[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्री नारायणमुनी म्हणाले, "आता इतर मनूंचे आख्यान सांगतो. त्याच्या श्रवणानेही मनुष्य देवीभक्त होतो. सदाचरणी वैवस्वत मनूला करूष, पुषध्र, नाभाग, दिष्ट, शर्याती, त्रिशंकू असे सहा पुत्र होते. ते सर्व बलाढ्य असून त्यांनी कालिंदीच्या तीरावर उग्र तप केले. मृत्तिकामय देवीची मूर्ती करून त्यांनी तिची पूजा केली. निराहार राहून सूर्यकिरणावर उपजीविका करून त्यांनी देवीची आराधना केली. त्यामुळे त्यांना मोहनाश करणारे ज्ञान प्राप्त झाले. त्यांना आत्मज्ञान झाले. तेव्हा प्रत्यक्ष जगदीश्वरी देवी त्यांच्या समोर आली. त्यावेळी सर्वांनी तिची स्तुती केली.
राजपुत्र म्हणाले, "हे महेश्वरी, हे इशानी, तुझा जयजयकार असो. वाग्भव मंत्रातून तू प्रतीत होतेस. तुझा आकार क्लींरूप आहे. तू कामराजामुळे मनास आनंद देणारी व ईश्वरास संतुष्ट करणारी आहेस. हे महामाये, तूच विश्व, शिवादिरूप आहेस. तूच भोगांची वृद्धी करतेस." अशारीतीने तिची स्तुती केल्यावर श्रीदेवी म्हणाली.
" हे राजपुत्रांनो, माझ्या तपामुळे तुमचे अंतःकरण शुद्ध झाले असून तुम्ही पापरहित झाला आहात. मी तुमच्यावर प्रसन्न झाले आहे. तुम्ही इष्ट वर मागून घ्या." राजपुत्र म्हणाले, "निष्कंटक राज्य, चिरंजीव संतती, भोग, काम, यश, तेज इत्यादी आम्हाला प्राप्त करून दे."
श्रीदेवी म्हणाली, "तुम्ही सर्वजण मन्वंतराचे स्वामी व्हा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील."
याप्रमाणे वर दिल्यावर ती जगदंबिका गुप्त झाली. नंतर ते सर्व राजपुत्र उत्तम भोग भोगू लागले. दुसर्या जन्मी ते क्रमाक्रमाने मन्वंतराचे स्वामी झाले. त्यातला पहिला दक्षसावर्णी हा नववा मनू होय. तो देवीप्रसादामुळे अकुंठित सामर्थ्यवान झाला. दुसरा मेरूसावर्णी हा दहावा मनू झाला. सूर्यसावर्णी हा अकरावा मनू असून चंद्रसावर्णी हा बारावा, रुद्रसावर्णी हा तेरावा, विष्णुसावर्णी हा चवदावा, असे हे मनू जगद्वंद्य झाले. त्या देवी भ्रामरीच्या प्रसादामुळे सर्व श्रेष्ठ झाले."
नारद म्हणाले, "ह्मा भ्रामरी देवीची कथा आपण मला निवेदन करा."
श्रीनारायण म्हणाले, "हे नारदा, अव्यक्त, अचिंत्य अशा जगन्मातेचे चरित्र मी तुला सांगतो. ते मोक्ष देणारे आहे. पूर्वी अरूण नावाचा एक बलाढ्य दैत्य होता. तो महाबली पातालात रहात असे. त्याने ब्रह्मदेवास उद्देशून उग्र तप केले. त्याने हिमालयाच्या पार्श्वभागी, गंगाजलाने पवित्र ठिकाणी, पिकलेली पाने खाऊन गायत्रीमंत्राच्या साह्याने दहा हजार वर्षे तप केले. पुढील दहा हजार वर्षे उदकाचे तुषार पिऊन तो राहिला. पुढे वायुभक्षण करून दहा हजार वर्षे व नंतर निराहार राहिला.
या दारूण तपश्चर्येनंतर त्याच्या शरीरातून निघालेल्या अग्नीने सर्व जग जाळून टाकले. तेव्हा सर्व देव भयाने कापू लागले व ब्रह्मदेवास शरण गेले. तेव्हा तो गायत्रीसह हंसारूढ होऊन तेथे आला. तेथे अत्यंत कृश झालेल्या पण देदीप्यमान अरुणास पाहिले. ब्रह्मदेव म्हणाला, हे वरा, तुझे कल्याण असो. तू इष्ट वर माग." तेव्हा संतुष्ट झालेल्या अरुणाने डोळे उघडून ब्रह्मदेवास पाहिले. नंतर विविध स्तोत्रे म्हणून त्याने देवाची स्तुती केली व अमर होण्याचा वर त्याने ब्रह्मदेवास मागितला.
तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला, ब्रह्मा, विष्णु, महेश यांनाही मृत्यु आहे. म्हणून मला देता येईल असा योग्य वर मागून घे. कारण बुद्धीमान लोक या गोष्टीविषयी आग्रह धरीत नाहीत.
तेव्हा अरुण आदराने म्हणाला, "युद्धामध्ये शस्त्रांपासून पुरुष अथवा स्त्री यांपासून, द्वीपाद, चतुष्पाद प्राण्यांकडून मला मृत्यु येऊ नये. तसेच देवांना जिंकता येण्यासारखे बल दे."
तसा वर देऊन ब्रह्मदेव स्वस्थानी गेला. त्या वरामुळे गर्विष्ठ होऊन अरुणाने पाताळातून दैत्यांना वर आणले. तो दैत्यांचा राजा झाला. त्याने दूत पाठवून इंद्रास युद्धाचे आवाहन केले. तेव्हा इंद्र भयभीत होऊन ब्रह्मदेव व विष्णु यांच्यासह शंकराकडे गेला. ते सर्व देव त्या दैत्याच्या वधाचा विचार करू लागले.
पण इकडे अरुणाने स्वर्गलोकी जाऊन विविध रूपे धारण करून इंद्र, सूर्य, वरुण, यम, अग्नी यांचे अधिकार घेतले. तेव्हा स्वस्थानापासून भ्रष्ट झालेल्या देवांनी ही वार्ता शंकराला सांगितली. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे शंकरही विचारात पडला. सर्वजण चिंताव्यग्र झाले होते. इतक्यात आकाशवाणी झाली, "भुवनेश्वरीची सेवा करा. गायत्री जपात तल्लीन झालेल्या दैत्यराजाला तिने सोडले तर तो मृत्यूस योग्य होईल."
ती वाणी ऐकून इंद्र बृहस्पतीला म्हणाला, "हे गुरो, तू असुराकडे जाऊन तो गायत्री जपाचा त्याग करील असे काहीतरी कर. आम्ही इकडे परमेश्वराची सेवा करतो." असे सांगून देव जंबुनदेश्वराकडे गेले. तेथे जाऊन त्यांनी निग्रहपूर्वक तप केले. मायबीज मंत्राच्या योगाने त्यांनी देवीचे यज्ञ केले.
इकडे बृहस्पती असुराकडे गेला. त्याला पाहून दैत्यराज म्हणाला, "हे मुने, आपण कोठून व कशाकरता आला आहात ? कारण मी तुमचा शत्रु आहे."
मुनीश्रेष्ठ, बृहस्पती म्हणाला, "आम्ही जिची सेवा करावी अशा देवीची तू पूजा करीत आहेस. तेव्हा तू आमचा पक्षपातीस नव्हेस काय ?"
हे शब्द ऐकताच देवमायेने मोहित झालेल्या राक्षसाने गर्वाने त्या मंत्राचा त्याग केला. गायत्रीचा त्याग करताक्षणीच तो निस्तेज झाला. तेव्हा देवगुरु सत्वर इंद्राकडे गेला. त्याने सर्व वृत्तांत त्याला निवेदन केला. संतुष्ट झालेल्या देवांनी परमेश्वरीची आराधना केली, तोच ती जगन्मंगलकारिणी त्यांच्यापुढे प्रकट झाली.
ती कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी होती. मदनाप्रमाणे सुंदर होती. चित्रविचित्र उटी तिने लावली होती. ती विचित्र अशा दोन वस्त्रांनी युक्त होती. पुष्पालंकार तिने धारण केले होते. तिच्या मुठीत विचित्र भ्रमर होते. मुद्रा अभयदायक होती. तिच्याभोवती कोट्यावधी भ्रमर ऱ्हींकार मंत्राचे गायन करीत होते. अशी अंबा शृंगार वेषांनी परिपूर्ण होती. तिला पाहून सर्व देव त्या शिवेचे स्तवन करू लागले. देव म्हणाले, "हे महाविद्ये, तुला नमस्कार असो. हे कमलपत्राक्षी, तुला वंदन असो. हे सर्वाधारभूत देवी, तुला प्रणाम असो. विश्व, तेजस, प्राज्ञ, विराट व सूत्रात्मक देवी, तुला नमस्कार असो. हे दुर्गे, तू दुष्टांचा निरोध करणारी आडणा (अर्गला) आहेस. म्हणून अविद्यादिकांचा नाश करणारी, तुला नमस्कार असो. हे त्रिपुर सुंदरी, पितवत्र धारिणी, हे भैरवी, हे मातंगी, हे धूमावती, तुला वारंवार नमस्कार असो.
हे छिन्नमस्ते, क्षीरसागरकन्ये, हे शिवे, शाकंभरी, हे रक्तदंतिके, आमचा तुला नमस्कार असो. हे सर्व दानवांचा अंत करणारे शिवे, तुला नमस्कार असो. हे विजये, हे गंगे, हे शारदे, हे पृथ्वीरूपी, दयारूपे, तेजोरूपे, तुला वारंवार प्रणाम असो. हे प्राणरूपे, हे महारूपे, भूतरूपे, विश्वमूर्ते, धर्ममूर्ते, दयापूर्ते तुला असकृत प्रणाम असोत. हे देवमूर्ते, ज्योतिमूर्ते, ज्ञानमूर्ते, हे गायत्री, हे वरदे, हे सावित्री, सरस्वती तुला नमस्कार असो.
हे स्वधे, हे माते, हे दक्षिणे, हे वेदबोधरूपे, तुला नित्य प्रणाम असो. तू भ्रमरांनी वेष्टित आहेस, म्हणून तुला भ्रामरी असे म्हणतात. तुला सर्व बाजूंनी आमचा नमस्कार असो.
हे अंबिके, हे मणिद्वीपवासिनी, हे अनंतकोटी ब्रह्मांडनायिके, हे जगदंबिके, हे जगन्माते, परात्परदेवी, हे भुवनेश्वरी, तुझा जयजयकार असो. हे परमेश्वरी, प्रसन्न हो. आमच्यावर कृपा कर."
असे देवांनी तिचे स्तवन केल्यावर ती जगदंबा म्हणाली, "हे देवांनो, मी प्रसन्न झाले आहे. तेव्हा तुमचे काय कार्य आहे ते सांगा. "
देवीचे भाषण ऐकून देवांनी आपले कार्य तिला निवेदन केले. देवब्राह्मणांचा व वेदांचा नाश करणार्या दुष्ट दैत्यासंबंधीचे आपले कार्य तिला सांगितले. ब्रह्मदेवाचा वरही तिला सांगितला. ते सर्व ऐकून भ्रामरीने आपल्या सर्व बाजूंना असलेल्या व हातातल्या भ्रामरांना प्रेरणा केली. तेव्हा विविध रूपाने असंख्य भ्रमर उत्पन्न झाले. त्यांनी त्रिभुवन व्यापून टाकले.
तो सर्व भ्रमरसमुदाय तेधून निघाला. त्यावेळी अंतरिक्ष व्यापल्यामुळे अंधकार झाला. अंतरिक्षात, पर्वतशिखरावर, वृक्षावर सर्वत्र भ्रमरच दिसू लागले. त्या भ्रमरांनी क्रुद्ध होऊन दैत्यांची वक्षस्थले फोडून टाकली. शस्त्रास्त्रांचे त्यापुढे काही चालेना. दैत्य जागच्या जागी ठार झाले. एका क्षणार्धात सर्व दैत्यश्रेष्ठ नष्ट झाले. याप्रमाणे देवांचे कार्य पार पाडल्यावर सर्व भ्रमर देवीजवळ आले. सर्व लोक आश्चर्ययुक्त झाले.
ब्रह्मा-विष्णु-महेशांनी हर्षयुक्त होऊन त्या देवीचे पूजन केले. तिला विविध उपचार अर्पण केले. तिच्यावर पुष्पवृष्टी केली. स्वर्गलोकी दुंदुभी वाजू लागल्या. गंधर्व गाऊ लागले. विविध स्तोत्रांनी देव देवीची स्तुती करू लागले. सर्व देवांनी तिचा जयजयकार केला. सर्वांना पृथकू पृथकू वर देऊन ती देवी गुप्त झाली.
हे नारदा, याप्रमाणे भ्रामरीचे चरित्र मी तुला सांगितले. हे पठण अथवा श्रवण करणारा पापमुक्त होतो. ह्याप्रमाणे सर्व मनूंचे पापनाशक आख्यान जो पठण करतो अथवा नित्य पाठ करतो तो सर्व पापापासून मुक्त होतो. शेवटी त्याला देवीसायुज्यता प्राप्त होते.