श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
अष्टमः स्कन्धः
चतुर्दशोऽध्यायः


सूर्यगतिवर्णनम्

नारायण उवाच
ततः परस्तादचलो लोकालोकेति नामकः ।
अन्तराले च लोकालोकयोर्यः परिकल्पितः ॥ १ ॥
यावदस्ति च देवर्षे ह्यन्तरं मानसोत्तरात् ।
सुमेरोस्तावती शुद्धा काञ्चनी भूमिरस्ति हि ॥ २ ॥
दर्पणोदरतुल्या सा सर्वप्राणिविवर्जिता ।
यस्यां पदार्थः प्रहितो न किञ्चित्प्रत्युदीयते ॥ ३ ॥
अतः सर्वप्राणिसङ्घरहिता सा च नारद ।
लोकालोक इति व्याख्या यदत्र परिकल्पिता ॥ ४ ॥
लोकालोकान्तरे चास्य वर्तते सर्वदा स्थितिः ।
ईश्वरेण स लोकानां त्रयाणामन्तगः कृतः ॥ ५ ॥
सूर्यादीनां ध्रुवान्तानां रश्मयो यद्वशादिह ।
अर्वाचीनाश्च त्रीँल्लोकानातन्वानाः कदापि हि ॥ ६ ॥
पराचीनत्वभाजो हि न भवन्ति च नारद ।
तावदुन्नहनायामः पर्वतेन्द्रो महोदयः ॥ ७ ॥
एतावाँल्लोकविन्यासोऽयं संस्थामानलक्षणैः ।
कविभिः स तु पञ्चाशत्कोटिभिर्गणितस्य च ॥ ८ ॥
भूगोलस्य चतुर्थांशो लोकालोकाचलो मुने ।
तस्योपरि चतुर्दिक्षु ब्रह्मणा चात्मयोनिना ॥ ९ ॥
निवेशिता दिग्गजा ये तन्नामानि निबोधत ।
ऋषभः पुष्पचूडोऽथ वामनोऽथापराजितः ॥ १० ॥
एते समस्तलोकस्य स्थितिहेतव ईरिताः ।
तेषां च स्वविभूतीनां बहुवीर्योपबृंहणम् ॥ ११ ॥
विशुद्धसत्त्वं चैश्वर्यं वर्धयन्भगवान् हरिः ।
आस्ते सिद्ध्यष्टकोपेतो विष्वक्सेनादिसंवृतः ॥ १२ ॥
निजायुधैः परिवृतो भुजदण्डैः समन्ततः ।
आस्ते सकललोकस्य स्वस्तये परमेश्वरः ॥ १३ ॥
आकल्पमेवं वेषं स गतो विष्णुः सनातनः ।
स्वमायारचितस्यास्य गोपीथायात्मसाधनः ॥ १४ ॥
योऽन्तर्विस्तार एतेन ह्यलोकपरिमाणकम् ।
व्याख्यातं यद्‌बहिर्लोकालोकाचल इतीरणात् ॥ १५ ॥
ततः परस्ताद्योगेशगतिं शुद्धा वदन्ति हि ।
अण्डमध्यगतः सूर्यो द्यावाभूम्योर्यदन्तरम् ॥ १६ ॥
सूर्याण्डगोलयोर्मध्ये कोट्यः स्युः पञ्चविंशतिः ।
मृतेऽण्ड एष एतस्मिञ्जातो मार्तण्डशब्दभाक् ॥ १७ ॥
हिरण्यगर्भ इति यद्धिरण्याण्डसमुद्‍भवः ।
सूर्येण हि विभज्यन्ते दिशः खं द्यौर्महीभिदा ॥ १८ ॥
स्वर्गापवर्गौ नरका रसौकांसि च सर्वशः ।
देवतिर्यङ्‍मनुष्याणां सरीसृपसवीरुधाम् ॥ १९ ॥
सर्वजीवनिकायानां सूर्य आत्मा दृगीश्वरः ।
एतावान्भूमण्डलस्य सन्निवेश उदाहृतः ॥ २० ॥
एतेन हि दिवो मानं वर्णयन्ति च तद्विदः ।
द्विदलानां च निष्पावादीनां च दलयोर्यथा ॥ २१ ॥
अन्तरेण तयोरन्तरिक्षं तदुभयसन्धितम् ।
यन्मध्यगश्च भगवान् भानुर्वै तपतां वरः ॥ २२ ॥
आतपेन त्रिलोकं च प्रतपत्येव भासयन् ।
उत्तरायणमासाद्य गतिमान्द्यं वितन्वते ॥ २३ ॥
आरोहणस्थानमसौ गत्वाहो दैर्ध्यमाचरेत् ।
दक्षिणायनमासाद्य गतिशैघ्र्यं वितन्वते ॥ २४ ॥
अवरोहस्थानमसौ गच्छन्ह्रस्वं दिनं चरेत् ।
विषुवत्संज्ञमासाद्य गतिसाम्यं वितन्वते ॥ २५ ॥
समस्थानमथासाद्य दिनसाम्यं करोति च ।
यदा च मेषतुलयोः सञ्चरेद्धि दिवाकरः ॥ २६ ॥
समानानि त्वहोरात्राण्यातनोति त्रयीमयः ।
वृषादिपञ्चसु यदा राशिष्वर्को विरोचते ॥ २७ ॥
तदाहानि च वर्धन्ते रात्रयोऽपि ह्रसन्ति च ।
वृश्चिकादिषु सूर्यो हि यदा सञ्चरते रविः ॥ २८ ॥
तदापीमान्यहोरात्राणि भवन्ति विपर्ययात् ॥ २९ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
सूर्यगतिवर्णनं नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥


दिवस व रात्री यांचे प्रमाण -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्री नारायण मुनी म्हणाले, "हे नारदा, त्या द्वीपात पुढे आणखी एक पर्वत असून त्यात त्याचे नाव लोकालोक असे आहे. लोक व अलोक या दोन विभागांचे मध्ये त्याची योजना करण्यात आली आहे.

हे देवर्षे, मानसोत्तरापासून थेट सुमेरूपर्यंत जेवढे अंतर आहे तेवढे, पण शुद्धोदाच्या पलिकडे विस्तृत एवढी सुवर्णभूमी आहे. ती दर्पणाच्या मध्यभागी आहे. त्या भूमीत कोणताही पदार्थ टाकला तरी तो परत घेता येत नाही. कारण त्या पदार्थाचे सुवर्णच होते.

हे नारदा, त्या कारणामुळे तेथे प्राणी वगैरे काही आढळत नाही. म्हणूनच त्याची लोकालोक अशी व्याख्या करण्यात आली आहे. त्याचे कारण आता विस्तारपूर्वक सांगतो. हे नारदा, ऐक.

लोकयुक्त देश आणि अलोकयुक्त देश यांच्या मधोमध हा पर्वत उभा आहे. ईश्वराने या तिन्ही लोकांची सीमा म्हणून ह्याची निर्मिती केली आहे. प्राणीयुक्त लोकांची ही मर्यादा आहे.

सूर्यापासून ध्रुवापर्यंत ज्या अनेक ज्योती पसरलेल्या आहेत, त्यांचे किरण या सर्वांच्या योगाने त्या ज्योती अलीकडच्या तिन्ही लोकांना चोहोबाजूने प्रकाशित करतात.

हे नारदा, या किरणांचा त्यापुढील लोकांमध्ये प्रवेश होत नाही. कारण हा महोदय नावाचा सर्वश्रेष्ठ असा जो पर्वत आहे तो ध्रुवापेक्षांही अतिशय उंच असून तितकाच विस्तीर्ण आहे. ह्या लोकांचा समुदाय एवढाच आहे असे पंडितांनी संस्था, प्रमाण व लक्षणे यावरून स्पष्ट सांगितले आहे.

हे नारदमुने, भूलोकांचे क्षेत्रफळ पन्नास कोटी योजने आहे असे गणित केले आहे. हा लोकालोक पर्वत या भूलोकांच्या एक चतुर्थांश इतका विशाल आहे. त्यावर स्वयंभू ब्रह्मदेवाने चारी दिशांमध्ये दिग्गजांची नेमणूक केलेली आहे. त्यांची नावे ऐक वृषभ, पुष्पचूड, वामन, अपराजित या नावांनी ते दिग्गज ओळखले जातात.

हे नारदा, या दिग्गजांमुळेच सर्व लोकांचे अस्तित्व म्हणजे स्थिती निर्माण झाली आहे. त्या स्वतःच्याच विभूति असल्यामुळे त्यांचे बहुवीर्ययुक्त असे विशुद्ध सत्त्वरूप ऐश्वर्य वाढविणारा भगवान हरि आठही सिद्धींनी परिपूर्ण होऊन तेथे रहात असतो.

विश्वक वगैरे सेनादी लोकपालांनी तो परिवेष्टित असतो. भुजदंडरूप आपल्या आयुधांनी संपूर्णपणे आच्छादित असलेला परमेश्वर सर्व लोककल्याणार्थ तेथे वास्तव्य करीत असतो. कल्प संपेपर्यंत तो अहिदेव भगवान विष्णु या स्वरूपात तेथे रहात असतो.

आपल्या मायायोगाने तो स्वतःच सृष्टीचे रक्षणासाठी साधन निर्माण करतो. त्याच्याच जवळ पण बाहेरील बाजूस लोकालोकाचल आहे असे सांगून ठेवले आहे. म्हणून हे नारदा, तुला हा विस्तार सांगितला. यामुळे अलोकाचे मापनही सिद्ध झाले आहे. शुद्ध योगेश्वराचीच त्याच्यापुढे गती होते असे सांगतात. घावा व भूमि यांच्यामध्ये म्हणजे या संपूर्ण ब्रह्मांडाच्या मध्यभागी सूर्य असतो.

तो मध्यभागी आहे असे कशावरून ? त्याचे कारण असे की, सूर्य व अंडयासारखा वर्तुळभाग यांच्यामध्ये संपूर्णपणे पंचवीस कोटी अंतर आहे. पण हे विराटरूप अचेतनाच्या ठिकाणी निर्माण झाले. म्हणून याला मार्तंड हे नाव प्राप्त झाले.

सुवर्णमय अंडयातून याची उत्पत्ती झाली असल्यामुळे यालाच हिरण्यगर्भ असे म्हणतात. सूर्याच्या दिशा, आकाश, अंतरिक्ष, पृथ्वी व तिचे निरनिराळे भाग, स्वर्ग, मोक्ष, नरक व अतल इत्यादी अधोलोक या सर्वांचा विभाग कल्पिलेला आहे.

देव, तिर्यक, मनुष्ये, सर्प, लता व सर्व प्राणी समुदाय यांचा आत्मा व नेत्रांचा नियंता सूर्य हाच आहे. अशा तर्‍हेने या भूमंडलाची स्थिती, हे नारदा, मी तुला सांगितली. द्विदल, बीजरहित अशा फलांच्या एका भागाने जसे दुसर्‍या भागाचे प्रमाण ठरवितात त्याचप्रमाणे यांच्याच योगाने प्रमाण जाणणारे पंडित द्युलोकाची स्थिती सांगत असतात.

या दोहोंच्यामध्ये अंतरिक्ष आहे. त्याच्या सहाय्याने दोन्हीही लोक संलग्न झाले असून ते संबंधित झाले आहेत. त्याच्या मध्यभागी तो भगवान म्हणजे सर्व प्रकाशमानात श्रेष्ठ आहे. सूर्य स्थित असतो. तो स्वतःच्या प्रकाशाने संपूर्ण त्रैलोक्य दृश्यरूप करतो. तसेच उष्णताही देतो. त्याचप्रमाणे तो उत्तरायण गतीचा उपयोग करून आपली गती मंद करतो.

जेव्हा सूर्य आरोहणात जातो तेव्हा त्यामुळे दिवस मोठा होतो. दक्षिणायनामध्ये सूर्य जेव्हा प्रवेश करतो तेव्हा त्याची गती वेगवान होते. म्हणून अवरोहणात सूर्य गेल्यावर तो दिवस लहान करतो.

जेव्हा हा सूर्य विषुवात नावाच्या स्थानाप्रत येतो तेव्हा त्याची गती सारखी रहाते. तेथे हा भगवान सूर्य दिवस व रात्र यांचे मान सम प्रमाणात ठेवतो.

पण पुढे हा आदित्य मेष, तूल या राशींमध्ये फिरू लागतो तेव्हा तो वेदांनी किंवा पिता, पितामह, प्रपितामह या तिन्हींनी युक्त होतो, तेव्हा हा सूर्य दिवस व रात्र सारखा करतो.

वृषभ इत्यादि पाच राशीमध्ये ज्यावेळी सूर्य संचार करू लागतो तेव्हा प्रतिदिनी दिवसाचे मान वाढते व रात्रीचे प्रमाण कमी होते. वृश्चिक वगैरे ज्या पाच राशी आहेत, त्यात जेव्हा भगवान सूर्य प्रवेश करतो तेव्हा रात्री व दिवस यांची स्थिती उलट होते. म्हणजे प्रती दिवशी रात्र वाढत जाते आणि त्याच प्रमाणात दिवस लहान लहान होत जातो.


अध्याय चवदावा समाप्त

GO TOP