[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नारायण म्हणाले, ''अग्निरितिभस्म या मंत्राने भस्म शुद्ध करावे. नंतर त्रिपुंड्र धारण करावे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे द्विज असल्याने त्यांनी त्रिपुंड्र धारण करावे. ज्याचे उपनयन झाले आहे त्यालाच द्विज म्हणतात. भस्मधारणावाचून कर्म निष्फल होते. गायत्रीचा उपदेश प्राप्त होत नाही. भस्मलेपनानंतर गायत्री जप करावा. जोवर अग्निजन्य भस्म धारण केले नाही तोवर गायत्री मंत्राचा अधिकार नाही. म्हणून भस्म हा पुण्य देणारा उपाय आहे. मस्तकावर भस्म असलेला द्विज विद्वान होय. भस्मसंग्रहाची आवड असलेला ब्राह्मण होय. भस्मसंग्रहाविषयी आदर नसलेला चांडाल होय. भस्मधारणावाचून फलादि भक्षण करणारे घोर नरकात जातात. विभूतीधारण सोडून कोणी सुवर्णतुला केली तरी फलप्राप्ती होत नाही.
उपवीतरहित द्विज संध्या करीत नाही. तसेच विभूतीवाचून संध्या करू नये. विभूती धारणावाचून कुठलाही मंत्र जपू नये कारण त्याविना केलेले कर्म अनधिकृत होय.
श्रौत अथवा स्मार्त भस्म शांत पुरुषांनी संपादन करावे. नित्य कर्माचे फळ भस्मलेपन करावे. सहा अंगुलांच्या प्रमाणाचा त्रिपुंड्र लावावा. अनामिका हा आकार, मधले बोट हुकार, तर्जनी मकार म्हणून मध्यमा तर्जनी व अनामिका त्यांच्या योगाने त्रिपुंड्र लावावा. पूर्वी एकदा दुर्वासऋषी स्वर्गलोकी गेले होते. त्यांनी रूद्राक्ष व भस्म धारण केले होते. 'हे शिव, हे शंकर, हे सर्वात्मन् हे श्रीपते, जगन्नाथ' असे शब्द ते मोठमोठ्याने उच्चारीत होते. तेव्हा कण्वादि पितृगणांनी त्यांना उत्थान देऊन सन्मान केला. त्याचवेळी, ''हाय, हाय, मेलो, मेलो' ' असा कुंभिपाकमधल्या प्राण्यांचा घोर शब्द ऐकू आला.'' आम्ही मेलो, आमचे तुकडे झाले, आम्ही दग्ध झालो'' असे ते ओरडत होते. तेव्हा ते करुणाकर मुनी म्हणाले, ''हे कोण ओरडत आहेत ?''
तेव्हा पितृनाथ म्हणाले, ''येथे जवळच संयमिनी नगरी आहे. तेथे पापी लोक नरकात आपली पापे भोगत आहेत. कुंभिपाक नरकाचे वर्णन करणे अशक्य आहे. विष्णूचा द्वेष करणारे त्या नरकात पडतात. तसेच वेद, चंद्र, सूर्य, ब्राह्मण इत्यादींचा द्वेष करणारेही त्याच नरकात पडतात. माता, पिता, गुरु यांचे निंदकही तेथेच जातात. तेव्हा त्यांचा हा घोर शब्द आहे. हा शब्द सतत आम्ही ऐकतो. त्यामुळे विरक्ती उत्पन्न होते.''
हे ऐकून तो मुनिश्रेष्ठ सत्वर या कुंडाजवळ गेला. त्याने सहज कुंडात डोकावून पाहिले. तेव्हा त्यातील प्राणी एकाएकी स्वर्गाहून अधिक सुखी झाले. ते गाऊ लागले, हसू लागले, नाचू लागले. तो भाग एकदम सुस्वर स्वरांनी भरून गेला. सुगंधित वायु वाहू लागले. तेव्हा दूत यमाला जाऊन म्हणाले, '' अहो महाराज, आज आश्चर्य घडले. कुंभीपाक कुंडातले प्राणी सुखे भोगीत आहेत.''
हे ऐकून यम रेड्यावर बसून तेथे आला. त्या दूताकडून हे वृत्त अमरावतीला कळविले. ब्रह्मदेव विष्णूसह सर्व दिक्पाल तेथे आले. सर्वजण कुंभिपाक कुंडाच्या भोवती उभे राहून तो प्रकार पाहू लागले. सर्वच विस्मित झाले, असे जर घडू लागले. तर लोकांना पापाची भीती वाटणार नाही. असा सर्व विचार करीत होते. इतक्यात भगवान विष्णु शंकराकडे गेला व सर्व वृत्तांत त्याने शंकरास सांगितला. नंतर 'त्याचे कारण काय असावे' असे त्याने शंकरास विचारले. शंकर म्हणाले, ''हे विष्णो, शिवभक्तांना मान्य असा दुर्वास भस्म व रुद्राक्ष लावून तेथे गेला. त्याने सहज खाली वाकून पाहिले. तेव्हा वार्यामुळे त्याच्या ललाटावरील भस्माचे कण खाली कुंभिपाक कुंडात पडले. त्यामुळे असा प्रकार घडला. हा सर्व भस्माचा महिमा आहे. यामुळे हे कुंड पितृलोकामध्ये रहाणार्यांचे तीर्थ होईल. तेथे आता माझे लिंग व देवीची स्थापना करावी. त्रैलोक्यात हे श्रेष्ठ तीर्थक्षेत्र होईल.''
तेव्हा त्याची आज्ञा घेऊन हरी परत आला. त्याने देवांना सर्व प्रकार समजावून सांगितला. तेव्हा सर्व देवांनी 'ठीक' म्हणून होकार दिला. तेव्हा हरी व ब्रह्मा यांना भस्माचे महात्म्य सांगितले. नंतर सर्व देवांनी तेथे लिंग व देवीची स्थापना केली. तेथील पापी लोक विमानात बसून वैकुंठी गेले. ते भद्रगण या नावाने प्रसिद्ध झाले. नंतर यमाने दूर प्रदेशी दुसरा कुंभीपाक निर्माण केला. सारांश, भस्मासारखे श्रेष्ठ काही नाही.
पर्वताचा भाग, नदीचे तीर, शिवक्षेत्र, सिंधूतीर, वारूळ, तुलसीचे मूळ येथील मृत्तिका घ्यावी. काळा ऊर्ध्वपुंड्र शांती करतो. लाल वश करतो. पिवळा संपत्तीदायी व पांढरा धर्म देतो. अंगठा पुष्टी देतो. मधले बोट आयुष्य व अनामिका अन्न देते. पुंड्र लावताना नखांनी स्पर्श करू नये. दीपज्योतीच्या पंक्तीप्रमाणे अथवा वेळूच्या पानाच्या आकाराचा किंवा कमलकवीसारखा ऊर्ध्व पुंड्र असावा. दहा अंगुले लांबीचा पुंड्र उत्तम होय.
ललाटावर केशव, उदरात नारायण, हृदयात माधव, कंठात गोविंद, उदराच्या उजव्या बाजूस विष्णू, त्यामागे व बाहूच्यामध्ये मधुसूदन, कर्णप्रदेशी त्रिविक्रम, डाव्या बाजूस क्षीधर, कानावर हृषिकेश, पीठावर पद्मनाभ, कण्यावर दामोदर हा देवता आहेत अशी कल्पना करावी. वासुदेव म्हणून मस्तकावर न्यास करावा.
पूजासमयी व होमाचे वेळी मन शांत करावे. यथाशास्त्र या नावांचा उच्चार करून ऊर्ध्वपुंड्र धारण करावा.
अशुद्ध, आचारशून्य, पापी यांनी जरी ऊर्ध्वपुंड्र मस्तकावर धारण केला तरी शुद्धी होते. हे धारण करणारा चांडाल जरी कोठेही मृत्यू पावला तरी माझ्या लोकी येतो. माझे स्वरूप जाणणारे भाग्यवान विष्णूच्या पायांच्या आकाराचा त्रिपुंड्र दोन रेघात धारण करतात.
हरिद्राचूर्ण असे निर्मल व शूलाच्या आकाराचे पुंड्र लावावे. वैष्णव छिद्ररहित पुंड्र लावतात. वीर वैष्णवांनी छिद्ररहित पुंड्र धारण केल्यास महादोष लागतो. दंडाच्या आकाराचा, सच्छिद्र असा ऊर्ध्वपुंड्र वैष्णवाने लावावा.
अंतर राखून ऊर्ध्वपुंड्र लावणार्याने माझे मंदिरच केल्यासारखे आहे. अशा ठिकाणी विस्तृत पुंड्रात विष्णु लक्ष्मीसह रममाण होतो. अंतर न ठेवता ऊर्ध्वपुंड्र लावणारा ब्राह्मण अधम होय. तो क्रमाने एकवीस नरकात पडतो. म्हणून ब्राह्मणाने, त्रिशूलाकार, वर्तुळ, चौकोनी असे ऊर्ध्वपुंड्र लावावे. वेदनिष्ठ ब्राह्मणाने अर्धचंद्रादि चिन्हे धारण करू नयेत. वैदिक पुरुषाने श्रुतीप्रोक्त आडवा पुंड्र सोडून इतर पुंड्र धारण करू नयेत. असे केल्यास ते पतित होत. तसेच त्याने शरीरावर मुद्रा धारण करू नयेत. त्याने श्रौतचिन्ह धारण करावे.
ज्या श्रुतिबाहेर तंत्रात सांगितलेल्या देवता आहेत त्यांचे चिन्ह अश्रौत असते. कारण वेदसिद्ध महादेवच संसारातून सोडवतो. तो भक्तावर अनुग्रह करण्यासाठी श्रौत लिंग धारण करतो. तसेच वेदसिद्ध विष्णूचे लिंगही श्रुतिप्रोक्तच आहे. ऊर्ध्वपुंड्रादी चिन्हे श्रुतिबाह्य आहे. आडवा पुंड्र श्रुतिबाह्य नाही. म्हणून वेदोक्त मार्गाने ललाटावर भस्माचा आडवा पुंड्र धारण करावा. जो नारायणास शरण जातो त्याने नित्य ललाटावर गंधोदकाने शूल धारण करावा.