[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नारदमुनी नारायण ऋषींना म्हणाले, "हे महात्म्या देवाधिदेवा, कलीची पाच हजार वर्षे संपल्यावर ती गंगा कोठे गेली, हे मला सांगा." श्री नारायणमुनी म्हणाले, "हे नारदा, ईश्वरी इच्छा व शापाची समाप्ती झाल्यावर ती पुनः वैकुंठाला गेली. भारती (सरस्वती) तीही भारतवर्ष सोडून हरीच्या स्थानी पुनः प्राप्त झाली. अशारीतीने शापाचा अंत झाल्यावर त्या गंगा, सरस्वती व पद्मा पुनः वैकुंठाप्रत पोहोचल्या. गंगा, लक्ष्मी, सरस्वती ह्या हरीला फार प्रिय आहेत. हे नारदा, तुलसीसह मी तुला आता चार शुभ स्त्रिया निवेदन केल्या."
नारद म्हणाले, "हे नारायणमुने, ती देवी विष्णूच्या पदकमलापासून कोणत्या निमित्ताने उत्पन्न झाली ? ब्रह्मदेवाच्या कमंडलूत ती कशी राहिली ? ती शिवाची पत्नी झाल्याचे मी ऐकले आहे. तेव्हा हे कसे घडले ? गंगा नारायणाला कोणत्या उपायाने प्रिय झाली ? हे मुनीवर्य, आपण सांप्रत याविषयी सविस्तर निवेदन करा." श्री नारायणमुनी म्हणाले, "हे ब्रह्मपुत्रा, गंगा गोकुळात द्रवरूप झाल्यावर राधाकृष्णाच्या अंशभूत रूपाने त्याच्या स्वरूपात विलीन झाली. ती द्रवाची अधिष्ठात्री देवता झाली व भूलोकात सर्वोत्तम म्हणून विख्यात झाली. ती नवयौवना सर्व आभरणांनी सुशोभित दिसत असे. तिचे मुख शरदऋतूतील मध्यान्ह कालच्या कमलाप्रमाणे होते व ती हास्यमुखामुळे शोभून दिसत होती. तिची शरीरकांती तप्त सुवर्णाप्रमाणे मनोहर होती. शरद्कालातील चंद्रमण्याप्रमाणे तिची शोभा होती, शुद्ध सत्व हे तिचे स्वरूप होते. तिचा श्रोणीभाग अत्यंत कठीण व पुष्ट होता. सुंदर नितंबावर तिचे वस्त्र ठीक बसले होते. पुष्ट, उचललेले, वर्तुळाकार, कठीण असे तिचे स्तनयुगुल होते. तिचे नेत्रद्वय कटाक्षयुक्त व सुंदर, वक्र होते. तिची वेणीही वक्र व मालतीच्या पुष्पांनी शोभून दिसत होती. तो सर्व केशालप चंदन व शेंदराच्या बिंदूंनी मनोहर दिसत होता.
दोन्ही गंडस्थळे कस्तुरीपत्राने युक्त व मनोहर होती. असण्याच्या पुष्पाप्रमाणे तिच्या ओष्ठांचा आकार होता. पक्व डाळिंबातील दाण्यांप्रमाणे तिचे दंत सुशोभित होते. त्यामुळे मुखकमल उज्वल दिसत होते.
तिचे वस्त्र अग्नीप्रमाणे शुद्ध व गाठ बांधले असे होते. अशी ती देवी काममोहित झाल्यामुळे लज्जित होऊन कृष्णाच्या मागे उभी राहिली. तिने वस्त्राने आपले मुख झाकले होते व अनिमिष नेत्रांनी ती त्या कृष्णाकडे चोरून पहात होती.
अत्यंत आनंदामुळे तिचे वदन प्रसन्न झाले होते. नव्याने होणार्या समागमासाठी ती उत्कंठित झाली होती. प्रभूच्या रूपाकडे पाहून ती पूर्ण मोहवश झाली. तिच्या अंगावर शहारा आला.
त्यावेळी तीस कोटी गोपी सभोवार असलेली राधा तेथे प्राप्त होती. रागामुळे तिचे नेत्र आरक्त बनले होते. तिचे वदन लाल कमलाप्रमाणे भासत होते. पिवळ्या चाफ्याप्रमाणे तिची कांती दिसत होती. तिची गती गजाप्रमाणे मंद होती.
नाना अमूल्य रत्नांच्या आभरणांनी ती सुशोभित झाली होती. रत्नजडित व अमूल्य असे अग्नीप्रमाणे शुद्ध पिवळया रंगाचे वस्त्र तिने परिधान केले होते. त्या वस्त्राला सुंदर नीवी होती. कमलप्रभेने युक्त, कोमल व अति मनोहर, कृष्णाने दिलेल्या अध्यनि युक्त असे पदकमल टाकणारी अशी देवी सर्वोत्तम विमानातून तेथे उतरली. श्वेत चामरांनी वारा घालीत ऋषी सेवा करीत होते. कस्तुरी व चंदन या बिंदूनी ती युक्त होती. प्रज्वलित दीपाप्रमाणे ती उज्वल होती. मस्तकावर मध्यभागी शेंदुराचे बिंदू रोखलेले होते. पुष्पमाला भांगाखाली धारण केल्या होत्या. पारिजात पुष्पाच्या माला ती ल्याली होती. तेव्हा ती थरथर कापणारी रागाने युक्त अशी राधा श्रीकृष्णाच्या बाजूला असलेल्या एक रत्नजडित सिंहासनावर येऊन बसली.
ती सख्यांनी परिवेष्टित होती. त्या प्रिय राधेला अवलोकन करताच हरी उठला. आदराने उभा राहिला. तो गडबडून गेला. हसतमुखाने व मधुर शब्दांनी तो तिच्याशी बोलू लागला. सर्व गोपदेव मस्तक नम्र करून तिला वारंवार प्रणाम करू लागले. सर्वजण भक्तिपूर्वक तिची स्तुती करू लागले.
त्याच वेळी एकाएकी गंगाही उठली व तिची अत्यंत स्तुती करू लागली. ती भयभीत झाली होती. तरीही श्रद्धायुक्त मनाने तिने राधेला कुशल प्रश्न विचारले. गंगा नीच स्थानी उभी राहिली. भीतीमुळे तिचा कंठ, ओष्ठ व तालू सुकून गेली होती. ध्यानाने ती श्रीकृष्णाच्या चरणकमली लीन झाली. हृदयकमलात स्थिर असलेल्या देवीने ती भयभीत झाल्याचे अवलोकन करून तिला अभय दिले व वर देऊन तिचे मन स्थिर केले.
सिंहासनावर बसलेल्या आणि ब्रह्मतेजाने जिचे मुखकमल तळपत आहे अशा प्रेमळ राधेला त्या गंगेने अवलोकन केले. असंख्य ब्रह्मदेव उत्पन्न करणारी, सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण असलेली, सनातन, नित्य बाराव्या वर्षाप्रमाणे तरुण असलेली, रूपाने अनुपमेय अशी, शांत, सुंदर, अनंत, आद्यरहित, अंतरहित अशी ती सती, नित्य शुभ, सुभद्रा, सुभगा, सौभाग्यमंडित, सौंदर्यसुंदरी, सर्वांत श्रेष्ठ अशी, कृष्णाचे अर्धांगरूप असलेली अशी ती राधा स्वतेजाने तळपत होती.
ती अत्यंत तेजस्वी होती. कृष्णाच्या तुलनेशी योग्य अशी, लक्ष्मी व लक्ष्मीश्वर हे जिची पूजा करीत असत, अशी ती महालक्ष्मी, स्वयंप्रभायुक्त ईश्वराची कांती आच्छादून टाकणारी, तांबूल भक्षण करणारी, जन्ममृत्यूरहित, सर्वांची जननी, सर्वमान्य अशी मानिनी, कृष्णाच्या प्राणांची अधिदेवता असलेली अशी ती राधा कृष्णाला प्राणाहूनही प्रिय होती.
ती सुरेश्वरी, ती राकेश्वरी, रमेला पाहून अशी तृप्त झाली नाही. जणू तिने आपल्या नेत्रांनी तिला पिऊन टाकले आणि ती राधा अत्यंत मधुरवाणीने जगदीश्वराला, हसतमुखाने, शांतपणे व नम्रपणाने म्हणाली,
"हे प्राणेश्वरा, ही हसतमुखाने तुझ्याकडे टक लावून पहाणारी कल्याणी कोण ? तुजकडे पाहून हिच्या नेत्रात काम जागा झाला असून त्यामुळे तिचे नेत्र वक्र झाले आहेत. तुझ्यामुळे हिचे शरीर रोमांचित झले असून कामविव्हलतेने ही जणू मूर्च्छितच होणार असे दिसते. आपल्या वस्त्राने मुख आच्छादून ही तुजकडे पहात आहे. तूही हिच्याकडे पाहून कामातुर व आनंदित झाला आहेस. हे हृदयेश्वरा, मी गोलोकी जिवंत असताना तुला ही दुर्बुद्धी का बरे व्हावी ? तू नेहमीच असे दुर्वर्तन करीत असतोस. पण सांप्रत मी तुला क्षमा करते, कारण स्त्रियांचे हृदय कोमल असते.
हे लंपटा, आता या आपल्या प्रियेला घेऊन तू गोलोकातून सत्वर निघून जा. नाहीतर हे व्रजेश्वरा, तुझे कदापीही कल्याण होणार नाही. पूर्वीदखील त्या चंदनवनात विरजा नावाच्या गोपीबरोबर मी तुला क्रीडा करताना पाहिले आहे. माझ्या सख्यांना दिलेल्या वचनामुळे मी त्यावेळीही क्षमाच केली. माझ्या शब्दामुळे तू गुप्त झालास. विरजानेदेखील देहत्याग करून ती नदीरूप झाली. ती नदी कोटी योजने विस्तीर्ण होती. ती आता विद्यमान असून त्याच्या चौपट विस्तृत झाली आहे व तुझी कीर्ती गात आहे.
मी त्यावेळी स्वस्थानी गेल्यावर तू पुन्हा त्या विरजेजवळ गेलास आणि 'हे विरजे, हे विरजे !' असे म्हणून रडू लागलास. तेव्हा ती योगिनी योगबलाने उदकातून बाहेर आली. सालंकृत व साकार होऊन तुला भेटली, तेव्हाही तू तिच्या ठायी रत झालास आणि वीर्यदान केलेस. त्यामुळे तिच्या उदरातून सप्तसमुद्र जन्माला आले.
त्यानंतर शोभा नावाच्या गोपीबरोबर तू चाफ्याच्या वनात क्रीडा करू लागलास, तेव्हाही माझा शब्द ऐकताच तू गुप्त झालास. शोभा देह टाकून चंद्रलोकाप्रत गेली. तिचे शरीर मंद पण तेजोरूप झाले. तू अत्यंत दुःखित झालास.
शोभेचे तेज तू इतरांना वाटून दिलेस. रत्न, सुवर्ण, उत्तम मणी, स्त्रियांचे मुखकमल यांना तू थोडे थोडे तेज दिलेस. उरलेले राजाला, पल्लवांना, पुष्पांना, पक्व फलांना, धान्यांना, तृणांच्या देवघरांना, काही पदार्थांना, नवीन पत्रांना व दुग्ध या ठिकाणी ते तेज वाटलेस.
हे कृष्णा, त्यानंतर प्रभा नावाच्या गोपीसह तू वृंदावनात क्रीडा करीत होतास. तेव्हाही तू तसाच गुप्त झालास. देहत्याग करून प्रभा सूर्यमंडलात गेली. तेव्हाही तिचे तेजोरूप स्वरूप तू अत्यंत दुःखित होऊन रडत रडत इतर ठिकाणी वाटलेस.
हे कृष्णा, केवळ माझ्या भीतीमुळे, तसेच लज्जेमुळे ते दोन्ही नेत्रांपासून निर्माण झालेले तेज तू अग्नी, यक्ष, शूर पुरुष, देव, विष्णुभक्त, काही नाग, ब्राह्मण, मुनीश्रेष्ठ, तपस्वी, सौभाग्यवती स्त्रिया, तसेच काही यशस्वी पुरुष यांना वाटलेस. त्यानंतरही तू खूप रडलास.
काही काळानंतर रासमंडलात तू शांती नावाच्या गोपीबरोबर क्रीडा केलीस. तेथे रत्नांनी युक्त व दीपांनी वेढलेल्या मंदिरात वसंत ऋतूमध्ये, चंदनाचा लेप लावून, पुष्पमाला परिधान करून तू शृंगारित होऊन बसला होतास.
ती शांताही रत्नमण्यांनी विभूषित व शांत होती.
हे प्रभो, तिने दिलेला तांबूल तू आवडीने भक्षण केलास. पण माझ्या शब्दाबरोबर तू तेथेच गुप्त झालास. शांताही तुझ्यातच लीन झाली. तिचे शरीर श्रेष्ठ गुणांनी युक्त झाले. अत्यंत प्रेमाने तू रोदन करीत ते सर्व विश्वात विभागलेस.
काही अरण्यात, काही ब्राह्मणांनी, काही शुद्ध व सत्त्वस्वरूप असलेल्या मला दिलेस. काही लक्ष्मीला, मंत्रोपासकांना, शक्तींना, तपस्व्यांना, धर्माला, धार्मिकांना असे ते गुणरूप वाटलेस.
तसेच एकदा उत्कृष्ट वेषभूषा केलेल्या मालांनी युक्त, सुगंधी पदार्थासह चंदनाची उटी लावलेल्या तुला क्षमा नावाच्या दासीबरोबर मी पाहिले. तू पुष्पे व चंदन यांनी परिपूर्ण अशा शय्येवर निद्रित झाला होतास. तुमचा दोघांचाही सुखाने समागम झाला होता. तीही तुझ्या शेजारी पहुडली होती. त्यावेळी मी तुम्हा दोघांनाही उठविले. तू ते आता आठव. त्याचवेळी मी तुझे पीत वस्त्र, मनोहर, मुरली, वनमाला, कौस्तुभ, अमूल्य रत्नकुंडले ही सर्वच काढून घेतली, पण माझ्या सख्यांनी विनंती केल्यामुळे मी तुला सर्व परत दिली.
हे प्रभो, त्यावेळी आपली पापी मुद्रा लज्जेमुळे काळीठिक्कर पडली. क्षमेने सत्वर देहत्याग करून ती पृथ्वीवर निघून गेली. त्यावेळी तिचे शरीर उत्तम गुणरूप झाले. तेव्हा अत्यंत रोदन करीत ते तू विष्णूला, विष्णूभक्तांना, धार्मिकांना, धर्माला, दुर्बलांना, तसेच उरलेले तपस्व्यांना वाटून दिलेस.
हे प्रभो, अशारीतीने मी तुझे अपराध सांप्रत तुला निवेदन केले. तुला आता आणखी काय सांगू ? तुझे सगळे गुण मी जाणीत नाही काय ?"
असे म्हणून राधेने गंगेकडे पाहिले. ती अत्यंत लज्जित झाली होती. त्या सलज्ज गंगेला राधा काहीतरी बोलणर इतक्यात योगसामर्थ्याने ती गुप्त झाली आणि तिने उदकात प्रवेश केला. पण राधेनेही तिचे अस्तित्व अवलोकन केले व तीही सिद्धयोगिनी असल्याने तिने ते उदक घटाघटा पिण्यास सुरुवात केली. पण त्याचवेळी गंगेने हे जाणले व तिने श्रीकृष्णाच्या चरणांत स्वतःच्या योगबलाने प्रवेश केला व ती श्रीकृष्णाच्या आश्रयाने राहू लागली.
गोकुळ, वैकुंठ, भूलोक अशा सर्व ठिकाणी राधेने तिचा शोध केला, पण तिला गंगादर्शन झाले नाही. सर्व प्रदेश जलशून्य झाले. सर्व गोलोक वाळलेल्या चिखलाप्रमाणे भासू लागला. त्यात असंख्य जंतु मरून पडले होते. तेव्हा ब्रह्मा, विष्गु, महेश, शिव, अनंत, धर्म, इंद्र, चंद्र, सूर्य, मनू, सर्व देव, सिद्ध, तपस्वी गोलोकी प्राप्त झाले. सर्वांचे कंठ, ओठ, तालू सर्व काही शुष्क झाले होते. त्या सर्वांनी सर्वेश्वर अशा गोविंदाला वंदन केले
तो श्रीकृष्णच सर्वश्रेष्ठ, भजन करण्यास योग्य, वर देणारा, उत्तमाचे कारण असलेला, सर्व गोप व गोपिका या सर्वांचा स्वामी असा परमात्मा होता. तो निरिच्छ, निराकार, दोषांनी लिप्त न झालेला, आश्रयशून्य, निरंजन, स्वेच्छापूर्ण असल्यामुळे कधी कधी साकार होत असे.
तो साकार होऊन भक्तांवर अनुग्रह करीत असे. सत्त्वरूप, सत्येश्वर, सनातन, साक्षीरूप, पर, परेश, परम व परमात्मा अशा त्या ईश्वराची त्यांनी भक्तियुक्त अंतःकरणाने स्तुती केली. ते सर्वजण सद्गदित झाले. ते साश्रु नयनांनी व अंगावर काटे येऊन स्तुती करू लागले. जो ज्योतिर्मय आहे, सर्वांचे कारण आहे, अमूल्य रत्नांनी परिवेष्ठित सिंहासनावर आरूढ झाला आहे, गोपाल शुभ्र चवर्यांनी ज्याला वारा घालीत आहेत, जो मधुर हास्यमुक्त होऊन गोपींची नृत्ये पहात आहे, राधेला प्राणप्रिय असा, ज्याच्या वक्षस्थलावर राधा स्थित झाली आहे, अशा त्या परिपूर्ण देवभूत तत्वाला मुनी, मानव, सिद्ध, तापस व तपस्वी यांनी प्रत्यक्ष पाहिले. तेव्हा ते अत्यंत आनंदित झाले. त्यांना परम आश्चर्य वाटले. त्यांनी एकमेकांकडे दृष्टीक्षेप करून ब्रह्मदेवाला सुचविले. तेव्हा उजव्या बाजूला विष्णु व डाव्या बाजूला वामदेव यांसह ब्रह्मदेव कृष्णाजवळ गेला.
त्या रासमंडळात परमानंदयुक्त व परमानंदरूप अशा कृष्णाला सर्वांनी पाहिले. तेथे सर्वत्रच कृष्णमय होते. सर्वजण सारख्याच आसनावर व सारख्याच वेषाने स्थित होते. ज्याच्या हातात मुरली आहे, जे वनमालांनी सुशोभित आहे, ज्यांच्या मस्तकावर मयूरपिच्छे आहेत, कौस्तुभ मण्यांनी जे विराजित आहे, अतिशय प्रेक्षणीय, सुंदर, शांतस्वरूप, गुण, भूषणे, रूप, तेज, वय, अंगकांती यांनी अत्यंत परिपूर्ण, असे सर्वही ऐश्वर्यसंपन्न होते. त्या रासमंडळात सेव्य व सेवक यातील भेद समजत नव्हता. क्षणभर तेजोरूप व क्षणभर मूर्तिमान असे निराकार, साकार असे विविध प्रकारचे ते दिसू लागले.
क्षणभरच राधेशिवाय व क्षणातच तिच्यासह प्रत्येक आसनावर विराजमान झालेला, तर कधी राधेचे रूप घेतलेला, तर कधी कृष्णरूप झालेली राधा अशी विविध रूपे ब्रह्मदेवाला क्षणोक्षणी दिसत होती. स्त्रीरूप व पुरुषरूप कोणते हे जाणण्यात ब्रह्मदेवही समर्थ झाला नाही. तेव्हा हृदयात कृष्णरूपाचे ध्यान करून त्याने भक्तीपूर्वक त्याचे स्तवन केले व सर्वांना क्षमा करण्याबद्दल अनेक उपायांनी विनंती केली.
अखेर श्रीकृष्णाच्याच आज्ञेने त्याने आपले नेत्र उघडले तेव्हा त्याच्या वक्षस्थलावर राधा स्थित असल्याचे त्याला दिसले. त्याच्याभोवती पार्षद उभे होते. तसेच चोहोबाजूला गोपींनी त्याला वेढलेले होते. अशा त्या भगवानाला पाहून सर्वांनी त्याला नमस्कार केला व त्याची स्तुती केली. नंतर तो सर्वेश्वर, सर्वज्ञ व सर्वांचे उतपत्तीस्थान असलेला रमापती म्हणाला, "हे ब्रह्मदेवा, ये. हे कमलापते, हे महादेवा, येथे या. तुमचे निरंतर कल्याण होवो. तुम्ही सर्वजण त्या पुण्यवान उदार गंगेला नेण्यासाठी आला आहात. पण अत्यंत भयभीत होऊन ती सांप्रत माझ्या चरणकमलात विलय पावून राहिली आहे. ती माझ्याजवळ असल्याने राधा तिला पिऊन टाकण्याची इच्छा करीत आहे, पण तरी मी तिला तुमच्या स्वाधीन करतो. तुम्ही हिला भयरहित करा."
श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकल्यावर ब्रह्मदेवाने किंचित हास्य केले. नंतर श्रीकृष्ण जिचे पूजन करतो अशा त्या राधेची ब्रह्मदेवाने स्तुती केली. भक्तीमुळे ज्याचे मस्तक व देह नम्र झाला आहे अशा त्या ब्रह्मदेवाने आपल्या चतुर्मुखांनी विविध वेद म्हटले. ब्रह्मदेव म्हणाला, "हे देवी, ही गंगा रासमंडळात तुझ्या व कृष्णाच्या अंशापासूनच निर्माण झालेली आहे. ती द्रवरूप आहे. वस्तुतः कृष्णांगापासून व तुझ्याच अंशापासून ती निर्माण झाल्यामुळे ती तुला कन्यारूप आहे. तुझ्याच मंत्रांचे उच्चार करून तिला तुझे पूजन करू दे. चतुर्भुज वैकुंठेश्वर तिचा पती होईल. अशा रूपाने ती गंगा भूलोकी गेल्यावर समुद्र हा तिचा पती होईल, हे देवी, हे अंबिके, गोलोकी असलेली ही गंगा देवीरूप असून तू तिची माता आहेस."
ब्रह्मदेवाचे हे म्हणणे राधेने मान्य केले. ती क्षणभर हसली. तेव्हा निर्भय होऊन गंगा कृष्णाच्या पायाच्या अंगठयाच्या नखातून बाहेर पडली. त्या ठिकाणी तिचा सत्कार झाला, ती उदकाची शांत अधिष्ठात्री देवता, मध्यभागी येऊन उभी राहिली. तेव्हा त्यातील काही उदक ब्रह्मदेवाने कमंडलूत ठेवले. काही उदक शंकराने मस्तकावर धारण केले. ब्रह्मदेवाने गंगेला राधिकेचा मंत्र सांगितला. तसेच तिचे स्तोत्र, कवच, पूजाविधाने व ध्यान याविषयी सर्व काही तिला सांगितले. तसेच सोमवेदोक्त पुरश्चरणाचा प्रकार तिला सांगितला. शेवटी सर्व विधीप्रमाणे राधेचे पूजन करून गंगा वैकुंठात निघून गेली.
हे नारदा, लक्ष्मी, सरस्वती, गंगा, तुलसी ह्या सर्व नारायणाच्या भार्या होत. नंतर त्या कृष्णाने हसतमुखाने, अत्यंत दुर्बोध असा कालाचा वृत्तांत ब्रह्मदेवाला निवेदन केला. तो म्हणाला, "हे ब्रह्मदेवा, हे विष्णो, हे शंकरा, गंगेचा स्वीकार करा. हे ब्रह्मदेवा, मी आता कालाचा वृत्तांत सांगतो तो श्रवण करा. तुम्ही सर्व देव, मुनी, मनू सिद्ध तसेच येथे उपस्थित असलेले सर्वजण, कालचक्र नसलेल्या गोलोकात जिवंत आहात. पण यावेळी विश्व पाण्यात बुडल्यामुळे कल्पाचा क्षय झाला आहे. त्यामुळे विश्वातील सर्व ब्रह्मलोक वगैरे सर्व माझ्यात लीन झाले आहेत. हे पद्मोद्भवा, वैकुंठ लोक सोडला तर सर्व काही उदकात विलय पावले आहेत.
आता तुम्ही सर्वजण जाऊन ब्रह्मलोक वगैरे सर्व लोक निर्माण करा. तसेच पुनः सृष्टी उत्पन्न करा. म्हणजे गंगा येईल. मी त्या सृष्टीतील ब्रह्मादिक उत्पन्न करतो. हे ब्रह्मदेवा, तू देवांसह सृष्टी उत्पन्न करण्यास जा. कारण आता तुमचा बराच काल निघून गेला आहे. तुमच्यासारखे असे अनेक ब्रह्मदेव पुढे निर्माण होतील. त्या प्रत्येक स्थळी परमात्म्याच्या आज्ञेने ही गंगा तेथे जाईल. ती विष्णूच्या पदकमलापासून उत्पन्न झाल्यामुळे तिला विष्णुपदी असे म्हणतात."
"हे नारदा, याप्रमाणे मी तुला गंगेचे सर्व आख्यान निवेदन केले. हे सर्व श्रवणाने सुख व मोक्ष प्राप्त होतो. आता यानंतर तुला आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे ?"