श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
अष्टमः स्कन्धः
द्वाविंशोऽध्यायः


नरकप्रदपातकवर्णनम्

नारद उवाच
कर्मभेदाः कतिविधाः सनातनमुने मम ।
श्रोतव्याः सर्वथैवैते यातनाप्राप्तिभूमयः ॥ १ ॥
श्रीनारायण उवाच
यो वै परस्य वित्तानि दारापत्यानि चैव हि ।
हरते स हि दुष्टात्मा यमानुचरगोचरः ॥ २ ॥
कालपाशेन सम्बद्धो याम्यैरतिभयानकैः ।
तामिस्रनामनरके पात्यते यातनास्पदे ॥ ३ ॥
ताडनं दण्डनं चैव सन्तर्जनमतः परम् ।
याम्याः कुर्वन्ति पाशाढ्याः कश्मलं याति चैव हि ॥ ४ ॥
मूर्च्छामायाति विवशो नारकी पद्मभूसुत ।
यः पतिं वञ्चयित्वा तु दारादीनुपभुज्यति ॥ ५ ॥
अन्धतामिस्रनरके पात्यते यमकिङ्करैः ।
पात्यमानो यत्र जन्तुर्वेदनापरवान्भवेत् ॥ ६ ॥
नष्टदृष्टिर्नष्टमतिर्भवत्येवाविलम्बतः ।
वनस्पतिर्भज्यमानमूलो यद्वद्‍भवेदिह ॥ ७ ॥
तस्मादप्यन्धतामिस्रनाम्ना प्रोक्तः पुरातनैः ।
एतन्ममाहमिति यो भूतद्रोहेण केवलम् ॥ ८ ॥
पुष्णाति प्रत्यहं स्वीयं कुटुम्बं कार्यलम्पटः ।
एतद्विहाय चात्रैव स्वाशुभेन पतेदिह ॥ ९ ॥
रौरवे नाम नरके सर्वसत्त्वभयावहे ।
इह लोकेऽमुना ये तु हिंसिता जन्तवः पुरा ॥ १० ॥
त एव रुरवो भूत्वा परत्र पीडयन्ति तम् ।
तस्माद्‌रौरवमित्याहुः पुराणज्ञा मनीषिणः ॥ ११ ॥
रुरुः सर्पादतिक्रूरो जन्तुरुक्तः पुरातनैः ।
एवं महारौरवाख्यो नरको यत्र पूरुषः ॥ १२ ॥
यातनां प्राप्यमाणो हि यः परं देहसम्भवः ।
क्रव्यादा नाम रुरवस्तं क्रव्ये घातयन्ति च ॥ १३ ॥
य उग्रः पुरुषः क्रूरः पशुपक्षिगणानपि ।
उपरन्धयते मूढो याम्यास्तं रन्धयन्ति च ॥ १४ ॥
कुम्भीपाके तप्ततैले उपर्यपि च नारद ।
यावन्ति पशुरोमाणि तावद्वर्षसहस्रकम् ॥ १५ ॥
पितृविप्रब्राह्मणध्रुक्कालसूत्रे स नारके ।
अग्न्यर्काभ्यां तप्यमाने नारकी विनिवेशितः ॥ १६ ॥
क्षुत्पिपासादह्यमानोऽन्तःशरीरस्तथा बहिः ।
आस्ते शेते चेष्टते चावतिष्ठति च धावति ॥ १७ ॥
निजवेदपथाद्यो वै पाखण्डं चोपयाति च ।
अनापद्यपि देवर्षे तं पापं पुरुषं भटाः ॥ १८ ॥
असिपत्रवनं नाम नरकं वेशयन्ति च ।
कशया प्रहरन्त्येव नारकी तद्‍गतस्तदा ॥ १९ ॥
इतस्ततो धावमान उत्तालमतिवेगतः ।
असिपत्रैश्छिद्यमान उभयत्र च धारभिः ॥ २० ॥
संछिद्यमानसर्वाङ्गो हाहतोऽस्मीति मूर्च्छितः ।
वेदनां परमां प्राप्तः पतत्येव पदे पदे ॥ २१ ॥
स्वधर्मानुगतं भुङ्क्ते पाखण्डफलमल्पधीः ।
यो राजा राजपुरुषो दण्डयेद्वै त्वधर्मतः ॥ २२ ॥
द्विजे शरीरदण्डं च पापीयान्नारकी च सः ।
नरके सूकरमुखे पात्यते यमकिङ्करैः ॥ २३ ॥
विनिष्यिष्टावयवको बलवद्‌भिस्तथेक्षुवत् ।
आर्तस्वरेण स्वनयन्मूर्च्छितः कश्मलङ्गतः ॥ २४ ॥
स पीड्यमानो बहुधा वेदनां यात्यतीव हि ।
विविक्तपरपीडो योऽप्यविविक्तपरव्यथाम् ॥ २५ ॥
ईश्वराङ्‌कितवृत्तीनां व्यथामाचरते स्वयम् ।
स चान्धकूपे पतति तदभिद्रोहयन्त्रिते ॥ २६ ॥
तत्रासौ जन्तुभिः क्रूरैः पशुभिर्मृगपक्षिभिः ।
सरीसृपैश्च मशकैर्यूकामत्कुणजातिभिः ॥ २७ ॥
मक्षिकाभिश्च तमसि दन्दशूकैश्च पीड्यते ।
परिक्रामति चैवात्र कुशरीरे च जन्तुवत् ॥ २८ ॥
यस्तु संविहितैः पञ्चयज्ञैः काकैश्च संस्तुतः ।
अश्नाति चासंविभज्य यत्किंञ्चिदुपपद्यते ॥ २९ ॥
स पापपुरुषः क्रूरैर्याम्यैश्च कृमिभोजने ।
नरकाधमके दुष्टकर्मणा परिपात्यते ॥ ३० ॥
लक्षयोजनविस्तीर्णे कृमिकुण्डे भयङ्करे ।
कृमिरूपं समासाद्य भक्ष्यमाणश्च तैः स्वयम् ॥ ३१ ॥
अप्रत्ताप्रहुतादो यः पातमाप्नोति तत्र वै ।
यस्तु स्तेयेन च बलाद्धिरण्यं रत्‍नमेव च ॥ ३२ ॥
ब्राह्मणस्यापहरति अन्यस्यापि च कस्यचित् ।
अनापदि च देवर्षे तममुत्र यमानुगाः ॥ ३३ ॥
अयस्मयैरग्निपिण्डैः सदृशैर्नित्कुषन्ति च ।
योऽगम्यां योषितं गच्छेदगम्यं पुरुषं च या ॥ ३४ ॥
तावमुत्रापि कशया ताडयन्तो यमानुगाः ।
तिग्मया लोहमय्या च सूर्म्याप्यालिङ्गयन्ति तम् ॥ ३५ ॥
तां चापि योषितं सूर्म्यालिङ्गयन्ति यमानुगाः ।
यस्तु सर्वाभिगमनः पुरुषः पापसञ्चयी ॥ ३६ ॥
निरयेऽमुत्र तं याम्याः शाल्मलीं रोपयन्ति तम् ।
वज्रकण्टकसंयुक्तां शाल्मलीं तामयस्मयीम् ॥ ३७ ॥
राजन्या राजपुरुषा ये वा पाखण्डवर्तिनः ।
धर्मसेतुं विभिन्दन्ति ते परेत्य गता नराः ॥ ३८ ॥
वैतरण्यां पतन्त्येव भिन्नमर्यादपातकाः ।
नद्यां निरयदुर्गस्य परिखायां च नारद ॥ ३९ ॥
यादोगणैः समन्तात्तु भक्ष्यमाणा इतस्ततः ।
नात्मना वियुजन्त्येव नासुभिश्चापि नारद ॥ ४० ॥
स्वीयेन कर्मपाकेनोपतपन्ति च सर्वतः ।
विण्मूत्रपूयरक्तैश्च केशास्थिनखमांसकैः ॥ ४१ ॥
मेदोवसासंयुतायां नद्यामुपपतन्ति ते ।
वृषलीपतयो ये च नष्टशौचा गतत्रपाः ॥ ४२ ॥
आचारनियमैस्त्यक्ताः पशुचर्यापरायणाः ।
तेऽत्रानुकष्टगतयो विण्मूत्रश्लेष्मरक्तकैः ॥ ४३ ॥
श्लेष्ममलसमापूर्णे निपतन्ति दुराग्रहाः ।
तदेव खादयन्त्येतान्यमानुचरवर्गकाः ॥ ४४ ॥
ये श्वानगर्दभादीनां पतयो वै द्विजातयः ।
मृगयारसिका नित्यमतीर्थे मृगघातकाः ॥ ४५ ॥
परेतांस्तान्यमभटा लक्षीभूतान्नराधमान् ।
इषुभिश्च विभिन्दन्ति तांस्तान्दुर्नयमागतान् ॥ ४६ ॥
ये दम्भा दम्भयज्ञेषु पशून्घ्नन्ति नराधमाः ।
तानमुष्मिन्यमभटा नरके वैशसे तदा ॥ ४७ ॥
निपात्य पीडयन्त्येव कशाघातैर्दुरासदैः ।
यो भार्यां च सवर्णां वै द्विजो मदनमोहितः ॥ ४८ ॥
रेतः पाययति मूढोऽमुत्र तं यमकिङ्कराः ।
रेतःकुण्डे पातयन्ति रेतः सम्पाययन्ति च ॥ ४९ ॥
ये दस्यवोऽग्निदाश्चैव गरदा सार्थघातकाः ।
ग्रामान्सार्थान्विलुम्पन्ति राजानो राजपूरुषाः ॥ ५० ॥
तान्परेतान्यमभटा नयन्ति श्वानकादनम् ।
विंशत्यथिकसंख्याताः सारमेया महाद्‍भुताः ॥ ५१ ॥
सप्तशत्या समाख्याता रभसं खादयन्ति ते ।
सारमेयादनं नाम नरकं दारुणं मुने ।
अतः परं प्रवक्ष्यामि अवीचिप्रभुखान्मुने ॥ ५२ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
नरकप्रदपातकवर्णनं नाम द्वाविंशोऽध्यायः ॥ २२ ॥


पातकांच्या कर्माप्रमाणे नरक यातनांचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारद म्हणाले, "हे नित्यमुने, कर्मभेद किती प्रकारचे आहेत ? ते मला सांगा. कारण हे कर्मभेदच यातनांची स्थाने प्राप्त करून देत असतात. म्हणून त्याविषयी मी ऐकण्याची इच्छा करीत आहे."

श्री नारायण मुनी म्हणाले, "हे नारदा, जो दुसर्‍याचे वित्त, स्त्री, अपत्ये हरण करतो तो पुरुष दुष्टबुद्धी असून तो नेमका यमाच्या दूतांच्या दृष्टीस पडतो. नंतर ते यमदूत त्या दुर्बुद्धीला कालपाशांनी बद्ध करतात. मग त्याला अत्यंत भयंकर यमयातना भोगायला लावतात. अखेर अत्यंत यातनांची पीडा देणारा असा जो तामिस्त्र नावाचा नरक आहे त्यात त्याला पाठवतात.

त्या नरकात सर्व दूत पाशांनी युक्त असतात. ते बद्ध पुरुषाला ताडन करतात, भयंकर दंड करतात व त्याची अत्यंत निर्भत्सना करून त्याला घोर यातना भोगायला लावतात.

त्यामुळे प्राणी अगदी दीन होऊन जातो. हे नारदा, त्यानंतर तो अगदीच परतंत्र असल्यामुळे त्याला मूर्च्छा येते. जो पतीला फसवून त्याच्या स्त्रीचा उपभोग घेतो, त्याला यमाचे दास अंधतामिस्र नावाच्या नरकात टाकतात. ते यमदूत जेव्हा त्या प्राण्याला त्या नरकात लोटतात तेव्हा तो अती वेदना होत असल्यामुळे बेशुद्ध पडतो. त्याची दृष्टी क्षीण होत जाऊन नाहीशी होते. बुद्धी सत्वर नष्ट होते. वनस्पतींची मुळे तोडल्यावर ज्याप्रमाणे ती वनस्पती निस्तेज होते, तसे त्या प्राण्याचेही होत असते. म्हणूनच त्या नरकाला प्राचीन लोकांनी अंधतामिस्र असे नाव दिले आहे. ते योग्यच आहे.

भूतांचा द्रोह करून व 'हे माझे, हा मी' असे म्हणून जो प्रत्येक दिवशी कार्यलोलुप होतो व केवळ आपले कुटुंब पोसतो, तो सर्व सोडून आपल्याच अशुभ कर्मामुळे प्राण्यांना भयावह असलेल्या रौरव नावाच्या नरकात जातो. त्याने पूर्व जन्मात प्राण्यांची हिंसाही केलेली असते. ते रूरू होऊन त्याला परलोकी अतिशय त्रस्त करतात. म्हणून तर सर्व विद्वान जन याला पुराणयज्ञ रौरव असे संबोधतात

प्राचीन लोक सांगतात की रूरू हा प्राणी सर्वापेक्षाही अत्यंत क्रूर आहे. त्याचप्रमाणे तो महारौरव नावाचा नरकही तसाच भयंकर आहे. जेव्हा प्राणी कर्माचे फले भोगू लागतो तेव्हा त्याला यातना असह्य होतात. त्यात पुरुषाला देह प्राप्ती होऊन क्रव्याद नावाचे रूरू त्या पुरुषाच्या देहाच्या मांसाचे लचके तोडत असतात. हे नारदा, जो पुरुष अत्यंत क्रूर व उग्रपणामुळे पशुपक्षांच्या थव्यांचा पाक करतो त्याला त्या पुरुषाने मारलेल्या पश्वादिकांचे जेवढे रोम असतात ते सर्व मिळून जी संख्या होते, तितकी हजार वर्षे कुंभीपाकामध्ये नेतात व तापलेल्या तेलात त्याला ते यमाचे दूत तळतात.

जो पुरुष माता, पिता, सामान्य जन, ब्राह्मण, विद्वान यांचाही द्रोह करतो त्याला नरकात टाकतात. सूर्य व अग्नी यांच्यापासून कालसूत्र नावाचा नरक निर्माण झाला आहे. त्या नरकात त्या द्रोही पुरुषाला पाठवितात. तेथे तो भुकेने व तहानेने आतून जळू लागतो व उष्णतेमुळे बाहेरूनही तप्त होऊ लागतो. त्यामुळे त्याला काहीही सुचेनासे होते. तो कधी बसतो, तर कधी निजतो, कधी उभाच रहातो तर कधी धावू लागतो. इतर सर्वजण त्याची फारच चेष्टा व अवहेलना करतात.

हे नारदा, कोणत्याही प्रकारचे संकट नसतानासुद्धा जो आपल्या वेदोक्त मार्गांपासून ढळतो, तो पाखंडी झालेला असल्याने त्या पापी पुरुषाला यमाचे भाट असिपत्र नावाच्या घोर नरकात टाकतात. तेथे तो पुरुष गेल्यावर तेथील यमदूत त्याला वाद्यांनी भयंकर मारतात. त्यामुळे तो हातावर हात आपटीत अतिशय शीघ्रगतीने इकडे तिकडे धावू लागतो. तेव्हा दोन्ही बाजूला धार असलेल्या तरवारीच्या पात्यांनी त्याला कापून काढतात. यमदूत त्याच्या सर्वांगाचे तुकडे करीत असताना तो ओरडू लागतो. तो म्हणतो, "हाय, हाय ! मेलो, मेलो !" असे म्हणत असतानाच त्याला असह्य वेदना झाल्यामुळे तो एकसारखा मूर्च्छित पडू लागतो. असा अल्पज्ञान प्राप्त झालेला पुरुष आपल्या धर्मकर्माप्रमाणे नास्तिकपणाचे योग्य असे फल भोगत असतो

आता हे देवर्षे, जो राजा अथवा राजपुरुष अधममार्गाने वागून अयोग्य दंड करतो, तसेच ब्राह्मण, तपस्वी इत्यादि द्विजांना अन्यायाने शरीरदंड भोगायला लावतो, त्याला यमाचे दूत सूकरमुख नावाच्या नरकात टाकतात. तेथे अत्यंत बलाढय असे यमदूत असतात. ते त्या राजपुरुषाचे अवयव उसाप्रमाणे पिळून काढतात. त्यामुळे तो पुरुष अतिशय दीन व करुण होतो. तो ओरडू लागतो. अखेर त्याला भयंकर मूर्च्छा येते. तो निश्चेष्ट होऊन पडतो. अशाप्रकारे त्याला अत्यंत वेदना होऊ लागतात व त्याला ते असह्य होऊन जाते.

ज्याची ईश्वराने रक्तपानादि रूपांनी उपजीविका केलेली असून जो दुसर्‍यांना नित्य पिडा करतो, त्याला अत्यंत द्रोहामुळे नियंत्रित होणार्‍या अंधकूपात यमदूत घेऊन येतात. त्या ठिकाणी अत्यंत क्रूर असे जंतू असतात. तसेच भयंकर पशु, मृग, पक्षी, साप, मत्सर, उवा, ढेकूण इत्यादि जाती, त्याचप्रमाणे माश, दंशशूक नावाने प्रसिद्ध असलेले सर्प, इत्यादि सर्व प्राणी त्याला अंधारातच सारखी पीडा देतात. अखेर तो पुन्हा जंतूसारख्या वाईट जन्माला जातो.

जो विहित धर्माच्या मार्गाने व इतर पंचयज्ञांच्या योगाने मिळालेले असे सर्व धन व इतर साहित्य हे इतरांना वाटणी करून न देता स्वतःच खाऊन त्याचा उपभोग घेतो, तो कावळ्यासारखा समजावा असे शास्त्र म्हणते. अशा त्या पाप्याला क्रूर असे यमदूत कृमिभक्षण नावाच्या अत्यंत अधम अशा नरकात फेकून देतात. त्याच्याशी ते यमदूत क्रूरपणाने वागतात.

तेथे कृमीकुंड नावाचा नरक असून तो प्राणी स्वतः कृमी होऊन स्वतःला इतर कृमींकडून खाववतो अशा या नरकात पडणार्‍या प्राण्याने अतिथींना अन्न विभागून दिलेले नसते. तसेच भूतबली न देता स्वतःच सर्व भक्षण केलेले असते. म्हणून तो तेथे पडतो.

जो संकटे नसतानाही चौर्यकर्म करतो, किंवा ब्राह्मणांचे अथवा इतर कुणाचेही सुवर्ण किंवा धन, रत्ने इत्यादिंचे हरण करतो त्याला यमाचे अनुयायी अग्नीप्रमाणे तप्त व लाल झालेल्या लोखंडाच्या गोळ्यांनी भाजून काढतात.

हे नारदा, जो चांडाल इत्यादि स्त्रियांशी गमन करतो किंवा जी स्त्री याप्रमाणे अगम्य पुरुषाशी शरीरसंबंध ठेवते, अशा त्या स्त्री-पुरुषांना यमदूत परलोकी घेऊन गेल्यावर तेथे चाबकाच्या वाद्यांनी मारतात. त्या पुरुषाला यमदूत जळजळीत लोखंडाच्या स्त्रीला आलिंगन द्यायला लावतात व त्या स्त्रीलाही लोखंडाच्या जळजळीत पुरुषाला आलिंगन देण्यास भाग पाडतात.

सर्व जातीच्या स्त्रियांशी गमन करणारा पुरुष पापराशीच निर्माण करीत असतो. त्या पुरुषाला यमदूत नरकात गेल्यावर शूलावर चढवतात. तो शूल वज्रासारख्या काटयांनी युक्त असतो.

जे राजे अथवा राजाचे अधिकारी पुरुष नास्तिक वृत्तीचा स्वीकार करून धर्माच्या नीतीनियमांचे उल्लंघन करतात, ते पुरुष मृत होऊन परलोकी गेल्यावर वैतरणी नदीमध्ये पडतात. हे नारदा, ही गोष्ट तू निश्चित समज. ती नदी जणू काय नरकरूपी किल्ल्याचा खंदकच आहे. त्या नदीत असलेले भयंकर जलचर प्राणी त्या पुरुषाला सदैव दंश करीत रहातात.

पण हे नारदा, इतक्या प्रकारे छळवणूक होऊनही ते सर्व क्लेश त्या पुरुषांना सहनच करावे लागतात कारण या यातना भोगत असता त्यांचा देहनाश होत नाही अथवा यांचा प्राण जात नाही. कारण स्वतःच्या दुष्कर्मामुळे विष्ठा, मूत्र, पू, रक्त, केस, अस्थी, नखे, मांस यांपासून त्यांना सर्व बाजूंनी त्रास भोगावा लागतो. मेद व वसा यांनी परिपूर्ण भरलेल्या नदीत ते बुडून जातात.

ज्या स्त्रियांचे व्यभिचारी पती, अमंगलपणे, निर्लज्जपणे, आचार व नियम सोडून व पशूप्रमाणे, आचरण करतात, त्यातच जे मग्न होतात, असे दुराग्रही लोक परलोकात गेल्यावर विष्ठा, मूत्र, कफ व रक्त यांपासून मिळणार्‍या किळसवाण्या गतीस जातात व घाणेरडया श्लेष्मा, मल यांनी भरलेल्या खड्डयात पडतात. यमाचे अनुयायी तेथे जाऊन त्या पापी पुरुषांना ती घाण खाण्यास भाग पाडतात.

जे ब्राह्मण कुत्री व गाढवे यांचे स्वामी असतात व नित्य मृगयेची इच्छा करतात, वेदांनी सांगितलेल्या ठिकाणावाचून इतरत्र जे प्राण्यांची हिंसा करतात, जे अत्यंत धनसंचय करतात, ते दुष्ट नराधम मृत झाल्यावर त्या त्यांच्या अनीतीच्या कर्मगतीमुळे प्राप्त झालेल्या नरकात पडतात. तेथे त्यांना यमाचे दूत तीक्ष्ण बाणांनी टोचतात. जे पुरुष अतिशय दांभिकपणा व अधमपणा करतात व त्या योगे यज्ञात पशूंची हत्या करतात त्यांना परलोकी गेल्यावर यमदूत विशस नावाच्या घोर नरकात फेकतात. तेथे ते अत्यंत दुःसह अशा चाबकाच्या वाद्यांनी त्यांचे शरीरावर प्रहार करतात, तेथे अतिशय पीडा देतात.

कामव्यथेने पीडित होऊन जो द्विज सगोत्र स्त्रीच्या ठिकाणी समागम करतो, त्या मूर्खाला परलोकात नेऊन यमदूत रेतकुंडात टाकतात. त्यातील रेत पिववितात.

जे चोर, आग लावणारे, विष घालणारे, वाटमारे असे असतात, अथवा जे राजे व अधिकारी द्रव्याच्या इच्छेने गावे लुटून द्रव्य लुटतात असे पुरुष मृत झाल्यावर त्यांना यमाचे दूत कुत्र्यांच्या भक्षस्थानावर नेतात तेथे अत्यंत अद्‍भुत असे सातशे वीस कुत्रे आहेत असे शास्त्र सांगते. ते कुत्रे अशा पुरुषांना सत्वर खातात.

हे नारदमुने, या नरकालाच सारमेयादन असे नाव दिलेले आहे. आता हे देवर्षे, तुला मी अवीची व उरलेले नरक यांविषयी सांगतो.


अध्याय बाविसावा समाप्त

GO TOP