श्रीनारायण उवाच
ततोऽधस्ताद्विवरकं तलातलमुदीरितम् ।
दानवेन्द्रो मयो नाम त्रिपुराधिपतिर्महान् ॥ १ ॥
त्रिलोक्याः शङ्करेणायं पालितो दग्धपूस्त्रयः ।
देवदेवप्रसादात्तु लब्धराज्यसुखास्पदः ॥ २ ॥
आचार्यो मायिनां सोऽयं नानामायाविशारदः ।
पूज्यते राक्षसैर्घोरैः सर्वकार्यसमृद्धये ॥ ३ ॥
ततोऽधस्तास्तुविख्यातं महातलमिति स्फुटम् ।
सर्पाणां काद्रवेयाणां गणः क्रोधवशो महान् ॥ ४ ॥
अनेकशिरसां विप्र प्रधानान्कीर्तयामि ते ।
कुहकस्तक्षकश्चैव सुषेणः कालियस्तथा ॥ ५ ॥
महाभोगा महासत्त्वाः क्रूराः क्रूरस्वजातयः ।
पतत्रिराजाधिपतेरुद्विग्नाः सर्व एव ते ॥ ६ ॥
स्वकलत्रापत्यसुहृत्कुटुम्बस्य च सङ्गताः ।
प्रमत्ता विहरन्त्येव नानाक्रीडाविशारदाः ॥ ७ ॥
ततोऽधस्ताच्च विवरे रसातलसमाह्वये ।
दैतेया निवसन्त्येव पणयो दानवाश्च ये ॥ ८ ॥
निवातकवचा नाम हिरण्यपुरवासिनः ।
कालेया इति च प्रोक्ताः प्रत्यनीका हविर्भुजाम् ॥ ९ ॥
महौजसश्चोत्पत्त्यैव महासाहसिनस्तथा ।
सकलेशस्य च हरेस्तेजसा हतविक्रमाः ॥ १० ॥
बिलेशया इव सदा विवरे निवसन्ति हि ।
ये वै वाग्भिः सरमया शक्रदूत्या निरन्तरम् ॥ ११ ॥
मन्त्रवर्णाभिरसुरास्ताडिता बिभ्यति स्म ह ।
ततोऽप्यधस्तात्पाताले नागलोकाधिपालकाः ॥ १२ ॥
वासुकिप्रमुखाः शङ्खः कुलिकः श्वेत एव च ।
धनञ्जयो महाशङ्खो धृतराष्ट्रस्तथैव च ॥ १३ ॥
शङ्खचूडः कम्बलाश्वतरो देवोपदत्तकः ।
महामर्षा महाभोगा निवसन्ति विषोल्बणाः ॥ १४ ॥
पञ्चमस्तकवन्तश्च फणासप्तकभूषिताः ।
केचिद्दशफणाः केचिच्छतशीर्षास्तथापरे ॥ १५ ॥
सहस्रशिरसः केऽपि रोचिष्णुमणिधारकाः ।
पातालरन्ध्रतिमिरनिकरं स्वमरीचिभिः ॥ १६ ॥
विधमन्ति च देवर्षे सदा सञ्जातमन्यवः ।
अस्य मूलप्रदेशे हि त्रिंशत्साहस्रकेऽन्तरे ॥ १७ ॥
योजनैः परिसंख्याते तामसी भगवत्कला ।
अनन्ताख्या समास्ते हि सर्वदेवप्रपूजिता ॥ १८ ॥
अहमित्यभिमानस्य लक्षणं यं प्रचक्षते ।
सङ्कर्षणं सात्वतीयाः कर्षणं द्रष्ट्टदृश्ययोः ॥ १९ ॥
इदं भूमण्डलं यस्य सहस्रशिरसः प्रभोः ।
अनन्तमूर्तेः शेषस्य ध्रियमाणं च शीर्षके ॥ २० ॥
पृध्वीगोलमशेषं हि सिद्धार्थ इव लक्ष्यते ।
यस्य कालेन देवस्य सञ्जिहीर्षोः समं विभोः ॥ २१ ॥
चराचरं भ्रुवोरन्तर्विवरादुदपद्यत ।
साङ्कर्षणो नाम रुद्रो व्यूहैकादशशोभितः ॥ २२ ॥
त्रिलोचनश्च त्रिशिखं शूलमुत्तम्भयन्स्वयम् ।
उदतिष्ठन्महासत्त्वो महाभूतक्षयङ्करः ॥ २३ ॥
यस्याङ्घ्रिकमलद्वन्द्वशोणाच्छनखमण्डले ।
विराजन्मणिबिम्बेषु महाहिपतयोऽनिशम् ॥ २४ ॥
एकान्तभक्तियोगेन सह सात्त्वतपुङ्गवैः ।
प्रणमन्तः स्वमूर्ध्ना ते स्वमुखानि समीक्षते ॥ २५ ॥
स्फुरत्कुण्डलमाणिक्यप्रभामण्डलभाञ्ज्यपि ।
सुकपोलानि चारूणि गण्डस्थलद्युमन्ति च ॥ २६ ॥
नागराजकुमार्योऽपि चार्वङ्गविलसत्त्विषः ।
विशदैर्विपुलैस्तद्वद्धवलैः सुभगैस्तथा ॥ २७ ॥
रुचिरैर्भुजदण्डैश्च शोभमाना इतस्ततः ।
चन्दनागुरुकाश्मीरपङ्कलेपेन भूषिताः ॥ २८ ॥
तदभिमर्षसञ्जातकामावेशसमायुताः ।
ललितस्मितसंयुक्ताः सव्रीडं लोकयन्ति च ॥ २९ ॥
अनुरागमदोन्मत्तविघूर्णारुणलोचनम् ।
करुणावलोकनेत्रं च आशासानास्तथाशिषः ॥ ३० ॥
सोऽनन्तो भगवान्देवोऽनन्तसत्त्वो महाशयः ।
अनन्तगुणवार्धिश्च आदिदेवो महाद्युतिः ॥ ३१ ॥
संहृतामर्षरोषादिवेगो लोकशुभाय च ।
आस्ते महासत्त्वनिधिः सर्वदेवप्रपूजितः ॥ ३२ ॥
ध्यायमानः सुरैः सिद्धैरसुरैश्चोरगैस्तथा ।
विद्याधरैश्च गन्धर्वैर्मुनिसङ्घैश्च नित्यशः ॥ ३३ ॥
अनारतमदोन्मत्तलोकविह्वललोचनः ।
वाक्यामृतेन विबुधान्स्वपार्षदगणानपि ॥ ३४ ॥
आप्यायमानः स विभुर्वेजयन्तीं स्रजं दधत् ।
अम्लानाभिनवैः स्वच्छैस्तुलसीदलसञ्चयैः ॥ ३५ ॥
माद्यन्मधुकरव्रातघोषश्रीसंयुतां सदा ।
नीलवासा देवदेव एककुण्डलभूषितः ॥ ३६ ॥
हलस्य ककुदि न्यस्तसुपीवरभुजोऽव्ययः ।
महेन्द्रः काञ्चनीं यद्वद्वरत्रां च मतङ्गमः ।
उदारलीलो देवेशो वर्णितः सात्त्वतर्षभैः ॥ ३७ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
तलातलादिलोकवर्णनेऽनन्तवर्णनं नाम विंशोऽध्यायः ॥ २० ॥
आणखी काही विवरांचे वर्णन -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नारदमुनी एकचित्त होऊन ऐकत होते. श्री नारायणमुनी नारदाला पुढे सांगू लागले, "हे नारदा, या विवराखाली तलातल नावाचे विवर आहे. ते प्रसिद्धच आहे. त्रिपुरांचा स्वामी महाबलाढय असुरश्रेष्ठ तो मय त्या ठिकाणी वास्तव्य करीत असतो. तीन पुरांचे दहन करणार्या कल्याणकारी शंकराने त्याचे रक्षण केले आहे व देवाधिदेव जो भगवान त्याच्या प्रसादाने त्याला राज्य प्राप्ती झाली आणि हे सुखाचे स्थान प्राप्त झाले.
हा मायासुर सर्व मायावी लोकांचा श्रेष्ठ गुरू आहे. तो सर्व प्रकारच्या माया करण्यात अत्यंत निपुण आहे. सर्व कार्यात यश मिळावे म्हणून सर्व राक्षस लोक त्याची सतत पूजा करीत असतात. कारण तो त्यांना पूज्य आहे. त्याची पूजा केल्याने सर्व कार्यांची समृद्धि होते असे म्हणतात.
या विवराच्या खाली असलेल्या प्रदेशाला महातल म्हणतात. ते महातल अत्यंत प्रसिद्ध आहे. तेथे अत्यंत क्रोधावश असलेल्या कद्रूच्या पुत्रांचा म्हणजे सर्व सर्पांचा परिवार रहात असतो.
हे ब्राह्मणश्रेष्ठा, असंख्य मस्तके असलेल्या त्या सर्व श्रेष्ठांपैकी मुख्य जे आहेत, ते तुला सांगतो. कुहक, तक्षक, सुषेण, कालिय अशा नावांनी ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या फणा अत्यंत विशाल आहेत. तसेच ते अत्यंत सामर्थ्यशील व संपन्न आहेत. ते वृत्तीने अत्यंत क्रूर आहेत. तसेच त्या सर्पाच्या सर्व जाती व परिवारही तसाच क्रूर आहे.
पण हे मुनीश्रेष्ठा, ते सर्व सर्प पक्षिराज गरूडाला मात्र अत्यंत भीत असतात. ते आपल्या स्त्रिया, आपली अपत्ये, तसेच आपले मित्र या सर्व परिवारांसह क्रीडा करीत असतात. ते सर्प क्रीडेत अत्यंत निपुण असून ते सर्व सर्प अत्यंत उन्मत्त आहेत व तसेच उन्मत्तपणे ते विहार करीत असतात.
त्या महातलाखाली जे विवर आहे त्याचे नाव रसातल असे सांगितले आहे. त्या रसातल विवरामध्ये हिरण्यपुरात रहाणारे दीतिपुत्र असुर तेथे रहातात. निवात कवच व कालेय या नावाने ते प्रसिद्ध आहेत. हे दानवश्रेष्ठ देवांचे शत्रू आहेत.
हे दानव जन्मल्यापासून अत्यंत बलश्रेष्ठ असतात. त्याचप्रमाणे ते अत्यंत साहसी म्हणून प्रसिद्ध आहेत. पण सर्वश्रेष्ठ हरीच्या प्रभावी तेजापुढे त्यांचा पराक्रम चालत नाही. जसे बिळामध्ये रहावे तसेच त्या विवरामध्ये ते वास्तव्य करून असतात.
इंद्राच्या सरमा नावाच्या दूतीने सतत उच्चारलेल्या मंत्ररूप वाणीने ते असूर ताडित होतात व त्यांच्या मनात एक प्रकारचे भय निर्माण होते.
आता त्या विवराच्या खाली असलेले पाताल या नावाचे एक विवर प्रसिद्ध आहे. या विवरात नाग लोकांचे स्वामी व वासुकी वगैरे श्रेष्ठ नाग आहेत, ते राहतात. या ठिकाणी शंख, कुलिक, श्वेत, धनंजय, महाशंक, तसेच धृतराष्ट्र, शंखचूड, कंबला, श्वतर, देवोपदत्तक इत्यादि अत्यंत रागीट व अतिशय प्रचंड शरीराचे तसेच अति विषारी असे ते नागश्रेष्ठ आहेत. या प्रचंड महानागांना पाच मस्तके असून त्यांना सात फडा आहेत. काही महा अजस्त्र नागांना तर दहा फडा आहेत, तर काहींना अतिशय प्रचंड अशा शंभर फडा आहेत. यापेक्षा अति भयंकर असेही सर्पराज तेथे आहेत. त्यांना तर अति तेजस्वी एक हजार मस्तके असून त्या मस्तकांवर ते अतिशय सुंदर, तेजस्वी मणी धारण करतात.
हे नारदमुने, या अत्यंत तेजोमय मण्यांच्या प्रभेमुळे या विवरातीत संपूर्ण अंधार नाहीसा झाला आहे. ते सर्वश्रेष्ठ नेहमीच क्रोधायमान झालेले असतात.
या विवराच्या मूल प्रदेशामध्ये तीस हजार योजने भरेल एवढया प्रचंड भूमीवरील अंतरावर देवश्रेष्ठ भगवानाची अनंत या नावाची अतिशय तामसी कला आहे. ती अतिशय श्रेष्ठ असून सर्व देवांनाही अतिशय पूज्य आहे. द्रष्टा, दृश्य यांचे उत्तम प्रकारे ऐक्य ज्याने केले आहे तो संकर्षण नावाचा अभिमानच त्या सात्विकी कलेचे लक्षण आहे.
ज्याला हजार मस्तके आहेत, ज्याच्या आकाराचा कधीही अंत लागत नाही, अशा त्या प्रभू शेषाच्या मस्तकावर हे भूमंडल राहिले आहे. हा सर्व भूगोल शेषाच्या मस्तकावर एखाद्या मोहरी प्रमाणे दिसतो. प्रलय काल प्राप्त झाल्यावर एकाच वेळी सर्व चराचर सृष्टीचा संहार करण्याची इच्छा करणार्या त्या नियंत्या देवाच्या भ्रूमध्यभागापासून रुद्र नावाचा अकरा रूद्रमूर्ति रूपाने सुशोभित झालेला संकर्षणपुत्र उत्पन्न झाला.
त्या संकर्षणपुत्राला तीन नेत्र व तीन शिखा होत्या. त्याच्या खांद्यावर प्रचंड शल दिसत होता. तो महाबलाढय व महाभूतांचा नाश करणारा भगवान रुद्र स्वतः उठून उभा राहिला. त्याच्या दोन्ही चरणकमलावर स्वच्छ नखमंडलाचे ठिकाणी पडलेल्या मण्याच्या प्रतिबिंबामध्ये मोठे मोठे सर्पराज सदैव अत्यंत निश्चल राहून भक्तीयोग आचरतात. सात्वत कुलोत्पन्न पुरुषांसह ते आपल्या मस्तकाने वाकून नमस्कार करतात. त्यावेळी आपली मुखे त्यात पहातात
त्याच कुंडलावर सर्वोत्तम माणके जडवलेली होती. ती स्वतेजाने झळकत होती आणि स्वयंप्रभेने युक्त होती. ती गोल व अति उत्तम होती; तशीच फारच सुंदर होती. त्यांची गंडस्थळे अतीव तेजस्वी होती.
त्या नागश्रेष्ठांच्या स्त्रियादेखील इतस्ततः फिरताना त्यांच्या सुंदर अंगावरील त्वचा चमकत होती. स्वच्छ, पुष्ट, शुभ्र, सुंदर आणि मनोहर असे त्यांचे बाहु होते. त्यामुळे त्यांना फारच शोभा प्राप्त झाली होती. त्या सुंदर नागस्त्रियांनी आपल्या सर्वांगाला चंदन, अगुरु, कस्तुरी इत्यादींच्या मिश्रणाचे लेप लावल्यामुळे त्या मनोरमा दिसत होत्या.
जेव्हा नखांतील प्रतिबिंबाचा त्यांचा संसर्ग होतो तेव्हा मनांत विषयवासना उत्पन्न होते. त्यामुळे त्या मनोहर हास्य करून लज्जित होतात. त्यांचे नेत्र प्रीतीयुक्त मदामुळे त्या नखांमध्ये पहातात. त्या सर्व स्त्रिया त्यांची कृपापूर्ण दृष्टी व त्यांचे आशीर्वाद यांची अपेक्षा करतात.
तो भगवान अनंत नावाचा देव अत्यंत सामर्थ्यसंपन्न, उदार, असंख्य गुणांचा जणू साठाच आहे. तो भगवान आदिपुरुष अतिशय तेजस्वी आहे. चीड व क्रोध या भावनांना फार वेग असतो. ते वेग आवरून लोककल्याणासाठी तो महा सामर्थ्यशाली समुद्र व सर्व देव यांनी अतिशय पूजित होऊन तेथेच वास्तव्य करतो. देव, सिद्ध, मुनी, ऋषी, विद्याधर, असुर, सर्प, गंधर्व, यक्ष वगैरे श्रेष्ठ पुरुष त्याचे सर्वदा ध्यान करतात. एकसारख्या मदनवृत्तीमुळे उन्मत्त झालेल्या लोकांच्या नेत्राप्रमाणे ज्याचे नेत्र व्याकुळ झाले आहेत तो सर्वव्यापी प्रभु वाक्यरूपी अमृताने देव व आपले पार्षदगण यांना सामर्थ्यवान व टवटवीत करतो व नव्या आणि स्वच्छ असलेल्या तुलसीची माळ करून ती कंठात धारण करतो. ती वैजयंती माळ म्हणून प्रसिद्ध आहे. ती माळ उन्मत्त भ्रमरांच्या थव्यांनी युक्त असते, तसेच घोष व शोभा यांनी युक्त असतेच.
त्यावेळी तो देवेश्वर निळे वस्त्र नेसतो. तो याठिकाणी एकाच कुंडलाने भूषित होतो. तो चिरंतन देवरूपी नंदीच्या वशिंडावर म्हणजे कुकुदावर आपले अतिशय पूज्य व पुष्ट बाहू टेकून ठेवतो. त्यानंतर हत्तीप्रमाणे तो महेंद्र सुवर्णाची कक्षा धारण करतो.
सारांश, हे महाबुद्धिमान नारदा, ज्याची लीला अगाध आहे अशा त्या देवाधिदेवाचे सात्वत श्रेष्ठांनी अशा पद्धतीचे वर्णन केले आहे.