श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
अष्टमः स्कन्धः
पञ्चदशोऽध्यायः


भुवनकोशवर्णने सूर्यगतिवर्णनम्

श्रीनारायण उवाच
अतः परं प्रवक्ष्यामि भानोर्गमनमुत्तमम् ।
शीघ्रमन्दादिगतिभिस्त्रिविधं गमनं रवेः ॥ १ ॥
सर्वग्रहाणां त्रीण्येव स्थानानि सुरसत्तम ।
स्थानं जारद्‍गवं मध्यं तथैरावतमुत्तरम् ॥ २ ॥
वैश्वानरं दक्षिणतो निर्दिष्टमिति तत्त्वतः ।
अश्विनी कृत्तिका याम्या नागवीथीति शब्दिता ॥ ३ ॥
रोहिण्यार्द्रा मृगशिरो गजवीथ्यभिधीयते ।
पुष्याश्लेषा तथाऽऽदित्या वीथी चैरावती स्मृता ॥ ४ ॥
एतास्तु वीथयस्तिस्र उत्तरो मार्ग उच्यते ।
तथा द्वे चापि फल्गुन्यौ मघा चैवार्षभी मता ॥ ५ ॥
हस्तश्चित्रा तथा स्वाती गोवीथीति तु शब्दिता ।
ज्येष्ठा विशाखानुराधा वीथी जारद्‍गवी मता ॥ ६ ॥
एतास्तु वीथयस्तिस्रो मध्यमो मार्ग उच्यते ।
मूलाषाढोत्तराषाढा अजवीथ्यभिशब्दिता ॥ ७ ॥
श्रवणं च धनिष्ठा च मार्गी शतभिषक् तथा ।
वैश्वानरी भाद्रपदे रेवती चैव कीर्तिता ॥ ८ ॥
एतास्तु वीथयस्तिस्रो दक्षिणो मार्ग उच्यते ।
उत्तरायणमासाद्य युगाक्षान्तर्निबद्धयोः ॥ ९ ॥
कर्षणं पाशयोर्वायुबद्धयो रोहणं स्मृतम् ।
तदाभ्यन्तरगान्मण्डलाद्रथस्य गतेर्भवेत् ॥ १० ॥
मान्द्यं दिवसवृद्धिश्च जायते सुरसत्तम ।
रात्रिह्रासश्च भवति सौम्यायनक्रमो ह्ययम् ॥ ११ ॥
दक्षिणायनके पाशे प्रेरणादवरोहणम् ।
बहिर्मण्डलवेशेन गतिशैघ्र्यं तदा भवेत् ॥ १२ ॥
तदा दिनाल्पता रात्रिवृद्धिश्च परिकीर्तिता ।
वैषुवे पाशसाम्यात्तु समावस्थानतो रवेः ॥ १३ ॥
मध्यमण्डलवेशश्च साम्यं रात्रिदिनादिके ।
आकृष्येते यदा तौ तु ध्रुवेण समधिष्ठितौ ॥ १४ ॥
तदाभ्यन्तरतः सूर्यो भ्रमते मण्डलानि च ।
ध्रुवेण मुच्यमानेन पुना रश्मियुगेन तु ॥ १५ ॥
तथैव बाह्यतः सूर्यो भ्रमते मण्डलानि च ।
तस्मिन्मेरौ पूर्वभागे पुर्यैन्द्री देवधानिका ॥ १६ ॥
दक्षिणे वै संयमनी नाम याम्या महापुरी ।
पश्चान्निम्लोचनी नाम वारुणी वै महापुरी ॥ १७ ॥
तदुत्तरे पुरी सौम्या प्रोक्ता नाम विभावरी ।
ऐन्द्रपुर्यां रवेः प्रोक्त उदयो ब्रह्मवादिभिः ॥ १८ ॥
संयमन्यां च मध्याह्ने निम्लोचन्यां निमीलनम् ।
विभावर्यां निशीथः स्यात्तिग्मांशोः सुरपूजितः ॥ १९ ॥
प्रवृत्तेश्च निमित्तानि भूतानां तानि सर्वशः ।
मेरोश्चतुर्दिशं भानोः कीर्तितानि मया मुने ॥ २० ॥
मेरुस्थानां सदा मध्यं गत एव विभाति हि ।
सव्यं गच्छन्दक्षिणेन करोति स्वर्णपर्वतम् ॥ २१ ॥
उदयास्तमये चैव सर्वकालं तु सम्मुखे ।
दिशास्वशेषासु तथा सुरर्षे विदिशासु च ॥ २२ ॥
यैर्यत्र दृश्यते भास्वान्स तेषामुदयः स्मृतः ।
तिरोभावं च यत्रैति तत्रैवास्तमनं रवेः ॥ २३ ॥
नैवास्तमनमर्कस्य नोदयः सर्वदा सतः ।
उदयास्तमनाख्यं हि दर्शनादर्शनं रवेः ॥ २४ ॥
शक्रादीनां पुरे तिष्ठन्स्पृशत्येष पुरत्रयम् ।
विकर्णौ द्वौ विकर्णस्थस्त्रीन्कोणान्द्वे पुरे तथा ॥ २५ ॥
सर्वेषां द्वीपवर्षाणां मेरुरुत्तरतः स्थितः ।
यैर्यत्र दृश्यते भानुः सैव प्राचीति चोच्यते ॥ २६ ॥
तद्वामभागतो मेरुर्वर्ततेति विनिर्णयः ।
यदि चैन्द्र्याः प्रचलते घटिका दशपञ्चभिः ॥ २७ ॥
याम्यां तदा योजनानां सपादं कोटियुग्मकम् ।
सार्धद्वादशलक्षाणि पञ्चनेत्रसहस्रकम् ॥ २८ ॥
प्रक्रामति सहस्रांशुः कालमार्गप्रदर्शकः ।
एवं ततो वारुणीं च सौम्यामैन्द्रीं सहस्रदृक् ॥ २९ ॥
पर्येति कालचक्रात्मा द्युमणिः कालबुद्धये ।
तथा चान्ये ग्रहाः सोमादयो ये दिग्विचारिणः ॥ ३० ॥
नक्षत्रैः सह चोद्यन्ति सह चास्तं व्रजन्ति ते ।
एवं मुहूर्तेन रथो भानोरष्टशताधिकम् ॥ ३१ ॥
योजनानां चतुस्त्रिंशल्लक्षाणि भ्रमति प्रभुः ।
त्रयीमयश्चतुर्दिक्षु पुरीषु च समीरणात् ॥ ३२ ॥
प्रवहाख्यात्सदा कालचक्रं पर्येति भानुमान् ।
यस्य चक्रं रथस्यैकं द्वादशारं त्रिनाभिकम् ॥ ३३ ॥
षण्नेमि कवयस्तं च वत्सरात्मकमूचिरे ।
मेरुमूर्धनि तस्याक्षो मानसोत्तरपर्वते ॥ ३४ ॥
कृतेतरविभागो यः प्रोतं तत्र रथाङ्गकम् ।
तैलकारकयन्त्रेण चक्रसाम्यं परिभ्रमन् । ३५ ॥
मानसोत्तरनाम्नीह गिरौ पर्येति चांशुमान् ।
तस्मिन्नक्षे कृतं मूलं द्वितीयोऽक्षो ध्रुवे कृतः ॥ ३६ ॥
तुर्यमानेन तैलस्य यन्त्राक्षवदितीरितः ।
कृतोपरितनो भागः सूर्यस्य जगतां पतेः ॥ ३७ ॥
रथनीडस्तु षट्‌त्रिंशल्लक्षयोजनमायतः ।
तत्तुर्यभागतः सोऽयं परिणाहेन कीर्तितः ॥ ३८ ॥
तावानर्करथस्यात्र युगस्तस्मिन्हयाः शुभाः ।
सप्तच्छन्दोऽभिधानाश्च सूरसूतेन योजिताः ॥ ३९ ॥
वहन्ति देवमादित्यं लोकानां सुखहेतवे ।
पुरस्तात्सवितुः सूतोऽरुणः पश्चान्नियोजितः ॥ ४० ॥
सौत्ये कर्मणि संयुक्तो वर्तते गरुडाग्रजः ।
तथैव बालखिल्याख्या ऋषयोऽङ्गुष्ठपर्वकाः ॥ ४१ ॥
प्रमाणेन परिख्याताः षष्टिसाहस्रसंख्यकाः ।
स्तुवन्ति पुरतः सूर्यं सूक्तवाक्यैः सुशोभनैः ॥ ४२ ॥
तथा चान्ये च ऋषयो गन्धर्वा अप्सरोरगाः ।
ग्रामण्यो यातुधानाश्च देवाः सर्वे परेश्वरम् ॥ ४३ ॥
एकैकशः सप्त सप्त मासि मासि विरोचनम् ।
सार्धलक्षोत्तरं कोटिनवकं भूमिमण्डलम् ॥ ४४ ॥
द्विसहस्रं योजनानां स गव्यूत्युत्तरं क्षणात् ।
पर्येति देवदेवेशो विश्वव्यापी निरन्तरम् ॥ ४५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
भुवनकोशवर्णने सूर्यगतिवर्णनं नाम पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥


सूर्याच्या गतींविषयी माहिती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीनारायणमुनी नारदाला म्हणाले, "हे नारदा, हे सुपुत्रा, आता मी तुला सूर्याच्या सर्व गतींचे गमनासंबंधी माहिती सांगतो. शीघ्र, मंद अशाप्रकारच्या गतीमुळे सूर्याचे गमन तीन प्रकारात होते. हे देवोत्तमा, सर्व ग्रहांची स्थानेही तीनच आहेत.

जारद्‍गव हे मधले स्थान असून वरच्या स्थानास ऐरावत स्थान असे म्हणतात. दक्षिणेकडे जे स्थान आहे त्याला वैश्वानर स्थान या नावाने सांबोधतात असे तत्त्ववेत्यांनी सांगितले आहे.

अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी यांना नागवीथी असे म्हणण्याचा प्रघात आहे. तसेच रोहिणी, मृग व आर्द्रा यांचे नाव गजवीथी असे आहे. पुढे पुनर्वसु, पुष्प व आश्लेषा यांना ऐरावती वीथी असे म्हणतात. या तिन्ही विथी उत्तर मार्गी आहेत, म्हणजे वरच्या स्थानातील आहेत. त्याचप्रमाणे मघा व दोन फाल्गुनी ही आर्षभी वीथी होय असे सर्व पंडित मानतात. हस्त, चित्रा आणि स्वाती यांना गोपीथी असे म्हटले आहे. जेष्ठा, विशाखा, अनुराधा या तीन नक्षत्रांना जारद्‍गवीवीथी असे नाव दिलेले आहे. या तीन वीथी मध्यममार्गी वीथी म्हणून ओळखल्या जातात.

मूळ, पूर्वाषाढा व उत्तराषाढा यांना अजवीथी या नावाने संबोधतात. त्याचप्रमाणे श्रवण, धनिष्ठा, शतषक यांना मार्गी वीथी म्हटले जाते. पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा, रेवती, यांना वैश्वानरी वीथी म्हणतात. या तीन वीथी म्हणजेच दक्षिण मार्ग होय.

उत्तरायणात जुवांच्या आसामध्ये बांधून वायूच्या योगाने घट्ट केलेले पाश म्हणजे घट्ट दोरे ओढणे याचाच अर्थ वर चढणे होय असे शास्त्रात सांगितले आहे.

त्यावेळी आतील मंडलातून रथाची गती होऊ लागल्यामुळे ती मंद होत जाते व हे नारदा, दिवस मोठा होऊन रात्र लहान होत जाते. ह्याला सौम्यायन क्रम असे म्हणतात.

त्यानंतर दक्षिणायनाशी संबंध असलेले दोरे ओढले असता त्याचे अवरोहन होते, म्हणजे तो उतरत असतो. त्याचवेळी त्याचा बाहेरच्या मंडलात प्रवेश होतो. रथाची गती शीघ्र होते आणि असे झाल्यामुळे दिवस ओघाओघाने लहान होतो व रात्र प्रतिदिनी मोठी होत जाते असे पंडित व शास्त्री सांगत आले आहेत.

फक्त विषुववृत्तातील पाश सारखे असल्याने विषुववृत्ताच्या भागात सुर्याच्या गती सारख्या होत असतात. सूर्याचा मध्यम मंडलामध्ये प्रवेश होतो. त्यामुळे दिवस व रात्र यांचे प्रमाण सारखे होते.

ज्यावेळी धृव पाश धरून त्यांना ओढतो त्यावेळी सूर्याचे भ्रमण आतून होऊ लागते व त्याची मंडले होत असतात. पण जेव्हा ध्रुव किरणरूपी जुवांच्या सहाय्याने त्यांना सैल सोडतो, पूर्ववत सूर्य बाहेरून फिरू लागतो व त्याची मंडले बाहेरून होत रहातात असे ते गमनाचे प्रकार आहेत.

त्या मेरू पर्वतावर पूर्व भागामध्ये देवींची सुंदर राजधानी इंद्रपुरी वसलेली आहे. मेरूच्या दक्षिणभागात यमाची नगरी असून या यमपुरीस संयमिनी असे म्हणतात. तसेच मेरु पर्वताच्या पश्चिम प्रदेशात वरुण देवाची महानगरी आहे तिला निमलोचन या नावाने संबोधले आहे. मेरुच्या उत्तर भागामध्ये विभावरी या नावाची प्रसिद्ध नगरी आहे. ती सोमाची नगरी आहे. इंद्राच्या इंद्रपुरीमध्ये सूर्याचा उदय होतो असे महापंडित सांगत असतात. त्याचवेळी संयमनी नगरीमध्ये मध्यान्ह म्हणजे दुपारची वेळ झालेली असते. तर त्याचवेळी इकडे निमलोचनीमध्ये सूर्यास्त होतो आणि या समान वेळी देवांना पूज्य असलेली मध्यरात्र सूर्यामुळे सुरू होते.

हे मुने, भूतांच्या प्रवृत्तींना सर्वच दृष्टीने कारण असलेली अशी ती सूर्याची मेरूच्या सर्व दिशांना होत असलेली गमने मी तुला सांगितली. मेरु पर्वतावरील सर्व लोकांना सूर्य बहुधा मध्यवर्ती दिसतो. कारण तो नक्षत्रांच्या समोर असल्याने मेरूला जरी डावीकडे टाकून जात असला तरीही, प्रवाह संज्ञक वायूच्या योगाने असणार्‍या ज्योतिषचक्राच्या सहाय्याने तो सुवर्ण पर्वतास उजवी घालतो.

सूर्याचा उदय व अस्त यामधे जो काल असतो तो संपूर्ण त्याचवेळी सर्वांच्या संमुख असतो. म्हणून हे देवर्षे, त्याचप्रमाणे सर्व दिशा आणि उपनिषदे यामध्ये ज्यांना ज्या वेळी व ज्या ठिकाणी सूर्य दिसतो, तोच त्यांचा उदय होय व ज्याठिकाणी सूर्य दिसेनासा होतो तो त्यांचा अस्त होय.

सूर्य हा नित्य असून वस्तुतः त्याला उदय अस्त नाहीतच. पण सर्व प्राण्यांना जेव्हा त्याचे दर्शन होते, तेव्हा ते त्याला उदय म्हणतात व जेव्हा सूर्य सर्व प्राणीमात्रांच्या दृष्टीच्या टप्प्यापलीकडे जातो तेव्हा अस्त समजतात.

पण जेव्हा हा सूर्य शुक्रादिकांच्या नगरीत असतो त्यावेळी इंद्रपूर, यमपूर, सौम्यपूर ही तीन नगरे आणि ईशान्य व वन्ही या कोनांना तो स्पर्श करतो. तसेच तो वन्हीचे जे विकर्णानगर आहे त्या नगरात जेव्हा असतो तेव्हा तो वन्ही, निॠती व इशान ह्या तीन कोनांना व इंद्र आणि यम यांच्याही नगरांना स्पर्श करतो.

ही सर्व द्वीपे व वर्षे यांच्या उत्तर दिशेला मेरू पर्वत आहे. ज्यांना तेथे सूर्य दिसतो त्या दिशांनाच ते पूर्व म्हणून संबोधतात. पूर्वेच्या डाव्या बाजूला मेरू असतो हे निश्चयाने समजावे. जेव्हा सूर्य इंद्राच्या नगरापासून निघतो आणि पंधरा घटकानंतर तो याम्य दिशेस येऊन पोहोचतो, त्यावेळी दोन कोटी सदतीस लक्ष व पंचाहत्तर योजने इतके अंतर त्या सूर्याने पूर्ण केले असे जाणकार नित्य सांगत असतात. तो सहस्रांश या प्रमाणात अंतर चालतो. याचा अर्थच असा की तो कालाचा मार्ग दाखवितो.

यानंतर सूर्य वरुणपुरात येतो व त्यातून पुढे सौम्यपुरात व ऐंद्रपुरात जातो. थोडक्यात असे की, हा सूर्य म्हणजे एक श्रेष्ठ कालचक्रच आहे. तो आपल्या भ्रमणाने कालाचे दिग्दर्शन करतो व त्याची जाणीव व्हावी म्हणून आकाशात भ्रमण करतो.

सूर्याप्रमाणे इतरही आणखी चंद्र वगैरे दुसरे ग्रह अवकाशात फिरत असतात. ते सर्व ग्रह विशिष्ट नक्षत्रांसह आकाशात भ्रमण करीत असतात. हे ग्रह व नक्षत्रे आकाशात उदय पावतात व अस्तास जातात.

सूर्याचा हा वेगवान रथ एक मुहूर्तामध्ये चवतीस लक्ष आठशे योजने चालतो. सूर्य हा देव तीन वेदांनी युक्त आहे. हा किरणांनी युक्त असा रवी प्रवह नावाच्या वायूमुळे नेहमी कालचक्रातून फिरत चारी दिशांना व त्यातील सर्व नगरीना प्रदक्षिणा करतो. त्याच्या रथाला एक चाक आहे. त्याला बारा अरा आहेत. ते चाक तीन नाभींनी युक्त आहे. त्याला सहा धावा आहेत.

सारांश, हा रथ संवत्सरात्मक आहे. त्याचा आस प्रचंड असून मेरूच्या शीर्षभागावर असलेल्या मानसोतर पर्वतावर आहे. ज्या ठिकाणी दोन भाग केलेले आहेत. तेथेच ह्या रथाचे चक्र अडकविलेले आहे. तेल्याचा घाणा जसा दिसतो तसा याचा आकार आहे. म्हणून घाण्याचा बैल फिरत रहातो तसा हा मानसोत्तर नावाच्या पर्वतावर चहूकडे फिरत असतो.

त्या चक्राच्या भागात जो घट्ट बसविलेला आस आहे, त्याची लांबी एक कोटी सत्तावन्न लक्ष पन्नास हजार योजने आहे, म्हणजे मानसोतराएवढी आहे. लयाचा दुसरा आस ध्रुवामध्ये अडकविलेला आहे. त्याची लांबी एकोणचाळीस लक्ष सदतीस हजार पाचशे योजने आहे. हा इतक्या लांबीचा आस ध्रुवामध्ये घट्ट बसविलेला असून घाण्याच्या आसाप्रमाणे वायुपाशाने घट्ट बांधून ठेवला आहे.

जगाचा स्वामी जो सूर्य आहे त्याच्या रथाचा भाग छत्तीस लक्ष योजने लांब आहे. ही सर्व मोजमापे तुर्यमानानेच आहेत. या सूर्याच्या रथाचे जूदेखील तेवढयाच लांबीचे आहेत.

या सुंदर जुवांना सूर्याच्या पुत्राने सात शुभ व छंदोमय अश्व जोडलेले आहेत. ते सर्व लोक कल्याणासाठी सूर्याचा रथ ओढत असतात. अरुण नावाचा एक सारथी सूर्याच्या पुढे बसलेला असतो. त्याचे तोंड नेहमी पश्चिमेला असते. सूर्याने आपल्या सारथ्यासाठी महापराक्रमी गरुडाचा जेष्ठ बंधू अरुण याची योजना केली आहे.

त्याचप्रमाणे जे आकारमानाने फक्त अंगठयाच्या एका पेर्‍याएवढे आहेत, अशी सर्वत्र प्रसिद्धी असलेले असे साठ हजार वाल्खिल्य ऋषी अत्यंत सुंदर वेदमंत्रांच्या योगाने सूर्याच्या पुढे उभे राहून त्याची स्तुती करीत असतात. त्याचप्रमाणे त्या दैदीप्यमान परमेश्वराची, त्या भगवान सूर्याची, ऋषी, गंधर्व, अप्सरा, सूर्य, ग्रामणी, यातुधान व देव हे इतरही सर्वजण प्रत्येक महिन्यात क्रमाक्रमाने सात जोडयांसह उपासना करतात.

तो सर्व विश्व व्यापून राहणारा देवाधिदेव भगवान सूर्यनारायण सतत वेगाने भ्रमण करीत असतो. तो एका क्षणात नऊ कोटी दीड लक्ष दोन हजार इतकी योजने अंतर फिरतो. तो सूर्यदेव दोन कोसांइतके भूमंडल व्यापून टाकतो.

हे नारदा, अशाप्रकारे सूर्य व त्याचे भ्रमण, दिशा इत्यादींविषयी मी तुला विस्ताराने सांगितले.


अध्याय पंधरावा समाप्त

GO TOP