[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
मुनी म्हणाले, "महिषीपुत्र महिषासूराने देवांना जिंकल्यावर त्याने सर्व लोकपालांचे अधिकार बलात्काराने काढून घेतले व तो त्रैलोक्याचे ऐश्वर्य भोगू लागला. स्वर्गभ्रष्ट झालेले देव ब्रह्मदेवाकडे गेले. तेथेच शंकर व अच्युत बसले होते. देवांनी सर्व वृत्तांत सांगितला.
हे अमरश्रेष्ठांनो, महिषासूराने देवांचे राज्य बलात्काराने हरण केले आहे. त्याच्या वधाचा उपाय सागा.
ते ऐकताच ब्रह्मा, विष्णु, महेश हे क्रुद्ध झाले. तेव्हा हरीच्या मुखातून एक दिव्य तेज बाहेर पडले. नंतर क्रमाने सर्व देवांच्या मुखातून तेज बाहेर पडले.
शंभूच्या तेजापासून मुख, विष्णूच्या तेजापासून बाहू सामाच्या तेजामुळे स्तन, इंद्रतेजामुळे मध्यभाग, वरुणाच्या तेजापासून जांघा व मांड्या, भूमीच्या तेजापासून नितंब उत्पन्न झाले. ब्रह्मदेवाच्या तेजापासून पाद, सूर्यतेजामुळे पायांची अंगुले निर्माण झाली. इंद्राच्या तेजामुळे हातांची बोटे, अग्नीमुळे श्रोत्रद्वय, साध्यांच्या तेजापासून भृकुटी, वायूच्या तेजामुळे कान अशा विविध अवयवांनी युक्त अशी स्त्री तेथे प्रकट झाली.
नंतर शिवाने तिला शूल दिला, विष्णूने चक्र, वरुणाने शंख, अग्नीने शक्ती, वायूने दोन बाण, इंद्राने वज्र, ऐरावताने घंटा, यमाने कालदंड, ब्रह्माने अक्षमाला व कमंडलू सूर्याने किरणांची माला अर्पण केली. कालाने निर्मल खड्ग व चर्म दिले. समुद्राने रत्नहार, वस्त्रे, चूडामणी, कुंडले, कंकणे, अर्धचंद्र, नूपुरे इत्यादी वस्तु दिल्या. विश्वकर्म्याने गळ्यातील अलंकार व आंगठी दिली.
हिमालयाने वाहन म्हणून सिंह दिला. कुबेराने सुरापात्र दिले. शेषाने नागांचा हार दिला. अशा रीतीने विविध देवांनी आपापल्या उत्तमोत्तम वस्तु देवीला अर्पण केल्या. नंतर त्या सर्व देवांनी मुक्त कंठाने महामायेचे स्तवन केले. नंतर महिष वधासाठी तिने प्रचंड नाद केला. तो नाद ऐकून महिष आश्चर्ययुक्त झाला व तो सर्वसैन्य घेऊन देवीसमोर आला. त्यावेळी देवी व असुर यांच्यात तुमुल युद्ध झाले. महिषाचे सर्व सेनाप्रमुख वधले गेले.
अखेर त्या महिषाने विविध रूपे घेऊन आकाश व्याप्त केले. मायेत निपुण असलेला तो दैत्य सत्वर देवीजवळ येऊन युद्धप्रवृत्त झाला. त्याने विविध रूपे धारण केली. शेवटी महिषरूपधारी दैत्यास पाशबद्ध करून तिने खड्गाने त्याचे शीर तोडले. त्याचवेळी इतर दैत्यसैन्य हाहाकार करीत पळून गेले. अशी ही महिषासुरमर्दिनी उत्पन्न झाली.
आता सरस्वतीची कथा ऐक. एकदा शुंभ व निशुंभ हे दोघे भाऊ बलाने उन्मत्त झाले. त्यांनी देवास त्रस्त केले. शेवटी सर्व देवांनी हिमालय पर्वतावर जाऊन देवीची स्तुती केली. देव म्हणाले, "हे देवेश्वरी, तुझा जयजयकार असो. तू भक्तांची पीडा दूर करतेस. तू दानवांना यमासारखी आहेस. हे देवेशी, तू भक्तीस सुलभ आहेस. बलिष्ठ आहेस. तू अतुल पराक्रमी आहेस. हे माधवी, मोददायिनी, महातांडवामुळे तू अतिशय प्रसन्न होतेस म्हणून सांप्रत प्रसन्न हो. शुंभनिशुभाच्या भयापासून आम्हाला मुक्त कर. हे शरणागताचे दुःख निवारण करणारे देवी, आमचे रक्षण कर."
याप्रमाणे स्तुती केल्यावर देवांवर गिरिजा प्रसन्न झाली. ती म्हणाली, "माझे स्तवन का केले ?"
तेव्हा कौशिका नावाच्या प्रकट झालेल्या देवीस ती म्हणाली, "हे देवी, त्रैलोक्य व्यापलेल्या शुंभनिशुंभाचा वध कर."
देवीने त्या देवशत्रूंना मारण्याचे वचन दिले व ती तेथेच गुप्त झाली. नंतर देव मेरू पर्वताच्या गुहेत जाऊन राहिले. शुंभनिशुंभाच्या चंडमुंड नावाच्या दूतांनी त्या देवीला एकांतात अवलोकन केले. नंतर शुंभ राजाकडे जाऊन म्हणाले, "आम्ही पाहिलेली स्त्री तुलाच भोगण्यास योग्य आहे. कारण तिच्यासारखी स्त्री त्रैलोक्यात असणे अशक्य." हे ऐकून शुंभाने सुग्रीवाला दूत म्हणून तिच्याकडे पाठवले. दूत देवीला म्हणाला, '"हे देवी, त्रैलोक्याचा जेता, असुरश्रेष्ठ शुंभाने तुला निरोप सांगितला आहे. तो म्हणतो, "मी सर्वोत्तम वस्तूंचा भोक्ता आहे, तू सुंदर आहेस, म्हणून माझा स्वीकार कर. या त्रैलोक्यातील सर्व रत्ने माझीच आहेत. म्हणून हे स्त्रिये, कामोत्पन्न रसांनी माझी सेवा कर."
दूताचे भाषण ऐकून देवी म्हणाली, "हे दूता, मी पूर्वी प्रतिज्ञा केली आहे. जो मला युद्धात जिंकेल तोच माझा भोग घेण्यास योग्य आहे. तेव्हा ही गोष्ट त्या असुर राजाला अशक्य नाही."
हे देवीचे बोलणे त्या दूताने शुंभास जाऊन सांगितले. ते ऐकून त्या दानवश्रेष्ठाला क्रोध आला. तो धूम्राक्ष नावाच्या राक्षसास म्हणाला, "हे धूम्रा, तू त्या स्त्रीचे केस धरून तिला तेथे घेऊन ये." हे ऐकताच साठ हजार असुरसैन्यासह धूम्रलोचन देवीसमोर येऊन उभा राहिला व देवीस म्हणाला, "हे देवी, शुंभाची सेवा करून तू उत्तम सुखाचा भोग घे. नाही तर तुझ्या केसांना धरून मी तुला राजाकडे घेऊन जाईन."
तेव्हा त्या देवीने त्या राक्षसास युद्धाचे आव्हान दिले. खड्ग उपसून तो तिच्याकडे धावताच तिने एका हुंकाराने त्याचे भस्म केले. देवीच्या सिंहाने इतर दैत्यांचा पराभव केला. हे वृत्त ऐकून क्रुद्ध झालेल्या राजाने चंड, मुंड, रक्तबीज यांना युद्धासाठी पाठविले पण त्यांचाही देवीने वध केला. अखेर शुंभनिशुंभ स्वतः युद्धास गेले. त्यांनी देवीशी दारुण युद्ध केले. पण त्यांनाही देवीने ठार मारले. तेव्हा देवांनी त्या देवीची भक्तीभावाने स्तुती केली. ती देवी म्हणजेच सर्वश्रेष्ठ सरस्वती होय.
हे राजा, म्हणून तू त्या जगद्धात्री देवीचाच आश्रय कर. ती महामाया पूज्य देवी तुझे कार्य करील."
ऋषीचे ते भाषण ऐकून सूरथराजा देवीस शरण गेला. त्याने मृत्तिकेची देवीची मूर्ती स्थापन केली व निराहार राहून त्याने तिची आराधना केली. तेव्हा ती देवी प्रसन्न होऊन त्याच्यापुढे प्रकट झाली. तेव्हा राजाने मोहनाशक ज्ञान व निष्कंटक राज्य तिला मागितले.
महेश्वरी देवी म्हणाली, "हे राजा, माझ्या वरामुळे तुला याच जन्मी मोहनाशक ज्ञान व निष्कंटक राज्य प्राप्त होईल. नंतर तू सूर्यवंशात उत्पन्न होऊन सावर्णी होशील. तुला मन्वंतराचे स्वामित्व प्राप्त होऊन पुत्रपौत्रादि संतति लाभेल."
असा वर देऊन देवी अंतर्धान पावली. नंतर देवीच्या प्रसादामुळे पुढे तो राजा मन्वंतराचा अधिपती झाला. हे साधो, याप्रमाणे मी तुला सावर्णी मनूचा जन्म व चरित्र कथन केले. या आख्यानाचा पाठ करणार्यास किंवा श्रवण करणार्यास देवीचा अनुग्रह लाभतो.