[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्रीनारायणमुनी म्हणाले, "हे नारदमुने, हे ब्रह्मपुत्रा, असे कण्वशाखेत सांगितलेले ध्यान आहे. श्वेतवर्णाच्या कमलाप्रमाणे कांती असलेली देवी सर्व पापांचा नाश करते. ती कृष्णाच्या शरीरापासून उत्पन्न झाली आहे. ती कृष्णाप्रमाणेच असून परम साध्वी आहे. तिने अग्नीप्रमाणे शुभ्र वस्त्र परिधान केले आहे. ती रत्नालंकारांनी विभूषित आहे.
शरदऋतूतील पूर्ण चंद्राप्रमाणे तिची कांती शुद्ध आहे. ती हसतमुख असल्याने प्रसन्न दिसते. तिचे तारुण्य नित्य आणि निरंतर आहे. ती नारायणास प्रिय आहे.
ती शांतस्वरूप असून सौभाग्य व मालतीपुष्पांनी युक्त आहे. सुंदर केशालाप तिला शोभून दिसत आहे.
शेंदूर व चंदनाच्या बिंदूने ती युक्त असून नानाप्रकारच्या चित्रांनी ती युक्त आहे. सुशोभित गंडस्थळावरील कस्तुरीपत्राने ती विभूषित आहे.
तिची कांती पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे तेजस्वी आहे. मोत्यांच्या पंक्तीप्रमाणे तिच्या दंतपक्ती आहेत. त्यामुळे ती मनोहर दिसत आहे. कटाक्षयुक्त मनोरम मुखकमलांनी ती युक्त असून तिचे स्तनयुगल फळाप्रमाणे रेखीव आहेत. अतिशय कठीण व विस्तीर्ण श्रोणी, केळीच्या खांबांना तुच्छ करणारे उरूयुगुल व स्थलावरील पद्मप्रभेला कःपदार्थ मानणार्या पादकमलापर्यंत वस्त्र धारण करणारी असून तिचे पादकमल रत्ने व पादुकांनी शोभायमान दिसत आहेत. कुंकुमयुक्त यावक नावाचे अलंकार तिने धारण केले आहेत.
देव, सिद्ध, मुनीश्रेष्ठ यांनी दिलेले व देवेंद्राच्या मस्तकावरील मंदारपुष्पांच्या कणांनी लाल झालेले, अध्यनि सर्वदा युक्त, तपस्व्यांच्या मस्तकावरील भ्रमरपंक्तींनी वेष्टित व मुमुक्षूंना मुक्ती देणारे, कामी पुरुषांना भोग देणारे असे तिचे स्वरूप आहे.
ती श्रेष्ठ, भजन करण्यास योग्य, वरदायिनी, भक्तावर अनुग्रह करणारी, विष्णूपदी अशी ती, तिचे मी नित्य भजन करतो. अशाप्रकारे ध्यान करून तिची पूजा करावी.
हे ब्राह्मणश्रेष्ठा, षोडशोपचारांनी तिची पूजा करून तिला आसन द्यावे. पाद्य, अर्ध्य, स्नान, अनुलेपन, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, शीतल जल, वस्त्र, भूषण, माल्य, गंध, आचमन, सुंदर शय्या हे सोळा उपचार करून तिची पूजा करावी. हात जोडून तिला वंदन करावे. असे तिचे पूजन केल्यावर पूजकाला अश्वमेधाचे पुण्य मिळते." नारायणमुनीने पूजाविधी सांगितला. नंतर नारदमुनी म्हणाले, "हे विष्णो, हे देवेशा, हे लक्ष्मीकांत, हे जगत्पते, मला पापनाश करणारे, पुण्यकारक विष्णूपदीचे स्तोत्र सांगा. ते ऐकण्याची मला अनिवार इच्छा आहे."
श्रीनारायण म्हणाले, "हे नारदा, ते पापनाश करणारे स्तोत्र मी तुला सांगतो. शंकराने ते उत्तमरीतीने गायिले आहे. त्यामुळे श्रीकृष्ण संतुष्ट झाला. त्याच्या अंगापासून उत्पन्न झालेल्या राधेच्या अंगच्या द्रवाने युक्त असलेल्या गंगेला मी प्रणाम करतो.
शंकराच्या संन्निध गोलोकी रासमंडलात सृष्टीच्या आरंभकाली जिचा जन्म झाला त्या गंगेला मी वंदन करतो. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी गोप-गोपी यांनी व्याप्त अशा राधा महोत्सवात जिचा जन्म झाला तिला मी सर्वदा नमस्कार करतो.
जिने साठ लक्ष योजने विस्तीर्ण, लांबीने त्याच्या चौपट अशा वैकुंठास वेढले त्या गंगेला माझे वंदन असो. एक कोस रुंदी असलेली अशी ती अलकनंदा भूलोकी प्राप्त झाली आहे, अशा त्या गंगेला प्रणाम असो. सत्यलोकी जिचा वर्ण दुधाप्रमाणे शुभ्र होता, त्रेतायुगात चंद्राप्रमाणे, द्वापारात चंदनाप्रमाणे रंग असलेल्या त्या गंगेला माझा नमस्कार असो.
जी कलियुगात जलाप्रमाणे व पृथ्वीवर कोठेही नसलेल्या दुधाप्रमाणे जी स्वर्गलोकात असते, त्या गंगेला मी वारंवार वंदन करतो. जिच्या उदकाच्या लहानशा शिंतोडयानेही प्राण्यांना ज्ञान होते. कोटी जन्मातील ब्रह्महत्येची पातके नष्ट होतात.
हे ब्राह्मणा, ह्याप्रमाणे एकवीस गंगापद्ये निवेदन केली. ही स्तोत्रे पापनाश करणारी, जीवनास पुण्यकारक अशी आहेत. त्या सुरेश्वरीचे जो नित्य भक्तीने पूजन करतो व त्याचा पाठ करतो त्याला अश्वमेधाचे फल मिळते, अपुत्राला पुत्रलाभ होतो.
स्त्रीहीन पुरुषाला पत्नी मिळते. सर्व रोगी रोगमुक्त होतात. सर्व बंधनातून माणूस मुक्त होतो.
रोज सकाळी उठून जो हे मंगल स्तोत्र म्हणतो तो अकीर्तिमान असला तरी त्याची कीर्ती होते. मूर्ख पंडित होतो. दुष्ट स्वप्न पडल्यास त्या स्तोत्राचा पाठ करावा म्हणजे दोषनाश होतो व गंगास्नानाचे फळ मिळते." भगीरथाने या स्तोत्राने गंगेची स्तुती केली. तिला घेऊन तो सागरपुत्रांच्या भस्माजवळ गेला. गंगेचा स्पर्श होताच सर्व सागरपुत्र तत्क्षणी वैकुंठ लोकी गेले. भगीरथाने तिला आणले म्हणून तिला भागीरथी हे नाव प्राप्त झाले. हे नारदा, असे गंगोपाख्यान मी तुला निवेदन केले. आता तुला आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे ते सांग."
नारायणमुनींना नारद म्हणाले, "हे मुनीवर्या, हे प्रभो, ती गंगा तिन्ही मार्गांनी गमन
करते. ती पवित्र कशी, कोणत्या विधीमुळे व कोठे असते ? हे सर्व मला कथन करा. तसेच जे लोक तेथे होते त्यांनी असे काय चांगले केले होते ? ते आपण विस्तारपूर्वक मला सांगा."
नारायणमुनी प्रसन्न हास्य करून म्हणाले, "हे नारदा, कार्तिकी पौर्णिमा हा राधेच्या उत्तम महोत्सवाचा दिवस आहे. त्या राधेची पूजा करूनच श्रीकृष्ण राममंडलात राहिला. ती कृष्णालाही पूज्य असल्यामुळे ब्रह्मादि देव व शौनक ऋषीप्रमाणे सर्व मुनी तिचे पूजन करून प्रसन्न चित्ताने रहातात. त्याचवेळी श्रीकृष्णाने स्तुती केल्यामुळे सरस्वतीने उत्तमप्रकारे वीणावादन करून गायन केले. त्यामुळे संतुष्ट होऊन ब्रह्मदेवाने तिला रत्नहार दिला. शिवाने अत्युत्कृष्ट व दुर्लभ मणी तिला अर्पण केला. कृष्णाने अदभुत असे कौस्तुभ रत्न दिले. राधिकेने अमूल्य रत्नांचा हार दिला. भगवान नारायणाने मनोहर माला दिली. लक्ष्मीने अमूल्य रत्नांनी युक्त अशी सुवर्ण कुंडले दिली. भगवती, विष्णुमाया, ईश्वरी, मूलप्रकृती, ईशाना, नारायणी अशा दुर्गेने अत्यंत दुर्लभ अशी ब्रह्मशक्ती तिला दिली. धर्माने धर्मबुद्धी, प्रपंचात यश अर्पण केले. अग्नीने स्वतेजाप्रमाणे शुभ्र वस्त्र दिले. वायूने मणी व नूपुरे दिली. ब्रह्मदेवाने नित्य प्रेरणा दिल्याने शंभूने रासांच्या उल्हासासहित श्रीकृष्णाने गाईलेल्या स्तोत्राचे गायन सुरू केले.
त्यावेळी देव भान विसरले आणि बाहुल्याप्रमाणे स्तब्ध झाले. अखेर फार मोठया कष्टाने सर्वांना चेतना प्राप्त झाली. त्याच क्षणी सर्वजण ते रासमंडल अवलोकन करताच आश्चर्यचकित झाले. कारण तेथे सर्व भाग जलमय झाला होता व राधाकृष्ण दोघेही दिसेनासे झाले होते.
ते पहाताक्षणीच सर्व गोप गोपी, देव, ब्राह्मण सर्वजण मोठयाने रडू लागले. तेव्हा ब्रह्मदेवाने ध्यान बलाने सर्व जाणले की राधा-कृष्ण द्रवरूप झाले असून ते पवित्र तीर्थ झाले आहेत. तेव्हा ब्रह्मदेवादि सर्वांनी त्या परमेश्वराची स्तुती केली.
"हे प्रभू स्वमूर्तीचे दर्शन दे. हाच आम्हाला इष्ट वर दे."
इतक्यात सर्वात मधुर अशी आकाशवाणी सर्वांच्या कानावर आली, "मी सर्वात्मा आहे. ही शक्ती भक्तानुग्रहरूप आहे. तुमच्यात व माझ्यात किंचितही भेद नाही. तेव्हा माझ्या व राधेच्या देहाशी तुम्हाला काहीही कर्तव्य नाही. मनु, सर्व मनुष्ये, विष्णुभक्त हे सर्व माझ्या मंत्राने पवित्र होऊन मला पहाण्यासाठी माझ्याप्रत येतात. हे सर्व देवहो, माझी व्यक्त मूर्ती जर पहाण्याची तुमची इच्छा असली तर शंकराने तेथेच राहून माझे वचन पाळावे.
हे विधात्या ब्रह्मदेवा तू स्वतःच जगद्गुरूला आज्ञा कर. वेदांगरूप व अत्यंत मनोहर असे शास्त्र तयार करायला सांग. ते सर्व अभीष्ट फल देणारे व सर्व मंत्रांनी स्तोत्रे व ध्यान यांनी युक्त असावे. त्यात पूजाविधी सांगावा. माझ्या मंत्रांचे कवच करावे व प्रयत्नपूर्वक त्याचे रक्षण करावे.
त्याच्या योगाने पापीजन माझ्याप्रत येऊन मुक्त होतील. हजारो व शेकडो लोकात माझ्या मंत्राची उपासना करणारा एखादा तरी निघेल. त्यामुळे लोक पवित्र होऊन मत्पदाला पोहोचतील. पण हे माझे शास्त्र जर नाहीसे झाले तर गोलोकही नाहीसे होतील. तसे झाल्यास सर्व प्राणीमात्रांचा अभाव होऊन ब्रह्मदेवाचे ब्रह्मांड निष्फल होईल.
म्हणून हे ब्रह्मदेवा, प्रत्येक युगात पाच प्रकारचे लोक निर्माण करणे योग्य होईल. म्हणजे काही पृथ्वीवर, काही स्वर्गात वास्तव्य करतील.
हे ब्रह्मदेवा, देवसभेत हे शास्त्र निर्माण करण्याची महादेव दृढ प्रतिज्ञा करील, तेव्हा माझ्या मूर्तीचे सत्वर दर्शन घडेल."
असे आकाशवाणीने बोलल्यावर तो सनातन प्रभू स्तब्ध राहिला तेव्हा प्रजापती ब्रह्मदेव आनंदाने शंकराशी भाषण करू लागला. ब्रह्मदेवाचे बोलणे ऐकून ज्ञानी व श्रेष्ठ अशा महादेवाने गंगोदक हाती घेतले व त्या शब्दांचा स्वीकार केला.
"विष्णूच्या मायेच्या मंत्रांनी युक्त व श्रेष्ठ असे वेदांतसारभूत शास्त्र मी निर्माण करीन. प्रतिज्ञापालनार्थ गंगेच्या उदकाला स्पर्श करून जो मनुष्य मिथ्या भाषण करील तो ब्रह्मदेवाचे आयुष्य असेपर्यंत कालसूत्र नावाच्या नरकात जाईल."
असे त्या शंकराने सुरांच्या सभेत गोलोकी सांगितले. तेव्हा राधा व कृष्ण दोघेही तत्काल प्रकट झाले. त्या पुरुषोत्तमाला सर्वांनी डोळे भरून पाहिले. संतुष्ट होऊन सर्व देवादिकांनी त्यांची स्तुती केली. ते सर्व परमानंदपूर्ण झाले. त्यांनी त्या वेळी महोत्सव केला. नंतर कालांनी भगवान शंभूनेही मुक्तीदीप केला."
हे नारदा, हे अतिशय गुह्य व दुर्लभ असे निवेदन मी सांप्रत केले. तो कृष्णच गोलोकी उत्पन्न झालेली द्रवरूपी गंगा होय. ही गंगा राधाकृष्णांच्या अंगापासून निर्माण झाली. ती भक्ती व मुक्ती ही फले देत असते.
परमात्म्या कृष्णाने तिची निरनिराळ्या ठिकाणी स्थापना केली. ती परमदेवी कृष्णस्वरुप आहे. सर्व विश्वब्रह्मांड तिचीच नित्य पूजा करीत असते.