[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नारद म्हणाले, "हे महर्षे, ही तुलसी पूर्वजन्मात कोण होती ? ती कोठून उत्पन्न झाली ? ती साध्वी नारायणाला प्रिय कशी झाली ? कोणाच्या कुलात तिचा जन्म झाला ? सर्वेश्वर, प्रकृतीपर, निर्विकार, विश्वरूप, निष्क्रिय, नारायण, परब्रह्म, परमेश्वर, आराधना करण्यास योग्य, सर्वांचे कारण असा, सर्वज्ञ, सर्वांचा आधार, सर्वरूप व सर्वांचा परिपालक अशा त्या थोर पुरुषाची प्राप्ती तुलसीला कोणत्या तपामुळे झाली ? त्या देवीला वृक्षत्व का प्राप्त झाले ? त्या तपस्विनीला असुरांनी का ग्रासून टाकले ?
माझे अतिशय प्रेमळ मन हे समजून घेण्याची इच्छा करीत आहे. हे सर्व संशयांचा उच्छेद करणार्या नारायणा, माझा हा संशय घालविण्यास आपणच समर्थ आहात. तेव्हा आपण मला आता हे निवेदन करा."
नारदाचे भाषण ऐकून नारायण मुनी म्हणाले, "दक्ष सावर्णी मनू पुण्यवान, विष्णुभक्त, पवित्र, यशस्वी, कीर्तिमान, विष्णूच्या अंशापासून निर्माण झाला होता. त्याचा पुत्र ब्रह्म सावर्णी, तोसुद्धा धार्मिक, पवित्र व विष्णूभक्त होता. तसेच तो जितेंद्रिय होता. त्याला देव सावर्णी असा पुत्र झाला. तो विष्णूव्रततत्पर होता. त्याचा पुत्र इंद्र सावर्णी हाही महान विष्णूभक्त होता. त्याचा पुत्र वृषध्वज हा महान शंकरभक्त होता. त्याच्या आश्रमात शंभूदेव स्वतः तीन युगे होता. शंकराचे त्याच्यावर पुत्रापेक्षाही अधिक प्रेम होते. पण तो वृषध्वज नारायण, लक्ष्मी, सरस्वती यांना मानीत नव्हता. त्याने सर्व देवांची पूजा सोडून दिली.
त्याने उन्मत्त होऊन भाद्रपद महिन्यात लक्ष्मीच्या पूजेचा भंग केला. त्यानंतर माघशुद्ध पंचमीला सरस्वती पूजनाचा त्याने भंग केला, नंतर त्याने विष्णु व यज्ञ यांची निंदा केली तेव्हा त्याच्यावर सूर्य (दिवाकर) क्रुद्ध झाला. देवाने त्याला शाप दिला. "तू संपत्तीपासून भ्रष्ट होशील."
असा सूर्याने शाप दिल्यामुळे स्वतः भगवान शंकरच त्याच्यावर रागावून अंगावर शूल घेऊन धावून गेले. तेव्हा आपल्या पित्यासह तो ब्रह्मदेवास शरण गेला.
इतक्यात त्रिशूल धारण केलेला शिव तेथे येऊन प्राप्त झाला. तोही अतिशय क्रुद्ध झाला होता. तेव्हा ब्रह्मदेवही भयभीत होऊन सूर्याला पुढे करून वैकुंठलोकी गेले. ब्रह्मदेव, कश्यप, सूर्य हे इतके घाबरले होते की, त्यांचे घसे कोरडे पडले. ते सगळेच त्या सर्वेश्वर नारायणाला शरण गेले. त्यांनी त्या श्रीहरीची उत्कृष्ट स्तुती केली. तेव्हा त्या श्रीहरीने त्यांना भयभीत होण्याचे कारण विचारले. तो म्हणाला, "हे भयग्रस्तहो, मी असताना तुम्हाला भ्यायचे कारण काय ? ज्यावेळी तुम्हाला भीती उत्पन्न होते त्यावेळी तुम्ही माझे स्मरण करताच, मी चक्र हातात घेऊन, तुम्हाला निर्भय करीत असतो. हे देवांनो, मी कर्ता असून, या जगताचे मी नित्य पालन करीत असतो. मीच ब्रह्मा होऊन सृष्टि उत्पन्न करतो व शिव होऊन सृष्टीचा संहार करतो. तो शिव मीच व तूही मीच आहे. तसेच त्रिगुणात्मक सूर्यही मीच आहे.
नाना रूपे धारण करून मीच या जगत्सृष्टीचे पालन करतो. आता तुम्ही आपल्या स्थानी जा. तुमचे कल्याण असो. तुम्हाला कशापासून भय आहे ? मी वर दिल्यामुळे तुम्हाला आता शंकरापासूनही भय नाही. तो भगवान सर्वेश्वर शंकर हा सज्जनांचा स्वामी असून नित्य भक्तांच्या आधीन असतो. तो भक्तात्मा व भक्तवत्सल आहे.
हे ब्रह्मदेवा, सूर्य, शिव हे मला प्राणाहूनही अधिक प्रिय आहेत. या ब्रह्मांडांत यांच्यापेक्षा दुसरा कुणीही तेजस्वी नाही. तो महादेव सहजच कोटयावधी सूर्य उत्पन्न करू शकेल. तसेच तो कोटी ब्रह्मदेवही निर्माण करील. त्या शूलधारी सर्वात्मक प्रभूला काय अशक्य आहे ?
तो शिव सतत माझेच ध्यान करतो. त्याला ब्रह्मज्ञान मुळीच नाही. माझे मंत्र व माझेच गुण तो पाच मुखांनी युक्त होऊन गात असतो
म्हणून मीही सदासर्वदा त्याचेच कल्याण चिंतीत असतो. मी माझ्या भक्तांना त्यांच्या भक्तीप्रमाणे फल देतो.
तो भगवान कल्याणस्वरूप असून त्याची आराधना केल्यास कल्याण होत असते. म्हणूनच त्याला शिव हे नाव प्राप्त झाले आहे."
श्रीहरी असे सांगत असतानाच तो शिव शूल घेऊन तेथे प्राप्त झाला. तो नंदीवर आरूढ झाला होता. त्याचे नेत्र आरक्त होते. तो तेथे येऊन उभा राहिला. सत्वर तो नंदीवरून खाली उतरला. त्याने भक्तीभावाने नतमस्तक होऊन त्या शांत व परात्पर लक्ष्मीकांताला प्रणाम केला.
रत्नमय सिंहासनावर स्थित असलेला, रत्नालंकारांनी विभूषित असा, किरीट-कुंडले घातलेला, चक्रधारी, मेघाप्रमाणे वनमाला धारण केलेला, शामल, सुंदर, श्वेत चवर्यांच्या वायूने चतुर्भुज पुरुषांनी जो नित्य सेव्य आहे असा, ज्याच्या सर्वांगावर चंदन शिंपिलेले आहे, ज्याने पीत वस्त्रे परिधान केली आहेत, असा विष्णु तेथे होता.
हे नारदा, लक्ष्मीने दिलेला तांबूल तो भक्षण करीत होता. विद्याधरांचे नृत्य व गीत यांचा तो आस्वाद घेत होता. अशा त्या ईश्वर, परमात्मा, भक्तानुग्रहरूप शरीर धारण करणार्या त्या श्री हरीला सर्वेश्वर महादेवाने प्रणाम केला.
ब्रह्मदेवानेही त्या महादेवास वंदन केले. अत्यंत त्रस्त झालेल्या सूर्यानेही त्या महादेवाला भक्तीभावाने वंदन केले. कश्यपाने ज्याची अपार स्तुती केली तो महादेवही श्रीहरीची स्तुती करून सुखासनावर बसला.
त्यानंतर विष्णूच्या पार्षदांनी त्या महादेवाला शुभ्र चवर्यांनी वारा घातला व त्याचे स्तवन केले. त्यानंतर अमृतमय व मधुर अशा स्वराने भगवान विष्णु म्हणाले, "हे शंकरा, तू सांप्रत येथे कसा आलास ? कोणत्या कारणासाठी तुला येथे यावे लागले ते सांग."
महादेव म्हणाला, "हे विष्णो, प्राणाहून प्रिय असलेल्या माझ्या वृषध्वज नावाच्या भक्ताला सूर्याने शाप दिला, त्यामुळे मला कोप झाला. मी सूर्याला मारावयास सिद्ध झाल्याचे पाहून प्रेम शोकामुळे तो इकडे आला, विधीसह तो सूर्य तुला शरण आला. तुला शरण आलेले सर्वजण संकटमुक्त व निःशंक होतात.
ते जरा व मृत्यू यावरही विजय मिळवतात. हे प्रभो, तुला शरण आलेल्यांना कोणते फल मिळते याविषयी मी अधिक काय सांगू ? हरीचे स्मरणसुद्धा निर्भय करते. ते स्मरणही सर्वमंगल व अभय देणारे आहे. पण आता हे जगदीशा, सूर्याच्या शापामुळे माझा भक्त निस्तेज झाला आहे. त्याचे आता काय होणार याविषयी तू मला सांग." विष्णु म्हणाले, "कालाच्या ओघाप्रमाणे येथील अर्ध घटका झाली. पण एकवीस युगांचा काल निघून गेला आहे; म्हणून तू त्वरित स्वस्थानी परत जा. अतिशय दारूण व ज्याचे निवारण करता येण्यासारखे नाही अशा त्या कालगतीमुळे वृषध्वज मृत्यु पावला आहे. तसेच त्याचा पुत्र रथध्वज हाही मृत्यू पावला आहे.
त्याचे पुत्र धर्मध्वज व कुशध्वज हे महान उदार होते. पण सूर्याच्या शापामुळे ते निस्तेज झाले होते. पण ते वैष्णव म्हणून प्रसिद्ध पावले. ते राज्यभ्रष्ट व कांतिभ्रष्ट झाले असून ते लक्ष्मीचे तप करीत आहेत, म्हणून लक्ष्मी अंशाने त्यांची भार्या होईल."
हे शंभो, तुझा भक्त मृत झाला आहे, म्हणून तू जा. ब्रह्मादि देवांनो, तुम्हीही आता स्वस्थानी जावे. असे म्हणून तो भगवान विष्णु लक्ष्मीसह त्या सभेतून उठला आणि अंतर्गृहात निघून गेला. देवही अत्यंत आनंदाने स्वस्थानी परत गेले. परिपूर्ण शंकरही तप करण्यासाठी सत्वर निघून गेला.