[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजयाने म्हटले, "आपण सांगितलेले अमृतमय असे चंद्र व सूर्य यांच्या वंशात उत्पन्न झालेल्या राजांचे सुंदर चरित्र मी श्रवण केले, आता त्या देवी जगदंबेची प्रत्येक मन्वंतरांत ज्या रूपाने, ज्या ठिकाणी, ज्या कर्माने पूजा केली जाते ती पद्धती ऐकण्याची मला इच्छा झाली आहे. इतकेच नव्हे तर हे मुनीश्रेष्ठा, त्या देवीचा जेवढा विस्तार असेल तेवढा मला श्रवण कर. तिच्या विराट स्वरूपाविषयी मला कथन करा व आपल्याला ज्या ध्यानयोगाने गति मिळेल ते सर्व काही सांगा म्हणजे त्या श्रवणाने माझे कल्याण होईल."
व्यास म्हणाले, "हे राजा, मी नुसती श्रवण करूनही या लोकी कल्याण प्राप्त करून देते ती देवीची उत्तम प्रकारे पूजा कशी करावी ते आता मी कथन करतो."
पूर्वी नारदमुनींनी नारायणास जे विचारले ते योगानुष्ठानामध्ये प्रवृत्त करणार्या देवाने नारदाला सांगितले तेच आता ऐक. पूर्वी महातेजस्वी नारद मुनी नारायणाचे निवासस्थानी प्राप्त झाले. प्रत्यक्ष नारायणाचे दर्शनाने ते श्रमरहित झाले व हात जोडून उभे राहिले. ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेला नारद त्याला नमस्कार करून म्हणाला, "हे देवाधिदेव, हे महादेव, हे नित्य पुरुषोत्तमा, हे जगदाधारा, हे सर्वज्ञा, हे सद्गुणात्मा स्फूर्तिदात्या, जे इष्ट व जगाचे आद्य तत्त्व ते मला कथन करा. ह्याची उत्पत्ति कोठून होते ? याची कुणामुळे स्थिती होते ? योग्यवेळी ते कोणात लय पावते ? प्राण्याच्या कर्मफलाचा उदय कोणाच्या सत्तेमुळे होतो ? ही मोहाची जननी जी माया ती कोणत्या ज्ञानप्राप्तीमुळे नाश पावते ? कोणाच्या पूजेने अथवा कोणता जप केल्यास वा ध्यान केल्यास हृदयामध्ये प्रकाश पडतो. हे परमेश्वरा, विनासायास प्राण्याला या अंधःकाररूपी तमाचे उल्लंघन करता येईल असे कारण मला विस्ताराने सांगा."
अशाप्रकारचा देवर्षी नारदाचा प्रश्न ऐकून अनादि अशा महायोगी नारायणाने 'फार उत्तम विचारलेस' असे म्हणून नारदाचे अभिनंदन केले.
नारायण म्हणाले, "हे देवर्षी, हे श्रेष्ठा, मी आता तुला उत्तम ज्ञान सांगतो. जे ज्ञान प्राप्त असता हे मर्त्य जगत् पुन्हा पुन्हा भ्रमात पडत नाही. ज्या ज्ञानप्राप्तीमुळे एकदम मुक्ति मिळते असे सर्वोत्तम ज्ञान आता तू ऐक. ऋषी, मुनी, महाज्ञानी आणि अनेक पंडितांप्रमाणे जे आत्मानुभवी आहेत, त्या सर्वाप्रमाणे मलाही निश्चितपणे असे वाटते की या सर्वश्रेष्ठ जगाचे उत्तम तत्त्व देवी हीच आहे. आम्ही सर्वानी तेच निश्चित धरले आहे.
ही देवी तीन गुणांनी युक्त असून त्या तिन्ही गुणांच्या योगाने ती या जगाची निर्मिती करते, नंतर पालन करते आणि प्रलय काळी तीच या जगाचा संहार करते असे शास्त्र वचन प्रमाण आहे. आम्ही सर्वांनी ते सत्य मानले आहे.
हे नारदा, सिद्ध आणि ऋषी यांनी नित्य पूज्यस्थानी मानलेले, ज्याच्या स्मरणाने सर्व पापांचा नाश होतो असे, चिंतनाने सर्व कामना पूर्ण करणारे व अखेरीस मोक्षप्राप्ती करून देणारे असे ते एकमेव देवीचे स्वरूप सांप्रत मी तुला विस्ताराने कथन करतो. तू श्रवण कर.
बह्मदेव स्वयंभू आहे. त्याचा पहिला पुत्र मनू आहे. तो अत्यंत प्रतापशाली असून तो श्रीमान मनू हा शतरूपेचा पति आहे आणि तो मनु हाच सर्व मन्वंतरांचा अधिपती म्हणून प्रसिद्ध व मान्यवर आहे.
पूर्वी त्या मनूने प्रजापती म्हणून विख्यात असलेल्या स्वयंभू पित्याची भक्तिपूर्वक सेवा केली. तेव्हा तो निष्पाप व प्रकाशरूप असलेला त्याचा पिता ब्रह्मदेव म्हणाला, "हे पुत्रश्रेष्ठा, हे सुता, आता तू निःशंक मनाने त्या महामाया देवीची आराधना कर. कारण तिने प्रसाद दिल्यानंतरच तुझे प्रजोत्पादनाचे श्रेष्ठ कार्य सत्वरतेने सिद्धीस जाईल. बाबारे, तू तिची भक्ती कर."
त्या प्रजापती ब्रह्मदेवाने याप्रमाणे मनूस उपदेश केल्यावर त्या ब्रह्मपुत्र मनूने, जिचे स्वरूप विराट असून अनाकलनीय आहे अशा त्या प्रभू देवीची जगतास कारण असलेल्या सर्वशक्तीशाली देवेश्वरीचा, सर्व कारणांचेही कारण असलेल्या अशा त्या मूलमायेची अत्यंत शांत चित्ताने व शुद्ध अंतःकरणाने स्तुति करण्यास सुरुवात केली. मनू हात जोडून म्हणाला, "हे देवदेवेश्वरी, तुला माझा नमस्कार असो. हे देवी, खरोखरच तू जगातील सर्व कारणांचे कारण आहेस. तू केवल भक्तांचे कल्याण व्हावे याच हेतूने शंख, चक्र, गदा इत्यादि आयुधे धारण करीत असतेस. तू नारायणाच्या हृदयाचा आश्रय केला आहेस. वेद ही तुझीच मूर्ती आहे. तूच सर्व जगताची जननी आहेस. या सर्वांचे मूल कारण जी माया, त्या मायेचे ब्रह्म म्हणून जे स्थान आहे त्या स्थानाचे रूपही तूच आहेस. हे देवते, ऋगादि तीन प्रमाणांनीच तुझे ज्ञान होत असते.
हे शिवे, तूच सर्वज्ञ असल्यामुळे देवांनी आणि वेदांनीही तुझी यथोचित व यथाशक्ती स्तुति केलेली आहे. हे माहेश्वरी, हे महाभागे, हे देवी, हे महामाये, हे महोदये, तूच त्या सर्वज्ञ महादेवाचे अत्यंत प्रिय असे अंग आहेस व त्या महादेवाचे सर्व प्रिय करणारी तूच आहेस.
हे नंदप्रियकारिणी, तू या सर्वापेक्षाही अत्यंत श्रेष्ठ आहेस. हे महानंदे, हे महोत्सवे, हे महामारी, तू आम्हा सर्वांचे भयहरण करणारी आहेस. तसेच हिरण्यगर्भसुद्धा तुझ्याच पूजनात मग्न असतो. हे देवी, अशा या सर्वज्ञ तुला माझा नम्रतापूर्वक प्रणाम असो.
हे सर्व मंगलातील मांगल्यरूपिणी, हे कल्याण स्वरूपिणी, तूच पुरुषार्थ साध्य करून देत असतेस. तसेच सर्वांनी आश्रय करावा अशा योग्यतेची फक्त तूच आहेस, तू तीन नेत्रांनी युक्त आहेस. तुझा वर्ण गौर आहे. हे देवते, मी तुला वारंवार नमस्कार करतो.
हे देवी, जिच्यापासून हे प्रत्यक्ष विश्व निर्माण झाले आहे, तसेच हे संपूर्ण विश्व जिने ओतप्रोत भरून राहिलेले आहे अशा त्या देवीचे रूप चैतन्य हेच आहे. ते चैतन्यस्वरूप अद्वितीय असून आदि आहे. त्याला कदापीही अंत नसल्यामुळे ते तेजोमय आहे. तेव्हा त्या दिव्य स्वरूपाला माझा नमस्कार असो.
जिच्या कृपाकटाक्षाने ब्रह्मदेव हे सर्व विश्व निर्माण करण्यास समर्थ होतो, जिच्या प्रसादामुळे विष्णूला या विश्वाचे पालन करण्याची शक्ती प्राप्त होते आणि जिच्या वरदहस्तामुळे व अनुग्रहामुळे महेश्वर या विश्वाचा प्रलयकारी संहार करू शकतो, त्या भगवती देवीला माझा नमस्कार असो. मधुकैटभ दैत्यबंधूपासून जेव्हा ब्रह्मदेवाला भीती उत्पन्न झाली तेव्हा त्याने जिचे स्तवन केले आणि त्यामुळेच त्या महाकाय दैत्यांपासून व त्या घोर दैत्यरूप भवसागरापासून त्याची मुक्तता झाली, त्या देवीला माझा नमस्कार असो.
हे देवी, र्हीं म्हणजे अकृत्य करण्याविषयीची लज्जा, कीर्ति, स्मृति, कांति, कमला, गिरिजा, सती, दाक्षायणी, वेदगर्भा, बुद्धिदात्री व सर्वदा अभय देणारी तूच एकमेव आहेस.
हे देवी, मी तुझीच स्तुती करीत आहे. हे भगवती, मी तुला नमस्कार करतो. तसेच मी नित्य तुझेच जप व पूजन करीत असतो. मी सर्वदा तुझेच ध्यान करतो व मी तुझ्याविषयीचीच भावना करीत असतो. हे देवते, मी तुझेच दर्शन घेत असतो व तुझ्याच गुणांचे श्रवण करीत असतो. म्हणून हे देवी तू मजवर प्रसन्न हो.
खरोखरच हे देवी, तुझ्याच प्रसादाने ब्रह्मदेव वेदांचा निधी झाला. विष्णु लक्ष्मीचा पती झाला. इंद्राला त्रैलोक्याचे अधिपत्य लाभले आणि तो पाद धारण करणारा वरुण जलधारांचा राजा झाला. जिच्या कृपेमुळे कुबेर संपत्तीचा स्वामी झाला, यम प्रेतांचा अधिकारी झाला, नैऋत सर्व राक्षसांचा सर्वाधिकारी राजा झाला, चंद्र अपोमय झाला, हे सर्व जिच्यामुळे झाले त्या देवीला माझा प्रणाम असो.
हे त्रिलोकवंद्ये, हे लोकेशी, हे महामंगलरूप देवी, तुला माझा नमस्कार असो. हे जगन्माते, मी तुला वारंवार वंदन करीत आहे. हे भगवती, मी वारंवार तुझ्या चरणावर लोटांगणे घालीत आहे."
नारायण मुनी नारदाला म्हणाले, "हे देवऋषे, अशारीतीने जी सर्वश्रेष्ठ, दुर्गा व नारायणी या नावाने विख्यात असलेली देवी, त्या भगवतीची त्या ब्रह्मपुत्र मनूने अपरंपार स्तुती केली. त्यामुळे ती देवी त्या मनूला सत्वर प्रसन्न झाली आणि त्या ब्रह्मपुत्राला म्हणाली, "हे राजेंद्रा, हे ब्रह्मपुत्रा, मी तुझ्या भक्तीमुळे आणि स्तुतीयुक्त आराधनेमुळे तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. म्हणून तू हवा तो वर माग. तुला जे वांच्छित असेल ते आता मागून घे."
देवी प्रसन्न झाल्याचे पाहून मनू आनंदून म्हणाला, "हे देवी, तू सर्वच करुणिकांमध्ये उत्तम आहेस. तू खरोखरच माझ्या भक्तीमुळे प्रसन्न झाली असशील तर माझे प्रजोत्पत्तीचे कार्य निर्विघ्नपणे पार पडो असा तू वर दे."
देवी म्हणते, "हे राजेंद्रा, माझा तुझ्यावर वरदहस्त आहे. त्यामुळे हे सर्वोत्कृष्ट सृष्टीकार्य उत्तम प्रकारे चालेल, प्रजेची उत्पत्तीही निर्वेधपणे पार पडेल याबद्दल तू संशय बाळगू नकोस. तसेच तू उत्पन्न केलेल्या प्रजेची दिवसानुदिवस वृद्धीच होईल, हे नक्की समज. हे मनू तू आज हे माझे स्तोत्र तयार केले आहेस ते स्तोत्र जो कोणी नित्यनेमाने पठण करील त्या पुरुषाला विद्या, संतती, कार्यसिद्धी, कीर्ती व कांती या सर्वांचा निश्चितपणे लाभ होईल. हे राजा, माझ्या प्रसादाने माझी स्तुती करणार्या त्या पुरुषांना धनधान्य, कोठेही खंडित होणार नाही अशी शक्ती, सर्वच बाबतीत त्यांना विजय, अमाप सुख हे प्राप्त होऊन त्यांच्या शत्रूंचा क्षय होत जाईल. अखेर शत्रूंचा नाश होईल. '
नारायण मुनी नारदाला म्हणाले, "हे ब्रह्मन, हे नारदा, अशाप्रकारे त्या देवीने त्या ब्रह्मपुत्र मनूला इच्छित वरदान दिले आणि मनू तिच्याकडे एकाग्र चित्त करून पहात असतानाच ती देवी सत्वर अंतर्धान पावली.
अशारीतीने देवीचा वर प्राप्त झाल्यावर तो महाप्रतापी ब्रह्मपुत्र मनू सत्वर ब्रह्मदेवाकडे गेला आणि हात जोडून नम्रतेने ब्रह्मदेवाला म्हणाला, "हे तात, मला आता सुंदर, निवांत असे स्थान सांगा म्हणजे त्या ठिकाणी राहून मी पुष्कळ प्रजा निर्माण करतो. तसेच भरपूर यज्ञ करून देवाधि देवांचे पूजन व यजन करतो. हे महाराज, मला सत्वर सर्वश्रेष्ठ असे ठिकाण सांगून आज्ञा करा."
आपल्या पुत्राचे भाषण ऐकून प्रसन्न झालेला तो ब्रह्मदेव प्रजापती स्वतःशी विचार करू लागला. "अहो, हे कार्य घडावे कसे ?" यावर ब्रह्मदेव बराच काळपर्यंत विचार करीत राहिला. ज्याला मोजमाप नाही व ज्याची संख्येत गणती करता येणार नाही इतका अनंत व विपुल काळ गेला, तेव्हापासून सृष्टी उत्पन्न करीत आहे, पण सांप्रत ती सर्व जलमय होऊन बुडून गेली.
सर्वांनाच आश्रय होऊन राहिलेली पृथ्वी तीच जर रसातळाला गेली आहे तर आता इथून पुढे सुष्टीचे कार्य कसे बरे पार पडणार ! तेव्हा माझे हे काळजी निवारण करण्याचे कार्य आता तो आदिपुरुष भगवानच करू शकेल. कारण मी सर्वदा त्याच्याच आज्ञेचे पालन करीत असतो. तोच माझा एकमेव सहाय्यकर्ता आहे.