[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नारद म्हणाले, "हे महामुने, आता सावित्रीची उत्पत्ती कशी झाली हे सांगा. निरनिराळ्या लोकात तिची कोणी प्रथम पूजा केली तेही विस्ताराने सांगा. कारण तिला वेदजननी म्हणतात."
नारायणमुनी म्हणाले, "ब्रह्मदेवाने या वेदजननीची पूजा प्रथम केली. नंतर देवगण व त्या नंतर विद्वानांनी तिचे पूजन केले. भारतवर्षात अश्वपती राजाने तिची पूजा केली व नंतर चारी वर्णांनी तिला पूजले."
नारद म्हणाले, "हा अश्वपती कोण ?"
नारायण म्हणाले, "अश्वपती हा भद्र देशाचा राजा होय. तो अत्यंत बलाढय होता. त्याची लक्ष्मीप्रमाणे मालती या नावाने प्रसिद्ध असलेली महाराणी पत्नी होती. पण राणी वांझ होती. वसिष्ठांच्या आज्ञेने तिने सावित्रीची पूजा केली. पण तिला वर मिळाला नाही. तेव्हा महिषी खिन्न होऊन घरी गेला. ते पाहून राजा स्वतः पुष्कर तीर्थावर जाऊन सावित्रीची उपासना करू लागला. शंभर वर्षे तप केल्यावरसुद्धा सावित्रीने दर्शन दिले नाही. पण वर मात्र दिला.
"तू गायत्रीचा दशलक्ष जप कर." अशी आकाशवाणी त्याच्या कानावर आली.
इतक्यात तेथे पराशर मुनी आले. राजाने त्यांना वंदन केले. मुनी राजास म्हणाले, "गायत्रीचा जप एकदा केला म्हणजे दिवसाचे पाप नष्ट होते. दहा वेळा जप केल्यास दिवसाची व रात्रीची घडलेली पापे नाहीशी होतात. शंभर जपामुळे महिन्याची पापे व हजार जपामुळे वर्षाची पापे नष्ट होतात. एक लक्ष जपामुळे सर्व पातके नाहीशी होतात. एक कोटी जप केल्यास सर्व जन्मी घडलेली पापे नाश पावतात. सर्पफणाकृती हात धरून कोटी जप केला असता ब्राह्मणाला मुक्ती मिळते. ब्राह्मणाने नतमस्तक होऊन, ताठ बसून, पूर्वाभिमुख करून, जप करावा. अनामिकेच्या मधल्या पेरापासून दक्षिणावर्तक्रमाने तर्जनीच्या मुळापर्यंत मोजत जावे. इंद्रिये नियमित करून जप करावा. श्वेतकमलाच्या बीजांची माळ करावी. ती गोरोचनाने भिजवून तिच्यावर अभिषेक करावा.
संस्कृत माळेस पंचगव्याचे स्नान घालावे व त्या गंगोदकाने स्नान करावे. तेव्हा हे राजा, तू दशलक्ष जप कर म्हणजे तुला सावित्रीचे दर्शन होईल. नंतर नित्याने शुचिर्भूत होऊन त्रिकाल संध्या कर म्हणजे तुला फल प्राप्ती होईल. त्रिकाल संध्या करणार्याच्या चरणधूलीने सर्व पवित्र होते. संध्येमुळे पुरुष जिवन्मुक्त होतो.
त्रिकाळ संध्या न करणार्या पुरुषाकडून देव तर्पण घेत नाहीत. जो द्विज हरी मंत्ररहित, त्रिकाल संध्या करीत नाही, एकादशी व्रत करीत नाही तो विषारी सर्पाप्रमाणे होय. हरीचा नैवेद्य न घेणारा, धोबीकाम करणारा, बैलारूढ होणारा, शूद्रान्न भक्षण करणारा, ब्राह्मणही विषारी होय. जो ब्राह्मण कन्याविक्रय करतो, हरिनामाची विक्री करतो, निपुत्रिक स्त्रीचे अन्न खातो, ऋतुस्नात स्त्रीचे अन्न भक्षण करतो, तसेच कुंटणाचे कार्य करतो, व्याजावर उपजीविका करतो, जो विद्येचा विक्रय करतो तो विषारी सर्पाप्रमाणे होय.
जो सूर्योदयानंतर निजतो, मत्स्य भक्षण करतो, देवीची पूजा करीत नाही तो बिनविषारी सर्पाप्रमाणे होय." असे सांगून पराशर ऋषींनी राजाला पूजेचा विधी व क्रम सांगितला. तसेच सावित्रीच्या ध्यानाविषयी सांगितले. नंतर ते मुनी आश्रमात परत गेले. त्यानंतर राजाने सावित्रीची विधीपूर्वक पूजा केली. तेव्हा राजाला तिचे दर्शन घडले व योग्य वर मिळाला.
"हे नारदा, आता तो श्रेष्ठ विधी मी तुला सांगतो. जेष्ठातील कृष्ण त्रयोदशीला शुद्धकाली, तसेच चतुर्थीच्या दिवशी पुरुषाने भक्तीपूर्वक व्रत करावे. असे चवदा वर्षे व्रत करून चवदा फले व चवदा नैवेद्य अर्पण करावेत. वस्त्र, यज्ञोपवीत व विधीपूर्वक भोजन द्यावे. जळे व शाखा यांचा उपयोग करून घट स्थापन करावा. गणेश, सूर्य, अग्नी, विष्णु, शिव, पार्वती यांना व इष्ट देवीचे घरात आवाहन करावे. माध्यंदिनशाखेत सावित्रीचे ध्यान सांगितले आहे. तसेच ध्यान, स्तोत्र, पूजाविधान व सर्वकाम मंत्र आता मी निवेदन करतो.
तप्त सुवर्णाप्रमाणे कांती असलेल्या, ब्रह्मतेजाने झळाळणार्या, ग्रीष्मातील सूर्याप्रमाणे प्रभा असलेली, जिचे मुख प्रसन्न आहे, रत्नांनी विभूषित, अग्नीप्रमाणे शुद्ध वस्त्र परिधान
केलेली, भक्तनुग्रही, सर्वदात्री, मुक्तीदायी, जगत्कर्त्याची कांता शांत, सुस्वरूप, सर्वसंपत्तीरूप, वेदांची अधिष्ठात्री, वेदशास्त्र व वेदबीजस्वरूपिणी अशा मातेला मी नमन करतो.
मनात ध्यान करून, नैवेद्य दाखवून, स्वतःच्या मस्तकावर हात ठेवून, पुतः भक्तीने ध्यान करून त्याने देवीस आवाहन करावे. मंत्रोक्त षोडशोपचार यांनी पूजा करून तिची स्तुती करावी.
आसन, पाद्य, अर्ध्य, स्नान, अनुलेपन, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, शीतल उदक, वस्त्र, भूषण, माल्य, गंध, आचमन, मनोहर उत्कृष्टशय्या असे हे सोळा उपचार आहेत.
तसेच तिला तीर्थोदक, पुण्यमय, पूजांग भूत, शुद्ध असे पाद्य अर्पण करावेत. पवित्र अर्ध्य, पुष्पदले, दुर्वा, शंखोदक यांनी स्नान घालावे. देवीला याचा स्वीकार करण्यास मनोभावे सांगावे.
हे अंबे, मंगलरूप, मंगलदायी, पुण्यमय, सुगंधमय, सुखद असा धूप मी तुला देत आहे. तू स्वीकार कर. जगाकडे पहाण्यासाठी व अंधाराचा नाश करण्यासाठी मी तुला दीप अर्पण करतो.
तुष्टीदायी, पुष्टीदायी, प्रीतीकर, क्षुधानाश करणारी, पुष्परूप, गोड असा नैवेद्य तू ग्रहण कर.
हे देवी, रम्य, सुवासिक कर्पूर, तुष्टी व पुष्टी देणारा तांबूल मी तुला अर्पिला आहे. शीतल व तृषा पूर्ण करणारे जीवनरूप पाणी तू ग्रहण कर.
देहाची शोभा वाढवणारे रेशमी वस्त्र, सभेची शोभा वृद्धींगत करणारे कापसाचे वस्त्र तू ग्रहण कर.
कांचननिर्मित, श्रीकर, श्रीमुक्त, सुख, पुण्य देणारे असे हे रत्नभूषण तू स्वीकार.
हे देवी, विविध वृक्षांपासून निर्माण झालेले, नाना रूपांनी पूर्ण, फलदायी असे फल तू ग्रहण कर. तसेच ही विविध पुष्पांनी युक्त मंगलकारक अशी माला तू स्वीकार.
हे देवी, गंधयुक्त, पुण्यद गंध तू घे. उत्तम, रम्य, मस्तकाची शोभा वृद्धी करणारा, भूषणावह शेंदूर तू स्वीकृत कर. शुद्ध ग्रंथींनी युक्त, पवित्र सूत्रात्मक वेदमंत्रांनी पवित्र झालेले यज्ञोपवीत तू घे."
असे म्हणून देवीचे स्तोत्र म्हणावे. नंतर ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. चतुर्थात सावित्री शब्द व शेवटी स्वाहा हा शब्द, पूर्वी लक्ष्मी, माया, काम यातील शब्दांनी अष्टाक्षरी मंत्र तयार होतो.
सावित्री गोलोकी कृष्णाने ब्रह्मदेवास अर्पण केली. ती संपूर्ण कथा आता मी तुला निवेदन करतो.
ती सावित्री ब्रह्मदेवाबरोबर जाण्यास सिद्ध होत नव्हती. म्हणून ब्रह्मदेवाने त्या वेदमातेचे स्तवन केले. तेव्हा संतुष्ट होऊन तिने ब्रह्मदेव पती होण्याची इच्छा केली. ब्रह्मदेव म्हणाला, "हे सच्चिदानंदरूपे, तूच मूल प्रकृती आहेस. हे हिरण्यगर्भरूपे, हे सुंदरी, तू प्रसन्न हो. हे तेजस्वरूपे, हे श्रेष्ठ स्त्रिये, हे परमानंदरूपिणी, द्विजजातीरूप देवी, हे सुंदरी, प्रसन्न हो. हे ब्राह्मस्वरूपिणी, हे मंत्रसारे, हे परात्परे, हे सुखदे, हे मोक्षदे, हे देवी, हे सुंदरी, प्रसन्न हो."
"हे पापनाशक, अग्निशिखोपमे, हे ब्रह्मतेजपुरे, हे देवी प्रसन्न हो. शरीराने, मनाने, वाणीने पुरुष पाप करतो. ते तुझे स्मरण केल्यास भस्म होते."
असे म्हणून ब्रह्मदेव स्वस्थ उभा राहिला. त्यानंतर प्रसन्न होऊन सावित्री ब्रह्मलोकी गेली.
अशारीतीने अश्वपती राजानेही स्तवन केले. तेव्हा तिने दर्शन दिले. त्याची कामना पूर्ण झाली. संध्या केल्यावर जो तिचे स्तवन करतो, त्याला वेदपठणाचे फल मिळते.