श्रीनारायण उवाच
अधस्तात्सवितुः प्रोक्तमयुतं राहुमण्डलम् ।
नक्षत्रवच्चरति च सैंहिकेयोऽतदर्हणः ॥ १ ॥
सूर्याचन्द्रमसोरेव मर्दनः सिंहिकासुतः ।
अमरत्वं च खेटत्वं लेभे यो विष्ण्वनुग्रहात् ॥ २ ॥
यददस्तरणेर्बिम्बं तपतो योजनायुतम् ।
तच्छादकोऽसुरो ज्ञेयोऽप्यर्कसाहस्रविस्तरम् ॥ ३ ॥
त्रयोदशसहस्रं तु सोमस्याच्छादको ग्रहः ।
यः पर्वसमये वैरानुबन्धी छादकोऽभवत् ॥ ४ ॥
सूर्याचन्द्रमसोर्दूराद्भवेच्छादनकारकः ।
तन्निशम्योभयत्रापि विष्णुना प्रेरितं स्वकम् ॥ ५ ॥
चक्रं सुदर्शनं नाम ज्वालामालातिभीषणम् ।
तत्तेजसा दुःसहेन समन्तात्परिवारितम् ॥ ६ ॥
मुहूर्तो द्विजमानस्तु दूराच्चकितमानसः ।
आरान्निवर्तते सोऽयमुपराग इतीव ह ॥ ७ ॥
उच्यते लोकमध्ये तु देवर्षे अवबुध्यताम् ।
ततोऽधस्तात्समाख्याता लोकाः परमपावनाः ॥ ८ ॥
सिद्धानां चारणानां च विद्याध्राणां च सत्तम ।
योजनायुतविख्याता लोकाः पुण्यनिषेविताः ॥ ९ ॥
ततोऽप्यधस्ताद्देवर्षे यक्षाणां च सरक्षसाम् ।
पिशाचप्रेतभूतानां विहाराजिरमुत्तमम् ॥ १० ॥
अन्तरिक्षं च तत्प्रोक्तं यावद्वायुः प्रवाति हि ।
यावन्मेघास्ततोद्यन्ति तत्प्रोक्तं ज्ञानकोविदैः ॥ ११ ॥
ततोऽधस्ताद्योजनानां शतं यावद् द्विजोत्तम ।
पृथिवी परिसंख्याता सुपर्णश्येनसारसाः ॥ १२ ॥
हंसादयः प्रोत्पतन्ति पार्थिवाः पृथिवीभवाः ।
भूसन्निवेशावस्थानं यथावदुपवर्णितम् ॥ १३ ॥
अधस्तादवनेः सप्त देवर्षे विवराः स्मृताः ।
एकैकशो योजनानामायामोच्छ्रायतः पुनः ॥ १४ ॥
अयुतान्तरविख्याताः सर्वर्तुसुखदायकाः ।
अतलं प्रथमं प्रोक्तं द्वितीयं वितलं तथा ॥ १५ ॥
तृतीयं सुतलं प्रोक्तं चतुर्थं वै तलातलम् ।
महातलं पञ्चमं च षष्ठं प्रोक्तं रसातलम् ॥ १६ ॥
सप्तमं विप्र पातालं सप्तैते विवराः स्मृताः ।
एतेषु बिलस्वर्गेषु दिवोऽप्यधिकमेव च ॥ १७ ॥
कामभोगैश्वर्यसुखसमृद्धभुवनेषु च ।
नित्योद्यानविहारेषु सुखास्वादः प्रवर्तते ॥ १८ ॥
दैत्याश्च काद्रवेयाश्च दानवा बलशालिनः ।
नित्यप्रमुदिता रक्ताः कलत्रापत्यबन्धुभिः ॥ १९ ॥
सुहृद्भिरनुजीवाद्यैः संयुताश्च गृहेश्वराः ।
ईश्वरादप्रतिहतकामा मायाविनश्च ते ॥ २० ॥
निवसन्ति सदा हृष्टाः सर्वर्तुसुखसंयुताः ।
मयेन मायाविभुना येषु येषु च निर्मिताः ॥ २१ ॥
पुरः प्रकामशो भक्ता मणिप्रवरशालिनः ।
विचित्रभवनाट्टालगोपुराद्याः सहस्रशः ॥ २२ ॥
सभाचत्वरचैत्यादिशोभाढ्याः सुरदुर्लभाः ।
नागासुराणां मिथुनैः सपारावतसारिकैः ॥ २३ ॥
कीर्णकृत्रिमभूमिश्च विवरेशगृहोत्तमैः ।
अलङ्कृताश्चकासन्ति उद्यानानि महान्ति च ॥ २४ ॥
मनःप्रसन्नकारीणि फलपुष्पविशालिभिः ।
ललनानां विलासार्हस्थानैः शोभितभाञ्जि च ॥ २५ ॥
नानाविहंगमव्रातसंयुक्तजलराशिभिः ।
स्वच्छार्णपूरितह्रदैः पाठीनसमलङ्कृतैः ॥ २६ ॥
जलजन्तुक्षुब्धनीरनीरजातैरनेकशः ।
कुमुदोत्पलकह्लारनीलरक्तोत्पलैस्तथा ॥ २७ ॥
तेषु कृतनिकेतानां विहारैः सङ्कुलानि च ।
इन्द्रियोत्सवकारैश्च तथैव विविधैः स्वरैः ॥ २८ ॥
अमराणां च परमां श्रियं चातिशयन्ति च ।
यत्र नैव भयं क्वापि कालाङ्गैर्दिनरात्रिभिः ॥ २९ ॥
यत्राहिप्रवराणां च शिरःस्थैर्मणिरश्मिभिः ।
नित्यं तमः प्रबाध्येत सदा प्रस्फुटकान्तिभिः ॥ ३० ॥
न वा एतेषु वसतां दिव्यौषधिरसायनैः ।
रसान्नपानस्नानाद्यैर्नाधयो न च व्याधयः ॥ ३१ ॥
वलीपलितजीर्णत्ववैवर्ण्यस्वेदगन्धताः ।
अनुत्साहवयोऽवस्था न बाधन्ते कदाचन ॥ ३२ ॥
कल्याणानां सदा तेषां न च मृत्युभयं कुतः ।
भगवत्तेजसोऽन्यत्र चक्राच्चैव सुदर्शनात् ॥ ३३ ॥
यस्मिन्प्रविष्टे दैतेयवधूनां गर्भराशयः ।
प्रायो भयात्पतन्त्येव स्रवन्ति ब्रह्मपुत्रक ॥ ३४ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
राहुमण्डलाद्यवस्थानवर्णनं नामाष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥
विवरांची माहिती -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्री नारायणमुनी पुढे म्हणाले, "हे नारदा, सूर्याच्या खालच्या बाजूस दहा हजार योजने अंतरावर राहूचे मंडल आहे असे सांगतात. तेथे तो सिंहिकापुत्र राहू नक्षत्राप्रमाणे फिरत असतो. पण खरोखरच तो नक्षत्रांच्या योग्यतेइतका थोर नाही. पण सूर्य, चंद्र यांना नित्य पीडा देणार्या त्या सिंहिकापुत्राला विष्णूचा प्रसाद लाभला आहे. त्यामुळे त्याला अमरत्व प्राप्त होऊन नक्षत्रत्त्वही प्राप्त झाले आहे. जो स्वतःच नित्य प्रकाशित होत असतो त्या सूर्याचे जे हे हजारो योजने असे प्रचंड विस्ताराने पूर्ण असे बिंब आहे, त्याला हा असुर राहू ग्रासून झाकून टाकू शकतो. तसेच ते प्रचंड चंद्रमंडल बारा हजार योजने विस्तीर्ण असूनही हा तेरा योजने विस्तीर्णपर्यंत सर्व जागा झाकतो. त्यामुळे तो चंद्रमंडलाचाही ग्रास करतो.
अमावास्या व पौर्णिमा या पर्वकालामध्ये तो त्याला आच्छादित करतो. पूर्वापार त्या दोघांचे वैर असल्याने त्याचे स्मरण होऊन तो त्यांना दुरूनच झाकून टाकण्यास समर्थ आहे.
पण या राहूचा प्रभाव जाणून त्या राहूच्या दोन्ही बाजूस विष्णूने आपले सुदर्शन चक्र पाठविले आहे. ते ज्वालांनी परिपूर्ण असून भयंकर उग्र आहे. ते चोहोकडे पसरलेले आहे. त्याचे तेज राहूला अत्यंत असह्य होते व त्यामुळे दुःखी होऊन तो क्षणभर खिन्न होतो आणि आश्चर्यचकित होऊन तो सत्वर परत फिरतो.
याच कालाला सर्वजण ग्रहण असे म्हणतात. हे नारदा, ही गोष्ट तू जाणून जे. हे उत्तमा, त्या राहूमंडलाचे खालच्या बाजूला सिद्धांचे व चारणांचे लोक आहेत, तसेच विद्याधरांचेही लोक आहेत. हे सर्व लोक पवित्र व पुण्यकारक आहेत. हे सर्व लोक हजारो योजने दूर अंतरावर आहेत. पण त्यांच्या पुण्याच्या योगाने परमेश्वराची सेवा घडते.
हे देवर्षे, त्याच्या खालील दिशेस काही उत्तम स्थाने असून ती राक्षस, यक्ष, पिशाच्चे, प्रेते व भूते यांच्या विहाराची स्थाने आहेत. हे नारदा, या सर्वांना मिळून अंतरिक्ष ही संज्ञा आहे.
आता हे ब्रह्मपुत्रा, या सर्व अवकाशांत वायु भरून राहिला आहे. ज्या अवकाश भागी वायु शांत असतो व ज्या ठिकाणी मेघ उत्पन्न होत असतात त्या सर्वाला अंतरिक्ष अशी संज्ञा प्राज्ञजनांनीच दिलेली आहे.
हे द्विजोतमा नारदा, त्याच्याखाली शंभर योजने दूर इतक्या अंतरावर ही पृथ्वी आहे अशी गणना केली आहे. खग, श्येन, सारस, हंस इत्यादि पार्थीव योनीतील पक्षी तेथे उड्डाणे करून सर्वत्र संचार करीत असतात.
आता भूमीच्या संपूर्ण स्थानाचे वर्णनही योग्य असेच केले आहे. हे देवर्षे, पृथ्वीच्या खालीसुद्धा सात विवरे आहेत असे शास्त्रात सांगितलेले आहे. ते प्रत्येक विवर हे हजारो योजने दूर अंतरावर आहे, तसेच त्याची लांबी हजारो योजने विस्तीर्ण आहे. तितकेच ते रुंदही आहे. सर्व ऋतूंमध्ये सुख देणारी अशी ती उत्तम विवरे आहेत. आता ती कशी ते सांगतो.
पहिले विवर अतल या नावाने प्रसिद्ध आहे व दुसरे विवर वितल म्हणून संबोधले आहे. तिसर्या विवरास प्राज्ञांनी सुतल म्हणून सांगून चवथे विवर तलातल नावाचे सांगितले आहे. पाचवे विवर महातल असून सहाव्यास रसातल म्हटले जाते. त्यानंतर सर्वात शेवटी पाताल आहे असे म्हणतात.
अशी ही सातही विवरे अतिविख्यात आहेत. हे जणू विवररूपी स्वर्गच आहेत. कामभोग, ऐश्वर्य, सुख, यांनी समृद्ध अशा भुवनांमध्ये व उद्यानातील विहारामध्ये रोज सदैव सुख मिळत असते. द्युलोकापेक्षाही त्या सप्त विवरात अत्यंत उपभोग आहेत.
अति बलवान दैत्य, काद्रवेय व सर्व दानव ते आपल्या स्त्रियांसह उपभोग घेत असतात. त्यांचे पुत्र व बंधूही नित्य सुखांत रममाण झालेले असतात. स्त्रीपुरुष एकमेकांवर अनुरक्त असतात.
त्या गृहांचे स्वामी आपापले मित्रपरिवारासहित व सेवकांसह तेथे रहात असतात. प्रत्यक्ष ईश्वरही त्यांच्या इच्छांच्या आड येऊ शकत नाही. ते सर्वजण मायावी असल्यामुळे सर्व ऋतूमध्ये ते निरनिराळी सुखे भोगतात. अशा तर्हेने या सप्त विवरातीत लोक अत्यंत आनंदीत होऊन सुखाने विहार करीत असतात.
मय हा मायेचा स्वामी आहे. त्याने तेथे उत्तमोत्तम गृहे निर्माण केली आहेत. ती गृहे अमूल्य मण्यांनी युक्त असतात व ती गृहे साक्षात् देवांनाही दुर्लभ अशी असून चमत्कृतिजन्य आहेत.
सर्व मंदिरे, गोपुरे, सभागृहे, चौक, विविध देवालये इत्यादि सर्व गोष्टी तेथे विपुल प्रमाणात त्या श्रेष्ठ मयाने निर्माण केल्या आहेत व नंतर सर्वांना ती वाटून टाकली आहेत. कारण असे प्रासाद तेथे हजारोंनी तयार केले आहेत.
नाग, असुर यांच्या आणि पारवे, सारिका यांच्या बहुविध जोडप्यांनी तसेच त्या त्या विवराच्या अधिपतींनी तेथे उत्तमोत्तम गृहे करून तेथील कृत्रिम भूमी पूर्णपणे व्याप्त करून टाकली आहे.
तेथे मोठमोठी अति सुंदर उद्याने असून निरनिराळ्या भूषणांनी ती अलंकृत केली आहेत. ती उद्याने मनाला प्रसन्न करतात, आल्हाद देतात. अशा उद्यानांनी ती विवरे युक्त आहेत. त्यात ही उद्याने झळकत असतात.
तेथील वृक्ष अत्यंत विशाल व प्रचंड आहेत. पण ते सर्व फळे व पुष्पे यांनी परिपूर्ण आहेत. त्या वृक्षामुळे तेथे शोभा आली असून ती स्थाने स्त्रियांच्या विलास भोगासाठी योग्य आहेत. त्यामुळे सुखाला पूर्णता प्राप्त झाली आहे.
तसेच अत्यंत निर्मल उदकाने आकंठ भरलेली सुंदर सरोवरे तेथे आहेत. त्यामधील जलाचा अंदाज घेता येत नाही इतकी ती सरोवरे विस्तीर्ण आहेत. त्यावर निरनिराळ्या पक्ष्यांचे थवे विहार करीत असतात. त्या सरोवरांत सुंदर व मोठे मोठे मासेही असल्यामुळे त्या सरोवरांना मनोहर शोभा प्राप्त झाली आहे.
त्या सरोवरात अत्यंत लहान मोठे जलचर नित्य क्रीडा करीत असतात. त्यामुळे त्यातील उदक सर्वदा क्षुब्ध झालेले असते. अशा त्या उदकात कुमुद, उत्पल, कल्हार, नील, रक्त इत्यादि विविध प्रकारची कमले आहेत. तेथे रहाणार्या प्राण्यांच्या विहारांनी व इंद्रियांना आनंद देणार्या निरनिराळ्या प्रकारच्या मधुर स्वरांनी त्या सातही विवरातील वातावरण व्याप्त झालेले असते.
थोडक्यात सांगायचे म्हणजे देवांच्याही उत्तमोत्तम संपत्तीला ही विवरे तुच्छ करीत असतात. दिवस व रात्र होणे हे कालाच्या अंगभूत असते. त्या दिवस रात्रींच्या योगाने तेथे कधीच भीतीचे कारण निर्माण होत नाही. कारण त्या ठिकाणी श्रेष्ठ अशा सर्पांच्या मस्तकावरील दैदीप्यमान मण्यांच्या किरणांनी त्या विवरातील अंधाराचा सर्वशः नाश होतो.
या सर्व सुखांप्रमाणे या विवरात वास्तव्य करणार्या प्राण्यांना शारीरिक व मानसिक पीडा कधीच उद्भवत नाहीत. कारण तेथील सर्व प्राणी दिव्य औषधींचा उपयोग करतात, तसेच विविध रसायने वापरतात. रस, अन्न, पान व स्नान यामुळेच त्यांना या पीडा संभवत नाहीत. शरीरावर सुरकुत्या पडणे, केस पिकणे, वार्धक्य प्राप्त होणे, फिकटपणा निर्माण होणे, घामटपणा, आळस इत्यादि अवस्था प्राप्त होणे यांची त्यांना बाधा पोहोचत नाही.
ही सर्व विवरे सदा कल्याणरूपच आहेत. त्या भगवान विष्णूच्या तेजोमय सुदर्शन नावाच्या चक्राशिवाय इतर कोणत्याही कारणापासून तेथील प्राण्यांना मृत्यूचे भय नसते.
हे नारदमुने, त्या चक्राचा एकदा का त्या विवरात प्रवेश झाला की मग मात्र तेथील सर्व प्राण्यांचे भीतीमुळे स्त्रियांच्या गर्भाचेही पतन व स्खलन होते. इतके ते भयंकर अस्त्र आहे.