[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नारदाने विचारले, "हे प्रभो, तुझ्याच प्रसादाने मी अमृततुल्य असे सर्व काही ऐकले. आता प्रकृतीचे भिन्नभिन्न पूजन व चिंतन कसे करावे ते सांग. मृत्युलोकी प्रसिद्ध असलेल्या देवींची कोणत्या कारणामुळे का प्रसिद्धी झाली ? त्यांच्या प्रथम पूजा कोणी केल्या ? त्यांची स्तुती कशाप्रकारे करावी ? त्यांची स्तोत्रे, ध्यान, प्रभाव व उत्तम चरित्र याविषयी मला सर्व निवेदन कर. हे महर्षे, कोणत्या देवीने कोणाला व कोणता शुभ वर दिला आहे ते सांगण्यास, हे महाराज, आपणच काय ते समर्थ आहात." नारदाने असा प्रश्न विचारल्यावर नारायण मुनी प्रसन्न झाले. ते नारदाला म्हणाले, "हे नारदमुने, गणेशाची माता दुर्गा, राधा, लक्ष्मी, सरस्वती, सावित्री अशी सृष्टीकाली पाच प्रकारची प्रकृती असल्याचे सांगितले आहे. त्यांची पूजा अत्यद्भुत प्रभाव, तसेच तिचे मंगलमय व अमृताप्रमाणे असलेले चरित्र प्रसिद्धच आहे. म्हणून प्रकृतीच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या ज्या ज्या कला आहेत, त्यांचे शुभ चरित्र मी तुला आता निवेदन करतो. हे ब्राह्मणा, तू शांतचित्ताने ते ऐक.
काली, वसुंधरा, गंगा, षष्ठी, मंगलचंडिका, तुलसी, मनसा, निद्रा, स्वाहा, दक्षिणा अशा त्या कला निर्माण झालेल्या आहेत. त्यांचे अत्युत्तम व पुण्यफलदायी, श्रवणास मधुर असे चरित्र मी आता थोडक्यात सांगतो. ते श्रवण केल्यानेसुद्धा प्रसंगानुरूप फल प्राप्त करून देते. तेही मी तुला सांगतो.
त्याचप्रमाणे, राधा व दुर्गा यांचे अद्भुत चरित्र मी तुला विस्तारपूर्वक निवेदन करीन आणि त्यानंतर त्या देवीच्या अनुष्ठानाचे सर्व प्रकार विधीपूर्वक कथन करीन. हे नारदा, प्रथम त्या भगवान श्रीकृष्णाने सरस्वतीची पूजा केली. ही देवी जर प्रसन्न झाली तर एखादा मूढही पंडित होऊन जातो. ती राधेच्या जिव्हाग्रापासून प्रगट झाली. त्यावेळी ती कामविव्हल होऊन कृष्णाची अपेक्षा करू लागली. तेव्हा श्रीकृष्णाने तिचे मनातील भाव ओळखले. त्या सर्व हितकर्त्या जननीला भगवान कृष्ण काही हिताच्या गोष्टी सांगू लागले. श्रीकृष्ण म्हणाले, "हे साध्वी, तू आता माझ्या अंशापासून उत्पन्न झालेल्या चतुर्भुज नारायणाला शरण जा. त्याची पूजा कर. तोही तरुण असून तो माझ्याप्रमाणे सुंदर आहे. तो सर्वगुणसंपन्न असून तो माझ्यासारखाच प्रभावी आहे. तो कामिनींच्या कामवासना ओळखून त्यांच्या इच्छा पूर्ण करतो.
तो एक कोटी मदनांच्या इतक्या लावण्याने युक्त आहे. तसेच तो ईश्वरी लीलांच्या योगाने विभूषित आहे. हे सरस्वती, मलाच पती म्हणून वरल्यानंतर तू इथेच रहाण्याचा निश्चय करशील तर तुझा राधेपुढे टिकाव लागणार नाही. कारण ती तुझ्यापेक्षा बलवान आहे. ती तुझे बरे होऊ देणार नाही.
हे वाणी, जो बलवान असतो तोच अन्यायापासून स्वतःचे रक्षण करतो. जो परावलंबी आहे, तो दुसर्याचे रक्षण करणारच कसे ? मी स्वतः स्वतंत्र नसून राधेच्या आधीन आहे. म्हणून मी तरी तुझे रक्षण करू शकणार नाही.
मी सर्वेश्वर व सर्वांचा नियंता असलो तरीही राधेवर मी नियंत्रण करू शकत नाही. कारण ती माझ्यासारखीच तेज, रूप व गुण याबाबतीत श्रेष्ठ आहे. तीच प्रत्यक्ष प्राणांचीही अधिष्ठात्री देवता आहे. असे असल्यामुळे प्राणाचा त्याग करण्यास कोण बरे समर्थ होईल ? आपल्या प्राणापेक्षा कुणालाही पुत्र वा इतर कोणीही प्रिय वाटेल का ?
म्हणून हे कल्याणी, तू सत्वर वैकुंठास जा म्हणजे तेथे तुझे कल्याणच होईल. त्या ईश्वरालाच तू पती कर आणि दीर्घकालपर्यंत तू त्याचा सुखोपभोग घे. लोभ, मोह, काम, क्रोध, मान, परपीडा इत्यादींची भावना नसलेली व तेज, रूप, गुण यांनी तुझ्याप्रमाणे परिपूर्ण असलेली लक्ष्मी तिच्याशी तुझे प्रीतीचे संबंध जुळतील व तुझा काल सुखात जाईल. तो भगवान हरी तुम्हा दोघींचाही योग्यप्रकारे व सारखाच गौरव करील.
हे सुमुखी, माझा वर प्राप्त झाल्यामुळे प्रत्येक विश्वात ती गौरवयुक्त अशी पूजा, मनुष्ये, मनू, देव, मुनिश्रेष्ठ, मुमुक्षू, वसू, योगी, सिद्ध, नाग, गंधर्व, राक्षस, वगैरे सर्वजण करतील. माघ शुद्ध पंचमीला व विद्येसाठी आरंभ करण्यापूर्वी प्रत्येक कल्पात त्याचा लय होईपर्यंत, तुझी भक्तीयुक्त मनाने षोडशोपचारयुक्त पूजा करून ती तुला अर्पण करतील.
शम व दम यांनी युक्त असलेल्या कण्वशाखेत सांगून ठेवल्याप्रमाणे विधीयुक्त स्तवन करतील, कुंभ अथवा पुस्तक याठिकाणी ते तुझी भावना करतील व त्या ठिकाणी तूच आहेस असे समजून तुला आवाहन करतील. तसेच भूर्जपत्रावर सुगंधयुक्त चंदनाचे कवच लिहून ते सुवर्णाच्या पेटीत किंवा ताईतामध्ये घालून ती गळ्यात किंवा उजव्या हातात बांधतील.
पूजा करतेवेळी आणि त्यानंतरही विद्वान लोक ते कवच वाचतील. तेव्हा हे सरस्वती, तू मी सांगितल्याप्रमाणे आता कर.
अशाप्रकारे श्रीकृष्णाने तिला वर दिले. त्यानंतर तिची षोडशोपचारे पूजा केली. तेव्हापासून प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णु, महेश, अनंत, धर्म, सनक, सर्व देव, इतरही ऋषी, मुनी, राजे व सर्व मानव त्या सरस्वतीदेवीचे पूजन करू लागले. तीच देवी नंतर सर्वांना नित्य पूजनीय झाली." अशारीतीने नारायण मुनींनी नारदाला सरस्वतीच्या उत्पत्तीपासून पूजाविधीपर्यंत विस्ताराने कथन केले व ते ऐकून नारद म्हणाले, "हे वेदवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या नारायण मुने, पूजेचे विधान, कवच, ध्यान, तसेच पूजेसाठी योग्य असा नैवेद्य कोणता हे आता सांगा. तसेच कोणती फुले आणि कोणत्या वर्णांचे गंध आवश्यक आहे तेही निवेदन करा. ते सविस्तर ऐकण्याची मला उत्कंठा लागली आहे. कारण ते सर्व ऐकण्यासही मधुर आहे."
श्रीनारायण मुनी म्हणाले, "हे नारदा, सरस्वती ही जगताची जननीच असून तिची विधियुक्त कण्वशाखेत सांगितलेली पूजापद्धती मी तुला सांगतो. ती शांत व एकाग्र होऊन श्रवण कर.
हे नारदा, माघ शुद्ध पंचमीच्या दिवशी व विद्येस आरंभ करण्यापूर्वी ह्या देवीचे पूजन करावे. प्रथम दिवशी संकल्प करावा. पूजेच्या दिवशी स्नान करून पवित्र झाल्यावर नित्यक्रिया कराव्यात. भक्तीभावाने घटाची स्थापना करावी. नंतर स्वतःच्या शाखेत सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक त्या गणेशाचे पूजन करावे व नंतर सरस्वतीची पूजा करावी
मी सांगणार असल्याप्रमाणे प्रथम ध्यान करावे. नंतर घटाचे ठिकाणी पुन्हा ध्यानमग्न व्हावे. व्रतस्थ होऊन देवीची षोडशोपचारे पूजा करावी. हे नारदा, आता पूजेसाठी, वेदात सांगितलेला योग्य असा नैवेद्य मी तुला सांगतो.
लोणी, दही, दूध, तीळ, लाडू ऊस, ऊसाचा रस, साखर, गूळ, मध, तसेच शुभ अशी इतर द्रव्ये, खडीसाखर, पांढर्या धान्याच्या तुटलेल्या अक्षता, पांढर्या व कोरडया धान्याचे पोहे, पांढरे मोदक, कल्याणरूप तूप व सैंधव यांचा उपयोग केलेले असे हविष्यान्न, तीळ, गहू यांचे तूप मिसळलेले पीठ, घृतयुक्त पायस, अमृताप्रमाणे रुचकर मिष्टान्न, नारळ, नारळातील पाणी, केशर, मुळा, आले, पिकलेली वेळी, सुंदर फळे, बोरे, त्या त्या हंगामात व त्या त्या प्रदेशात उत्पन्न होणारी अशी मधुर फळे, चांगल्या वासाचे पांढरे चंदन, नवीन सुंदर वस्त्र, तसेच मनोहर शंख, पांढर्या फुलांच्या माळा, पांढरे हार व फुलांनी बनविलेली भूषणे ही सर्व देवीला अर्पण करावी.
हे उदार नारदा, ज्या योगाने भ्रमाचा नाश होतो, त्याचे कारण मी तुला सांगतो. ते सर्व श्रवणास योग्य, मधुर व पुण्यकारक असून ते प्रशस्त आहे. ते भ्रमनाशक ध्यान मी तुला सांगतो.
जिचा वर्ण शुभ्र आहे, जी नित्य हसतमुख आहे, जी अत्यंत नयनमनोहर आहे, जिची
कांती कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे, जिची देहयष्टी पुष्ट आहे, जिने अग्निवर्णाचे शुद्ध वस्त्र धारण केले आहे, जिने वीणा व पुस्तक आपल्या हस्तकमलात धारण केले आहे, जी सर्वोत्कृष्ट रत्नांनी आणि नित्य नवीन अलंकारांनी विभूषित झालेली आहे, तसेच प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णु व महेश हे जिचे पूजन करीत आहेत, अशी ती सर्वश्रेष्ठ देवी सरस्वती, तिचे यथासांग पूजन करावे. मी त्या देवी सरस्वतीस नेहमी वंदन करतो. सर्व मुनीश्रेष्ठ, मनू, सर्व मानव, हे सर्वच त्या देवीला सर्वदा वंदन करीत असतात. म्हणून अशा त्या देवीचे मनामध्ये ध्यान करावे. तसेच बुद्धिमंताने आपले सारसर्वस्व अर्पण करून तिचे स्तवन करावे. तिचे कवच धारण करावे व दंडवत घातल्याप्रमाणे भूमीवर पडून नमस्कार करावा.
हे नारदमुने, ही देवी प्रसन्न व्हावी अशी ज्यांची इच्छा आहे, त्या सर्वांनी विद्येच्या आरंभी व वर्षांच्या शेवटी माघ शुक्ल पंचमीस वर सांगितल्याप्रमाणे त्या देवीचे यथासांग पूजन करावे. त्याचप्रमाणे उपयुक्त, सर्वश्रेष्ठ व मूल्य असा अष्टाक्षरी वैदिक मंत्र जपावा.
ज्या कारणासाठी उपदेश झाला असेल, ते कारण पूर्ण करणारा असाच मंत्र जपावा. अग्निजाया जी स्वाहा, तिचा वाचक शब्द शेवटी असलेले, चतुर्थात सरस्वतीपद असून पूर्वी लक्ष्मी व माया यांचे वाचक शब्द योजावेत. त्यामुळे तो अष्टाक्षरी मंत्र कल्पवृक्षाप्रमाणे सिद्ध होतो. तो मंत्र असा, 'श्रीं र्हीं सरस्वत्यै स्वाहा.'
फार पूर्वी, कृपाळू नारायणाने पुण्य क्षेत्र असलेल्या भारतातील, जान्हवीच्या काठी वाल्मीकीला हाच मंत्र उपदेशिला होता. त्यानंतर हाच मंत्र भृगूनेही सूर्यग्रहणाचे वेळी पुष्कर तीर्थावर शुक्राला सांगितला. चंद्रग्रहणाचे वेळी मारिचमुनींनी या मंत्राची दीक्षा बृहस्पतीला दिली. ब्रह्मदेवाने अत्यंत प्रसन्न होऊन हाच मंत्र भृगूला बद्रिकाश्रमात दिला.
क्षीरसमुद्राच्या काठी जरत्कारूने हाच महामंत्र अस्तिकाला सांगितला. विभांडकाने मेरूपर्वतावर ॠष्यशुंगाला हाच मंत्र शिकविला. शंकराने हा मंत्र कणादमुनींना दिला. आनंद ॠषींनी गौतमाला दिला. सूयनि याज्ञवल्क्याला व कात्यायनाला दिला. शेषाने पाणिनीला व बुद्धीश्रेष्ठ भारद्वाजाला ह्याच मंत्राचा उपदेश केला. तसेच त्याने सुतल लोकांमध्ये बलीसभेत असताना शाकटायनाला दिला.
या मंत्राचा चार लक्ष जप केल्यास हा मंत्र मनुष्यलोकीही सिद्ध होतो. त्यायोगे मंत्र उच्चारणारा बृहस्पतीप्रमाणे विद्वान होतो. हे विप्रश्रेष्ठ नारदा, विश्वाचा निर्माता तो ब्रह्मदेव, त्याने गंधमादन पर्वतावर त्या सरस्वतीचे कवच भृगूला दिले. ते आता तुला सांगतो. ते एकाग्रतेने तू ऐक व ग्रहण कर.
त्यावेळी भृगु ब्रह्मदेवाला म्हणाला, हे सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेवा, हे सर्वेश्वरा, हे सर्वांनी पूजित असलेल्या प्रभो, हे ब्रह्मज्ञाननिपुणा, हे सर्वज्ञा, हे सर्वोत्पादका, हे सर्वेश्वरा, हे विश्वविजयी, हे श्रेष्ठा, या जगात सर्वंकष यश मिळवण्यासाठी काय करावे ? ते यश देणारे सर्वश्रेष्ठ व निर्दोष असे अनेक मंत्रांनी युक्त असलेले ते सरस्वतीकवच आपण मला निवेदन करा."
भृगूचे भाषण ऐकून ब्रह्मदेव संतुष्ट होऊन भृगूला म्हणाला, "हे पुत्रा, श्रुतींनी सार असलेले, ऐकण्यास श्रुतिमधुर, श्रुतींनी पूजित, असे सर्वकाम देणारे ते सरस्वती कवच मी तुला सांगतो. ऐक.
तो सर्वश्रेष्ठ प्रभु, रासक्रीडांना ईश्वर, अशा श्रीकृष्णाने, रासक्रीडेच्या प्रसंगी, गोलोकांमध्ये, वृंदावनातील रासमंडलामध्ये, मला ते निवेदन केले. ते कवच अत्यंत गुप्त आहे. पण ते कल्पवृक्षाप्रमाणे श्रेष्ठ आहे. तसेच ते कवच कधीही न ऐकलेल्या मंत्रांनी युक्त आहे. हे कवच धारण केल्यावर भगवान शुक्र हा सर्व दैत्यांना पूज्य झाला.
त्याचप्रमाणे हे ब्राह्मणा, हे कवच धारण केल्याने अथवा पठण केल्याने बृहस्पतीही अति बुद्धिमान झाला. त्याच्या नित्य पठणाने व ते धारण केल्याने कविश्रेष्ठ वाल्मीकिमुनी श्रेष्ठ वक्ता झाला. स्वयंभुव मनूसुद्धा हे कवच धारण केल्यामुळे सर्वमान्य झाला.
कणाद, गौतम, कण्व, पाणिनी, शाकटायन, दक्ष, कात्यायन हे स्वतः धारण केल्यामुळे ग्रंथकार झाले. त्याच्या धारणामुळे कृष्णद्वैपायनाने स्वतः सहजच लीलेने सर्व पुराणे रचली व वेदांचे विभाग केले. शांतातप, संवर्त वसिष्ठ, पराशर, याज्ञवल्क्य यांनी हे कवच धारण केल्यामुळे मोठे ग्रंथ निर्माण केले. ॠष्यशृंग, भारद्वाज, अस्तिक, देवल, जैगीश्वर, ययाती हे ह्या कवचाच्या पठणामुळेच सर्वत्र पूज्य झाले. हे विप्रश्रेष्ठा, या कवचाचा ऋषी स्वतः प्रजापती, छंद बृहती व देवता शारदांबिका आणि सर्व तत्त्वाचे संपूर्ण ज्ञान, सर्व अर्थ साधने, सर्व कविता, या सर्वांचे ठिकाणी विनियोग सांगितला आहे.
"ॐ श्रीं र्हीं सरस्वत्यै स्वाहा ।" माझ्या ललाटाचे सर्वदा रक्षण करो.
"ॐ श्रीं र्हीं सरस्वत्यै स्वाहा ।" माझ्या कर्णाचे नित्य रक्षण करो.
"ॐ श्रीं र्हीं भगवत्यै सरस्वत्यै स्वाहा ।" माझे दोन्ही नेत्र सदा सुरक्षित राहोत.
"ॐ ऐं र्हीं वाग्वादिन्यै स्वाहा ।" माझ्या नासिकांचे सर्वदा रक्षण होवो.
"ॐ र्हीं विद्याधिष्ठातृदैव्यै स्वाहा ।" माझ्या ओष्ठाचे नित्य रक्षण होवो.
"ॐ श्रीं र्हीं ब्राह्मयै स्वाहा ।" माझ्या दंतपंक्तींचे रक्षण होवो.
"ऐं" हा एकाक्षरी मंत्र माझा कंठ सदा सुरक्षित स्थितीत ठेवो.
"ॐ श्रीं र्हीं" माझी मान सदा सुरक्षित राहो.
"श्रीं" स्कंधाचे संरक्षण करो.
"ॐ र्हीं विद्याधिष्ठातृदेव्यै स्वाहा ।" ती देवी सर्वदा हृदयाचे रक्षण करो.
"ॐ र्हीं विधाधि स्वरुपायैः स्वाहा ।" हा मंत्र माझ्या नासिकेचे संरक्षण करो.
"ॐ र्हीं क्लीं वाण्यै स्वाहा ।" ह्या मंत्रामुळे माझ्या हातांचे नित्य रक्षण होवो.
"ॐ वागाधिष्ठातृदेव्है स्वाहा ।" हा मंत्र सर्वांचे नित्य संरक्षण करो.
"ॐ सर्वकंठवासिन्यै स्वाहा ।" हा पूर्वेमध्ये रक्षण करो.
"ॐ सर्व जिव्हाग्रवासिन्यै स्वाहा ।" हा आग्नेय दिशेस रक्षण करो.
"ॐ ऐं र्हीं क्लीं सरस्वत्यै बुधजनै स्वाहा" ह्या मंत्रराजामुळे माझे नेहमीच दक्षिण दिशेला संरक्षण होवो.
"ॐ ऐं र्हीं श्रीं ।" हा तीन अक्षर मंत्र माझे सर्वदा नैऋत्य दिशेला रक्षण करो.
"ॐ ऐं जिव्हाग्रवासिन्यै स्वाहा ।" हा मंत्र माझे पश्चिम दिशेस संरक्षण करो.
"ॐ सर्वांबिकायै स्वाहा ।" हा वायव्य दिशेस माझे रक्षण करो.
"ॐ श्रीं क्लीं गद्यावासिन्यै स्वाहा ।" हा मंत्र माझे उत्तर दिशेला संरक्षण करो.
"ॐ ऐं सर्वशास्त्रवासिन्यै स्वाहा ।" या मंत्रामुळे माझे सर्वदा ईशान्य दिशेस रक्षण होवो.
"ॐ र्हीं सर्वपूजितायै स्वाहा ।" हा मंत्र ऊर्ध्व दिशेमध्ये माझे नित्य रक्षण करो.
"ॐ र्हीं पुस्तकवासिन्यै स्वाहा ।" ह्या मंत्राच्या योगाने माझे अधोदिशेस रक्षण होवो.
"ॐ ग्रंथबीज स्वरुपायै स्वाहा ।" हा मंत्र माझे सर्व बाजूस रक्षण करो.
अशाप्रकारे हे विप्रश्रेष्ठा, विश्वजय नावाचे हे मूलतः स्वतःच ब्रह्मरूप असलेले कवच मी तुला सांगितले. गंधमादन पर्वतावर असताना मी हे धर्माच्या तोंडून श्रवण केले. हे गुरु असले तरी माझे तुझ्यावर प्रेम असल्यामुळे मी तुला हे सांगितले आहे. पण हे कोणालाही सांगू नये. ज्याला हे ग्रहण करायचे असेल त्या बुद्धिश्रेष्ठाने गुरूंची वस्त्रे, अलंकार, चंदन यांच्या योगाने यथाशास्त्र पूजा करावी. दंडाप्रमाणे भूमीवर लोटांगण घालावे व त्याचे ग्रहण करावे.
या कवचाचा पाच लक्ष वेळा जप करावा. म्हणजे ते सिद्ध होते. ज्याने कवच सिद्ध केले असेल तो महाबुद्धीमान, वक्ता, श्रेष्ठ कवी व त्रैलोक्यात सर्व विजयी होतो. तो या कवचाच्या प्रसादामुळे सर्वांना जिंकतो. हे मुनीश्रेष्ठा, हे कण्वशाखेमध्ये सांगितलेले कवच असून मी सांप्रत तुला कथन केले. आता मी तुला देवीचे संपूर्ण स्तोत्र, पूजेचे प्रकार व विधी, ध्यान व वंदन याविषयी सर्व सांगतो. तू ऐक.