हिमालय उवाच
स्वीयां भक्तिं वदस्वाम्ब येन ज्ञानं सुखेन हि ।
जायेत मनुजस्यास्य मध्यमस्याविरागिणः ॥ १ ॥
देव्युवाच
मार्गास्त्रयो मे विख्याता मोक्षप्राप्तौ नगाधिप ।
कर्मयोगो ज्ञानयोगो भक्तियोगश्च सत्तम ॥ २ ॥
त्रयाणामप्ययं योग्यः कर्तुं शक्योऽस्ति सर्वथा ।
सुलभत्वान्मानसत्वात्कायचित्ताद्यपीडनात् ॥ ३ ॥
गुणभेदान्मनुष्याणां सा भक्तिस्त्रिविधा मता ।
परपीडां समुद्दिश्य दम्भं कृत्वा पुरःसरम् ॥ ४ ॥
मात्सर्यक्रोधयुक्तो यस्तस्य भक्तिस्तु तामसी ।
परपीडादिरहितः स्वकल्याणार्थमेव च ॥ ५ ॥
नित्यं सकामो हृदयं यशोऽर्थी भोगलोलुपः ।
तत्तत्फलसमावाप्त्यै मामुपास्तेऽतिभक्तितः ॥ ६ ॥
भेदबुद्ध्या तु मां स्वस्मादन्यां जानाति पामरः ।
तस्य भक्तिः समाख्याता नगाधिप तु राजसी ॥ ७ ॥
परमेशार्पणं कर्म पापसङ्क्षालनाय च ।
वेदोक्तत्वादवश्यं तत्कर्तव्यं तु मयानिशम् ॥ ८ ॥
इति निश्चितबुद्धिस्तु भेदबुद्धिमुपाश्रितः ।
करोति प्रीतये कर्म भक्तिः सा नग सत्त्विकी ॥ ९ ॥
परभक्तेः प्रापिकेयं भेदबुद्ध्यवलम्बनात् ।
पूर्वप्रोक्ते ह्युभे भक्ती न परप्रापिके मते ॥ १० ॥
अधुना परभक्तिं तु प्रोच्यमानां निबोध मे ।
मद्गुणश्रवणं नित्यं मम नामानुकीर्तनम् ॥ ११ ॥
कल्याणगुणरत्नानामाकरायां मयि स्थिरम् ।
चेतसो वर्तनं चैव तैलधारासमं सदा ॥ १२ ॥
हेतुस्तु तत्र को वापि न कदाचिद्भवेदपि ।
सामीप्यसार्ष्टिसायुज्यसालोक्यानां न चैषणा ॥ १३ ॥
मत्सेवातोऽधिकं किञ्चिन्नैव जानाति कर्हिचित् ।
सेव्यसेवकताभावात्तत्र मोक्षं न वाञ्छति ॥ १४ ॥
परानुरक्त्या मामेव चिन्तयेद्यो ह्यतन्द्रितः ।
स्वाभेदेनैव मां नित्यं जानाति न विभेदतः ॥ १५ ॥
मद्रूपत्वेन जीवानां चिन्तनं कुरुते तु यः ।
यथा स्वस्यात्मनि प्रीतिस्तथैव च परात्मनि ॥ १६ ॥
चैतन्यस्य समानत्वान्न भेदं कुरुते तु यः ।
सर्वत्र वर्तमानानां सर्वरूपां च सर्वदा ॥ १७ ॥
नमते यजते चैवाप्याचाण्डालान्तमीश्वर ।
न कुत्रापि द्रोहबुद्धिं कुरुते भेदवर्जनात् ॥ १८ ॥
मत्स्थानदर्शने श्रद्धा मद्भक्तदर्शने तथा ।
मच्छास्त्रश्रवणे श्रद्धा मन्त्रतन्त्रादिषु प्रभो ॥ १९ ॥
मायि प्रेमाकुलमती रोमाञ्चिततनुः सदा ।
प्रेमाश्रुजलपूर्णाक्षः कण्ठगद्गदनिस्वनः ॥ २० ॥
अनन्येनैव भावेन पूजयेद्यो नगाधिप ।
मामीश्वरीं जगद्योनिं सर्वकारणकारणम् ॥ २१ ॥
व्रतानि मम दिव्यानि नित्यनैमित्तिकान्यपि ।
नित्यं यः कुरुते भक्त्या वित्तशाठ्यविवर्जितः ॥ २२ ॥
मदुत्सवदिदृक्षा च मदुत्सवकृतिस्तथा ।
जायते यस्य नियतं स्वभावादेव भूधर ॥ २३ ॥
उच्चैर्गायंश्च नामानि ममैव खलु नृत्यति ।
अहङ्कारादिरहितो देहतादात्म्यवर्जितः ॥ २४ ॥
प्रारब्धेन यथा यच्च क्रियते तत्तथा भवेत् ।
न मे चिन्तास्ति तत्रापि देहसंरक्षणादिषु ॥ २५ ॥
इति भक्तिस्तु या प्रोक्ता परभक्तिस्तु सा स्मृता ।
यस्यां देव्यतिरिक्तं तु न किञ्चिदपि भाव्यते ॥ २६ ॥
इत्थं जाता परा भक्तिर्यस्य भूधर तत्त्वतः ।
तदैव तस्य चिन्मात्रे मद्रूपे विलयो भवेत् ॥ २७ ॥
भक्तेस्तु या परा काष्ठा सैव ज्ञानं प्रकीर्तितम् ।
वैराग्यस्य च सीमा सा ज्ञाने तदुभयं यतः ॥ २८ ॥
भक्तौ कृतायां यस्यापि प्रारब्धवशतो नग ।
न जायते मम ज्ञानं मणिद्वीपं स गच्छति ॥ २९ ॥
तत्र गत्वाखिलान्भोगाननिच्छन्नपि चर्च्छति ।
तदन्ते मम चिद्रूपज्ञानं सम्यग्भवेन्नग ॥ ३० ॥
तेन मुक्तः सदैव स्याज्ज्ञानान्मुक्तिर्न चान्यथा ।
इहैव यस्य ज्ञानं स्याद्धृद्गतप्रत्यगात्मनः ॥ ३१ ॥
मम संवित्परतनोस्तस्य प्राणा व्रजन्ति न ।
ब्रह्मैव संस्तदाप्नोति ब्रह्मैव ब्रह्म वेद यः ॥ ३२ ॥
कण्ठचामीकरसममज्ञानात्तु तिरोहितम् ।
ज्ञानादज्ञाननाशेन लब्धमेव हि लभ्यते ॥ ३३ ॥
विदिताविदितादन्यन्नगोत्तम वपुर्मम ।
यथादर्शे तथात्मनि यथा जले तथा पितृलोके ॥ ३४ ॥
छायातपौ यथा स्वच्छौ विविक्तौ तद्वदेव हि ।
मम लोके भवेज्ज्ञानं द्वैतभावविवर्जितम् ॥ ३५ ॥
यस्तु वैराग्यवानेव ज्ञानहीनो म्रियेत चेत् ।
ब्रह्मलोके वसेन्नित्यं यावत्कल्पं ततः परम् ॥ ३६ ॥
शुचीनां श्रीमतां गेहे भवेत्तस्य जनिः पुनः ।
करोति साधनं पश्चात्ततो ज्ञानं हि जायते ॥ ३७ ॥
अनेकजन्मभी राजञ्ज्ञानं स्यान्नैकजन्मना ।
ततः सर्वप्रयत्नेन ज्ञानार्थं यत्नमाश्रयेत् ॥ ३८ ॥
नोचेन्महान् विनाशः स्याज्जन्मैतद्दुर्लभं पुनः ।
तत्रापि प्रथमे वर्णे वेदप्राप्तिश्च दुर्लभा ॥ ३९ ॥
शमादिषट्कसम्पत्तिर्योगसिद्धिस्तथैव च ।
तथोत्तमगुरुप्राप्तिः सर्वमेवात्र दुर्लभम् ॥ ४० ॥
तथेन्द्रियाणां पटुता संस्कृतत्वं तनोस्तथा ।
अनेकजन्मपुण्यैस्तु मोक्षेच्छा जायते ततः ॥ ४१ ॥
साधने सफलेऽप्येवं जायमानेऽपि यो नरः ।
ज्ञानार्थं नैव यतते तस्य जन्म निरर्थकम् ॥ ४२ ॥
तस्माद्राजन्यथाशक्त्या ज्ञानार्थं यत्नमाश्रयेत् ।
पदे पदेऽश्वमेधस्य फलमाप्नोति निश्चितम् ॥ ४३ ॥
घृतमिव पयसि निगूढं
भूते भूते च वसति विज्ञानम् ।
सततं मन्थयितव्यं
मनसा मन्थानभूतेन ॥ ४४ ॥
ज्ञानं लब्ध्वा कृतार्थः स्यादिति वेदान्तडिण्डिमः ।
सर्वमुक्तं समासेन किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥ ४५ ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां सप्तमस्कन्धे
देवीगीतायां भक्तिमहिमावर्णनं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः ॥ ३७ ॥
(देवीगीता ; अध्याय ६ वा) भक्तियोग व त्याचे श्रेष्ठत्व
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
ब्रह्मतत्त्वांचे निरूपण ऐकून हिमालय आनंदित झाला. तो म्हणाला, "हे अंबे, हे जगज्जननी, मी खरोखरच धन्य आहे. आता तुझी भक्ती कशी करावी हे सांग म्हणजे त्यामुळे अविरक्त असल्यामुळे मध्यम अवस्थेत असलेल्या मनुष्यालाही अनायासे तिचे ज्ञान प्राप्त होईल."
देवी म्हणाली, हे अति उत्तम पर्वता, मोक्षप्राप्तीचे तीन मार्ग सांगितले आहेत. एक कर्मयोग, दुसरा ज्ञानयोग व तिसरा भक्तीयोग असे तीन मार्ग आहेत. या तिन्हीही मार्गापैकी भक्तीमार्ग हा अत्यंत सहजसुलभ आहे. कारण भक्तीमार्ग हा फक्त मानसक्रियेवरच मुख्यत्वेकरून अवलंबून आहे. त्यामुळे शरीर व चित्त यांना पीडा देऊन मोक्षप्राप्ती करून घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. भक्तीयोग हा अनुसरण्यास अत्यंत योग्य आहे व तो सर्वप्रकारे सहजशक्य आहे.
मनुष्याशी सत्त्व, रज, तम इत्यादि गुणांचा एकनिष्ठ संबंध येतो. त्यामुळे भक्तीसुद्धा तीन वेगवेगळ्या प्रकारांची मानली जाते. दुसर्यास पीडा व्हावी म्हणून अथवा केवळ दंशयुक्त भक्ती अथवा मात्सर्य व क्रोध या भावांनी युक्त अशी जी भक्ती तिला तामसी भक्ती असे नाव आहे.
जो फक्त स्वतःपुरती, स्वतःच्या आत्मकल्याणासाठी भक्ती करतो त्याच्यापासून इतरांना पीडा पोहोचत नाही. तो सर्वदा अंतःकरणात कसली तरी कामना ठेवून त्या पूर्णतेसाठी भक्ती करतो. तो भोगाविषयी आसक्त असतो. तो मोठया भक्तीभावाने इच्छित फलाची प्राप्ती व्हावी म्हणूनच माझी उपासना करतो, तो अशाप्रकारचा बिचारा पामर भेदबुद्धीने मला स्वतःहून अन्य समजतो. म्हणून हे पर्वतश्रेष्ठा, त्याच्या भक्तीला राजसी भक्ती असे प्रज्ञावंतांनी नाव दिले आहे.
केवळ पापविमोचन व्हावे म्हणून आपली सर्व कर्मे जो देवाला अर्पण करून म्हणजे मला अर्पण करून वेदोक्त मार्गाने माझी भक्ती करतो, तो वेदोक्त मार्गाने ओघपतित असल्यामुळे सतत निष्काम बुद्धीने, आपले भक्ती करणे हे अवश्य कर्तव्य आहे, अशी स्थिर बुद्धी ठेवतो व केवळ मी उपास्य व तो उपासक अशी भावना ठेवून माझ्याविषयी वेगळेपणाची बुद्धी ठेवून केवळ मी प्रसन्न व्हावे म्हणून जो कर्म करीत राहतो आणि नित्य भक्ती करतो त्या भक्तीला सात्त्विकी भक्ती म्हणावे.
या भक्तीत शुद्ध सत्त्वरूप भेदबुद्धीचा अवलंब केल्यामुळे हीच पराभक्ती प्राप्त करून देणारी आहे. पण प्रथम सांगितलेल्या ज्या तामसी आणि राजसी दोन भक्ती आहेत, त्या दोन्ही भक्ती पराभक्तीची प्राप्ती करून देणार्या नाहीत असे विद्वानांचे मत आहे.
आता पराभक्ती म्हणजे काय हे मी तुला सांगते. तू साग्र चित्ताने श्रवण कर. कल्याणकारक व सर्व गुणरत्नांची खाण असलेली मी त्या माझ्यामध्ये नित्य तेलाच्या धारेप्रमाणे चित्ताचे स्थैर्य करून केव्हाही व कोणताही हेतु मनात न धरता नित्य माझ्य़ाच गुणांचे श्रवण करावे व माझ्या नामाचे कीर्तन करावे.
जो सामिप्य, स्वारुप्य, सायुज्य, सालोक्य या मुक्तींचीही अपेक्षा धरीत नाही, जो केवळ माझी सेवा करणे एवढे एकच कार्य करीत असतो, त्या व्यतिरिक्त काहीही करीत नाही, अन्य काही जाणत नाही, जो शुद्ध सेव्य-सेवक भाव मनात दृढ धरून मोक्षाचीही इच्छा करीत नाही, जो अत्यंत प्रीतीने व निरलसपणे माझे सदैव चिंतन करतो, जो त्याचे व माझे अभिन्नत्व जाणून राहतो, जो माझ्याविषयी किंचितही भेदभाव पहात नाही, सर्व जीवनमात्र हे माझेच स्वरूप आहेत अशी ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो फक्त अद्वैतच चिंतीत असतो, जसा आपला देह आहे तसाच दुसर्याचाही आहे असे जो मनात धरतो व तशीच देहावर प्रीती करतो, जो सर्व प्राणीमात्रात एकसारखे चैतन्य आहे असे मानतो, त्यात द्वैत मानीत नाही, सर्वत्र संचार करणार्या आणि सर्वरूपात भरून राहिलेल्या मला जो नेहमी नमस्कार करीत असतो, व माझीच पूजा करतो, उत्तम अथवा चांडाल यांमध्येही भेद न बाळगता जो कोठेच मोहबुद्धी ठेवीत नाही आणि भेदशून्य होतो, माझी स्थाने पहाण्याविषयी, माझ्या भक्तांचे दर्शन घेण्याविषयी, तसेच माझेच प्रतिपादन ज्या शास्त्रात सांगितलेले आहे अशाच त्या शास्त्रांचे श्रवण करण्याविषयी व मंत्र-तंत्र इत्यादिकावर ज्याची नितांत श्रद्धा आहे, त्याचप्रमाणे ज्याची बुद्धी माझ्यावरील आत्यंतिक प्रेमामुळे व्याकुळ झाली आहे, केवळ सात्त्विक भाव जागृत होऊन ज्याच्या शरीरावर रोमांच उभे राहतात, प्रेमाश्रूंच्या जलाने ज्याचे नेत्र नित्य भरभरून येत असतात, ज्याचा कंठ केवळ माझ्या आठवणींनी दाटून येतो. मी ईश्वरी, जगद्योनी व सर्वच कारणांचे कारण आहे अशी बुद्धी ठेवून जो अनन्यभावाने माझी पूजा करीत असतो, माझी दिव्य व्रते व तसेच नैमित्तिक अशी नित्याची व्रते जो शुद्ध मनाने आचरणात आणित असतो, भक्तियुक्त मनाने व वित्तासाठी लबाडी न करता तो निष्काम मनानेच व्रतस्थ राहतो, माझा उत्सव पहाण्यासाठी आणि माझा उत्सव करण्यासाठी जो स्वभावतःच नित्य उत्सुक असतो, मोठमोठया आवाजाने माझेच नाम संकीर्तन करीत जो नाचतो, जो स्वदेहाचा अभिमान विसरून व देहाचे माझ्या स्वरूपाशी तादात्म्य करून स्थिर असतो, प्रारब्ध जे जे करील ते ते तसेच होवो दैवाच्या इच्छेप्रमाणे सर्व काही घडो, मला माझ्या देह रक्षणाचीही काळजी नाही असे जो मनात म्हणतो, तोच माझा श्रेष्ठतम भक्त होय.
अशाप्रकारची जी भक्ती सांगितली आहे, तीच पराभक्ती म्हणून मान्य आहे. ह्या भक्तीमध्ये भक्ताला देवीहून दुसरे काहीही नाही याचा साक्षात्कार झालेला असतो. अशाप्रकारे ज्याच्या अंतःकरणात निष्ठा उत्पन्न होते, खरोखरच त्या भक्ताचा माझ्या चिन्मात्र स्वरूपात तो सत्वर लय होत असतो. तो माझ्याशी तत्क्षणी एकरूप होतो.
हे भूधरा, भक्तीची जी परमश्रेष्ठ सीमा आहे त्यालाच ज्ञान असे म्हणतात. ज्ञान हीच वैराग्याची खरी सीमा आहे. कारण ज्ञानामध्येच त्या उभयतांचा अंतर्भाव होत असतो.
हे पर्वता, भक्ती करूनसुद्धा ज्या उपासकाला केवळ दुर्दैवामुळे माझे ज्ञान होत नाही, तो माझ्या वसतीस्थानी म्हणजे मणिद्विपात जातो. त्या ठिकाणी गेल्यावर त्याची इच्छा असो नसो, तेथील सर्व भोग तो भोगतो. अखेर शेवटी कल्पाचा अंतकाळ प्राप्त झाल्यावर त्याला माझ्या चित्रूपाचे ज्ञान होते. त्यानंतर ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे तो नित्य मुक्त होतो.
हे पर्वता, माझ्या ज्ञानानेच सर्व प्राण्यांस मुक्ती मिळते. माझ्याबद्दलच्या ज्ञानाशिवाय मुक्ती मिळतच नाही. जिवंत आहे तोवर ज्याला हृदयस्थ प्रत्यागात्म्याचे म्हणजे माझ्या स्वंविद्रूपी श्रेष्ठ शरीराचे ज्ञान होते त्याचे प्राण कधीच जात नाहीत, तर तो ज्ञानी पुरुष स्वतःच ब्रह्म होऊन ब्रह्मपदाला मिळतो. कारण श्रुतिवचनाप्रमाणे, "जो ब्रह्माला जाणतो, तोच ब्रह्म होय."
कंठस्थ सुवर्णाप्रमाणे अज्ञानामुळे गुप्त झालेले माझे स्वरूप जरी पूर्वीही प्राप्त होते तरी ते ज्ञानाने अज्ञानाचा नाश केल्यावर जणू काय पुन्हा प्राप्त झाले असे वाटते.
हे पर्वतोत्तमा, ज्ञान व अज्ञान अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थाहून माझे शरीर निराळे आहे. आरशामध्ये जसे स्वतःचेच प्रतिबिंब दिसते तसेच देहामध्ये माझे स्वरूप अनुभवास येते. जलात जशी छाया दिसते तसा पितृलोकी आत्मसाक्षात्कार होतो. छाया आणि प्रकाश जसे अगदी स्पष्टपणे वेगवेगळे दिसतात तसेच माझ्या लोकी द्वैतभावशून्य असे ज्ञान प्राप्त होते.
जो वैराग्यसंपन्न असूनदेखील आत्मज्ञान होण्यापूर्वीच मरण पावतो तो कल्पाची समाप्ति होईपर्यंत ब्रह्मलोकीच राहतो. त्यानंतर पुन्हा पवित्र व श्रीमंत अशा घराण्यात जो पुनर्जन्म घेतो. तेथे प्राप्त झाल्यावर तो पुन्हा पुन्हा साधना व अनुष्ठाने करीत राहतो आणि त्यामुळे त्याला अखेर ज्ञान प्राप्ती होते.
हे शैलराजा, अनेक जन्म घेतल्यानंतर ज्ञान प्राप्त होते. ते ज्ञान एकाच जन्मात मिळविता येत नाही. म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी सारखा प्रयत्न चालू ठेवणे अत्यंत इष्ट होय. तसे न केल्यास अनर्थ घडून मोठा नाश होतो कारण हा मानवजन्म पुन्हा प्राप्त होणे दुर्लभ आहे. त्यातूनही प्रथम वर्णात म्हणजे ब्राह्मण वर्णात जन्म मिळणे तर फारच दुरापास्त. ब्राह्मण जातीत जन्म प्राप्त होऊन वेदाधिकार मिळणे हे अत्यंत कर्मकठीण आहे.
शम, दम, वगैरे षट्काची प्राप्ती, योगाची संसिद्धी, त्याचप्रमाणे उत्तम गुरूची प्राप्ती, शिवाय इंद्रिये कार्यतत्पर सदैव असणे, शरीरावर वेदोक्त जात-कर्मादि संस्कार होणे हे सर्व या संसारात अत्यंत दुर्लभ आहे.
अनेक जन्मात पुण्ये केली असतील, तरच मोक्षाची इच्छा होत असते. कदाचित् पूर्व साधने सफल होऊन मोक्षाची इच्छा झाली असूनही जो पुरुष ज्ञानाकरता प्रयत्न करीत नाही त्याचा जन्म निष्फल आहे.
म्हणून हे शैलराजा, ज्ञान प्राप्तीसाठी यथाशक्ति नित्य प्रयत्न करीत रहावे. असे प्रयत्न तत्पर राहिल्यास निदान अश्वमेधाचे फल तरी निश्चितपणे मिळते. तूप हे जसे दुधात गुप्त स्वरूपात असते, तसेच प्रत्येक भूतांमध्ये विज्ञान हे असतेच असते. म्हणून घुसळण्य़ाच्या रवीप्रमाणे मनाचा उपयोग करून त्याचे सतत मंथन करावे. ज्ञानाची प्राप्ती झाल्यावरच मनुष्यप्राणी कृतकृत्य होतो असा वेदांतघोष आहे.
हे पर्वता, याप्रमाणे मी तुला संक्षेपाने का होईना, पण सर्व काही सांगितले आहे. आता तुला आणखी काय श्रवण करण्याची इच्छा आहे ते सत्वर सांग."