[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
लक्ष्मी व सरस्वती यांचा अवतार -
श्रीनारायणमुनी म्हणाले, "ती देवी सरस्वती स्वतःच्या पूर्णांशाने वैकुंठात नारायणाजवळ असते. पण गंगेशी कलह होऊन शापित झाल्यामुळे ती भारतवर्षात नदी होऊन वाहात आहे. ती पुण्यफलदायी असून पुण्यरूप आहे. तसेच ती पुण्यतीर्थ असून ऋषीमुनींनी तिची सेवा करावी अशी ती पुण्याचे निधान आहे.
तपस्व्यांना तपाचे फल देणारी, पापाचे दहन करणारी, तशीच प्रज्वलित अग्नीप्रमाणे भासणारी अशी ती आहे. जे लोक तिच्या उदकात देह विसर्जन करतात त्यांचे वैकुंठात दीर्घकालपर्यंत वास्तव्य होते, ज्याने पापकर्म केले आहे त्याने सहज जरी त्या नदीत स्नान केले तरीही पापमुक्ती होते व त्यांना विष्णुलोक प्राप्त होतो.
चातुर्मासातील पौर्णिमेस, अक्षयनवमीस, क्षय तिथीचे दिवशी, व्यतिपात होत असताना, ग्रहणकाली तसेच इतरही दिवशी सहजगत्या जरी उदकाने स्नान घडले तरीही त्याच्या श्रद्धेमुळे त्याला वैकुंठ प्राप्त होतो. सरस्वतीच्या क्षेत्रामध्ये जो सरस्वतीच्या मंत्राचा एक महिनाभर जप करतो, तो महामूर्ख असला तरीही श्रेष्ठ कवी होतो.
जो एकदा मुंडन करून सरस्वतीच्या उदकात स्नान करतो त्या माणसाला पुन्हा गर्भवास प्राप्त होत नाही. तो मुक्त होतो.
हे नारदा, असे त्या सरस्वतीचे या लोकी महात्म्य आहे. ती सुख-काम वगैरे प्राप्त करून देणारी आहे. शिवाय सारभूत असे सरस्वतीचे कीर्तन केल्यास चिरकालीन मोक्ष प्राप्त करून देणारी आहे. हे नारदा, मी तुला सरस्वतीच्या गुणांविषयी संक्षेपाने सांगितले. आता आणखी काय ऐकण्याची तुझी इच्छा आहे ते सांग. म्हणजे मी तुझा संशय दूर करीन.
मुनिश्रेष्ठ नारदाने सत्वर प्रतिप्रश्न केला, "हे नारायणमुने, सरस्वती व गंगा यांच्यात कलह कसा निर्माण झाला ? सरस्वतीला शाप कसा मिळाला ? ती पुण्यनदी का झाली ? हे मुने, असे हे सारभूत असलेले आख्यान ऐकण्याची माझी इच्छा आहे. अशा प्रकारची कथानके ऐकूनच माझे मन तृप्त होते. खरोखरच ते मन आणखी कशाने बरे तृप्त होणार ?
हे नारायणमुने, सर्वांना पूजनीय असलेल्या सरस्वतीला गंगेने शाप कसा दिला ? वास्तविक ती सर्वांना पुण्यरूप असून कल्याणकारक आहे. त्यामुळे ती सत्वरूप आहे. म्हणून परिपूर्ण असणे आवश्यक आहे. तेव्हा हे मुने, त्या दोन तेजस्वी देवतांमध्ये कलह कसा निर्माण झाला ते आता निवेदन करा."
नारदाने प्रश्न विचारल्यामुळे नारायणमुनी प्रसन्न झाले. ते हसतमुखाने नारदाला म्हणाले, "हे देवर्षे, ही कथा केवळ श्रवण केली असतासुद्धा मनुष्य मोक्षाप्रत जातो. तीच कथा मी आता तुला निवेदन करतो."
लक्ष्मी, सरस्वती, गंगा अशा हरीच्या तीन भार्या होत्या. त्यांवर हरीचे सारखेच प्रेम होते. तसेच हरीवरही त्यांचे नित्य प्रेम होते. तसेच त्या परस्परांवरही प्रेम करीत असत. त्या तिघीही नेहमी हरीच्या सन्निध राहून त्याची सेवा करीत. एकदा गंगा कामविव्हल झाली. तिने डोळे मुरडीत हरीकडे हसतमुखाने वारंवार पाहिले. तेव्हा तो भगवान हरी एकदा तिच्याकडे पाहून स्वतःशीच हसला. ते पाहून लक्ष्मीने क्षमा केली. पण सरस्वती मात्र क्रुद्ध झाली. लक्ष्मीने तिला बोध करण्याचा प्रयत्न केला. पण क्रुद्ध झालेली ती वाणी शांत होईना. तिचे मुख, डोळे रागाने लाल झाले. तिच्या शरीरातील काम जागृत होऊन ती थरथर कापू लागली. तिचे ओठ स्फुरण पावू लागले. ती पतीला म्हणाली, "जो पती धार्मिक व श्रेष्ठ असतो त्याची सर्व भार्यांचे ठिकाणी समबुद्धी असते. पण दुष्ट पतीची बुद्धी तशी नसते. हे गदाधरा, तुझे त्या गंगेवरच अधिक प्रेम दिसते आहे. तसेच त्या कमलेच्या ठायीही तुझे जास्त प्रेम आहे. पण मजवर मात्र तसे नाही. कारण गंगेचे लक्ष्मीबरोबरही फारच चांगले सख्य आहे. म्हणून त्या लक्ष्मीने तुझ्या या कामाविषयी क्षमा केली. तेव्हा मीच एकाकी झाले. आता मजसारख्या दुर्भागिनीला जिवंत राहून काय करायचे आहे ? जिला पतिप्रेम मिळत नाही, तिचा जीव निष्फळ आहे. खरोखरच हे नारायणा, जे विद्वान तुला सत्त्वरूपी आहे असे म्हणतात, ते मूर्ख आहेत, ते वेदज्ञ नाहीत. कारण खरोखरच ते तुझी बुद्धी कशाप्रकारची आहे हे जाणीत नाहीत."
सरस्वती क्रुद्ध झाल्याचे अवलोकन करून नारायणाने क्षणभर विचार केला आणि तो बाहेर निघून गेला. तो निघून गेल्यावर श्रवणास अयोग्य असे कठीण शब्द देवी वाणीने गंगेला उद्देशून उच्चारले. वाणीची ती अधिष्ठात्री देवता म्हणाली, "हे निलाजर्या स्त्रिये, हे कामविव्हले, तू वृथा मोठेपणाचा गर्व का वहात आहेस ? पतीचे तुझ्यावर अधिक प्रेम आहे हेच तू मला दाखवीत आहेस काय ? पण त्या हरीसमोर मी तुझा अभिमान नष्ट करीन. हे पतीला प्रिय असलेल्या गंगे, तुझा पती काय करतो तेच मी आज पहाते."
असे म्हणून ती गंगेचे केस धरण्यास सिद्ध झाली. पण मधेच लक्ष्मीने तिचे निवारण केले. तेव्हा सरस्वतीने लक्ष्मीला वृक्षरूप व नदीरूप होशील असा शाप दिला. वृक्ष जसा सभेत जड होऊन बसतो तसेच नदीही, त्याचप्रमाणे तू सांप्रत काहीही बोलली नाहीस, म्हणून तू तशीच होशील."
हा शाप ऐकूनही ती लक्ष्मी न रागवता सरस्वतीला आपल्या हाताने धरून तशीच उभी राहिली व दुःखित झाली. पण गंगा मात्र क्रुद्ध झाली आणि म्हणाली, "हे पद्मे, तू या महा उग्र स्त्रीला सोड. ही दुःशील व वृथा बडबडणारी आहे. ती नित्य वल्गना करणारी वाणी माझे काय बरे करील ? ही वाणीची देवता आहे. ती कलहप्रियच आहे. ही काळतोंडी सवत हिला शक्तीप्रमाणे माझ्याबरोबर वाद करू दे. हे साध्वी, आम्हा दोघींनाही एकमेकींचे सामर्थ्य अजमावून पाहू दे.
हे लक्ष्मी, तिने तुला शाप दिला आहे. ती माझी सवत नदीरूप होवो व पापी लोकांचे वसतीस्थान असलेल्या मृत्यु लोकात जावो. ही कलियुगात त्यांची पातके ग्रहण करील."
ही शापवाणी ऐकून सरस्वतीही म्हणाली, "तूच भूलोकी जाऊन त्यांची पापे घेशील."
इतक्यात तो चतुर्भुज भगवान चार पार्षदांसह तेथे आला. त्याने सरस्वतीला दृढ आलिंगन दिले. त्याने त्या दोघींनाही पूर्वज्ञान सांगितले. त्यामुळे शापांचे कलहाचे रहस्य समजल्यावर त्या दुःखित स्त्रियांना तो म्हणाला, "हे शुभ लक्ष्मी, तू अंशतः धर्मध्वजाच्या घरी जा. भूलोकी तू अयोनिसंभव कन्या होशील. तेथे दैवगतीमुळे तुला वृक्षत्व प्राप्त होईल. नंतर माझ्याच अंशापासून उत्पन्न झालेल्या शंखचूड नावाच्या असुराची तू स्त्री होशील. नंतर पुढे सर्व विश्वास पवित्र असलेल्या तुळशीरूपाने तू माझी पत्नी होशील. हे सुंदरी, तू सर्वांना पावन करण्यासाठी नदीरूपाने सत्वर भूलोकी जा. सरस्वतीच्या शापामुळे तू पद्मवती या नावाने प्रसिद्ध हो." नंतर लक्ष्मीला असे सांगितल्यावर भगवान गंगेला म्हणाले, "हे गंगे, तू भारतातील लोकांना पवित्र करण्यासाठी तेथे जाऊन नदी हो व सर्वांचे पाप नाश कर. हे प्रिय कामिनी, भगीरथाच्या तपामुळे संतुष्ट होऊन तो तुला भूलोकी नेईल. तू भागीरथी या नावाची प्रसिद्ध नदी होशील. नंतर माझ्याच अंशभूत असलेल्या सागराची तू भार्या हो. तसेच हे सुरेश्वरी, माझाच अंशभूत असलेल्या त्या शंतनूचीही तू कालपरत्त्वे भार्या हो."
तसेच हे सरस्वती, तुला गंगेचा शाप झाला असल्याने तूही अंशभूताने भारतवर्षात जा. हे निश्चयी स्त्रिये, या दोघी सवतींसह तू कलहाचे फळ भोगत रहा. तू स्वतः ब्रह्मदेवाची स्त्री हो. गंगा व लक्ष्मी ही शिवाच्या वस्तीस्थानी जाऊन राहो. कारण लक्ष्मी ही शांतचित्त असल्याने व तिचे माझ्याठायी अतिशय प्रेम असल्याने ती सत्त्वरूप असून उदार, धर्मशील आचरण करणारी आहे. हिच्याच अंशापासून सर्व युगात सुशील स्त्रिया उत्पन्न होतील."
तीन स्वभावाच्या तीन भार्या, तीन स्वभावाचे तीन सेवक, तीन बांधव आणि वेदाविरुद्ध आचरण करणारे असे चार प्रकारचे प्राणी हितकर नव्हेत. ज्या गृहस्थाच्या गृहात स्त्री-पुरुषाप्रमाणे प्रगल्भ व पुरुष स्त्रीवश होतो, त्यांचा जन्म निष्फळ होय. त्यांचे पदोपदी अकल्याण होत असते. ज्याची स्त्री वाणीने व जातीने दुष्ट, ती कलहप्रिय असते. त्याने अरण्यात जावे. कारण तेथेच त्याला जल, स्थल, फल प्राप्त होत असते.
अग्नीत रहाणे बरे. व्याघ्रादि हिंस्त्र श्वापदांचा सहवासही एक वेळ सुखकर होईल, पण दुष्ट स्त्रीचा सहवास मात्र घोर व दुःखदायक आहे.
हे सुंदरी, व्याधींची ज्वाला, विषाची ज्वाला, ती पुरुषांना सहन होऊ शकेल, पण दुष्ट स्त्रियांच्या मुखांची ज्वाला मात्र त्यांना मरणाहूनही अधिक होय. स्त्रियांनी जित असलेला पुरुष मरणानंतरच शुद्ध होतो. त्याने दिवसा केलेल्या कोणत्याही कर्माचे फल त्याला मिळत नाही. तो इहलोकी व परलोकी निंद्य होतो. त्याला नरक प्राप्ती होते. यश व कीर्ती यांनी विरहित असलेला पुरुष या जगतात वास्तव्य करण्यास अयोग्य आहे. तो जिवंत असला काय किंवा मृत असला काय, दोन्हीही सारखेच. तसेच अनेक स्त्रिया सवती म्हणून एकत्र रहाणे शक्यच नाही. त्यामुळे कधीही सुख प्राप्त होत नाही.
हे गंगे, तू शिवलोकी जा. हे सरस्वती, तू ब्रह्मस्थानी जा. ती सुशील लक्ष्मी मात्र येथेच राहील. ज्याची स्त्री सहज वश होणारी असते म्हणजे ती हट्टी नसते, ती पतिव्रता असते, अशा पुरुषालाच इहलोकी व परलोकी सुख मिळते. त्यालाच सर्वत्र धर्म व मोक्ष प्राप्त होतो. ज्याची पत्नी पतिव्रता असते तोच मुक्त, पवित्र व सुखी होय. ज्याची स्त्री दुराचरिणी असते, तो जिवंत असूनही मृत, अपवित्र व दुःखी असतो हे निश्चयाने लक्षात ठेव.