गौरीचा जन्म आणि माहेश्वरीची एकशे आठ नावे व पीठे -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
ब्रह्मदेवाच्या आज्ञेने त्याचे सर्व धर्मज्ञ पुत्र हिमालयावर जाऊन राहिले आणि त्या ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांनी भुवनेश्वरी देवीचा अखंड जप सुरू केला. त्या देवीच्या ठिकाणी स्वतःचे मन एकाग्र करून ते शांत अंतःकरणाने नित्य जप करण्यात मग्न झाले.
या ब्रह्मदेवाच्या पुत्रांचे तप अखंड दिवसरात्र चालू होते. त्यांनी दीर्घकाळपर्यंत आपल्या मनाची एकाग्रता ढळू न देता तप केले. अशाप्रकारे एकूण एक लक्ष वर्षेपर्यंत महाभयंकर तप केल्यावर ती जगन्माता पराशक्ती देवी सुप्रसन्न झाली आणि संतुष्ट होऊन तिने ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांना दर्शन दिले.
ती सर्वांगसुंदर होती. तिला चार हात व तीन नेत्र होते. तिचे हातपाय अंकुश, वरद, मुद्रा यांच्यामुळे शोभून दिसत होते. ती सच्चिदानंदरूपिणी देवी अत्यंत सुप्रसन्न वदन होऊन तेथे प्राप्त झाली होती. तिचे मुख करुणरसाने परिपूर्ण होते. अशा त्या आदिमाया जगज्जननीचे दर्शन घडताच ते ब्रह्मपुत्र अत्यंत आनंदित झाले. त्यांनी हात जोडून विनम्र भावाने देवीची स्तुति केली.
ते सर्व मुनिश्रेष्ठ देवीला उद्देशून म्हणाले, "हे विश्वरूपिणी, हे देवी, तुला आम्ही शरण येऊन वंदन करीत आहोत. तुझे रूप अग्नीप्रमाणे दैदीप्यमान आहे. त्यामुळे ते पाहून आम्हाला परम संतोष होत आहे. तूच स्वाभिमानी आहेस व तैजसरूप आहेस. तसेच सर्व लिंग-देह एकत्र रहातात अशी सूत्रात्मकरूप तूच आहेस. तसेच सुषुप्तीचा अभिमान बाळगणारा जो प्राज्ञ पंडित आहे, त्याचे स्वरूप तूच आहेस. तू निराकार आहेस.
हे ब्रह्मस्वरूपिणी, तूच प्रत्यगात्मा आहेस. हे अंबे, तुला आमचे असंख्य नमस्कार असोत. त्वंपद लक्ष व तत्पदलक्ष जो परमात्मा तो तुझेच रूप आहे. म्हणून हे सर्वरूपिणी, आम्ही तुला वारंवार प्रणाम करीत आहोत."
अशाप्रकारे भक्तिरसपूर्ण वाणीने ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांनी त्या देवीची आराधना केली. त्या परमपवित्र दक्षादि मुनींनी तिच्या चरणकमलावर नम्र होऊन मस्तके ठेवली.
अखेर ती देवी अत्यंत प्रसन्न झाली आणि स्वतःशीच हसत हसत तिने सर्वांना अभय दिले. ती अत्यंत मधुर व मंगल प्रसादतुल्य वाणीने म्हणाली, "हे मुनीश्रेष्ठांनो, तुम्ही माझी दीर्घ कालपर्यंत तपश्चर्या केलीत व खडतर व्रत स्वीकारून माझी आराधना केलीत म्हणून मी तुम्हाला प्रसन्न झाले आहे. तेव्हा योग्य तो इच्छित वर मागून घ्या."
त्या जगन्मातेचे ते मधुर भाषण ऐकून सर्व मुनी म्हणाले, "हे देवी, शिव व विष्णु यांना त्यांच्या शक्तींचा पूर्वीप्रमाणे लाभ दे आणि उभयतांच्या शरीराची स्वस्थता करून त्यांना पूर्वोक्त कार्यरत कर."
अशाप्रकारे त्या ब्रह्मदेवपुत्रांनी देवीजवळ वर मागितले.
दक्ष म्हणाला, "हे देवी, हे अंबिके, माझ्या कुलात जन्म घेऊन तू माझे कुल पावन कर म्हणजे त्या योगाने मी धन्य होईन व कृतार्थ होईन. तसेच हे देवी, हे ईश्वरी, तुझ्या जपाने मंत्र, ध्यान व पूजा तसेच तुझी वेगवेगळी अशी स्थाने आज तू स्वतःच्या मुखाने मला कथन कर."
देवी सुहास्यवदन करून म्हणाली, "हे ब्रह्मपुत्रांनो, माझ्या शक्तीचा हरी आणि हर यांनी अपमान केला. त्यामुळे त्या शक्तींनी त्या उभयतांचा त्याग केला. या सर्व त्रैलोक्यात माझ्या प्रेरणेनेच सर्व काही घडत असताही उभयतांना स्वसामर्थ्याचा गर्व झाला. म्हणून त्या दोघांचीही ही दयनीय अवस्था झाली, म्हणून माझा अथवा माझ्य़ापासून उत्पन्न होणार्या शक्तींचा अपमान करून कोणीही अपराध करू नये. पण आता मी त्यांना पूर्वीप्रमाणे करते. माझ्या कृपेच्या अंशानेच त्या उभयतांना पूर्वीप्रमाणे शरीराचे स्वास्थ्य लाभेल आणि माझ्या प्रसादाने हरी व हर यांना त्या शक्तीही पुन्हा प्राप्त होतील. त्या दोन्हीही पूर्वशक्ती लवकरच जन्म घेतील. हे दक्षा, माझ्या प्रेरणेने गौरी तुझ्या घरी जन्म घेईल व लक्ष्मी क्षीरसागराच्या पोटी जन्म घेईल.
हे दक्षा, माझा मुख्य मंत्र म्हणजे मायाबीज हाच आहे व तो सर्वांचे नित्य प्रिय करीत असतो. माझे विराट स्वरूप किंवा माझे सांप्रतचे तुम्हासमोर स्थिर असलेले स्वरूप यांचेच तुम्ही नित्य ध्यान करावे किंवा सच्चिदानंदस्वरूप असे जे माझे आणखी ध्यान आहे तेही आराधना करण्यास योग्य आहे. ते निर्गुण ध्यान आहे. तुम्ही माझीच पूजा करीत रहावे व नित्य माझेच ध्यान करावे."
असे दक्षादि ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांना सांगितल्यावर त्यांना इच्छित वर देऊन जगन्माता भगवती अंबा, जी मणिद्वीपात नित्य वास करीत असते, ती पराशक्ती देवी अंतर्धान पावली, त्यानंतर दक्षादि सर्व ब्रह्मदेवकुमार आपला पिता ब्रह्मदेव यांचेकडे गेले. त्यांनी ब्रह्मदेवापुढे नम्रतापूर्वक हात जोडले व सर्व वृत्तांत देवाला कथन केला.
अखेर हरि व हर ह्यांना पूर्वीप्रमाणे शरीराची स्वस्थता लाभली. ते आपापली कार्ये पहिल्याप्रमाणे नित्य करू लागले. पुढे केव्हाही गर्विष्ठ न होता ते निरभिमान होऊन राहू लागले. आपल्याला देवीमुळेच सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे त्यांनी आता पूर्णपणे जाणले होते.
अशाप्रकारे बराच काळ लोटला, नंतर पुढे दक्षाच्या घरी त्या श्रेष्ठ अशा शक्तीचे तेज उत्पन्न झाले. त्यामुळे अतिशय आनंद होऊन सर्वांनी तिन्ही लोकात मोठा उत्सव सुरू केला. अतिशय हर्षयुक्त मनाने सर्व देवांनी त्या शक्तीवर पुष्पवृष्टि केली.
सर्वांना अवर्णनीय आनंद झाला. त्या आनंदाचे स्वरूप इतके महान होते की आनंदाच्या भरात दुंदुभी, चौघडे वाजविण्यासाठी काडया घेण्याचेही त्यांना भान राहिले नाही. त्यांनी आपल्या हातात काडयाच आहेत असे समजून आपल्या हातांच्या कोपरांनीच वाद्ये वाजविण्यास सुरूवात केली.
त्या देवीचा जन्म होताच निर्मल अंतःकरणाचे साधु व मुनी अत्यंत प्रसन्नचित्त झाले. नद्यातील उदक अत्यंत निर्मल होऊन योग्य मार्गाने त्या नद्या वाहू लागल्या. सूर्याचे तेजही अतिशय अद्भुत झाले. तो अधिक तेजाने तळपू लागला. अशाप्रकारे त्या परममंगल देवीचा जन्म झाल्यावर त्रैलोक्यात सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले. पावित्र्याने सर्व अवकाश ओतप्रोत भरून गेले.
त्या शक्तीच्या ठिकाणी आत्यंतिक स्वरूपाचे ज्ञान वास्तव्य करून राहिले होते. त्रिकालाबाधित सत्य असे तिचे स्वरूप असल्यामुळे तिचे नाव सती असे पडले. नंतर तिला शंकरास पुनरपि अर्पण करण्यात आली. तेव्हा त्या शक्तीच्या प्राप्तीमुळे शंकर पूर्वीप्रमाणे कार्य करण्यास प्रवृत्त झाला. ती शंकराची शक्ती झाली.
पण पुढे दक्षाचे दुर्दैव म्हणून की काय, ती शक्ती अग्नीमध्ये दग्ध झाली. त्यामुळे पुन्हा सर्वत्र हलकल्लोळ झाला."
जनमेजय म्हणाला, "हे मुनीश्रेष्ठा, हे काय विपरीत भाषण करीत आहात ? अहो, जिच्या नुसत्या नामस्मरणाने संसाररूपी अग्नीपासून मानवाला होणारे भय नाहीसे होते, असे तिचे सतीस्वरूप आहे, असे असताना ती स्वतःच अग्नीमध्ये दग्ध झाली ? अहो, त्या प्रजापती दक्षाच्या कोणत्या पापकर्मामुळे हे असले अमोल शक्तीरूप रत्न दग्ध झाले ते सांगा."
व्यास म्हणाले, "आता त्या सतीच्या दहनाचे काय कारण घडले ते मी तुला सांगतो. ते ऐक. तू एकचित्त होऊन ते समजून घे."
फार प्राचीन काळी दुर्वास नावाचे महातपस्वी श्रेष्ठ मुनीश्वर जांबूनदीच्या तीरावर त्या भगवती देवीचे दर्शन घेतल्यावर त्यांनी तेथे मायाबीज मंत्राचा जप केला. त्या देवीचे मंत्रोक्त ध्यान केल्यामुळे ती जगन्माता दुर्वासावर प्रसन्न झाली. तिने आपल्या गळयातील प्रसादतुल्य पुष्पमाला काढून त्या मुनीश्रेष्ठाच्या कंठात घातली. ती माला मध पिऊन गर्वोन्मत्त झालेल्या व मधुर गुंजारव करणार्या भ्रमरांनी युक्त होती. ती माला मुनींनी आनंदाने स्वीकारली.
पुढे ती प्रसादरूप माला आपल्या कंठात धारण करून दुर्वास मुनी आकाशमार्गाने जात होते. ते सत्वर आकाशमार्गाने दक्षाच्या घरी त्या साक्षात अंबेचे, त्या गौरीचे दर्शन घेण्यासाठी आले. त्यांनी त्या सतीच्या पायावर आपले मस्तक ठेवले. तेव्हा दक्षाने मुनींकडे निरखून पाहिले व विचारले, "मुनीश्रेष्ठा, ही अलौकिक पुष्पमाला आपणाला कशी प्राप्त झाली ? कोणाची आहे ही माला ? ही भूलोकीच्या मानवांना दुर्लभ आहे. आपण ही कशी मिळवलीत ?"
दक्षाचे हे कुतूहलजनक प्रश्न ऐकून त्या मुनीश्रेष्ठांचे अंतःकरण स्मृतीने भरून आले व त्याचे वदन प्रसन्न झाले. अत्यंत सद्गदित व आनंदाश्रूंनी पूर्ण भरलेल्या नेत्रांनी ते म्हणाले,
"हे दक्षा, त्या जगन्माता भगवतीचा अनुपमेय असा प्रसाद आहे हा. तिनेच मला हा हार अर्पण केला."
मुनींचे वचन ऐकून सतीचा पिता जो दक्ष याला त्या मालेचा मोह झाला. त्याने ती माला आपणास मिळावी म्हणून त्या मुनींची प्रार्थना केली. भगवतीच्या भक्तांना या त्रिभुवनात अदेय असे काही नसते. म्हणून निरपेक्ष भावनेने दुर्वासांनी ती माला दक्षाला अर्पण केली. दक्षाने ती नम्रभावनेने शिरसावंद्य मानून जेथे स्त्री पुरुषांचे शयन होत असते अशा मंदिरात माला आणून ठेवली. मालेच्या सुगंधाने व्याप्त होऊन दक्ष आनंदित झाला. त्याच्यातील काम जागृत झाला व त्या रात्री तो पंशुकर्मासक्त झाला.
त्याच्या मनात पाप आल्यामुळे कल्याणस्वरूप शंकराविषयी व आपली कन्या सती हिच्याविषयी त्याच्या मनात द्वेषबुद्धी निर्माण झाली. दक्षाच्या त्या अपराधामुळे दक्षापासून निर्माण झालेला तो आपला देह, पातिव्रत्य सिद्ध करण्याच्या इच्छेने त्या सतीने प्रत्यक्ष योगाग्नीमध्ये भस्म करून टाकला आणि नंतर ते तेज दग्ध झाल्यावर पुन्हा हिमालयावर तेच तेज उत्पन्न झाले."
जनमेजय म्हणाला, "हे ब्रह्मन्, सतीचा देह दग्ध झाल्यावर जी सती शंकराला प्राणाहूनही प्रिय होती तिच्या वियोगामुळे भगवान शंकर उद्विग्न झाले नाहीत का ? नंतर त्यांनी त्या विरहावस्थेत काय केले ?"
व्यास म्हणाले, "राजा, खरोखरच ती सती दग्ध झाल्यामुळे जो भयानक अनर्थ ओढवला त्या अनर्थकारक परिस्थीतीचे वर्णन माझ्याच्याने करवत नाही. तो प्रसंग फारच दारुण होता. ते शब्दरूप करण्यास मी खरोखरच असमर्थ आहे.
हे भूपेंद्रा, सती दग्ध झाल्यामुळे भगवान शंकर क्रुद्ध झाले. त्याच्या कोपाग्नीत त्रैलोक्याचा प्रलय झाला. भद्रकाली व शिवगण यांच्यासह तो वीर भद्र उत्पन्न झाला आणि तो त्रैलोक्याचा नाश करीत सुटला. अखेर ब्रह्मादि देव शंकराला शरण गेले.
अशा अवस्थेत सर्वस्वाचा नाश होऊनही भगवान शंकरांनी देवांना अभय दिले. कारण तो ईश्वर खरोखर करुणसागर होता. म्हणून तर तो आपला कोप विसरण्यास तयार झाला आणि दक्षाला मुख लावून भगवान शंकराने त्याला पुन्हा जिवंत केले.
पण नंतर तो भगवान देवाधिदेव शिव, अत्यंत खिन्न झाला. प्रिय सतीच्या वियोगामुळे अतिशय दुःखपीडित होऊन तो यज्ञशालेत गेला व तेथे अपार शोक करू लागला.
शोकाग्नीमध्ये दग्ध झालेल्या आपल्या त्या प्रियेचे शरीर त्याने खांद्यावर घेतले आणि हे सती ! असे वारंवार म्हणू लागला व सतीचा तो अचेतन देह घेऊन तो भगवान शंकर भ्रमिष्टासारखा निरनिराळ्या प्रदेशात भ्रमण करू लागला. त्या देवाच्या त्या शोकमग्न अवस्थेमुळे ब्रह्मदेवादि सर्व देवांना घोर चिंता निर्माण झाली. ते चिंतेने दुःखित झाले.
तेव्हा भगवान विष्णु त्वरेने उठले. त्यांनी आपले धनुष्य सज्ज केले. अनेक बाण सोडून त्या सतीच्या देहाचे असंख्य तुकडे केले. बाणांच्या वेगाबरोबर ते सर्व इतस्ततः पांगून निरनिराळया ठिकाणी जाऊन पडले. ज्या ज्या ठिकाणी सतीच्या देहाचे तुकडे पडले तेथे तेथे भगवान शंकर निरनिराळी रुपे धारण करून राहू लागले आणि सर्व देवांना उद्देशून शंकर म्हणाले, "हे देवांनो, या स्थानी येऊन जे अत्यंत श्रद्धेने शिवशक्तीची उपासना करतील त्यांना या त्रैलोक्यात काहीही अप्राप्य असणार नाही. कारण या आपल्या प्रत्येक अवयवामध्ये ती जगन्माता महादेवी नित्य वास करीत आहे. जे मानव या ठिकाणी येऊन पुरश्चरणासारखी कर्मे करतील त्यांचे मंत्र उत्तम प्रकारे सिद्धीस जातील. परंतु त्यातले त्यात मायाबीज म्हणून जो श्रेष्ठ मंत्र आहे तो तर येथे त्वरित सिद्ध होईल."
हे जनमेजया, अशारीतीने भगवान शंकराने तेथेच वास्तव्य करून प्रियेच्या विरहाने दुःखमग्न होऊन जप, ध्यान व समाधि यातच आपला काळ घालवला.
जनमेजय म्हणाला, "हे निष्पाप मुने, हे कृपाकरा, ती स्थाने कोणती आहेत ? अशाप्रकारची मंत्र सिद्धपीठे किती आहेत ? त्यांची कोणकोणती नावे आहेत ? ते सविस्तर मला सांगा. त्या ठिकाणच्या निरनिराळया देवांची नावे कोणती आहेत हेही मला सांगा म्हणजे त्यामुळे हे महामुने, मी कृतकृत्य होईन."
व्यास म्हणाले, "हे जनमेजया, आता मी तुला देवीची सर्व पीठे कथन करतो. त्यांच्या श्रवणाने मनुष्यास मुक्ती मिळते व त्याचे मनोरथ पूर्ण होतात. कोणत्या ठिकाणी उपासना केली असता त्या फलद्रूप होतात, तसेच कोठे आराधना केल्यावर ऐश्वर्य प्राप्त होते, ती इच्छेप्रमाणे फलप्राप्ती देणारी पीठे मी आता सांगतो. ती तू श्रवण कर.
गौरीचे मुख वाराणसी येथे पडले. तिथे ती भगवतीच्या रूपाने वास्तव्य करीत असून विशालक्ष्मी हे तिचे नाव आहे. नेमिषारण्यात तिला लिंगधारिणी या नावाने ओळखतात.
प्रयाग क्षेत्री तिचे नाव लिलिता असून गंधमादनावर तिला कामुक्ती या सुप्रसिद्ध नावाने संबोधतात. दक्षिण मानस सरोवरामध्ये ती कुमुदा या नावाने सुप्रसिद्ध आहे. उत्तर मानससरोवर विश्वाचे कर्म पूर्ण करणारी ती कामना नावाची भगवती होऊन राहिली आहे. गोमंत पर्वतावर ती देवी गोमति या प्रसिद्ध नावाने वास्तव्य करीत आहे. मंदरावर कामचारिणी, चैत्ररथावर मदोत्कटा, हस्तिनापुरी ती जयंति म्हणून ओळखली जाते. कान्यकुंजात ती गौरी या नावाने विख्यात आहे व मलयगिरीवर रंभा या नावाने ती वावरत आहे.
एकाम्रपीठावर त्या देवीला कीर्तिमती हे नाव प्राप्त झाले आहे. विश्वेश्वर क्षेत्रामध्ये तिला विश्वेश्वरी या नावाने संबोधतात. पुष्करतीर्थावर तिला पुरूहूता असे नाव मिळाले आहे.
केदार पीठावर त्या देवीला सन्मार्गदायिनी म्हणतात. हिमालयावर मंदा, गोकर्णी भद्रकार्णिका, स्थानेश्वराचे क्षेत्रावर ती भवानी आहे. बिल्वकतीर्थावर ती बिल्वपत्रिका म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीशैलावर तिला माधवी म्हणतात. भद्रेश्वरी भद्रा या प्रसिद्ध नावाने तिला ओळखतात.
वराहशैलावर जया, कमलालय तीर्थावर ती कमला आहे. रुद्रकोटी पीठात ती रुद्राणी असून, कालंजरात ती काली आहे. शालग्रामी महादेवी, शिवलिंगी जलप्रिया, महालिंगावर कपिला, माकोटास्थानावर मुकुटेश्वरी, मायापुरीत कुमारी व संतानामध्ये ललितांबिका अशा विविध नावाने तिला ओळखतात. गयेमध्ये मंगला, पुरुषोत्तम नामक तीर्थात तिला विमला असे म्हणण्याचा प्रघात आहे.
सहास्त्राक्षावर उत्पलाक्षी, हिरण्याक्षावर महोत्पला, विपाशातीर्थावर अमोघाक्षी, पंड्रवर्धनावर पाडला. सुपार्श्वावर नारायणी, चित्रकूटावर रुद्रासुंदरी, विपुल नावाच्या तीर्थक्षेत्री ती देवी विपुला या नावाने प्रसिद्ध आहे. मलयाचलावर कल्याणी, सह्यादि पर्वतामध्ये एकवीरा, हरिश्चंद्र नावाच्या क्षेत्रावर चंद्रिका, रामतीर्थावर रमणा, यमुनेत मृगावती, कोटतीर्थी कोटिवी, मधुवनात सुगंधा, गोदावरीमध्ये त्रिसंध्या, गंगाद्वारी रतिप्रिया, शिवकुंडस्थानी शुभानंदा, द्वारावतीत रुक्मिणी, वृंदावनामध्ये राधा, मथुरेत देवकी, पाताललोकी परमेश्वरी अशी तिची निरनिराळ्या क्षेत्रांवर निरनिराळी नावे आहेत. तसेच ती चित्रकूट पर्वतावर सीता या नावाने प्रसिद्ध असून विंध्याद्रि पर्वतावर विंध्यवासिनी म्हणून तिला ओळखतात.
करवीरक्षेत्री महालक्ष्मी, विनायक क्षेत्रावर उमादेवी, वैद्यनाथी तीर्थावर आरोग्या, महाकालावर महेश्वरी, उष्णतीर्थावर अभया, विंध्यपर्वतावर नितंबा, मांडव्यावर मांडली व माहेश्वरीपुरामध्ये ती स्वाहा नावाची देवी आहे. छगलंडक्षेत्री प्रचंडा, अमरकंटकी चंडिका, सोमेश्वरी वरारोहा, प्रभासक्षेत्रावर पुष्करावती, सरस्वतीमध्ये देवमाता आणि समुद्रतीरावर पारावारा या नावाने प्रसिद्ध आहे.
महालयामध्ये महाभागा, पयोष्णिमध्ये पिंगलेश्वरी, कृतशौचनामक क्षेत्रामध्ये सिंहिका, कार्तिकक्षेत्री अतिशांकरी, वर्तकावर उत्पला, शोणनदीच्या संगमावर लीला सुभद्रा, सिद्धवनात माता, भरताश्रमात ती लक्ष्मी अनंगा या नावाने प्रसिद्ध आहे. जालंधर क्षेत्रावर विश्वमुखी, किष्किंध पर्वतावर तारा, देवदारूवनात पुष्टी, काश्मीर मंडलामधे मेघा, हिमाद्रीवर भीमादेवी, विश्वेश्वर क्षेत्रात तुष्टि, कपालमोचनात शुद्धि, कामावरोहण नावाच्या क्षेत्रामध्ये ती माता या नावाने विख्यात आहे.
शंखोद्वारामध्ये धरा आणि पिंडारक क्षेत्रावर ती धृति नावाची देवी आहे. चंद्रभागेत कला, अच्छोद सरोवरी शिवधारिणी, वेणेमध्ये अमृताख्या, बद्रिकरण्यात उर्वशी अशी तिची नावे आहेत.
उत्तरकुरूत औषधी, कुशद्वीपात कुशोदका, हेमकूटामध्ये मन्मथा, कुमुदक्षेत्री सत्यवाहिनी, अश्वत्थाचे ठिकाणी वंदनीय, कुबेरगृही निधी, वेदमुखामध्ये गायत्री, शिवासमीप पार्वती, देवलोकी इंद्राणी, ब्रह्ममुखात सरस्वती, सूर्यबिंबात प्रभा, मातृकामध्ये वैष्णवी अशी ही तिची निरनिराळी नावे आहेत.
सतीमध्ये अरुंधती, स्त्रियांमध्ये तिलोत्तमा, चित्तामध्ये ब्रह्मकला, सर्व जीवात्म्यामध्ये शक्ती या नावाने तीच सर्वत्र वास्तव्य करीत असते.
हे जनमेजया, अष्टोत्तर शतपीठे आहेत. तसेच त्या पीठाचे नियमन करणार्या त्या देवींची नावेही मी तुला कथन केली. सतीदेवीच्या अंगभूत असलेली ही सर्व पीठे सांप्रत तुला सांगितली असून यापूर्वी भूतलावर मुख्य असलेली इतरही सर्व स्थाने तुला सांगितली.
जो पुरुषश्रेष्ठ या अष्टोत्तरशत नामांचे स्मरण किंवा श्रवण करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि त्याचा उद्धार होऊन देवीलोक त्याला प्राप्त होतो.
हे राजा जनमेजया, जो या तीर्थक्षेत्रांवर जाऊन श्राद्धादि विधी करतो व त्यायोगे आपल्या पितरांचे तर्पण करतो व या उत्कृष्ट पद्धतीने आपल्या पितरांना तृप्त व त्या देवी भगवतीची शास्त्रोक्त विधीने जो सर्वोत्तम पूजा बांधतो, तसेच त्या जगाचे पालन करणार्या जगदंबेची जो वारंवार क्षमा मागतो, तोच प्राणी कृतकृत्य होऊन मुक्त होतो. त्यालाच मोक्ष मिळतो. हे राजा, या सर्व पवित्र क्षेत्रांची यात्रा करणार्या पुरुषाने भव्य, भोजादिकांच्या योगाने सर्व ब्राह्मण व सुवासिनी स्त्रिया, कुमारिका व ब्रह्मचारी, यांना भोजन घालावे. हे प्रभो ! त्या क्षेत्रामध्ये वास्तव्य करीत असलेले चांडाळादि प्राणीही देवरुपच मानावे व त्यांनाही अन्नदान व वस्त्रदान इत्यादि उपायांनी तृप्त करावे. त्या क्षेत्रांमध्ये प्रतिगृहासारखी निषिद्ध कर्मे वर्ज करावीत.
उत्तम ब्राह्मणाने त्या क्षेत्रावर जाऊन गायत्री मंत्राच्या साहाय्याने जप करून पुरःश्चरणे करावीत. तसेच त्या त्या स्थानामध्ये राहणार्या देवींची मायाबीज मंत्राने नित्य पूजा करावी. देवीच्या उपासनेत तत्पर असणार्या भक्ताने वित्तशाष्ढ्य (योग्यतेपेक्षा कमी अथवा जास्त द्रव्य देणे) करू नये.
अशाप्रकारे जो कोणी प्रसन्न अंतःकरणाने यात्रा करील त्याचे पितर हजारो कल्पापर्यंत सर्वोत्कृष्ठ अशा ब्रह्मलोकी निवास करतील. आणि तो स्वतः देवीपुरात वास्तव्य करील आणि अखेर श्रेष्ठ दिव्यज्ञानाची प्राप्ती होऊन तो भवसागरातून मुक्त होईल.
या अष्टोत्तरगत नावाच्या जपाने कित्येकांना सिद्धी प्राप्त झालेली आहे. ही नामावली कोठेही पुस्तकात अथवा इतरत्र लिहिलेली असते. तेथे ग्रह, मृत्यु इत्यादि पासून भय प्राप्त होत नाही. पर्वकाळी वृद्धी पावणार्या समुद्राप्रमाणे त्याचे सौभाग्य वृद्धिंगत होते.
या एकशे आठ नावांचा जप करणारास या जगात दुर्लभ असे काही नाही. खरोखरच देवीच्या भक्तीत सदैव तत्पर असणारा पुरुष कृतार्थ होतो. त्याला सर्व देव-देवता वंदन करतात. तो देवीभक्त देवीरुपच आहे असे शास्त्रात म्हटले आहे त्याला प्रत्यक्ष देवसुद्धा जर पूज्य मानत असतात मग तर मनुष्याची गोष्टच नको.
श्राद्धाचे वेळी या अष्टोत्तरशत नामावलीचे पठण केल्यास सर्व पितर तृप्त होऊन उत्तम गतीला जातात. हे राजेंद्रा, ही ज्ञानमय सिद्धपीठे असल्याने बुद्धिमान पुरुषाने यांचा नित्य आश्रय करावा.
हे राजा, असे हे माहेश्वरीचे परम रहस्य तू मला विचारलेस ते मी तुला सांगून तृप्त केले आहे. आता आणखी काय ऐकावे अशी तुझी इच्छा आहे ते सत्वर सांगा.