श्रीनारायण उवाच
जम्बुद्वीपो यथा चायं यत्प्रमाणेन कीर्तितः ।
तावता सर्वतः क्षारोदधिना परिवेष्टितः ॥ १ ॥
जम्ब्वाख्येन यथा मेरुस्तथा क्षारोदकेन च ।
क्षारोदधिस्तु द्विगुणः प्लक्षाख्येनोपवेष्टितः ॥ २ ॥
यथैव परिखा बाह्योपवनेन हि वेष्ट्यते ।
प्लक्षाख्यश्च स्वयं जम्बुप्रमाणो द्वीपरूपधृक् ॥ ३ ॥
हिरण्मयोऽग्निस्तत्रैव तिष्ठतीति विनिश्चयः ।
प्रियव्रतात्मजस्तत्र सप्तजिह्व इति स्मृतः ॥ ४ ॥
अग्निस्तदधिपस्त्विध्मजिह्वः स्वं द्वीपमेव च ।
विभज्य सप्तवर्षाणि स्वपुत्रेभ्यो ददौ विभुः ॥ ५ ॥
स्वयमात्मविदां मान्यां योगचर्यां समाश्रितः ।
तेनैव चात्मयोगेन भगवन्तमुपागतः ॥ ६ ॥
शिवं च यवसं भद्रं शान्तं क्षेमामृते तथा ।
अभयं चेति सप्तैव तद्वर्षाणि सदेक्षताम् ॥ ७ ॥
तेषु प्रोक्ता नदीः सप्त गिरयः सप्त चैव हि ।
अरुणा नृम्णाङ्गिरसी सावित्री सुप्रभातिका ॥ ८ ॥
ऋतम्भरा सत्यम्भरा इति नद्यः प्रकीर्तिताः ।
मणिकूटो वज्रकूट इन्द्रसेनस्तथैव च ॥ ९ ॥
ज्योतिष्मान्वै सुपर्णश्च हिरण्यष्ठीव एव च ।
मेघमाल इति ख्याताः प्लक्षद्वीपस्य पर्वताः ॥ १० ॥
नदीनां जलमात्रेण दर्शनस्पर्शनादिभिः ।
निर्धूताशेषरजसो निस्तमस्काः प्रजास्तथा ॥ ११ ॥
हंसश्चैव पतङ्गश्च ऊर्ध्वायन इतीव च ।
सत्याङ्गसंज्ञाश्चत्वारो वर्णाः प्लक्षस्य द्वीपके ॥ १२ ॥
सहस्रायुप्रमाणाश्च विविधोपमदर्शनाः ।
स्वर्गद्वारं त्रयीविद्याविधिनार्कं यजन्ति ते ॥ १३ ॥
प्रत्नस्य विष्णो रूपं च सत्यर्तस्य च ब्रह्मणः ।
अमृतस्य च मृत्योश्च सूर्यमात्मानमीमहि ॥ १४ ॥
प्लक्षादिषु च सर्वेषु पञ्चद्वीपेषु नारद ।
आयुरिन्द्रियमोजश्च बलं बुद्धिः सहोऽपि च ॥ १५ ॥
विक्रमः सर्वलोकानां सिद्धिरौत्पत्तिकी सदा ।
प्लक्षद्वीपात्परं चेक्षुरसोदः सरिताम्पतिः ॥ १६ ॥
प्लक्षद्वीपं समग्रं च परिवार्यावतिष्ठते ।
शाल्मलाख्यस्ततो द्वीपश्चास्माद् द्विगुणविस्तरः ॥ १७ ॥
समानेन सुरोदेन सिन्धुना परिवेष्टितः ।
यत्र वै शाल्मलीवृक्षः प्लक्षायामः प्रकीर्तितः ॥ १८ ॥
स्थानं तत्पक्षिराजस्य गरुडस्य महात्मनः ।
तस्य द्वीपस्य नाथो हि यज्ञबाहुः प्रियव्रतात् ॥ १९ ॥
जातः स एव सप्तभ्यः स्वपुत्रेभ्यो ददौ धराम् ।
तद्वर्षाणां च नामानि कथितानि निबोधत ॥ २० ॥
सुरोचनं सौमनस्यं रमणं देववर्षकम् ।
पारिभद्रं तथा चाप्यायनं विज्ञातनामकम् ॥ २१ ॥
तेषु वर्षाद्रयः सप्त सप्तैव सरितः स्मृताः ।
सरसः शतशृङ्गश्च वामदेवश्च कन्दकः ॥ २२ ॥
कुमुदः पुष्पवर्षश्च सहस्रश्रुतिरेव च ।
एते च पर्वताः सप्त नदीनामानि चोच्यते ॥ २३ ॥
अनुमतिः सिनीवाली सरस्वती कुहूस्तथा ।
रजनी चैव नन्दा च राकेति परिकीर्तिताः ॥ २४ ॥
तद्वर्षपुरुषाः सर्वे चातुर्वर्ण्यसमाह्वयाः ।
श्रुतधरो वीर्यधरो वसुन्धर इषुन्धरः ॥ २५ ॥
भगवन्तं वेदमयं यजन्ते सोममीश्वरम् ।
स्वगोभिः पितृदेवेभ्यो विभजन्कृष्णशुक्लयोः ॥ २६ ॥
सर्वासां च प्रजानां च राजा सोमः प्रसीदतु ।
एवं सुरोदाद् द्विगुणः स्वमानेन प्रकीर्तितः ॥ २७ ॥
घृतोदेनावृतः सोऽयं कुशद्वीपः प्रकाशते ।
यस्मिन्नास्ते कुशस्तम्बो द्वीपाख्याकारणो ज्वलन् ॥ २८ ॥
स्वशष्परोचिषा काष्ठा भासयन्परितिष्ठते ।
हिरण्यरेतास्तद्द्वीपपतिः प्रैयव्रत स्वराट् ॥ २९ ॥
स्वपुत्रेभ्यश्च सप्तभ्यस्तद्द्वीपं सप्तधाभजत् ।
वसुश्च वसुदानश्च तथा दृढरुचिः परः ॥ ३० ॥
नाभिगुप्तस्तुत्यव्रतौ विविक्तनामदेवकौ ।
तेषां वर्षेषु सप्तैव सीमागिरिवराः स्मृताः ॥ ३१ ॥
नद्यः सप्तैव सन्तीह तन्नामानि निबोधत ।
चक्रस्तथा चतुःशृङ्गः कपिलश्चित्रकूटकः ॥ ३२ ॥
देवानीकश्चोर्ध्वरोमा द्रविणः सप्त पर्वताः ।
रसकुल्या मधुकुल्या मित्रविन्दा तथैव च ॥ ३३ ॥
श्रुतविन्दा देवगर्भा घृतच्युन्मन्दमालिके ।
यत्पयोभिः कुशद्वीपवासिनः सर्व एव ते ॥ ३४ ॥
कुशलः कोविदश्चैवाप्यभियुक्तस्तथैव च ।
कुलकश्चेति संज्ञाभिश्चतुर्वर्णाः प्रकीर्तिताः ॥ ३५ ॥
जातवेदसरूपं तं देवं कर्मजकौशलैः ।
यजन्ते देववर्याभाः सर्वे सर्वविदो जनाः ॥ ३६ ॥
परस्यब्रह्मणः साक्षाज्जातवेदोऽसि हव्यवाट् ।
देवानां पुरुषाङ्गानां यज्ञेन पुरुषं यज ।
एवं यजन्ते ज्वलनं सर्वे द्वीपाधिवासिनः ॥ ३७ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
भुवनकोशवर्णने प्लक्षद्वीपकुशद्वीपवर्णनं नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
द्वीपवर्णन -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्रीनारायण मुनी नारदाला म्हणाले, "हे नारदा, हे देवर्षे, ह्या जंबूद्वीपाबद्दल जसे आजवर सांगण्यात आलेले आहे आणि ते जसे आहे तसे मी आता तुला सांगतो. संपूर्ण जंबूद्वीप क्षारोदधीने सर्व बाजूंनी वेढलेले आहे. जंबूद्वीप ज्याप्रमाणे मेरूच्या सभोवती पसरलेले आहे तसेच जंबूद्वीपभोवतीही हा क्षारोदधी म्हणजे खार्या पाण्याचा समुद्र पसरलेला आहे. जसे खंदक बाहेरच्या उपवनांनी परिवेष्टित झालेले असतात तसे हा क्षारोदधीदेखील विस्तृत अशा प्लक्षाख्य द्वीपाने वेष्टिलेला आहे. प्लक्ष नावाच्या प्रचंड वृक्षापुढे जसा जंबू वृक्ष दिसेल, तसे प्लक्षाख्य द्वीपापुढे जंबूद्वीप भासते, त्याचे प्रमाण याप्रकारे दर्शित केले आहे.
हिरण्मय व अग्नि त्याच ठिकाणी रहातो असे शास्त्रकार सांगत असतात, प्रियव्रताचा प्रसिद्ध पुत्र सप्तजिव्ह हा त्या द्वीपाचा अधिकारी आहे. इध्मजिव्ह नावाचा जणू अग्नीच असा तो या द्वीपाचा अधिपती आहे. त्याने आपल्या द्वीपाचे भाग करून सात पुत्रांना दिले व स्वतः मात्र आत्मबोध झालेल्यांना मान्य आहे, अशा योगाश्रमाच्या आचरणाचा स्वीकार करून रहातो आहे. त्या आत्मज्ञानामुळेच त्यास सत्वर भगवद्प्राप्ती झाली व तो देवलोकी गेला.
शिव, यवस, भद्र, शांत, क्षेम, अमृत व अभय ह्या वर्षांनी ते द्वीप युक्त आहे. त्या सातही वर्षात सात सुप्रसिद्ध नद्या आहेत व सर्वश्रेष्ठ असे सात पर्वतही आहेत. अरुणा, तृम्णा, आंगिरसी, सावित्री, सुप्रभवा, ऋतंकरा, सत्यंभरा अशा या सात नावांनी त्या नद्या प्रसिद्ध आहेत. या नद्या सर्वोत्तम आहेत.
या नद्यांप्रमाणेच आता हे नारदा, पर्वतांची सात नावे ऐक. मणिकूट, इंद्रसेन ज्योतिष्मान, सुवर्ण, हरिण्यष्ठी, मेघमाला असे सात पर्वत प्लक्षद्वीपात श्रेष्ठ व प्रसिद्ध आहेत.
ज्या नद्यांच्या केवळ दर्शनाने अथवा त्यातील उदकस्पशनि सर्व शरीरावरचा अथवा मनावरचा सर्व मल धुऊन जातो, त्याचप्रमाणे त्या उदकाच्या पुण्याने सर्वांचे अज्ञानही धुऊन जाते. प्लक्षद्वीपामध्ये हंस, पतंग, ऊर्ध्वायन व सत्यांग असे चार प्रकारचे वर्ण आहेत. त्यांचे आयुष्य हजार वर्षे आहे. त्यांची रूपे विविध प्रकारची आहेत. तेथील लोक वैदिक पद्धतीने स्वर्गद्वारभूत अशा त्या अर्काची पूजा करतात. पुराणपुरुष विष्णू त्याचे सूर्य हे उज्वल स्वरूप आहे. म्हणून आम्ही सर्वजण त्या भगवानाला शरण जातो. अनुष्ठानांनी युक्त असलेला धर्म, तसेच अनुभवास येणारा धर्म ब्रह्मतत्त्वाचा बोध घडविणारा धर्म, असे हे असून त्या भगवानाचे आहेत. शुभ फलाप्रमाणेच अशुभ फलाचाही आधार असा तो सूर्य नावाने प्रसिद्ध असलेला भगवानच आहे.
हे नारदा, प्लक्ष, जंबु वगैरे सर्व द्वीपामध्ये आयुष्य, इंद्रिय, ओज, बल, बुद्धी, वीर्य यांनी सर्वजण विक्रमी असून त्यांना सर्व सिद्धि ह्या नित्य साध्य झाल्या आहेत. त्या सिद्धी त्यांच्या आधीन आहेत.
प्लक्षद्वीपाच्या पलीकडे इक्षुरसोद नावाचा प्रचंड समुद्र आहे. त्याने जवळ जवळ संपूर्ण द्वीपच सर्व बाजूंनी वेढून टाकले आहे. त्या प्लक्षद्वीपाचे पलीकडे अतिशय विशाल असे किंबहुना प्लक्षद्वीपाच्या दुप्पट विस्ताराने असलेले असे शाल्मल नावाचे सुंदर द्वीप आहे. ते द्वीप सुरोद नावाच्या प्रंचड समुद्राने परिवेष्टित झाले आहे.
प्लक्षद्वीपात जसे प्लक्षवृक्ष आहेत, तसेच शाल्मल द्वीपात शाल्मल नावाचे प्रचंड वृक्ष आहेत. शाल्मल द्वीप हे प्रचंड व शूर पक्षिराजाचे वसतीस्थान आहे. पक्षीराज गरुड नेहमी तेथेच वास्तव करून असतो. त्या शाल्मलद्वीपाचा श्रेष्ठ अधिपती प्रियव्रताचा पुत्र यज्ञबाहू हा आहे. त्यानेही पृथ्वीचे सात भाग करून ते आपल्या सात पुत्रांना वाटून दिले. त्या सात उपवर्षांची नावे पुढीलप्रमाणे सांगितली आहेत. ती आता ऐक.
हे नारदा, ती सात वर्षे पुढील नावांनी प्रसिद्ध आहेत. सुरोचन, सौमनस्य, रमण, देववर्षक, पारिभद्र, आत्यायन व विज्ञात. अशी त्यांची सात नावे प्रसिद्ध आहेत. या सातही वर्षात उत्कृष्ट अशा सात नद्या आहेत. सरस, शतशृंग, वामदेव, कंदक, कुमुद, पुष्पवर्ष व सहस्रश्रुती असे सात उत्तम पर्वत आहेत.
या पर्वताप्रमाणे आता तेथील श्रेष्ठ नद्यांची नावे, हे नारदा, तुला सांगतो. अनुमती, सिनीवाली, सरस्वती, कुप्र, रजनी, नंदा, राका या नावांच्या सात नद्या त्या वर्षात प्रसिद्ध आहेत.
त्या वर्षातील सर्वच पुरुष श्रुतधर, वीर्यधर, वसुंधर, इषुंधर या नावाच्या चार वर्णाचे आहेत.
वेदमय असलेला व तेजस्वी अशा सोम या नावाने प्रसिद्ध पावलेल्या भगवान ईश्वराचे पूजन तेथील लोक करतात. तो ईश्वर आपल्या किरणांनी शुक्ल व कृष्ण पक्षांमध्ये देवांना व पितरांना अन्न वाटून देतो. तो सोम सर्वच प्रजांचा राजा आहे. तो सर्वांना प्रसन्न होवो.
त्यानंतर ज्याचे प्रमाण सुरोदापेक्षा दुप्पट आहे, असे सांगतात, असे कुलद्वीप नावाचे धृत समुद्राने सर्व बाजूंनी वेढलेले असे द्वीप आहे. तेथे ज्याच्यामुळे या द्वीपाला धृतोद नाव पडले. असा कुशसांब दैदीप्यमान होऊन राहिला आहे. तो आपल्या कोमल ज्वालांच्या तेजामध्ये सर्व दिशांना प्रकाश देत असतो.
प्रियव्रताचा पुत्र स्वराट् हिरण्यरेता, तो या द्वीपाचा स्वामी आहे. त्याने या द्वीपाचे सात भाग केले व आपल्या पुत्रांना वाटून दिले. वसु, वसुदान, दृढरूची, नाभिगुत्त, स्तुत्यव्रत, विविक्त, वामदेवक अशी त्या सात वर्णांची नावे आहेत. ही सातही वर्षे प्रसिद्ध आहेत. या सातही वर्षांच्या सीमा निश्चित करणारे सात पर्वतश्रेष्ठ आहेत. तसेच सातच मोठया नद्या आहेत. त्यांची नावे आता ऐक.
हे नारदा, तेथे चक्र, चतुःशृंग, कपिल, चित्रकूटक, देवानीक, ऊर्ध्वरोमा, द्रविण या नावाचे सात पर्वतराज आहेत. तसेच सात नद्यांची नावे ऐक.
रसकुल्या, मधुकुल्या, मित्रविंदा, श्रुतिविंदा, देवगर्भा, धृतच्युत, मंदमालिका या त्या सप्त नद्या होत. त्यांचे उदक अत्यंत पवित्र असून तेथे रहाणारे लोकही त्या उदकाने पवित्र होतात.
कुशल, कोविद, अभियुक्त, कुलक या चार वर्णांचे ते वसतीस्थान आहे असे सांगितले जाते. त्या वर्णांची कांती देवाप्रमाणे सतेज आहे. ते सर्वच लोक सर्वज्ञ आहेत. त्यांना अज्ञेय काही नाही.
अग्नि जसा तेजस्वी असतो, त्याप्रमाणे जातवेदाला पूज्य मानतात. जातवेद ह्या देवाला ते उत्तम कर्मे अर्पण करतात. ते म्हणतात,
"हे जातवेदा, तू परब्रह्माचा हव्यवाद आहेस. देव व पुरुषांची अंगे यांचा यज्ञ करून पुरुषाचे पूजन कर." असे म्हणून द्वीपात रहाणारे सर्वजण त्या जातवेद अग्नीची पूजा करतात.