श्रीनारायण उवाच
लक्ष्मीं तौ च समाराध्य चोग्रेण तपसा मुने ।
वरमिष्टं च प्रत्येकं सम्प्रापतुरभीप्सितम् ॥ १ ॥
महालक्ष्मीवरेणैव तौ पृथ्वीशौ बभूवतुः ।
पुण्यवन्तौ पुत्रवन्तौ धर्मध्वजकुशध्वजौ ॥ २ ॥
कुशध्वजस्य पत्नी च देवी मालावती सती ।
सा सुषाव च कालेन कमलांशां सुतां सतीम् ॥ ३ ॥
सा च भूयिष्ठकालेन ज्ञानयुक्ता बभूव ह ।
कृत्वा वेदध्वनिं स्पष्टमुत्तस्थौ सूतिकागृहात् ॥ ४ ॥
वेदध्वनिं सा चकार जातमात्रेण कन्यका ।
तस्मात्तां च वेदवतीं प्रवदन्ति मनीषिणः ॥ ५ ॥
जातमात्रेण सुस्नाता जगाम तपसे वनम् ।
सर्वैर्निषिद्धा यत्नेन नारायणपरायणा ॥ ६ ॥
एकमन्वन्तरं चैव पुष्करे च तपस्विनी ।
अत्युग्रां च तपस्यां च लीलया हि चकार सा ॥ ७ ॥
तथापि पुष्टा न क्लिष्टा नवयौवनसंयुता ।
सुश्राव सा च सहसा सुवाचमशरीरिणीम् ॥ ८ ॥
जन्मान्तरे च ते भर्ता भविष्यति हरिः स्वयम् ।
ब्रह्मादिभिर्दुराराध्यं पतिं लप्स्यसि सुन्दरि ॥ ९ ॥
इति श्रुत्वा च सा हृष्टा चकार ह पुनस्तपः ।
अतीव निर्जनस्थाने पर्वते गन्धमादने ॥ १० ॥
तत्रैव सुचिरं तप्त्वा विश्वस्य समुवास सा ।
ददर्श पुरतस्तत्र रावणं दुर्निवारणम् ॥ ११ ॥
दृष्ट्वा सातिथिभक्त्या च पाद्यं तस्मै ददौ किल ।
सुस्वादुभूतं च फलं जलं चापि सुशीतलम् ॥ १२ ॥
तच्च भुक्त्वा स पापिष्ठश्चोवास तत्समीपतः ।
चकार प्रश्नमिति तां का त्वं कल्याणि वर्तसे ॥ १३ ॥
तां दृष्ट्वा स वरारोहां पीनश्रोणिपयोधराम् ।
शरत्पद्मोत्सवास्यां च सस्मितां सुदतीं सतीम् ॥ १४ ॥
मूर्च्छामवाप कृपणः कामबाणप्रपीडितः ।
स करेण समाकृष्य शृङ्गारं कर्तुमुद्यतः ॥ १५ ॥
सती चुकोप दृष्ट्वा तं स्तम्भितं च चकार ह ।
स जडो हस्तपादैश्च किञ्चिद्वक्तुं न च क्षमः ॥ १६ ॥
तुष्टाव मनसा देवीं प्रययौ पद्मलोचनाम् ।
सा तुष्टा तस्य स्तवनं सुकृतं च चकार ह ॥ १७ ॥
सा शशाप मदर्थे त्वं विनंक्ष्यसि सबान्धवः ।
स्पृष्टाहं च त्वया कामाद् बलं चाप्यवलोकय ॥ १८ ॥
इत्युक्त्वा सा च योगेन देहत्यागं चकार ह ।
गङ्गायां तां च संन्यस्य स्वगृहं रावणो ययौ ॥ १९ ॥
अहो किमद्भुतं दृष्टं किं कृतं वानयाधुना ।
इति सञ्चिन्त्य सञ्चिन्त्य विललाप पुनः पुनः ॥ २० ॥
सा च कालान्तरे साध्वी बभूव जनकात्मजा ।
सीतादेवीति विख्याता यदर्थे रावणो हतः ॥ २१ ॥
महातपस्विनी सा च तपसा पूर्वजन्मतः ।
लेभे रामं च भर्तारं परिपूर्णतमं हरिम् ॥ २२ ॥
सम्प्राप तपसाऽऽराध्य दुराराध्यं जगत्पतिम् ।
सा रमा सुचिरं रेमे रामेण सह सुन्दरी ॥ २३ ॥
जातिस्मरा न स्मरति तपसश्च क्लमं पुरा ।
सुखेन तज्जहौ सर्वं दुःखं चापि सुखं फले ॥ २४ ॥
नानाप्रकारविभवं चकार सुचिरं सती ।
सम्प्राप्य सुकुमारं तमतीव नवयौवना ॥ २५ ॥
गुणिनं रसिकं शान्तं कान्तं देवमनुत्तमम् ।
स्त्रीणां मनोज्ञं रुचिरं तथा लेभे यथेप्सितम् ॥ २६ ॥
पितुः सत्यपालनार्थं सत्यसन्धो रघूद्वहः ।
जगाम काननं पश्चात्कालेन च बलीयसा ॥ २७ ॥
तस्थौ समुद्रनिकटे सीतया लक्ष्मणेन च ।
ददर्श तत्र वह्निं च विप्ररूपधरं हरिः ॥ २८ ॥
रामं च दुःखितं दृष्ट्वा स च दुःखी बभूव ह ।
उवाच किञ्चित्सत्येष्टं सत्यं सत्यपरायणः ॥ २९ ॥
द्विज उवाच
भगवच्छ्रूयतां राम कालोऽयं यदुपस्थितः ।
सीताहरणकालोऽयं तवैव समुपस्थितः ॥ ३० ॥
दैवं च दुर्निवार्यं च न च दैवात्परो बली ।
जगत्प्रसूं मयि न्यस्य छायां रक्षान्तिकेऽधुना ॥ ३१ ॥
दास्यामि सीतां तुभ्यं च परीक्षासमये पुनः ।
देवैः प्रस्थापितोऽहं च न च विप्रो हुताशनः ॥ ३२ ॥
रामस्तद्वचनं श्रुत्वा न प्रकाश्य च लक्ष्मणम् ।
स्वीकारं वचसश्चक्रे हृदयेन विदूयता ॥ ३३ ॥
वह्निर्योगेन सीताया मायासीतां चकार ह ।
तत्तुल्यगुणसर्वाङ्गां ददौ रामाय नारद ॥ ३४ ॥
सीतां गृहीत्वा स ययौ गोप्यं वक्तुं निषिध्य च ।
लक्ष्मणो नैव बुबुधे गोप्यमन्यस्य का कथा ॥ ३५ ॥
एतस्मिन्नन्तरे रामो ददर्श कानकं मृगम् ।
सीता तं प्रेरयामास तदर्थे यत्नपूर्वकम् ॥ ३६ ॥
संन्यस्य लक्ष्मणं रामो जानक्या रक्षणे वने ।
स्वयं जगाम तूर्णं तं विव्याध सायकेन च ॥ ३७ ॥
लक्ष्मणेति च शब्दं स कृत्वा च मायया मृगः ।
प्राणांस्तत्याज सहसा पुरो दृष्ट्वा हरिं स्मरन् ॥ ३८ ॥
मृगदेहं परित्यज्य दिव्यरूपं विधाय च ।
रत्ननिर्माणयानेन वैकुण्ठं स जगाम ह ॥ ३९ ॥
वैकुण्ठलोकद्वार्यासीत्किङ्करो द्वारपालयोः ।
पुनर्जगाम तद्द्वारमादेशाद् द्वारपालयोः ॥ ४० ॥
अथ शब्दं च सा श्रुत्वा लक्ष्मणेति च विक्लवम् ।
तं हि सा प्रेरयामास लक्ष्मणं रामसन्निधौ ॥ ४१ ॥
गते च लक्ष्मणे रामं रावणो दुर्निवारणः ।
सीतां गृहीत्वा प्रययौ लङ्कामेव स्वलीलया ॥ ४२ ॥
विषसाद च रामश्च वने दृष्ट्वा च लक्ष्मणम् ।
तूर्णं च स्वाश्रमं गत्वा सीतां नैव ददर्श सः ॥ ४३ ॥
मूर्च्छां सम्प्राप सुचिरं विललाप भृशं पुनः ।
पुनः पुनश्च बभ्राम तदन्वेषणपूर्वकम् ॥ ४४ ॥
कालेन प्राप्य तद्वार्तां गोदावरीनदीतटे ।
सहायान्वानरात्कृत्वा बबन्ध सागरं हरिः ॥ ४५ ॥
लङ्कां गत्वा रघुश्रेष्ठो जघान सायकेन च ।
कालेन प्राप्य तं हत्वा रावणं बान्धवैः सह ॥ ४६ ॥
तां च वह्निपरीक्षां च कारयामास सत्वरम् ।
हुताशस्तत्र काले तु वास्तवीं जानकीं ददौ ॥ ४७ ॥
उवाच छाया वह्निं च रामं च विनयान्विता ।
करिष्यामीति किमहं तदुपायं वदस्व मे ॥ ४८ ॥
श्रीरामाग्नी ऊचतुः
त्वं गच्छ तपसे देवि पुष्करं च सुपुण्यदम् ।
कृत्वा तपस्या तत्रैव स्वर्गलक्ष्मीर्भविष्यसि ॥ ४९ ॥
सा च तद्वचनं श्रुत्वा प्रतप्य पुष्करे तपः ।
दिव्यं त्रिलक्षवर्षं च स्वर्गलक्ष्मीर्बभूव ह ॥ ५० ॥
सा च कालेन तपसा यज्ञकुण्डसमुद्भवा ।
कामिनी पाण्डवानां च द्रौपदी द्रुपदात्मजा ॥ ५१ ॥
कृते युगे वेदवती कुशध्वजसुता शुभा ।
त्रेतायां रामपत्नी च सीतेति जनकात्मजा ॥ ५२ ॥
तच्छाया द्रौपदी देवी द्वापरे द्रुपदात्मजा ।
त्रिहायणी च सा प्रोक्ता विद्यमाना युगत्रये ॥ ५३ ॥
नारद उवाच
प्रियाः पञ्च कथं तस्या बभूवुर्मुनिपुङ्गव ।
इति मच्चित्तसंदेहं भञ्ज संदेहभञ्जन ॥ ५४ ॥
श्रीनारायण उवाच
लङ्कायां वास्तवी सीता रामं सम्प्राप नारद ।
रूपयौवनसम्पन्ना छाया च बहुचिन्तया ॥ ५५ ॥
रामाग्न्योराज्ञया तप्तुमुपास्ते शङ्करं परम् ।
कामातुरा पतिव्यग्रा प्रार्थयन्ती पुनः पुनः ॥ ५६ ॥
पतिं देहि पतिं देहि पतिं देहि त्रिलोचन ।
पतिं देहि पतिं देहि पञ्चवारं चकार सा ॥ ५७ ॥
शिवस्तत्प्रार्थनां श्रुत्वा प्रहस्य रसिकेश्वरः ।
प्रिये तव प्रियाः पञ्च भविष्यन्ति वरं ददौ ॥ ५८ ॥
तेन सा पाण्डवानां च बभूव कामिनी प्रिया ।
इति ते कथितं सर्वं प्रस्तावं वास्तवं शृणु ॥ ५९ ॥
अथ सम्प्राप्य लङ्कायां सीतां रामो मनोहराम् ।
विभीषणाय तां लङ्कां दत्त्वायोध्यां ययौ पुनः ॥ ६० ॥
एकादशसहस्राब्दं कृत्वा राज्यं च भारते ।
जगाम सर्वैर्लोकैश्च सार्धं वैकुण्ठमेव च ॥ ६१ ॥
कमलांशा वेदवती कमलायां विवेश सा ।
कथितं पुण्यमाख्यानं पुण्यदं पापनाशनम् ॥ ६२ ॥
सततं मूर्तिमन्तश्च वेदाश्चत्वार एव च ।
सन्ति यस्याश्च जिह्वाग्रे सा च वेदवती श्रुता ॥ ६३ ॥
धर्मध्वजसुताख्यानं निबोध कथयामि ते ॥ ६४ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे महालक्षम्या वेदवतीरूपेण
राजगृहे जन्मवर्णनं नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥
महालक्ष्मीचा जन्म -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्री नारायण म्हणाले, "हे मुने, उग्र तप करून लक्ष्मीची त्या राजांनी उत्तराधना केली. त्यामुळे प्रत्येकाला मनोरथ पूर्ण करणारा वर मिळाला. धर्मध्वज व कुशध्वज दोघेही महालक्ष्मीच्या वरदानामुळे पृथ्वीपती झाले. तसेच ते पुत्रवान झाले. कुशध्वजाला मालावती नावाची सती देवी पत्नी होती. तिला कमलेची अंशभूत अशी सुंदर कन्या झाली.
जन्मतःच ती ज्ञानयुक्त होऊन तिने वेदांचा स्पष्टपणे उच्चार केला व ती बाळंतिणीच्या गृहातून सत्वर बाहेर पडली. जन्मतःच त्या मुलीने वेदांचा उदघोष केला. त्यामुळे सूज्ञ लोक तिला वेदवती म्हणतात.
जन्म होताच नारायणाची उपासना करण्यात ती तत्पर होती. प्रथमच उत्तम प्रकारे सुस्नात झाल्यावर तिच्या वेदघोषाचा सर्वांनी निषेध केला. पण तरीही ती तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेली. तिने एक मन्वंतर कालपर्यंत त्या पुष्करतीर्थावर दारूण तप केले. तरीही ती सुदृढ व नवयौवनसंपन्न होती. तिला कधीही क्लेश झाले नाहीत. तोच तिने आकाशवाणी ऐकली -
"हे सुंदरी, ब्रह्मदेव वगैरे देवांनाही ज्याची आराधना करणे शक्य नाही असा पती तुला लाभेल, म्हणजे दुसर्या जन्मी स्वतः हरीच तुझा पती होईल."
ही आकाशवाणी ऐकून अत्यंत आनंदित झालेल्या सुंदरीने गंधमादन पर्वतावर जाऊन उग्र तप केले. आकाशवाणीवर विश्वास ठेवून तिने तेथेच वास्तव्य केले. तेथे तिला क्रूरात्मा रावण दृष्टीस पडला.
तिने अतिथीप्रमाणे त्याला मानून त्याची अर्ध्यपाद्यादि उपचारांनी व त्याला सात्त्विक फले देऊन पूजा केली. त्याला शीतल उदक दिले. ते सर्व भक्षण केल्यावर तो दुरात्मा तिच्याजवळ उभा राहिला. तो म्हणाला, "हे कल्याणी, तू खरोखरच कोण आहेस ?"
त्यावेळी जी रमणीय असून जिची श्रोणी व पयोधर पुष्ट आहेत, जिचे मुख शरद्कालीन कमलाप्रमाणे प्रसन्न आहे, जी किंचित हास्य करीत आहे, जिचे दात सुंदर आहेत अशा त्या सुंदर कन्येला अवलोकन करून तो मूढमती कामबाणांनी पीडित झाला व मूर्च्छित होऊन खाली कोसळला. त्याने हाताने तिला जवळ ओढले. तो क्रीडा करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे ती सती क्रुद्ध झाली. तिने त्याला सत्वर खांबाप्रमाणे करून टाकले. त्यामुळे त्याचे हातपाय जड झाले. त्याला नीट बोलताही येईना. तेव्हा मनातल्या मनातच त्याने देवीची स्तुती केली. त्या कमलनयनेकडे जाऊन त्याने तिचे स्तवन केले. तेव्हा ती म्हणाली,
"माझ्यासाठी तू कुलासह नाश पावशील. तू मला कामविव्हल होऊन स्पर्श केलास. आता माझे सामर्थ्य तू अवलोकन कर.
असे सांगून तिने योगबलाने सत्वर देहत्याग केला. तिचे शरीर गंगेच्या प्रवाहात सोडून रावण स्वस्थानी निघून गेला.
"खरोखरच मी आज केवढा चमत्कार पाहिला ! काय केले या सतीने हे ?" असे म्हणून तो वारंवार रडू लागला. ती साध्वी पुढे जनककन्या म्हणून उदयास आली. तिला सीतादेवी हे नाव प्राप्त होऊन तिच्यासाठीच रावणाचा नाश झाला. पूर्वजन्मीच्या तपामुळे तिला हरीचा अवतार असलेला रामच पती मिळाला.
सर्व प्राण्यांनी आराधना करण्यास योग्य व तामसी जनांना दुराराध्य अशा या जगत्पतीची तिला प्राप्ती झाली. ती सुंदरी रमा पुष्कळ कालपर्यंत त्या रामाशी रममाण झाली. तिला पूर्व जन्मीचे स्मरण होतेच. पण त्यावेळच्या क्लेशांचे स्मरण ती करीत नसे. सांप्रतच्या सुखामुळे ती ते दुःख विसरली होती.
हे नारदा, उत्तम फल मिळाले म्हणजे पूर्वीच्या दुःखांचेही सुखच होते. त्या सतीने सीतेच्या स्वरूपात विविध प्रकारच्या वैभवाचा भोग घेतला. अतिशय नवयौवना अशा तिला सुकुमार, गुणी, रसिक, शांत, सुंदर, अत्युत्तम, देवाधिदेव, स्त्रियांचे मनहरण करणारा जसा हवा असतो तसा पती मिळाला.
पुढे बराच कालावधी लोटल्यावर पित्याचे वचन सत्य करण्यासाठी तो सत्यवचनी प्रभु रामचंद्र वनवासात गेला. सीता, लक्ष्मण यांसह तो समुद्रकिनार्याच्या काठावर राहू लागला. अग्नीने ब्राह्मणरूपाने त्याला पाहिले. रामाच्या दुःखामुळे त्यालाही दुःख झाले. तो अग्नीनारायण त्याला त्यावेळी इष्ट असे काही म्हणाला, "हे भगवान रामचंद्रा, सांप्रत कोणती कालगती येऊन ठेपली आहे ते ऐक. तुझ्या सीताहरणाचा काल आला आहे. दैवाचे निवारण करता येत नाही. म्हणून आता तू त्या भूमीकन्येला माझ्या स्वाधीन कर आणि तिची छाया
तू स्वतःजवळ ठेव. परीक्षेची वेळ येईल तेव्हा तुझी सीता मी तुला परत देईन. देवांनीच मला तुझ्याकडे पाठविले आहे. मीच तो साक्षात अग्नी आहे. ब्राह्मण नाही."
हे नारदा, त्या द्विजरूपी अग्नीच्या वचनाचा रामाने जड अंतःकरणाने स्वीकार केला. लक्ष्मणाला यातले त्याने काही एक सांगितले नाही. त्या अग्नीने योगसामर्थ्यावर मायेनेच प्रतीसीता तयार केली. सर्व गुणांनी ती सीतेची प्रतीकृती त्याने रामाला अर्पण केली. नंतर ह्या गोष्टीची वाच्यता न करण्याविषयी अग्नीने बजावून सांगून तो निघून गेला. लक्ष्मणालाही ही गोष्ट समजली नाही.
त्याचवेळी राम व सीता यांनी पाहिलेल्या सुवर्णमृगाची जानकीने अपेक्षा केली. लक्ष्मणाला जानकीचे रक्षण करण्यास सांगून राम सुवर्णमृगाचा पाठलाग करू लागला. शेवटी तो हरीण तेथे मरण पावला. पण मरताना "हे लक्ष्मणा, धाव !" असे तो रामासारखा आवाज करून ओरडला. नंतर मृगाचे शरीर टाकून तो दिव्यरूप घेऊन विमानातून वैकुंठास निघून गेला. कारण हाच पूर्वी वैकुंठ लोकात द्वारपालांचा किंकर होता. तो पूर्वीच्या जागेवर येऊन प्राप्त झाला.
"हे लक्ष्मणा, धाव !" असा शब्द ऐकताच सीतेने लक्ष्मणाला रामाच्या मदतीस जाण्याची आज्ञा केली व त्याला पाठविले. लक्ष्मण तेथून गेलेला पाहून त्या दुरात्म्या रावणाने सीतेला लंकेत पळवून नेले. लक्ष्मणाला समोरून येत असल्याचे अवलोकन करताच रामाला खेद वाटला. आश्रमात येऊन पहाताच सीता नसल्याचे त्यांना आढळले. तेव्हा दोघेही तिचा शोध करू लागले. नंतर बराच काल उलटल्यावर सीता कोठे आहे याचा तपास लागला.
श्रीरामचंद्ररूपी हरीने नंतर गोदातीरावरील वानरांशी स्नेह संपादन केला. त्यांचे सहाय्य घेऊन समुद्रावर प्रचंड सेतु बांधला. नंतर लंकेस पोहचल्यावर रावणाशी युद्ध करून रामाने रावणाच्या आप्तेष्टांचा वध केला. शेवटी सीतेची अग्नीत परीक्षा पाहिली. तेव्हा अग्नीने खरी जानकी परत दिली. त्यावेळी ती छायारूपी सीता त्या ठिकाणी रामाला व अग्नीला म्हणाली -
"आता मी काय करावे याविषयी मला सांगा." तेव्हा श्रीरामचंद्र व अग्नी तिला म्हणाले, "हे देवी, अत्यंत पुण्यप्रद अशा पुष्करतीर्थावर जाऊन तू तप कर. तेथे तप केल्यावर तू स्वर्गातील लक्ष्मी होशील."
हे वचन ऐकून त्या देवीने देवांची तीन लक्ष वर्षे त्या पुष्करतीर्थावर उग्र तप केले. अखेरीस ती स्वर्गलक्ष्मी झाली. पुढे बर्याच कालावधीनंतर आपल्या तपःसामर्थ्याने ती द्रुपदाच्या यज्ञात उत्पन्न झाली व द्रौपदी या नावाने ती पांडवांची भार्या झाली. तीच कृतयुगामध्ये कुशध्वजाची कन्या वेदवती या नावाने प्रसिद्ध पावली. त्रेतायुगात ती सीता होती. तिची छाया ही द्रौपदी द्वापारात द्रुपदाची कन्या झाली. तीन युगात तिचे वास्तव्य झाले म्हणून ती त्रिहायणी या नावाने प्रसिद्ध आहे."
नारद म्हणाले, "हे मुनीश्रेष्ठा, तिला पाच पतींची प्राप्ती कशी झाली ? याबद्दल माझ्या मनात शंका आहे. आपणच माझा हा संदेह घालवू शकाल. कारण आपण माझ्या संदेहाचा नाश करण्यास समर्थ आहात."
त्यावर नारायणमुनी म्हणाले, "हे नारदा, खरी सीता रामाला लंकेत प्राप्त झाली व रूपयौवनसंपन्न छाया अत्यंत चिंता व्याप्त होऊन अग्नी व राम यांच्या आज्ञेवरून शंकराची तपःश्चर्या करू लागली. ती कामातुर होऊन पतीच्या प्राप्तीसाठी वारंवार प्रार्थना करू लागली. ती म्हणाली,
"हे त्रिलोचन, पती दे, पती दे." असे ती पाच वेळा म्हणाली. त्यावेळी त्या रसिक शंकराने, प्रसन्न होऊन तिला वर दिला. शंकर म्हणाला, "हे सुंदरी, तुला पाच पती प्राप्त होतील."
त्या वरामुळे ती पांडवांची आवडती भार्या झाली. हे नारदा, अशारीतीने मी तुला खरा प्रकार काय आहे हे सर्व निवेदन केले. आता मी तुला मूळ कथा सांगतो. लंकेत ती सुंदर सीता प्राप्त झाल्यावर बिभीषणाला लंकेचे राज्य परत देऊन राम अयोध्येस गेला. या भारतवर्षात अकरा हजार वर्षे राज्य केल्यावर तो सर्व लोकांसह वैकुंठास गेला. कमलेच्या अंशातून उत्पन्न झालेली वेदवती कमलेत प्रविष्ट झाली. हे नारदा, हे पुण्य फल देणारे आख्यान जो श्रवण करतो त्याला पुण्य लाभते. त्याचे पाप हरण होते. मूर्तिमंत चारी वेद तिच्या जिव्हाग्रावर होते म्हणून वेदवती या नावाने ती प्रसिद्ध झाली.
हे नारदा, आता मी तुला धर्मध्वजाच्या कन्येचे उत्तम आख्यान सांगतो, ऐक."