[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नारद म्हणाले, "हे प्रभो, आपण संक्षेपाने सांगितलेले देवीचे सर्व चरित्र मी श्रवण केले. पण आता मला हे सर्व विस्तृतपणे कथन करा. ह्या प्रकृतीने ही सृष्टी द्वैतरूप का निर्माण केली ? तिने असे स्वरूप का प्रगट केले ? तसेच ती कोणत्या कारणामुळे पाच प्रकारांची झाली ?
हे श्रेष्ठ वेदवेत्त्या, आपण माझ्या मनातील हा संशय दूर करा. आपण विस्तार करून देवीचे स्पष्ट चरित्र सांगा. या संसारात त्या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या अंशकलेने झालेली जी शक्ती असेल त्या विषयीचे संपूर्ण चरित्र ऐकण्याची आता यावेळी अनिवार इच्छा झाली आहे. म्हणून, हे ज्ञानी पुरुषा, त्यांच्या जन्माचे वर्णन, पूजा व ध्यान यांचा विधी आपण मला सांगा. तसेच त्यांचे स्तोत्र व ध्यान याबद्दलही कथन करा. देवीचे कवच, ऐश्वर्य, शौर्य व मांगल्य यांचे सांप्रत आपण वर्णन करा." नारदाचे बोलणे ऐकून नारायण मुनी प्रसन्न झाले. ते अत्यंत आनंदाने नारदाला म्हणाले, "हे ब्रह्मपुत्र नारदा, जसा आत्मा हा नित्य आहे, तसेच काल व दिशाही नित्यच आहेत. आकाश नित्य आहे. भूलोकांप्रमाणे असलेले इतर चवदा लोक नित्यच असून ब्रह्मांड वगैरेही नित्य आहे. तसेच तो वैकुंठ प्रदेशही नित्य आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मलीला म्हणून प्रसिद्ध असलेली ती शाश्वत प्रकृतीसुद्धा नित्यच आहे.
जसे अग्नीमध्ये दाहशक्ती नित्य असून कमल व चंद्र यामध्ये असलेली शोभा नित्य आहे. रवीचे ठिकाणी असलेली प्रभा नित्य असून युक्त आहे. ती अधिष्ठानापेक्षा भिन्न नसते. तसेच आत्म्याच्या ठिकाणी असलेल्या प्रकृतीचे आहे. ती प्रकृती आत्म्यापासून भिन्न नाही.
प्रकृती पुरुषाहून भिन्न आहे असे सांख्य मानतात. पण त्यांचे हे मत वेदाला मात्र मान्य नाही. ज्याप्रमाणे सोनार सोन्यावाचून कुंडले करण्यास समर्थ होत नाही, अथवा मृत्तिकेवाचून कुंभार घट बनविण्यास समर्थ होत नाही, तसेच आत्म्याचेही आहे. तो प्रकृतीशिवाय सृष्टी घडविण्यास समर्थ होत नाही. कारण ती प्रकृतीच सर्व शक्तीरूप आहे. तिच्यामुळेच पुरुष सर्वज्ञ व शक्तिमान झाला आहे.
श' हा शब्द मंगलवाचक असून तो ऐश्वर्यवाचकही आहे. 'क्ति' हा शब्द पराक्रमाचे द्योतक आहे. म्हणून ऐश्वर्य व पराक्रम एकरूपच आहेत. ऐश्वर्य व पराक्रम देणारी शक्ती म्हणून ती सांगितली आहे.
ज्ञान, समृद्धी, संपत्ती, यश, बल यांचा वाचक असलेला शब्द 'भग' हा असून त्यामुळे त्या शक्तीला भगवती असेही म्हणतात. कारण तीच सदासर्वकाळ भगरूप आहे. या सर्वांनी आत्मा युक्तच असतो. म्हणून त्याला भगवान असे संबोधतात.
तो ज्योतीरूप असून स्वेच्छामय आहे. तो त्या योगाने साकार आहे व निराकारही आहे. स्वयंप्रकाश व चिद्रूप अशा त्या निराकाराचे योगी ध्यान करतात. परब्रह्म, परमानंदरूप व ईश्वर असे त्याला म्हणतात.
इंद्रिय गोचर न होणारे, सर्वसाक्षी, सर्वांचे कल्याण करणारे, सर्वांचे कारण असलेले, सर्वरूप असे ते आहे, पण वैष्णव त्याला अशा स्वरूपात मान्य करीत नाहीत. त्याचे म्हणणे असे की, 'तेजस्वी पुरुषाशिवाय कोणाचे ठिकाणी तेज असणार ! कारण चंद्रावाचून चांदणे व सूर्यावाचून प्रभा कधीही दिसत नाही. म्हणून चैतन्यरूप असलेल्या तेजाला काही तरी सावयव अधिष्ठान अवश्य पाहिजे. म्हणून आम्ही तेजोमंडलामध्ये असणारे ब्रह्म अत्यंत तेजस्वी आहे असे मानतो.
ते स्वेच्छामय, सर्वरूप, सर्व कारणांचेही ते कारण अहे. अत्यंत सुंदर रूप धारण करणारे म्हणून ते अतीव मनोहर, अल्पवयी, अत्यंत शांत, परम कांतिमान, उत्तमोत्तम, नूतन, मेघाच्या कांतीचे मुख्य स्थान व त्यामुळे ज्याचे नेत्र शामवर्णाकृति आहेत, शरद ऋतूतील मध्यान्हकाळी प्रफुल्लित झालेल्या पद्मसमूहांची शोभा घालविणारे आहेत, असे मोत्यांच्याही प्रभेला तुच्छ करणारे, अविरल दंतपक्तींमुळे नयनमनोहर झालेले, ज्याची चूडा मयूरपिच्छाप्रमाणे असून मालतीच्या पुष्पांनी मंडित झालेले असे, सरळ नासिका असलेले, स्मितयुक्त, मनोरम, भक्तावरील अनुग्रहाचे कारण, दैदीप्यमान, अग्नीसारखे, अत्यंत शुद्ध असे एक पीत वस्त्र परिधान केलेले, त्यामुळे सुशोभित झालेले, द्विभुज, हातात मुरली धारण केलेले, रत्नांच्या भूषणांनी भूषित झालेले, सर्वांचा आधार सर्वांचे नियमन करणारे असे ते स्वरूप आहे." शिवाय ते सर्वशक्तीने युक्त असून व्यापक आहे. ते सर्व ऐश्वर्य प्राप्त करून देणारे, सर्वरूप, स्वतंत्र, सर्व मंगल, अत्यंत परिपूर्ण, नित्य, सिद्ध, नित्य, सिद्ध, पुरुषांचे नियमन करणारे व सिद्धीकारक आहे. अशा सनातन देवाचे वैष्णव नित्य ध्यान करतात.
जन्म, मृत्यू, वार्धक्य, व्याधी, शोक, भीती यांचा नाश करणारे असे ते श्रेष्ठतम स्वरूप आहे. ब्रह्मदेवाच्या वयाचे प्रमाण धरल्यास त्या परमात्म्याचा एकच क्षण होऊ शकेल इतके दीर्घकालीन असे ते आहे.
तोच आत्मा, तेच ब्रह्म, तोच कृष्ण असे म्हणतात. 'कृषि' हा शब्द त्याची भक्ती असा बोध करून देतो, न हा शब्द त्याच्या दास्यत्वाचा वाचक आहे. म्हणून भक्ति व दास्य जो देतो तो कृष्ण असे म्हणतात अथवा कृषि हा शब्द सर्व चराचर जगताचा अर्थ सांगतो. 'न' म्हणजे नका म्हणजे बीज होय. अर्थात कार्यकारणरूप असा तो कृष्णच होय. तोच सर्वांचा उत्पादक आहे. सृष्टीकाली तोच सृष्टीची इच्छा करतो.
त्याच्याच अंशभूत जो काल त्याने प्रेरीत होऊन तो प्रभू, सृष्टीकर्त्यांकडे वळतो. तोच स्वेच्छामय ईश्वर स्वतःच्याच इच्छेने दोन रूपात स्पष्ट झाला आहे.
त्याच्या डाव्या बाजूचा भाग स्त्रीरूप आहे. व उजव्या बाजूचा भाग पुरुषरूप आहे असे वर्णन केले आहे. त्या सनातन महाकामी पुरुषाने कामाला आधारभूत अशा त्या स्त्रीला पाहिले. ती अत्यंत रमणीय व सुंदर कमलाप्रमाणे दिसत होती. तिचे नितंब युगुल चंद्राच्या बिंबालाही अत्यंत तुच्छ करणारे, अतिशय वर्तुळाकार व एकमेकाला चिकटून गेलेले होते. तसेच तिचा ऊरप्रदेश अत्यंत रमणीय अशा कर्दलीच्या स्तंभालाही लाजवील असा होता. अशी ती सर्वांग सुंदर व श्रेष्ठ अशी स्त्री होती.
तिचे स्तनयुगुल बेलाच्या फळाच्या कांतीप्रमाणे सतेज होते. त्यामुळे ती अत्यंत मनोरम दिसत होती. तिने सुवासिक पुष्पे धारण केली होती. तिच्या उदरावर उत्कृष्ठ वळ्या होत्या. तिची कंबर बारीक होती. त्यामुळे ती प्रेक्षकांचे मन हरण करीत असे. ती अतिशय सुंदर व शांत होती.
ती सुहास्यवदना होती. तिचे नेत्र कटाक्षयुक्त होते. म्हणजेच ती अत्यंत चंचल दृष्टीची होती. तिने परिधान केलेले वस्त्र अग्नीप्रमाणे दैदीप्यमान होते. ती रत्नांलंकारांनी विभूषित होती. चक्षुरूप चकोरांच्या योगाने ती मोठया आनंदाने कोटी चंद्रांना तुच्छ करायला लावणारा श्रीकृष्णाचा मुखचंद्र सर्वदा पीत होती.
तिने कस्तुरीचा तिलक भालावर लावला होता. त्याखाली चंदनाचा बिंदू दिला होता. त्याच ठिकाणी शेंदुराचा बिंदूही चमकत होता. तिची ती वक्र वेणी मालतीच्या पुष्पामुळे शोभायमान दिसत होती. रत्नांचे उत्तमोत्तम हार ती ल्याली होती व सांप्रत ती पती प्राप्तीची इच्छा करीत होती.
एक कोटी चंद्राची जशी प्रभा असेल तशी ती परिपूर्ण झालेली होती. आपल्या गमनाने ती राजहंस व हत्ती याच्या गतीबद्दलचा गर्व, त्या गर्वाला मागे सरायला लावील अशा गतीची होती.
अशा त्या सुंदरीला पाहून रासक्रीडेचा ईश्वर तो श्रीकृष्ण रासमंडलांत राहून तिच्यासह रासांच्या उल्लासामध्ये तल्लीन होऊन गेला. त्याने उत्कृष्ठ रासक्रीडा केली. नानाप्रकारचे शृंगार करणारा तो देव मूर्तिमान शृंगाराप्रमाणे भासू लागला. ब्रह्मदेवाचा एक दिवस इतका काल याने संभोगसुख भोगले. त्यानंतर मात्र तो श्रांत झाला. त्यामुळे जगाच्या जनकाने तिच्या गर्भाशयांत नित्य आनंद, रूप व शुभ प्रसंगी गर्भधारणा केली.
हे सदाचारणी नारदा, मैथुनानंतर अत्यंत दमलेल्या त्या स्त्रीच्या गात्रांपासून हरीच्या तेजामुळे घाम आला, व ६८ आलिंगन देऊन श्रांत झालेल्या राधेचा श्वासोच्छवास जोराने होऊ लागला. त्यावेळी त्या घामाच्या उदकाने पंचीकृत पंचमहाभूतात्मक तो विश्वगोलक झाकून टाकला.
तोच निःश्वास वायु सर्वांचा आधार होऊन गेला. या संसारात सर्व जीवांचा निःश्वास वायु त्या मूर्तिमान वायूपासूनच झाला आहे. ती त्याची पत्नी व प्राण्याचे प्राणरूप पाच पुत्र असे निर्माण झाले.
प्राण, अपान, समान, उदान, व्यान हे पाच वायूचे त्याचे पुत्र झाले. तसेच नाग वगैरे त्यांच्यापेक्षा निकृष्ट असलेले दुसरे पाच वायुही निर्माण झाले. महाबलाढय वरूण धर्मरूप उदकाचा अधिष्ठाता देव झाला. त्याची पत्नी त्याच्या डाव्या बाजूपासून वरुणाने निर्माण केली. त्यानंतर ब्रह्मतेजाने झळकत असणार्या त्या कृष्णाच्या चिद्शक्तीने कृष्णाचे ते बीज शंभर मन्वंतरे होईपर्यंत धारण केले. तिचे कृष्ण हेच प्राण आहेत. त्यालाही ती अतिशय प्रिय आहे. ती नेहमी कृष्णाच्याच संगतीने रहात असते, तसेच त्याच्या वक्षःस्थलावर स्थित असते. शंभर मन्वंतरे पूर्ण होताच त्या सुंदरीने एका बालकास जन्म दिला. ते बालक सुवर्णासारखे तेजस्वी होते. तसेच सर्वश्रेष्ठ विश्वाचे उत्तम आधारस्थान आहे. त्या भयंकर बालकाला पाहून त्या देवीचे हृदय म्हणजे राधेचे हृदय भीतीने थरथर कापू लागले व रागानेच तिने ते बालक ब्रह्मांडगोलातील जलामध्ये टाकून दिले.
त्या बालकाला टाकलेले पाहून कृष्णाने हाहाकार केला. त्या देवाधिदेवाने त्याच क्षणी देवीला यथायोग्य शाप दिला. कृष्ण म्हणाला, "हे निष्ठूर व कोपशील स्त्रिये, तू सांप्रत अपत्याचा त्याग केलास म्हणून तू आजपासून वांझ होशील. तसेच तुझ्या अंशापासून होणार्या सर्व देवस्त्रियाही तुझ्याप्रमाणेच वांझ रहातील. त्यांचे तारुण्य नित्य राहील."
इतक्यात देवीच्या जिभेच्या शेंडयापासून अकल्पितपणे एक कन्या उत्पन्न झाली. तिने शुभ्र वस्त्र परिधान केले होते. ती कृष्णवर्णी पण अत्यंत मनोहर दिसत होती. तिच्या एका हातात वीणा होती व दुसर्या हातात पुस्तक होते. तिने रत्नांची अनेक आभरणे परिधान केली होती. ती सर्व शास्त्रांची आधिदेवता होती.
त्यानंतर काही कालाने तिचे दोन भाग झाले. ती डाव्या बाजूने कमला व उजव्या बाजूने राधिका झाली. इतक्यात कृष्णही दोन प्रकारचा झाला. त्याचा उजवा भाग द्विभुज व डावा भाग चतुर्भुज झाला. नंतर कृष्ण त्या राणीला म्हणाला, "हे देवी, तू या नारायणाची स्त्री हो व ही अभिमानी राधा मात्र येथेच राहून दे. माझ्या म्हणण्याप्रमाणे वागल्यास कल्याण होईल."
तेव्हा अशाप्रकारे संतुष्ट झालेल्या श्रीकृष्णाने लक्ष्मीला नारायणाच्या स्वाधीन केले व त्यांच्यासह तो जगत्पती वैकुंठी गेला. राधेपासून झालेल्या दोघीही देवी लक्ष्मी व सरस्वती वांझ झाल्या.
नारायणाच्या अंगापासून चार हातांचे पार्षद निर्माण झाले. ते सर्वजण रूपाने, गुणाने, तेजाने व वयाने हरीप्रमाणेच श्रेष्ठ होते. कमलेच्या अंगापासून तिच्यासारख्या कोटयावधी दासी निर्माण झाल्या.
हे नारदा, त्यानंतर गोकुळाचा अधिपती तो भगवान कृष्ण त्याच्या रोमरंध्रापासून वय आणि तेज यांनी कृष्णाशी बरोबरी करतील असे असंख्य गोप निर्माण झाले. ते सर्वजण रूप, बल, गुण व पराक्रम यांनी कृष्णाप्रमाणेच युक्त होते. ते सर्व पार्षद प्रभूला प्राणाइतके प्रिय होते.
राधेच्या रोमरंध्रापासून राधेसारख्या गोपकन्या झाल्या. त्या सर्व राधेच्याच दासी असून प्रियभाषणी होत्या. त्या रत्नांच्या दागिन्यांनी मढवलेल्या होत्या. त्या सर्व त्या पुरुषाच्या शापामुळे वांझच राहिल्या.
इतक्यात हे नारदा, विष्णूची चिरस्थायी शक्ती जी कृष्णदेवता दुर्गा, ती प्रकट झाली. ती देवी लक्ष्मी, नियमन करणारी, सर्व शक्तीरूप, बुद्धीची अधिदेवता व परमात्म्या कृष्णाची देवता होती.
ती मूल प्रकृती ईश्वरी देवीच्या बीजभूत, अत्यंत परिपूर्ण, तेज, स्वरूप व त्रिगुणात्मक होती. तिची कांती तापवलेल्या सुवर्णाप्रमाणे तेजस्वी होती. कोटी सूर्य एकाच वेळी तळपावेत अशी तिची प्रभा होती. ती गालातल्या गालात हसत होती. त्यामुळे तिचे मुखकमल प्रसन्न दिसत होते. तिला सहस्र हात होते. तिने विविध प्रकारची शस्त्रात्रे धारण केली होती. तिला तीन नेत्र होते. तिने अग्नीप्रमाणे शुद्ध वस्त्र नेसले होते. रत्नांच्या अलंकारांनी ती भूषित झाली होती
तिच्या अंशाच्या अंशकलेपासून सर्व स्त्रिया उत्पन्न झाल्या. विश्वातील ब्रह्म वगैरे सर्व लोक तिच्या मायेने मोहित झाले. कामी गृहस्थांना ती ऐश्वर्य देते.
ती वैष्णवी वैष्णवाची भक्ती परमात्म्याचे ठिकाणी दृढ करते. ज्यांना मोक्षाची इच्छा असते त्यांना ती मोक्ष देते. ज्यांना सुख हवे असते त्यांना ती सुख देते. ती स्वर्गामध्ये स्वर्गलक्ष्मी, गृहामध्ये गृहलक्ष्मी अशा स्वरूपात नित्य असते.
ती तपस्व्यांमध्ये तपश्चर्या असून राजे लोकात ती श्रीरूपाने वास्तव्य करते. अग्नीत दाहरूप, सूर्यात प्रभारूप, चंद्राचे ठिकाणी शोभारूप, कमलात शोभनारूप व श्रीकृष्ण परमात्म्याचे ठिकाणी ती सर्वशक्तीरुप आहे. तिच्यामुळे आत्मा सर्व शक्तीशाली होऊ शकला. या सर्व जगात तिच्यामुळेच शक्ती निर्माण झाली आहे. कारण तिच्यावाचून हे सर्व जगत् जिवंतरूप असूनही मृतासारखे होऊन जाते.
तीच सनातनी शक्ती या संसाररूपी वृक्षाचे बीजरूपाने वास्तव्य करीत आहे.
हे नारदा, ही स्थितीरूप, बुद्धीरूप, व फलरूप आहे. ती क्षुधा, तृषा, दया, निद्रा, तंद्रा, क्षमा, धृती, लज्जा, तुष्टी, पुष्टी, भ्रांती, कांती इत्यादीरूप आहे. सर्वेश्वराची स्तुती करून तिने त्याच्यापुढे दीर्घकालापर्यंत वास्तव्य केले तेव्हा त्या राधिकेश्वराने तिला रत्नाचे सिंहासन निर्माण करून दिले.
हे नारदा, इतक्यात त्याच ठिकाणी पद्मनाभाच्या नाभीकमलापासून स्त्रीसह चतुर्मुख उत्पन्न झाला. त्या श्रीमान् तपस्वी, ज्ञानिश्रेष्ठ देवाने हातात कमंडलू धारण केला होता. ब्रह्म तेजाने झळकत असणार्या त्या देवाने चारी मुखांनी परमात्म्याची स्तुती केली.
त्यानंतर निर्माण झालेली ती व शतचंद्रासारख्या प्रभेची ती सुंदरी, अग्नीसारखे शुद्ध वस्त्र नेसून, रत्नांच्या अलंकारांनी भूषित झाली होती. शेवटी रत्नाच्या सिंहासनावर बसून सर्व कारण असलेला परमात्मा, त्यांची ती स्तुती करू लागली. ती आपल्या स्वामीसह श्रीकृष्णापुढे अत्यंत आनंदाने राहिली.
इतक्यात कृष्ण दोन प्रकारचा झाला. त्याचे डावे अंग महादेव व उजवे गोपिकापति झाले. तो शुद्ध स्फटिकासारखा शुभ्रवर्णी दिसत होता. शंभर कोटि सूर्यप्रभेने शंकर त्रिशूल व पट्टिश नावाने शस्त्र धारण करून त्याने व्याघ्रांबर परिधान केले होते.
त्याची अंगकांती तप्त सुवर्णाप्रमाणे सतेज होती. त्याचे मस्तकावर जटाभार शोभून दिसत होता. त्याचे सर्वांग भस्माने विभूषित होते. तो गालातल्या गालात हसत होता. त्या ईश्वराच्या मस्तकावर चंद्र विराजमान झाला होता. त्यावेळी तो नग्न होता. त्याचा कंठ नीलवर्णाचा होता. त्याने सर्पांची भूषणे शरीरावर ल्याली होती. उजव्या हातात यथाशास्त्र तयार करून घेतलेली एक माला होती. या मालेलाच रुद्राक्षाची माला म्हणतात.
तो सनातन प्रभु पाच मुखांनी युक्त होता. तो सत्वस्वरूप, श्रीकृष्ण नावाचा ईश्वर परमात्मा व ज्याला ब्रह्मज्योती असे म्हणतात, त्याच्या म्हणजेच त्याच्या बीजमंत्राचा जप करीत राहिला.
ते ब्रह्मस्वरूप सर्व कारणाचेही कारण आहे. ते सर्व मंगलांचे मंगल स्वरूप आहे. जन्म, मृत्यु, जरा, व्याधी, शोक व भीती यांचा नाश करणारे असे ते चितस्वरूप आहे. ते अत्यंत श्रेष्ठ आहे.
तोच परमात्मा प्रत्यक्ष मृत्यूचाही मृत्यू असून त्याला मृत्युंजय अशी संज्ञा प्राप्त झाली आहे. त्याची स्तुती केल्यावर भगवान शंकर रत्नाच्या त्या सिंहासनासमोर उभा राहिला.