श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
अष्टमः स्कन्धः
त्रयोविंशोऽध्यायः


अवशिष्टनरकवर्णनम्

श्रीनारायण उवाच
ये नराः सर्वदा साक्ष्ये अनृतं भाषयन्ति च ।
दाने विनिमयेऽर्थस्य देवर्षे पापबुद्धयः ॥ १ ॥
ते प्रेत्यामुत्र नरके अवीच्याख्येऽतिदारुणे ।
योजनानां शतोच्छ्रायाद्‌‍गिरिमूर्ध्नः पतन्ति हि ॥ २ ॥
अनाकाशेऽधःशिरसस्तदवीचीतिनामके ।
यत्र स्थलं दृश्यते च जलवद्वीचिसंयुतम् ॥ ३ ॥
अवीचिमत्ततस्तत्र तिलशश्छिन्नविग्रहः ।
म्रियते नैव देवर्षे पुनरेवाऽवरोप्यते ॥ ४ ॥
यो वा द्विजो वा राजन्यो वैश्यो वा ब्रह्मसम्भव ।
सोमपीथस्तत्कलत्रं सुरां वा पिबतीव हि ॥ ५ ॥
प्रमादतस्तु तेषां वै निरये परिपातनम् ।
कुर्वन्ति यमदूतास्ते पानं कार्ष्णायसो मुने ॥ ६ ॥
वह्निना द्रवमाणस्य नितरां ब्रह्मसम्भव ।
सम्भावनेन स्वस्यैव योऽधमोऽपि नराधमः ॥ ७ ॥
विद्याजन्मतपोवर्णाश्रमाचारवतो नरान् ।
वरीयसोऽपि न बहु मन्यते पुरुषाधमः ॥ ८ ॥
स नीयते यमभटैः क्षारकर्दमनामके ।
निरयेऽर्वाक्‌शिरा घोरा दुरन्तयातनाश्नुते ॥ ९ ॥
ये वै नरा यजन्त्यन्यं नरमेधेन मोहिताः ।
स्त्रियोऽपि वा नरपशुं खादन्त्यत्र महामुने ॥ १० ॥
पशवो निहितास्ते तु यमसद्यनि सङ्गताः ।
सौनिका इव ते सर्वे विदार्य शितधारया ॥ ११ ॥
असृक्पिबन्ति नृत्यन्ति गायन्ति बहुधा मुने ।
यथेह मांसभोक्तारः पुरुषादा दुरासदाः ॥ १२ ॥
अनागसोऽपि येऽरण्ये ग्रामे वा ब्रह्मपुत्रक ।
वैश्रम्भकैरुपसृतान्विश्रम्भय्यजिजीविषून् ॥ १३ ॥
शूलसूत्रादिषु प्रोतान्क्रीडनोत्कारकानिव ।
पातयन्ति च ते प्रेत्य शूलपाते पतन्ति ह ॥ १४ ॥
शूलादिषु प्रोतदेहाः क्षुत्तृड्भ्यां चातिपीडिताः ।
तिग्मतुण्डैः कङ्कबकैरितश्चेतश्च ताडिताः ॥ १५ ॥
पीडिता आत्मशमलं बहुधा संस्मरन्ति हि ।
ये भूतानुद्वेजयन्ति नरा उल्बणवृत्तयः ॥ १६ ॥
यथा सर्पादिकास्तेऽपि नरके निपतन्ति हि ।
दन्दशूकाभिधाने च यत्रोत्तिष्ठन्ति सर्वतः ॥ १७ ॥
पञ्चाननः सप्तमुखा ग्रसन्ति नरकागतान् ।
यथा बिलेशया विप्र क्रूरबुद्धिसमन्विताः ॥ १८ ॥
येऽवटेषु कुसूलादिगुहादिषु निरुन्धते ।
तानमुत्रोद्यतकराः कीनाशपरिसेवकाः ॥ १९
तेष्वेवोपविशित्वा च सगरेण च वह्निना ।
धूमेन च निरुन्धन्ति पापकर्मरतान्नरान् ॥ २० ॥
योऽतिथीन्समयप्राप्तान्दिधक्षुरिव चक्षुषा ।
पापेनेहालोकयेच्च स्वयं गृहपतिर्द्विजः ॥ २१ ॥
तस्यापि पापदृष्टेर्हि निरये यमकिङ्कराः ।
अक्षिणी वज्रतुण्डा ये कङ्काः काकवटादयः ॥ २२ ॥
गृध्राः क्रूरतराश्चापि प्रसह्योत्पाटयन्ति हि ।
य आढ्याभिमतिर्याति अहङ्कृत्यातिगर्वितः ॥ २३ ॥
तिर्यक्प्रेक्षण एवात्राभिविशङ्‌की नराधमः ।
चिन्तयार्थस्य सर्वत्रायतिव्ययस्वरूपया ॥ २४ ॥
शुष्यद्धृदयवक्त्रश्च निर्वृतिं नैव गच्छति ।
ग्रहवद्‍रक्षते चार्थं स प्रेतो यमकिङ्करैः ॥ २५ ॥
सूचीमुखे च नरके पात्यते निजकर्मणा ।
वित्तग्रहं च पुरुषं वायका इव याम्यकाः ॥ २६ ॥
किङ्कराः सर्वतोऽङ्गेषु सूत्रैः परिवयन्ति हि ।
एते बहुविधा विप्र नरकाः पापकर्मणाम् ॥ २७ ॥
नराणां शतशः सन्ति यातनास्थानभूमयः ।
सहस्रशोऽपि देवर्षे उक्तानुक्तांस्तथापि हि ॥ २८ ॥
विशन्ति नरकानेतान्यातनाबहुलान्मुने ।
तथा धर्मपराश्चापि लोकान्यान्ति सुखोद्‍गतान् ॥ २९ ॥
स्वधर्मो बहुधा गीतो यथा तव महामुने ।
देवीपूजनरूपो हि देव्याराधनलक्षणः ॥ ३० ॥
येनानुष्ठितमात्रेण नरो न नरकं व्रजेत् ।
सा देवी भवपाथोधेरुद्धर्त्री पूजिता नृणाम् ॥ ३१ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे-
ऽवशिष्टनरकवर्णनं नाम त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥


नरकांविषयी माहिती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीनारायण मुनी म्हणाले, "हे ब्रह्मपुत्र नारदा, जे पुरुष पापवासनेने साक्ष वगैरे देताना, अथवा दान करताना, किंवा द्रव्य खर्च करीत असताना नेहमी खोटे बोलतात, त्यांना मृत्यु आल्यावर यमदूत परलोकात घेऊन जातात. तेथे नेल्यावर त्या पुरुषांना अवीची नावाच्या अत्यंत भयंकर नरकात टाकतात. शंभर योजने उंच असलेल्या पर्वतशिखरावरून त्यांना फेकून देतात.

त्या नरकात त्या पुरुषांना खाली डोके वर पाय अशा अवस्थेत अंतराळातच ठेवतात. त्या नरकातील स्थान हे जलाप्रमाणे तरंगयुक्त दिसते. वास्तविक पहाता ते तसे नसते पण तरंगयुक्त भासते. पण ते तरंगरहित असल्यामुळे त्या नरकाला अवीची हे नाव पडलेले आहे. हे देवर्षे, त्या नरकात पुरुषाच्या देहाचे तिळाएवढे तुकडे केले तरी तो मृत्यु पावत नाही. तेव्हा अशाप्रकारे त्या पुरुषाला शिक्षा दिल्यावर पुनः त्याला अणकुचीदार अशा तीक्ष्ण शूलावर चढवितात.

हे ब्रह्मपुत्रा, एखादा ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य अथवा इतर कोणत्याही वर्णांचा पुरुष असो, त्याने सोमपान केलेले असले आणि तसेच त्याची स्त्रीही मोहवश होऊन सुरापान करीत असेल तर अशांना हे यमदूत नरकातच टाकतात.

हे ब्रह्मपुत्रा, हे मुनिश्रेष्ठा, अशा पुरुषांना अग्नीच्या सहाय्याने पातळ केलेले पोलाद भरपूर पाजतात, तरीही या नरकात ते पुरुष मरत नाहीत. त्यांना या सर्व यातना भोगाव्याच लागतात.

जो अत्यंत दुष्ट पुरुष विद्या, जन्म, तप, वर्ण, आश्रम, आचार, यांनी युक्त असलेल्या श्रेष्ठ पुरुषांना मान न देता स्वतःलाच मोठा समजतो, अशा क्षुद्र विचाराच्या पुरुषाला यमाचे दास मृत्यूनंतर घेऊन येतात. त्याला ते यमदूत क्षारकर्दम नावाच्या नरकात नेऊन टाकतात. तेथे त्याला खाली मस्तक करायला लावल्याने अतिशय यातना होत असतात.

जे पुरुष मुर्खपणामुळे नरमेधन करतात व त्यांचा अन्य देवतापुढे बळी देतात किंवा हे महाभाग्यशाली नारदा, ज्या स्त्रिया नरपशू खातात, त्यांना यमसदनात गेल्यावर त्यांनी जे पशू अथवा मनुष्य प्राणी मारलेले असतात ते सर्व तेथे एकत्र येतात आणि लखलखीत तरवार घेऊन एखादा वीर पुरुष ज्याप्रमाणे युद्धात माणसे कापत सुटतो तसे त्या पापी पुरुषाला ते पशु अथवा नर एकत्र होऊन त्याचा देह विदीर्ण करून टाकतात. जसे या लोकातील मांसाहारी लोक कृत्य करीत असतात तसेच ते पशु त्या पुरुषाचे रक्त पितात व धुंद होऊन नाचतात, गाणी म्हणतात, अशी विविध प्रकारे क्रीडा करतात.

हे ब्रह्मदेव पुत्रा नारदा, जे अरण्यात अथवा गावात अत्यंत विश्वास ठेवून जवळ आलेल्या एखाद्या निरपराध प्राण्याचा जे जिवंत रहाण्याची इच्छा दाखवितात अशा प्राण्यांचा विश्वासघात करतात अशा पुरुषाला यमदूत शूलावर चढवतात. जे क्रीडेच्या साधनांप्रमाणे असलेल्या व शूल, सुई इत्यादींद्वारा ओवलेल्या प्राण्यांना मारतात त्यांनाही परलोकात शूलावर चढवितात.

अशा पातक्यांचा देह शूलामध्ये ओवतात. ते तहान व भूक यामुळे अतिशय पीडित होतात. तसे ते आपल्या तीक्ष्ण चोचींनी तेथील भयंकर कंकपक्षी व बकपक्षी त्याला सर्व बाजूंनी टोचत असतात. त्यामुळे अत्यंत पीडित होऊन त्या पुरुषांना आपल्या पातकांचे सदैव स्मरण होत रहाते. क्रूर सर्पाप्रमाणे वागून जे पुरुष इतर प्राण्यांना अत्यंत त्रस्त करतात ते दंदशूक नावाच्या नरकात पडतात. त्या ठिकाणी सर्व बाजूला सात तोंडांचे वाघ सिद्ध असतात. ते सत्वर येऊन नरकात आलेल्या त्या प्राण्याला अत्यंत क्रूर बुद्धीने प्रेरित सर्पाप्रमाणे ग्रासून टाकतात.

जे अंधकूप, अंधारकोठडी व गुहा इत्यादी ठिकाणी प्राण्यांना विनाकारण कोंडतात त्यांना परलोकामध्ये गेल्यावर तेथे हात वर उचललेले यमदूत त्यांच्या स्थानी घेऊन जातात. विषयुक्त अग्नी व धूर यांनी परिपूर्ण भरलेल्या ठिकाणी ह्या पापकर्मी पुरुषांना कोंडून टाकतात.

जो पुरुष गृहस्थाश्रमात असूनही आपल्याकडे दुपारी आलेला अतिथी पाहून त्याच्याकडे इंगळाप्रमाणे लाल डोळे करून पहातो, त्या पापदृष्टी पुरुषाचे नेत्रसुद्धा नरकामध्ये गेल्यावर ते यमदूत उपटून काढतात. ज्यांच्या चोची वज्राप्रमाणे आहेत असे कावळे व वटपक्षी तसेच अतिशय क्रूर गिधाडे त्या पापी पुरुषाचे डोळे अत्यंत बलात्काराने उपटतात.

जो पुरुष संपत्तीमुळे माजतो व अहंकार धरतो, अत्यंत गर्विष्ठ होऊन जातो आणि इतरांकडे जो नराधम दुष्ट नजरेने पहातो, तसेच सर्वांकडे संशयित दृष्टीने बघतो, जो सर्वकाळ केवळ द्रव्यप्राप्तीचीच चिंता करतो, अशा स्वार्थी पुरुषाचे हृदय व मुख अत्यंत सुकून जाते. त्याला कधीही सुख मिळत नाही. कारण तो ब्रह्मपिशाच्चाप्रमाणे द्रव्याचे रक्षण करीत असतो. असा हा पुरुष मृत झाल्यावर केवळ त्याच्या कुकर्मामुळेच दुर्गतीस जाऊन सूचिमुख नावाच्या नरकात जाऊन पडतो. यमदूतांनी त्याला नरकात फेकल्यावर ब्रह्मराक्षसाप्रमाणे वित्ताचे रक्षण करणार्‍या त्या पुरुषास यमाचे दूत एखाद्या कोष्टयाप्रमाणे त्याच्या शरीरात सर्व बाजूंनी अंगात सूत ओवतात.

असे हे द्रव्य लोभाने प्राप्त होणारे नरक पुष्कळ प्रकारचे आहेत. पापाचरण करणार्‍या पुरुषांना त्यांचे योग्यतेप्रमाणे फल यातना भोगायला लावणारी शेकडो स्थाने आहेत.

हे देवर्षे, याप्रमाणे मी तुला जशी ही स्थाने सांगितली तशी न सांगितलेली हजारो स्थाने आहेत. पण सर्व पापी पुरुष अथवा स्त्रिया या अनंत यातना भोगायला लावणार्‍या निरनिराळ्या नरकात पडतात हे निश्चित समज.

याच्या अगदी उलट असे की, जे धार्मिक प्रवृत्तीचे लोक आहेत ते मात्र सुखोपभोग देणार्‍या लोकात जातात. म्हणून ज्ञानी जनांनी देवीचे पूजन हाच उत्तम धर्म म्हणून सांगितला आहे. त्या धर्माचे मुख्य लक्षण म्हणजे देवीची आराधना हेच होय. केवळ देवीचे अनुष्ठान केले तरीही पुरुष नरकात जात नाहीत. कारण ती देवी सर्वांनाच या भवसागरातून मुक्त करते. म्हणून ती मनुष्यांना पूज्य आहे."


अध्याय तेविसावा समाप्त

GO TOP