[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नारायण म्हणाले, ''भस्मांकित पुरुषास दान दिल्याने सर्व पापे नष्ट होतात. श्रुती- स्मृती पुराणे भस्माचे महात्म्य सांगतात. त्रिकाल भस्माचा पुंड्र लावणारा शिवलोकी जातो. नखशिखांत त्रिकाल स्नान केल्याने योगसिद्धी सत्वर होते. भस्मस्नानाने कुलाचा उद्धार होतो. त्यामुळे सर्व तीर्थांचे पुण्य व फल प्राप्त होते. अग्नी जसा इंधन जाळतो तसे भस्म पातकांना दग्ध करते. भस्माहून श्रेष्ठ स्नान दुसरे नाही. शंकरानेही भस्मस्नान केल्यामुळेच तो शिवरूप झाला, त्यामुळे कल्याणाची इच्छा करणारे सर्व देव देवता भस्मस्नान करू लागले.
अग्नेयशिरस्नान करणारा शरीरानेच रुद्र होतो. भस्मचर्चित मनुष्याला पाहून जो आदराने उठून उभा राहतो, त्याला इंद्रादिदेवही दंडवत प्रणाम करतात. आर्द्रस्नानापेक्षा भस्मस्नान श्रेष्ठ होय. उदक ही प्रकृती असल्याने बंधन होय. म्हणून भस्मस्नानाने बंधनाचा नाश करावा.
पूर्वी देवांनी रक्षणार्थ, मंगलार्थ, पवित्रतेसाठी भस्म स्वीकारले. ते शंकराने देवीस स्वतः दिले. सर्व रोग व सर्व भये या भस्मलेपनामुळे नष्ट होतात. कंठावर भस्म धारण केल्यामुळे सर्व पातके नाहीशी होतात.
वक्षस्थलीच्या भस्मामुळे मानसिक पाप, नाभीस भस्म लावल्याने शिश्नकृत पाप, गुदाचे ठायी लावल्यास गुदकृत पाप नष्ट होते. दोन्ही कुशीस भस्म लावल्यास परस्त्री- आलिंगनाचे पाप नाहीसे होते. हे भस्मधारण सर्वकाळी सर्वस्थळी प्रशस्त आहे.
भस्मनिष्ठ पुरुषाचे दोष सत्वर दग्ध होतात. भस्मस्नानाने पवित्र झालेलाच खरा आत्मनिष्ठ होय. सर्व पापांचे यामुळे भस्म होते म्हणून त्याला भस्म असे म्हणतात. हे पुरुषांना ऐश्वर्य देते म्हणून याला भूती, तसेच ते रक्षण करते म्हणून रक्षा या नावांनी संबोधतात. त्रिपुंड्रिकास पाहून भुते, प्रेते कंपायमान होतात. अतुल पातके करूनही मृत्युसमयी द्विजाने भस्म लावल्यास तो पापमुक्त होतो.
भस्मस्नानामुळे ज्याने क्रोध वगैरे जिंकले आहेत तो माझ्याजवळ येतो. त्यास पुन्हा जन्म नाही. दीर्घायुष्याची इच्छा करणाराने मोक्षेच्छु पुरुषाचे भस्म धारण करावे. उदकाचे स्नान हे केवळ देहावरील मल नष्ट करते, पण भस्मस्नानाने अंतर्बाह्य मल नाहीसा होतो. कोटी वेळा केलेल्या उदकस्नानापेक्षा एकदा केलेल्या भस्मस्नानाचे महात्म्य श्रेष्ठ आहे. भस्माविना वैदिक कर्म केल्यास अर्धेही फल प्राप्त होत नाही. यथाशास्त्र भस्मधारण करणारास कर्माचा खरा अधिकारी होतो. भस्मस्नान श्रुतिप्रोक्त असल्याने तीन वेळा भस्मस्नान करावे. भस्माचा त्याग करणारा पतित होय. मूत्रादि मलाचा त्याग केल्यावर भस्मस्नान करावे.
अपानवायु सुटला असता, जांभई दिली असता, शिंक, उचकी, खोकला यांची बाधा झाल्यास भस्मस्नान करावे. हा भस्मस्नानाच्या महात्म्याचा एक भाग आहे. आता त्याचे फल सांगतो.