श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
सप्तमः स्कन्धः
अष्टत्रिंशोऽध्यायः


देवीगीतायां महोत्सवव्रतस्थानवर्णनम्

हिमालय उवाच
कति स्थानानि देवेशि द्रष्टव्यानि महीतले ।
मुख्यानि च पवित्राणि देवीप्रियतमानि च ॥ १ ॥
व्रतान्यपि तथा यानि तुष्टिदान्युत्सवा अपि ।
तत्सर्वं वद मे मातः कृतकृत्यो यतो नरः ॥ २ ॥
श्रीदेव्युवाच
सर्वं दृश्यं मम स्थानं सर्वे काला व्रतात्मकाः ।
उत्सवाः सर्वकालेषु यतोऽहं सर्वरूपिणी ॥ ३ ॥
तथापि भक्तवात्सल्यात्किञ्चित्किञ्चिदथोच्यते ।
शृणुष्वावहितो भूत्वा नगराज वचो मम ॥ ४ ॥
कोलापुरं महास्थानं यत्र लक्ष्मीः सदा स्थिता ।
मातुः पुरं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम् ॥ ५ ॥
तुलजापुरं तृतीयं स्यात्सप्तशृङ्गं तथैव च ।
हिङ्गुलाया महास्थानं ज्वालामुख्यास्तथैव च ॥ ६ ॥
शाकम्भर्याः परं स्थानं भ्रामर्याः स्थानमुत्तमम् ।
श्रीरक्तदन्तिकास्थानं दुर्गास्थानं तथैव च ॥ ७ ॥
विन्ध्याचलनिवासिन्याः स्थानं सर्वोत्तमोत्तमम् ।
अन्नपूर्णामहास्थानं काञ्चीपुरमनुत्तमम् ॥ ८ ॥
भीमादेव्याः परं स्थानं विमलास्थानमेव च ।
श्रीचन्द्रलामहास्थानं कौशिकीस्थानमेव ॥ ९ ॥
नीलाम्बायाः परं स्थानं नीलपर्वतमस्तके ।
जाम्बूनदेश्वरीस्थानं तथा श्रीनगरं शुभम् ॥ १० ॥
गुह्यकाल्या महास्थानं नेपाले यत्प्रतिष्ठितम् ।
मीनाक्ष्याः परमं स्थानं यच्च प्रोक्तं चिदम्बरे ॥ ११ ॥
वेदारण्यं महास्थानं सुन्दर्याः समधिष्ठितम् ।
एकाम्बरं महास्थानं परशक्त्या प्रतिष्ठितम् ॥ १२ ॥
महालसा परं स्थानं योगेश्वर्यास्तथैव च ।
तथा नीलसरस्वत्याः स्थानं चीनेषु विश्रुतम् ॥ १३ ॥
वैद्यनाथे तु बगलास्थानं सर्वोत्तमं मतम् ।
श्रीमच्छ्रीभुवनेश्वर्या मणिद्वीपं मम स्मृतम् ॥ १४ ॥
श्रीमत्त्रिपुरभैरव्याः कामाख्यायोनिमण्डलम् ।
भूमण्डले क्षेत्ररत्‍नं महामायाधिवासितम् ॥ १५ ॥
नातः परतरं स्थानं क्वचिदस्ति धरातले ।
प्रतिमासं भवेद्देवी यत्र साक्षाद्रजस्वला ॥ १६ ॥
तत्रत्या देवताः सर्वाः पर्वतात्मकतां गताः ।
पर्वतेषु वसन्त्येव महत्यो देवता अपि ॥ १७ ॥
तत्रत्या पृथिवी सर्वा देवीरूपा स्मृता बुधैः ।
नातः परतरं स्थानं कामाख्यायोनिमण्डलात् ॥ १८ ॥
गायत्र्याश्च परं स्थानं श्रीमत्पुष्करमीरितम् ।
अमरेशे चण्डिका स्यात्प्रभासे पुष्करेक्षिणी ॥ १९ ॥
नैमिषे तु महास्थाने देवी सा लिङ्गधारिणी ।
पुरुहूता पुष्कराक्षे आषाढौ च रतिस्तथा ॥ २० ॥
चण्डमुण्डीमहास्थाने दण्डिनी परमेश्वरी ।
भारभूतौ भवेद्‌भूतिर्नाकुले नकुलेश्वरी ॥ २१ ॥
चन्द्रिका तु हरिश्चन्द्रे श्रीगिरौ शाङ्करी स्मृता ।
जप्येश्वरे त्रिशूला स्यात्सूक्ष्मा चाम्रातकेश्वरे ॥ २२ ॥
शाङ्करी तु महाकाले शर्वाणी मध्यमाभिधे ।
केदाराख्ये महाक्षेत्रे देवी सा मार्गदायिनी ॥ २३ ॥
भैरवाख्ये भैरवी सा गयायां मङ्गला स्मृता ।
स्थाणुप्रिया कुरुक्षेत्रे स्वायम्भुव्यपि नाकुले ॥ २४ ॥
कनखले भवेदुग्रा विश्वेशा विमलेश्वरे ।
अट्टहासे महानन्दा महेन्द्रे तु महान्तका ॥ २५ ॥
भीमे भीमेश्वरी प्रोक्ता स्थाने वस्त्रापथे पुनः ।
भवानी शाङ्करी प्रोक्ता रुद्राणी त्वर्धकोटिके ॥ २६ ॥
अविमुक्ते विशालाक्षी महाभागा महालये ।
गोकर्णे भद्रकर्णी स्याद्‌भद्रा स्याद्‌भद्रकर्णके ॥ २७ ॥
उत्पलाक्षी सुवर्णाक्षे स्थाण्वीशा स्थाणुसञ्ज्ञके ।
कमलालये तु कमला प्रचण्डा छगलण्डके ॥ २८ ॥
कुरण्डले त्रिसन्ध्या स्यान्माकोटे मुकुटेश्वरी ।
मण्डलेशे शाण्डकी स्यात्काली कालञ्जरे पुनः ॥ २९ ॥
शङ्कुकर्णे ध्वनिः प्रोक्ता स्थूला स्यात्स्थूलकेश्वरे ।
ज्ञानिनां हृदयाम्भोजे हृल्लेखा परमेश्वरी ॥ ३० ॥
प्रोक्तानीमानि स्थानानि देव्याः प्रियतमानि च ।
तत्तत्क्षेत्रस्य माहात्म्यं श्रुत्वा पूर्वं नगोत्तम ॥ ३१ ॥
तदुक्तेन विधानेन पश्चाद्देवीं प्रपूजयेत् ।
अथवा सर्वक्षेत्राणि काश्यां सन्ति नगोत्तम ॥ ३२ ॥
अतस्तत्र वसेन्नित्यं देवीभक्तिपरायणः ।
तानि स्थानानि सम्पश्यञ्जपन्देवीं निरन्तरम् ॥ ३३ ॥
ध्यायंस्तच्चरणाम्भोजं मुक्तो भवति बन्धनात् ।
इमानि देवीनामानि प्रातरुत्थाय यः पठेत् ॥ ३४ ॥
भस्मीभवन्ति पापानि तत्क्षणान्नग सत्वरम् ।
श्राद्धकाले पठेदेतान्यमलानि द्विजाग्रतः ॥ ३५ ॥
मुक्तास्तत्पितरः सर्वे प्रयान्ति परमां गतिम् ।
अधुना कथयिष्यामि व्रतानि तव सुव्रत ॥ ३६ ॥
नारीभिश्च नरैश्चैव कर्तव्यानि प्रयत्‍नतः ।
व्रतमनन्ततृतीयाख्यं रसकल्याणिनीव्रतम् ॥ ३७ ॥
आर्द्रानन्दकरं नाम्ना तृतीयाया व्रतं च यत् ।
शुक्रवारव्रतं चैव तथा कृष्णचतुर्दशी ॥ ३८ ॥
भौमवारव्रतं चैव प्रदोषव्रतमेव च ।
यत्र देवो महादेवो देवीं संस्थाप्य विष्टरे ॥ ३९ ॥
नृत्यं करोति पुरतः सार्धं देवैर्निशामुखे ।
तत्रोपोष्य रजन्यादौ प्रदोषे पूजयेच्छिवाम् ॥ ४० ॥
प्रतिपक्षं विशेषेण तद्देवीप्रीतिकारकम् ।
सोमवारव्रतं चैव ममातिप्रियकृन्नग ॥ ४१ ॥
तत्रापि देवीं सम्पूज्य रात्रौ भोजनमाचरेत् ।
नवरात्रद्वयं चैव व्रतं प्रीतिकरं मम ॥ ४२ ॥
एवमन्यान्यपि विभो नित्यनैमित्तिकानि च ।
व्रतानि कुरुते यो वै मत्प्रीत्यर्थं विमत्सरः ॥ ४३ ॥
प्राप्नोति मम सायुज्यं स मे भक्तः स मे प्रियः ।
उत्सवानपि कुर्वीत दोलोत्सवसुखान्विभो ॥ ४४ ॥
शयनोत्सवं यथा कुर्यात्तथा जागरणोत्सवम् ।
रथोत्सवं च मे कुर्याद्दमनोत्सवमेव च ॥ ४५ ॥
पवित्रोत्सवमेवापि श्रावणे प्रीतिकारकम् ।
मम भक्तः सदा कुर्यादेवमन्यान्महोत्सवान् ॥ ४६ ॥
मद्‌भक्तान्भोजयेत्प्रीत्या तथा चैव सुवासिनीः ।
कुमारीर्बटुकांश्चापि मद्बुद्ध्या तद्‌गतान्तरः ॥ ४७ ॥
वित्तशाठ्येन रहितो यजेदेतान्सुमादिभिः ।
य एवं कुरुते भक्त्या प्रतिवर्षमतन्द्रितः ॥ ४८ ॥
स धन्यः कृतकृत्योऽसौ मत्प्रीतेः पात्रमञ्जसा ।
सर्वमुक्तं समासेन मम प्रीतिप्रदायकम् ।
नाशिष्याय प्रदातव्यं नाभक्ताय कदाचन ॥ ४९ ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां सप्तमस्कन्धे
देवीगीतायां महोत्सवव्रतस्थानवर्णनं नामाष्टत्रिंशोऽध्यायः ॥ ३८ ॥


(देवीगीता अध्याय ७ वा) देवीची स्थाने, व्रते व महोत्सव यांची माहिती

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

हिमालयाने देवीला विचारले, "हे देवेश्‍वरी, तुला नित्य प्रिय असणारी, सर्वात मुख्य आणि अत्यंत पवित्र अशी किती व कोणकोणती स्थाने पृथ्वीवर आहेत ? तसेच हे मातोश्री कोणती व्रते आचरणात आणली असता तुला परम संतोष होतो ? कोणते उत्सव केले असता तुला सुख होते ? ते सर्व तू मला सांग. कारण त्याच्या श्रवणानेही मनुष्य कृतकृत्य होतो."

हिमालयाने विचारलेल्या प्रश्‍नांमुळे देवीला अतिशय आनंद झाला. आपल्या सत्‌शिष्याच्या सर्व शंकांचे निरसन करण्याच्या उद्देशाने श्रीदेवी पुढे म्हणाली, "हे हिमालया, जे जे दिसते आहे ते ते सर्व वस्तुजात ही माझीच स्थाने आहेत. कारण मी सर्वस्वरूपिणी आहे. तसेच मला कालाचे बंधन नाही. कोणताही काल माझ्या उपासनेसाठी चालतो. माझी व्रते व माझे उत्सव कोणत्याही क्षणी आचरणात आणले तरी ते योग्यच होय. पण तू माझा उत्तम भक्त आहेस, म्हणून तुझ्यावरील प्रेमामुळे तुझे समाधान व्हावे या इच्छेने आता मी तुला सांगते. तू ते शांत चित्ताने श्रवण कर.

हे नगराजा, माझे जे भाषण मी आता तुला सांगणार आहे, ते तू लक्षपूर्वक ऐक. हे बघ, जेथे लक्ष्मीचे नित्य वास्तव्य आहे असे कोल्हापूर नावाचे क्षेत्र हे माझे फारच महान स्थान आहे. तसेच सह्याद्रि पर्वताच्या कुशीत वसलेले मातापूर हे रेणुकेचे वसतीस्थान असून ते माझे दुसरे महत्त्वाचे स्थान आहे.

तुळजापुर हे माझे तृतीय स्थान असून सप्तशृंग हे एक उत्तम स्थान आहे. हिंगोलीचे महास्थानही अत्यंत श्रेष्ठ आहे. ज्वालामुखीचे स्थान हे पवित्र असून शाकंभरीचे माझे पीठस्थान श्रेष्ठ दर्जाचे आहे. भ्रमरीचे माझे उत्तम स्थान असून श्रीदंतरक्तिका नावाच्या देवीचे वसतीस्थानही मला प्रिय आहे. तसेच दुर्गास्थानाचेही महात्म्य फार आहे.

विंध्याचली देवीचे विंध्यपर्वतावरील स्थानही सर्वोत्तम आहे. अन्नपूर्णामहास्थान प्रसिद्ध आहे. कांचीपूर उत्कृष्ट आहे. तसेच भीमादेवीचे स्थानही उत्कृष्ट आहे. त्याचप्रमाणे माझे विमलास्थान या नावाचे आणखी सुंदर स्थान आहे. कर्नाटक देशात श्रीचंद्रला देवीचे महास्थान आहे. शिवाय कौशिकी स्थान सुरेख आहे. नीलपर्वतावर नीलांबरीचे उत्तम स्थान आहे. जांबूनदेश्‍वरीचे स्थान, श्रीनगरचे स्थान ही सुंदर ठिकाणे आहेत. गुह्यकालीचे महास्थान नेपाळमध्ये वसलेले आहे. चिदंबर नावाच्या ठिकाणी मीनाक्षीचे महत्त्वाचे मुख्य स्थान आहे. सुंदरी देवी ज्या ठिकाणी अधिष्ठित होऊन राहिली आहे ते वेदारण्य नावाचे महास्थान प्रसिद्ध आहे.

एकांबर नावाच्या महास्थानात पराशक्तीचे नित्य वास्तव्य असल्याने ते अत्यंत पवित्र स्थान आहे. त्याचप्रमाणे मदालसा देवीचे स्थान सर्वोत्कृष्ट आहे. योगीश्‍वरीचे स्थानही सुंदर आहे. नीलसरस्वतीचे चीनमध्ये अत्यंत उत्तम स्थान आहे. वैद्यनाथावर असलेले बगलास्थानाचे महत्त्वही अपूर्व आहे आणि माझे श्रीभुवनेश्‍वरीचे स्थान श्रीमत् मणिद्वीप हे तर सर्वोत्तम व अत्यंत मान्य असे स्थान आहे.

सतीच्या देहाने अवतार घेतलेल्या कामाख्या महादेवीचे योनिमंडल ज्या ठिकाणी पडले ते श्रीमत्‌त्रिपुरभैरवी म्हणून विख्यात असलेले स्थान मला प्रिय आहे. ते स्थान हीच त्या महामायेची नित्याची वास्तव्याची भूमी असल्यामुळे या पृथ्वीतलावर सर्व क्षेत्रात उत्तम असे ते क्षेत्रस्थान आहे. त्या स्थानाशिवाय दुसरे श्रेष्ठ स्थान या पृथ्वीवर आढळणार नाही. ते ठिकाण इतके अद्‌भुत आहे की ती महादेवी त्या स्थानी दर महिन्याला साक्षात रजस्वला येत असते. तेथील सर्वच देवता पर्वतात्मक झाल्या आहेत. पर्वतावरदेखील मोठमोठया अत्यंत श्रेष्ठ अशा देवतांचे वास्तव्य नित्याचे असते. तेथील सर्वच भूमी देवींनी व्यापल्यामुळे देवीरूपच आहे. असे सूज्ञांचे मत आहे. म्हणून या कामाख्या देवीच्या योनिमंडलाच्या स्थानावाचून दुसरे कोणतेही इतके उत्तम व पवित्र असे स्थान नाही.

श्रीमतपुष्कर क्षेत्र हे गायत्रीचे श्रेष्ठ स्थान म्हणून सर्व मान्यवरांनी सांगितलेले आहे. अमरेश्‍वर स्थानी चंडीका, प्रभास तीर्थक्षेत्रावर पुष्करेक्षिणी, नैमिष नावाच्या भयंकर अरण्यात लिंगधारिणी, पुष्कराक्ष स्थानात पुरूहूता, आषाढी नावाच्या स्थानात रति, महास्थानी दंडिनी, परमेश्‍वरी क्षेत्रावर चामुंडी, भारभूताचे ठिकाणी भूति व नाकुल या ठिकाणी देवी नुकलेश्‍वरी नावांनी राहते.

हरिश्‍चंद्राचे स्थानी ती चंद्रिका असते. श्रीगिरीवर तिला शंकरी म्हणतात. ज्यत्येश्‍वर क्षेत्री त्रिशूला, तर आम्रातकेश्‍वर क्षेत्री ती सूक्ष्मादेवी असते. उज्जयनीत तीच शांकरी असून मध्यमा नावाच्या ठिकाणी ती शर्वाणी म्हणून प्रसिद्ध आहे. केदार या नावाने सुविख्यात असलेल्या महाक्षेत्रावर ती मार्गदायिनी देवी म्हणून वास्तव्य करते. भैरव नावाच्या ठिकाणी ती भैरवी असते व गया क्षेत्रावर ती मंगला देवी म्हणून राहते असे शास्त्रवचन आहे.

कुरू क्षेत्रावर ती स्थाणुप्रिया व नकुलामध्ये ती स्वयंभूवी म्हणून ओळखली जाते. कनगलात उग्रा व विमलेश्‍वर क्षेत्रामध्ये ती विश्‍वेशा आहे. अटटाहास नावाच्या उत्तम क्षेत्रामध्ये ती महानंदा असून महेंद्र पर्वतावर ती महांतका आहे. भीमा क्षेत्रात ती भीमेश्‍वरी आहे तर वस्त्रापथ स्थानामध्ये ती शांकरी भवानी म्हणून पंडितांनी सांगितलेली आहे.

अर्धकोटी नावाच्या तीर्थस्थानावर ती रुद्राणी म्हणून वास्तव्य करीत आहे. तसेच अविमुक्त देशात ती विशालाक्षी असून महालय या पवित्र स्थानात मी महाभागा आहे. तीच गोकर्ण क्षेत्रात भद्रकर्णी आहे. भद्रकर्ण क्षेत्रामध्ये ती भद्रा आहे. सुवर्णाक्षाचे ठिकाणी ती उत्पलाक्षी आहे. स्थाणु क्षेत्रामध्ये ती स्थाण्वीशा म्हणून मान्य आहे. कुरंडलमध्ये ती त्रिसंध्या आहे. तसेच मोकाट क्षेत्रामध्ये ती मुकटेश्‍वरी आहे.

मंडलेश या ठिकाणी ती शांडकी असून कालंजराचे पवित्र स्थानी ती काली आहे. शंकुकर्णामध्ये तिला ध्वनि या नावाने संबोधतात. तीच देवी स्थूलकेसरी येथे स्थूला होते आणि श्रेष्ठ ज्ञानी असलेल्या पुरुषांचे हृदयकमलात ती परमेश्‍वरी हल्लेखा या नावाने नित्य वास्तव्य करते.

हे उत्तम पर्वता, मी तुला देवीची पवित्र स्थाने, त्या स्थानी त्या कोणत्या नावाने रहात आहेत ती परममंगल नावे सांप्रत सांगितली आहेत. त्याच्या क्षेत्रांचे महात्म्य वर्णन केलेले आहे व ते श्रवण करून नंतर त्यात सांगितलेल्या विधीने युक्त अशी देवीची पूजा कर.

हे भूधरा, मी आता तुला कथन केलेली सर्वच क्षेत्रे आपापल्या स्थानमहात्म्यासह काशीक्षेत्रात आहेत. म्हणून देवीच्या भक्तीमध्ये एकचित्त प्राप्त झालेल्या पुरुषाने तत्पर राहून त्या काशीक्षेत्र जाऊन नित्य वास्तव्य करावे. त्या ठिकाणच्या स्थानांचे दर्शनसुखाचा अनुभव घेऊन देवीचे मंत्र नित्य जप करीत व देवीच्या चरणकमलांची मनांमध्ये नित्य स्मृति ठेवून देवीचे ध्यान करणारा पुरुष सर्व संसारबंधनातून सत्वर मुक्त होतो.

हे नगश्रेष्ठा, ही देवींची नावे जो प्रातःकाळी नित्य लवकर उठून शुचिर्भूत होऊन नेमाने उच्चारीत असतो त्याची सर्व पापे कसलाही विलंब न लागता तत्‌क्षणी भस्मसात होतात. ही सर्व निर्मल व पवित्र नावे श्राद्धकाली उच्चारली असता त्या ब्राह्मणाचे वा पाठकाचे पितर सत्वर मुक्त होऊन परम गतीला जातात.

हे सदाचरणी पर्वता, आता मी तुला व्रते निवेदन करते. स्त्रिया व पुरुष यांनी ही व्रते नित्य नेमाने करावीत. अनंततृतीया नावाचे व्रत रसकल्याणिव्रत, आद्रनंदकर नावाचे व्रत तृतीया या तीर्थाच्या दिवशी करतात. शुक्रवारव्रत, कृष्णचतुर्दशीव्रत, भौ‍मवारव्रत, प्रदोषकाळी देवाधिदेव शंकर देवीला आसनावर बसवून देवासहवर्तमान त्या देवतेपुढे नम्रभावपूर्ण असे सुंदर नृत्य करतो ते प्रदोषव्रत आचरीत रहावे.

प्रदोषाचे दिवशी उपवास करावा. रात्रीच्या सुरुवातीच्या प्रहरी म्हणजे प्रदोषाचे वेळी शिवाची भक्तीभावाने पूजा करावी. हे व्रत प्रत्येक पक्षात (शुद्धपक्ष व कृष्णपक्ष) करावे. कारण त्या जपामुळे देवी नित्य प्रसन्न होत असते.

हे हिमालया, सोमवारव्रत तर मला अत्यंतच प्रिय असून त्यामुळे मी आकर्षित होते. म्हणून त्या दिवशी रात्रीही देवीचे मनोभावे पूजन करूनच अन्नग्रहण करावे.

हे विभो पर्वता, शरद ऋतूत येणारे नवरात्र व वसंत ऋतूत येणारे नवरात्र ही दोन व्रते केल्यावर मी सत्वर प्रसन्न होते. या व्रताप्रमाणे आणिकही नित्य नैमित्तिक व्रते आहेत. जो कोणी मत्सरादि भावना सोडून एकचित्ताने ही व्रते करीत असतो त्यावर मी संतुष्ट होत असते. ती व्रते आचरण करणारा मला प्रिय होतो आणि तोच माझा भक्त आहे असे मी समजते. अशा त्या उपासकाला माझी प्राप्ती होऊन सायुज्यता प्राप्त होते.

हे विभो, दोलोत्सव या उत्सवासारखे उत्सव करीत रहावे. जसा शयनोत्सव तसाच जागरणोत्सव करावा. माझ्या संतोषासाठी रथोत्सव करावा. त्याचप्रमाणे दमनोत्सवही साजरा करावा. श्रावणातील पवित्रोत्सव हा नेमाने करावा. त्यायोगे मी सर्वदा प्रसन्न होते.

अशाप्रकारे इतर महोत्सवही उत्साहाने करावेत. या महोत्सवप्रसंगी माझ्या भक्तांना, सुवासिनींना, कुमारिकांना, ब्रह्मचार्‍यांना बोलावून त्यांच्या ठिकाणी मी देवी आहे असे कल्पून एकाग्र मनाने व भक्तीभावाने त्यांना भोजन घालावे व विनयाने कपटभाव न धरता पुष्पादिकांच्या योगाने त्यांची पूजा करावी.

कंटाळा न करता जो दरवर्षी भक्तीभावाने हे करीत असतो. तो धन्य होय. तोच कृतकृत्य होय आणि तोच माझ्या प्रीतीचे स्थान होय.

हे शैल राजा, मला प्रसन्न करून घेण्यासाठी आवश्यक अशी स्थाने, व्रते, उत्सव मी तुला संक्षेपाने सांगितले. आपल्या भक्त वा शिष्यांशिवाय हे इतरांना सांगू नये.



अध्याय अडतिसावा समाप्त

GO TOP