श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
सप्तमः स्कन्धः
त्रयस्त्रिंशोऽध्यायः


श्रीदेवीविराड्‌रूपदर्शनसहितं देवकृततत्स्तववर्णनम्

देव्युवाच
मन्मायाशक्तिसंक्लृप्तं जगत्सर्वं चराचरम् ।
सापि मत्तः पृथङ्‌माया नास्त्येव परमार्थतः ॥ १ ॥
व्यवहारदृशा सेयं विद्या मायेति विश्रुता ।
तत्त्वदृष्ट्या तु नास्त्येव तत्त्वमेवास्ति केवलम् ॥ २ ॥
साहं सर्वं जगत्सृष्ट्वा तदन्तः प्रविशाम्यहम् ।
मायाकर्मादिसहिता गिरे प्राणपुरःसरा ॥ ३ ॥
लोकान्तरगतिर्नोचेत्कथं स्यादिति हेतुना ।
यथा यथा भवन्त्येव मायाभेदास्तथा तथा ॥ ४ ॥
उपाधिभेदाद्‌भिन्नाहं घटाकाशादयो यथा ।
उच्चनीचादिवस्तूनि भासयन्भास्करः सदा ॥ ५ ॥
न दुष्यति तथैवाहं दोषैर्लिप्ता कदापि न ।
मयि बुद्ध्यादिकर्तृत्वमध्यस्यैवापरे जनाः ॥ ६ ॥
वदन्ति चात्मा कर्मेति विमूढा न सुबुद्धयः ।
अज्ञानभेदतस्तद्वन्मायाया भेदतस्तथा ॥ ७ ॥
जीवेश्वरविभागश्च कल्पितो माययैव तु ।
घटाकाशमहाकाशविभागः कल्पितो यथा ॥ ८ ॥
तथैव कल्पितो भेदो जीवात्मपरमात्मनोः ।
यथा जीवबहूत्वं च माययैव न च स्वतः ॥ ९ ॥
तथेश्वरबहुत्वं च मायया न स्वभावतः ।
देहेन्द्रियादिसङ्घातवासनाभेदभेदिता ॥ १० ॥
अविद्या जीवभेदस्य हेतुर्नान्यः प्रकीर्तितः ।
गुणानां वासनाभेदभेदिता या धराधर ॥ ११ ॥
माया सा परभेदस्य हेतुर्नान्यः कदाचन ।
मयि सर्वमिदं प्रोतमोतं च धरणीधर ॥ १२ ॥
ईश्वरोऽहं च सूत्रात्मा विराडात्माहमस्मि च ।
ब्रह्माहं विष्णुरुद्रौ च गौरी ब्राह्मी च वैष्णावी ॥ १३ ॥
सूर्योऽहं तारकाश्चाहं तारकेशस्तथास्म्यहम् ।
पशुपक्षिस्वरूपाहं चाण्डालोऽहं च तस्करः ॥ १४ ॥
व्याधोऽहं क्रूरकर्माहं सत्कर्माहं महाजनः ।
स्त्रीपुन्नपुंसकाकारोऽप्यहमेव न संशयः ॥ १५ ॥
यच्च किञ्चित्क्वचिद्वस्तु दृश्यते श्रूयतेऽपि वा ।
अन्तर्बहिश्च तत्सर्वं व्याप्याहं सर्वदा स्थिता ॥ १६ ॥
न तदस्ति मया त्यक्तं वस्तु किञ्चिच्चराचरम् ।
यद्यस्ति चेत्तच्छून्यं स्याद्वन्ध्यापुत्रोपमं हि तत् ॥ १७ ॥
रज्जुर्यथा सर्पमालाभेदैरेका विभाति हि ।
तथैवेशादिरूपेण भाम्यहं नात्र संशयः ॥ १८ ॥
अधिष्ठानातिरेकेण कल्पितं तन्न भासते ।
तस्मान्मत्सत्तयैवैतत्सत्तावान्नान्यथा भवेत् ॥ १९ ॥
हिमालय उवाच
यथा वदसि देवेशि समष्ट्याऽऽत्मवपुस्त्विदम् ।
तथैव द्रष्टुमिच्छामि यदि देवि कृपा मयि ॥ २० ॥
व्यास उवाच
इति तस्य वचः श्रुत्वा सर्वे देवाः सविष्णवः ।
ननन्दुर्मुदितात्मानः पूजयन्तश्च तद्वचः ॥ २१ ॥
अथ देवमतं ज्ञात्वा भक्तकामदुघा शिवा ।
अदर्शयन्निजं रूपं भक्तकामप्रपूरिणी ॥ २२ ॥
अपश्यंस्ते महादेव्या विराड्‌रूपं परात्परम् ।
द्यौर्मस्तकं भवेद्यस्य चन्द्रसूर्यौ च चक्षुषी ॥ २३ ॥
दिशः श्रोत्रे वचो देवाः प्राणो वायुः प्रकीर्तितः ।
विश्वं हृदयमित्याहुः पृथिवी जघनं स्मृतम् ॥ २४ ॥
नभस्तलं नाभिसरो ज्योतिश्चक्रमुरःस्थलम् ।
महर्लोकस्तु ग्रीवा स्याज्जनोलोको मुखं स्मृतम् ॥ २५ ॥
तपोलोको रराटिस्तु सत्यलोकादधः स्थितः ।
इन्द्रादयो बाहवः स्युः शब्दः श्रोत्रं महेशितुः ॥ २६ ॥
नासत्यदस्रौ नासे स्तो गन्धो घ्राणं स्मृतो बुधैः ।
मुखमग्निः समाख्यातो दिवारात्री च पक्ष्मणी ॥ २७ ॥
ब्रह्मस्थानं भ्रूविजृम्भोऽप्यापस्तालुः प्र्कीर्तिताः ।
रसो जिह्वा समाख्याता यमो दंष्ट्राः प्रकीर्तिताः ॥ २८ ॥
दन्ताः स्नेहकला यस्य हासो माया प्रकीर्तिता ।
सर्गस्त्वपाङ्गमोक्षः स्याद् व्रीडोर्ध्वोष्ठो महेशितुः ॥ २९ ॥
लोभः स्यादधरोष्ठोऽस्याधर्ममार्गस्तु पृष्ठभूः ।
प्रजापतिश्च मेढ्रं स्याद्यः स्रष्टा जगतीतले ॥ ३० ॥
कुक्षिः समुद्रा गिरयोऽस्थीनि देव्या महेशितुः ।
नद्यो नाड्यः समाख्याता वृक्षाः केशाः प्रकीर्तिताः ॥ ३१ ॥
कौमारयौवनजरा वयोऽस्य गतिरुत्तमा ।
बलाहकास्तु केशाः स्युः सन्ध्ये ते वाससी विभो ॥ ३२ ॥
राजञ्छ्रीजगदम्बायाश्चन्द्रमास्तु मनः स्मृतः ।
विज्ञानशक्तिस्तु हरी रुद्रोऽन्तःकरणं स्मृतम् ॥ ३३ ॥
अश्वा हि जातयः सर्वाः श्रोणिदेशे स्थिता विभोः ।
अतलादिमहालोकाः कट्यधोभागतां गताः ॥ ३४ ॥
एतादृशं महारूपं ददृशुः सुरपुङ्गवाः ।
ज्वालामालासहस्राढ्यं लेलिहानं च जिह्वया ॥ ३५ ॥
दंष्ट्राकटकटारावं वमन्तं वह्निमक्षिभिः ।
नानायुधधरं वीरं ब्रह्मक्षत्रौदनं च यत् ॥ ३६ ॥
सहस्रशीर्षनयनं सहस्रचरणं तथा ।
कोटिसूर्यप्रतीकाशं विद्युत्कोटिसमप्रभम् ॥ ३७ ॥
भयङ्करं महाघोरं हृदक्ष्णोस्त्रासकारकम् ।
ददृशुस्ते सुराः सर्वे हाहाकारं च चक्रिरे ॥ ३८ ॥
विकम्पमानहृदया मूर्च्छामापुर्दुरत्ययाम् ।
स्मरणं च गतं तेषां जगदम्बेयमित्यपि ॥ ३९ ॥
अथ ते ये स्थिता वेदाश्चतुर्दिक्षु महाविभोः ।
बोधयामासुरत्युग्रं मूर्छातो मूर्च्छितान्सुरान् ॥ ४० ॥
अथ ते धैर्यमालम्ब्य लब्ध्वा च श्रुतिमुत्तमाम् ।
प्रेमाश्रुपूर्णनयना रुद्धकण्ठास्तु निर्जराः ॥ ४१ ॥
बाष्पगद्‌गदया वाचा स्तोतुं समुपचक्रिरे ।
देवा ऊचुः
अपराधं क्षमस्वाम्ब पाहि दीनांस्त्वदुद्‌भवान् ॥ ४२ ॥
कोपं संहर देवेशि सभया रूपदर्शनात् ।
का ते स्तुतिः प्रकर्तव्या पामरैर्निर्जरैरिह ॥ ४३ ॥
स्वस्याप्यज्ञेय एवासौ यावान्यश्च स्वविक्रमः ।
तदर्वाग्जायमानानां कथं स विषयो भवेत् ॥ ४४ ॥
नमस्ते भुवनेशानि नमस्ते प्रणवात्मिके ।
सर्ववेदान्तसंसिद्धे नमो ह्रीङ्कारमूर्तये ॥ ४५ ॥
यस्मादग्निः समुत्पन्नो यस्मात्सूर्यश्च चन्द्रमाः ।
यस्मादोषधयः सर्वास्तस्मै सर्वात्मने नमः ॥ ४६ ॥
यस्माच्च देवाः सम्भूताः साध्याः पक्षिण एव च ।
पशवश्च मनुष्याश्च तस्मै सर्वात्मने नमः ॥ ४७ ॥
प्राणापानौ व्रीहियवौ तपः श्रद्धा ऋतं तथा ।
ब्रह्मचर्यं विधिश्चैव यस्मात्तस्मै नमो नमः ॥ ४८ ॥
सप्त प्राणार्चिषो यस्मात्समिधः सप्त एव च ।
होमाः सप्त तथा लोकास्तस्मै सर्वात्मने नमः ॥ ४९ ॥
यस्मात्समुद्रा गिरयः सिन्धवः प्रचरन्ति च ।
यस्मादोषधयः सर्वा रसास्तस्मै नमो नमः ॥ ५० ॥
यस्माद्यज्ञः समुद्‌भूतो दीक्षा यूपश्च दक्षिणाः ।
ऋचो यजूंषि सामानि तस्मै सर्वात्मने नमः ॥ ५१ ॥
नमः पुरस्तात्पृष्ठे च नमस्ते पार्श्वयोर्द्वयोः ।
अध ऊर्ध्वं चतुर्दिक्षु मातर्भूयो नमो नमः ॥ ५२ ॥
उपसंहर देवेशि रूपमेतदलौकिकम् ।
तदेव दर्शयास्माकं रूपं सुन्दरसुन्दरम् ॥ ५३ ॥
व्यास उवाच
इति भीतान्सुरान्दृष्ट्वा जगदम्बा कृपार्णवा ।
संहृत्य रूपं घोरं तद्दर्शयामास सुन्दरम् ॥ ५४ ॥
पाशाङ्कुशवराभीतिधरं सर्वाङ्गकोमलम् ।
करुणापूर्णनयनं मन्दस्मितमुखाम्बुजम् ॥ ५५ ॥
दृष्ट्वा तत्सुन्दरं रूपं तदा भीतिविवर्जिताः ।
शान्तचित्ताः प्रणेमुस्ते हर्षगद्‌गदनिःस्वनाः ॥ ५६ ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां सप्तमस्कन्धे
श्रीदेवीविराड्‌रूपदर्शनसहितं देवकृततत्स्तववर्णनं नाम त्रयस्त्रिंशोऽध्यायः ॥ ३३ ॥


(देवीगीता अध्याय २) विश्‍वरूप दर्शन

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

हे पर्वतश्रेष्ठा, ज्या शक्तीने या विराट जगताला निर्माण केले ती शक्ती म्हणजे मायाच होय. पण माया ही शक्तीदेखील माझ्यापासून वेगळी असू शकत नाही. केवळ लौकिक अर्थाने आणि व्यवहारसुलभतेसाठीच माझ्या या शक्तींना अविद्या अथवा माया अशा वेगळया वृत्तीने संबोधतात, मूलतत्त्वाचा विचार केला तर ती अविद्या आणि माया असे जिला म्हटले आहे ती शक्ती वेगळी नाही, ती आत्मतत्त्वच आहे.

हे पर्वतराज, माझे हे स्वरूप अशाप्रकारचे आहे आणि मीच हे सर्व जग निर्माण करते. मी जर प्राणरूपी होऊन या जगतात, प्राणीमात्रांत प्रवेश केला नाही तर इतर लोकांमध्ये चलनवलन, जन्म, मृत्यू इत्यादि भाव घडणार नाही. लौकिक व्यवहार साधणार नाहीत. म्हणून मी त्याप्रमाणे विचार करून नित्य कर्मे व इतर व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून प्राणाला पुढे करून सर्वात प्रवेश करते व त्यानंतर सर्व लौकिक व्यवहार सुरू होतात.

पण मी जरी व्यापकस्वरूपिणी आणि एकमेव असले तरी जसे शरीर असले तसे ते निर्माण होतात, त्याचे देहधर्म शरीराप्रमाणे होतात. केवळ या वेगवेगळया उपाधींच्या वेगवेगळेपणामुळे मीही भिन्न भिन्न स्वरूपात प्राप्त होते. जसे आकाश व घटाकाश यात भेद आहे. तसेच त्या प्राणीमात्रांतही भेद निर्माण होतात.

वस्तुमात्र उत्तम असोत किंवा अधम असोत, सूर्य दोन्ही वस्तुमानावर आपला प्रकाश पुरवितो, म्हणून त्याला काही दोष लागत नाही त्याचप्रमाणे मीही उत्तम व अधम वस्तूत प्राणरूपाने राहूनही त्या वस्तूच्या ठिकाणी असलेल्या गुणदोषांनी लिप्त होत नाही. मी त्या गुणदोषांपासून अलिप्त राहते.

पण ते प्राकृत असलेले पुरुष मात्र बुद्धि व इतर भावांच्या ठिकाणी असलेले कर्तृत्व इत्यादि स्वभावधर्म माझ्याच ठिकाणी आहे असे अटटाहासाने म्हणतात आणि "आत्मा हाच कर्ता आहे." असे म्हणतात. पण विवेकी पंडित मात्र त्या म्हणण्याला सहमत नाहीत.

केवळ अज्ञानभेद व मायाभेद यांमुळे जीव व ईश्‍वर असा चैतन्यातील भेद आहे असे ते आपल्या कल्पनेने मानतात. वास्तविक आकाश भेदरहित आहे. पण पुरुषांनी त्याचे भेद कल्पिले आहेत. ते घटाकाश, महाकाश असे वेगवेगळे मानतात. तसेच जीवात्मा व परमात्मा यातही ते भेद मानतात. पण तसे भेद नाहीत.

केवळ मायेच्या योगानेच आपण जीव अनेक आहेत अशी कल्पना करतो, पण ती कल्पना मुळीच सत्य नाही. तसेच मायेमुळेच ब्रह्मा, विष्णु, महेश हे सर्वजण वेगवेगळे आहेत. देव अनेक आहेत असे आपण म्हणतो. तेही केवळ मायेमुळेच. पण मूलस्वभावतः ही कल्पना खरी नाही. पण मायेमुळेच याही कल्पना आपण सत्य धरून चालतो.

इंद्रिये व देह वगैरे समूह व वासना यांच्या भेदामुळे अविद्याच भेद पावते व तीच जीवांच्या भेदाचे कारण आहे. याशिवाय दुसरे भेदाचे कारणच सांगितलेले नाही.

हे पर्वता, सत्त्वादिगुणांमुळे जे वासनाभेद निर्माण होतात त्यापासून माया वेगळी होते. तेच एकमेव कारण ईश्‍वरभेदांचेही आहे. यावाचून कोणतेही कारण नाही.

तेव्हा हे हिमालया, थोडक्यात सांगायचे म्हणजे हे सर्व चराचर जगत् म्हणजे मीच असून ते सूत्रातील मण्यांप्रमाणे माझ्याच ठिकाणी ग्रंथित झाले आहे. खरे म्हणजे ईश्‍वर मीच आहे. तसेच सूत्रात्मा व विराट आत्मा हे दोन्हीही मीच असून ब्रह्मदेव, विष्णु व रुद्र या क्रमाने ब्राह्मी, वैष्णवी व शिवा या शक्ती सरस्वती, लक्ष्मी व पार्वती या नावाने ओळखल्या जातात त्या शक्ती मीच आहे.

सूर्य मीच असून ही अगणित नक्षत्रेही मीच आहे. तो तारकांचा नायक चंद्र, मीच आहे. तसेच उत्तमाधम पशुपक्षीही सर्व मायेने माझीच रूपे असून चांडाल व चोरही मीच आहे.

त्या पशुपक्षांची मीच व्याध होऊन मृगया करते. त्याचप्रमाणे मी क्रूरकर्मा होऊन अत्यंत क्रूर अशी कर्मे करीत असते. तसेच सत्‌कर्मे करणारे महाजनही मी आहे. मी स्त्री-पुरुष व नपुसक असे निरनिराळे आकार धारण करीत असते. याबद्दल कोणीही संशय बाळगण्याचे कारण नाही.

माझ्यावाचून या चराचर सृष्टीत एकही वस्तु वेगळी नाही आणि जर तसे कुणी वेगळे मानले तर ते शून्य आहे, ते तर वंध्यापुत्रासारखे असते. एका रज्जूचे उदाहरण पहा. तीच सर्व मौक्तिकमाला, पुष्पमाला, दंड, जलधारा वगैरे निरनिराळया भेदातील स्वरूपांनी आपल्या अनुभवास येते. तसेच मीसुद्धा निरनिराळया ईश्‍वरीरूपातून वेगवेगळी म्हणून प्रत्ययास येते. पण मी एकच असते यात कसलाही संशय असू नये.

पिशाच्च, रजत, सर्प इत्यादि ह्या ज्या वस्तु पुरुषांनी कल्पिलेल्या आहेत त्याच स्थाणु, शक्ती, रज्जू इत्यादिंप्रमाणे भासतात. त्यावाचून त्या दुसरे काही भासत नाहीत.

यावरून ही गोष्ट निश्‍चित आहे की माझ्या सत्तेनेच हे सर्व सत्ताधारी निर्माण झाले आहेत. त्याच्या निर्मितीची दुसरी कोणतीही कारणे नाहीत."

हिमालय नम्रतेने म्हणाला, "हे देवी, हे ईश्‍वरी, हे आदिमाये खरोखरच माझ्यासारख्या दीनावर जर तू कृपा करण्यास सिद्ध असशील तर एकच माझी इच्छा पूर्ण कर. हे कल्याणि, तुझे विश्‍व व सृष्टि यात परिपूर्ण भरलेले विराट स्वरूप आहे. ते तू एकदा मला दाखव. म्या पामराची एवढी विनंती मान्य कर."

हिमालयाचे हे भाषण ऐकून ब्रह्मा, विष्णु, शिवादि सर्व देव अत्यंत हर्षभरित व उत्साहित झाले व प्रसन्नचित्त होऊन त्यांनी हिमालयाच्या भाषणाची स्तुती केली.

नंतर देवीने देवांची इच्छा जाणली आणि भक्ताच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी जणू ती कामधेनूरूप देवी तिने आपल्या प्रिय भक्तांना आपले विराट स्वरूप दाखविले व आपल्या भव्यस्वरूपाचे दर्शन घडविले.

त्या महादेवीचे सर्वश्रेष्ठांहून श्रेष्ठ असे जे विराटरूप होते, ते सर्व देवांनी पाहिले. ते होते कसे ?

"महादेवीच्या विराट स्वरूपाचे दर्शन फारच अनाकलनीय होते. सत्यलोक हे त्याचे मस्तक आहे. चंद्र व सूर्य हे त्याचे दोन नेत्र तेजाने तळपत होते. दिशा हे त्या स्वरूपाचे कर्ण होते, तर साक्षात वेद हेच त्याचे भाषण होते, सर्वत्र संचार करणारा वायु हा त्याचे प्राण होता. सर्वात्मक पण अव्यक्त हे त्याचे हृदय होते. पृथ्वी हाच त्या स्वरूपाचा जघन प्रदेश, तर नाभिकमलाच्या ठिकाणी नभस्थळ व भुवलोक दिसत होते. "ज्योतिष्चक्र" हे त्या विराट स्वरूपाचे वक्षस्थळ होते. महर्लोक ही त्याची ग्रीवा असून मुख म्हणजे जनलोक हे होते.

सत्यलोकाच्या खाली ललाटाच्या ठिकाणी यम लोक होते. इंद्र वगैरे देव हेच त्या विराट स्वरूपाचे बाहु होते. शब्द हा श्रोतेंद्रियाचा विषय, पण त्या विराट स्वरूपी महेश्‍वरीचे ते श्रवणेंद्रिय होते. नासापुटाचे ठिकाणी अश्‍विनीकुमार होते. गंध हे त्या देवीचे घ्राणेंद्रिय होते.

तिचे मुख हे साक्षात अग्नीच होता आणि दिवस व रात्र हे तिचे पंख होते. या पंखांनाच दोन बाजू म्हणतात. प्रजापतीचे वसतिस्थान हा त्या विश्‍वदेवीचा भ्रूविकास होता. उदक हा तिचा तालु भाग होता. सर्व रस हीच तिची जिव्हा होती आणि महाकाळ यम ह्या तिच्या दाढा होत्या.

सर्व स्त्री-पुरुषांचा परस्परातील स्नेहभाव हे तिचे दात होते आणि हास्यभावना हीच तिची माया होती. तिचे कटाक्ष म्हणजे प्रत्यक्ष सृष्टीची उत्‌पत्तीच असून त्या महेश्‍वरीचा वरचा ओठ लज्जाच होता. तसेच लोभ हा तिचा अधर ओष्ठ होता व धर्म हा त्या विराट देवीचा पृष्ठ प्रदेश होता.

प्रजापती हे त्या विराट स्वरूपाचे जननेंद्रिय होते. त्यापासूनच पृथ्वीवरील सर्व वस्तुजात उत्पन्न होतात. समुद्र ह्या त्या देवीच्या कुशी होत्या आणि पर्वत ही त्या महादेवीची हाडे होती. नद्या ह्या तिच्या नाडया होत्या व वृक्ष हे त्या देवीचे मनोहर केस होते. बालपण, तरुणपण व वृद्धावस्था या तिन्ही अवस्था म्हणजे त्या देवीच्या वयाच्या उत्तम गती होत्या. मेघ हे त्या देवीचे वलयांकित होते. सकाळ, संध्याकाळ ती त्या विराट स्वरूपाची वस्त्रे होती.

तसेच हेच त्या जगदंबेचे मन आहे असेही काहीजण सांगतात. तसेच हरी हीच तिची विज्ञान शक्ती आहे असे म्हणण्याचा प्रघात आहे. रुद्र हे तिचे अंतःकरण आहे असे प्रसिद्ध वचन आहे. अश्‍व वगैरे इतरही सर्व पशुजाती हे तिच्या श्रोणिप्रदेशात स्थिर आहेत. अतलाप्रमाणे इतर महालोकही त्या परादेवीच्या कटीच्या खाली असलेल्या प्रदेशावर राहिलेले दिसत होते.

असे ते महादेवीचे विराट स्वरूप सर्व देवांनी पाहिले.

हजारो ज्वालांच्या समुदायांनी ते परिपूर्ण होते व ती जिव्हेने जणु काय सर्व जगाचा आस्वाद चाखून अनुभव घेत आहे असा भास होता. त्या स्वरूपाच्या ज्या दाढा होत्या, त्या दाढांचा कट् कट् असा भयंकर ध्वनि होत होता. तिच्या नेत्रातून भयंकर अग्नीच्या ज्वाला प्रदीप्त होऊन बाहेर पडत होत्या. तिने नानाप्रकारची वैचित्र्यपूर्ण व वैशिष्टयपूर्ण अशी आयुधे धारण केली होती. ब्रह्मतेज व क्षात्रतेज ते त्या त्या वीरस्वरूपाचे भक्ष्य होते.

त्या विराट स्वरूपाला हजारो मस्तके होती, तसेच हजारो नेत्र होते व हजारो चरणही होते. त्या स्वरूपाचा प्रकाश कोटी सूर्य एकाच वेळी प्रकाशित व्हावे, इतका तेजस्वी होता. ते संपूर्ण विराट स्वरूप एक कोटी विद्युल्लता एकदम चमकाव्यात असे दैदीप्यमान व स्वयंप्रकाशी होते.

अशाप्रकारे ते महा अक्राळविक्राळ, अत्यंत भयंकर, हृदयाला धडकी बसविणारे व नेत्रांना दिपवून त्रस्त करणारे ते विराटस्वरूप होते. ते अत्यद्‌भुत तेज पाहून सर्व देव भयभीत झाले. सर्वजण हाहाःकार करू लागले. त्यांचे हृदय थरथर कापू लागले. त्या देवांना एकाएकी मूर्च्छा आली. आपल्यावर नित्य कृपा करणारी ही ती जगदंबाच आहे याचेही देवांना भान राहिले नाही. इतके हे स्वरूप अतर्क्य व महाप्रलयकारी होते."

अशाप्रकारे हे रूप पाहून देव भयभीत होऊन मूर्च्छित पडल्यावर महादेवीच्या चारी दिशेला असलेल्या चारी वेदांनी सर्व देवांना मूर्च्छेपासून सावध केले. नंतर मनात संपूर्णपणे धैर्य करून आणि वेदांचा अर्थ मनात पूर्णपणे जाणीवपूर्वक ठेवून त्याचे स्मरण करून देव महादेवीची स्तुति करू लागले. देवांचे नेत्र प्रेमाश्रूंनी भरून आले होते. त्यांचा कंठ गहिवरल्यामुळे दाटून आला होता. अशा अवस्थेत सर्व देव सद्‌‌गदित झाले व त्याच परिस्थितीत देवीची स्तोत्रे गाऊ लागले. ते देवीला शरण गेले.

देव म्हणाले, "हे मातोश्री, आम्ही खरोखरच अनंत अपराधी आहोत. पण हे देवी, तू आम्हाला क्षमा कर. आम्ही तुझ्यापासून उत्पन्न झालो आहोत हे आम्हाला कळले. म्हणून तुझ्यापासून निर्माण झालेल्या आम्हा दीनांचे तू दयाळू होऊन रक्षण कर.

हे देवेश्‍वरी, आता तू आपला क्रोध टाकून दे. कारण हे देवते, आम्ही तुझे हे विराट स्वरूप पाहून अत्यंत भयभीत झालो आहोत. अशा या तुला आम्हासारख्या पामर देवांनी कसे बरे स्तवावे ! हे परमेश्‍वरी, तुझा पराक्रम कशा प्रकारचा आहे आणि किती महान आहे हे तुझे तू सुद्धा जाणत नाहीस. जे तुलाही अनाकलनीय आहे, ते तुझ्यापासून उत्पन्न झालेल्या आम्हाला कसे कळू शकेल ?

हे देवी, भुवनेश्‍वरी, तुला आमचा नमस्कार असो. हे देवी, तुझ्या प्रणवाच्या रूपाला आमचे शतशः प्रणाम असोत. हे देवी, तुझे स्वरूप फक्त वेदांतातील वाक्यावरूनच सिद्ध होत असते. अशा या र्‍हींकारस्वरूपिणी, तुझ्या चरणावर आम्ही नित्य मस्तक ठेवतो.

जिच्या स्वरूपापासून अग्नी उत्पन्न झाला आहे, चंद्र, सूर्य हे ज्या ठिकाणाहून निर्माण झाले आहेत, सर्व औषधींचा ज्या ठिकाणाहून उद्‌भव झाला आहे, त्या सर्वात्मस्वरूप असलेल्या तुला आमचे नम्रतापूर्वक नमस्कार असोत.

देव, साधु, पक्षी, पशु, मनुष्य, इतर प्राणी हे ज्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत, त्या तुझ्या सर्वव्यापी व ईश्‍वरस्वरूपी देवीला आमचे वारंवार नमस्कार असोत.

हे देवी, हे दोन श्रोत, तसेच हे दोन्ही नेत्र तुझ्यापासून उत्पन्न झाले आहेत. तसेच ही दोन नासापुटे व मुख हेही तुझ्या स्वरूपापासूनच निर्माण होतात. त्याचप्रमाणे शीर्षात स्थिर असलेले सात प्राण व त्या सात प्राण्यांचा स्वतःच्या विषयीच्या ज्योतिरूप असलेल्या त्या शक्ती ह्यांना तुझ्यामुळेच चैतन्य येते. विषयरूपी सात समिधा तसेच सात विषयांचे विज्ञान, होम, तसेच सप्तलोक, ही तुझ्यापासून निर्माण झाली आहेत. म्हणून त्या सर्वात्मशक्तीरूपी, तुला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करीत आहोत.

खरोखरच पर्वत, नद्या, समुद्र ही जेथून निर्माण झाली, त्या परमपवित्र मूळांपासून औषधी निर्माण झाल्या, जेथून सर्व रस उत्पन्न होतात त्या शक्तीपुढे आम्ही लोटांगण घालीत आहोत.

ज्या सर्व कारण शक्तीपासून यज्ञ, दीक्षा, यज्ञस्तंभी दक्षिणा, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद या सर्वांची सहज निर्मिती झाली त्या सर्वस्वरूपभूत परमात्मशक्तीला आम्ही नित्य वंदन करीत आहोत.

हे माते, तुझ्या पुढील बाजूस, मागील बाजूस तसेच उजव्या व डाव्या बाजूस उभे राहून म्हणजे चोहोबाजूंनी, सर्व दिशांमधून आम्ही तुझ्यापुढे एकसारखे नम्र झालो आहोत.

तेव्हा हे देवेश्‍वरी, तुझ्या ह्या अलौकिक अत्यद्‌भुत स्वरूपाचा तू उपसंहार कर आणि तुझे ते मधुर असे पूर्वीचे अत्यंत रमणीय असे स्वरूप सांप्रत आमच्यापुढे प्रकट कर."

अशाप्रकारे देव अत्यंत भयभीत होऊन वारंवार देवीला नमस्कार करू लागले आणि तिला शरण जाऊन त्यांनी त्या परमेश्‍वरीची अपार स्तुति केली. तेव्हा देवांना अभय देण्यासाठी म्हणून कृपेचा जणू सागरच असलेल्या त्या जगदंबेने आपले अद्‌भुत असे विश्‍वरूप आवरले आणि क्षणातच ते रूप अदृश्य केले.

पाश, अंकुश, वरदमुद्रा या प्रकारच्या आयुधांनी युक्त असे अत्यंत कोमल सर्वांग आहे असे करुणरसपूर्ण अशा नेत्रांचे व प्रसन्न मुखकमल आहे असे ते पूर्वीचे सर्वांना सुसह्य असे, आपले सुंदर रूप पुन्हा देवांना दाखविले.

तेव्हा त्या रूपाकडे पाहिल्यावर शांत होऊन देव भीतीपासून मुक्त झाले. त्यांचे मन स्थिर झाले आणि त्यांना अत्यानंद झाला. सर्व देवांना गहिवरून आले आणि त्यांचे स्वर सद्‌गदित झाले. त्यांनी अपार समाधानाने त्या मनोहर अशा देवी भगवतीला साष्टांग नमस्कार घातले.



अध्याय तेहतिसावा समाप्त

GO TOP