देव्युवाच
इत्यादियोगयुक्तात्मा ध्यायेन्मां ब्रह्मरूपिणीम् ।
भक्त्या निर्व्याजया राजन्नासने समुपस्थितः ॥ १ ॥
आविः सन्निहितं गुहाचरं नाम महत्पदम् ।
अत्रैतत्सर्वमर्पितमेजत्प्राणमिषच्च यत् ॥ २ ॥
एतज्जानथ सदसद्वरेण्यं
परं विज्ञानाद्यद्वरिष्ठं प्रजानाम् ।
यदर्चिमद्यदणुभ्योऽणु च
यस्मिंल्लोका निहिता लोकिनश्च ॥ ३ ॥
तदेतदक्षरं ब्रह्म स प्राणस्तदु वाङ्मनः ।
तदेतत्सत्यममृतं तद्वेद्धव्यं सौम्य विद्धि ॥ ४ ॥
धनुर्गृहीत्वौपनिषदं महास्त्रं
शरं ह्युपासानिशितं सन्धयीत ।
आयम्य तद्भावगतेन चेतसा
लक्ष्यं तदेवाक्षरं सौम्य विद्धि ॥ ५ ॥
प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते ।
अप्रमत्तेन वेद्धव्यं शरवत्तन्मयो भवेत् ॥ ६ ॥
यस्मिन् द्यौश्च पृथिवी चान्तरिक्ष-
मोतं मनः सह प्राणैश्च सर्वैः ।
तमेवैकं जानथात्मानं
अन्या वाचो विमुञ्चथामृतस्यैष सेतुः ॥ ७ ॥
अरा इव रथनाभौ संहता यत्र नाड्यः ।
स एषोऽन्तश्चरते बहुधा जायमानः ॥ ८ ॥
ओमित्येवं ध्यायथात्मानं
स्वस्ति वः पाराय तमसः परस्तात् ।
दिव्ये ब्रह्मपुरे व्योम्नि आत्मा सम्प्रतिष्ठितः ॥ ९ ॥
मनोमयः प्राणशरीरनेता
प्रतिष्ठितोऽन्ने हृदयं सन्निधाय ।
तद्विज्ञानेन परिपश्यन्ति धीरा
आनन्दरूपममृतं यद्विभाति ॥ १० ॥
भिद्यते हृदयग्रन्थिश्छिद्यन्ते सर्वसंशयाः ।
क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन्दृष्टे परावरे ॥ ११ ॥
हिरण्मये परे कोशे विराजं ब्रह्म निष्कलम् ।
तच्छुभ्रं ज्योतिषां ज्योतिस्तद्यदात्मविदो विदुः ॥ १२ ॥
न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं
नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः ।
तमेव भान्तमनुभाति सर्वं
तस्य भासा सर्वमिदं विभाति ॥ १३ ॥
ब्रह्मैवेदममृतं पुरस्ताद्ब्रह्म
पश्चाद्ब्रह्म दक्षिणतश्चोत्तरेण ।
अधश्चोर्ध्वं च प्रसृतं ब्रह्मैवेदं विश्वं वरिष्ठम् ॥ १४ ॥
एतादृगनुभवो यस्य स कृतार्थो नरोत्तमः ।
ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति ॥ १५ ॥
द्वितीयाद्वै भयं राजंस्तदभावाद् बिभेति न ।
न तद्वियोगो मेऽप्यस्ति मद्वियोगोऽपि तस्य न ॥ १६ ॥
अहमेव स सोऽहं वै निश्चितं विद्धि पर्वत ।
मद्दर्शनं तु तत्र स्याद्यत्र ज्ञानी स्थितो मम ॥ १७ ॥
नाहं तीर्थे न कैलासे वैकुण्ठे वा न कर्हिचित् ।
वसामि किन्तु मज्ज्ञानिहृदयाम्भोजमध्यमे ॥ १८ ॥
मत्पूजाकोटिफलदं सकृन्मज्ज्ञानिनोऽर्चनम् ।
कुलं पवित्रं तस्यास्ति जननी कृतकृत्यका ॥ १९ ॥
विश्वम्भरा पुण्यवती चिल्लयो यस्य चेतसः ।
ब्रह्मज्ञानं तु यत्पृष्टं त्वया पर्वतसत्तम ॥ २० ॥
कथितं तन्मया सर्वं नातो वक्तव्यमस्ति हि ।
इदं ज्येष्ठाय पुत्राय भक्तियुक्ताय शीलिने ॥ २१ ॥
शिष्याय च यथोक्ताय वक्तव्यं नान्यथा क्वचित् ।
यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ ॥ २२ ॥
तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः ।
येनोपदिष्टा विद्येयं स एव परमेश्वरः ॥ २३ ॥
यस्यायं सुकृतं कर्तुमसमर्थस्ततो ऋणी ।
पित्रोरप्यधिकः प्रोक्तो ब्रह्मजन्मप्रदायकः ॥ २४ ॥
पितृजातं जन्म नष्टं नेत्थं जातं कदाचन ।
तस्मै न द्रुह्येदित्यादि निगमोऽप्यवदन्नग ॥ २५ ॥
तस्माच्छास्त्रस्य सिद्धान्तो ब्रह्मदाता गुरुः परः ।
शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न शङ्करः ॥ २६ ॥
तस्मात्सर्वप्रयत्नेन श्रीगुरुं तोषयेन्नग ।
कायेन मनसा वाचा सर्वदा तत्परो भवेत् ॥ २७ ॥
अन्यथा तु कृतघ्नः स्यात्कृतघ्ने नास्ति निष्कृतिः ।
इन्द्रेणाथर्वणायोक्ता शिरश्छेदप्रतिज्ञया ॥ २८ ॥
अश्विभ्यां कथने तस्य शिरश्छिन्नं च वज्रिणा ।
अश्वीयं तच्छिरो नष्टं दृष्ट्वा वैद्यौ सुरोत्तमौ ॥ २९ ॥
पुनः संयोजितं स्वीयं ताभ्यां मुनिशिरस्तदा ।
इति सङ्कटसम्पाद्या ब्रह्मविद्या नगाधिप ।
लब्धा येन स धन्यः स्यात्कृतकृत्यश्च भूधर ॥ ३० ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां सप्तमस्कन्धे
देवीगीतायां ब्रह्मविद्योपदेशवर्णनं नाम षट्त्रिंशोऽध्यायः ॥ ३६ ॥
(देवीगीता ; अध्याय ५ वा) ब्रह्मतत्त्वाचे निरूपण
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
अशारीतीने देवीने योगस्वरूपाचे निरूपण केल्यावर ती पुढे म्हणाली, "हे पर्वतराजा, अशाप्रकारे मी पूर्वी सांगितलेल्या योगाने संपन्न होऊन आसनावर बसावे आणि अंतःकरण निष्कपट करून ब्रह्मस्वरूपिणी अशा माझे ध्यान करावे. नंतर जे प्रकाशरूप आहे, सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये जे स्थिर आहे, जे बुद्धिरूपी गुहेमध्ये खोलवर राहून दर्शन व श्रवण इत्यादि व्यवहार सहज करीत असते व जे अत्यंत श्रेष्ठ आहे ते माझे स्थान आहे. त्यामध्ये चालन, प्राणन, निमेषोन्मषण इत्यादि कार्ये होतात. ते सर्व वस्तुमात्रात भरून राहिलेले आहे.
हे देवहो, हे माझ्या सत्शिष्यांनो, ते जे माझे श्रेष्ठ पद आहे, याचेच तुम्ही सत्वर ज्ञान करून घ्या. तेच मूर्त व अमूर्त अशा दोन्ही पदार्थाचे स्वरूप आहे. म्हणून प्राण्यांच्या विज्ञानाहून ते श्रेष्ठ असून सर्वात वरिष्ठ अशा त्या ब्राह्मणपदाचीच सर्वांनी इच्छा धरणे यथायोग्य आहे. सूर्य व सूर्याप्रमाणे प्रकाशमान होणार्यांचे ते प्रकाशक असे दीप्तिस्थान आहे. ते अत्यंत दीप्तिमान, अणुहूनही अत्यंत अणु व ज्या ठिकाणी भू, स्वर्ग, पाताल इत्यादि लोकही सामावू शकतात असे विशालही आहे. ते अक्षय ब्रह्म, तेच प्राण, वाणी, मन, तेच सत्य आणि तेच ब्रह्मपद म्हणजे अमृत आहे.
हे प्रियदर्शन शिष्या पर्वता, त्या ब्रह्मतत्त्वालाच वेध करणे युक्त असल्याकारणाने तू त्यालाच वेध कर. तू विचारशील, "तो वेध मी कसा करावा ?" त्यासाठी मी सांगते ते ऐक.
उपनिषद्रूपी महाअस्त्र असलेले धनुष्य घेऊन त्याला उपासना करून पाजळून तीक्ष्ण केलेला बाण लावावा. इंद्रियांसहवर्तमान अंतःकरणाचे स्वतःच्या विषयांपासून आकर्षण करावे, त्या लक्ष्य ब्रह्माच्या ठिकाणी ज्याची भावना स्थिर आहे अशा शुद्ध मनाने त्या लक्ष्य झालेल्या अक्षर ब्रह्माला वेध करावा.
याचा अर्थ असा की प्रणव हे धनुष्य घेऊन उपाधियुक्त आत्मा हाच पाजळलेला बाण त्याला जोडावा व ब्रह्मतत्त्वाची अपेक्षा हे लक्ष्य समजावे. त्याला एकचिन्ह अंतःकरणाने वेध करावा व शराप्रमाणे त्याशी एकरूप व्हावे, त्यात मिसळून जावे.
भुलोक, पृथ्वी, अंतरिक्ष व सर्व कर्मेंद्रिये यासह मन ज्या आत्म्यात पूर्णपणे गोवलेले आहे अशा त्या एका आत्म्याचीच जाणीव ठेवावी. त्यावेळी अन्य वाग्व्यापार सोडून द्यावेत आणि सर्वसंग परित्याग करून त्यातच लीन व्हावे. कारण हाच एकमेव मोक्षाचा सेतु असून संसाररूपी प्रचंड महासागरातून तरून जाण्यासाठी हे एकच मुख्य साधन आहे. त्या साधनाने संसारमुक्त व्हावे.
रथाच्या नाभीत जशा आरा सर्वत्र असतात, तशा तेथे सर्व नाडया समुदायाने एकत्र जुळलेल्या आहेत. अशा हृदयात बुद्धीच्या प्रयत्नांनी पुष्कळ प्रकारे भासमान होणारा आत्मा तेथे राहतो. तेथे आत्म्याचे प्रतीक असलेला अथवा आत्म्याची संज्ञा असलेला असा जो प्रणव, त्याचाच आश्रय करावा व एकतानता पावून ध्यान करावे.
अशाप्रकारे ध्यानमग्न अवस्थेत गेल्यावर तमाच्या म्हणजे अविद्येच्या पैलतीरी तरून जाण्यास थोडाही वेळ लागत नाही. पण मध्येच साधकास काही विघ्न न येईल अशी दक्षता घ्यावी.
असे एकचित्त झाल्यावर तो आत्मा प्रकाशरूप अशा या ब्रह्मपुरात म्हणजे साधकांच्या हृदयपुंडरिकात जी पोकळी आहे त्या पोकळीत राहिला आहे असे वाटू लागते.
त्याचे कारण असे की साधकाची मनोवृती तेथे असल्यामुळे तो आत्मा तेथे आहे असे वाटते. तोच तेथे स्थिर असलेला आत्मा प्राण व शरीर यांचा नियंता आहे. अंताचा जेथे परिणाम होतो अशा त्या परिणामभूत हृदयामध्ये बुद्धि स्थिर करून त्या आत्म्याच्या साक्षात्कारानेच धैर्यशाली पुरुष आनंद व अमृताप्रमाणे असलेले जे ब्रह्म, ते त्या ठिकाणी पाहू शकतात.
नंतर त्या परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर हृदयग्रंथींचा भेद होतो, म्हणजेच चित् आणि जड यांचे जे तादात्म्य झालेले असते त्याचा भेद होतो आणि सर्व संशय व विकृति नाहीशा होतात. त्याची सर्व संचिते व त्यांनी केलेली सर्व फलापेक्षेची कर्मे क्षीण होतात.
सारांश, त्रिगुणरहित मायाशून्य, निर्मल, सूर्य वगैरे ज्योतींनाही प्रकाश देणारे व फक्त केवल ज्ञानीच जे जाणू शकतात ते ब्रह्म ज्योतिरूप अशा त्या आनंदमय कोशात नित्य राहते.
त्या ब्रह्माच्या ठिकाणी सूर्य प्रकाशित होत नाही, चंद्राचे तेज रहात नाही व तारकांची ज्योति टिकाव धरीत नाही. मग हा अग्नी तरी त्या आत्म्यापुढे कोठून असणार ?
कारण त्याच्याच सत्तेने सर्व ज्योति प्रकाशित होतात व त्याच्याच प्रकाशामुळे हे सर्व वस्तुजात आपणास जाणवते.
मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे हे अमृतरूप ब्रह्मच पुढे आहे, तेच मागेही आहे, दक्षिणेकडेही तेच असते व उत्तरेकडेही त्याच ब्रह्माची जाणीव होते. खाली-वर असे सर्वत्र तेच एकमेव ब्रह्म पसरलेले आहे. इतकेच काय, पण हे जे दृश्य जगत् आहे तेही ब्रह्मच आहे. थोडक्यात असे की असा हा अनुभव ज्याला प्राप्त होतो तोच पुरुषश्रेष्ठ कृतार्थ समजावा.
तोच ब्रह्मरूप झाल्यामुळे त्याचे अंतःकरण प्रसन्न होते. तो कधीही शोक करीत नाही किंवा अप्राप्त वस्तुविषयी कधी खेद करीत नाही. प्रिय वस्तुविषयी कशाची इच्छाही करीत नाही.
हे शैलराजा, द्वैतभाव मनात बाळगल्यास भय उत्पन्न होते हे तर सर्वत्र विदीतच आहे. पण द्वैताचा अभाव झाल्यावर अद्वैतवादी वृत्ती बनल्यामुळे आत्मज्ञानी कधीही भीत नाही. त्यामुळे त्याचा व माझा एकमेकांपासून कधीही, कुठेही वियोग होत नाही हे सत्य आहे.
हे पर्वता, मीच तो व तोच मी आहे असे तू शंका मनात न ठेवता जाण. मला जाणणार्यास तो त्या ठिकाणी असेल तेथेच माझे सत्वर दर्शन घडते. मी तीर्थाचे ठिकाणी वास्तव्य करते किंवा कैलासपर्वतावर राहते अथवा वैकुंठातच माझा नित्य वास असतो हे समजणे खरे नाही. माझ्या स्वरूपाचा ज्याला साक्षात्कार झाला आहे अशा ज्ञानी पुरुषाच्या हृदयकमलामध्ये माझे नित्य वास्तव्य असते यात संशय नाही.
माझी पूजा करण्यापेक्षाही माझा साक्षात्कार ज्याला झाला आहे त्याचे पूजन करणे हे कोटी फले देणारे पुण्य आहे. अशा या पूजकाचे कुल पवित्र होते, त्याचा उद्धार होतो व त्या पूजकाची माता कृतार्थ व धन्य होय. ज्या साधकाच्या अंतःकरणाचा लय चैतन्यामध्ये झालेला असतो त्याच्या योगाने पृथ्वीही पुण्यवती होते. इतके त्या साधकाचे ऐश्वर्य मोठे आहे.
हे पर्वतोत्तमा, तू मला जे ब्रह्मज्ञानाविषयी विचारलेस ते मी तुला यथाशक्ती पूर्ण विस्ताराने कथन केले. आता यापेक्षा अधिक वेगळे सांगण्यासारखे काहीच या जगात राहिले नाही.
हे जे ब्रह्मज्ञान मी सांगितले ते फक्त अत्यंत शीलसंपन्न व श्रद्धेने भक्ती करणार्या अशा ज्येष्ठ वा श्रेष्ठ पुत्रालाच किंवा अशाच प्रकारची स्थिती प्राप्त झालेल्या सत्शिष्यालाच निवेदन करावे. याशिवाय इतर कोणालाही हे ब्रह्मज्ञान सांगू नये. ज्याची देहावर व देवाप्रमाणेच गुरूवर आत्यंतिक श्रेष्ठ अशी श्रद्धा आहे, भक्ती आहे, अशा त्या महात्म्यालाच ते सांगितले तर त्यातील अर्थबोध त्याला होतो, इतरांना तो बोध होत नाही.
ज्याने गुरूरुपाने त्या ब्रह्मविद्येचा उपदेश केला असेल तो त्या शिष्याचा परमेश्वर होय. हा शिष्य त्या गुरूवर पुन्हा प्रती उपकार करण्यास सदैव असमर्थ असतो. म्हणून मरेपर्यंत तो ब्रह्मोपदेश देणार्या गुरूचा ऋणी होऊन रहातो. कारण ब्रह्मोपदेश देऊन गुरू शिष्याचा पुनर्जन्म करतो. म्हणून माता-पित्यांपेक्षा तो अधिक श्रेष्ठ होय असे धर्मशास्त्र सांगते.
हे पर्वता, पित्यापासून मातेच्या उदरातून प्राप्त झालेला जन्म नष्ट होतो, पण ब्रह्मोपदेश मिळाल्यामुळे जो पुनर्जन्म प्राप्त होतो तो नष्ट होत नाही. म्हणून गुरूचा कधीही द्रोह करू नये असे वेदही सांगत आले आहेत. ब्रह्म प्राप्त करून देणारा गुरू हा सर्वात श्रेष्ठ आहे असा शास्त्र सिद्धांतच ठरतो.
शंकर रागावले असता गुरू रक्षण करतो. गुरू जर रागावले तर त्याचे कोणीच काय पण शंकरही रक्षण करू शकत नाही.
म्हणून हे पर्वता, सर्व प्रयत्नांनी प्रथम गुरूला संतुष्ट करावे व काया, वाचा, मने करून त्याच्या सेवेविषयी नित्य तत्पर रहावे. असे न करणारा शिष्य अत्यंत कृतघ्न व नीच होय व अशा कृतघ्न वृत्तीला शास्त्रात कोठेही प्रायश्चित्त नाही.
इंद्राने दध्यङ्अथर्वणाला शिरच्छेदाची प्रतीज्ञा करूनच ब्रह्मविद्या सांगितली. पुढे त्याने ती विद्या अश्विनीकुमारांना सांगितली. त्यामुळे प्रतिज्ञेप्रमाणे इंद्राने त्याचा शिरच्छेद केला. नंतर त्या आपल्या गुरूचे ते अश्वशीर नष्ट झाले आहे असे अवलोकन करून पुन्हा त्या मुनीचे शीर पूर्ववत जोडले.
सारांश, हे हिमालया, हे भूधरा, अनेक संकटे सोसल्यावरच प्राप्त होणारी अशी ती ब्रह्मविद्या आहे. ज्याने महत्प्रयासाने ती आत्मसात करून घेतली आहे, तो खरोखरच धन्य होय. तो खरा मुक्त होय.