[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
या सर्व भाषणानंतर नारदमुनी म्हणाले, "हे नारायणमुनी, हे महाराज, देवीचा आराधनारूप धर्म कशा प्रकारचा आहे ? तिची आराधना केल्यावर ती देवी कशी बरे परमपद प्राप्त करून देते ? तिच्या आराधनेचा प्रकार कसा आहे ? तिची कशी व केव्हा आराधना करावी ? कोणते उपाय केल्याने ती देवी दुस्तर नरकांपासून मानवाचे संरक्षण करते ? हे सर्व आता मला सांगा."
श्रीनारायणमुनी म्हणाले, "हे महाविद्वान नारदा, धर्मशील आचरण करीत राहिल्याने विनासायास देवीची प्राप्ती कशी होते, ती कशी प्रसन्न होते, हे सर्व मी आता सांगतो. हे मुने, तू शांत चित्ताने ऐकून घे.
हे नारदा, स्वधर्म कोणता व तो कोणत्या प्रकारचा सांगितला आहे हे मी तुला सांगतो. अनादि अशा संसारात राहून देवीचे पूजन केल्यावर देवी प्राप्त होते. आता हे नारदा, त्या पूजेचा विधी ऐक. मी तुला समजावून सांगतो. प्रतिपदेच्या दिवशी देवीची गाईच्या तुपाने पूजा करावी. ब्राह्मणाला ते घृत व दक्षिणा यांचे दान करावे. म्हणजे दान देणारा सर्व रोगराईपासून मुक्त होतो. त्यानंतर द्वितीयेस साखरेच्या योगाने त्या जगदंबेची पूजा करावी व ब्राह्मणाला ती शर्करा दक्षिणेसह दान करावी, म्हणजे मनुष्य दीर्घायुषी होतो.
तृतीयेच्या दिवशी उत्कृष्ट दूध अर्पण करून देवीची आराधना करावी व ते श्रेष्ठ ब्राह्मणास अर्पण करावे. त्यामुळे प्राण्याचे सर्व दुःखांपासून रक्षण होते. चतुर्थीस पूजनांचे वेळी देवीची अनरशांनी पूजा करून ते अनरसे ब्राह्मणास द्यावेत. त्यामुळे मनुष्यावर कसलेही विघ्न येत नाही. पंचमीचे दिवशी देवीला केळांचा नैवेद्य दाखवून ती ब्राह्मणांना दान द्यावीत. त्यामुळे दात्याची बुद्धी वाढते. षष्ठीला देवीचे पूजन करताना मध घ्यावा आणि नंतर मध ब्राह्मणाला दान द्यावा. त्यामुळे देणार्याची शरीरकांती मधाप्रमाणे सतेज होते.
सप्तमीच्या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवून तो गूळही ब्राह्मणास अर्पण करावा. हे ब्राह्मणोत्तमा, त्यामुळे देणारास कधीही शोक प्राप्त होत नाही. अष्टमीच्या दिवशी देवीची नारळाने पूजा करून नारळ ब्राह्मणास दान द्यावेत. त्यामुळे दात्यास ताप वगैरे होत नाहीत. नवमीचे दिवशी लाह्यांनी देवीची पूजा केल्यावर लाह्या ब्राह्मणास द्याव्यात. त्यामुळे इहलोकात व परलोकातही सुख प्राप्त होत असते.
हे नारदमुने, दशमीचे दिवशी देवीला काळे तीळ द्यावेत व ते ब्राह्मणाला दान द्यावेत. म्हणजे यमयातनाचे भय नाहीसे होते. एकादशीच्या दिवशी जर देवीला दही अर्पण करून ते ब्राह्मणाला दिले तर तो देणारा देवीस अतिशय प्रिय होतो. द्वादशीच्या दिवशी देवीला व ब्राह्मणाला जो पोहे अर्पण करतो त्याच्यावर देवी प्रसन्न होते. त्रयोदशीच्या दिवशी देवीची मण्यांनी पूजा करून ते ब्राह्मणाला अर्पण केल्यास त्या पुरुषाला विपुल संतती होते. हे नारदा, चतुर्दशीला देवीला सातू अर्पण करून त्याचे ब्राह्मणास दान दिल्यास तो शंकराला अत्यंत प्रिय होतो. त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी सांजा करून देवीचे पूजन करावे व तो सांजा ब्राह्मणाला दान करावा म्हणजे दात्याच्या सर्व पितरांचा उद्धार होतो.
हे भाग्यवान मुने, याप्रमाणे सांगितलेल्या तिथीला त्या त्या वस्तु घेऊन देवीची नित्य पूजा करावी. त्या वस्तु ब्राह्मणास अर्पण कराव्यात व त्यांचे अशाप्रकारे हवन करावे. त्यामुळे सर्व अरिष्टांची शांती होते.
रविवारी देवीला पयसाचा नैवेद्य दाखवून तिची सेवा करावी. सोमवारी नैवेद्यासाठी दूध वापरावे. मंगळवारी केळींनी पूजा करावी. बुधवारी ताजे लोणी पूजेसाठी योग्य आहे. गुरुवारी लाल साखर व शुक्रवारी पांढरी साखर घेऊन देवीचे पूजन करावे. शनिवारी गाईच्या तुपाने पूजा करावी असे सांगितले आहे.
हे नारदा, आता सत्तावीस नक्षत्रांना काय नैवेद्य दाखवायचा ते तुला सांगतो, ते ऐक.
घृत, तीळ, साखर, दही, दूध, दुधाची साय, दह्याची साय, मोदक, तारफेण्या, शक्करपारा, सांजा, पापड, घीवर, वडे, खजुराचा रस, बेसन, मधु, सुरण, गूळ, पोहे, द्राक्षे, खजूर, चारोळ्या, अपूप, लोणी, मुगदळ, मोदक, महाळुंगे हे पदार्थ नैवेद्यासाठी म्हणून निवेदन केले आहेत.
आता विष्कंभादि योगावर काय करावे हे मी तुला निवेदन करतो. मी सांगितलेले पदार्थ जर खरोखरच देवीला अर्पण केले तर ती जगदंबा निश्चयाने प्रसन्न होते.
गूळ, मध, तूप, दूध, दही, ताक, अनरसे, लोणी, काकडी, कोहळा, मिठाई, फणस, केळी, जांभुळ, आंबा, तीळ, नारिंग, डाळिंब, बोर, आवळा, खीर, पोहे, चणे, नारळ, जंबीर, केशर व सुरण वगैरे पदार्थांनी विष्कंभासारखे योग असतील त्या दिवशी देवीचे पूजन करावे. असे हे नैवेद्य क्रमाने देवीस दाखवावेत.
आता हे नारदा, कारणांचा नैवेद्य तुला मी वेगवेगळे सांगतो ते ऐक.
सांजा, मांडा, तारफेणी, मोदक, पापड, लाडू घीवर, तीळ, दही, तूप, मध ह्या पदार्थांनी कारणाला देवीस उत्कृष्ट नैवेद्य दाखवावा व आदराने तिचे पूजन करावे असे शास्त्रात सांगितले आहे.
हे नारदमुने, देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी काय करावे त्याचे विधी मी आता तुला सांगतो. ते सर्व विधी तू लक्षपूर्वक ऐक.
चैत्र शुद्ध तृतीयेच्या दिवशी पुरुषाने त्या देवतेचे आवाहन करावे व महुव्याच्या वृक्षाचे पूजन करावे. पाच प्रकारचे खाद्यपदार्थ घेऊन त्यांचा नैवेद्य देवीस अर्पण करावा. ह्याप्रमाणे बारा महिन्यात सर्व शुक्लपक्षातील तृतीयेचे दिवशी कसे पूजन करावे ते आता सर्व विधी तुला सांगतो
हे नारदा, वैशाखात तृतीयेचे दिवशी गुळखाद्याचा नैवेद्य दाखवावा. ज्येष्ठातील शुद्ध तृतीयेस मध वापरावा. आषाढात महुव्याच्या झाडालाच लोण्याचा नैवेद्य दाखवावा. श्रावणात दही, भाद्रपदात साखर, अश्विनात खीर, कार्तिकात उत्तम प्रकारचे दूध वापरावे. मार्गशीर्षात उत्कृष्ट तारफेणी अर्पण करावी. पौष महिन्यात दह्यावरील साय, माघात गाईचे तूप, फाल्गुनात नारळ असे हे नैवेद्य दाखवावेत असे सांगितले आहे. याप्रमाणे क्रमाक्रमाने बारा महिने त्या देवीचे यथाविधी पूजन करावे.
मंगला, वैष्णवी, माया, कालरांत्री, दुरत्यचा, महामाया, मतंगी, काली, कमलवासिनी, शिवा, सहस्रचरणा व सर्वमंगलरूपिणी अशी देवीची नावे आहेत. त्यांचा उच्चार करून देवीची महुव्याचे वृक्षाच्या ठिकाणी निश्चिती करून पूजा करावी.
त्यानंतर महुव्याचे वृक्षात स्थित असलेली महेश्वरी देवी तिच्या सर्व कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून व आपल्याही व्रताची सिद्धी व्हावी म्हणून त्या देवीचे आदराने स्तवन करावे.
"पुष्कर नेत्रा देवी, तुला माझा नमस्कार असो. हे सर्व जगताचे रक्षण करणार्या देवी, तुला नमस्कार असो. हे महेश्वरी, महाभूती महामंगल मूर्ती, अशी तू देवी आहेस, त्या तुला नित्य नमस्कार असो."
तू सर्वश्रेष्ठ असून सर्वांच्या पापांचा नाश करतेस. तसेच सन्मार्ग देतेस. हे परमेश्वरी, सर्व लोकांचे उत्पत्तीस्थान तूच आहेस. हे ब्रह्मस्वरूपिणी, मद देणारी व मदाने उन्मत्त झालेली अशी केवळ नामावरूनच तुझे ज्ञान होते. तू अत्यंत उन्नत आहेस, तसेच फार विचारी आहेस. तू मुनींनी ध्यान करावे अशी आहेस, तसेच तू प्रत्येक सूर्य मंडलात रहातेस. तेव्हा हे प्रज्ञे, तू लोकेश्वरी, तुझा सदैव जयजयकार असो.
तू नित्य ध्यान करणार्यांना प्रिय मानतेस. तू मानवांना केवळ मनाने ज्ञात होतेस व शंकराचे प्रिय करतेस. अश्वत्थ, वट, निंब, कवठ, बदरी या वृक्षांमध्ये तुझेच रूप आहे.
फणस, अर्क, नेबती वगैरे क्षीराने युक्त असलेल्या वृक्षातही तूच आहेस. तू दुधवल्लीतही रहाण्यास योग्य आहेस. तुझ्या ठिकाणी अत्यंत दया आहे व तू स्वतः अतिशय दयाळू आहेस.
दाक्षिण्य व करुणा हीच तुझी रुपे आहेत. हे सर्वज्ञे, हे सुंदरी, तुझा जयजयकार असो !
या स्तोत्रांच्या आधारे ब्राह्मण वेदसंपन्न होतात. क्षत्रिय युद्धात विजयी होतात. वैश्यांना धन प्राप्त होते.
श्राद्धाचे वेळी जर हे स्तोत्र म्हटले तर त्याच्या पितरांची एक कल्पपर्यंत तृप्ती होते. अशाप्रकारे देवांनाही मान्य असलेली अशी ही देवीची आराधना सांगितली आहे. असे देवीचे पूजन नित्य पवित्र नि मंगल आहे. त्याचप्रमाणे हे मुनिश्रेष्ठा, महुव्याच्या झाडाचे पूजन महिन्याच्या क्रमाने सांगण्यात आले आहे. हे मधू नावाचे पूजन जो करील त्याला रोगबाधा इत्यादीपासून भय उत्पन्न होणारच नाही.
'हे निष्पापा, हे नारदा, आता मी तुला प्रकृतीचे दुसरे आणखी जे श्रेष्ठ पंचक आहे ते सांगतो. ते नाव, रूप, उत्पत्ती यांच्या योगाने सर्व जगाला आनंद देणारे असे आहे. हे मुने, ते सर्व आख्यान व महात्म्य त्या पंचकासहित तू आता ऐक. ते अत्यंत चमत्कृतिजन्य व मुक्ती प्राप्त करून देणारे आहे.