श्रीनारायण उवाच
धर्मध्वजस्य पत्नी माधवीति च विश्रुता ।
नृपेण सार्धं सारामे रेमे च गन्धमादने ॥ १ ॥
शय्यां रतिकरीं कृत्वा पुष्पचन्दनचर्चिताम् ।
चन्दनालिप्तसर्वाङ्गीं पुष्पचन्दनवायुना ॥ २ ॥
स्त्रीरत्नमतिचार्वङ्गी रत्नभूषणभूषिता ।
कामुकी रसिका सृष्टा रसिकेन च संयुता ॥ ३ ॥
सुरते विरतिर्नास्ति तयोः सुरतिविज्ञयोः ।
गतं देववर्षशतं न ज्ञातं च दिवानिशम् ॥ ४ ॥
ततो राजा मतिं प्राप्य सुरताद्विरराम च ।
कामुकी सुन्दरी किञ्चिन्न च तृप्तिं जगाम सा ॥ ५ ॥
दधार गर्भं सा सद्यो दैवादब्दशतं सती ।
श्रीगर्भा श्रीयुता सा च सम्बभूव दिने दिने ॥ ६ ॥
शुभे क्षणे शुभदिने शुभयोगे च संयुते ।
शुभलग्ने शुभांशे च शुभस्वामिग्रहान्विते ॥ ७ ॥
कार्तिकीपूर्णिमायां तु सितवारे च पाद्मज ।
सुषाव सा च पद्मांशां पद्मिनीं तां मनोहराम् ॥ ८ ॥
शरत्पार्वणचन्द्रास्यां शरत्पङ्कजलोचनाम् ।
पक्वबिम्बाधरोष्ठीं च पश्यन्तीं सस्मितां गृहम् ॥ ९ ॥
हस्तपादतलारक्तां निम्ननाभिं मनोरमाम् ।
तदधस्त्रिवलीयुक्तां नितम्बयुगवर्तुलाम् ॥ १० ॥
शीते सुखोष्णसर्वाङ्गीं ग्रीष्मे च सुखशीतलाम् ।
श्यामां सुकेशीं रुचिरां न्यग्रोधपरिमण्डलाम् ॥ ११ ॥
पीतचम्पकवर्णाभां सुन्दरीष्वेव सुन्दरीम् ।
नरा नार्यश्च तां दृष्ट्वा तुलनां दातुमक्षमाः ॥ १२ ॥
तेन नाम्ना च तुलसीं तां वदन्ति मनीषिणः ।
सा च भूयिष्ठमानेन योग्या स्त्री प्रकृतिर्यथा ॥ १३ ॥
सर्वैर्निषिद्धा तपसे जगाम बदरीवनम् ।
तत्र देवाब्दलक्षं च चकार परमं तपः ॥ १४ ॥
मनसा नारायणः स्वामी भवितेति च निश्चिता ।
ग्रीष्मे पञ्चतपाः शीते तोयवस्त्रा च प्रावृषि ॥ १५ ॥
आसनस्था वृष्टिधाराः सहन्तीति दिवानिशम् ।
विंशत्सहस्रवर्षं च फलतोयाशना च सा ॥ १६ ॥
त्रिंशत्सहस्रवर्षं च पत्राहारा तपस्विनी ।
चत्वारिंशत्सहस्राब्दं वाय्वाहारा कृशोदरी ॥ १७ ॥
ततो दशसहस्राब्दं निराहारा बभूव सा ।
निर्लक्ष्यां चैकपादस्थां दृष्ट्वा तां कमलोद्भवः ॥ १८ ॥
समाययौ वरं दातुं परं बदरिकाश्रमम् ।
चतुर्मुखं च सा दृष्ट्वा ननाम हंसवाहनम् ॥ १९ ॥
तामुवाच जगत्कर्ता विधाता जगतामपि ।
ब्रह्मोवाच
वरं वृणीष्व तुलसि यत्ते मनसि वाच्छितम् ॥ २० ॥
हरिभक्तिं हरेर्दास्यमजरामरतामपि ।
तुलस्युवाच
शृणु तात प्रवक्ष्यामि यन्मे मनसि वाञ्छितम् ॥ २१ ॥
सर्वज्ञस्यापि पुरतः का लज्जा मम साम्प्रतम् ।
अहं तु तुलसी गोपी गोलोकेऽहं स्थिता पुरा ॥ २२ ॥
कृष्णप्रिया किंकरी च तदंशा तत्सखी प्रिया ।
गोविन्दरतिसम्भुक्तामतृप्तां मां च मूर्च्छिताम् ॥ २३ ॥
रासेश्वरी समागत्य ददर्श रासमण्डले ।
गोविन्दं भर्त्सयामास मां शशाप रुषान्विता ॥ २४ ॥
याहि त्वं मानवीं योनिमित्येवं च शशाप ह ।
मामुवाच स गोविन्दो मदंशं च चतुर्भुजम् ॥ २५ ॥
लभिष्यसि तपस्तप्त्वा भारते ब्रह्मणो वरात् ।
इत्येवमुक्त्वा देवेशोऽप्यन्तर्धानं चकार सः ॥ २६ ॥
देव्या भिया तनुं त्यक्त्वा प्राप्तं जन्म गुरो भुवि ।
अहं नारायणं कान्तं शान्तं सुन्दरविग्रहम् ॥ २७ ॥
साम्प्रतं तं पतिं लब्धुं वरये त्वं च देहि मे ।
ब्रह्मदेव उवाच
सुदामा नाम गोपश्च श्रीकृष्णाङ्गसमुद्भवः ॥ २८ ॥
तदंशश्चातितेजस्वी लेभे जन्म च भारते ।
साम्प्रतं राधिकाशापाद्दनुवंशसमुद्भवः ॥ २९ ॥
शङ्खचूडेति विख्यातस्त्रैलोक्ये न च तत्समः ।
गोलोके त्वां पुरा दृष्ट्वा कामोन्मथितमानसः ॥ ३० ॥
विलम्भितुं न शशाक राधिकायाः प्रभावतः ।
स च जातिस्मरस्तस्मात्सदामाभूच्च सागरे ॥ ३१ ॥
जातिस्मरा त्वमपि सा सर्वं जानासि सुन्दरि ।
अधुना तस्य पत्नी त्वं सम्भविष्यसि शोभने ॥ ३२ ॥
पश्चान्नारायणं शान्तं कान्तमेव वरिष्यसि ।
शापान्नारायणस्यैव कलया दैवयोगतः ॥ ३३ ॥
भविष्यसि वृक्षरूपा त्वं पूता विश्वपावनी ।
प्रधाना सर्वपुष्पेषु विष्णुप्राणाधिका भवेः ॥ ३४ ॥
त्वया विना च सर्वेषां पूजा च विफला भवेत् ।
वृन्दावने वृक्षरूपा नाम्ना वृन्दावनीति च ॥ ३५ ॥
त्वत्पत्रैर्गोपिगोपाश्च पूजयिष्यन्ति माधवम् ।
वृक्षाधिदेवीरूपेण सार्धं कृष्णेन सन्ततम् ॥ ३६ ॥
विहरिष्यसि गोपेन स्वच्छन्दं मद्वरेण च ।
इत्येवं वचनं श्रुत्वा सस्मिता हृष्टमानसा ॥ ३७ ॥
प्रणनाम च ब्रह्माणं तं च किञ्चिदुवाच सा ।
तुलस्युवाच
यथा मे द्विभुजे कृष्णे वाञ्छा च श्यामसुन्दरे ॥ ३८ ॥
सत्यं ब्रवीमि हे तात न तथा च चतुर्भुजे ।
अतृप्ताहं च गोविन्दे दैवाच्छृङ्गारभङ्गतः ॥ ३९ ॥
गोविन्दस्यैव वचनात्प्रार्थयामि चतुर्भुजम् ।
त्वत्प्रसादेन गोविन्दं पुनरेव सुदुर्लभम् ॥ ४० ॥
ध्रुवमेव लभिष्यामि राधाभीतिं प्रमोचय ।
ब्रह्यदेव उवाच
गृहाण राधिकामन्त्रं ददामि षोडशाक्षरम् ॥ ४१ ॥
तस्याश्च प्राणतुल्या त्वं मद्वरेण भविष्यसि ।
शृङ्गारं युवयोर्गोप्यं न ज्ञास्यति च राधिका ॥ ४२ ॥
राधासमा त्वं सुभगे गोविन्दस्य भविष्यसि ।
इत्येवमुक्त्वा दत्त्वा च देव्या वै षोडशाक्षरम् ॥ ४३ ॥
मन्त्रं चैव जगद्धाता स्तोत्रं च कवचं परम् ।
सर्वं पूजाविधानं च पुरश्चर्याविधिक्रमम् ॥ ४४ ॥
परां शुभाशिषं चैव पूजां चैव चकार सा ।
बभूव सिद्धा सा देवी तत्प्रसादाद्रमा यथा ॥ ४५ ॥
सिद्धं मन्त्रेण तुलसी वरं प्राप यथोदितम् ।
बुभुजे च महाभोगं यद्विश्वेषु च दुर्लभम् ॥ ४६ ॥
प्रसन्नमनसा देवी तत्याज तपसः क्लमम् ।
सिद्धे फले नराणां च दुःखं च सुखमुत्तमम् ॥ ४७ ॥
भुक्त्या पीत्वा च सन्तुष्टा शयनं च चकार सा ।
तल्पे मनोरमे तत्र पुष्पचन्दनचर्चिते ॥ ४८ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे नारायणनारदसंवादे
धर्मध्वजसुतातुलस्युपाख्यानवर्णनं नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥
तुलसीला वरप्राप्ती -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्री नारायणमुनी म्हणाले, "धर्मध्वजाची पत्नी माधवी या नावाने प्रसिद्ध होती. गंधमादन पर्वतावर ती राजासह क्रीडा करण्यात रममाण झाली होती. पुष्पे व चंदन यांनी युक्त अशा सुखकर शय्येवर ती चंदनाची उटी चर्चून पुष्पे व चंदन यांच्या वायूने आनंदित होत असे. ती माधवी म्हणजे स्त्रियांतीत एक रत्नच होय. शिवाय ती विविध रत्नालंकारांनी विभूषित होती."
ती कामुक होती. ती स्वतः रसिक असून रसिक पतीशी तिचा संयोग घडला होता. ते दोघेही सुरतामध्ये निपुण होते. त्यामुळे त्यांना सुरतक्रीडेचा कंटाळा कधीच आला नाही. अशाप्रकारे देवांची शंभर वर्षे लोटली, पण त्यांना दिवस अथवा रात्र केव्हा उलटली हेही समजले नाही. अखेर शेवटी राजालाच सुविचार सुचला व तो सुरतापासून विराम पावला. पण ती सुंदरी मात्र तृप्त झाली नाही.
दैवयोगाने शंभर वर्षेपर्यंत तिने गर्भ धारण केला. ती दिवसानुदिवस कांतीमान भासू लागली. तो गर्भही कांतीने तेजस्वी दिसू लागला. एके दिवशी शुभ वेळी, शुभयोग असताना, शुभ लग्नावर, शुभ अंशी, शुभ स्वामी व शुभ ग्रह असताना, कार्तिकी पौर्णिमेला शुक्रवारी तिच्या पोटी सुंदर अशा पद्मिनीचा जन्म झाला. शरदातील चंद्राप्रमाणे तिचे मुख होते. तसेच नेत्र कमलाप्रमाणे होते. पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे तिचे ओष्ठद्वय मधुर होते. अत्यंत स्मित करीत ती पहात होती. तिच्या हातापायांचे तळवे लाल होते. नाभी मनोरम व खोली होती. त्याच्याखाली त्रिवलीयुक्त व वर्तुळाकार नितंब होते. उष्ण शरीरामुळे थंडीच्या दिवसात ती सुखप्रद होती, तर उन्हाळ्यात ती शीतल होत असे. तिचा केशालाप काळाभोर व सुंदर होता. वडाच्या पारंब्याप्रमाणे तिचे केस लांब होते
पिवळ्या चाफ्याप्रमाणे तिची अंगकांती सतेज होती. ती सर्वच स्त्रियांमध्ये अत्यंत सुंदर होती. तिच्या सौंदर्याला उपमा देण्यास कोणीही समर्थ नव्हते. म्हणून प्रज्ञावंत लोक तिला तुलसी म्हणू लागले. ती प्रकृतीप्रमाणे यथायोग्यच होती. तिचे सर्वांनी निवारण केले तरीही ती तप करण्यासाठी बदरीवनात निघून गेली.
बदरीवनात तिने देवांची तीन लक्ष वर्षे उग्र तप केले. तेव्हा नारायण आपला स्वामी होणार याविषयी तिच्या मनाची खात्री झाली. ती ग्रीष्म पंचाग्नी साधन करीत असे. हिवाळ्यात भिजलेल्या वस्त्राने ती अहोरात्र पाण्यात उभी राही. शरीरावरचे वस्त्र सुकू नये म्हणून ती सारखी स्नान करीत असे. पावसाळ्यात अहोरात्र ती जलवर्षावाखाली रहात असे. वीस हजार वर्षे तिने केवळ फलाहार व जल यावर आपला निर्वाह केला. नंतर तीस हजार वर्षे ती पानांचा आहार घेत होती. नंतरची चाळीस हजार वर्षे तिने वायु भक्षण करून आपले तप केले. अखेरची दहा हजार वर्षे ती निराहार राहिली.
एक लक्ष वर्षे ती पाण्यात एका पायावर उभी राहिली. हे पाहून तो कमलोद्भव ब्रह्मदेव तिला वर देण्यासाठी त्या ठिकाणी आला. त्या हंसारूढ ब्रह्मदेवाला तिने वंदन केले. तेव्हा तो जगत्कर्ता तिला म्हणाला, "हे तुलसी, वर माग. तुला हरिभक्ती अथवा हरीची सेवा अथवा अजरामरत्त्व यापैकी कोणताही अपेक्षित वर माग."
तुलसी म्हणाली, "हे तात, माझे मनोरथ मी सांगते. कारण आपण सर्वज्ञ आहात. तेव्हा लज्जा धरून उपयोग काय ? मी तुलसी नावाची गोपी आहे. मी पूर्वजन्मी गोलोकी होते. मी कृष्णप्रिया असून त्याची दासी होते. त्याच्या अंशभूत व त्याची सखी होते. त्या गोविंदाच्या रतिसुखाचा उपभोग मी घेतला आहे. पण माझी तृप्ती न झाल्यामुळे मला मूर्च्छा आली.
त्या अवस्थेत त्या रासेश्वरीने मला तेथे रासमंडपात अवलोकन केले. तेव्हा तिने गोविंदाची निर्भर्त्सना केली व मलाही रागाने शाप दिला. ती म्हणाली, "तू मानव योनीत जन्म घे."
तेव्हा तो गोविंद म्हणाला, "हे प्रिये, माझा जो अंश चतुर्भुजात्मक आहे तो ब्रह्मदेवाच्या वरामुळे तुला भारतवर्षात प्राप्त होईल." एवढे शब्द उच्चारून श्रीकृष्ण गुप्त झाले. तेव्हा हे गुरो, म्हणून मी तो देह भयभीत होऊन टाकून दिला आणि भूलोकी जन्म घेताना आता यावेळी तो सुंदर शांत, सुस्वरूप असा नारायण पती मला मिळावा असा मला वर द्या."
ब्रह्मदेव म्हणाला, "श्रीकृष्णाच्या अंशापासून उत्पन्न झालेला सुदामा नावाचा गोप आहे. त्याचा अतिशय तेजस्वी अंश, राधेच्या शापामुळे भारतवर्षात दतुवंशात जन्मला आहे. तो सांप्रत शंखचूड या नावाने प्रसिद्ध आहे. या त्रैलोक्यात त्याच्यासारखा कोणीही नाही.
गोलोकी असताना तुला पाहून त्याचे मन कामविव्हल होऊन गेले. पण राधेच्या प्रभावामुळे तो तुला आलिंगन देऊ शकला नाही. त्याला पूर्व जन्मचे स्मरण असून तो सुदामा सागरात उत्पन्न झाला. तसेच तुलाही पूर्वस्मरण असल्याने तू सर्व जाणतेच आहेस.
म्हणून हे शोभने, तू त्याची पत्नी होशील. त्यामुळे सुंदर, शांत नारायणाची तुला प्राप्ती होईल. दैवगतीने नारायणाचा शाप होऊन तू वृक्षरूप होशील. पण तू सर्वांना पावन करशील. त्यामुळे पुष्पात मान्य होऊन तू विष्णुप्रिया होशील. इतकेच नव्हे तर तुझ्यावाचून विष्णूची पूजा व्यर्थ होईल.
तू वृंदावनात वृक्ष होऊन वृंदावनी या नावाने विख्यात होशील. तुझ्या पत्रांनी सर्वजण त्या माधवाची पूजा करतील. माझ्या वराने तू वृक्षांची अधिदेवता होऊन श्रीगोपालकृष्णाबरोबर यथेच्छ क्रीडा करशील."
अशाप्रकारे ब्रह्मदेवाचे बोलणे ऐकून तिने आनंदाने ब्रह्मदेवाला वंदन केले. ती म्हणाली, "हे तात, मी आता खरे तेच सांगते. मला त्या द्विभुज अशा शामसुंदर कृष्णाचीच इच्छा आहे, तशी चतुर्भुजाचेविषयी मला नाही. दैवगतीने शृंगाराचा भंग झाला. मी गोविंदाविषयी अतृप्त राहिले आहे. त्याच्याच इच्छेवरून मी आता आपणाला प्रार्थना करीत आहे. हे देवा, तुझ्या प्रसादाने दुर्लभ अशा गोविंदाची मला प्राप्ती होईल. तेव्हा तसेच कर."
ब्रह्मदेव म्हणाला, "हे सुंदरी, मी आता तुला षोडशाक्षरी राधिका मंत्र सांगतो. त्यामुळे तू राधिकेची प्राणप्रिया होशील. तुमचा शृंगार गुप्त राहून राधेला तो समजणारही नाही.
हे भाग्यवती, "तू गोविंदाला राधेप्रमाणे प्रिय होशील." असे सांगून ब्रह्मदेवाने देवीचा षोडशाक्षरी मंत्र तुलसीला सांगितला. त्याचे कवच, स्तोत्र, पुरश्चरणविधी हे सर्व सांगून तिला उत्तम आशिर्वाद दिला. तेव्हा तिने त्याचे पूजन केले. त्यामुळे ती देवी रमेप्रमाणे दिसू लागली. मंत्रामुळे तुलसीला विश्वात दुर्लभ असा पती मिळाला. या ब्रह्मांडातील अद्भुत भोग तिने भोगले. तिचे मन प्रसन्न होऊन तिने क्लेश टाकून दिले. फलसिद्धिमुळे माणसाचे क्लेश हे उत्तम सुखाचे साधन होतात. खाऊन पिऊन संतुष्ट मनाने ती पुष्पे माळून, चंदन चर्चून उत्तम शय्येवर शयन करीत असें.