श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
सप्तमः स्कन्धः
एकोनत्रिंशोऽध्यायः


भगवतीं समाराधयिषूणां देवानां तपःकरणवर्णनम्

व्यास उवाच -
इत्येवं सूर्यवंश्यानां राज्ञां चरितमुत्तमम् ।
सोमवंशोद्‌भवानां च वर्णनीयं मया कियत् ॥ १ ॥
पराशक्तिप्रसादेन महत्त्वं प्रतिपेदिरे ।
राजन् सुनिश्चितं विद्धि पराशक्तिप्रसादतः ॥ २ ॥
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं पराशक्त्यंशसम्भवम् ॥ ३ ॥
एते चान्ये च राजानः पराशक्तेरुपासकाः ।
संसारतरुमूलस्य कुठारा अभवन्नृप ॥ ४ ॥
तस्मात्सर्वप्रयत्‍नेन संसेव्या भुवनेश्वरी ।
पलालमिव धान्यार्थी त्यजेदन्यमशेषतः ॥ ५ ॥
आमथ्य वेददुग्धाब्धिं प्राप्तं रत्‍नं मया नृप ।
पराशक्तिपदाम्भोजं कृतकृत्यो‍ऽस्म्यहं ततः ॥ ६ ॥
पञ्चब्रह्मासनारूढा नास्त्यन्या कापि देवता ।
तत एव महादेव्या पञ्चब्रह्मासनं कृतम् ॥ ७ ॥
पञ्चभ्यस्त्वधिकं वस्तु वेदेऽव्यक्तमितीर्यते ।
यस्मिन्नोतं च प्रोतं च सैव श्रीभुवनेश्वरी ॥ ८ ॥
तामविज्ञाय राजेन्द्र नैव मुक्तो भवेन्नरः ।
यदा चर्मवदाकाशं वेष्टयिष्यन्ति मानवाः ॥ ९ ॥
तदा शिवामविज्ञाय दुःखस्यान्तो भविष्यति ।
अत एव श्रुतौ प्राहुः श्वेताश्वतरशाखिनः ॥ १० ॥
ते ध्यानयोगानुगता अपश्य-
न्देवात्मशक्तिं स्वगुणैर्निगूढाम् ॥ ११ ॥
तस्मात् सर्वप्रयत्‍नेन जन्मसाफल्यहेतवे ।
लज्जया वा भयेनापि भक्त्या वा प्रेमयुक्तया ।
सर्वसङ्गं परित्यज्य मनो हृदि निरुध्य च ॥ १२ ॥
तन्निष्ठस्तत्परो भूयादिति वेदान्तडिण्डिमः ।
येन केन मिषेणापि स्वपंस्तिष्ठन्व्रजन्नपि ॥ १३ ॥
कीर्तयेत्सततं देवीं स वै मुच्येत बन्धनात् ।
तस्मात्सर्वप्रयत्‍नेन भज राजन् महेश्वरीम् ॥ १४ ॥
विराड्‌रूपां सूत्ररूपां तथान्तर्यामिरूपिणीम् ।
सोपानक्रमतः पूर्वं ततः शुद्धे तु चेतसि ॥ १५ ॥
सच्चिदानन्दलक्ष्यार्थरूपां तां ब्रह्मरूपिणीम् ।
आराधय परां शक्तिं प्रपञ्चोल्लासवर्जिताम् ॥ १६ ॥
तस्यां चित्तलयो यः स तस्या आराधनं स्मृतम् ।
राजन् राज्ञां पराशक्तिभक्तानां चरितं मया ॥ १७ ॥
धार्मिकाणां सूर्यसोमवंशजानां मनस्विनाम् ।
पावनं कीर्तिदं धर्मबुद्धिदं सद्‌गतिप्रदम् ॥ १८ ॥
कथितं पुण्यदं पश्चात्किमन्यच्छ्रोतुमिच्छसि ।
जनमेजय उवाच -
गौरीलक्ष्मीसरस्वत्यो दत्ताः पूर्वं पराम्बया ॥ १९ ॥
हराय हरये तद्वन्नाभिपद्मोद्‌भवाय च ।
तुषाराद्रेश्च दक्षस्य गौरी कन्येति विश्रुतम् ॥ २० ॥
क्षीरोदधेश्च कन्येति महालक्ष्मीरिति स्मृतम् ।
मूलदेव्युद्‌भवानां च कथं कन्यात्वमन्ययोः ॥ २१ ॥
असम्भाव्यमिदं भाति संशयोऽत्र महामुने ।
छिन्धि ज्ञानासिना तं त्वं संशयच्छेदतत्परः ॥ २२ ॥
व्यास उवाच -
शृणु राजन् प्रवक्ष्यामि रहस्यं परमाद्‌भुतम् ।
देवीभक्तस्य ते किञ्चिदवाच्यं न हि विद्यते ॥ २३ ॥
देवीत्रयं यदा देवत्रयायादात्पराम्बिका ।
तदाप्रभृति ते देवाः सृष्टिकार्याणि चक्रिरे ॥ २४ ॥
कस्मिंश्चित्समये राजन् दैत्या हालाहलाभिधाः ।
महापराक्रमा जातास्त्रैलोक्यं तैर्जितं क्षणात् ॥ २५ ॥
ब्रह्मणो वरदानेन दर्पिता रजताचलम् ।
रुरुधुर्निजसेनाभिस्तथा वैकुण्ठमेव च ॥ २६ ॥
कामारिः कैटभारिश्च युद्धोद्योगं च चक्रतुः ।
षष्टिवर्षसहस्राणामभूद्‍युद्धं महोत्कटम् ॥ २७ ॥
हाहाकारो महानासीद्देवदानवसेनयोः ।
महताथ प्रयत्‍नेन ताभ्यां ते दानवा हताः ॥ २८ ॥
स्वस्वस्थानेषु गत्वा तावभिमानं च चक्रतुः ।
स्वशक्त्योर्निकटे राजन् यद्वशादेव ते हताः ॥ २९ ॥
अभिमानं तयोर्ज्ञात्वा छलहास्यं च चक्रतुः ।
महालक्ष्मीश्च गौरी च हास्यं दृष्ट्वा तयोस्तु तौ ॥ ३० ॥
देवावतीव संकृद्धौ मोहितावादिमायया ।
दुरुत्तरं च ददतुरवमानपुरःसरम् ॥ ३१ ॥
ततस्ते देवते तस्मिन्क्षणे त्यक्त्वा तु तौ पुनः ।
अन्तर्हिते चाभवतां हाहाकारस्तदा ह्यभूत् ॥ ३२ ॥
निस्तेजस्कौ च निःशक्ती विक्षिप्तौ च विचेतनौ ।
अवमानात्तयोः शक्त्योर्जातौ हरिहरौ तदा ॥ ३३ ॥
ब्रह्मा चिन्तातुरो जातः किमेतत्समुपस्थितम् ।
प्रधानौ देवतामध्ये कथं कार्याक्षमावमू ॥ ३४ ॥
अकाण्डे किं निमित्तेन संकटं समुपस्थितम् ।
प्रलयो भविता किं वा जगतोऽस्य निरागसः ॥ ३५ ॥
निमित्तं नैव जानेऽहं कथं कार्या प्रतिक्रिया ।
इति चिन्तातुरोऽत्यर्थं दध्यौ मीलितलोचनः ॥ ३६ ॥
पराशक्तिप्रकोपात्तु जातमेतदिति स्म ह ।
जानंस्तदा सावधानः पद्मजोऽभून्नृपोत्तम ॥ ३७ ॥
ततस्तयोश्च यत्कार्यं स्वयमेवाऽकरोत्तदा ।
स्वशक्तेश्च प्रभावेण कियत्कालं तपोनिधिः ॥ ३८ ॥
ततस्तयोस्तु स्वस्त्यर्थं मन्वादीन्स्वसुतानथ ।
आह्वयामास धर्मात्मा सनकादींश्च सत्वरः ॥ ३९ ॥
उवाच वचनं तेभ्यः सन्नतेभ्यस्तपोनिधिः ।
कार्यासक्तोऽहमधुना तपः कर्तुं न च क्षमः ॥ ४० ॥
पराशक्तेस्तु तोषार्थं जगद्‌भारयुतोऽस्म्यहम् ।
शिवविष्णू च विक्षिप्तौ पराशक्तिप्रकोपतः ॥ ४१ ॥
तस्मात्तां परमां शक्तिं यूयं सन्तोषयन्त्वथ ।
अत्यद्‌भुतं तपः कृत्वा भक्त्या परमया युताः ॥ ४२ ॥
यथा तौ पूर्ववृत्तौ च स्यात शक्तियुतावपि ।
तथा कुरुत मत्पुत्रा यशोवृद्धिर्भवेद्धि वः ॥ ४३ ॥
कुले यस्य भवेज्जन्म तयोः शक्त्योस्तु तत्कुलम् ।
पावयेज्जगतीं सर्वां कृतकृत्यं स्वयं भवेत् ॥ ४४ ॥
व्यास उवाच -
पितामहवचः श्रुत्वा गताः सर्वे वनान्तरे ।
रिराधयिषवः सर्वे दक्षाद्या विमलान्तराः ॥ ४५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां सप्तमस्कन्धे भगवतीं समाराधयिषूणां
देवानां तपःकरणवर्णनं नामैकोनत्रिंशोऽध्यायः ॥ २९ ॥


हरि व हर निस्तेज होतात ! -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

व्यास म्हणाले, "हे जनमेजया, मी सूर्य वंशातील व सोमवंशातील काही राजांचे उत्कृष्ट चरित्र तुला सांगितले. पराशक्ती जी देवी तिच्या प्रसादाने त्या सर्व राजांना वैभव व महत्त्व प्राप्त झाले यात तिळमात्रही शंका नाही. ते सर्व त्या पराशक्तीचे उपासक होते.

हे जनमेजया, या त्रैलोक्यातील प्रत्येक प्राणी, प्रत्येक वस्तु त्या पराशक्तीच्या अंशातूनच निर्माण झाली आहे. याबद्दल कोणाही पंडितांचे दुमत नाही.

हे राजा, या पृथ्वीवर जे जे पराशक्तीचे उपासक राजे होऊन गेले आहेत त्यांची चरित्रे श्रवण करणे म्हणजे संसाररूपी वृक्षाच्या मुळावर कुर्‍हाडीचा घाव घालून त्यातून मुक्त होण्यासारखे आहे. धान्य उगवावे म्हणून जसे माणूस बीज टाकतो तसे सर्व काही विसरून व उपभोग सोडून त्या देवी पराशक्तीचीच उपासना करावी.

हे राजा, मी प्रत्यक्ष वेदरूपी क्षीरसागर घुसळला आहे आणि त्यातून हे पराशक्तीपदकमलरूप रत्‍न प्राप्त करून घेतले आहे. त्या पराशक्तीच्या प्राप्तीमुळे मी स्वतः धन्य झालो आहे.

आजवर कोणतीही दुसरी देवता पंचब्रह्मासनावर आरूढ होण्यास समर्थ झाली नाही."

जनमेजयाने विचारले, "हे महर्षे, पंचब्रह्मासन हे काय आहे ? आजवर याचा उपयोग केलेला माझ्या ऐकण्यात नाही व पहाण्यातही नाही. तेव्हा कृपा करून आपण मला त्या आसनाविषयी सांगा."

व्यास म्हणाले, "ब्रह्मांडपुराणात पंचब्रह्मासनाची माहिती आहे. ब्रह्मा, विष्णु, रुद्र व ईश्‍वर हे चार खुर असून वरील फळी म्हणजे सदाशिव असे हे देवतात्मक पीठ आहे. त्या पीठाला पंचब्रह्मासन असे म्हणतात. हे आसन कोणत्याही इतर देवतांना लाभलेले नाही. म्हणून महादेवीने स्वतःसाठी पंचब्रह्मासन तयार केले.

पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही जी पंचमहाभूते आहेत त्यात सूक्ष्म स्वरूपात ब्रह्मा, विष्णु, महेशादि पाच अधिपतींचे उत्पत्तीस्थान आहे. वेदात अव्यक्त म्हणून जे सांगितलेले आहे, तसेच हे सर्व जग ज्या मूळ वस्तूत पुरेपुर भरलेले आहे, ती ही आदिशक्ती, पराशक्ती श्रीभुवनेश्‍वरीदेवी आहे.

हे राजेंद्रा, त्या आदीशक्ती देवीचे ज्ञान करून घेतल्याशिवाय मनुष्य कधीही मुक्त होणे शक्य नाही. या देवीची जाणीव न ठेवता जर मनुष्याच्या दुःखाचा क्षय व्हावा असे वाटत असेल तर माणूस या आकाशाला कातडयाचे वेष्टन घालू शकला पाहिजे. अर्थात ही गोष्ट अशक्य आहे. म्हणून देवीची जाण ठेवली पाहिजे. श्‍वेताश्‍वतर शाखेचे अध्ययन करणारे असे सांगतात की, "ती जी आदिदेवाची आत्मशक्ती आहे, ती स्वतःच्या सत्त्वादि गुणांमुळे गुप्त असते. असे ध्यान योगाचे अनुष्ठान करणार्‍यांनी फक्त जाणले आहे. श्रुतीमध्ये तसे वचन आहे.

म्हणून दीर्घ प्रयत्‍न, लज्जा, भय अथवा प्रेमपूर्ण भक्ती या साधनांनी सर्वसंग परित्याग करावा व मनाचा निरोध करून तन्निष्ठ व तत्पर व्हावे असा वेद घोष करीत आहेत.

कोणतेही कारण असो, निजताना, उभे किंवा चालताना कोणत्याही अवस्थेत जो त्या आदिशक्ती देवीचे चिंतन-मनन करीत असतो, तो संसाररूपी बंधनातून पूर्णपणे मुक्त होतो. याबद्दल संशय बाळगू नये."

व्यास जनमेजयाला म्हणाले, "राजा, तू सुद्धा सर्व कल्याणासाठी एकत्रित मनाने त्या देवी माहेश्‍वरीची अत्यंत प्रयत्‍ने करून भक्ती कर. प्रथम विराट रूप धारण केलेल्या देवीची साधना करावी. नंतर सूत्ररूपिणीचे ध्यानाने चिंतन करावे आणि शेवटी अंतर्यामी रूपिणीची आराधना करावी. अशी पायरी पायरीने सेवा करावी म्हणजे आपले चित्त शुद्ध होते. त्यानंतर सत्‌चित् आनंद हेच त्या देवीचे रूप आहे असे समजून त्या ब्रह्मरूपिणी आणि प्रपंच तरंग विरहित अशा त्या श्रेष्ठ व शाश्‍वत शक्तीची भक्ती करावी. तिच्या स्वरूपात आपल्या चित्ताला लय करणे म्हणजेच त्या महाशक्तीची आराधना करणे होय. त्याशिवाय दुसरी आराधना नाही.

त्या पराशक्ती देवीची उपासना ज्यांनी केली त्या सूर्य वंशात जन्मलेल्या बुद्धिमान धर्मतत्पर, राजांचे पवित्र व कीर्तिप्रद चरित्र धर्म भावना उत्पन्न करते व शेवटी उत्तम गती प्राप्त करून देते. ते पुण्यमय चरित्र मी तुला सांगितले. आता तुला काय ऐकायची इच्छा आहे ते सांग. मी तुझी इच्छा पूर्ण करीन."

जनमेजय म्हणाला, "हे वेदमहर्षे, हे भगवन्, पूर्वी त्या सर्वश्रेष्ठ अशा अंबेने ब्रह्मदेव, विष्णु व शंकर यांना तीन महाशक्ती दिल्या. त्या सरस्वती, लक्ष्मी आणि गौरी या असून देवीने स्वेच्छेने त्या त्यांना दिल्या हे आपण सांगितलेत. पण महाराज, गौरी ही हिमालयाची कन्या तसेच दक्षाची कन्या होती. असे पूर्वी मी ऐकले होते. शिवाय महालक्ष्मी ही तर क्षीरसागराची कन्या आहे हे विदितच आहे. तेव्हा प्रत्यक्ष आदिशक्ती अशा त्या मूलदेवीपासून जर त्या दोघी उत्पन्न झाल्या होत्या तर त्या क्षीरसागर व हिमालय यांच्या कन्या म्हणून कशा जन्मास आल्या ? हे मला असंभवनीय वाटत असल्यामुळे माझ्या मनात उलट सुलट विचार येऊ लागले आहेत आणि मन विनाकारण संशयग्रस्त होत आहे. तेव्हा आपणच ते विस्ताराने कथन करून माझी संशयापासून मुक्तता करा. आपल्या ज्ञानरूपी शस्त्राने माझ्या या अज्ञानाचा छेद करा. हे ऋषीश्‍वरा, आपण एकमेव माझ्या या अज्ञानाचा नाश करण्यास समर्थ आहात."

व्यास म्हणाले, "हे राजा, देवीच्या उपासकाला न सांगण्यासारखे यात काहीही नाही. देवीभक्ताला सर्वांचे ज्ञान करून देणेच योग्य होय. म्हणून ह्यामध्ये जे अत्यद्‌भुत असे रहस्य आहे, ते मी तुला आता सांगतो. तू ते श्रवण कर.

हे धर्मज्ञ राजा, त्या पराशक्ती अशा श्रेष्ठ अंबेने या तीन शक्ती तीन देवांना उत्पन्न करून दिल्या. त्या शक्ती प्राप्त झाल्यावरच ते तिन्ही देव ब्रह्मा, विष्णु, महेश हे त्या सरस्वती, लक्ष्मी, गौरी या शक्तींच्या योगाने सृष्टिकर्म करू लागले. पुढे एकदा दारुण प्रसंग प्राप्त झाला. काही काळाने हलाहल नावाचे अति प्रचंड व महापराक्रमी दैत्य निर्माण झाले. त्यांनी स्वतःच्या सामर्थ्याने एकाच क्षणात सर्व त्रिभुवन जिंकून घेतले. त्यांनी सत्वर सर्वांचा पराभव केला व ते त्रैलोक्याचे अधिपती झाले.

त्यांना ब्रह्मदेवाचा अति सामर्थ्यशाली वर प्राप्त झाला होता. त्यामुळे सर्व जिंकल्यावर त्यांनी अत्यंत उन्मत्त होऊन आपले प्रचंड दानव सैन्य घेऊन कैलास पर्वतास वेढा घातला. त्याचप्रमाणे उरलेल्या सैन्याने वैकुंठ वेढून टाकले. अखेर कामारि शंकर व कैटभारी विष्णु यांनी त्या उन्मत्त दानवांशी युद्ध करण्यास सुरूवात केली. देवदैत्यांचे ते अद्‌भुत युद्ध अत्यंत भयंकर रीतीने चालले होते. साठ हजार वर्षे अशा प्रकारचे दारुण युद्ध उभयतात झाले. देव व दानव दोघांच्याही सैन्यात हाहाःकार उडाला. शेवटी अत्यंत सायासाने व दीर्घ प्रयत्‍नाने शंकर व विष्णूने त्या दानव सैन्याचा नाश केला. सर्व दानवांना त्यांनी मारून टाकले.

अशाप्रकारे ते युद्धात विजयी झाल्यावर एखाद्या वीराप्रमाणे दोघेही आपापल्या स्थानी परत आले. त्यांना आपल्या सामर्थ्याचा अभिमान वाटू लागला. वास्तविक ज्या शक्ती त्यांच्याजवळ दिलेल्या होत्या त्या शक्तींमुळेच या दोघांनी दानवांना मारले. पण त्यांनी आपला अभिमान त्या शक्तींजवळ स्वतःची प्रौढी सांगून व्यक्त केला. तेव्हा त्या दोन्हीही शक्ती अत्यंत कुत्सितपणे हसल्या. त्यांचा गर्व पाहून त्या शक्तींना विस्मय वाटला.

त्या शक्ती आपणाकडे पाहून कपटाने हसत आहेत हे पाहून शंकर व विष्णु यांना अनावर राग आला आणि त्यांनी शब्दाने ताडन करून आपल्याला प्राप्त झालेल्या त्या शक्तींना अपमानास्पद दुरुत्तरे केली. जणू दोघेही देव त्या आदिमायेने मोहित झाले होते. भवितव्याचा व स्वतःच्या सामर्थ्याच्या कारणाचा विचार न करता दोघांनी त्या शक्तींचा क्रुद्ध होऊन अपमान केल्यामुळे त्या दोघीही शक्ती संतप्त होऊन तत्‌क्षणी अंतर्धान पावल्या. त्या शक्तींनी महेश व विष्णु यांचा त्याग केला. त्या दिसेनाशा होताच सर्वत्र हाहाःकार उडाला. विष्णु व रुद्र यांनी शक्तीची अवहेलना केल्यामुळे ते दोघेही हरि आणि हर निस्तेज झाले. ते कमालीचे दुर्बल झाले. ते बुद्धिशून्य होऊन अत्यंत विक्षिप्त झाले.

तो सर्व प्रकार अवलोकन करून ब्रह्मदेव चिंताग्रस्त झाला. अहो, कसले बरे संकट ओढवले आहे ? असे कसे झाले ? आता याचा काय परिणाम होणार ? असा विचार करून तो विस्मित झाला.

हे दोघेजण सर्व देवांमध्ये प्रमुख आहेत असे असता दोघेहीजण असे अचानक निस्तेज का बरे झाले ? दोघेही स्वकार्याविषयी एकाएकी असे निरुपयोगी कसे झाले ? काय कारण घडल्यामुळे हे संकट अकल्पितपणे उभे राहिले ? आता या निरपराधी जगाचा अकस्मितपणे प्रलय तर होणार नाही ना ? यांच्या दुर्बलतेचे कारणच जर माझ्या लक्षात येत नाही तर याचा प्रतिकार तरी मी कसा करावा ! आता कुणाला शरण जावे ?"

अखेर ब्रह्मदेवाने डोळे मिटले. तो एकाग्र चित्ताने ध्यान करू लागला. तेव्हा या संकटाचे कारण कोणते आहे ते त्याला अंतर्ज्ञानाने समजले. त्या सर्वोत्कृष्ट शक्तींचा कोप झाल्यामुळे सांप्रत हे महासंकट ओढवले आहे हे लक्षात येताच ब्रह्मदेव सावध झाला.

त्या तपोनिधी ब्रह्मदेवाने स्वतःच्या शक्तिप्रभावाने काही कालपर्यंत विष्णु व महेश यांचे पालन केले.

तसेच त्या उभयता हरिहरांना पूर्ववत शक्ति प्राप्त व्हाव्यात व त्यांचे सामर्थ्य पूर्ववत् निर्माण व्हावे म्हणून ब्रह्मदेवाने धर्मबुद्धीने आपले स्वपुत्र मनु, सनक इत्यादि सर्व पुत्रांना सत्वर बोलावून घेतले. त्यांना एकत्र घेऊन तो आपल्या आज्ञाधारक व नम्र अशा पुत्रांना म्हणाला, "हे माझ्या पुत्रांनो, सध्या कार्य बाहुल्यामुळे मला तप करणे अशक्य आहे. मजवरील जबाबदारी वाढल्यामुळे माझ्यात सांप्रत ध्यान करण्याचे सामर्थ्य नाही. त्या महाशक्ति विष्णु व महेश यांच्यावर कोपल्या असून त्यांनी या उभयतांचा त्याग केला आहे. त्यामुळे ते दोघेही देव उभयता यावेळी विक्षेप स्थितीत आहेत. त्या महादेवी संतुष्ट व्हाव्यात म्हणून मी या जगाच्या उत्पत्तीप्रमाणेच स्थिती व लय करण्याचा भारदेखील माझ्यावरच घेतला आहे. त्यामुळे मला क्षणाचाही अवसर मिळत नाही.

म्हणून या अत्यंत दुर्घटप्रसंगी तुम्ही मला सहाय्य करा. तुम्ही सर्वांनी मिळून परमभक्तीने अत्यंत अद्‌भुत तप करा आणि त्या पराशक्तीचे ध्यान करून त्या श्रेष्ठ अशा देवी अंबेला संतुष्ट करा. हे माझ्या सुपुत्रांनो, त्या देवीला प्रसन्न करून घेऊन तिच्या प्रसादाने तुम्ही विष्णु व शिव यांना पुन्हा त्या शक्ती प्राप्त करून देऊन पूर्ववत कार्यरत करा. उभयता दोघेही देव पूर्ववत् स्वकार्यदक्ष व स्वशक्तींनी युक्त असे करा. या तपःसाधनेतून तुमच्याही यशात भर पडेल यात संशय नाही. तसेच ज्यांच्या कुलात या महाशक्ती जन्म घेतील त्यांचे कुल पावन होऊन त्यांचा उद्धार होईल व ज्यांच्या पोटी या महाशक्ती अवतार घेतील ते कृतार्थ होतील हे निश्‍चित समजा."

ब्रह्मदेवाचे हे भाषण एकाग्र चित्ताने श्रवण केल्यावर ब्रह्मदेवाचे सर्व मानसपुत्र दक्ष वगैरे अत्यंत निर्मल अंतःकरणाने व शुद्ध मनाने त्या भगवती जगदंबेची आराधना करण्यासाठी सत्वर स्वेच्छेने वनात निघून गेले.



अध्याय एकोणतिसावा समाप्त

GO TOP