श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
सप्तमः स्कन्धः
एकत्रिंशोऽध्यायः


हिमालयगृहे पार्वतीजन्मविषये देवान् प्रति देवीकथनवर्णनम्

जनमेजय उवाच
धराधराधीशमौलावाविरासीत्परं महः ।
यदुक्तं भवता पूर्वं विस्तरात्तद्वदस्व मे ॥ १ ॥
को विरज्येत मतिमान् पिबञ्छक्तिकथामृतम् ।
सुधां तु पिबतां मृत्युः स नैतच्छृण्वतो भवेत् ॥ २ ॥
व्यास उवाच
धन्योऽसि कृतकृत्योऽसि शिक्षितोऽसि महात्मभिः ।
भाग्यवानसि यद्देव्यां निर्व्याजा भक्तिरस्ति ते ॥ ३ ॥
शृणु राजन्पुरा वृत्तं सतीदेहेऽग्निभर्जिते ।
भ्रान्तः शिवस्तु बभ्राम क्वचिद्देशे स्थिरोऽभवत् ॥ ४ ॥
प्रपञ्चभानरहितः समाधिगतमानसः ।
ध्यायन्देवीस्वरूपं तु कालं निन्ये स आत्मवान् ॥ ५ ॥
सौभाग्यरहितं जातं त्रैलोक्यं सचराचरम् ।
शक्तिहीनं जगत्सर्वं साब्धिद्वीपं सपर्वतम् ॥ ६ ॥
आनन्दः शुष्कतां यातः सर्वेषां हृदयान्तरे ।
उदासीनाः सर्वलोकाश्चिन्ताजर्जरचेतसः ॥ ७ ॥
सदा दुःखोदधौ मग्ना रोगग्रस्तास्तदाभवन् ।
ग्रहाणां देवतानां च वैपरीत्येन वर्तनम् ॥ ८ ॥
अधिभूताधिदैवानां सत्यभावान्नृपाभवन् ।
अथाऽस्मिन्नेव काले तु तारकाख्यो महसुरः ॥ ९ ॥
ब्रह्मदत्तवरो दैत्योऽभवत्त्रैलोक्यनायकः ।
शिवौरसस्तु यः पुत्रः स ते हन्ता भविष्यति ॥ १० ॥
इति कल्पितमृत्युः स देवदेवैर्महासुरः ।
शिवौरससुताभावाज्जगर्ज च ननन्द च ॥ ११ ॥
तेन चोपद्रुताः सर्वे स्वस्थानात्प्रच्युताः सुराः ।
शिवौरससुताभावाच्चिन्तामापुर्दुरत्ययाम् ॥ १२ ॥
नाङ्गना शङ्करस्यास्ति कथं तत्सुतसम्भवः ।
अस्माकं भाग्यहीनानां कथं कार्यं भविष्यति ॥ १३ ॥
इति चिन्तातुराः सर्वे जग्मुर्वैकुण्ठमण्डले ।
शशंसुर्हरिमेकान्ते स चोपायं जगाद ह ॥ १४ ॥
कुतश्चिन्तातुराः सर्वे कामकल्पद्रुमा शिवा ।
जागर्ति भूवनेशानी मणिद्वीपाधिवासिनी ॥ १५ ॥
अस्माकमनया देव तदुपेक्षास्ति नान्यथा ।
शिक्षैवेयं जगन्मात्रा कृतास्मच्छिक्षणाय च ॥ १६ ॥
लालने ताडने मातुर्नाकारुण्यं यथार्भके ।
तद्वदेव जगन्मातुर्नियन्त्र्या गुणदोषयोः ॥ १७ ॥
अपराधो भवत्येव तनयस्य पदे पदे ।
कोऽपरः सहते लोके केवलं मातरं विना ॥ १८ ॥
तस्माद्यूयं पराम्बां तां शरणं यात मा चिरम् ।
निर्व्याजया चित्तवृत्त्या सा वः कार्यं विधास्यति ॥ १९ ॥
इत्यादिश्य सुरान्सर्वान्महाविष्णुः स्वजायया ।
संयुतो निर्जगामाशु देवैः सह सुराधिपः ॥ २० ॥
आजगाम महाशैलं हिमवन्तं नगाधिपम् ।
अभवंश्च सुराः सर्वे पुरश्चरणकर्मिणः ॥ २१ ॥
अम्बायज्ञविधानज्ञा अम्बायज्ञं च चक्रिरे ।
तृतीयादिव्रतान्याशु चक्रुः सर्वे सुरा नृप ॥ २२ ॥
केचित्समाधिनिष्णाताः केचिन्नामपरायणाः ।
केचित्सूक्तपराः केचिन्नामपारायणोत्सुकाः ॥ २३ ॥
मन्त्रपारायणपराः केचित्कृच्छ्रादिकारिणः ।
अन्तर्यागपराः केचित्केचिन्न्यासपरायणाः ॥ २४ ॥
हृल्लेखया पराशक्तेः पूजां चक्रुरतन्द्रिताः ।
इत्येवं बहुवर्षाणि कालोऽगाज्जनमेजय ॥ २५ ॥
अकस्माच्चैत्रमासीयनवम्यां च भृगोर्दिने ।
प्रादुर्बभूव पुरतस्तन्महः श्रुतिबोधितम् ॥ २६ ॥
चतुर्दिक्षु चतुर्वेदैर्मूर्तिमद्‌भिरभिष्टुतम् ।
कोटिसूर्यप्रतीकाशं चन्द्रकोटिसुशीतलम् ॥ २७ ॥
विद्युत्कोटिसमानाभमरुणं तत्परं महः ।
नैव चोर्ध्वं न तिर्यक्च न मध्ये परिजग्रभत् ॥ २८ ॥
आद्यन्तरहितं तत्तु न हस्ताद्यङ्गसंयुतम् ।
न च स्त्रीरूपमथवा न पुंरूपमथोभयम् ॥ २९ ॥
दीप्त्या पिधानं नेत्राणां तेषामासीन्महीपते ।
पुनश्च धैर्यमालम्ब्य यावत्ते ददृशुः सुराः ॥ ३० ॥
तावत्तदेव स्त्रीरूपेणाभाद्दिव्यं मनोहरम् ।
अतीव रमणीयाङ्गीं कुमारीं नवयौवनाम् ॥ ३१ ॥
उद्यत्पीनकुचद्वन्द्वनिन्दिताम्भोजकुड्मलाम् ।
रणत्किङ्‌किणिकाजालसिञ्जन्मञ्जीरमेखलाम् ॥ ३२ ॥
कनकाङ्गदकेयूरग्रैवेयकविभूषिताम् ।
अनर्घ्यमणिसम्भिन्नगलबन्धविराजिताम् ॥ ३३ ॥
तनुकेतकसंराजन्नीलभ्रमरकुन्तलाम् ।
नितम्बबिम्बसुभगां रोमराजिविराजिताम् ॥ ३४ ॥
कर्पूरशकलोन्मिश्रताम्बूलपूरिताननाम् ।
कनत्कनकताटङ्कविटङ्कवदनाम्बुजाम् ॥ ३५ ॥
अष्टमीचन्द्रबिम्बाभललाटामायतभ्रुवम् ।
रक्तारविन्दनयनामुन्नसां मधुराधराम् ॥ ३६ ॥
कुन्दकुड्मलदन्ताग्रां मुक्ताहारविराजिताम् ।
रत्‍नसम्भिन्नमुकुटां चन्द्ररेखावतंसिनीम् ॥ ३७ ॥
मल्लिकामालतीमालाकेशपाशविराजिताम् ।
काश्मीरबिन्दुनिटिलां नेत्रत्रयविलासिनीम् ॥ ३८ ॥
पाशाङ्कुशवराभीतिचतुर्बाहुं त्रिलोचनाम् ।
रक्तवस्त्रपरीधानां दाडिमीकुसुमप्रभाम् ॥ ३९ ॥
सर्वशृङ्गारवेषाढ्यां सर्वदेवनमस्कृताम् ।
सर्वाशापूरिकां सर्वमातरं सर्वमोहिनीम् ॥ ४० ॥
प्रसादसुमुखीमम्बां मन्दस्मितमुखाम्बुजाम् ।
अव्याजकरुणामूर्तिं ददृशुः पुरतः सुराः ॥ ४१ ॥
दृष्ट्वा तां करुणामुर्तिं प्रणेमुः सकलाः सुराः ।
वक्तुं नाशक्नुवन् किञ्चिद्वाष्पसंरुद्धनिःस्वनाः ॥ ४२ ॥
कथञ्चित्स्थैर्यमालम्ब्य भक्त्या चानतकन्धराः ।
प्रेमाश्रुपूर्णनयनास्तुष्टुवुर्जगदम्बिकाम् ॥ ४३ ॥
देवा ऊचुः
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥ ४४ ॥
तामग्निवर्णां तपसा ज्वलन्तीं
     वैरोचनीं कर्मफलेषु जुष्टाम् ।
दुर्गां देवीं शरणमहं प्रपद्ये
     सुतरसि तरसे नमः ॥ ४५ ॥
देवीं वाचमजनयन्त देवा-
     स्तां विश्वरूपाः पशवो वदन्ति ।
सा नो मन्द्रेषमूर्जं दुहाना
     धेनुर्वागस्मानुपसुष्टुतैतु ॥ ४६ ॥
कालरात्रिं ब्रह्मस्तुतां वैष्णवीं स्कन्दमातरम् ।
सरस्वतीमदितिं दक्षदुहितरं नमामः पावनां शिवाम् ॥ ४७ ॥
महालक्ष्म्यै च विद्महे सर्वशक्त्यै च धीमहि ।
तन्नो देवी प्रचोदयात् ॥ ४८ ॥
नमो विराट्स्वरूपिण्यै नमः सूत्रात्ममूर्तये ।
नमोऽव्याकृतरूपिण्यै नमः श्रीब्रह्ममूर्तये ॥ ४९ ॥
यदज्ञानाज्जगद्‌भाति रज्जुसर्पस्रगादिवत् ।
यज्ज्ञानाल्लयमाप्नोति नुमस्तां भुवनेश्वरीम् ॥ ५० ॥
नुमस्तत्पदलक्ष्यार्थां चिदेकरसरूपिणीम् ।
अखण्डानन्दरूपां तां वेदतात्पर्यभूमिकाम् ॥ ५१ ॥
पञ्चकोशातिरिक्तां तामवस्थात्रयसाक्षिणीम् ।
नुमस्त्वंपदलक्ष्यार्थां प्रत्यगात्मस्वरूपिणीम् ॥ ५२ ॥
नमः प्रणवरूपायै नमो ह्रीङ्कारमूर्तये ।
नानामन्त्रात्मिकायै ते करुणायै नमो नमः ॥ ५३ ॥
इति स्तुता तदा देवैर्मणिद्वीपाधिवासिनी ।
प्राह वाचा मधुरया मत्तकोकिलनिःस्वना ॥ ५४ ॥
श्रीदेव्युवाच
वदन्तु विबुधाः कार्यं यदर्थमिह सङ्गताः ।
वरदाहं सदा भक्तकामकल्पद्रुमास्मि च ॥ ५५ ॥
तिष्ठन्त्यां मयि का चिन्ता युष्माकं भक्तिशालिनाम् ।
समुद्धरामि मद्‌भक्तान्दुःखसंसारसागरात् ॥ ५६ ॥
इति प्रतिज्ञां मे सत्यां जानीथ विबुधोत्तमाः ।
इति प्रेमाकुलां वाणीं श्रुत्वा सन्तुष्टमानसाः ॥ ५७ ॥
निर्भया निर्जरा राजन्नूचुर्दुःखं स्वकीयकम् ।
देवा ऊचुः
नाज्ञातं किञ्चिदप्यत्र भवत्यास्ति जगत्त्रये ॥ ५८ ॥
सर्वज्ञया सर्वसाक्षिरूपिण्या परमेश्वरि ।
तारकेणासुरेन्द्रेण पीडिताः स्मो दिवानिशम् ॥ ५९ ॥
शिवाङ्गजाद्वधस्तस्य निर्मितो ब्रह्मणा शिवे ।
शिवाङ्गना तु नैवास्ति जानासि त्वं महेश्वरि ॥ ६० ॥
सर्वज्ञपुरतः किं वा वक्तव्यं पामरैर्जनैः ।
एतदुद्देशतः प्रोक्तमपरं तर्कयाम्बिके ॥ ६१ ॥
सर्वदा चरणाम्भोजे भक्तिः स्यात्तव निश्चला ।
प्रार्थनीयमिदं मुख्यमपरं देहहेतवे ॥ ६२ ॥
इति तेषां वचः श्रुत्वा प्रोवाच परमेश्वरी ।
मम शक्तिस्तु या गौरी भविष्यति हिमालये ॥ ६३ ॥
शिवाय सा प्रदेया स्यात्सा वः कार्यं विधास्यति ।
भक्तिर्यच्चरणाम्भोजे भूयाद्युष्माकमादरात् ॥ ६४ ॥
हिमालयो हि मनसा मामुपास्तेऽतिभक्तितः ।
ततस्तस्य गृहे जन्म मम प्रियकरं मतम् ॥ ६५ ॥
व्यास उवाच
हिमालयोऽपि तच्छ्रुत्वात्यनुग्रहकरं वचः ।
बाष्पैः संरुद्धकण्ठाक्षो महाराज्ञीं वचोऽब्रवीत् ॥ ६६ ॥
महत्तरं तं कुरुषे यस्यानुग्रहमिच्छसि ।
नोचेत्क्वाहं जडः स्थाणुः क्व त्वं सच्चित्स्वरूपिणी ॥ ६७ ॥
असम्भाव्यं जन्मशतैस्त्वत्पितृत्वं ममानघे ।
अश्वमेधादिपुण्यैर्वा पुण्यैर्वा तत्समाधिजैः ॥ ६८ ॥
अद्य प्रपञ्चे कीर्तिः स्याज्जगन्माता सुताभवत् ।
अहो हिमालयस्यास्य धन्योऽसौ भाग्यवानिति ॥ ६९ ॥
यस्यास्तु जठरे सन्ति ब्रह्माण्डानां च कोटयः ।
सैव यस्य सुता जाता को वा स्यात्तत्समो भुवि ॥ ७० ॥
न जानेऽस्मत्पितॄणां किं स्थानं स्यान्निर्मितं परम् ।
एतादृशानां वासाय येषां वंशेऽस्ति मादृशः ॥ ७१ ॥
इदं यथा च दत्तं मे कृपया प्रेमपूर्णया ।
सर्ववेदान्तसिद्धं च त्वद्‌रूपं ब्रूहि मे तथा ॥ ७२ ॥
योगं च भक्तिसहितं ज्ञानं च श्रुतिसम्मतम् ।
वदस्व परमेशानि त्वमेवाहं यतो भवेः ॥ ७३ ॥
व्यास उवाच
इति तस्य वचः श्रुत्वा प्रसन्नमुखपङ्कजा ।
वक्तुमारभताम्बा सा रहस्यं श्रुतिगूहितम् ॥ ७४ ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां सप्तमस्कन्धे हिमालयगृहे
पार्वतीजन्मविषये देवान् प्रति देवीकथनवर्णनं नामैकत्रिंशोऽध्यायः ॥ ३१ ॥


देवांनी स्तुति केल्यामुळे देवी प्रसन्न होते -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

जनमेजयाने कृतार्थ होऊन व्यासांना विचारले, "हे भगवन्, आपण पूर्वीच सांगितले आहे की, हिमालय पर्वतावर त्या शक्तीचे तेज प्रकट झाले. पण ते कसे झाले ? केव्हा प्रकट झाले ? हे आपण मला सांगा. शक्ती देवीच्या या कथारूपी अमृताचा कधीच कंटाळा येत नाही. इतकेच काय पण मला तर असे वाटते की जो ही देवीची कथा श्रवण करील त्याला देवांच्या मृत्यूपासूनही भय प्राप्त होणार नाही. इतकी ही कथा अवीट व परमपवित्र आहे."

व्यास म्हणाले, "हे राजा, तू खरोखरच अत्यंत निष्कपट बुद्धीने हे देवीचे पुराण ऐकत आहेस. म्हणून तू अत्यंत धन्य आहेस. तू कृतार्थ असून तुला महात्म्यांनी खरोखरच योग्य असेच शिक्षण दिले आहे. म्हणून तू अत्यंत भाग्यवान आहेस असे मला वाटते.

आता पुढे काय घडले ते ऐक.

सतीचा देह अग्नीत दग्ध झाल्यावर भगवान शंकर इतस्ततः दुःख व्याकुळ होऊन सदैव भटकू लागले. काही ठिकाणी ते स्थिरही राहिले. त्यांचे मन प्रपंचातून उडून गेले. ते अत्यंत उद्विग्न झाले होते. अखेर आपले मन त्यांनी आत्म्यात लीन केले व आत्मज्ञानाने ते भगवती देवीच्या स्वरूपाचे चिंतन करू लागले व सर्वकाळ त्यांनी तिच्या ध्यानातच घालविला.

त्यामुळे सर्व पर्वत, समुद्र, द्वीपे, सर्व चराचर सृष्टि एकाएकी ऐश्‍वर्यरहित व शक्तीशून्य होऊन चैतन्यरहित झाली. सर्वांच्याच हृदयातील आनंद नष्ट झाला. त्या शंकराविषयी चिंता निर्माण होऊन आता स्वतःविषयीची चिंता निर्माण झाल्या. सर्वजण व्याकुळ झाले. सर्व लोक उदासीन झाले व नित्य दुःखरूपी सागरात ते बुडून गेले. त्या काळी सर्वजण रोगग्रस्तही झाले.

सतीच्या अभावामुळे सर्व आधिभौतिक व आधिदैविक जे ग्रह होते त्यांच्या नित्य गती नाहीशा होऊन त्यांच्या गती विपरीत झाल्या. अशाप्रकारे त्रैलोक्यात कोठेही आनंद व चैतन्य राहिले नाही.

अशा या दुष्टचक्राचे वेळी ब्रह्मदेवाची तारकासुराने अपार स्तुति केल्यामुळे ब्रह्मदेव तारकासुरावर प्रसन्न झाला होता. त्याने तारकासुराला याच वेळी अनवधानतेने वर दिला. वरप्राप्तीमुळे तारकासुर उन्मत्त झाला व त्याने त्रैलोक्य जिंकून तो सर्वांचा अधिपति झाला. त्याच्या मृत्यूविषयी एकच कारण इष्ट होते. पण सांप्रत ते कसे शक्य होणार !

शंकराला जो औरस पुत्र होईल तोच त्या तारकासुराचा वध करू शकणार होता आणि भगवान शंकराला यावेळी भार्या नव्हती. शंकराला आता पुत्रलाभ होणे शक्य नाही असे जाणून तारकासुर आनंदाने भयानक गर्जना करीत होता.

तो सर्व देवांना सारखा त्रस्त करून सोडीत होता. देवांच्या स्वस्थानापासून तारकासुराने देवांना भ्रष्ट केले होते. शंकराला सांप्रत औरस पुत्र नसल्याने सर्व देव अत्यंत चिंताग्रस्त झाले. त्यांना काहीही उपाय सुचेना. या शंकराला पुत्र प्राप्ती कशी होणार ? आम्ही देव असून सांप्रत दुर्भागी झालो आहोत. आता आमचे कसे होणार ? या विचाराने देव शोकमग्न झाले होते. अखेर सर्वजण वैकुंठ लोकाप्रत गेले. विष्णूला एकांतात वेढून देवांनी सर्व आपली अवस्था विष्णूच्या कानावर घातली.

भगवान विष्णू म्हणाले, "अहो सुरवरांनो, मणिद्वीपात राहणारी व आपल्या इष्ट मनकामना पूर्ण करणारी ती माहेश्‍वरी शिवा जागृत आहे. तेव्हा तिचा आपणाला एवढा मोठा आधार असताना तुम्ही इतके चिंतामग्न का होता ?

अहो, आमच्याच हातून अनेक चुका घडतात. आम्हीच अपराधी आहोत. म्हणून ती देवी आमची उपेक्षा करते. नाहीतर आमची उपेक्षा झाल्यामुळे आमचा नाश व्हावा अशी तिची इच्छाच नाही. तिचा हेतू शुद्ध व योग्य असतो. आम्हास योग्य तो धडा मिळून आम्ही शहाणपण शिकावे म्हणूनच ती जगन्माता आम्हाला अधून मधून शिक्षा करीत असते.

अहो, बालकाचे प्रेमाने पालनपोषण करणार्‍या मातेने एखादे वेळी बालकाला ताडन केले तर त्यात मातेचा निष्ठुरपणा नसतो. तसेच सर्वांचे नियमन करणार्‍या जगन्मातेने आपल्या गुणदोषांमुळे आपणावर कृपादृष्टी फिरवणे अथवा आपणाला शिक्षा करणे यात तिचा हेतु शुद्ध आहे असेच तुम्ही समजावे.

व्यवहारात मुले पावलोपावली चुकत असतात. ती चुकणारच. मग त्या चुका एका मातेशिवाय अन्य कोण बरे सहन करील ? म्हणून आता निष्कपट बुद्धीने आपण त्या श्रेष्ठ अंबेला शरण जाऊ म्हणजे ती सत्वर देवकार्य करील.

अशाप्रकारे देवांची समजूत घालून भगवान विष्णु आपल्या प्रिय भार्येसह तत्‌क्षणी देवांबरोबर जाण्यास निघाले. नंतर सर्व देव त्या भगवतीच्या मंत्राची पुरश्‍चरणे करू लागले. काहींनी अंबेचे यज्ञ यथाविधी केले. देवीयाग करून काहींनी भगवती देवी संतुष्ट व्हावी म्हणून देवीची तृतीयादि व्रते केली.

काही समाधिनिष्ठ होऊन तप करीत राहिले. कित्येकजण देवीच्या मंत्राचा जप करू लागले. काहींनी देवी सूक्तांचा जप करण्यास सुरुवात केली. काही उत्सुकतेने तंत्रशुद्ध असा देवीच्या नावाचा उच्चार करू लागले. कित्येकांनी मंत्रांची पारायणे केली. काहींनी कृच्छ्र चांद्रायणादि तपे सुरू केली. काहींनी प्राणाग्नी होमाचा आरंभ केला. उरलेल्यांनी न्यासास आरंभ केला. अशाप्रकारे सर्व देवांनी हिमालय पर्वतावर जाऊन हृदयनिवासिनी जी भुवनेश्‍वरीदेवी तिची मंत्रांनी एक चित्ताने पूजा केली.

अशी अनेक वर्षे लोटल्यानंतर अकस्मितपणे चैत्र महिन्यातील नवमीला शुक्रवारी श्रुतींनी वर्णन केल्याप्रमाणे त्या देवी भगवतीचे अद्वितीय तेज सर्व देवांपुढे प्रकट झाले.

ते तेज चारी दिशेला स्थित असलेल्या चारी वेदांनी स्तविल्याप्रमाणे होते. कोटिसूर्याप्रमाणे त्यांची प्रभा अलौकिक होती, पण कोटिचंद्राप्रमाणे ते शीतल व आल्हाददायकही होते. ते कोटयवधी वीजलोटाप्रमाणे दैदीप्यमान होतेच, शिवाय आरक्त असून अत्यंत श्रेष्ठ असे ते तेज होते. ते तेज वर नाही, बाजूला नाही, मध्येही नाही असे सर्वदिशांनी व्याप्त असे होते.

त्या तेजाचा आदि अथवा अंताचा शोध लागत नव्हता. तसेच ते तेज हस्तादि शरीर अवयवांनी युक्त नव्हते. ते तेज स्त्रीरूपही नव्हते व पुरुषरूपही नव्हते. तसेच नपुसकरूपही नव्हते. अशा कोठल्याच प्रकारचे ते नव्हते. त्याच्या दीप्तीने सर्व देवांचे नेत्र दिपून गेले. त्यांना ते सहन होईनासे झाले. अत्यंत धैर्य धरून करुण वदनाने त्यांनी डोळे उघडून ते तेज निरखून पहाण्याचा प्रयत्‍न केला.

तेव्हा ते तेज मनोहर असून स्त्रीरूपाप्रमाणे असावे असे त्यांना वाटले. तिचे रमणीय अवयव बांधेसूद होते. ती नवयौवनाने युक्त असून रुपगुणांनी श्रेष्ठ होती. त्या कुमारीचे स्तनद्वय पुष्ट होते व कमळाच्या कळ्यांपेक्षाही आकर्षक होते. तिच्या नुपुरातील घागर्‍या खुळखुळत होत्या. त्यांचा मंदस्वर श्रवणीय होता. तसेच कमरपटटयातील घुंगरे मधुर नाद करीत होती. सुवर्णाचे गोठ, तोडे तिला शोभून दिसत होते. गळयातील शुभ अलंकारांनी तिला अनुपमेय शोभा प्राप्त झाली होती. त्या अलंकारात अमूल्य रत्‍न जडवलेली होती. या सर्व कंठभूषणामुळे ती अतीव नयनमनोहर दिसत होती.

अत्यंत लहान अशा केतकीच्या पानावर जसे काळे भ्रमर बसावेत तसे तिचे ते काळेभोर केस शोभून दिसत होते. तसेच तिचा अत्यंत रमणीय नितंबप्रदेश रोमराजीनी विभूषित दिसत होता. तिच्या मुखातील तांबूल कापराच्या तुकडयांनी युक्त होता. सुवर्ण कुंडलांमुळे तिच्या मुखाला आगळीच शोभा प्राप्त झाली होती.

अष्टमीच्या चंद्राप्रमाणे तिचे कपाळ नाजूक होते व भिवया दीर्घ होत्या. नेत्र रक्त कमलाप्रमाणे असून विस्तीर्ण होते. नासिका सरळ व उन्नत होती. तिचे अधर मधुर होते आणि ते ओष्ठद्वय अत्यंत मनोहर होते. तिचे हात कुंदकळ्यांप्रमाणे विभूषित होते. मोत्यांच्या हारांनी तिची सुंदरता अधिक वृद्धिंगत झाली होती.

तिच्या मुकुटातील रत्‍ने अत्यंत तेजस्वी आणि सुंदर होती. तिने आपल्या कर्णरंध्रामध्ये चंद्ररेखाकृति अलंकार धारण केले होते. तिचा केशपाश मल्लिका व मालती यांच्या पुष्पमाळांनी सुशोभित झाला होता. तिच्या मस्तकावरील केशर-कस्तुरीचा तिलक उठून दिसत होता आणि तीन नेत्रांनी ती युक्त असल्याने ती अत्यंत रमणीय दिसत होती.

तिचे चारी हात-पाय अंकुश, वरद व अभय या मुद्रांनी युक्त होते आणि तिच्या सर्व सौंदर्यात त्याची भर पडली होती. ती तिच्या तीन नेत्रांमुळे तर फारच आकर्षक रीतीने खुलून दिसत होती. तिची कांति डाळिंबाच्या पुष्पाप्रमाणे होती. तिने लाल वस्त्र परिधान केले होते.

सर्व शृंगार वेषाने ती परिपूर्ण होती. तिला पाहून सर्व देवांनी विनम्र होऊन नमस्कार केले. तिच्या तेजाने सर्व दिशा भारावून गेल्या होत्या. ती सर्वमोहिनी सर्वांचीच जननी होती. प्रसन्नतेमुळे तिच्या मुखावर अधिकच रमणीयता प्राप्त झाली होती. ती गालातल्या गालात मिस्किल व नाजुक हास्य करीत होती.

अशी ती निष्कपट, करुणामूर्ति देवी सर्व देवांना दिसली. त्या मूर्तिमंत करुणेला अवलोकन करून सर्व देवांनी तिला वारंवार नमस्कार केले. पण अत्यानंदाने त्यांचे कंठ दाटून आले होते म्हणून ते काहीच बोलू शकले नाहीत. पण महत्प्रयासांनी देवांनी आपले चित्त स्थिर केले. ते भक्तीने अत्यंत नम्र झाले होते. त्यांचे नेत्र प्रेमाश्रूंनी भरून आले होते. ते सर्व देव हात जोडून त्या जगदंबेची स्तुति करू लागले. देव म्हणाले,

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सतत नमः ।

नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥

अशी देवीची स्तुतिची सुरुवात करून सर्व देव म्हणाले, "हे देवी, तुला आम्ही नमस्कार करतो. तूच महादेवी शिवा असून आम्ही तुला वारंवार प्रणाम करीत आहोत. हे देवी, सर्वांची प्रकृति व सर्वांना कल्याणरूप असलेली शक्ती जी माया म्हणून प्रसिद्ध आहे ती तूच असून आम्ही अत्यंत एकचित्त होऊन तुला पुन्हा पुन्हा नमस्कार करीत आहोत.

जी देवी वर्णाने अग्नीसारखी आहे, जिचे ज्ञान अत्यंत जाज्वल्य आहे, जी प्रखर व दैदिप्यमान आहे, जिची सेवा केली असता कर्माला फल प्राप्त होते अशी जी शक्ती दुर्गादेवी तिला आम्ही अनन्य भावाने शरण आहोत. तीच आपल्या सर्व भक्तांना संसारसागरातून पार करते, म्हणून तिला आम्ही नमस्कार करतो.

ज्या देवीने इंद्रियांनी प्रकाश पाडणार्‍या वाणीला निर्माण केले आहे, आम्ही यज्ञ असून आमच्या सारखे ज्या देवीला बहुरूप मानतात, आम्हाला प्रतिष्ठा व मान प्राप्त करून देऊन जी आम्हाला उन्मत्त बनवते, जी प्राणवायुरूपी कामधेनू असून जी आम्हाला बलशक्ती देते, अशी ती बहुरूपी बहुगुणी देवी, आम्ही तिची आराधना केल्यावर आम्हावर प्रसन्न होवो.

ती मृत्यूचाही नाश करते. तसेच ब्रह्मदेवाने स्तुति केल्यावर तिने मधुकैटभासारख्या महादैत्याचा वध केला अशा तिला, जी विष्णूची शक्ती असून पार्वती, सरस्वती, आदिति व दक्षकन्या आहे, त्या पवित्र शिवेला आम्ही आज शरण येऊन नम्रतापूर्वक वंदन करीत आहोत.

आम्ही त्या महालक्ष्मीला संपूर्ण ओळखले असून तिची शक्ती आम्ही जाणली आहे. म्हणून त्या शक्तीचे आम्ही मनःपूर्वक चिंतन करीत असतो. आमच्या चिंतनामुळे हे देवी आमचेवर प्रेमवर्षाव कर. हे विराट स्वरूपी देवी, तू जणू सूत्राची मूर्ति आहेस, शरीरानी अव्यक्त आहेस व ब्रह्ममय आहेस. म्हणून असे जे तुझे दिव्य, भव्य स्वरूप आहे त्या स्वरूपाची आम्ही पूजा करतो. त्या स्वरूपाला आमचे वंदन असो. आम्हाला रज्जु सर्पाप्रमाणे भासतात, तसेच मालाही सर्पमयच वाटतात, हे केवळ आम्हाला तुझे ज्ञान नसल्यामुळे होते व हे सर्व जगही तसेच बंधनकारक भासते. तुझ्याच ज्ञानाने हे देवी, सर्व जग लय पावते, म्हणून हे सर्वशक्तिमान भुवनेश्‍वरी, आमचा तुला प्रणाम असो.

हे देवी, तू केवळ तत्त्व, चित्‌स्वरूप, तत्‌पदाचा लक्ष्यार्थ, अखंड स्वरूप व वेदांचे तात्पर्य या सर्वांचे स्थान आहे. म्हणून अशा तुझ्या रूपापुढे आम्ही नम्र होत असतो. देवी, तूच अन्नादि पाच कोशात वास्तव्य करूनही त्यापासून भिन्न आहेस. जागृति, सुषुप्ति आणि स्वप्न या तिन्ही अवस्थांची तूच साक्षी आहेस. पण तू दृष्टीकाली त्वंपदाचा लक्ष्यार्थ व प्रत्यगात्म रूपाने व्यक्त होणारी आहेस. यास्तव अशा या जगन्मातेच्या चरणी आम्ही मस्तक ठेवतो. तुच प्रणवाचे स्वरूप आहेस, र्‍हींकारमूर्ती तूच आहेस, तू निरनिराळ्या मंत्रात्मक असून तूच मूर्तिमंत करुणा आहेस. म्हणून अशा या तुला आम्ही सातत्याने नमन करीत असतो."

अशाप्रकारे मणिद्वीपाची अधिपती असलेली व नित्य मणिद्वीपात वास्तव्य करणारी अशी जी देवी तिचे सर्व देवांनी मनःपूर्वक स्तवन केले. अशा रीतीने तिची स्तोत्रे गाईल्यावर जिचा स्वरमंत्र कोकिळेसारखा आहे अशी ती देवी आपल्या मधुर वाणीने देवांना म्हणाली, "हे देवांनो, आता माझी स्तुति पुरे. मी तुमच्यावर प्रसन्न झाले आहे. तुम्ही ज्या कारणासाठी माझे स्तवन केलेत ते कारण मला सत्वर सांगा. तुम्ही सर्वजण येथे का आला आहात ? मी नित्य वरदायिनी असून माझ्या भक्तांच्या मनकामना पूर्ण करते.

हे भाग्यवान देवांनो, मी साक्षात आदिशक्ती, सर्व देवांची वांच्छिते पूर्ण करण्यास समर्थ असून त्यासाठी सिद्ध आहे. असे असताना, हे देवांनो, तुम्हाला चिंता करण्याचे कारण काय ते तुम्ही सांगा. कारण मी माझ्या भक्तांना या दुःखरूपी संसारसागरातून नेहमी मुक्त करीत असते. तसेच मी तुम्हालाही संकटातून सत्त्वर मुक्त करीन. ही माझी प्रतिज्ञा असून ती सत्य आहे असे समजा."

अशाप्रकारे देवीनी आपल्या प्रेमपूर्ण वाणीने देवांना अभय दिले. त्यामुळे देवांची अंतःकरणे अत्यंत संतुष्ट झाली. सर्व देव निर्भय झाल्यामुळे उत्साहभरित झाले. त्यांनी देवीपुढे हात जोडले व ज्या संकटामुळे सांप्रत ते दुःखी होते ते कारण त्यांनी देवीला सांगितले.

सर्व देव पूज्य भावनेने नम्र होऊन देवीला म्हणाले, "हे देवी, परमेश्‍वरी, तू सर्वज्ञ असून तू सर्वसाक्षीरूप आहेस. तुला अकलनीय असे या त्रिभुवनात काहीही नाही. हे देवी, हे महेश्‍वरी, सांप्रत ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे उन्मत्त झालेला दैत्यराज तारकासुर आम्हास रात्रंदिवस त्रस्त करीत आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे पीडिलो आहोत. हे कल्याणी, त्याचा शिवाचा औरस पुत्राकडूनच मृत्यू होऊ शकेल अशी ब्रह्मदेवाने योजना केली आहे. पण हे दयावती देवी, सांप्रत शंकराला भार्या नसल्याने तू जाणतेच आहेस, अशावेळी तुझ्यासारख्या सर्वज्ञापुढे आमच्यासारख्या पामरांनी अधिक काही न सांगणेच बरे !

हे अंबिके, आमच्या स्पष्ट बोलण्यातील जो आशय आहे तो तर आम्ही तुला निवेदन केलाच आहे. याशिवाय तुझ्या चरण कमलांची नित्य सेवा व्हावी अशी आमची प्रमुख इच्छा आहे. म्हणून या देहाचा अभिमान धरण्याचे मनात येते. तुझी सतत सेवा व्हावी म्हणून आम्ही देहसंरक्षणाची इच्छा करीत असतो. तेव्हा हे देवी, आमची प्रार्थना तू ऐक."

देवांचे ते हेतुगर्भ भाषण ऐकून ती जगन्माता देवी परमेश्‍वरी देवांना म्हणाली, "हे देवांनो, मी देवकार्य करण्याविषयी नेहमी तत्पर असते. म्हणून माझ्या प्रेरणेने गौरी म्हणून विख्यात असलेली माझी शक्ती हिमालय पर्वतावर सत्वर निर्माण होईल. ती शक्ती तुम्ही शंकराला अर्पण करा म्हणजे तुमचे जे कार्य आहे ते ती पूर्णत्वास नेईल, तसेच माझ्या चरणकमली तुमची नित्य भक्ती राहील. हिमालय पर्वतसुद्धा परमभक्तीने माझी उपासना करीत असतो. म्हणून त्याच्या गृही जन्म घेणे सांप्रत अत्यंत प्रिय आहे. तेव्हा तुम्ही आता निःशंक मनाने परत जा. मी देवकार्य पूर्ण करीन."

देवीने अशा तर्‍हेने पूर्ण अनुग्रह करणारे भाषण केले. तेव्हा हिमालयाचा व इतर देवांचाही कंठ गहिवराने दाटून आला. त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. ते अत्यंत लीन झाले. हिमालय म्हणाला,

"हे महादेवी, हे परमेश्‍वरी, तू ज्याच्यावर अनुग्रह करण्याची इच्छा करतेस त्याला तू सर्वश्रेष्ठ करतेस. खरोखर मी केवळ जड पाषाण असूनही तू सच्चित्‌स्वरूपिणी देवता अत्यंत श्रेष्ठ असून मज पामराकडे जन्म घेत आहेस.

हे निष्पापे, खरोखर तुझे पितृत्व माझ्यासारख्या जडाकडे येणे किती जन्म घडले तरी अशक्य होते. प्रत्यक्ष अश्‍वमेध यज्ञ करून अथवा समाधि, तपश्‍चर्या करून मिळवलेल्या पुण्यानेही ही घटना घडणे असंभाव्य होती. पण तू आज अशक्य गोष्ट शक्य करीत आहेस. अहो, ती जगन्माता, महादेवी, आदिशक्ती या गरीब पामर हिमालयाची कन्या झाली. खरोखरच मी धन्य आहे. माझे महाभाग्य अत्यंत थोर आहे. अत्यंत महाभाग्यशाली अशी आता सर्व त्रैलोक्यात मला सत्‌कीर्ती लाभेल.

खरोखरच जिच्या उदरांत अनंत कोटी ब्रह्मांडे सामावलेली आहेत अशी ती देवी ज्याची कन्या झाली असा महद्‌भाग्यवान पुत्र ज्या वंशात जन्मास आला, त्या माझ्या पूर्व पितरांसाठी कोणते बरे उत्कृष्ट स्थान वास्तव्याकरता निर्माण केले गेले आहे हेच मला समजेनासे झाले आहे.

हे देवी, तुझे हे सांप्रतचे रूप जसे अत्यंत प्रेमपूर्ण व कृपार्द्र वाटते तसे सर्व वेदांतांनी सिद्ध केलेले तुझे ते रूप अव्यक्त असूनही ते कसे आहे ते तू मला सांग.

हे परमेश्‍वरी, ज्या कारणाने मी सहज तुझ्या स्वरूपाप्रत पोहोचेन ते श्रुतींनी मान्य केलेले ज्ञान व भक्तियुक्त कर्मयोग हे सर्व तू मला कथन कर."

अशाप्रकारे ती आदिमाया अत्यंत प्रसन्न झाली व प्रसन्न मुखकमल होऊन त्या देवी अंबेने श्रुतीतील गुप्त रहस्य देवांना सांगण्यास सुरुवात केली.



अध्याय एकतिसावा समाप्त

GO TOP