श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
सप्तमः स्कन्धः
द्वात्रिंशोऽध्यायः


देव्या व्यष्टिसमष्टिरूपवर्णनम्

श्रीदेव्युवाच
शृण्वन्तु निर्जराः सर्वे व्याहरन्त्या वचो मम ।
यस्य श्रवणमात्रेण मद्‌रूपत्वं प्रपद्यते ॥ १ ॥
अहमेवास पूर्वं तु नान्यत्किञ्चिन्नगाधिप ।
तदात्मरूपं चित्संवित्परब्रह्मैकनामकम् ॥ २ ॥
अप्रतर्क्यमनिर्देश्यमनौपम्यमनामयम् ।
तस्य काचित्स्वतः सिद्धा शक्तिर्मायेति विश्रुता ॥ ३ ॥
न सती सा नासती सा नोभयात्मा विरोधतः ।
एतद्विलक्षणा काचिद्वस्तुभूतास्ति सर्वदा ॥ ४ ॥
पावकस्योष्णतेवेयमुष्णांशोरिव दीधितिः ।
चन्द्रस्य चन्द्रिकेवेयं ममेयं सहजा ध्रुवा ॥ ५ ॥
तस्यां कर्माणि जीवानां जीवाः कालाश्च सञ्चरे ।
अभेदेन विलीनाः स्युः सुषुप्तौ व्यवहारवत् ॥ ६ ॥
स्वशक्तेश्च समायोगादहं बीजात्मतां गता ।
स्वाधारावरणात्तस्या दोषत्वं च समागतम् ॥ ७ ॥
चैतन्यस्य समायोगान्निमित्तत्वं च कथ्यते ।
प्रपञ्चपरिणामाच्च समवायित्वमुच्यते ॥ ८ ॥
केचित्तां तप इत्याहुस्तमः केचिज्जडं परे ।
ज्ञानं मायां प्रधानं च प्रकृतिं शक्तिमप्यजाम् ॥ ९ ॥
विमर्श इति तां प्राहुः शैवशास्त्रविशारदाः ।
अविद्यामितरे प्राहुर्वेदतत्त्वार्थचिन्तकाः ॥ १० ॥
एवं नानाविधानि स्युर्नामानि निगमादिषु ।
तस्या जडत्वं दृश्यत्वाज्ज्ञाननाशात्ततोऽसती ॥ ११ ॥
चैतन्यस्य न दृश्यत्वं दृश्यत्वे जडमेव तत् ।
स्वप्रकाशं च चैतन्यं न परेण प्रकाशितम् ॥ १२ ॥
अनवस्थादोषसत्त्वान्न स्वेनापि प्रकाशितम् ।
कर्मकर्त्रीविरोधः स्यात्तस्मात्तद्दीपवत्स्वयम् ॥ १३ ॥
प्रकाशमानमन्येषां भासकं विद्धि पर्वत ।
अत एव च नित्यत्वं सिद्धसंवित्तनोर्मम ॥ १४ ॥
जाग्रत्स्वप्नसुषुप्त्यादौ दृश्यस्य व्यभिचारतः ।
संविदो व्यभिचारश्च नानुभूतोऽस्ति कर्हिचित् ॥ १५ ॥
यदि तस्याप्यनुभवस्तर्ह्ययं येन साक्षिणा ।
अनुभूतः स एवात्र शिष्टः संविद्वपुः पुरा ॥ १६ ॥
अत एव च नित्यत्वं प्रोक्तं सच्छास्त्रकोविदैः ।
आनन्दरूपता चास्याः परप्रेमास्पदत्वतः ॥ १७ ॥
मा न भूवं हि भूयासमिति प्रेमात्मनि स्थितम् ।
सर्वस्यान्यस्य मिथ्यात्वादसङ्गत्वं स्फुटं मम ॥ १८ ॥
अपरिच्छिन्नताप्येवमत एव मता मम ।
तच्च ज्ञानं नात्मधर्मो धर्मत्वे जडताऽऽत्मनः ॥ १९ ॥
ज्ञानस्य जडशेषत्वं न दृष्टं न च संभवि ।
चिद्धर्मत्वं तथा नास्ति चितश्चिन्न हि भिद्यते ॥ २० ॥
तस्मादात्मा ज्ञानरूपः सुखरूपश्च सर्वदा ।
सत्यः पूर्णोऽप्यसङ्गश्च द्वैतजालविवर्जितः ॥ २१ ॥
स पुनः कामकर्मादियुक्तया स्वीयमायया ।
पूर्वानुभूतसंस्कारात् कालकर्मविपाकतः ॥ २२ ॥
अविवेकाच्च तत्त्वस्य सिसृक्षावान्प्रजायते ।
अबुद्धिपूर्वः सर्गोऽयं कथितस्ते नगाधिप ॥ २३ ॥
एतद्धि यन्मया प्रोक्तं मम रूपमलौकिकम् ।
अव्याकृतं तदव्यक्तं मायाशबलमित्यपि ॥ २४ ॥
प्रोच्यते सर्वशास्त्रेषु सर्वकारणकारणम् ।
तत्त्वानामादिभूतं च सच्चिदानन्दविग्रहम् ॥ २५ ॥
सर्वकर्मघनीभूतमिच्छाज्ञानक्रियाश्रयम् ।
ह्रीङ्कारमन्त्रवाच्यं तदादितत्त्वं तदुच्यते ॥ २६ ॥
तस्मादाकाश उत्पन्नः शब्दतन्मात्ररूपकः ।
भवेत्स्पर्शात्मको वायुस्तेजोरूपात्मकं पुनः ॥ २७ ॥
जलं रसात्मकं पश्चात्ततो गन्धात्मिका धरा ।
शब्दैकगुण आकाशो वायुः स्पर्शरवान्वितः ॥ २८ ॥
शब्दस्पर्शरूपगुणं तेज इत्युच्यते बुधैः ।
शब्दस्पर्शरूपरसैरापो वेदगुणाः स्मृताः ॥ २९ ॥
शब्दस्पर्शरूपरसगन्धैः पञ्चगुणा धरा ।
तेभ्योऽभवन्महत्सूत्रं यल्लिङ्गं परिचक्षते ॥ ३० ॥
सर्वात्मकं तत्सम्प्रोक्तं सूक्ष्मदेहोऽयमात्मनः ।
अव्यक्तं कारणो देहः स चोक्तः पूर्वमेव हि ॥ ३१ ॥
यस्मिञ्जगद्‌बीजरूपं स्थितं लिङ्गोद्‌भवो यतः ।
ततः स्थूलानि भूतानि पञ्चीकरणमार्गतः ॥ ३२ ॥
पञ्चसंख्यानि जायन्ते तत्प्रकारस्त्वथोच्यते ।
पूर्वोक्तानि च भूतानि प्रत्येकं विभजेद्‌ द्विधा ॥ ३३ ॥
एकैकं भागमेकस्य चतुर्धा विभजेद्‌ गिरे ।
स्वस्वेतरद्वितीयांशे योजनात्पञ्च पञ्च ते ॥ ३४ ॥
तत्कार्यं च विराड्देहः स्थूलदेहोऽयमात्मनः ।
पञ्चभूतस्थसत्त्वांशैः श्रोत्रादीनां समुद्‌भवः ॥ ३५ ॥
ज्ञानेन्द्रियाणां राजेन्द्र प्रत्येकं मिलितैस्तु तैः ।
अन्तःकरणमेकं स्याद्‌ वृत्तिभेदाच्चतुर्विधम् ॥ ३६ ॥
यदा तु सङ्कल्पविकल्पकृत्यं
     तदा भवेत्तन्मन इत्यभिख्यम् ।
स्याद्‌ बुद्धिसंज्ञं च यदा प्रवेत्ति
     सुनिश्चितं संशयहीनरूपम् ॥ ३७ ॥
अनुसन्धानरूपं तच्चित्तं च परिकीर्तितम् ।
अहङ्कृत्यात्मवृत्त्या तु तदहङ्कारतां गतम् ॥ ३८ ॥
तेषां रजोंशैर्जातानि क्रमात्कर्मेन्द्रियाणि च ।
प्रत्येकं मिलितैस्तैतु प्राणो भवति पञ्चधा ॥ ३९ ॥
हृदि प्राणो गुदेऽपानो नाभिस्थस्तु समानकः ।
कण्ठदेशेऽप्युदानः स्याद्‌ व्यानः सर्वशरीरगः ॥ ४० ॥
ज्ञानेन्द्रियाणि पञ्चैव पञ्चकर्मेन्द्रियाणि च ।
प्राणादिपञ्चकं चैव धिया च सहितं मनः ॥ ४१ ॥
एतत्सूक्ष्मशरीरं स्यान्मम लिङ्गं यदुच्यते ।
तत्र या प्रकृतिः प्रोक्ता सा राजन्द्विविधा स्मृता ॥ ४२ ॥
सत्त्वात्मिका तु माया स्यादविद्या गुणमिश्रिता ।
स्वाश्रयं या तु संरक्षेत्सा मायेति निगद्यते ॥ ४३ ॥
तस्यां यत्प्रतिबिम्बं स्याद्‌बिम्बभूतस्य चेशितुः ।
स ईश्वरः समाख्यातः स्वाश्रयज्ञानवान्परः ॥ ४४ ॥
सर्वज्ञः सर्वकर्ता च सर्वानुग्रहकारकः ।
अविद्यायां तु यत्किञ्चित्प्रतिबिम्बं नगाधिप ॥ ४५ ॥
तदेव जीवसंज्ञं स्यात्सर्वदुःखाश्रयं पुनः ।
द्वयोरपीह सम्प्रोक्तं देहत्रयमविद्यया ॥ ४६ ॥
देहत्रयाभिमानाच्चाप्यभून्नामत्रयं पुनः ।
प्राज्ञस्तु कारणात्मा स्यात्सूक्ष्मदेही तु तैजसः ॥ ४७ ॥
स्थूलदेही तु विश्वाख्यस्त्रिविधः परिकीर्तितः ।
एवमीशोऽपि सम्प्रोक्त ईशसूत्रविराट्पदैः ॥ ४८ ॥
प्रथमो व्यष्टिरूपस्तु समष्ट्यात्मा परः स्मृतः ।
स हि सर्वेश्वरः साक्षाज्जीवानुग्रहकाम्यया ॥ ४९ ॥
करोति विविधं विश्वं नानाभोगाश्रयं पुनः ।
मच्छक्तिप्रेरितो नित्यं मयि राजन्प्रकल्पितः ॥ ५० ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां सप्तमस्कन्धे
देवीगीतायां देव्या व्यष्टिसमष्टिरूपवर्णनं नाम द्वात्रिंशोऽध्यायः ॥ ३२ ॥


(देवीगीता ; अध्याय १) आत्मतत्त्व म्हणजे काय ?

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

पर्वतश्रेष्ठ हिमालयाचे उत्सुकतेने परिपूर्ण असलेले भाषण ऐकून ती भगवती देवी सर्व देवांना उद्देशून म्हणाली, "हे देवांनो, मी आता या पर्वतश्रेष्ठाने विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देण्यासाठी बोलत आहे. मी जे रहस्य सांगणार आहे, ते तुम्ही सर्वांनी एकाग्र चित्ताने श्रवण करा. हे केवळ श्रवण केले तरीही कोणत्याही प्राण्याला माझ्या स्वरूपाची प्राप्ती होते."

नंतर हिमालयाकडे वळून व हिमालयाला अनुलक्षून ती देवी भगवती अत्यंत मधुर पण गंभीर वाणीने म्हणाली, "हे पर्वतश्रेष्ठा, ही सृष्टि उत्पन्न होण्यापूर्वी त्रिविधभेदशून्य अशी मीच सर्वत्र भरून राहिले होते. माझ्याशिवाय साकार अथवा निराकार असे येथे काहीही नव्हते.

ते माझे त्यावेळी विराट स्वरूप होते. त्यालाच आत्मरूप, चित्‌संवित् परब्रह्म अशी निरनिराळी नावे आहेत. ते रूप वाणीला व मनाला अनाकलनीय असल्यामुळे त्या रूपाविषयी कसलाही तर्क करणे शक्य नाही. त्या रूपाचा कोणत्याही प्रकारे निर्देश करता येत नाही. त्या स्वरूपाशिवाय दुसरी कोणतीच वस्तुमात्र उत्पन्न झाली नसल्यामुळे माझ्या त्या आदिस्वरूपाला कसलीही उपमा देता येणे शक्य नाही.

ते रूप जनन, अस्तित्वादि सहा भावविकारविहित असेच आहे. त्याची जी स्वयंप्रकाश, अनादि व अनिर्वचनीय शक्ती, तीच माया या नावाने विख्यात आहे.

ती सत् नाही, म्हणजे कालत्रयीही बांध न पावणारी नाही आणि असत् म्हणजे वंध्यापुत्र, शशशृंग, खपुष्प याप्रमाणेही नाही. तसेच तिला सत् व असत् रूपिणी असेही म्हणता येणार नाही. कारण एकाच पदार्थात ही दोन्हीही स्वरूपे असणे अनुभवाला येत नाही. म्हणून माया ही नित्य सत् असत् आणि सदसत् याहीपेक्षा निराळी लक्षणे असलेली व अनिर्वचनीय असूनही भावरूप आहे.

जशी अग्नीच्या ठिकाणी उष्णता असते, सूर्याच्या ठिकाणी प्रकाशकिरण असतात आणि चंद्र चांदण्यांनी परिपूर्ण असतो, त्याचप्रमाणे ही माझी आदिशक्ती सहज, अकृत्रिम व नित्य अशी आहे. सुषुप्ति अवस्था प्राप्त झाल्यावर जसा सर्व व्यवहार लीन होतो, त्याचप्रमाणे प्रलयकाल प्राप्त झाल्यावर जीव, त्याची नित्य कर्मे व सांप्रतचा कालही सर्व त्या मायेमध्ये एकरूप होऊन जातात व त्यातच लीन होतात.

या जीवादिकांच्या योगाने ती माया विशिष्ट स्वरूपात स्थित असते. त्या मायेच्या संसर्गामुळे मी निर्गुण असूनही सर्व जगाचे प्रथम कारण होते. पण माझी शक्ती मला मोह पाडू शकत नाही. त्या उत्पन्न झालेल्या जीवांच्या ठिकाणी वास्तव्य करणारी अज्ञात शक्ती मात्र त्या जीवांना मोह पाडते. म्हणूनच ती या कारणाने स्वतःच्या आधारभूत असलेल्या आत्म्याला आच्छादित करते व त्यामुळे तिच्या ठिकाणी दोषत्व येते आणि म्हणून ती अज्ञात शक्ती महादोषी ठरते.

व्यवहारातील कार्याप्रमाणे या प्रपंचाचेही जे उपादान कारण आहे ते निमित्तकारणापेक्षा काही वेगळे नाही. म्हणूनच त्या मायेच्या संबंधाने चैतन्यालाही निमित्तकारणत्व प्राप्त होते. घट घडविणार्‍या कुंभाराप्रमाणे जे चैतन्य मायेतच प्रतिबिंबित झालेले असते त्या आभासमय चैतन्याला निमित्त कारण म्हणतात. तसेच प्रपंचाच्या योगाने परिणाम पावल्यामुळे मायेला त्याचे उपादान कारण म्हणतात, उपादानकारण व निमित्तकारण या दोन्हीही कारणांना ज्या कारणामुळे ही स्थिती प्राप्त होते ते शुद्धचैतन्य असल्यामुळे होय. या शुद्ध चैतन्यास विवर्तोपादन असे म्हणतात.

यालाच काही वेदशास्त्रज्ञ तप या संज्ञेने संबोधतात, कोणी तम म्हणून उल्लेख करतात तर काही त्याला जड म्हणून ओळखतात. काही पंडीत त्याला ज्ञान, माया, प्रधान, प्रकृति, शक्ति व अजा अशी वेगवेगळी नावे देतात.

शैवशास्त्रात पारंगत असलेले प्राज्ञजन तिला विमर्श असे म्हणतात आणि इतर वेदांचा अभ्यास करणारे व त्याचे चिंतन करणारे व त्याचे चिंतन करणारे तिला अविद्या या नावाने संबोधतात.

याप्रमाणे निगमादिकांमध्ये तिला वेगवेगळी प्रसिद्ध नावे देण्यात आली आहेत. तिच्या ठिकाणी दृश्यत्व हा स्वभावधर्म आहे. म्हणून ती जड आहे असे समजून तिच्या अधिष्ठानाचे ज्ञान झाल्यावर तिचा बोध होतो, म्हणून ती त्यांना मिथ्या आहे असे वाटते.

चैतन्याच्या ठिकाणी दृश्यत्व हा धर्म नाही. पण ते जर दृश्य झाले असते तर तेही जडत्वातच गणले गेले असते. कारण जे दृश्य ते जड आहे असे प्राज्ञजन मानतात. असा त्यांचा सिद्धांत आहे. म्हणून चैतन्यास दुसर्‍या कोणाकडूनही प्रकाश घ्यावा लागत नसून ते स्वयंप्रकाशी आहे. पण ते चैतन्यच स्वतःला प्रकाशित करीत असते असे जर आपण मानले तर त्याला अनवस्था दोष प्राप्त होतो. शिवाय ते स्वतःच प्रकाशित होणारे आहे असे जर मानले तर त्या क्रियेचा जो कर्ता आहे, त्याचे स्वतंत्र अस्तित्व न मानता त्या कर्त्यालाच जर कर्म मानले तर कर्तुकर्मदोष उत्पन्न होतो.

म्हणून हे पर्वतश्रेष्ठा हिमालया, हे जे चैतन्य आहे ते दीपाप्रमाणे स्वयंप्रकाशी असते. म्हणून सर्वाचे भासक आहे. त्यामुळे संविद्रूपाने याचाच अर्थ ज्ञान रूपाने माझे नित्यत्व, अविनाशित्व सिद्ध होत आहे. म्हणून तर भूत, भविष्य, वर्तमान या तिन्हीही काळात उत्पत्ति, स्थिती आणि लय या नित्य अवस्थांमुळे मी दोष पावत नाही. म्हणून माझा अबाधित्व हा गुणधर्मही सिद्ध होतो.

जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति या तिन्ही अवस्था जरी व्यभिचारामुळे दृश्य भासत असल्या तरी त्या कधीच अनुभवास येत नाहीत. मी अमुक इतका वेळ जागृत अवस्थेत होतो अथवा मला असे स्वप्न पडले किंवा मी निद्रित होऊन इतका काल लोटला, असे समजणे, इत्यादि मार्गाने सर्व अवस्थातील अहंतेचाच सारखा अनुभव येत असतो.

शिवाय या संवित्‌चासुद्धा व्यभिचार आपल्या अनुभवास येतो असे आपण मानले तरी आपण कोणाच्या साक्षीने हा अनुभव घेतला, तो ज्ञानरूप साक्षीही अवशिष्टच रहातो. म्हणून साक्षीज्ञान हेच नित्याचे आहे असेच म्हटले पाहिजे. म्हणूनच केवळ सत् शास्त्र जाणणार्‍या व्युत्‌पन्न पंडीतांनी हा साक्षी नित्य आहे असेच सांगितलेले आहे.

व्यवहारात जे पदार्थ आहेत त्यापेक्षा हा जो साक्षी आहे त्या साक्षीबद्दल प्राण्याला अधिक प्रेम वाटत असते. हा साक्षी हे त्या प्राण्याच्या प्रेमाचे एकमेव स्थान आहे. तसेच हा त्याच्या परमप्रेमाचे एकमेव स्थान आहे. तसेच हा त्याच्या परमप्रेमाचे विधान असल्यामुळे हा साक्षी हा त्यांचा एकमेव आनंद आहे. कारण मी कधीही नसावे असे कोणत्याही प्राण्याला कधीही वाटत नाही. आपण नित्य वास्तव्य करीत रहावे अशीच प्रत्येक प्राण्याची अंतःकरणपूर्वक इच्छा असते. कारण प्राण्यास स्वतःच्या आत्म्याविषयी अपार प्रेम असते.

हे देवांनो, हे जरी खरे असले तरी इतर सर्व मिथ्या आहे, म्हणून माझे असंगत्व अगदी स्पष्ट होते. कारण मिथ्या व सत्य यांचा संयोग केव्हाही अशक्यच. म्हणूनच माझी अपरिच्छिन्नता, निःसीमता आणि माझा अमर्यादपणा ह्या वृत्ती सर्व विद्वज्जनांना मान्य आहेत. ते स्वरूपज्ञान हा आत्म्याचा धर्म. आपण तो आत्म्याचा धर्म मानायचे ठरवले तरी त्या आत्म्याच्या ठिकाणी जडत्व येईल.

असे असूनही चैतन्यरूपी असलेला आत्मा हा जर जडाचाच एक भाग असे आपण समजलो तर ज्ञानही जडच भाग आहे असे म्हणावे लागेल. पण ज्ञान हा तर जडाचा भाग कधीही होऊ शकणार नाही. कारण तसे आपल्या अनुभवास येत नाही. जड व चैतन्य याला नित्याचाच विरोध असतो. त्यामुळे आत्मा जडाचाच भाग आहे हे कधीही संभवनीय नाही.

बरे, चैतन्य हा चैतन्याचाच धर्म असेही म्हणता येत नाही. कारण सजातीयाचा सजातीयाशी भेद करणे कदापि शक्य नाही. म्हणून तो त्याचा धर्म होऊ शकत नाही. यावरून एकच निदान सत्य आहे ते असे की आत्मा हा नित्य ज्ञानरूप व सुखरूप असतो. तो जसा सत्य आहे तसाच तो पूर्ण आहे. पण तो असंग आहे हे मात्र निश्‍चित जाणावे. तसेच तो सर्व द्वैतभाव शून्य आहे.

त्या आम्याने पूर्व सृष्टीच्या अनुभवांचा संस्कार स्वीकारला आहे. तसेच कालपरत्वे जसा कर्मांचा परिपाक होत जातो त्यायोगे व तत्त्वांच्या विवेकाच्या योगाने सृष्टी निर्माण करावी अशी तो इच्छा करीत असतो. अदृष्टातल्या कर्माच्या सहाय्याने युक्त असलेली जी माया तिच्या योगाने तो आपली ही इच्छा स्वतःच प्रकट करतो.

हे पर्वतराजा, जसे प्राणी सुषुप्ति अवस्थेतून जागृतावस्थेत येतात ते अबुद्धीपूर्वक त्या अवस्थेत प्राप्त होत असतात. तसाच हा संसारही अबुद्धीपूर्वकच होत असतो हे तू सत्य समज.

आज माझ्या या स्वरूपाबद्दल मी तुम्हाला सर्व काही सांगितलेच आहे. त्या माझ्या रूपाला अव्याकृत, अव्यक्त, मायाबल, तसेच सर्व कारणांचे कारणतत्त्व, सर्व तत्त्वांचे उत्पत्तीस्थान, सच्चिदानंदभूत व सर्व कर्मधनीभूत, सर्वांच्या कर्माचे साक्षी, त्याचप्रमाणे इच्छा, ज्ञान आणि क्रिया यांचे अधिष्ठान असे सर्वशास्त्रात सांगितलेले आहे. त्यालाच र्‍हींकार शब्दाचा वाच्यार्थ किंवा आदितत्त्व असेही म्हणण्याची प्रथा आहे.

त्या माझ्या ठिकाणच्या आदितत्त्वातून सूक्ष्म अपंचीकृत असे आकाश म्हणजेच शब्दतन्मात्रारूप आकाश निर्माण झाले. त्यांच्यापासून स्पर्श सहज असलेला वायु आणि वायूपासून रूपात्मक तेज निर्माण झाले. तेजापासून रसाने युक्त जल तयार झाले आणि त्या जलापासून गंधयुक्त अशी पृथ्वी निर्माण झाली.

शब्द हा आकाशाचा एकमेव गुण असून वायु मात्र स्पर्श व शब्द या दोन्ही गुणांनी परिपूर्ण आहे. तेज हे शब्द, स्पर्श व रूप या तिन्ही गुणांनी अलंकृत आहे तर उदकाजवळ शब्द, स्पर्श, रस आणि रूप हे चारही गुण आढळून येतात असे प्राप्त पंडितांचे मत आहे. शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध हे पाचही गुण जी मध्ये वास करीत आहेत अशी ही पृथ्वी आहे असे शास्त्रीवचन आहे. या सुक्ष्म पंचमहाभूतांपासून अत्यंत विस्तृत अशा सूत्रात्मा झाला आहे. त्याला लिंग असे म्हणतात.

सर्वात्मक व प्राणरूप असे ते सूत्र आहे असे व्युत्पन्नांनी सांगितले आहे. त्यालाच आत्म्याचा सूक्ष्म देह म्हणतात. ज्यामध्ये हे जगत् बीजरूपाने वास्तव्य करीत असते व ज्या स्थानापासून लिंग देहाची व्युत्पत्ती होते, तेच पूर्वीचे अव्यक्त असून तेच या आत्म्याचा कारण देह होय. पंचमहाभूतांची उत्पत्ती झाल्यावर पाच स्थूल भूते निर्माण होतात.

हे शैलश्रेष्ठा, आता तुला मी प्रथम पंचीकरण हा काय प्रकार आहे ते सांगते. प्रथम सांगितल्याप्रमाणे त्या सूक्ष्म पंचमहाभूतांचे प्रत्येकी दोन भाग करावे. नंतर त्या प्रत्येकातील दोन भागांच्या प्रत्येक भागाचे पुन्हा चार निरनिराळे विभाग करावे. एकेका भूताच्या अर्ध्या भागात इतर चारही भूतांचे प्रत्येकी एक चतुर्थांश भाग मिळविले असता ते पुन्हा पाचा पाचाचे विभाग तयार होतात.

हे पर्वतश्रेष्ठा, विराट देह हे त्या पंचीकृत पंचमहाभूतांचे मोठे कार्य आहे. त्याला आत्म्याचा स्थूल देह असे म्हणतात. पाच भूतांच्या वेगवेगळया सत्त्वांशापासून श्रोत्रादि ज्ञानेंद्रियांची उत्पत्ती होते व त्या सर्वांच्या सत्त्वांशापासून एक अंतःकरण उत्पन्न होते.

प्रत्येक वृत्तीच्या वेगवेगळेपणामुळे हे अंतःकरण चार प्रकारचे असते. ज्यावेळी ते अंतःकरण संकल्प अथवा विकल्पादि क्रिया करते तेव्हा त्याला मन हे नाव प्राप्त होते. जेव्हा ते निश्‍चित ठाम मनाने जाणीव करून घेते आणि संशयरहित असे त्याचे रूप होते त्याला प्राज्ञजन बुद्धी या नावाने संबोधतात. जेव्हा त्या अंतःकरणात कसले ना कसले तरी चिंतन करण्याची शक्ती प्राप्त होते तेव्हा त्याला चित्त असे म्हणतात. जेव्हा त्या "अहं" पणाचा दृढ भाव निर्माण होतो, त्यातला "अहं" भाव श्रेष्ठत्व पावतो, तेव्हा त्याला अहंकार असे म्हणतात.

पाच भूतांच्या ठिकाणी जे निरनिराळे रजोगुण संभवत असतात त्यापासून क्रमाने पाच कर्मेंद्रिये तयार होतात. त्या पाच कर्मेंद्रियांच्या रजोगुणांच्या सहाय्याने पाच प्राण्यांचा प्राण तयार होत असतो. त्या पाच प्राणांचे वास्तव्य पाच ठिकाणी होत असते. प्राण हा हृदयामध्ये, अपान गुदामध्ये, समान नाभीस्थानी, उदान कंठात व व्यान हा सर्व शरीरात व्यापून रहातो.

सर्व ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये पाच प्राण व मन यांसह बुद्धी ह्या सर्वांच्या समुदायापासून लिंग शरीर म्हणून ज्याला संबोधले जाते ते माझे सूक्ष्म शरीर तयार झालेले आहे.

आता हे पर्वतराजा, पूर्वी जिला प्रकृती म्हणून संबोधले होते त्याबद्दल तुला सांगते. प्रकृती दोन प्रकारची असते असे शास्त्रात सांगितलेले आहे. प्रकृतीचा एक प्रकार म्हणजे माया व दुसरा प्रकार म्हणजे अविद्या. माया ही सत्त्वरूप असते आणि अविद्या ही रज व तम या गुणांनी युक्त आहे. माया ही स्वतःचे आश्रयस्थान असलेल्या चैतन्यालाही आच्छादित करीत नाही. म्हणूनच ती माया होय.

जो बिंबस्वरूप नियंता आहे, त्याचे प्रतिबिंब तिच्यात पडते. त्या प्रतिबिंबाला ईश्‍वर असे म्हणतात. त्या ईश्‍वराला स्वतःचे आश्रयभूत व विश्‍वव्यापक ब्रह्म असे सर्वांगीण ज्ञान असते. म्हणूनच तो सर्वश्रेष्ठ, सर्वज्ञ, सर्वकर्ता व सर्वांनुग्रही आहे.

तसेच अविद्येमध्ये जे प्रतिबिंब पडते त्याला जीव या नावाने संबोधतात आणि जीव हाच सर्व दुःखाचे एकमेव आश्रयस्थान आहे. अविद्येमुळे यांना तीन देह असतात असे शास्त्रात सांगितलेले आहे.

या तिन्ही देहाबद्दल अभिमान बाळगल्याबद्दल या जीवभूत चैतन्याला तीन वेगवेगळी नावे प्राप्त झाली आहेत. कारण देहरूप होणार्‍यास प्राज्ञ, सूक्ष्म देहाचा अभिमान धरणार्‍यास तैजस व स्थूल देहाची आस्था बाळगणार्‍यास विश्‍व अशी ही तीन नावे आहेत.

म्हणून हे तीन प्रकार त्यापासून संभवतात असा सिद्धांत आहे.

त्याचप्रमाणे ईश्‍वरसूत्र व विराट शब्द ईशाचे निदर्शक आहेत. जीव हा व्यष्टीरूप असून ईश्‍वर हा समष्टीरूप आहे असे आप्तवचन आहे.

हे श्रेष्ठा, माझ्या शक्तीच्या प्रेरणेने माझ्याच ठिकाणी कल्पिलेला असा सर्वेश्‍वर प्रत्यक्षात जीवावर अनुग्रह करण्याची इच्छा करतो आणि निरनिराळया भोगांचे जे आश्रयस्थान ते हे जगत तो निर्माण करतो.



अध्याय बत्तिसावा समाप्त

GO TOP