श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
नवमः स्कन्धः
तृतीयोऽध्यायः


ब्रह्मविष्णुमहेश्वरादिदेवतोत्पत्तिवर्णनम्

श्रीनारायण उवाच
अथ डिम्भो जले तिष्ठन्यावद्वै ब्रह्मणो वयः ।
ततः स काले सहसा द्विधाभूतो बभूव ह ॥ १ ॥
तन्मध्ये शिशुरेकश्च शतकोटिरविप्रभः ।
क्षणं रोरूयमाणश्च स्तनान्धः पीडितः क्षुधा ॥ २ ॥
पित्रा मात्रा परित्यक्तो जलमध्ये निराश्रयः ।
ब्रह्माण्डासंख्यनाथो यो ददर्शोर्ध्वमनाथवत् ॥ ३ ॥
स्थूलास्थूलतमः सोऽपि नाम्ना देवो महाविराट् ।
परमा्णुर्यथा सूक्ष्मात्परः स्थूलात्तथाप्यसौ ॥ ४ ॥
तेजसा षोडशांशोऽयं कृष्णस्य परमात्मनः ।
आधारः सर्वविश्वानां महाविष्णुश्च प्राकृतः ॥ ५ ॥
प्रत्येकं लोमकूपेषु विश्वानि निखिलानि च ।
अस्यापि तेषां संख्यां च कृष्णो वक्तुं न हि क्षमः ॥ ६ ॥
संख्या चेद्‌रजसामस्ति विश्वानां न कदाचन ।
ब्रह्मविष्णुशिवादीनां तथा संख्या न विद्यते ॥ ७ ॥
प्रतिविश्वेषु सन्त्येवं ब्रह्मविष्णुशिवादयः ।
पातालाद्‌ ब्रह्मलोकान्तं ब्रह्माण्डं परिकीर्तितम् ॥ ८ ॥
तत ऊर्ध्वं च वैकुण्ठो ब्रह्माण्डाद्‌ बहिरेव सः ।
तत ऊर्ध्वं च गोलोकः पञ्चाशत्कोटियोजनः ॥ ९ ॥
नित्यः सत्यस्वरूपश्च यथा कृष्णस्तथाप्ययम् ।
सप्तद्वीपमिता पृध्वी सप्तसागरसंयुता ॥ १० ॥
ऊनपञ्चाशदुपद्वीपासंख्यशैलवनान्विता ।
ऊर्ध्वं सप्त स्वर्गलोका ब्रह्यलोकसमन्विताः ॥ ११ ॥
पातालानि च सप्ताधश्चैवं ब्रह्माण्डमेव च ।
ऊर्ध्वं धराया भूर्लोको भुवर्लोकस्ततः परम् ॥ १२ ॥
ततः परश्च स्वर्लोको जनलोकस्तथा परः ।
ततः परस्तपोलोकः सत्यलोकस्ततः परः ॥ १३ ॥
ततः परं ब्रह्मलोकस्तप्तकाञ्चनसन्निभः ।
एवं सर्वं कृत्रिमं च बाह्याभ्यन्तरमेव च ॥ १४ ॥
तद्विनाशे विनाशश्च सर्वेषामेव नारद ।
जलबुद्‌बुदवत्सर्वं विश्वसंघमनित्यकम् ॥ १५ ॥
नित्यौ गोलोकवैकुण्ठौ प्रोक्तौ शश्वदकृत्रिमौ ।
प्रत्येकं लोमकूपेषु ब्रह्माण्डं परिनिश्चितम् ॥ १६ ॥
एषां संख्यां न जानाति कृष्णोऽन्यस्यापि का कथा ।
प्रत्येकं प्रतिब्रह्माण्डं ब्रह्मविष्णुशिवादयः ॥ १७ ॥
तिस्रः कोट्यः सुराणां च संख्या सर्वत्र पुत्रक ।
दिगीशाश्चैव दिक्पाला नक्षत्राणि ग्रहादयः ॥ १८ ॥
भुवि वर्णाश्च चत्वारोऽप्यधो नागाश्चराचराः ।
अथ कालेऽत्र स विराडूर्ध्वं दृष्ट्वा पुनः पुनः ॥ १९ ॥
डिम्भान्तरे च शून्यं च न द्वितीयं च किञ्चन ।
चिन्तामवाप क्षुद्युक्तो रुरोद च पुनः पुनः ॥ २० ॥
ज्ञानं प्राप्य तदा दध्यौ कृष्णं परमपूरुषम् ।
ततो ददर्श तत्रैव ब्रह्मज्योतिः सनातनम् ॥ २१ ॥
नवीनजलदश्यामं द्विभुजं पीतवाससम् ।
सस्मितं मुरलीहस्तं भक्तानुग्रहकातरम् ॥ २२ ॥
जहास बालकस्तुष्टो दृष्ट्वा जनकमीश्वरम् ।
वरं तदा ददौ तस्मै वरेशः समयोचितम् ॥ २३ ॥
मत्समो ज्ञानयुक्तश्च क्षुत्पिपासादिवर्जितः ।
ब्रह्माण्डासंख्यनिलयो भव वत्स लयावधि ॥ २४ ॥
निष्कामो निर्भयश्चैव सर्वेषां वरदो भव ।
जरामृत्युरोगशोकपीडादिवर्जितो भव ॥ २५ ॥
इत्युक्त्वा तस्य कर्णे स महामन्त्रं षडक्षरम् ।
त्रिःकृत्वश्च प्रजजाप वेदाङ्‌गप्रवरं परम् ॥ २६ ॥
प्रणवादिचतुर्थ्यन्तं कृष्ण इत्यक्षरद्वयम् ।
वह्निजायान्तमिष्टं च सर्वविघ्नहरं परम् ॥ २७ ॥
मन्त्रं दत्त्वा तदाहारं कल्पयामास वै विभुः ।
श्रूयतां तद्‌ ब्रह्मपुत्र निबोध कथयामि ते ॥ २८ ॥
प्रतिविश्वं यन्नैवेद्यं ददाति वैष्णवो जनः ।
तत्षोडशांशो विषयिणो विष्णोः पज्वदशास्य वै ॥ २९ ॥
निर्गुणस्यात्मनश्चैव परिपूर्णतमस्य च ।
नैवेद्ये चैव कृष्णस्य न हि किञ्चित्प्रयोजनम् ॥ ३० ॥
यद्यद्ददाति नैवेद्यं तस्मै देवाय यो जनः ।
स च खादति तत्सर्वं लक्ष्मीनाथो विराट् तथा ॥ ३१ ॥
तं च मन्त्रवरं दत्त्वा तमुवाच पुनर्विभुः ।
वरमन्यं किमिष्टं ते तन्मे ब्रूहि ददामि च ॥ ३२ ॥
कृष्णस्य वचनं श्रुत्वा तमुवाच विराड् विभुः ।
कृष्णं तं बालकस्तावद्वचनं समयोचितम् ॥ ३३ ॥
बालक उवाच
वरो मे त्वत्पदाम्भोजे भक्तिर्भवतु निश्चला ।
सततं यावदायुर्मे क्षणं वा सुचिरं च वा ॥ ३४ ॥
त्वद्‍भक्तियुक्तलोकेऽस्मिञ्जीवन्मुक्तश्च सन्ततम् ।
त्वद्‍भक्तिहीनो मूर्खश्च जीवन्नपि मृतो हि सः ॥ ३५ ॥
किं तज्जपेन तपसा यज्ञेन पूजनेन च ।
व्रतेन चोपवासेन पुण्येन तीर्थसेवया ॥ ३६ ॥
कृष्णभक्तिविहीनस्य मूर्खस्य जीवनं वृथा ।
येनात्मना जीवितश्च तमेव न हि मन्यते ॥ ३७ ॥
यावदात्मा शरीरेऽस्ति तावत्स शक्तिसंयुतः ।
पश्चाद्यान्ति गते तस्मिन्स्वतन्त्राः सर्वशक्तयः ॥ ३८ ॥
स च त्वं च महाभाग सर्वात्मा प्रकृतेः परः ।
स्वेच्छामयश्च सर्वाद्यो ब्रह्मज्योतिः सनातनः ॥ ३९ ॥
इत्युक्त्वा बालकस्तत्र विरराम च नारद ।
उवाच कृष्णः प्रत्युक्तिं मधुरां श्रुतिसुन्दरीम् ॥ ४० ॥
श्रीकृष्ण उवाच
सुचिरं सुस्थिरं तिष्ठ यथाहं त्वं तथा भव ।
ब्रह्मणोऽसंख्यपाते च पातस्ते न भविष्यति ॥ ४१ ॥
अंशेन प्रतिब्रह्माण्डे त्वं च क्षुद्रविराड् भव ।
त्वन्नाभिपद्माद्‌ ब्रह्मा च विश्वस्रष्टा भविष्यति ॥ ४२ ॥
ललाटे ब्रह्मणश्चैव रुद्राश्चैकादशैव ते ।
शिवांशेन भविष्यन्ति सृष्टिसंहरणाय वै ॥ ४३ ॥
कालाग्निरुद्रस्तेष्वेको विश्वसंहारकारकः ।
पाता विष्णुश्च विषयी रुद्रांशेन भविष्यति ॥ ४४ ॥
मद्‍भक्तियुक्तः सततं भविष्यसि वरेण मे ।
ध्यानेन कमनीयं मां नित्यं द्रक्ष्यसि निश्चितम् ॥ ४५ ॥
मातरं कमनीयां च मम वक्षःस्थलस्थिताम् ।
यामि लोकं तिष्ठ वत्सेत्युक्त्वा सोऽन्तरधीयत ॥ ४६ ॥
गत्वा स्वलोकं ब्रह्माणं शङ्‌करं समुवाच ह ।
स्रष्टारं स्रष्टुमीशं च संहर्तुं चैव तत्क्षणम् ॥ ४७ ॥
श्रीभगवानुवाच
सृष्टिं स्रष्टुं गच्छ वत्स नाभिपद्मोद्‍भवो भव ।
महाविराड् लोमकूपे क्षुद्रस्य च विधे शृणु ॥ ४८ ॥
गच्छ वत्स महादेव ब्रह्मभालोद्‍भवो भव ।
अंशेन च महाभाग स्वयं च सुचिरं तप ॥ ४९ ॥
इत्युक्त्वा जगतां नाथो विरराम विधेः सुत ।
जगाम ब्रह्मा तं नत्वा शिवश्च शिवदायकः ॥ ५० ॥
महाविराड् लोमकूपे ब्रह्माण्डगोलके जले ।
बभूव च विराट् क्षुद्रो विराडंशेन साम्प्रतम् ॥ ५१ ॥
श्यामो युवा पीतवासाः शयानो जलतल्पके ।
ईषद्धास्यः प्रसन्नास्यो विश्वव्यापी जनार्दनः ॥ ५२ ॥
तन्नाभिकमले ब्रह्मा बभूव कमलोद्‍भवः ।
सम्भूय पद्मदण्डे च बभ्राम युगलक्षकम् ॥ ५३ ॥
नान्तं जगाम दण्डस्य पद्मनालस्य पद्मजः ।
नाभिजस्य च पद्मस्य चिन्तामाप पिता तव ॥ ५४ ॥
स्वस्थानं पुनरागम्य दध्यौ कृष्णपदाम्बुजम् ।
ततो ददर्श क्षुद्रं तं ध्यानेन दिव्यचक्षुषा ॥ ५५ ॥
शयानं जलतल्पे च ब्रह्माण्डगोलकाप्लुते ।
यल्लोमकूपे ब्रह्माण्डं तं च तत्परमीश्वरम् ॥ ५६ ॥
श्रीकृष्णं चापि गोलोकं गोपगोपीसमन्वितम् ।
तं संस्तूय वरं प्राप ततः सृष्टिं चकार सः ॥ ५७ ॥
बभूवुर्ब्रह्मणः पुत्रा मानसाः सनकादयः ।
ततो रुद्रकलाश्चापि शिवस्यैकादश स्मृताः ॥ ५८ ॥
बभूव पाता विष्णुश्च क्षुद्रस्य वामपार्श्वतः ।
चतुर्भुजश्च भगवान् श्वेतद्वीपे स चावसत् ॥ ५९ ॥
क्षुद्रस्य नाभिपद्मे च ब्रह्मा विश्वं ससर्ज ह ।
स्वर्गं मर्त्यं च पातालं त्रिलोकीं सचराचराम् ॥ ६० ॥
एवं सर्वं लोमकूपे विश्वं प्रत्येकमेव च ।
प्रतिविश्वे क्षुद्रविराड् ब्रह्मविष्णुशिवादयः ॥ ६१ ॥
इत्येवं कथितं ब्रह्मन् कृष्णसङ्‌कीर्तनं शुभम् ।
सुखदं मोक्षदं ब्रह्मन्किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥ ६२ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे ब्रह्मविष्णुमहेश्वरादि-
देवतोत्पत्तिवर्णनं नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥


विराट् स्वरूपाचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारायणमुनी नारदाला म्हणाले, "हे नारदा, ब्रह्मदेवाचे आयुष्य असेपर्यंत ते बालक पाण्यातच राहिले. त्यानंतर काही काल संपूर्ण होताच त्या बालकाचेही एकाएकी दोन भाग झाले. तो बालक एक कोटी सूर्याच्या प्रभेइतका अत्यंत तेजस्वी होता. पण स्तनपान न मिळाल्यामुळे भुकेने अतिशय आक्रोश करू लागला. पित्याने व मातेने दोघांनीही त्याला जलात टाकून त्याचा त्यागच केला होता. त्यामुळे तेथील उदकात तो निराश्रिताप्रमाणे रहात होता. वास्तविक पहाता तो या असंख्य ब्रह्मांडाचा स्वामी होता. पण तरीही एखाद्या अनाथाप्रमाणे, 'माझे आता कोण रक्षण करणार ?' असे म्हणून त्याने वर पाहिले.

तो सर्व पृथ्वी वगैरे पदार्थापेक्षाही स्थूल होता. तो स्वतः देव असून तो महाविराट या नावाने प्रसिद्ध झाला. म्हणजे परमाणू ज्याप्रमाणे अत्यंत सूक्ष्म अणूहूनही सूक्ष्म असतो, तसा हा बालकदेखील सर्व स्थूल पदार्थाहूनही स्थूल होता.

श्रीकृष्ण परमात्म्याच्या तेजाचा सोळावा अंश इतके तेज त्याचे ठिकाणी होते. तोच सर्व भूतांचा आधार असून प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तो महाविष्णु हाच होय.

त्याच्या प्रत्येक रोमरंध्रामध्ये सर्व विश्वे रहात असतात. त्याच्या शरीरावरील या विश्वांची संख्या, स्वतः परमात्मा भगवान कृष्णालाही सांगता येणार नाही. एखादे वेळी पृथ्वीवरील धूलीकण मोजता येतात, पण त्याच्या शरीरावरील विश्वांची गणना करणे शक्य नाही.

तसेच ब्रह्मा, विष्णु, महेश यांचीही संख्या करवत नाही. प्रत्येक विश्वात हे असेच ब्रह्मदेव, विष्णु आणि महेश्वर वगैरे देव आहेतच.

पातालापासून ब्रह्मलोकापर्यंत असे एक ब्रह्मांड असते. त्याच्या पलीकडे वैकुंठ लोक असतो. तो मात्र ब्रह्मांडाच्या बाहेर आहे. त्याच्यापुढे गोलोक आहे. तो पन्नास कोटी योजने विस्तीर्ण आहे.

कृष्णाप्रमाणेच गोलोकही नित्य आहे. तसेच सत्यस्वरूपही आहे. पृथ्वी सप्तद्वीपांच्या परिमाणाची असून सप्त सागरांनी युक्त आहे. त्या पृथ्वीवरील असंख्य पर्वत व नानाविध वने असून ती पृथ्वी एकूण पन्नास योजने विस्तीर्ण आहे.

ब्रह्मलोकासह वरचे सात लोक व पातालातील सात अधोलोक मिळून ब्रह्मांड होते. पृथ्वीवर भूर्लोक व त्याच्याही वरती भूवर्लोक असून त्यावर स्वर्गलोक आहे. त्याच्या पलीकडे वरच्याच बाजूला जनलोक आहे. त्यानंतर सर्वांत उत्तम असा तपोलोक व सर्वात शेवटी वरती सत्यलोक आहे. त्याच्यापुढे तापवलेल्या सुवर्णाच्या कांतीप्रमाणे तेजस्वी असा ब्रह्मलोक आहे.

तेव्हा हे नारदा, अशाप्रकारे हे सर्व आतून व बाहेरून कृत्रिम आहे. पण हे देवर्षे, याचा विनाश झाला असता सर्वांचाच विनाश होतो. कारण हे सर्व विश्व पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे अनित्य आहे.

गोलोक व वैकुंठलोक सदासर्वदा अकृत्रिम असून नित्य आहेत. हे प्रलयावस्थेपर्यंत रहात असतात. त्यामुळे त्यांना नित्य म्हणतात.

ईश्वराच्या प्रत्येक रोमरंध्रामध्ये एकेक ब्रह्मांड वसलेले आहे. हे मी तुला सांगितलेच. त्यांची संख्या स्वतः कृष्णही जाणत नाही, मग अल्प जनांची गोष्ट पाहिजे कशाला ?

ह्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये निरनिराळे ब्रह्मा, विष्णु व महेश्वर आहेत. ते आता निराळे सांगणे नको. जितकी ब्रह्मांडे तितके हे ब्रह्मा, विष्णु महेश्वर नित्य आहेत.

हे ब्रह्मपुत्रा नारदा, या सर्व ठिकाणी देवांची संख्या मात्र तीन कोटीच सांगितली आहे. दिशांचे स्वामी, दिक्पाल, नक्षत्रे, ग्रह वगैर भूलोकी चार वर्ण, अधोलोकातील नाग, चराचर सृष्टी हे सर्व ब्रह्मांडामध्ये आहे.

पुष्कळ कालानंतर त्या विराटाने पुन्हा पुन्हा वर पाहिले त्या बालरूप अंडयामध्ये अन्य काही एक नाही, शून्य म्हणजे अस्तित्त्व नसलेले असे आहे म्हणून अत्यंत भूक लागल्यामुळे तो बालक महाचिंतेत पडला आणि वारंवार रडू लागला. इतक्यात त्याला वृत्तिज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे त्याने तत्काळ परमपुरुष कृष्णाचे ध्यान केले. कृष्णाचे ध्यान करताच त्याने आपल्या वृत्तीतच ब्रह्मज्योत पाहिली. ती आश्चर्याने पाहू लागला.

नूतन मेघाप्रमाणे श्यामवर्ण, द्विभुज, पीतांबरधारी, हसतमुख, मुरलीधर व भक्तांवर अनुग्रह करण्या तत्पर अशा त्या ईश्वररूप जनकाला पाहून तो बालक आनंदित होऊन गेला व हसला. त्याचवेळी वर देण्यात तत्पर असलेल्या ईश्वराने सुयोग्य वर दिला. परमात्मा श्रीकृष्ण म्हणाला, "हे बालका, तू प्रलयापर्यंत माझ्यासारखा ज्ञानयुक्त, क्षुधा व तृषा यांनी रहित व असंख्य ब्रह्मांडाचे वसतीस्थान हो. तसेच तू निष्काम, निर्भय व सर्वांना वर देणारा हो. जरा, मृत्यु, रोग, शोक, पीडा इत्यादी तुला प्राप्त होणार नाहीत."

अशाप्रकारे त्या बालकाला वर दिल्यावर त्याच्या कानात षडाक्षरी मंत्र तीन वेळा सांगितला. तो वेदांगातील एक श्रेष्ठ असा महामंत्र होता. त्याची आरंभी प्रणव व कृष्ण ही दोन अक्षरे चतुर्थी विभक्त्यंत व शेवटी अग्निजाया स्वाहा इतके मिळून तो अत्यंत इष्ट व सर्व विघ्नांचे हरण करणारा असा मंत्र होता.

ह्याप्रमाणे त्या बालकाला वर व मंत्र देऊन त्या भगवान कृष्णाने त्याच्या आहाराबद्दल सांगितले. हे ब्रह्मपुत्रा नारदा, त्याबद्दल आता मी तुला सर्व काही सांगतो. तू श्रवण कर.

प्रत्यक्ष विश्वात वैष्णव लोक जो नैवेद्य समर्पण करतात त्याचा सोळावा अंश असा तो पुरुषाचा व पंधरा अंश विष्णूचे असतात. तो विष्णु नावाचा आत्मा निर्गुण व अत्यंत परिपूर्ण आहे. त्यामुळे त्या कृष्णाला नैवेद्याची काही एक आवश्यकता नाही. म्हणून पुरुषाने देवाला दाखविलेला कुठलाही नैवेद्य तो सर्व तो लक्ष्मीनाथ तसेच तो विराट् खातो.

अशा रीतीने उत्तम प्रकारचा वर दिल्यावर तो भगवान प्रभु त्याला म्हणाला, "हे पुत्रा, तुला आणखी कोणता वर पाहिजे ते तू सत्वर सांग म्हणजे मी तुला तसा वर देईन."

कृष्णाचे ते बोलणे ऐकल्यावर तो प्रभु विराट कृष्णाबरोबर समयोचित भाषण करू
लागला. तो म्हणाला, "माझे हे सर्व आयुष्य संपेपर्यंत माझी भक्ती तुझ्या पदकमली स्थिर व्हावी. मग ते आयुष्य क्षणभराचे असो अथवा शेकडो वर्षाचे असो. भक्ती निश्चल राहो असा मला वर पाहिजे. कारण या लोकात तुझी भक्ती नित्य करणारा पुरुष नेहमीच जीवनमुक्त असतो. तुझ्या भक्तीशिवाय जिवंत रहाणे हे मूर्खपणाचे व मृत्युसारखे आहे.

भक्ती नसल्यास जपाने, तपाने, यज्ञाने, पूजनाने, व्रताने, उपवासाने, पुण्याने, तीर्थवासाने काय बरे कार्य होणार ? खरोखरच, ज्याच्या अंतःकरणात श्रीकृष्णाबरोबर भक्ती नाही त्याचे आयुष्य व्यर्थ आहे. अहो, प्रत्यक्ष हा जीव ज्या आत्म्यामुळे जिवंत रहातो, त्यालाच त्याने मानले नाही तर काय उपयोग ? त्या शरीरात जोपर्यंत आत्मा आहे तोवरच सर्व ठीक. आत्मा निघून गेल्यास त्याच्या निर्माण झालेल्या शक्तीही निघून जातात.

म्हणूनच हे महाउदारा, तो आत्मा तूच आहेस. तूच सर्वांचा आत्मा असून प्रकतीहूनही उत्तम आहेस. तू स्वेच्छामय असून सर्वांचा आदि व सनातन ब्रह्मज्योती आहेस." असे म्हणून तो बालक स्तब्ध झाला. हे नारदा, तेव्हा कृष्ण अत्यंत गोड असे भाषण बोलला, ते श्रवण करण्यास फारच मधुर आहे.

श्रीकृष्ण विराटाला म्हणाले, "हे विराट्, तू अनंत कालपर्यंत रहाशील व पुढे निश्चल राहून माझ्यासारखा होशील. ब्रह्मदेवाने जरी असंख्य पात केले तरी तुझा पात होणार नाही.

प्रत्येक वेगवेगळ्या ब्रह्मांडामध्ये तू पृथक पृथक विराट् होऊन रहा म्हणजे आत्म्याच्या अंशाने तू प्रत्येक ब्रह्मांडात वास्तव्य कर.

विश्वाची निर्मिती करणारा ब्रह्मदेव तुझ्याच नाभीकमलापासून उत्पन्न होईल. नंतर या विश्वाचा लय करणारा भगवान रुद्र शंकराच्या अंशाने त्या ब्रम्ह्याच्या ललाटापासून निर्माण होईल. ते सुप्रसिद्ध असे अकरा रुद्र होतील.

त्या अकरापैकी कालाग्नी नावाचा रुद्र हा सर्व विश्वाचा संहार करणार आहे. तसेच त्या विश्वाचे रक्षण करणारा, विषयोपभोग घेणारा असा तो भगवान विष्णु अल्पांशाने उत्पन्न होईल.

त्याचप्रमाणे माझ्या वरामुळे तू नित्य माझी शक्ती करीत रहाशील. मी नित्य सुंदर असून केवळ तू ध्यानाच्या बळानेच मला नित्य पहात रहाशील. तसेच तुझी ती सुंदर माता माझ्याच वक्षस्थलावर स्थित असून तू तिलाही तेथे पहाशील.

हे विराट्, आता मी स्वर्गलोकी जातो. हे वत्सा, सांप्रत त्याच ठिकाणी वास्तव्य कर.

असे म्हणून तो भगवान श्रीकृष्ण त्याच क्षणी व त्याच ठिकाणी गुप्त झाला. तो भगवान श्रीकृष्ण आपल्या स्थानी परत गेल्यावर त्याने भगवान ब्रह्मदेवाला तत्काळ सृष्टी उत्पन्न करण्याची आज्ञा केली व शंकरालाही संहार काली सृष्टीचा लय करण्याबद्दल सांगितले.

श्री भगवान म्हणाले, "हे वत्सा, आता तू सृष्टी उत्पन्न करण्यासाठी सत्वर जा. महाविराटांच्या रोमरंध्रात क्षुद्र विराटाचे नाभिकमल आहे. त्यात तू उत्पन्न हो. हे विधे, आता मी सांगतो ते शांतपणे ऐक.

हे वत्सा, हे महादेवा, हे महाउदारा, तू आता जा. या अनेक ब्रह्मांडात अनेक ब्रह्मदेव आहेत. त्यांच्या ललाटापासून तू उत्पन्न हो. त्यानंतर तू पुष्कळ काल तपश्चर्या करीत रहा

हे विधिसुता, तू आता सत्वर कार्याला लाग." असे म्हणून भगवान कृष्ण, तो जगन्नाथ स्तब्ध झाला. तेव्हा ब्रह्मदेव व कल्याणकारी शिव त्या जगन्नाथाला प्रणाम करून निघून गेला. स्वतःच्या अंशाने तो इकडे महाविराटाच्या रोमरंध्रामध्ये असलेल्या, ब्रह्मांडगोलातील जलाशयात त्वरित क्षुद्र विराट झाला.

त्यावेळी तो शामल वर्णाचा होता. त्याने पीत वस्त्रे परिधान केली होती. जलरूपी शय्येवर तो निद्रिस्त झाला होता. असा तो हसतमुख व प्रसन्नचित्त असणारा असा, एकमेव विश्वाला व्यापून टाकणारा असा तो जनार्दन होता.

काही कालाने त्याच्या नाभिकमलापासून ब्रह्मदेव उत्पन्न झाला. ब्रह्मदेव कमलाच्या देहावर चढून आपल्या उत्पत्ती स्थानाला शोध घेत फिरू लागला. अशाप्रकारे तो एक लक्ष युगे फिरत होता, पण त्या कमलोद्‌भव ब्रह्मदेवाला नाभिपासून निघालेल्या या देहाचा शोध लागलाच नाही.

तेव्हा मात्र हे नारदा, तुझ्या पित्याला अत्यंत काळजी वाटू लागली. तो पुन्हा मूळ ठिकाणी परत आला. तो कृष्णाचे पदकमलांचे चिंतन करू लागला. अखेरीस ध्यानाच्या बलाने त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि त्याला क्षुद्र विराटाचे दर्शन झाले. तो क्षुद्र विराट ब्रह्मांडगोलातील जलशय्येवर पहुडला होता. त्या परमेश्वराला ब्रह्मदेवाने पाहिले. त्यानंतर ती त्या जगन्नाथाची स्तुती करू लागला. तेथे त्या जगन्नाथाच्या रोमरंध्रातील ब्रह्मांड त्याने पाहिले. त्या ठिकाणी श्रीकृष्ण व गोपगोपींनी भरलेली असंख्य गोलकेही होती. तेव्हा आश्चर्यमुग्ध होऊन ब्रह्मदेव त्याचे स्तवन करू लागला.

जगन्नाथाने ब्रह्मदेवाला वर दिला. तेव्हा त्याने सृष्टी निर्माण केली. सनकादिक वगैरे ब्रह्मदेवाने मानसपुत्र निर्माण केले. नंतर शिवाच्या प्रसिद्ध अकरा रुद्रकला निर्माण झाल्या. त्या क्षुद्र विराटाच्या डाव्या भागापासून सर्व विश्वाचे रक्षण करणारा तो भगवान विष्णु उत्पन्न झाला. तो भगवान श्वेतद्वीपामध्ये वास्तव्य करीत होता. त्याला चार हात होते. त्यानंतर त्या क्षुद्र विराटाच्या नाभिकमलात ब्रह्मदेवाने स्वर्गलोक, मृत्युलोक व पाताल याप्रमाणे चराचर त्रैलोक्य निर्माण करून सृष्टीची रचना केली.

अशाप्रकारे विराटाच्या रोमरंध्रामध्ये एक एक नवे विश्व निर्माण केले. प्रत्येक विश्वात एक एक क्षुद्र विराट, ब्रह्मा, विष्णु, महेश इत्यादि सर्वजण वेगळे वेगळे निर्माण केलेले असतात.

अशाप्रकारे हे ब्राह्मण, हे नारदमुने, त्या भगवान श्रीकृष्णाचे शुभ चरित्र मी तुला निवेदन केले, आता तुला माझ्याकडून आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे ते सांग.


अध्याय तिसरा समाप्त

GO TOP