[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्री नारदमुनी म्हणाले, "हे वेदवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या नारायणमुने, आपण सांगितलेले पृथ्वीचे आख्यान मी ऐकले. आता हे ऋषीश्रेष्ठा, त्या गंगेविषयी आपण मला निवेदन करा. सरस्वतीच्या शापामुळे विष्णुस्वरूपा असूनही ती सुरेश्वरी भारतात कशी आली ? तिची प्रार्थना कुणी व कोणत्या युगात प्रथम केली ? तिला प्रेरणा कोणी दिली ? वगैरेसंबंधी ऐकण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे. हे श्रेष्ठा, आपण माझी इच्छा पूर्ण करा."
नारायण मुनी म्हणाले, "हे नारदा, सूर्यवंशात सागर नावाचा अतिश्रेष्ठ राजा उत्पन्न झाला होता. त्याला वैदर्भी व शैब्या या नावाच्या दोन भार्या होत्या. शैब्येच्या पोटी असमंजा नावाचा सुंदर व कुलवृद्धी करणारा सर्वश्रेष्ठ असा पुत्र जन्माला आला.
वैदर्भीने पुत्रप्राप्तीसाठी शंकराची आराधना केली. त्याच्या कृपाप्रसादाने तिलाही गर्भ राहिला. शंभर वर्षे त्या स्थितीत गेल्यावर तिने एका मांसाच्या गोळ्याला जन्म दिला. ते पाहून ती शंकराचे ध्यान करू लागली. ती सदैव मोठमोठयाने रडू लागली. तेव्हा शंकर द्विजरूप घेऊन तिच्याजवळ आला. त्याने त्या मांसाच्या गोळ्याचे साठ हजार भाग केले. ते सर्व पुत्ररूप झाले व सर्वजण अतिबलाढय असे झाले.
त्यांची अंगकांती ग्रीष्म ऋतूतील सूर्यप्रभेप्रमाणे तेजस्वी होती. पण कपिल मुनींचा शाप झाल्यामुळे त्या राजपुत्रांचे भस्म झाले, हे श्रवण करताच राजाला अनिवार दुःख होऊन तो रडतच वनात गेला. तेव्हा गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी असमंजा उग्र तप करू लागला. एक लाख वर्षे तपश्चर्या केल्यावर तो मृत्यु पावला. नंतर त्याचा पुत्र अंशुमान यानेही गंगेला आणण्यासाठी एक लाख वर्षे तपश्चर्या करून मृत्यू पावला. पुढे अंशुमानचा पुत्र भगीरथ हा अत्यंत सदगुणी, बुद्धिमान व भगवद्भक्त होता. तो विष्णूचा एकनिष्ठ भक्त होता. त्यामुळे तो मरण व जरारहित झाला. त्यानेही गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी लाख वर्षे तप केले. अखेर ग्रीष्मामध्ये असलेल्या सूर्याप्रमाणे कोटिसूर्य इतकी तेजस्वी अंगकांती असलेल्या श्रीकृष्णाने त्याला दर्शन दिले.
ते द्विभुज, मुरलीधर, बालरूपधारी, गोपवेष धारण केलेले, गोपाल सुंदरीरूप, भक्तांचा अनुग्रह करणारे, स्वेच्छामय, परब्रह्म, परिपूर्ण, प्रभु, ब्रह्मा, विष्णू, महेश इत्यादींनी स्तुती केलेले, मुनीवर्यांनी स्तवन केलेले, निर्लेप, साक्षीरूप, निर्गुण व प्रकृतीच्या पलीकडे असलेले, हसतमुख प्रसन्नचित्त, भक्तानुग्रही, अग्निवस्त्र परिधान केलेले, रत्नलंकारांनी विभूषित असे स्वरूप भगीरथाला दिसले. तो अत्यंत आनंदित झाला. त्याने भगवान श्रीकृष्णाला वारंवार वंदन केले. त्याने मुक्तकंठाने त्याची स्तुती केली, त्यामुळे भगवान प्रसन्न झाला व त्याला देवाने इष्ट पुत्रप्राप्तीचा वर दिला.
भगवान गंगेला म्हणाले, "हे सुरेश्वरी, तुला सरस्वतीचा शाप झाला आहे म्हणून तू सत्वर भारतवर्षांत जाऊन सागरपुत्रांचा उद्धार कर. तुझ्या स्पर्शामुळे त्या सागरपुत्रांना पावित्र्य मिळून ते माझ्या लोकात पोहोचतील. ते नित्य माझी स्तुती गाणारे, स्वानंदरूप पार्षद होतील."
कोटी जन्म घेऊन केलेली पापेही तुझ्या स्पर्शाने पावन होतील असे श्रुतीत सांगितले आहे. त्या गंगादेवीला स्पर्श केल्याने अथवा तिचे दर्शन घेतल्याने दहापट पुण्य मिळते. इतर दिवशीही संकल्पाशिवाय तिचे स्नान केले तरी शंभर कोटी जन्मांचे पाप नाहीसे होते. ब्रह्महत्येसारखी घोर पापेही तिच्या संकल्पस्नानामुळे नष्ट होतील. पुण्य दिवशी स्नान केल्यास केवढे प्रचंड पुण्य लाभते हे वेदही सांगू शकत नाहीत.
हे ब्राह्मणश्रेष्ठा नारदा, शास्त्राला अनुसरून हे वेद काही फल सांगत असतात. पण त्याचे पूर्ण फळ मात्र बुद्धीलाही अगम्य आहे. ब्रह्मा, विष्णु, महेश वगैरे देवसुद्धा हे सांगण्यास असमर्थ आहेत.
भगवान विष्णू गंगेला म्हणाले, "हे सुंदरी आता इतर दिवशी स्नानाचा संकल्प कसा करायचा ते ऐक. ह्या स्नानामुळे संकल्परहित स्नानापेक्षा कितीतरी पटीने अधिक पुण्य मिळते. अमावस्येलाहि तेवढेच पुण्य प्राप्त होते.
दक्षिणायनात दुप्पट फल मिळते, उत्तरायणात दसपट मिळते. चातुर्मासातील पौर्णिमेला स्नान घडल्यास अनंत पुण्य मिळतात. तितकेच अक्षयनवमीसही मिळते. ह्या दिवशी केलेले स्नान, दान असंख्य पुण्ये मिळवून देणारे आहे. सामान्य दिवशी केलेल्या स्नानापेक्षा व दानापेक्षा शतपट अधिक फल मिळते.
मन्वंतराची आद्यतिथी, युगाहितिथी, माघ शुक्ल सप्तमी, भीमाष्टमी, अशोकाष्टमी, रामनवमी इत्यादि तिथींना गंगास्नान केले तर दुर्लभ पुण्य प्राप्त होते. दशहरातील दशमीस तर गायुप्रमाणे फल मिळते. वारुणीस नंदेसारखे, महावारुणीस त्यापेक्षा चौपट इतके पुण्य लाभते. महामहावारुणीस त्याहीपेक्षा चारपटीने अधिक पुण्य मिळते.
चंद्रग्रहणाचे वेळी स्नान केल्यास सामान्य दिवसापेक्षा कोटीपटीने अधिक पुण्य मिळते. सुर्यग्रहणाचे दिवशी त्यापेक्षा दसपट अधिक पुण्यलाभ होतो. अर्धोदयकाली तर त्यापेक्षा अधिक शंभरपट पुण्य मिळते."
असे भगवानाने गंगेला सांगितले. त्यावेळी भगीरथ त्यांच्यापुढे नम्रतेने उभा होता. तेव्हा भक्तीमुळे गंगा अगदी नम्र होऊन गेली होती. ती सत्वर भगवान विष्णूला म्हणाली, "हे नाथ, सरस्वतीचा शाप व आपली आज्ञा तसेच या राजेंद्राची तपश्चर्या यामुळे मी भारत वर्षात गेले तर पापी लोक आपली सर्वच पापे मला अर्पण करतील. मग हे देवेश्वरा, मी स्वीकारलेली पापे कशामुळे नाश पावतील ? हे प्रभो, मला त्या पापनाशासाठी उपाय सांगा. तसेच भारतवर्षात मी किती काल रहावे ? मी पुनः आपल्या परमस्थानी केव्हा येणार ?
हे देवेश्वरा, आपण तर माझे मनोरथ जाणीतच आहात. तेथे मला कोणता पती लाभणार हे आपण सांगा. हे सर्व सर्वज्ञा, हे अंतर्यामी, हे सर्व विशेषज्ञावान् आपण सर्व जाणत आहात. म्हणून हे प्रभो, पुनः विष्णुलोकी येण्याचा उपाय मला निवेदन करा."
श्री भगवान गंगेला उद्देशून उतरले, "हे सुरेश्वरी गंगे, मी तुझे मनोरथ ओळखतो. तुझा पती द्रवरूप असा लवणोद समुद्र असेल. तो खार्या पाण्याचा सागर आहे. तो माझेच अंशरूपाने आहे. तू लक्ष्मीरूपाने आहेस. तेव्हा विरही स्त्री-पुरुषांचा भूलोकी समागम होणेच श्रेयस्कर आहे. भारतवर्षात सरस्वती वगैर अनेक नद्या असल्या तरी सागराशी क्रीडेसाठी तूच मुख्य होशील.
हे महादेवी, आजपासून कलीची पाच हजार वर्षेपर्यंत तू भारतलोकी वास्तव्य कर. समुद्रासह तुला एकांत लाभून क्रीडा करता येईल. हे देवी, समुद्र रसिकश्रेष्ठ व तू रसिका आहेस. भारतवर्षात राहणारे सर्व लोक या भगीरथाने केलेल्या स्तुतीस्तोत्रांनी तुझी आराधना करतील. कण्वशाखेत सांगितल्याप्रमाणे तुझे ध्यान व पूजन करतील. जो तुझी नित्य स्तुती करील व तुला नमस्कार करील, त्याला अश्वमेध यज्ञाचे पुण्य लाभेल. जो शंभर योजने दूर असूनही 'गंगा गंगा' असे म्हणेल तोही सर्व पापांपासून मुक्त होईल व विष्णुलोकी प्राप्त होईल. सर्वांच्या स्पर्शाने तुला लाभलेली पापे भुवनेश्वरीच्या स्पर्शाने नाहीशी होतील.
हजारो पापी, शवें यामुळे तुझ्या ठिकाणी जरी पातके साठली तरी भुवनेश्वरीचे मंत्रोपासक तुझ्यात स्नान करताच ती पापे नाहीशी होतील. हे शुभे, तू सरस्वती वगैरे नद्यांसह त्या भक्तांचे व उपासकांचे अधिष्ठान हो. जेथे भुवनेश्वरीची कीर्तने होतील ते ठिकाण तत्क्षणीच तीर्थ होईल. तुझ्या किंचित बिंदुस्पशनिही पातकी पावन होतील. माझे स्मरण करीत जे तुझ्या स्थानी प्राणत्याग करतील त्यांना विष्णुलोक लाभेल. ते श्रीहरीचे पार्षद होतील. ते असंख्य प्रकृतिप्रलय प्रत्यक्ष पाहतील. विष्णुलोकी त्यांचा कधीही नाश होणार नाही. पुष्कळ पुण्य केलेल्या पुरुषाचे शव तुझ्या पात्रात टाकल्यास तो पुरुष वैकुंठास जाईल. त्याला अनेक प्रकारचे देह देऊन मी पुढे त्याला कर्माप्रमाणे भोग भोगवीन. त्यांना मी पार्षद करीन.
अज्ञानी पुरुष तुझ्या जलस्पशनि प्राण सोडतील तर त्यांनाही मी हा लोक देऊन पार्षद करीन. तुझे नामस्मरण करीत कोणीही कुठेही प्राण सोडला तरी असंख्य प्रकृतीप्रलय होईपर्यंत मी त्याला वैकुंठात ठेवीन. शेवटी उत्तमोत्तम रत्ने व अलंकारांनी युक्त होऊन तो गोलोकास जाईल व तो खरोखरच माझ्यासारखा होईल. माझ्या मंत्राची उपासना करणारे, नैवेद्य खाणारे जर तीर्थाचे स्थानी मृत्यु पावतील तेही वैकुंठलोकी येतील. त्यांना कोठेही मरण आले तरी ते मजप्रत येऊन मिळतील.
माझ्या भक्तांचे आप्तस्वकीय आहेत तेही रत्नवहानात बसून सत्वर गोलोकी प्राप्त होतील. हे साध्वी, ज्ञानी ज्ञानाच्या योगाने जेथे माझे स्मरण करतात, माझी भक्ती उत्तम प्रकारे करतात ते जीवनमुक्त होतात."
अशाप्रकारे गंगेला तिचे महात्म्य सांगून भगवान श्रीहरी भगीरथास म्हणाले,
" हे राजा, आता तू या गंगेची स्तुती कर. तिचे यथाविधी पूजन कर."
भगीरथाने अत्यंत एकाग्र चित्ताने गंगेची स्तुती केली व दृढ भावाने तिचे पूजन केले. कौस्तुभशाखेत सांगितलेल्या ध्यानाप्रमाणे व स्तोत्रांनी त्याने वारंवार तिचे स्तवन केले. तसेच स्तोत्रे गाऊन त्याने श्रीकृष्णाला प्रणाम केला व गंगेलाही त्याने नमस्कार केला. तेव्हा तो भगवान गुप्त झाला.
नारदांनी श्रीनारायण मुनींना विचारले, "हे वेदांतश्रेष्ठा, राजाने त्या गंगेची स्तुती कोणत्या स्तोत्रांनी केली ? तिचे पूजन कसे केले ?"
श्री नारायण मुनी उत्तरले, "हे नारदा, स्नानादि नित्य कर्मे आटोपून त्याने धूतवस्त्र परिधान केले. अत्यंत भक्तियुक्त मनाने त्याने सहा देवांची पूजा केली. गणेश, सूर्य, अग्निहोत्रातील अग्नी, विष्णु, शिव व देवी या सहा देवांची यथाविधी पूजा केली. विघ्नांचा नाश व्हावा म्हणून गणेशाची आराधना केली. आरोग्यासाठी सूर्याची, शुद्धीसाठी अग्नीची, संपत्तीकरता विष्णूची पूजा करतात. ज्ञानाचा ईश्वर म्हणून शंकर पुजावा. मुक्ती व सिद्धी प्राप्त होण्यासाठी देवीची पूजा करावी, अशी यथायोग्य दैवतांची पूजा केली असता कल्याण होते. अशाप्रकारे विधीपूर्वक पूजा न केल्यास अकल्याण होते."