श्रीनारायण उवाच
प्रथमे विवरे विप्र अतलाख्ये मनोरमे ।
मयपुत्रो बलो नाम वर्ततेऽखर्वगर्वकृत् ॥ १ ॥
षण्णवत्यो येन सृष्टा मायाः सर्वार्थसाधिकाः ।
मायाविनो याश्च सद्यो धारयन्ति च काश्चन ॥ २ ॥
जृम्भमाणस्य यस्यैव बलस्य बलशालिनः ।
स्त्रीगणा उपपद्यन्ते त्रयोलोकविमोहनाः ॥ ३ ॥
पुंश्चल्यश्चैव स्वैरिण्यः कामिन्यश्चेति विश्रुताः ।
या वै बिलायनं प्रेष्ठं प्रविष्टं पुरुषं रहः ॥ ४ ॥
रसेन हाटकाख्येन साधयित्वा प्रयत्नतः ।
स्वविलासावलोकानुरागस्मितविगूहनैः ॥ ५ ॥
संलापविभ्रमाद्यैश्च रमयन्त्यपि ताः स्त्रियः ।
यस्मिन्नुपयुक्ते जनो मनुते बहुधा स्वयम् ॥ ६ ॥
ईश्वरोऽहमहं सिद्धो नागायुतबलो महान् ।
आत्मानं मन्यमानः सन्मदान्ध इव कथ्यते ॥ ७ ॥
एवं प्रोक्ता स्थितिश्चात्र अतलस्य च नारद ।
द्वितीयविवरस्यात्र वितलस्य निबोधत ॥ ८ ॥
भूतलाधस्तले चैव वितले भगवान्भवः ।
हाटकेश्वरनामायं स्वपार्षदगणैर्वृतः ॥ ९ ॥
प्रजापतिकृतस्यापि सर्गस्य बृंहणाय च ।
भवान्या मिथुनीभूय आस्ते देवाधिपूजितः ॥ १० ॥
भवयोर्वीर्यसम्भूता हाटकी सरिदुत्तमा ।
समिद्धो मरुता वह्निरोजसा पिबतीव हि ॥ ११ ॥
तन्निष्ठ्यूतं हाटकाख्यं सुवर्णं दैत्यवल्लभम् ।
दैत्याङ्गना भूषणार्हं सदा तं धारयन्ति हि ॥ १२ ॥
तद्बिलाधस्तलात्प्रोक्तं सुतलाख्यं बिलेश्वरम् ।
पुण्यश्लोको बलिर्नामा आस्ते वैरोचनिर्मुने ॥ १३ ॥
महेन्द्रस्य च देवस्य चिकीर्षुः प्रियमुत्तमम् ।
त्रिविक्रमोऽपि भगवान् सुतले बलिमानयत् ॥ १४ ॥
त्रैलोक्यलक्ष्मीमाक्षिप्य स्थापितः किल दैत्यराट् ।
इन्द्रादिष्वप्यलब्धा या सा श्रीस्तमनुवर्तते ॥ १५ ॥
तमेव देवदेवेशमाराधयति भक्तितः ।
व्यपेतसाध्वसोऽद्यापि वर्तते सुतलाधिपः ॥ १६ ॥
भूमिदानफलं ह्येतत्पात्रभूतेऽखिलेश्वरे ।
वर्णयन्ति महात्मानो नैतद्युक्तं च नारद ॥ १७ ॥
वासुदेवे भगवति पुरुषार्थप्रदे हरौ ।
एतद्दानफलं विप्र सर्वथा नहि युज्यते ॥ १८ ॥
यस्यैव देवदेवस्य नामापि विवशो गृणन् ।
स्वकीयकर्मबन्धीयगुणान्विधुनुतेऽञ्जसा ॥ १९ ॥
यत्क्लेशबन्धहानाय सांख्ययोगादिसाधनम् ।
कुर्वते यतयो नित्यं भगवत्यखिलेश्वरे ॥ २० ॥
न चायं भगवानस्माननुजग्राह नारद ।
मायामयं च भोगानामैश्वर्यं व्यतनोत्परम् ॥ २१ ॥
सर्वक्लेशाधिहेतुं तदात्मानुस्मृतिमोषणम् ।
यं साक्षाद्भगवान् विष्णुः सर्वोपायविदीश्वरः ॥ २२ ॥
याञ्जाछलेनापहृतं सर्वस्वं देहशेषकम् ।
अप्राप्तान्योपाय ईशः पाशैर्वारुणसंभवैः ॥ २३ ॥
बन्धयित्वावमुच्यापि गिरिदर्यामिवाब्रवीत् ।
असाविन्द्रो महामूढो यस्य मन्त्री बृहस्पतिः ॥ २४ ॥
प्रसन्नमिममत्यर्थमयाचल्लोकसम्पदम् ।
त्रैलोक्यमिदमैश्वर्यं कियदेवातितुच्छकम् ॥ २५ ॥
आशिषां प्रभवं मुक्त्वा यो मूढो लोकसम्पदि ।
अस्मत्पितामहः श्रीमान् प्रह्लादो भगवत्प्रियः ॥ २६ ॥
दास्यं वव्रे विभोस्तस्य सर्वलोकोपकारकः ।
पित्र्यमैश्वर्यमतुलं दीयमानं च विष्णुना ॥ २७ ॥
पितर्युपरते वीरे नैवैच्छद्भगवत्प्रियः ।
तस्यातुलानुभावस्य सर्वलोकोपधीमतः ॥ २८ ॥
अस्मद्विधो नाल्पपक्वेतरदोषोऽवगच्छति ।
एवं दैत्यपतिः सोऽयं बलिः परमपूजितः ॥ २९ ॥
सुतले वर्तते यस्य द्वारपालो हरिः स्वयम् ।
एकदा दिग्विजये राजा रावणो लोकरावणः ॥ ३० ॥
प्रविशन्सुतले येन भक्तानुग्रहकारिणा ।
पादाङ्गुष्ठेन प्रक्षिप्तो योजनायुतमत्र हि ॥ ३१ ॥
एवंभूतानुभावोऽयं बलिः सर्वसुखैकभुक् ।
आस्ते सुतलराजस्थो देवदेवप्रसादतः ॥ ३२ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
अतलवितलसुतललोकवर्णनं नामैकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥
सुतला विषयीचे वर्णन -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्रीनारायण मुनी म्हणाले, "हे नारदा, हे ब्राह्मणा, आता सर्व विवरांबद्दल संक्षेपाने सांगतो."
सर्वात प्रथम अतल नावाचे विवर आहे. तेथे मयाचा बल नावाने प्रसिद्ध पुत्र वास्तव्य करीत असतो. तो अत्यंत गर्वोन्मत्त आहे. त्याने शहाण्णव माया निर्माण केल्या आहेत. त्या सर्व माया सर्व इच्छा पूर्ण करणार्या आहेत. काही मायावी लोकांजवळ इतरही त्यापैकी काही माया असतात.
तो बलाढय पुत्र बल हा जेव्हा जांभई देतो तेव्हा तिन्ही लोकांना मोह उत्पन्न करतील असे मनोहर स्त्रियांचे समूह निर्माण होतात.
पुश्चली म्हणजे ज्या स्त्रिया कोणत्याही पुरुषाशी रममाण होतात. स्वैरिणी स्त्रिया फक्त स्ववर्णाच्या पुरुषांबरोबरच रममाण होतात. तसेच कामिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्त्रिया अन्य वर्णांशी रममाण होतात. अशा स्त्रिया त्याच्या जांभईपासून निर्माण होतात.
त्या विवरात जो पुरुष प्रवेश करील त्याला त्या स्त्रिया हाटक नावाच्या रसाने विनासायास वश करून घेतात आणि ते वश झाले म्हणजे आपले मोहक विलासयुक्त कटाक्ष त्यावर सोडतात. नंतर त्याला प्रेमाने जिंकून त्याच्याशी हास्यविनोद करून त्याला आलिंगन देतात. नंतर त्याच्याबरोबर मृदु संभाषणे करून त्याला मोहावश करतात. नंतर त्याला सर्व सुखे अर्पण करून त्याला रमवतात. अशाप्रकारे सुखप्राप्ती झाल्यामुळे तो पुरुष स्वतःला कृतकृत्य मानतो.
त्या पुरुषाला अत्यंत धन्यता वाटते. ' मीच ईश्वर आहे, मीच सिद्ध आहे, तसेच मला हजारो हत्तींचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे, मीच काय तो मोठा आहे, असे त्या पुरुषाला स्वतःबद्दल वाटू लागते आणि नंतर तो मदोन्मत्त झाल्याप्रमाणे वल्गना करतो.
हे नारदा, याप्रमाणे ते अतल फार विलक्षण आहे. त्याची स्थिती मी तुला सांगितली. आता हे विप्रश्रेष्ठा, दुसरे विवर जे वितल नावाने प्रसिद्ध आहे त्याची मी आता माहिती सांगतो. तू ती एकाग्र चित्ताने श्रवण करून समजून घे.
भूतलाच्या खालील भागांत असलेल्या या वितलामध्ये भगवान शंकर हाटकेश्वर नाव धारण करून आपल्या गणांसहवर्तमान रहात असतो. प्रजापतीने निर्माण केलेल्या सृष्टीची वृद्धी करीत तो तेथे रहातो. तो वितलामध्ये भवानीसह वास्तव्य करीत असतो.
तो हाटकेश्वर भगवान शंकर सर्व देवांना पूज्य आहे. भव आणि भवानी यांच्या वीर्यापासून हाटकी या नावाने प्रसिद्ध असलेली सर्वोत्तम नदी उत्पन्न झाली. वायूने पेटलेला अग्नी जणू काय आपल्या सामर्थ्यांने तिला पिऊन टाकीत असतो.
त्या भगवान हाटकेश्वराने फेकलेल्या थुंकीतून हाटक नावाचे सुवर्ण निर्माण होते. ते दैत्यांचे अत्यंत आवडते आहे. दैत्य स्त्रिया त्या सुवर्णापासून विविध भूषणे तयार करून अत्यंत प्रेमाने परिधान करतात.
या विवराच्या खाली सुतल नावाचे आणखी एक सर्वात उत्तम असे विवर आहे असे सांगितले आहे.
हे नारदा, जो अत्यंत पुण्यवान म्हणून कीर्ती पावला आहे असा विरोचनाचा पुत्र बली या ठिकाणी नित्य वास्तव्य करीत असतो. महेंद्र म्हणून विख्यात असलेल्या देवाचे प्रिय करावे या इच्छेनेच भगवान त्रिविक्रमाने बलीला या सुतली नावाच्या विवरात आणून ठेवले आहे आणि त्रैलोक्यातील सर्व लक्ष्मी त्याला अर्पण करून त्या दैत्याची भगवानाने तेथे स्थापन केली.
इंद्रादि देवांजवळही नाही एवढी संपत्ती त्याची नित्य सेवा करते. तसेच तो दैत्यराज बली त्या देवाधिदेवाची मोठया भक्तीने व प्रेमाने आराधना करतो. सुतलाचा अधिपती होऊन तो निर्भयपणे तेथे वास्तव्य करीत असतो. खरोखरच त्याने पात्रभूत अशा सर्वेश्वराला भूमीदान केल्यामुळेच त्याला हे पुण्य फल मिळाले आहे असे थोर महात्मे सांगत असतात. पण हे नारदा, त्यांचे हे सांगणे योग्य नाही
ब्राह्मणांना पुरुषार्थ देणारा जो सर्वश्रेष्ठ हरी, त्या भगवान वासुदेवाच्या ठिकाणी एवढेच दानाचे फल म्हणून कल्पना करणेही योग्य नव्हे. देहभानही न ठेवता त्या देवाधिदेवाचे नामस्मरण करणारा पुरुष आपल्या कर्मबंधनाचे पाश अगदी सहजगत्या तोडून टाकतो. कर्माचे क्लेश व बंध यांना नाहीसे करून टाकण्यासाठी त्या सर्वेश्वर भगवानाला उद्देशून यती नेहमी सांख्ययोग इत्यादि साधने करीत असतात
हे नारदा, त्या भगवंताने आपणावरही नुसता अनुग्रहच केला नाही तर त्याने भोगांचे हे मायामय असलेले उत्तम ऐश्वर्य वाढविले आहे. पण तेच खरे म्हणजे सर्व क्लेशांचे मुख्य कारण आहे व ते आत्म्याविषयीच्या स्मरणाला नाहीसे करणारे आहे.
त्या सर्वांच्या नियंत्या भगवान विष्णूने त्या बलीच्या सर्व उपाय जाणले व याचनेचे निमित्त करून त्याच्या देहाव्यतिरिक्त सर्वस्व हरण केले. त्या भगवान ईश्वराला यावाचून अन्य उपाय त्या करता सापडला नाही. म्हणून त्या ईश्वराने वरूणापासून प्राप्त झालेल्या पाशांनी त्याला बद्ध केले आणि पर्वताच्या गुहेत नेऊन सोडले. तेव्हा तो म्हणाला, "ज्याचा मंत्री प्रत्यक्ष बृहस्पती आहे तो हा इंद्रही अत्यंत मूढ आहे. कारण हा भगवान ज्यावेळी अतिशय सुप्रसन्न झाला तेव्हा त्याने त्या देवाजवळ अलौकिक व विपुल संपत्तीच मागितली. पण हे त्रैलोक्याचे ऐश्वर्य अत्यंत अल्प व अतिशय तिरस्करणीय आहे.
अहो, ज्यांच्या योगाने आशिर्वाद उत्पन्न होतात असे स्थान मागायचे सोडून तो महामूढ इंद्र लौकिक संपत्ती मागू लागला व त्यातच गुंग झाला, त्याला काय म्हणावे ! आमच्या या श्रीमान भगवंताला प्रिय असलेल्या व सर्वच लोकांवर उपकार करणार्या पितामह प्रल्हादाने त्या प्रभूचे दास्यच मागितले.
खरोखरच प्रत्यक्ष पिता मरून पडला असता व विष्णु त्याला पित्याच्या जीविताचे ऐश्वर्य परत देण्यास तयार असताही त्या श्रेष्ठ भक्ताने असली लौकिक इच्छा प्रदर्शित केली नाही. सर्व लोक हीच ज्याची उपाधी होऊन राहिली आहे, अशा त्या अतुल पराक्रमी असलेल्या भगवानाचा अंत आमच्यासारख्या अपरिपक्व व बहुतदोषांनी युक्त असलेल्या दुष्टांना कसा बरे लागणार ?" अशाप्रकारे तो परमपूज्य, दैत्यांचा अधिपती बली या सुतलात रहातो. प्रत्यक्ष भगवान हरी हा त्याचा द्वारपाल आहे.
एके काळी सर्वांनाच पीडा देणारा तो दैत्यराज रावण दिग्विजय करण्यासाठी सुतलामध्ये आला. तेव्हा भक्तावर नित्य अनुग्रह करणार्या बलीने त्या बलाढय रावणाला आपल्या पायाच्या अंगठयाने दहा हजार योजने दूर फेकून दिले. ही घटना सर्वांनाच माहित आहे.
तेव्हा ज्याचे एवढे प्रचंड सामर्थ्य आहे तो सर्व सुखांचा एकटा उपभोग घेणारा बली देवाधिदेव भगवान विष्णूच्या प्रसादाने सुतलाचे राज्य करीत आहे.