श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
सप्तमः स्कन्धः
पञ्चत्रिंशोऽध्यायः


देवीगीतायां मन्त्रसिद्धिसाधनवर्णनम्

हिमालय उवाच
योगं वद महेशानि साङ्गं संवित्प्रदायकम् ।
कृतेन येन योग्योऽहं भवेयं तत्त्वदर्शने ॥ १ ॥
श्रीदेव्युवाच
न योगो नभसः पृष्ठे न भूमौ न रसातले ।
ऐक्यं जीवात्मनोराहुर्योगं योगविशारदाः ॥ २ ॥
तत्प्रत्यूहाः षडाख्याता योगविघ्नकरानघ ।
कामक्रोधौ लोभमोहौ मदमात्सर्यसञ्ज्ञकौ ॥ ३ ॥
योगाङ्गैरेव भित्त्वा तान्योगिनो योगमाप्नुयुः ।
यमं नियममासनप्राणायामौ ततः परम् ॥ ४ ॥
प्रत्याहारं धारणाख्यं ध्यानं सार्धं समाधिना ।
अष्टाङ्गान्याहुरेतानि योगिनां योगसाधने ॥ ५ ॥
अहिंसा सत्यमस्तेयं ब्रह्मचर्यं दयाऽऽर्जवम् ।
क्षमा धृतिर्मिताहारः शौचं चेति यमा दश ॥ ६ ॥
तपः सन्तोष आस्तिक्यं दानं देवस्य पूजनम् ।
सिद्धान्तश्रवणं चैव ह्रीर्मतिश्च जपो हुतम् ॥ ७ ॥
दशैते नियमाः प्रोक्ता मया पर्वतनायक ।
पद्मासनं स्वस्तिकं च भद्रं वज्रासनं तथा ॥ ८ ॥
वीरासनमिति प्रोक्तं क्रमादासनपञ्चकम् ।
ऊर्वोरुपरि विन्यस्य सम्यक्पादतले शुभे ॥ ९ ॥
अङ्गुष्ठौ च निबध्नीयाद्धस्ताभ्यां व्युत्क्रमात्ततः ।
पद्मासनमिति प्रोक्तं योगिनां हृदयङ्गमम् ॥ १० ॥
जानूर्वोरन्तरे सम्यक्कृत्वा पादतले शुभे ।
ऋजुकायो विशेद्योगी स्वस्तिकं तत्प्रचक्षते ॥ ११ ॥
सीवन्याः पार्श्वयोर्न्यस्य गुल्फयुग्मं सुनिश्चितम् ।
वृषणाधः पादपार्ष्णी पार्ष्णिभ्यां परिबन्धयेत् ॥ १२ ॥
भद्रासनमिति प्रोक्तं योगिभिः परिपूजितम् ।
उर्वोः पादौ क्रमान्न्यस्य जान्वोः प्रत्यङ्मुखाङ्गुली ॥ १३ ॥
करौ विदध्यादाख्यातं वज्रासनमनुत्तमम् ।
एकं पादमधः कृत्वा विन्यस्योरुं तथोत्तरे ॥ १४ ॥
ऋजुकायो विशेद्योगी वीरासनमितीरितम् ।
इडयाऽऽकर्षयेद्‌वायुं बाह्यं षोडशमात्रया ॥ १५ ॥
धारयेत्पूरितं योगी चतुःषष्ट्या तु मात्रया ।
सुषुम्नामध्यगं सम्यग्द्वात्रिंशन्मात्रया शनैः ॥ १६ ॥
नाड्या पिङ्गलया चैव रेचयेद्योगवित्तमः ।
प्राणायाममिमं प्राहूर्योगशास्त्रविशारदाः ॥ १७ ॥
भूयो भूयः क्रमात्तस्य बाह्यमेवं समाचरेत् ।
मात्रावृद्धिः क्रमेणैव सम्यग्द्वादश षोडश ॥ १८ ॥
जपध्यानादिभिः सार्धं सगर्भं तं विदुर्बुधाः ।
तदपेतं विगर्भं च प्राणायामं परे विदुः ॥ १९ ॥
क्रमादभ्यस्यतः पुंसो देहे स्वेदोद्‌गमोऽधमः ।
मध्यमः कम्पसंयुक्तो भूमित्यागः परो मतः ॥ २० ॥
उत्तमस्य गुणावाप्तिर्यावच्छीलनमिष्यते ।
इन्द्रियाणां विचरतां विषयेषु निरर्गलम् ॥ २१ ॥
बलादाहरणं तेभ्यः प्रत्याहारोऽभिधीयते ।
अङ्गुष्ठगुल्फजानूरुमूलाधोलिङ्गनाभिषु ॥ २२ ॥
हृद्ग्रीवाकण्ठदेशेषु लम्बिकायां ततो नसि ।
भ्रूमध्ये मस्तके मूर्ध्नि द्वादशान्ते यथाविधि ॥ २३ ॥
धारणं प्राणमरुतो धारणेति निगद्यते ।
समाहितेन मनसा चैतन्यान्तरवर्तिना ॥ २४ ॥
आत्मन्यभीष्टदेवानां ध्यानं ध्यानमिहोच्यते ।
समत्वभावना नित्यं जीवात्मपरमात्मनोः ॥ २५ ॥
समाधिमाहुर्मुनयः प्रोक्तमष्टाङ्गलक्षणम् ।
इदानीं कथये तेऽहं मन्त्रयोगमनुत्तमम् ॥ २६ ॥
विश्वं शरीरमित्युक्तं पञ्चभूतात्मकं नग ।
चन्द्रसूर्याग्नितेजोभिर्जीवब्रह्मैक्यरूपकम् ॥ २७ ॥
तिस्रः कोट्यस्तदर्धेन शरीरे नाडयो मताः ।
तासु मुख्या दश प्रोक्तास्ताभ्यस्तिस्रो व्यवस्थिताः ॥ २८ ॥
प्रधाना मेरुदण्डेऽत्र चन्द्रसूर्याग्ररूपिणी ।
इडा वामे स्थिता नाडी शुभ्रा तु चन्द्ररूपिणी ॥ २९ ॥
शक्तिरूपा तु सा नाडी साक्षादमृतविग्रहा ।
दक्षिणे या पिङ्गलाख्या पुंरूपा सूर्यविग्रहा ॥ ३० ॥
सर्वतेजोमयी सा तु सुषुम्ना वह्निरूपिणी ।
तस्या मध्ये विचित्राख्ये इच्छाज्ञानक्रियात्मकम् ॥ ३१ ॥
मध्ये स्वयंभूलिङ्गं तु कोटिसूर्यसमप्रभम् ।
तदूर्ध्वं मायाबीजं तु हरात्माबिन्दुनादकम् ॥ ३२ ॥
तदूर्ध्वं तु शिखाकारा कुण्डली रक्तविग्रहा ।
देव्यात्मिका तु सा प्रोक्ता मदभिन्ना नगाधिप ॥ ३३ ॥
तद्बाह्ये हेमरूपाभं वादिसान्तचतुर्दलम् ।
द्रुतहेमसमप्रख्यं पद्मं तत्र विचिन्तयेत् ॥ ३४ ॥
तदूर्ध्वं त्वनलप्रख्यं षड्दलं हीरकप्रभम् ।
बादिलान्तषड्वर्णेन स्वाधिष्ठानमनुत्तमम् ॥ ३५ ॥
मूलमाधारषट्कोणं मूलाधारं ततो विदुः ।
स्वशब्देन परं लिङ्गं स्वाधिष्ठानं ततो विदुः ॥ ३६ ॥
तदूर्ध्वं नाभिदेशे तु मणिपूरं महाप्रभम् ।
मेघाभं विद्युदाभं च बहुतेजोमयं ततः ॥ ३७ ॥
मणिवद्‌भिन्नं तत्पद्मं मणिपद्मं तथोच्यते ।
दशभिश्च दलैर्युक्तं डादिफान्ताक्षरान्वितम् ॥ ३८ ॥
विष्णुनाधिष्ठितं पद्मं विष्ण्वालोकनकारणम् ।
तदूर्ध्वेऽनाहतं पद्ममुद्यदादित्यसन्निभम् ॥ ३९ ॥
कादिठान्तदलैरर्कपत्रैश्च समधिष्ठितम् ।
तन्मध्ये बाणलिङ्गं तु सूर्यायुतसमप्रभम् ॥ ४० ॥
शब्दब्रह्ममयं शब्दानाहतं तत्र दृश्यते ।
अनाहताख्यं तत्पद्मं मुनिभिः परिकीर्तितम् ॥ ४१ ॥
आनन्दसदनं तत्तु पुरुषाधिष्ठितं परम् ।
तदूर्ध्वं तु विशुद्धाख्यं दलं षोडशपङ्कजम् ॥ ४२ ॥
स्वरैः षोडशभिर्युक्तं धूम्रवर्णम् महाप्रभम् ।
विशुद्धं तनुते यस्माज्जीवस्य हंसलोकनात् ॥ ४३ ॥
विशुद्धं पद्ममाख्यातमाकाशाख्यं महाद्‌भुतम् ।
आज्ञाचक्रं तदूर्ध्वं तु आत्मनाधिष्ठितं परम् ॥ ४४ ॥
आज्ञासंक्रमणं तत्र तेनाज्ञेति प्रकीर्तितम् ।
द्विदलं हक्षसंयुक्तं पद्मं तत्सुमनोहरम् ॥ ४५ ॥
कैलासाख्यं तदूर्ध्वं तु रोधिनी तु तदूर्ध्वतः ।
एवं त्वाधारचक्राणि प्रोक्तानि तव सुव्रत ॥ ४६ ॥
सहस्रारयुतं बिन्दुस्थानं तदूर्ध्वमीरितम् ।
इत्येतत्कथितं सर्वं योगमार्गमनुत्तमम् ॥ ४७ ॥
आदौ पूरकयोगेनाप्याधारे योजयेन्मनः ।
गुदमेढ्रान्तरे शक्तिस्तामाकुञ्च्य प्रबोधयेत् ॥ ४८ ॥
लिङ्गभेदक्रमेणैव बिन्दुचक्रं च प्रापयेत् ।
शम्भुना तां परां शक्तिमेकीभूतां विचिन्तयेत् ॥ ४९ ॥
तत्रोत्थितामृतं यत्तु द्रुतलाक्षारसोपमम् ।
पाययित्वा तु तां शक्तिं मायाख्यां योगसिद्धिदाम् ॥ ५० ॥
षड्चक्रदेवतास्तत्र सन्तर्प्यामृतधारया ।
आनयेत्तेन मार्गेण मूलाधारं ततः सुधीः ॥ ५१ ॥
एवमभ्यस्यमानस्याप्यहन्यहनि निश्चितम् ।
पूर्वोक्तदूषिता मन्त्राः सर्वे सिध्यन्ति नान्यथा ॥ ५२ ॥
जरामरणदुःखाद्यैर्मुच्यते भवबन्धनात् ।
ये गुणाः सन्ति देव्या मे जगन्मातुर्यथा तथा ॥ ५३ ॥
ते गुणाः साधकवरे भवन्त्येव न चान्यथा ।
इत्येवं कथितं तात वायुधारणमुत्तमम् ॥ ५४ ॥
इदानीं धारणाख्यं तु शृणुष्वावहितो मम ।
दिक्कालाद्यनवच्छिन्नदेव्यां चेतो विधाय च ॥ ५५ ॥
तन्मयो भवति क्षिप्रं जीवब्रह्मैक्ययोजनात् ।
अथवा समलं चेतो यदि क्षिप्रं न सिद्ध्यति ॥ ५६ ॥
तदावयवयोगेन योगी योगान्समभ्यसेत् ।
मदीयहस्तपादादावङ्गे तु मधुरे नग ॥ ५७ ॥
चित्तं संस्थापयेन्मन्त्री स्थानस्थानजयात्पुनः ।
विशुद्धचित्तः सर्वस्मिन्‌रूपे संस्थापयेन्मनः ॥ ५८ ॥
यावन्मनो लयं याति देव्यां संविदि पर्वत ।
तावदिष्टमनुं मन्त्री जपहोमैः समभ्यसेत् ॥ ५९ ॥
मन्त्राभ्यासेन योगेन ज्ञेयज्ञानाय कल्पते ।
न योगेन विना मन्त्रो न मन्त्रेण विना हि सः ॥ ६० ॥
द्वयोरभ्यासयोगो हि ब्रह्मसंसिद्धिकारणम् ।
तमः परिवृते गेहे घटो दीपेन दृश्यते ॥ ६१ ॥
एवं मायावृतो ह्यात्मा मनुना गोचरीकृतः ।
इति योगविधिः कृत्स्नः साङ्गः प्रोक्तो मयाऽधुना ॥ ६२ ॥
गुरूपदेशतो ज्ञेयो नान्यथा शास्त्रकोटिभिः ॥ ६३ ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां सप्तमस्कन्धे
देवीगीतायां मन्त्रसिद्धिसाधनवर्णनं नाम पञ्चत्रिंशोऽध्यायः ॥ ३५ ॥


(देवीगीता ; अध्याय ४ था) योग स्वरूपाचे निरुपण

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

हिमालयाने हात जोडून देवीस विचारले, "हे देवी, मी कोणते अनुष्ठान करू म्हणजे मी तत्त्वदर्शनास योग्य व समर्थ होईन ? हे महेश्‍वरी, तत्त्वदर्शनासाठी योग्य असा आत्मज्ञान देणारा योग मला सांग."

देवीला हिमालयाच्या उत्सुकतेमुळे आनंद झाला. ती म्हणाली, "पर्वतश्रेष्ठा, तत्त्वदर्शनाचा योग हा कुठेही उपलब्ध नाही. तो स्वर्गावर नाही, भूलोकी नाही आणि रसातलातही आढळणार नाही. तर योग म्हणजे दुसरे तिसरे साधन नसून जीवात्मा व परमात्मा याचे ऐक्य करता येणे हाच तो योग होय. योगात निपुण असलेले योगीजन असेच सांगतात.

हे निष्पापा, हा योग सहजसाध्य नाही. या योगाला नित्य विरोध होत असतो. या योगाचे विरोधक म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या नावाचे सहा शत्रु आहेत. यांनाच षड्‌रिपु म्हणतात. योगी पुरुष योगाच्या सहाय्याने समर्थ होऊन ह्या षड्‌रिपुंना नाहीसे करून टाकतात आणि नंतर योगसिद्धी मिळवितात.

योगसाधनेसाठी पुढीलप्रमाणे आठ अंगे योग्यांनी उपयोगात आणली पाहिजेत. ती आठ अंग अशी; प्रथम यम, नियम, त्यानंतर आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधि ही आठ अंगे पंडितांनी निवेदन केली आहेत.

यम हे दहा प्रकारचे असून ते आता सांगते. अहिंसा, सत्य, चौर्यकर्म न करणे, दया, ब्रह्मचर्य, सरळपणा, क्षमा, धैर्य, मिताहार व निर्मलपणा असे हे दहा यम सांगितले जातात.

यमाप्रमाणेच, हे पर्वता, नियमाचेही दहा प्रकार आहेत. ते असे - तप, संतोष, आस्तिकपणा, दान, देवाचे पूजन, वेदांतातील सिद्धांताचे श्रवण करणे, दुष्कार्याची लज्जा बाळगणे, आपली बुद्धी सच्छास्त्रात रममाण करणे, मंत्राचा जप करणे व स्तवन करणे इत्यादी निरनिराळ्या प्रकारचे हे दहा नियम सांगितले आहेत.

हे हिमाद्रे, आता याच्या पुढील आसन याविषयी मी तुला सांगते. आसने पाच प्रकारची आहेत. पद्मासन, स्वस्तिकासन, भद्रासन, वज्रासन आणि वीरासन अशी ही अनुक्रमाने पाच आसने सांगितलेली आहेत.

आपली शुभ पावले चांगल्या स्थितीत मांडयांवर ठेवावी व उलट हातांनी त्या पावलांचे अंगठे घटट धरावेत. (उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा घट्ट धरावा आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा घटट धरावा, पण हात पाठीमागून पुढे घ्यावेत.) या आसनालाच पद्मासन ही संज्ञा आहे. हे आसन योग्यांना अत्यंत हृदयंगम वाटते.

स्वच्छ पावले मांडी आणि गुडघा यांच्यामध्ये घालून शरीर ताठ ठेवून सरळ बसावे. या आसनाला स्वस्तिकासन म्हणतात.

सिवनीच्या दोन्ही बाजूला दोन्ही घोटे अगदी घटट बसवावेत व नंतर वृषणाच्या खाली असलेल्या पायाचे घोटे हातांनी घटट एकत्र धरावे. अशाप्रकारे स्थिती झाली असता जे आसन होते तेच भद्रासन होय. सर्व योग्यांना हे आसन फार मान्य आहे.

आता पुढले आसन पाहू. डाव्या मांडीवर उजवे पाऊल व उजव्या मांडीवर डावे पाऊल ठेवून त्यांची बोटे गुडघ्यात घुसवावीत. नंतर त्यावर हात ठेवावेत. या आसनाला वज्रासन म्हणतात. योग्यांच्या मते हे आसन फारच निरूपम आहे.

एक पाय खाली ठेवून त्यावर दुसरी मांडी ठेवावी व हे आसन करणार्‍या योग्यांनी आपले देह सरळ ठेवून बसावे. या आसनाला वीरासन म्हणतात. हे वीरांना शोभणारे आहे.

हे पर्वतराजा, आता प्राणायाम म्हणजे काय ते मी तुला सांगते. सोळा वेळा प्रणवाचा स्पष्ट उच्चार करावा. नंतर डाव्या नाकपुडीने बाहेरील वायु ओढुन घ्यावा. त्याला पूरक असे म्हणतात. प्रणवाचे चौसष्ट उच्चार होईपर्यंत योग्याने त्या वायूला सुषुप्नेमध्ये कोंडून धरावे. यालाही पूरक अशीच संज्ञा आहे. नंतर प्रणवाचे बत्तीस उच्चार पुन्हा करावेत. हे उच्चार करीत असता पिंगला नाडीचे म्हणजे आपल्या उजव्या नाकपुडीने तो कोंडलेल्या प्राणवायु सावकाश गतीने बाहेर सोडून द्यावा. या स्थितीला योगी रेचक असे संबोधतात. योगशास्त्रात जे लोक निपुण असतात तेच योगी होत. ते या अवस्थेला प्राणायाम या नावाने ओळखतात.

अशा तर्‍हेने क्रमाक्रमाने इडा व पिंगला या नाडयांच्या द्वारा बाहेरील वायूचे ग्रहण करणे आणि प्राणवायूचे विरेचन करणे व त्याबरोबरच बारा वेळा अथवा सोळा वेळा योग्य त्या क्रमाने प्रणवोच्चाराची वृद्धि करीत रहावे. जप करणे, ध्यानमग्न होणे इत्यादिसह केलेल्या प्राणायामाला सगर्भ प्राणायाम असे म्हणतात व याशिवाय इतर वेगळ्या प्रकारे या पद्धतीविरहित केलेल्या प्राणायामाला विगर्भ प्राणायाम म्हणावे असे योगाचे ज्ञानी व अभ्यासू यांचे म्हणणे आहे.

अशारीतीने यथावकाश व क्रमाक्रमाने या योगशास्त्राचा अभ्यास करीत रहावे. अशावेळी पुरुषाला घाम येऊ लागला तर तो प्राणायाम अधम असून नीच होय. अशा प्रकारच्या प्राणायामाच्या वेळी जर शरीर थरथर कंप पावू लागले तर तो मध्यम फल देणारा प्राणायाम होय. पण प्राणायाम चालू असता तर योग्याच्या देहाने भूमीला सोडले तर तो सर्वोत्तम प्राणायाम होऊन फलदायी होतो. योगशास्त्रात सांगितलेल्या गुणांची प्राप्ती होईपर्यंत या उत्तम प्राणायामाचा सतत अभ्यास करावा असे त्या शास्त्राचे सांगणे आहे.

इंद्रिये विषयाच्या ठिकाणी सत्वर प्रवृत्त होतात. त्यांना त्या विषयलालसेपासून बलात्काराने परत फिरविणे व निर्विघ्नपणे त्या इंद्रियांना ताब्यात ठेवणे यालाच प्रत्याहार असे म्हटलेले आहे.

आंगठे, घोटे, गुडघे, मांडया, मूलाधार, लिंग, नाभी यांच्या ठिकाणी व हृदय, ग्रीवा, कंठस्थान, त्यानंतर लंबिका (घाटी), व नाक, भिवयांचा मध्यप्रदेश, मस्तक, मूर्धा, सर्वात शेवटचे ब्रह्मरंध्र ह्या ठिकाणी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे प्राणवायु जे धारण करणे घडते तिलाच धारणा या संज्ञेने प्राज्ञजन संबोधतात.

सर्व वृत्तींपासून परावृत्त होऊन निर्मल व चैतन्यामध्येच स्थिर रहाणार्‍या अंतःकरणाने त्याच ठिकाणी आपल्याला अत्यंत प्रिय अशा देवतेचे चिंतन करावे. त्या एकाग्र चिंतनालाच या शास्त्रात ध्यान म्हणतात.

हे पर्वता, जीवात्मा व परमात्मा यांच्या ऐक्याविषयी मनात सतत जी भावना योगी स्थिर करतो तिलाच मुनीजन समाधी असे संबोधतात.

हे पर्वतश्रेष्ठा, अशाप्रकारे ही अष्टांगाची लक्षणे आहेत ती मी विस्ताराने सांगितली.

हे हिमालया, आता मी तुला सर्वात उत्तम असलेला असा जो मंत्रयोग आहे तो सांगते. हे शरीर म्हणजे ब्रह्मांडच आहे. मनात दृढ विचार धरावा. कारण हे शरीर पंचमहाभूतांपासून निर्माण झाले आहे. चंद्र, सूर्य, अग्नि इत्यादींनी ते युक्त आहे व ते जीवब्रह्माशी एक आहे, म्हणून ते त्याशी एकरूपच आहे.

शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या शरीरात साडेतीन कोटी नाडया संभवतात. त्यात दहा नाडया प्रमुख आहेत. त्या दहा नाडयात वैशिष्टयपूर्ण व महत्त्वाच्या तीन नाडया आहेत. त्यांची एक विशिष्ट प्रकारची व्यवस्था आहे. या तीन नाडयांपैकी सुषुम्ना नावाची नाडी ही सर्वात प्रमुख नाडी आहे. ती या सर्व शरीराच्या पृष्ठभागी आहे. म्हणजे मेरूदंड म्हणून ज्याला संबोधतात त्या पाठीच्या कण्यात ती सुषुम्ना नाडी आहे. ती चंद्र, सूर्य व अग्निरूपाने युक्त आहे.

डाव्या बाजूस इडा या नावाची नाडी आहे. तिचा वर्ण शुभ्र असून ती चंद्ररूपाप्रमाणे आहे. तसेच उजव्या बाजूस पिंगला नावाची नाडी आहे. ती पुरुषरूपी असून सूर्याप्रमाणे सतेज, शक्तीस्वरूपाची व साक्षात् अमृतात्मक आहे.

अग्नीसारखी दैदीप्यमान भासणारी जी तुषुम्ना नाडी आहे ती सर्व तेजांनी युक्त आहे. तिच्यामध्ये विचित्रा नावाची आणखी एक नाडी आहे. त्या विचित्रा नाडीत इच्छा, ज्ञान, क्रियारूप व कोटिसूर्यासारखे तेजस्वी असे स्वयंभू लिंग आहे. त्यावर हकार, रकार, ईकार रूपाने बिंदुनादात्मक असे मायाबीज वास्तव्य करीत असते.

हे पर्वतश्रेष्ठा, त्या मायाबीजावर दिव्याच्या ज्योतीप्रमाणे लालसर आकृतीची कुंडलिनी आहे. तीच देवीरुप आहे असे म्हणतात. ती ज्योतीच्या आकाराची कुंडलिनी माझ्यापासून वेगळी नाही. ती माझेच रूपात विलीन झालेली आहे.

तिच्या बाहेरच्या बाजूला सुवर्णाप्रमाणे भासणारे असे पिवळ्या रंगाचे व, श, ष, स या चार वर्णानी युक्त असलेले चार दलांचे व कढवलेल्या सुवर्णाप्रमाणे अत्यंत तेजस्वी असे कमल आहे. त्या कमलाचे नित्य चिंतन करावे.

या कमलावर अग्नीप्रमाणे व उज्ज्वल अशा हिर्‍याप्रमाणे असलेल्या वर्णाचे सहा दलांचे ब, भ, म, य, र, ल या सहा वर्णांनी असे आणखी एक कमल कल्पावे. मूलधार व षट्‌कोणयुक्त असे ते कमल असून त्यामुळे त्याला मूलाधार या नावाने ओळखतात. ते परलिंग, स्वशब्दवाच्य असल्यामुळे त्याला स्वाधिष्ठान असे म्हणतात.

त्याच्याही वरच्या बाजूस म्हणजे नाभीकमलाच्या प्रदेशात मणिपूर नावाचे अत्यंत तेजस्वी, मेघ व विद्युल्लता यांच्या आकाराचे व महातेजस्वी असे एक कमल आहे. ते रत्‍नाप्रमाणे तेजस्वी असून विकसित असलेले आहे. त्यामुळे त्याला मणिपद्म असे संबोधतात. ते मणिपद्म ड पासून फ पर्यंत जी बारा अक्षरे आहेत त्या अक्षरांनी युक्त असून त्या बाराक्षर पाकळ्यांनी ते सुशोभित केले आहे. ते मणिपद्म नावाचे कमल प्रत्यक्ष विष्णूचे अधिष्ठान असून तेच विष्णुदर्शनास कारण आहे.

त्या मणिपद्माच्या वरील बाजूस आणखी एक कमल आहे. त्याला अनाहत या नावाने संबोधले आहे. त्याची कांती उदयकालाच्या सूर्यासारखी असून क पासून ठ पर्यंत जी बारा अक्षरे आहेत त्यांनी ते युक्त आहे. ती बाराक्षरे म्हणजे याची बारा दले आहेत.

त्या अनाहत कमलामध्ये हजार सूर्य एकाच वेळी तळपावेत असे तेज असलेले सतेज बाणलिंग आहे. त्याठिकाणी प्रयत्‍नाशिवाय उत्पन्न होणारे ते ब्रह्मरूप असलेले सहज वेद दिसत असतात. त्या कमलाचे अनाहत हे नाव मुनींनी सांगितले आहे. ते कमलच रुद्राचे अधिष्ठान असलेले श्रेष्ठ असे पद असून आनंदाचे निधान आहे.

त्यावर विशुद्ध नावाचे सोळा पाकळ्या असलेले सुंदर कमल आहे. सोळा स्वरांनी त्या कमलाची सोळा दले तयार केली आहेत. ते कमल धूम्र वर्णाचे असले तरी अत्यंत प्रखर आहे. ते कमल जीवाला परमात्म सुखाचे दर्शन घडविते आणि त्याला अत्यंत शुद्ध करते म्हणून त्या पद्माला विशुद्धपद असे यथार्थ नाव प्राप्त झाले.

त्याच्यावरील भागात आकाश या नावाचे अत्यंत अद्‌भुत असे एक कमल आहे. तेच आज्ञाचक्र आहे. आत्म्याचे सर्वश्रेष्ठ अधिष्ठान तेच कमल आहे. त्याच ठिकाणी सर्व भूत, भविष्य व वर्तमान अशा सर्वकालातील आज्ञा उत्पन्न होत असतात, म्हणजे, "आता यानंतर तू अशा मार्गाने जावेस, तुझे वर्तन असे असावे" वगैरे ज्या ईश्‍वराच्या आज्ञा असतात त्या तेथून सुटलेल्या असतात. म्हणूनच तर त्याला आज्ञाचक्र असे प्राज्ञजन म्हणतात. ते कमल अत्यंत नयन मनोहर असून ह आणि क्ष या दोनच अक्षरांनी युक्त आहे.

हे सदाचारी पर्वता, त्या कमलावर कैलास नावाचे चक्र व त्या कैलास चक्रावर रोधिनी नावाचे सुंदर चक्र आहे. ह्याप्रमाणे सर्व आधार चक्राचे मी तुला विस्ताराने निवेदन केले. हजार अरांनी युक्त असलेले जे परमात्म्याचे महन्‌मंगल असे स्थान आहे ते तर सर्वांच्याही वर आहे व श्रेष्ठ आहे असे शास्त्रांत सांगितले आहे.

थोडक्यात सांगायचे इतकेच की हा मी सांगितलेला सर्वोत्तम योगमार्ग समजून प्रथम पूरकाच्या स्थितीने वायु घ्यावा व त्याचा कुंभक करून मनाला मूलाधारी नेऊन स्थिर करावे.

नंतर गुद व मेंदु याच्यामध्ये वास्तव्य करीत असलेली जी कुंडलिनी शक्ति त्या कुंडलिनीला त्या वायूच्या सहाय्याने पिडा द्यावी म्हणजे ती जागृत होते. नंतर अनुक्रमाने अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व स्वयंभु वगैरे लिंगांचा भेद करावा. कुंडलिनीला शेवटच्या बिंदुचक्रापर्यंत न्यावे व नंतर ती शक्ती परमात्मा शंकर यांच्याशी ऐक्यरूप होईल असे चिंतन करावे.

त्या ठिकाणी उष्णता देऊन पातळ केलेल्या लाक्षारसाप्रमाणे दिसणारे असे अमृत उत्पन्न होते. ते अमृत योगसिध्दी देणार्‍या माया नावाच्या शक्तीला पाजावे व नंतर सहा चक्रांमध्ये अधिष्ठित असलेले देव यांना त्या अमृतधारा पाजून तृप्त करावे नंतर त्याच मार्गाने तिला शहाण्या पुरुषाने मूलाधारापर्यंत आणावे.

अशा तर्‍हेने प्रत्येक दिवशी मनाचा निश्‍चय करून अभ्यास करावा. असा दुर्घट अभ्यास करणार्‍या साधकाचे पूर्वी सांगितलेले दूषित मंत्रही सिद्ध होण्यास वेळ लागत नाही. या अभ्यासपूर्ण योगाशिवाय प्राणी जरा, मरण व दुःख इत्यादीपासून आणि संसाररूपी बंधनचक्रातून विमुक्त होत नाही.

अशाप्रकारे सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या साधकाचे ठिकाणी देवी जगन्मातेचे म्हणजे पर्यायाने माझेच जे जे जसे जसे गुण आहेत तसे ते गुण साधक श्रेष्ठात सत्वर उत्पन्न होतात. हे माझे बोलणे अत्यंत सत्य आहे.

बा हिमालया, ह्याप्रमाणे उत्तम प्रकारचे वायुरोधन व धारणा मी तुला विस्ताराने कथन केले. आता मी तुला धारणा नावाचे आणखी एक अंग सांगते. ते तू सावधान चित्ताने माझ्याकडून ऐकून घे.

हे पर्वता, मी दिशा व काल यांनी मर्यादित नाही. म्हणून माझे म्हणजे जगन्मातेचे ठिकाणी आपले चित्त स्थिर करावे. जीव व ब्रह्म यांचे परिपूर्ण ऐक्य आहे असा मनात विश्‍वास धरून चिंतन केल्यास साधक सत्वर तद्रूप होतो आणि रागद्वेषाने चित्त मलिन होऊन जर चिंतन केले तर माझी प्राप्ती घडत नाही. अशावेळी साधकाने पुन्हा एकाग्र होऊन माझ्या अवयवांशी चित्त स्थिर करून योगाभ्यास करावा.

हे पर्वतराजा, माझ्या सर्वांगसुंदर व सुलक्षणी हात, पाय इत्यादि अवयवरूपी अंगांच्या ठिकाणी यंत्रज्ञ साधकाने चित्ताची स्थापना करावी आणि क्रमाक्रमाने प्रत्येक स्थानाचा जय करून अंतःकरण शुद्ध झाल्यावर त्याने माझ्या सर्वस्वरूप असलेल्या मनाची संस्थापना करावी.

हे हिमालया, या संविद्रूप देवीच्या ठिकाणी मनाचा लय होईपर्यंत मंत्राचा जप व होमादि कर्मे यांच्या सहाय्याने दृढ अभ्यास करावा.

मंत्राभ्यास व योग यांच्या प्रयत्‍नांनी ज्ञेयाचे सत्वर ज्ञान होते. कारण योगावाचून मंत्र नाही आणि मंत्रावाचून योगसिद्धी नाही. म्हणून दोघांचाही अभ्यास नित्य करीत राहणे हेच ब्रह्मपदाची प्राप्ती होण्याचे एकमेव साधन आहे.

अंधःकाराने भरून गेलेले घर व इतर साधने दीपाच्याच साह्याने दिसू शकतात. हे तत्त्व सोपे असले तरी ध्यानात ठेवावे. मायेने आच्छादित झालेला आत्मा अशा प्रकारच्या योगाभ्यासामुळे मनूला दिसू शकला हे निश्‍चित आहे.

तेव्हा हे पर्वता, असा हा सांग योगविधी मी तुला आज विस्तारपूर्वक स्पष्टीकरणाने निवेदन केला आहे. केवळ गुरूचा उपदेश झाल्यासच याचे ज्ञान होते. गुरूपदेशाशिवाय कोटि कोटि शास्त्रे अभ्यासून अथवा पठण करूनही हे ज्ञान प्राप्त होणार नाही.



अध्याय पस्तिसावा समाप्त

GO TOP