिक धारण करणार्या मूर्तीचे पूजन करावे.
पुढे 'ॐ अग्नये जातवेदसे नमः, ॐ अग्नये सप्तजिव्हाय नमः' इत्यादि रीतीने ॐ अग्नेय पूर्वी व नमः अंती अशी योजना करून जातवेदा, सप्तजिव्हा, हव्यवाहन, अश्वोदरज वैश्वानर, कौमारतेजा, विश्वमुख व देवमुख या सात अग्नीच्या मूर्तींचे व चारी दिशांमध्ये वज्रादि शस्त्रयुक्त लोकपालांचे पूजन करावे.
नंतर स्रुक व स्रुवा यांचे संस्कार, घृताचा संस्कार करून स्रुवेने आज्यस्थालीतील घृताच्या उजव्या भागातून घृत घेऊन अग्नीच्या उजव्या नेत्रात 'अग्नेये स्वाहा' म्हणून हवन करावे. डावीकडून घृत घेऊन 'सामाय स्वाहा' म्हणून डाव्या नेत्रात हवन करावे. त्याचप्रमाणे मध्यभागातून घृत घेऊन 'अग्नीषोमाभ्यां स्वाहा' म्हणून मध्यनेत्रामध्ये हवन करावे. उजवीकडून घृत घेऊन मुखामध्ये 'अग्नयेस्विष्टकृते स्वाहा' असे म्हणून हवन करावे. नंतर अग्निमंत्राने तीन वेळा पुन्हा हवन करावे.
प्रणवानेच आठ आहुती देऊन अग्नीच्या गर्भाधानादि संस्काराकरिता हवन करावे. गर्भाधान, पुंसवन, सीमंतोन्नयन, जातकर्म, नामकर्म, निष्क्रमण, अन्नप्राशन, चौल उपनयन, महानाम्नीव्रत, औपनिषद्व्रत, गोदान व विवाह हे संस्कार करावेत.
शिव व पार्वती यांचे पूजन करून विसर्जन करावे. अग्नीस उद्देशून पाच समिधांचे हवन करावे. नंतर आवरणांचेही एक एक आहुती द्यावी. स्रुवेने घृत घेऊन चार वेळा हवन करावे. स्रुचीस स्रुवेने झाकून आपल्या आसनावर बसूनच वौषट् ज्याच्या अंती आहे अशा अग्निमंत्राने हवन करावे.
हे मुने, नंतर महागणेशमंत्राने दहा आहुती द्याव्या. त्या देयमंत्राच्या देवतेचे पीठ अग्नीमध्ये आहे अशी कल्पना करून त्याची पूजा करावी. वन्हीमध्येच तिचे ध्यान करून तिच्या मुखामध्ये मूलमंत्राने पंचवीस आहुती द्याव्या. अग्नी आणि देवता यांचे आत्म्याशी ऐक्य आहे अशी भावना करावी.
सर्व एकीभूत आहे अशी भावना करावी. देवतांच्या षडंगांस उद्देशून पृथक् आहुती देऊन हवन करावे. अकरा आहुतीच द्याव्या म्हणजे त्यांच्या योगाने अग्नी व देवता यांचे नाडीसंधान होते.
आवरणदेवतांच्या क्रमानेच म्हणजे एका देवतेस एक आहुती याप्रमाणे घृताचे हवन करावे. तदनंतर कल्पसूत्रात सांगितलेल्या द्रव्यांनी अथवा तिलांनी मूलमंत्राने आठ हजार हवन करावे.
ह्याप्रमाणे हवन करून देवी संतुष्ट झाली आहे. त्याचप्रमाणे आवरणदेवता व वन्ही इत्यादी देवताही प्रसन्न झाल्या आहेत असे समजावे.
ज्याने उत्तम प्रकारे स्नान केले आहे व संध्यादि नित्यक्रिया केल्या आहेत अशा व दोन वस्त्रांनी व सुवर्णांच्या अलंकारांनी युक्त असलेल्या आपल्या शिष्यास कुंडाजवळ आणावे. त्याच्या हातात कमंडलू असावा व तो सोवळा असावा.
शिष्याने गुरूस व सभासदांस नमस्कार करून कुलदेवतेस वंदन करावे व तेथे आसनावर बसावे. शिष्याने चैतन्य आपल्या देहात येऊन पोचले आहे अशी भावना करावी. तदनंतर विद्वान गुरूने शिष्याच्या शरीरातील मार्गांचे शोधन कृपादृष्टीने करावे म्हणजे तो शुद्ध देवादिकांच्या अनुग्रहास योग्य असा होतो.
गुरूने शिष्याच्या शरीरामध्ये क्रमाने सहा मार्ग आहेत अशी भावना करावी. दोन्ही पायांमध्ये कलामार्ग, लिंगामध्ये तत्त्वमार्ग, नाभीमध्ये भुवनमार्ग, हृदयामध्ये वर्णमार्ग, ललाटात पदमार्ग व मस्तकामध्ये मंत्रमार्ग आहे अशी कल्पना करावी.
नंतर शिष्यास कूर्चाने स्पर्श करून गुरूने मी यास शुद्ध करतो असा संकल्प करून 'ॐ अमुमध्यानं स्वाहा' असा मंत्र उच्चारून घृताने भिजलेल्या तिलांनी प्रत्येक मार्गास आठ वेळा या प्रमाणाने हवन करावे. नंतर ते सहाही मार्ग ब्रह्मामध्ये लीन झाले आहेत अशी भावना करावी. पुन्हा गुरूने ब्रह्मापासून सृष्टिमार्गाने त्यांना उत्पन्न करावे. पुन्हा आपल्या चैतन्यामध्ये असलेले शिष्याचे चैतन्य त्याच्यामध्ये योजावे.
पूर्णाहुती देऊन देवतेला कलशावर ठेवावे. पुनः व्याहृतीच्या योगाने आहुती देऊन व अग्नीच्या अंगाहुती देऊन गुरूने अग्नीचे आत्म्यामध्ये विसर्जन करावे. गुरूने वस्त्राने शिष्याचे डोळे बांधावे व वैषट् मंत्राने त्या शिष्यास कुंडस्थलावरील मंडलाजवळ न्यावे. शिष्याच्या हातून मुख्य देवीस पुष्पांजली समर्पण करवावी. नेत्रबंध सोडून त्यास कुशासनावर बसवावे व पूर्वी सांगितलेल्या पद्धतीने शिष्यदेहावरील भूतांची शुद्धी करावी.
नंतर देयमंत्राकरता सांगितलेले न्यास शिष्याच्या शरीरावर करावे व त्यास दुसर्या मंडलावर बसवावे. कुंभामध्ये घातलेले पल्लव त्याच्या मस्तकावर ठेवून ककारादि मातृकांचा जप करावा. देवतारूप कलशस्थ जलाने शिष्यास स्नान घालावे. त्याचे सहज रक्षण व्हावे म्हणून ईशान्य दिशेत स्थापिलेल्या जलानेही त्यास अभिषेक करावा. नंतर शिष्याने उठून वस्त्रे परिधान करून भस्माचा चांगला लेप करून गुरूजवळ बसावे.
नंतर गुरूने आपल्या हृदयातून निघालेली भगवती शिवा शिष्याच्या हृदयात प्रविष्ट झाली आहे अशी भावना करावी व त्या शिष्य व देवता यांच्या ऐक्याची भावना करून त्या करुणानिधीने गंध, पुष्य इत्यादिकांच्या योगाने तिची पूजा करावी. नंतर गुरूने शिष्याच्या उजव्या कानांत महादेवीच्या महामंत्राचा तीन वेळा उपदेश करावा व आपला हात त्याच्या मस्तकावर ठेवावा.
नंतर शिष्याने गुरुमुखापासून घेतलेल्या मंत्राचा अष्टोत्तरशत जप करावा व त्या देवतारूप गुरूच्या पुढे भूमीवर दंडवत पडावे व यावज्जीव त्यास अनन्य मनाने सर्वस्व अर्पण करावे. ऋत्विजांस दक्षिणा देऊन ब्राह्मणांस व सुवासिनी, कुमारी व ब्रह्मचारी यांस सर्व प्रकारे भोजन घालावे. दीन, अनाथ व दरिद्री यासही भोजन घालावे. आपण कृतार्थ झालो असे मानून सतत मंत्रांची सेवा करावी.
या विधीचा पूर्णपणे विचार करून देवीच्या चरणकमलाची तू सेवा कर. या लोकी ब्राह्मणास याहून श्रेष्ठ असा अन्य धर्म नाही.
वैदिकाने आपापल्या गुह्योक्त पद्धतीने मंत्राचा उपदेश करावा व तांत्रिकाने तंत्ररीतीने उपदेश करावा.
हे नारदा, ह्याप्रमाणे तू जे विचारलेस ते मी तुला सांगितले. आता यापुढे अंबेच्या चरणकमलाचे नित्य सेवन कर. तिची नित्य आराधना करून मी परम सुखाप्रत प्राप्त झालो आहे.
व्यास म्हणाले, ''हे जनमेजय राजा, याप्रमाणे सर्व अत्युत्तम प्रकार नारदास सांगून व नेत्र मिटून तो मुनिवर्यांचा मुंकुटमणी भगवान नारायण, त्याने श्रीदेवीच्या पदकमलाचे ध्यान केले.
नारदानेही त्या श्रीनारायणगुरूस वंदन केले. देवीच्या दर्शनाच्या इच्छेने तो तप करण्यासाठी निघून गेला.