हिमालय उवाच
देवदेवि महेशानि करुणासागरेऽम्बिके ।
ब्रूहि पूजाविधिं सम्यग्यथावदधुना निजम् ॥ १ ॥
श्रीदेव्युवाच
वक्ष्ये पूजाविधिं राजन्नम्बिकाया यथा प्रियम् ।
अत्यन्तश्रद्धया सार्धं शृणु पर्वतपुङ्गव ॥ २ ॥
द्विविधा मम पूजा स्याद् बाह्या चाभ्यन्तरापि च ।
बाह्यापि द्विविधा प्रोक्ता वैदिकी तान्त्रिकी तथा ॥ ३ ॥
वैदिक्यर्चापि द्विविधा मूर्तिभेदेन भूधर ।
वैदिकी वैदिकैः कार्या वेददीक्षासमन्वितैः ॥ ४ ॥
तन्त्रोक्तदीक्षावद्भिस्तु तान्त्रिकी संश्रिता भवेत् ।
इत्थं पूजारहस्यं च न ज्ञात्वा विपरीतकम् ॥ ५ ॥
करोति यो नरो मूढः स पतत्येव सर्वथा ।
तत्र या वैदिकी प्रोक्ता प्रथमा तां वदाम्यहम् ॥ ६ ॥
यन्मे साक्षात्परं रूपं दृष्ट्वानसि भूधर ।
अनन्तशीर्षनयनमनन्तचरणं महत् ॥ ७ ॥
सर्वशक्तिसमायुक्तं प्रेरकं यत्परात्परम् ।
तदेव पूजयेन्नित्यं नमेद् ध्यायेत्स्मरेदपि ॥ ८ ॥
इत्येतत्प्रथमार्चायाः स्वरूपं कथितं नग ।
शान्तः समाहितमना दम्भाहङ्कारवर्जितः ॥ ९ ॥
तत्परो भव तद्याजी तदेव शरणं व्रज ।
तदेव चेतसा पश्य जप ध्यायस्व सर्वदा ॥ १० ॥
अनन्यया प्रेमयुक्तभक्त्या मद्भावमाश्रितः ।
यज्ञैर्यज तपोदानैर्मामेव परितोषय ॥ ११ ॥
इत्थं ममानुग्रहतो मोक्ष्यसे भवबन्धनात् ।
मत्परा ये मदासक्तचित्ता भक्तवरा मताः ॥ १२ ॥
प्रतिजाने भवादस्मादुद्धराम्यचिरेण तु ।
ध्यानेन कर्मयुक्तेन भक्तिज्ञानेन वा पुनः ॥ १३ ॥
प्राप्याहं सर्वथा राजन्न तु केवलकर्मभिः ।
धर्मात्सञ्जायते भक्तिर्भक्त्या सञ्जायते परम् ॥ १४ ॥
श्रुतिस्मृतिभ्यामुदितं यत्स धर्मः प्रकीर्तितः ।
अन्यशास्त्रेण यः प्रोक्तो धर्माभासः स उच्यते ॥ १५ ॥
सर्वज्ञात्सर्वशक्तेश्च मत्तो वेदः समुत्थितः ।
अज्ञानस्य ममाभावादप्रमाणा न च श्रुतिः ॥ १६ ॥
स्मृतयश्च श्रुतेरर्थं गृहीत्वैव च निर्गताः ।
मन्वादीनां श्रुतीनां च ततः प्रामाण्यमिष्यते ॥ १७ ॥
क्वचित्कदाचित्तन्त्रार्थकटाक्षेण परोदितम् ।
धर्मं वदन्ति सोंऽशस्तु नैव ग्राह्योऽस्ति वैदिकैः ॥ १८ ॥
अन्येषां शास्त्रकर्तॄणामज्ञानप्रभवत्वतः ।
अज्ञानदोषदुष्टत्वात्तदुक्तेर्न प्रमाणता ॥ १९ ॥
तस्मान्मुमुक्षुर्धर्मार्थं सर्वथा वेदमाश्रयेत् ।
राजाज्ञा च यथा लोके हन्यते न कदाचन ॥ २० ॥
सर्वेशान्या ममाज्ञा सा श्रुतिस्त्याज्या कथं नृभिः ।
मदाज्ञारक्षणार्थं तु ब्रह्मक्षत्रियजातयः ॥ २१ ॥
मया सृष्टास्ततो ज्ञेयं रहस्यं मे श्रुतेर्वचः ।
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भूधर ॥ २२ ॥
अभ्युत्थानमधर्मस्य तदा वेषान्बिभर्म्यहम् ।
देवदैत्यविभागश्चाप्यत एवाभवन्नृप ॥ २३ ॥
ये न कुर्वन्ति तद्धर्मं तच्छिक्षार्थं मया सदा ।
सम्पादितास्तु नरकास्त्रासो यच्छ्रवणाद्भवेत् ॥ २४ ॥
यो वेदधर्ममुज्झित्य धर्ममन्यं समाश्रयेत् ।
राजा प्रवासयेद्देशान्निजादेतानधर्मिणः ॥ २५ ॥
ब्राह्मणैर्न च सम्भाष्याः पङ्क्तिग्राह्या न च द्विजैः ।
अन्यानि यानि शास्त्राणि लोकेऽस्मिन्विविधानि च ॥ २६ ॥
श्रुतिस्मृतिविरुद्धानि तामसान्येव सर्वशः ।
वामं कापालकं चैव कौलकं भैरवागमः ॥ २७ ॥
शिवेन मोहनार्थाय प्रणीतो नान्यहेतुकः ।
दक्षशापाद् भृगोः शापाद्दधीचस्य च शापतः ॥ २८ ॥
दग्धा ये ब्राह्मणवरा वेदमार्गबहिष्कृताः ।
तेषामुद्धरणार्थाय सोपानक्रमतः सदा ॥ २९ ॥
शैवाश्च वैष्णवाश्श्चैव सौराः शाक्तास्तथैव च ।
गाणपत्या आगमाश्च प्रणीताः शङ्करेण तु ॥ ३० ॥
तत्र वेदाविरुद्धांशोऽप्युक्त एव क्वचित्क्वचित् ।
वैदिकैस्तद्ग्रहे देषो न भवत्येव कर्हिचित् ॥ ३१ ॥
सर्वथा वेदभिन्नार्थे नाधिकारी द्विजो भवेत् ।
वेदाधिकारहीनस्तु भवेत्तत्राधिकारवान् ॥ ३२ ॥
तस्मात्सर्वप्रयत्नेन वैदिको वेदमाश्रयेत् ।
धर्मेण सहितं ज्ञानं परं ब्रह्म प्रकाशयेत् ॥ ३३ ॥
सर्वैषणाः परित्यज्य मामेव शरणं गताः ।
सर्वभूतदयावन्तो मानाहङ्कारवर्जिताः ॥ ३४ ॥
मच्चित्ता मद्गतप्राणा मत्स्थानकथने रताः ।
संन्यासिनो वनस्थाश्च गृहस्था ब्रह्मचारिणः ॥ ३५ ॥
उपासन्ते सदा भक्त्या योगमैश्वरसञ्ज्ञितम् ।
तेषां नित्याभियुक्तानामहमज्ञानजं तमः ॥ ३६ ॥
ज्ञानसूर्यप्रकाशेन नाशयामि न संशयः ।
इत्थं वैदिकपूजायाः प्रथमाया नगाधिप ॥ ३७ ॥
स्वरूपमुक्तं संक्षेपाद् द्वितीयाया अथो ब्रुवे ।
मूर्तौ वा स्थण्डिले वापि तथा सूर्येन्दुमण्डले ॥ ३८ ॥
जलेऽथवा बाणलिङ्गे यन्त्रे वापि महापटे ।
तथा श्रीहृदयाम्भोजे ध्यात्वा देवीं परात्पराम् ॥ ३९ ॥
सगुणां करुणापूर्णां तरुणीमरुणारुणाम् ।
सौन्दर्यसारसीमां तां सर्वावयवसुन्दरीम् ॥ ४० ॥
शृङ्गाररससम्पूर्णां सदा भक्तार्तिकातराम् ।
प्रसादसुमुखीमम्बां चन्द्रखण्डशिखण्डिनीम् ॥ ४१ ॥
पाशाङ्कुशवराभीतिधरामानन्दरूपिणीम् ।
पूजयेदुपचारैश्च यथावित्तानुसारतः ॥ ४२ ॥
यावदान्तरपूजायामधिकारो भवेन्न हि ।
तावद्बाह्यामिमां पूजां श्रयेज्जाते तु तां त्यजेत् ॥ ४३ ॥
आभ्यन्तरा तु या पूजा सा तु संविल्लयः स्मृतः ।
संविदेव परं रूपमुपाधिरहितं मम ॥ ४४ ॥
अतः संविदि मद्रूपे चेतः स्थाप्यं निराश्रयम् ।
संविद्रूपातिरिक्तं तु मिथ्या मायामयं जगत् ॥ ४५ ॥
अतः संसारनाशाय साक्षिणीमात्मरूपिणीम् ।
भावयेन्निर्मनस्केन योगयुक्तेन चेतसा ॥ ४६ ॥
अतः परं बाह्यपूजाविस्तारः कथ्यते मया ।
सावधानेन मनसा शृणु पर्वतसत्तम ॥ ४७ ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां सप्तमस्कन्धे
देवीगीतायां श्रीदेव्याः पूजाविधिवर्णनं नामैकोनचत्वारिंशोऽध्यायः ॥ ३९ ॥
अध्याय एकोणचाळिसावा समाप्त
(देवीगीता अध्याय ८ वा) भगवतीच्या बाह्यपूजा व अंतरपूजा यांविषयी माहिती
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
हिमालय म्हणाला, "हे देवाधिदेवी, हे महेश्वरी, हे करुणासागरा, हे अंबिके, आता तुझी पूजा शास्त्रोक्त मार्गाने कशी करावी तो तुझा पूजाविधी मला विस्ताराने कथन कर."
श्रीदेवी आनंदून म्हणाली, "हे पर्वतपुंगवा, माझी पूजा कशी करावी हे मी तुला आता विधियुक्त सांगते. तू ते माझे भाषण लक्ष देऊन श्रवण कर.
हे पर्वतश्रेष्ठा माझी दोन प्रकारची पूजा आहे. एक बाह्यपूजेचा प्रकार आणि दुसरा आंतर पूजेचा प्रकार. बाह्यपूजेतही वैदिकी पूजा आणि तांत्रिकी पूजा अशा दोन पद्धती आहेत. वैदिकीपूजा ही मूर्तिभेदामुळे द्विविध आहे.
हे भूधरा, वेदाची दीक्षा घेतलेल्या पुरुषांनी वैदिकी प्रकारानेच माझी नित्य पूजा करावे व तंत्रोक्त दीक्षा ज्या पुरुषांनी स्वीकारली असेल त्यांनी तांत्रिकी पूजा पद्धतीने माझे भावपूर्ण पूजन करावे. अशाप्रकारच्या दोन्ही पूजांचे आचरण व दोन्ही पूजांचे रहस्य न जाणता जो वर्तन करतो त्याच्या विपरित कृतीमुळे तो सर्व बाजूंनी अधःपतित होतो.
हे भूधरा, आता मी तुला वैदिकी पूजेची पद्धती कशी आहे याची माहिती विस्तारपूर्वक सांगते.
हे पर्वतराजा, माझे अनंत मस्तके, अनंत नेत्र, व अनंत चरण असलेले जे विराट स्वरूप तू पाहिलेस ते मोठे, सर्वशक्तींनी युक्त व परात्पर असे माझे दिव्य स्वरूप तू अवलोकन केलेस त्याच श्रेष्ठ स्वरूपाचे नित्य पूजन करावे. त्याच स्वरूपाचे ध्यान करावे व त्याच विराट स्वरूपाचे सर्वदा स्मरण करावे.
हे पर्वता, हे अशाप्रकारचे माझे स्वरूप प्रथम पूजावे. शांत विक्षेपशून्य मनाने युक्त होऊन, दंभ व अहंकार यांचा त्याग करून तत्परतेने तू त्याच विराट स्वरूपाचे पूजन करणारा हो. त्याच स्वरूपाला तू शरण जा. त्यालाच विशुद्ध अंतःकरणाने पहा व त्याच दिव्य स्वरूपाचा नेहमी जप कर. त्याचेच नित्य ध्यान कर. अनन्य अशा प्रेमयुक्त भक्तीने माझ्याच स्वरूपाच्या भावनेचा तू आश्रय कर व यज्ञासारखे विधी करून माझे यजन कर. तपश्चर्या आणि दान यांच्या योगाने तू मला संतुष्ट कर.
हे पर्वतश्रेष्ठा, ज्यावेळी धर्माला ग्लानी येते, प्रजा अवैदिक झाल्याकारणाने स्वधर्मानुष्ठान करणे जवळजवळ अशक्य होऊन जाते, अधर्म वाढीस लागतो, तेव्हा तेव्हा मी शरीर धारण करते व अधर्माचा नाश करते.
हे शैलराजा, म्हणूनच देव व दैत्य असे दोन विभाग झालेले आहेत. वैदिक धर्माचे अनुष्ठान न करणार्या दैत्यांना शिक्षा करण्यासाठी मी नित्य नरक निर्माण केले आहेत. इतके त्या नरकाचे वर्णन ऐकले तरीही त्यामुळे त्रास होईल ते भयंकर आहेत.
वेदोक्त धर्म सोडून जो अन्य धर्माचे आचरण करील त्या धर्मभेदी पुरुषाला राजाने आपल्या देशातून घालवून द्यावे. ब्राह्मणांनी त्याच्याशी भाषण करू नये. तिन्ही वर्णाच्या लोकांनी त्याला आपल्या पंक्तीस भोजनासाठी घेऊ नये.
या लोकात जी निरनिराळ्या प्रकारची दुसरी शास्त्रे आहेत ती श्रुतिस्मृतींच्या उलट असल्यामुळे संपूर्णपणे तामसी आहे. वाममार्ग, कापालिक शास्त्र, कौलकशास्त्र, भैरवागम इत्यादि शास्त्रे शंकराने प्राण्यांना मोहित करण्यासाठीच निर्माण केली आहेत. त्याच्या निर्मितीमागे दुसरा हेतु नाही.
दक्षाच्या शापाने, भृगुऋषीच्या शापाने व दधीचिऋषीच्या शापाने दग्ध होऊन जे ब्राह्मण श्रेष्ठ वेदमार्गापासून भ्रष्ट झाले त्यांच्या सोपान मार्गाने म्हणजे पायरी पायरीने उद्धार करावा. म्हणूनच त्यासाठी शैव, वैष्णव, सौर, शाक्त व गाणपत्य हे आगम शंकराने मुद्दाम निर्माण केले आहेत.
त्या आगमांमध्ये वेदांना योग्य असाही भाग काही ठिकाणी सांगितलेला आहे. वैदिकांनी त्याचे ग्रहण करावे. कारण तसे करण्यात काहीच दोष नाही.पण वेदांहून ज्या भिन्न गोष्टी आहेत त्यांचे आचरण करण्यास ब्राह्मणास अधिकार नाही असे निश्चितपणे सांगितले असताना जो वेदाच्या उलट गोष्टीचे आचरण नित्य करीत राहतो त्याचा वेदाधिकार नाहीसा होतो. त्याचा वेदाचा व वैदिक कृत्य करण्याचा पूर्व अधिकार नष्ट होतो. म्हणून प्रदीर्घ प्रयत्नाने वैदिक पुरुषाने वेदांचा आश्रय करून आचरण ठेवावे.
धर्मासहवर्तमान असलेले ज्ञानच परब्रह्माचा साक्षात्कार करून देते. पुत्रादि सर्व मनकामनांचा त्याग करून जे मलाच शरण येतात, जे सर्व भूतमात्रांविषयी दया बाळगतात, जे मान व अहंकार टाकून देतात, ज्यांचे अंतःकरण माझ्याच ठिकाणी रत असते, जे आपली इंद्रियादि सर्व कर्मे माझ्याचसाठी करतात, ज्यांच्या प्राणप्रवृत्ती माझ्याच करता असते, जे माझ्याच स्थानांचे वर्णन करण्यात नित्य निमग्न असतात, मग ते संन्यासी असोत, वानप्रस्थाश्रमी असोत, गृहस्थाश्रमाचा स्वीकार केलेले असोत अथवा पूर्ण ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणारे असोत कोणीही असोत, जे नित्य नेमाने व भक्तीयुक्त अंतःकरणाने माझ्या ऐश्वर्याची उपासना करतात, त्या नित्योपासक पुरुषांचा अज्ञानजन्य मोह मी ज्ञान सूर्याच्या प्रकाशाने निःसंशय नाहीसा करून टाकते.
हे पर्वतोत्तमा, ह्याप्रमाणे माझी वैदिक पूजा कशी करावी हे मी तुला यथायोग्य रीतीने निवेदन केले आहे. आता माझ्या पूजेचे दुसरे स्वरूप सांप्रत तुला मी कथन करते.
करचरणयुक्त मूर्तीचे ठिकाणी किंवा स्थंडीलावर अथवा सूर्य-चंद्र मंडलामध्ये वा जल, बाणलिंग, यंत्र, मोठा चित्रपट अथवा हृदयकमल यामध्ये माझे पूजन करावे.
परात्पर, सगुण, करुणपूर्ण, तरुणी, अरुणाप्रमाणे लालभडक, सौंदर्याचे जणू सारच, सर्व अवयव सुंदर असलेल्या, शृंगाररसाने परिपूर्ण, भक्तांच्या दुःखाने नित्य दयार्द्र होणारी, प्रसाद गुणामुळे मनोहर, रमणीय, पाश, अंकुश व वरदमुद्रा ही धारण करणारी, व आनंदरूपिणी अशा देवीचे ध्यान करून आपल्या आर्थिक शक्तीप्रमाणे बाह्योपचार करून माझी नम्र भावाने पूजा करावी.
जोपर्यंत आंतरपूजेचा अधिकार प्राप्त झाला नाही तोपर्यंत अशाप्रकारे नित्यनेमाने ही बाह्यपूजा करावी व नंतर यथावकाश आंतरपूजेचा अधिकार प्राप्त झाल्यावर ह्या बाह्यपूजेचा सत्वर त्याग करावा. "संवित्" मध्ये लय होणे यालाच आंतरपूजा असे म्हणतात असे धर्मतत्परांनी सांगितले आहे.
हे पर्वतश्रेष्ठा, कोणत्याही प्रकारची उपाधी नसलेले असे "संवित्" हेच माझे मूळ खरे स्वरूप आहे. म्हणून मनाला आवर घालून विषयशून्य करावे व माझ्याच रूपात एकात्म रूपाने माझ्यातच विलीन होऊन जावे व माझ्यातच मनाला स्थिर करावे. संविद्रूपात्यतिरिक्त असे जे माझे काही आहे ते सर्व जगत् मिथ्या असून मायाच आहे. म्हणून संसारातून पाशमुक्त होण्यासाठी जी आत्मरूपिणी अशी साक्षी असलेली देवी, तिचे निर्विकल्प मनाने व भक्तीपूर्वक अंतःकरणाने चिंतन करावे.
हे पर्वतोत्तमा, अशाप्रकारे माझे पूजाविधी तुला सांगितले. आता तुला मी बाह्यपूजेची पद्धती विस्तारपूर्वक निवेदन करते. ती तू एकाग्र अंतःकरण ठेवून भक्तीपूर्वक श्रवण कर."