श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
अष्टमः स्कन्धः
एकादशोऽध्यायः


भुवनकोशवर्णने भारतवर्षवर्णनम्

श्रीनारायण उवाच
भारताख्ये च वर्षेऽस्मिन्नहमादिजपूरुषः ।
तिष्ठामि भवता चैव स्तवनं क्रियतेऽनिशम् ॥ १ ॥
नारद उवाच
ॐ नमो भगवते उपशमशीलायोपरतानात्म्याय
नमोऽकिञ्चनवित्ताय ऋषिऋषभाय नरनारायणाय
परमहंसपरमगुरवे आत्मारामाधिपतये नमो नम इति ।
कर्तास्य सर्गादिषु यो न बध्यते
     न हन्यते देहगतोऽपि दैहिकैः ।
द्रष्टुर्न दृश्यस्य गुणैर्विदूष्यते
     तस्मै नमोऽसक्तविविक्तसाक्षिणे ॥ २ ॥
इदं हि योगेश्वरयोगनैपुणं
     हिरण्यगर्भो भगवाञ्जगाद यत् ।
यदन्तकाले त्वयि निर्गुणे मनो
     भक्त्या दधीतोज्झितदुष्कलेवरः ॥ ३ ॥
यथैहिकामुष्मिककामलम्पटः
     सुतेषु दारेषु धनेषु चिन्तयन् ।
शङ्केत विद्वान् कुकलेवरात्यया-
     द्यस्तस्य यत्‍नः श्रम एव केवलम् ॥ ४ ॥
तन्नः प्रभो त्वं कुकलेवरार्पितां
     त्वं माययाहं ममतामधोक्षज ।
भिन्द्याम येनाशु वयं सुदुर्भिदां
     विधेहि योगं त्वयि नः स्वभावजम् ॥ ५ ॥
एवं स्तौति सदा देवं नारायणमनामयम् ।
नारदो मुनिशार्दूलः प्रज्ञाताखिलसारदृक् ॥ ६ ॥
अस्मिन् वै भारते वर्षे सरिच्छैलास्तु सन्ति हि ।
तान्प्रवक्ष्यामि देवर्षे शृणुष्वैकाग्रमानसः ॥ ७ ॥
मलयो मङ्गलप्रस्थो मैनाकश्च त्रिकूटकः ।
ऋषभः कूटकः कोल्लः सह्यो देवगिरिस्तथा ॥ ८ ॥
ऋष्यमूकश्च श्रीशैलो व्यङ्कटाद्रिर्महेन्द्रकः ।
वारिधारश्च विन्ध्यश्च मुक्तिमानृक्षपर्वतः ॥ ९ ॥
पारियात्रस्तथा द्रोणश्चित्रकूटगिरिस्तथा ।
गोवर्धनो रैवतकः ककुभो नीलपर्वतः ॥ १० ॥
गौरमुखश्चेन्द्रकीलो गिरिः कामगिरिस्तथा ।
एते चान्येऽप्यसंख्याता गिरयो बहुपुण्यदाः ॥ ११ ॥
एतदुत्पन्नसरितः शतशोऽथ सहस्रशः ।
पानावगाहनस्नानदर्शनोत्कीर्तनैरपि ॥ १२ ॥
नाशयन्ति च पापानि त्रिविधानि शरीरिणाम् ।
ताम्रपर्णी चन्द्रवशा कृतमाला वटोदका ॥ १३ ॥
वैहायसी च कावेरी वेणा चैव पयस्विनी ।
तुङ्गभद्रा कृष्णवेणा शर्करावर्तका तथा ॥ १४ ॥
गोदावरी भीमरथी निर्विन्ध्या च पयोष्णिका ।
तापी रेवा च सुरसा नर्मदा च सरस्वती ॥ १५ ॥
चर्मण्वती च सिन्धुश्च अन्धशोणौ महानदौ ।
ऋषिकुल्या त्रिसामा च वेदस्मृतिर्महानदी ॥ १६ ॥
कौशिकी यमुना चैव मन्दाकिनी दृषद्वती ।
गोमती सरयू रोधवती सप्तवती तथा ॥ १७ ॥
सुषोमा च शतद्रुश्च चन्द्रभागा मरुद्‌वृधा ।
वितस्ता च असिक्नी च विश्वा चेति प्रकीर्तिताः ॥ १८ ॥
अस्मिन्वर्षे लब्धजन्मपुरुषैः स्वस्वकर्मभिः ।
शुक्ललोहितकृष्णाख्यैर्दिव्यमानुषनारकाः ॥ १९ ॥
भवन्ति विविधा भोगाः सर्वेषां च निवासिनाम् ।
यथा वर्णविधानेनापवर्गो भवति स्फुटम् ॥ २० ॥
एतदेव च वर्षस्य प्राधान्यं कार्यसिद्धितः ।
वदन्ति मुनयो वेदवादिनः स्वर्गवासिनः ॥ २१ ॥
अहो अमीषां किमकारि शोभनं
     प्रसन्न एषां स्विदुत स्वयं हरिः ।
यैर्जन्म लब्धं नृषु भारताजिरे
     मुकुन्दसेवौपयिकं स्पृहा हि नः ॥ २२ ॥
किं दुष्करैर्नः क्रतुभिस्तपोव्रतै-
     र्दानादिभिर्वा द्युजयेन फल्गुना ।
न यत्र नारायणपदपङ्कज-
     स्मृतिः प्रमुष्टातिशयेन्द्रियोत्सवात् ॥ २३ ॥
कल्पायुषां स्थानजयात्पुनर्भवा-
     त्क्षणायुषां भारतभूजयो वरम् ।
क्षणेन मर्त्येन कृतं मनस्विनः
     संन्यस्य संयान्त्यभयं पदं हरेः ॥ २४ ॥
न यत्र वैकुण्ठकथासुधापगा
     न साधवो भागवतास्तदाश्रयाः ।
न यत्र यज्ञेशमखा महोत्सवाः
     सुरेशलोकोऽपि न वै स सेव्यताम् ॥ २५ ॥
प्राप्ता नृजातिं त्विह ये च जन्तवो
     ज्ञानक्रियाद्रव्यकलापसम्भृताम् ।
न वै यतेरन्न पुनर्भवाय ते
     भूयो वनौका इव यान्ति बन्धनम् ॥ २६ ॥
यैः श्रद्धया बर्हिषि भागशो हवि-
     र्निरुप्तमिष्टं विधिमन्त्रवस्तुतः ।
एकः पृथङ्नामभिराहुतो मुदा
     गृह्णाति पूर्णः स्वयमाशिषां प्रभुः ॥ २७ ॥
सत्यं दिशत्यर्थितमर्थितो नृणां
     नैवार्थदो यत्पुनरर्थिता यतः ।
स्वयं विधत्ते भजतामनिच्छता-
     मिच्छापिधानं निजपादपल्लवम् ॥ २८ ॥
(यद्यत्र नः स्वर्गसुखावशेषितं
     स्विष्टस्य पूर्तस्य कृतस्य शोभनम् ।
तेनाब्जनाभे स्मृतिमज्जन्म नः स्या-
     द्वर्षे हरिर्भजतां शं तनोति ॥)
श्रीनारायण उवाच
एवं स्वर्गगता देवाः सिद्धाश्च परमर्षयः ।
प्रवदन्ति च माहात्म्यं भारतस्य सुशोभनम् ॥ २९ ॥
जम्बुद्वीपस्य चाष्टौ हि उपद्वीपाः स्मृताः परे ।
हयमार्गान्विशोधद्‌भिः सागरैः परिकल्पिताः ॥ ३० ॥
स्वर्णप्रस्थश्चन्द्रशुक्र आवर्तनरमाणकौ ।
मन्दरोपाख्यहरिणः पाञ्चजन्यस्तथैव च ॥ ३१ ॥
सिंहलश्चैव लङ्केति उपद्वीपाष्टकं स्मृतम् ।
जम्बुद्वीपस्य मानं हि कीर्तितं विस्तरेण च ॥ ३२ ॥
अतः परं प्रवक्ष्यामि प्लक्षादिद्वीपषट्ककम् ॥ ३३ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
भुवनकोशवर्णने भारतवर्षवर्णनं नामैकादशोऽध्यायः ॥ ११ ॥


भारतवर्ष का श्रेष्ठ आहे ? -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्री नारायण मुनी म्हणाले, "हे सर्वात प्रथम जन्मास आलेल्या नारदमुने, या भारत नावाच्या वर्षामध्ये मी पुरुष रूपाने रहातो आणि तूच माझे अहोरात्र पुढीलप्रमाणे स्तवन करीत असतोस. तू माझी आराधना करताना म्हणतोस, "हे देवा, ज्याचे शील हे प्रत्यक्ष शांतच आहे अशा त्या भगवंताला माझा नमस्कार असो. तू निरहंकार आहेस. अकिंचनत्व हीच तुझी संपत्ती आहे. सर्व ऋषी श्रेष्ठांमध्ये सर्व श्रेष्ठ असा नारायणमुनी तो तूच आहेस. हे प्रभो, तू परमहंस व परम गुरू आहेस. सर्व आत्मज्ञानी पुरुषांचा तू स्वामी आहेस. म्हणून अशा तुझ्यासारख्या श्रेष्ठ ईश्वराला मी नमस्कार करतो, तुला मी पुनः पुन्हा वंदन करतो.

हे विभो, तूच या सृष्टीचा कर्ता आहेस. पण तू सृष्टी व लय यांच्या ठिकाणी अहंकार बाळगत नाहीस त्यामुळे त्या भावनेने तू बद्ध होत नाहीस. देहाला अनेक विकार होत असतात पण तू देहात राहूनही तुला विकारादि पीडा संभवत नाहीत. गुणांच्या सहवासानेही तुझी साक्षीभूत असलेली दृष्टी दूषित होत नाही.

सारांश, कोठेही आसक्त न होणार्‍या व सर्वांहून पृथक अशा साक्षीला माझा नमस्कार असो.

हे मायाघटनेच्या ईश्वरा, दुष्ट कलेवरावरील अभिमान सोडून अंतःकाली निर्गुण अशा तुझे ठिकाणी भक्तीने मन निश्चल करणे हेच योगाचे कौशल्य आहे. असे भगवान हिरण्यगर्भाने सांगितले आहे. ऐहिक व पारलौकिक वासना, कामनांनी लिप्त झालेला पुरुष पुत्र, स्त्री, द्रव्य याविषयी चिंतन करीत हे दुष्ट शरीर टाकण्यास जास्त भितो, तसाच विद्वान असूनही तो मृत्यूला भितो. त्याचा योग म्हणजे केवळ श्रमच होय. म्हणून हे प्रभो, हे अधोक्षजा, या वाईट शरीरावर तुझ्या मायेमुळे जडलेल्या व दुर्भेद्य अशा अहंकार प्रियतेला ज्या कारणे करून आम्ही सत्वर नाहीशी करून टाकू शकू अशाप्रकारे तू आमचा स्वभाव योग सिद्ध कर व त्याठिकाणी दृढ कर."

अशाप्रमाणे मुनीश्रेष्ठ नारद म्हणजे प्रत्यक्ष तूच, त्या महानंद स्वरूप नारायण देवाची म्हणजे साक्षात माझीच सेवा करतोस. नारदमुनी हा सर्व अनुभवांचे सार जाणत असल्यामुळे या भारत वर्षात ज्या नद्या व पर्वत सांप्रत दृष्टीस पडतात त्यांचे आता मी वर्णन करतो. तू आता सावधान अंतःकरण करून ते ऐक.

मलय, मंगल, प्रस्थ, मैनाक, चित्रकूट, ऋषभ, कूटक, कोल्ल, सह्य, देवगिरी त्याचप्रमाणे ऋष्यमूक, श्रीशैल, व्यंकटाद्री, महेंद्र, वारिधर, विंध्य, मुक्तिमान व ऋक्षपर्वत हे पर्वत असून शिवाय आणखी पर्वत आहेतच. पारियात्र द्रोण, चित्रकुटपर्वत, गोवर्धन, रैवतक, कुंकुभ, नीलपर्वत, गौरमुख, इंद्रकिलपर्वत, त्याचप्रमाणे कामगिरी हेही श्रेष्ठ पर्वत भारतवर्षात आहेत. या पर्वतांबरोबर आणखीही असंख्य पर्वत असून ते सर्व अत्यंत पुण्यफल देणारे आहेत.

या पर्वतांपासून हजारो नद्या उत्पन्न झाला आहेत. तसेच शेकडो प्रचंड नदही उगम पावले आहेत. त्या नद्यातील उदक केवळ प्राशन केले, अथवा स्नान करून त्यात एखादी बुडी जरी मारली किंवा त्या पवित्र नद्यांचे फक्त दर्शन जरी घेतले, त्या नद्यांच्या गुणसामर्थ्याचे साधे वर्णन जरी केले तरीसुद्धा सर्व प्राण्यांची कायेने, वाचेने, मनाने घडलेली सर्व पापे सत्वर नाहीशी होतात. कारण त्या सर्व नद्या पुण्यशील आहेत.

ताम्रवर्णी, चंद्रवशा, कृतमाला, वरोदका, वैहापसी, कावेरी, वेणा, पयस्विनी, तुंगभद्रा, कृष्णवेणा, शर्करवर्तका, गोदावरी, भीमरथी, निर्विघ्ना, पयोष्णिका, तापी, रेवा, सुरसा, नर्मदा, सरस्वती या नद्या व चर्मण्वती, सिंधु, अंध व शोण हे महानद आहेत.

ऋषिकुल्या, अत्रिसामा, वेदस्मृती, महानदी, कौशिकी, यमुना, मंदाकिनी, दृषद्वती, गोमती, सरयू रोधवती, सप्तवती, सुषोमा, शतद्रू, चंद्रभागा मरूद्‌वृधा, विस्तव्य, असिंकी व विश्वा याही नद्या प्रसिद्ध आहेत. या भारतवर्षांत ज्याचा जन्म झाला आहे असे सर्व पुरुष त्यांच्या सात्त्विक, राजस, तामस कर्माच्या योगाने स्वर्गातील मनुष्यलोकातील व नरकातील नानाप्रकारचे इष्ट-अनिष्ट भोग भोगतात. ज्या वर्णाचे जे विधान कर्म आहे त्याचे त्याने विधीयुक्त अनुष्ठान केले तर त्या ठिकाणी रहाणार्‍या सर्व लोकांना खात्रीपूर्वक मोक्ष मिळतो. त्याचप्रमाणे सुकर्मामुळे कार्यसिद्धीही होते. म्हणून ह्या भारतवर्षाला फार प्राधान्य असून ते फार प्रसिद्ध आहे असे स्वर्गातील वेदशास्त्रीही म्हणत असतात.

ज्यांना भारतवर्षात जन्म घेण्याचे भाग्य लाभून मुकुंदाची सेवा करण्यात त्यांनी जर आपल्या जन्माचा उपयोग केला तर त्यांना अत्यंतच पुण्य प्राप्त होते. त्याची गणती करता येणार नाही, त्यांना हा भगवान प्रसन्न होतो. आम्हालासुद्धा येथे जन्म घेण्याची इच्छा आहे. येथे निरनिराळे कठिण ऋतु करण्यास योग्य आहेत. तपे, व्रते, दाने इत्यादींच्या योगाने तो क्षुल्लक स्वर्ग मिळवून खरोखरच काय बरे उपयोग आहे ? कारण त्या ठिकाणी भगवान नारायणाच्या पदकमलाची स्तुती करण्यास वाव नाही. पण आमची बुद्धीच विषयाच्या उत्कट आसक्तीमुळे नष्ट झाली आहे. ज्यांना एक कल्पपर्यंत आयुष्य आहे, अशा लोकांचे नाश पावणारे स्थान प्राप्त करून घेण्यापेक्षा थोडे आयुष्य जगायला मिळणारे भारतवर्ष केव्हाही चांगलेच.

कारण क्षणभर टिकणारे का होईना, पण ह्या मर्त्य देहाने केलेले कृत्य, विवेके करून केल्यास व ते कर्म ईश्वरास अर्पण केल्यास, ते मानव कसलेही भय नसलेल्या हरीच्या स्थानाप्रत पोहोचतात.

खरोखर त्या इंद्रलोकात जाणेही बरे नव्हे. त्याचा स्वीकारही करू नये. कारण ज्या ठिकाणी हरीच्या कथामृतरूपी नद्या नित्य वहात नाहीत, जेथे महान भगवद्‌भक्त साधू नसतात, त्या भगवंताचे जेथे भोक्ते नाहीत, ज्या ठिकाणी महोत्सवी यज्ञ पुरुष नाहीत, त्या इंद्रलोकाचा स्वीकार करण्यात काय अर्थ आहे ?

ज्या प्राण्यांना इहलोकी ज्ञान, क्रिया व द्रव्ये यामुळे परिपूर्ण अशी मानवी प्रकृती मिळाली आहे, त्यांनी जर मोक्षाकरता प्रयत्न न केला तर ते पक्ष्यांप्रमाणे पुन्हा पुन्हा जाळ्यातच अडकतात. जे श्रद्धेने अग्नीमध्ये अग्नी, इंद्र, वरुण इत्यादि विभागपूर्वक व विधिमंत्रयुक्त इष्ट देवतेला उद्देशून हवि देतात, त्यांच्या त्या हवीचे निरनिराळ्या नावांनी बोलविलेला एका आशिर्वादांचा प्रभू व स्वपूर्ण असा ईश्वरच आनंदाने ग्रहण करतो. मनुष्यांनी त्यांची प्रार्थना केली असता तो कामना पूर्ण करतो. हे खरे, पण ते पुन्हापुन्हा प्रार्थना करतात म्हणून तो प्रभू त्यांना परमार्थ देत नाही. जे निरिच्छपणे त्या भगवंताची सेवा करतात त्यांना तो सर्व इच्छांचे दमन करणारे जे त्याचे पदकमल ते स्वतःच त्यांना प्राप्त करून देतो. त्यासाठी देवाजवळ निराळी मागणी करावी लागत नाही. जर आमच्या या स्वर्गीय मुखातून काही इष्ट, पूर्ण, पुण्यकृत्य राहिले असेल तर त्याच्या योगाने जेथे परमेश्वराचे ठिकाणी आमची स्मृती राहील अशा या भारतवर्षात आमचा जन्म व्हावा व हरीची भक्ती घडावी म्हणजे तोच आमचे कल्याण करील."

नारायणमुनी म्हणतात, "हे नारदा, हे महर्षे, ह्याप्रमाणे स्वर्गलोकी असलेल्या देवांनी, सिद्धांनी आणि महर्षीनीही असेच सांगून ठेवले आहे म्हणून भारतवर्षाचे महात्म्य फार मोठे आहे.

हे नारदा, जंबूद्वीपाची आणखी वेगळी अशी आठ उपद्वीपे आहेत असे सांगून ठेवले आहे. इंद्राने नेलेल्या घोडयाचा शोध करणार्‍या सागरपुत्रांनी ती निर्माण केली आहेत. त्यांची आठ नावे तुला आता सांगतो. तू सावध चित्ताने श्रवण कर.

स्वर्णप्रस्थ, चंद्र, शुक्र, आवर्त, नरमाषक, मंदरोपाख्य, हरिण तसेच पाचजन्य, सिंहलद्वीप, लंका अशी ही आठ उपद्वीपे अनुक्रमाने या नावांची प्रसिद्ध आहेत. जंबूद्वीपाचे क्षेत्रफळाचे प्रमाण फारच विशाल असल्याचे शास्त्रात सांगितले आहे. आता हे नारदा, यापुढे तुला प्लक्ष वगैरे सहा द्वीपाबद्दलही सांगतो.


अध्याय अकरावा समाप्त

GO TOP