श्रीनारायण उवाच
हिरण्मये नाम वर्षे भगवान्कूर्मरूपधृक् ।
आस्ते योगपतिः सोऽयमर्यम्णा पूज्य ईड्यते ॥ १ ॥
अर्यमोवाच
ॐ नमो भगवते अकूपाराय सर्वसत्त्वगुण-
विशेषणाय नोपलक्षितस्थानाय नमो वर्ष्मणे
नमो भूम्ने नमोऽवस्थानाय नमस्ते ।
यद्रूपमेतन्निजमाययार्पित-
मर्थस्वरूपं बहुरूपरूपितम् ।
संख्या न यस्यास्त्ययथोपलम्भना-
त्तस्मै नमस्तेऽव्यपदेशरूपिणे ॥ २ ॥
जरायुजं स्वेदजमण्डजोद्भिदं
चराचरं देवर्षिपितृभूतमैन्द्रियम् ।
द्यौः खं क्षितिः शैलसरित्समुद्रं
द्वीपग्रहर्क्षेत्यभिधेय एकः ॥ ३ ॥
यस्मिन्नसंख्येयविशेषनाम-
रूपाकृतौ कविभिः कल्पितेयम् ।
संख्या यया तत्त्वदृशापनीयते
तस्मै नमः सांख्यनिदर्शनाय ते ॥ ४ ॥
एवं स्तुवति देवेशमर्यमा सह वर्षपैः ।
गीयते चापि भजते सर्वभूतभवं प्रभुम् ॥ ५ ॥
तथोत्तरेषु कुरुषु भगवान्यज्ञपूरुषः ।
आदिवाराहरूपोऽसौ धरण्या पूज्यते सदा ॥ ६ ॥
सम्पूज्य विधिवद्देवं तद्भक्त्यार्द्रार्द्रहृत्कजा ।
भूमिः स्तौति हरिं यज्ञवाराहं दैत्यमर्दनम् ॥ ७ ॥
भूरुवाच
ॐ नमो भगवते मन्त्रतत्त्वलिङ्गाय यज्ञक्रतवे
महाध्वरावयवाय महावराहाय नमः कर्मशुक्लाय
त्रियुगाय नमस्ते ॥ ८ ॥
यस्य स्वरूपं कवयो विपश्चितो
गुणेषु दारुष्विव जातवेदसम् ।
मथ्नन्ति मथ्ना मनसा दिदृक्षवो
गूढं क्रियार्थैर्नम ईरितात्मने ॥ ९ ॥
द्रव्यक्रियाहेत्वयनेशकर्तृभि-
र्मायागुणैर्वस्तुभिरीक्षितात्मने ।
अन्वीक्षयाङ्गातिशयात्मबुद्धिभि-
र्निरस्तमायाकृतये नमोऽस्तु ते ॥ १० ॥
करोति विश्वस्थितिसंयमोदयं
यस्येप्सितं नेप्सितुमीक्षितुर्गुणैः ।
माया यथाऽयो भ्रमते तदाश्रयं
ग्राव्णो नमस्ते गुणकर्मसाक्षिणे ॥ ११ ॥
प्रमथ्य दैत्यं प्रतिवारणं मृधे
यो मां रसाया जगदादिसूकरः ।
कृत्वाग्रदंष्ट्रं निरगादुदन्वतः
क्रीडन्निवेभः प्रणतास्मि तं विभुम् ॥ १२ ॥
किम्पुरुषे वर्षेऽस्मिन्भगवन्तं दाशरथिं च सर्वेशम् ।
सीतारामं देवं श्रीहनुमानादिपूरुषं स्तौति ॥ १३ ॥
ॐ नमो भगवते उत्तमश्लोकाय नम इति ।
आर्यलक्षणशीलव्रताय नम उपशिक्षितात्मने
उपासितलोकाय नमः । साधुवादनिकषणाय नमो
ब्रह्मण्यदेवाय महापुरुषाय महाभागाय नम इति ।
यत्तद्विशुद्धानुभवात्ममेकं
स्वतेजसा ध्वस्तगुणव्यवस्थम् ।
प्रत्यक् प्रशान्तं सुधियोपलम्भनं
ह्यनामरूपं निरहं प्रपद्ये ॥ १४ ॥
मर्त्यावतारस्त्विह मर्त्यशिक्षणं
रक्षोवधायैव न केवलं विभो ।
कुतोऽन्यथा स्याद्ऽऽरमतः स्व आत्मनः
सीताकृतानि व्यसनानीश्वरस्य ॥ १५ ॥
न वै स आत्माऽऽत्मवतां सुहृत्तमः
सक्तस्त्रिलोक्यां भगवान्वासुदेवः ।
न स्त्रीकृतं कश्मलमश्नुवीत
न लक्षणं चापि विहातुमर्हति ॥ १६ ॥
न जन्म नूनं महतो न सौभगं
न वाङ् न बुद्धिर्नाकृतिस्तोषहेतुः ।
तैर्यद्विसृष्टानपि नो वनौकस-
श्चकार सख्ये बत लक्ष्मणाग्रजः ॥ १७ ॥
सुरोऽसुरो वाप्यथवा नरोऽनरः
सर्वात्मना यः सुकृतज्ञमुत्तमम् ।
भजेत रामं मनुजाकृतिं हरिं
य उत्तराननयत्कोसलान् दिवम् ॥ १८ ॥
श्रीनारायण उवाच
एवं किम्पुरुषे वर्षे सत्यसन्धं दृढव्रतम् ।
रामं राजीवपत्राक्षं हनुमान् वानरोत्तमः ॥ १९ ॥
स्तौति गायति भक्त्या च संपूजयति सर्वशः ।
य एतच्छृणुयाच्चित्रं रामचन्द्रकथानकम् ।
सर्वपापविशुद्धात्मा याति रामसलोकताम् ॥ २० ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
भुवनकोशवर्णने हिरण्मयकिम्पुरुषवर्षवर्णनं नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥
वर्षगत ईश्वर वर्णन -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
हिरण्मय नावाच्या वर्षात भगवंताच्या कूर्म रूपधारी मूर्तीची पूजा करतात. तो योगांचा अधिपती आहे. हिरण्मय वर्षाचा राजा आर्यमा असून तो पितृगणांचा अधिपती आहे. तो या परमपूज्य ईश्वराची सेवा करीत असतो. राजा आर्यमा म्हणतो,
"भगवान कूर्माला माझा नमस्कार असो. संपूर्णपणे सत्त्वगुणच भगवान कूर्माचे ठिकाणी आहे. पण तरीही त्याचे मूळ स्थान कोणते याचे आकलन होत नाही. तसेच त्याचा काल वगैरे याची गणना करता येत नाही. तो सर्वगत असून सर्वांचा आधार आहे. म्हणून अशा या देवाला माझा नमस्कार असो.
त्याचे हे पृथिव्यादि स्वरूप त्याच्या मायेमुळेच प्रकट होत असते आणि म्हणून त्याच्या स्वरूपाचे हे दृश्य दिसत आहे. अनेक प्रकारांनी त्याचे स्वरूप वर्णन केलेले आहे. पण ते सर्व स्वरूप प्रकार केवळ भ्रमामुळेच भासतात. त्यामुळे त्याची संख्याच करता येत नाही. सारांश, अनिर्वचनीय अशा स्वरूपाचा जो ईश्वर त्याला नमस्कार असो. मनुष्य वगैरे जरायुज, उवा, लिखा, ढेकूण यासारखे प्राणी स्वेदज, तसेच पक्षी, सर्प, प्राणी अंडज, वृक्षवेलीं उदभिज असे हे चराचर विश्व, देव, ऋषी, पितर, भूते, इंद्रियगोचर होणारे विषयजात, द्युलोक, आकाश, पृथ्वी, पर्वत, नदी, समुद्र, द्वीप, ग्रह, नक्षत्रे इत्यादि सर्व नावाचा वाचक तो एक परमात्माच होय. कारण ही सर्व त्याचीच नावे आहेत.
हे ईश्वरा, वास्तविक पहाता तुझ्या नावाचे, तुझ्या स्वरूपाचे व तुझ्या आकारांचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. पण कपिलमुनींसारख्या पंडितांनी ती संख्या चोवीसपर्यंतच कल्पिली आहे. त्यावरून एकूण चोवीस सत्त्वे आहेत असे त्यांचे मत आहे. पण तत्त्वज्ञानी पुरुष मात्र तात्त्विक दृष्टीकोनातूनच या मनाचा विचार करतो व तू तत्त्वरूप आहेस असे मानतो. त्या तुझ्या तत्त्वदृष्टीरूपाला माझा नमस्कार असो.
अशारीतीने सर्व वर्षपालांसह आर्यमा त्या देवाधिदेव कुर्माची भक्ती करीत असतो. तो त्याचेच पराक्रम गात असतो व वर्णन करीत असतो. तीच सर्व भूतांचे कारण आहे असे मानून तो त्याची स्तुती करीत असतो.
या नंतरच्या उत्तर कुरू नावाच्या वर्षामध्ये पृथ्वीचा उद्धार करणार्या वराहाचे रूप धारण करणार्या भगवंताच्या मूर्तीची पूजा करतात. त्याच यज्ञपुरुषाचे यजन करतात. देवाची शास्त्रोक्तविधीने पूजाअर्चा करून जिचे हृदय भक्तीमुळे आर्द्र झाले आहे, अशी ती भूमीदेवी दैत्याचे मर्दन करणार्या त्या वराहरूप यज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ईश्वराची भक्ती करते. ती देवाची स्तुती करताना म्हणते, "फक्त मंत्रोच्चाराने ज्याचे सर्व लक्षण बरोबर समजते त्या भगवानाला माझा नमस्कार असो. देवा, यूपरहित यज्ञ व यूपरहित ऋतू हेच तुझे स्वरूप आहे. मोठमोठे यज्ञ हे तुझेच अवयव आहेत. तू प्रचंड वराहरूप असून तुझे कर्म अत्यंत शुद्ध आहे. तीन युगे लोटली तरी तुझे हेच स्वरूप कायम आहे. म्हणून अशा बलवान तुला माझा नमस्कार असो.
काष्ठापासून मंथन करून ज्याप्रमाणे अग्नि प्रज्वलित करतात, तसे विद्वान व विवेकी पुरुष आपल्या मनाचे देह-इंद्रियातील गुणांचे मंथन करून त्यातून त्या देवाधिदेव भगवंताचे स्वरूप काढतात. जो कर्मे, त्या कर्मांची फले यांच्यामुळे गूढतर रहातो व मुमुक्षू ज्याला जाणून घेण्याची इच्छा करतात त्या सृष्टीरूपाने व्यक्त होणार्या ईश्वराला माझा नमस्कार असो. विषय, इंद्रियांचा व्यापार, देवता, देह, काल व अहंकार या मायेच्या गुणांनी यथार्थपणे ज्ञात झालेला जो आत्मा त्याला वंदन असो.
विचार, आचार, यमनियम, निश्चयरूप बुद्धी ही साधने ज्यांना प्राप्त झाली आहेत ते तुझ्या मायामय आकृतीचा निरास करीत असतात. म्हणून अशा तुला मी प्रणाम करते.
तूच तो सर्वसाक्षी ईश्वर असून त्या तुझी सर्व इच्छा जीवांच्या कल्याणा करताच असते. तू स्वतः निष्काम असून त्यामुळे तुला इच्छा नसतातच, पण जसे लोहचुंबकाच्या आकर्षण रेषेत आलेल्या लोखंडात जशी चलन शक्ती निर्माण होते, त्याचप्रमाणे तुझी माया तुझ्यापासून त्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करते. तूच गुणकर्मांचा साक्षी आहेस, अशा तुला नमस्कार असो. हे देवा, तू हत्तीप्रमाणे मत्त झालेल्या दैत्याचा युद्धात वध केलास आणि आदिसूकराचे रूप घेऊन तू रसातळात आलास. तेथून सहज लीलया मला दाढेत धरून अगदी सत्वर हत्तीप्रमाणे तू समुद्रातून वर काढलेस. त्या तुझ्यासारख्या प्रभूला माझा नित्य नमस्कार असो." अशी भूमीदेवी प्रार्थना करते.
आता या किंपुरुष नावाच्या आणखी एका वर्षात सर्वेश्वर अशा त्या भगवान दाशरथीची म्हणजे आदिपुरुष जो सीताराम देव त्यांची भक्त श्रीहनुमान स्तुती करीत असतो. तोच किंपुरुष वर्षाचा अधिपती होय. रामभक्त हनुमान देवाची प्रार्थना करताना म्हणतो,
"त्या षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा भगवान ईश्वराला माझा नमस्कार असो. ज्याची कीर्ती उत्तम आहे अशा रामचंद्राला मी प्रणाम करीत असतो. ज्याचे ठिकाणी श्रेष्ठ लक्षणे आहेत, त्याचे शील सर्वोत्तम आहे, ज्याचे ठिकाणी व्रते असतात त्या देवाला माझा नमस्कार असो.
ज्याचे अंतःकरण नियमित आहे, ज्याचे अनुकरण सर्व लोक करीत असतात, जो साधुत्वाची साक्षात कसोटी म्हणून प्रसिद्ध आहे, अशा त्या ब्रह्मरूप देवाला, त्या महापुरुषाला, त्या महाभागाला माझा नमस्कार असो. जे विशुद्ध आहे, अनुभवरूप आहे, एकच असून स्वयंप्रकाशाने युक्त असून गुणपूर्ण आहे, जागृती इत्यादी अवस्थांचा निरास करणारे आहे, सर्वांच्या अंतर्यामात वसणारे आहे, अतिशय शांतस्वरूप आहे. केवळ सूक्ष्म बुद्धीलाच पटते, नाम व रूप याविना आहे, तेच निरहंकार असे जे आत्मरूप याचा मी सर्वदा आश्रय करतो.
हे भगवान, तू ज्या मनुष्याचा अवतार घेतलास, तो फक्त राक्षस वधाकरता घेतला नसून येथील स्वतःच्या कृतीने मर्त्य असलेल्या जीवांना उपदेश करण्यासाठी. तसे जर नसते तर आत्म्याशी क्रीडा करण्यासाठी व्यग्र असलेल्या प्रभूला सीतेमुळे प्राप्त झालेली संकटे का बरे भोगावी लागली असती ?
आत्मज्ञानी लोकांना नेहमी प्रिय वाटणारा तो भगवान, जो वासुदेव या नावाने प्रसिद्ध असलेला तो या त्रैलोक्यात कोठेही आसक्त होणारा नाही. म्हणून तर त्याला स्त्रीकरता दुःख भोगावे लागले हे विशेष नाही का ? त्याचप्रमाणे ज्यांना मरण आहे अशाकरता जर त्याने अवतार घेतला नसता तर लक्ष्मणाचा त्याग करणे त्याला खचितच योग्य झाले नसते. मोठयांपासून उत्पत्ती, सौंदर्य, वाणी, बुद्धी, आकृती इत्यादी काही एक त्याच्या संतोषाला कारण होत नाही हे तर निश्चितच आहे.
खरोखरच आमचा जन्म अशा उत्तम कुलात न झाल्याने आम्ही जणू काय अरण्यवासी पशूच आहोत व पूर्वोक्त गुणहिनही आहोत. अशा आम्हा अरण्यवासातील पशूंबरोबर त्या लक्ष्मणाच्या वडील भावाने परम सख्य केले. हा आमचा गौरवच आहे. म्हणून देव, अदेव, मनुष्य, अमनुष्य ह्यापैकी सर्वच जण एक आत्माच आहे, अशा भावनेने त्या थोडयाशा भक्तीलाही जास्त मानणार्या सर्वोत्तम रामाला नित्य पूजावे.
तो मानव देहधारी असला तरी साक्षात हरीच आहे. उत्तर कोसल या नावाच्या प्रांतात रहाणार्यांना त्या प्रभू रामचंद्राने स्वर्गास नेले."
नारायण म्हणतात, "हे नारदा, अशाप्रकारे किंपुरुष वर्षामध्ये सत्याची प्रतिज्ञा घेतलेला आणि व्रतवैकल्यात अत्यंत दृढ असलेला असा जो, त्या कमलपत्राप्रमाणे नेत्र असलेल्या प्रभू रामचंद्राची तो वानरांचा प्रमुख व वानरात उत्तम असा हनुमान नित्य परमभावनेने स्तुती करीत असतो.