देवीला दुर्गा व शाकंभरी ही नावे का प्राप्त झाली ? -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजय म्हणाला, "त्या राजर्षींचे परममंगल आख्यान आपण सांगितले. तो महात्मा शताक्षी नावाच्या देवीच्या चरणांची एकचित्ताने भक्ती करीत असे, त्या देवीच्या उपासकाचे आख्यान तर तुम्ही निवेदन केले, पण ती कल्याणकारी अशी शुभ भगवतीदेवी शताक्षी कशासाठी प्रकट झाली ? तिच्या उत्पत्तीचे कारण काय ? हे आता मला सांगा म्हणजे माझ्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटेल.
भगवती देवीच्या प्रत्येक चरणाच्या श्रवणकाली अश्वमेध यज्ञ केल्याचे चिरकालीन पुण्य प्राप्त होते. असे असल्याने शुद्ध अंतःकरणाचा कोणता पुरुष देवीचे गुणवर्णन ऐकताना तृप्त होईल ?"
व्यास म्हणाले, "हे राजा, आता त्या कल्याणीदेवी शताक्षीचे आख्यान मी तुला सांगतो. ती कशी उत्पन्न झाली हे तू ऐक. कारण तू देवीभक्त आहेस. तेव्हा तुला न सांगण्यासारखे यात काही नाही. तू ते श्रवण कर.
हे राजा, फार प्राचीन काळी दुर्गम नावाचा एक दैत्य होऊन गेला. तो हिरण्याक्षाच्या वंशातील रूरू नावाच्या दैत्याचा पुत्र होता. तो अत्यंत दुष्ट व क्रूरकर्मा होता. तो अत्यंत बलवान होऊन गर्विष्ठ झाला.
त्याने विचार केला की, वेद हेच देवांच्या सामर्थ्याचे कारण आहे. तेव्हा त्या वेदांचा नाश केला असता देवांचाही आपोआप नाश होईल यात शंकाच नको. तेव्हा सत्वर वेदांचा नाश करावा हे उत्तम.
असा विचार करून तो दुर्गम नावाचा दैत्य महान तपश्चर्या करण्यासाठी हिमालय पर्वतावर गेला. तेथे तो निराहार राहून फक्त वायु भक्षण करून राहू लागला. त्याने ब्रह्मदेवाची अपार भक्ती केली. नित्य ब्रह्मदेवाची उपासना करीत तो राहात होता. अशाप्रकारे पूर्ण एक हजार वर्षेपर्यंत त्याने ब्रह्मदेवाचे चिंतन करून दारुण तप केले. त्याचे उग्र तप अवलोकन करून देव व दैत्य सर्वजण भयभीत झाले. पण तो तपश्चर्या करीतच राहिला.
अखेर त्याच्या उग्र तपाने भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि हंसारूढ होऊन ते दुर्गम दैत्यासमोर येऊन उभे राहिले. त्याला वर द्यावा असा विचार करून ब्रह्मदेव तेथे स्थिर झाले. डोळे मिटून ध्यानस्थ बसलेल्या त्या दैत्याला ब्रह्मदेव म्हणाला, "हे महाभाग्यवान दुर्गमा, खरोखरच तुझे कल्याण असो, तू अत्यंत कष्टाने फार महान तपस्या केली आहेस. तेव्हा मी अत्यंत प्रसन्न होऊन तुझ्याकडे आलो आहे. हे दैत्या, तुझे जे मनोरथ असतील ते साध्य होण्यासाठी इच्छित वर माग. मी तुला वर देऊन तुझी मनोकामना पूर्ण करीन. हे दैत्या, सत्वर हवे ते मागून घे."
ब्रह्मदेवाच्या मुखातून बाहेर पडलेले हे वरदायी शब्द त्या दैत्याच्या कानावर पडताच आपली नित्य समाधी सोडून तो हर्षभरित होऊन उठला. त्याने अत्यंत नम्र भावाने ब्रह्मदेवाची पाद्यपूजा केली आणि हात जोडून तो वर मागण्यासाठी म्हणाला, "हे सुरेश्वरा, देवाधिदेवा, आपण प्रसन्न झाला असाल तर मला वर द्या. हे देवा, मला वेद द्या. तिन्ही लोकात ब्राह्मण व देव यांच्याजवळ जे वेदमंत्र आहेत ते अक्षय्य माझ्याजवळ राहोत. तसेच ज्या योगाने मला देवांचाही पराभव करता येईल असे अलोट सामर्थ्य आपण मला द्या."
त्या दुर्गम नावाच्या दानवाचे भाषण ब्रह्मदेवांनी ऐकले आणि आपण देत असलेल्या वराचा पुढे काय विपरीत परिणाम होईल याचा विचार न करता ब्रह्मदेव म्हणाले, "हे दानवा, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो !"
असे पटकन बोलून तो चारी वेदांचा साक्षात देव ईश्वरश्रेष्ठ सत्यलोकी स्वस्थानी परत गेला.
इकडे एकाएकी पृथ्वीवरील सर्व ब्राह्मण वेदमंत्र विसरून गेले. स्नान, संध्या, वैश्वदेवासारखे नित्याचे होम-हवन, श्राद्धविधी, यज्ञ, जप ह्या सर्व क्रिया अकस्मात लुप्त झाल्या. सगळीकडे भयानक असा हाहाकार उडाला.
"अहो, आज असे कसे घडले ? ही दुर्घटना का निर्माण झाली ? आता वेदांचा आम्हाला विसर कसा पडला ? येथे आता आम्ही कसे जगावे ? वेदांच्या अभावामुळे आम्ही आता काय करावे ?"
अशाप्रकारे ब्राह्मण एकमेकात चर्चा करू लागले. सर्वजण विमनस्क होऊन गोंधळून गेले होते. कोणालाही इलाज माहीत नव्हता. प्रत्येक जण घाबरून गेला होता. अशाप्रकारे भूमीवर अत्यंत दारुण अवस्था झाली. देवांना हविर्भाव मिळेनासे झाले. कारण कोणीही यज्ञ करीनात. देव खरे म्हणजे जरारहित होते. पण सांप्रत त्यांना जरा प्राप्त होऊन ते अत्यंत क्षीण झाले, दुर्बल झाले.
देवांची ही शोचनीय अवस्था प्राप्त झाली असता त्या दुर्गम दैत्याने स्वर्गाची राजधानी जी अमरावती नगरी, त्या नगरीस वेढा घातला. त्या महाबलाढय व वज्रदेही राक्षसाबरोबर युद्ध करण्याचे सामर्थ्य देवात राहिले नाही. अखेर पूर्ण विचार करून हात दाखवून अवलक्षण नको म्हणून देव अमरावती सोडून निघून गेले.
सर्व देव पर्वतावरील दुर्गम गुहेत जाऊन तसेच सुमेरू पर्वतावरील अवघड ठिकाणी जाउन कसेबसे वास्तव्य करू लागले. तेथे जाऊन त्यांनी सर्वशक्तिमान देवी भगवती, जी अंबा नावाने प्रसिद्ध आहे, तिचे ध्यान करण्यास आरंभ केला. सर्व देव त्याच शक्तीची उपासना करू लागले.
इकडे पृथ्वीवर विपरीत अवस्था झाली. यज्ञयागादि सर्व क्रिया बंद पडल्या. त्यामुळे अग्नीमध्ये हवन होईनासे झाले. कारण सर्वच वेदमंत्र ब्राह्मणातून अचानकपणे निघून गेले होते. त्यामुळे वृष्टीचाही अभाव झाला. वृष्टी न झाल्याने पर्जन्याअभावी संपूर्ण महितल कोरडे ठणठणीत व निर्जन झाले. विहीरी, आड, तळी, नद्या सर्व पाण्यावाचून उजाड पडल्या. पाण्याचा एक थेंबही कोठे दृष्टीस पडेना.
अशाप्रकारची ही अनावृष्टी सतत शंभर वर्षे होत राहिली. गाई, म्हशी इत्यादि प्राणी पटापट मरून गेले. सर्व पृथ्वीवर लोकांचा संपूर्ण नाश झाला. प्रत्येक नगरीत प्रत्येक लहान मोठया गावात व प्रत्येक वस्तीवरील सर्व घरातून प्रेतांचे ढीग पडले.
हा अनर्थ ओढवल्याचे अवलोकन करून काही विचारी व शांत स्वभावाचे ब्राह्मण शिवशक्तीची उपासना करावी म्हणून हिमालयावर जाऊन तपस्या करू लागले. ते दररोज समाधी, ध्यान व पूजा करून त्या योगाने आपल्या शक्तीनुसार देवीची सदैव आराधना करू लागले. सर्वजण निराहार राहून अत्यंत तीव्र तपश्चर्या करू लागले. देवीच्या सेवेत नित्य तत्पर राहून ते देवीची स्तोत्रे गाऊ लागले आणि अनन्यभावाने देवीला शरण गेले. देवीची समाराधना करण्यासाठी ते म्हणाले, "हे माहेश्वरी, आम्ही पामर जना वर दया कर. हे अंबिके, आम्ही तुझे महान अपराधी असलो तरी आम्हा मूढ जनांवर इतका कोप करणे हे तुला योग्य नव्हे. हे सर्वेश्वरी, सर्व प्राण्यांच्या अंतरंगात तूच वास्तव्य करीत असतेस हे आता आम्हाला निश्चितपणे समजून आले आहे. म्हणून तर हे शांभवी, तू आता या कोपाचा त्याग कर. कारण हे देवी, तू प्रेरणा दिल्याशिवाय प्राणी कार्य करीत नाही. बरे अथवा वाईट ह्या क्रिया तुझ्याच प्रेरणेने प्राणी करीत आहेत.
हे जगदंबे, प्राण्याला तुझ्याशिवाय दुसरी गतीच नाही. असे असता तूच जर त्यांचा अंत पाहू लागलीस तर त्यांनी कसे बरे रहावे ! तू त्यांची यापेक्षा आणखी किती परीक्षा पहाणार आहेस ! हे माहेश्वरी, तू इच्छेप्रमाणे वाटेल ते कृत्य करण्यास नेहमी समर्थ आहेस. तुझे सामर्थ्य न जाणणारे जगात कोणी आढळणार नाही.
हे देवी, सांप्रत आमच्यावर महाभयंकर संकट ओढवले आहे. त्यामुळे आमचे व इतर प्राण्यांचेही जीवन असह्य झाले आहे. म्हणून हे जगन्माते, तूच आमचा या महासंकटातून उद्धार कर. हे अंबे, उदक हेच तर आमच्या जीवाचे कारण आहे. मग उदकावाचून आमची कोण दारुण अवस्था होईल ! हे ईश्वरी, आता फार अंत न पहाता तू आमच्यावर प्रसन्न हो. हे जगदंबे, तू सत्वर संतुष्ट हो. हे अनंतकोटी ब्रह्मांडनायिके, तुला आम्ही शरण येऊन पुन्हा पुन्हा नमस्कार करीत आहोत.
हे देवी, तू निर्विकार स्वरूपिणी आहेस हे आम्हाला समजले. म्हणून हे कल्याणी, तुला अनंत साष्टांग नमस्कार असोत.
हे देवते, तूच चैतन्य नावाची ईश्वरी शक्ती आहेस. वेदातांचे ज्ञान असेल तर तुझे निर्गुण स्वरूप ज्ञात होते. वेदज्ञानाशिवाय तुझे अविनाशी स्वरूप समजत नाही.
हे चामुंडे देवी, हे भुवनेश्वरी, तुला हात जोडून आम्ही करुण होऊन नमस्कार करीत आहोत. हे महादेवी, तुझ्यापुढे दीन होऊन आम्ही तुला वारंवार प्रणाम करीत आहोत.
हे सर्वशक्तीदायिनी, सर्व स्थूल व सुक्ष्म अशा प्रपंचाचा निषेध करून जर तुझे ध्यान केले तरच वेद तुझ्याबद्दलचे ज्ञान प्राप्त करून देतात.
हे सर्वदैव कारणभूत अशा देवी अनन्यभावाने आम्ही तुझ्यापुढे विनम्र झालो आहोत. तेव्हा हे देवी, आम्हाला सत्वर संकटमुक्त कर."
अशा रीतीने हिमालयावर जाऊन ब्राह्मणांनी त्या महाशक्तीशाली भुवनेश्वरीची आराधना केली. ती प्रार्थना ऐकून दयेने युक्त होऊन त्या सर्वांच्या अंतर्यामात वास करणार्या पार्वतीने आपले असंख्य नेत्रांनी युक्त असे दिव्य स्वरूप दाखवून पुण्यकारक दर्शन दिले. तिचे सर्वांग नीलवर्णाचे असून ते स्फटिकाप्रमाणे सुंदर होते. नीलकमलाप्रमाणे तिचे नेत्र विशाल होते. तिचे स्तन अतिशय कठीण होते व दोन्हीही सारखेच असून उंच, पुष्ट व वर्तुलाकार असे असून एकमेकांस चिकटलेले होते. ते अत्यंत रेखीव दिसत होते.
तिच्या एका हातात बाण होते. दुसर्या हातात तिने कमल धरले होते. तिच्या तिसर्या हातात विपुल सुंदर फुले होती. त्यासमवेत पाने, मुळे आणि जरा घालविणार्या अनेक रसभरित व उत्कृष्ट भाज्या होत्या. तिने आपल्या चवथ्या हातात सर्वोत्तम असे मोठे धनुष्य धारण केले होते.
तिचे रूप हे सर्व सौंदर्याचे जणू सार असे विलोभनीय होते. ती लावण्याने नटलेली असून शोभायमान दिसत होती. कोटिकोटि सूर्य एकाचवेळी तळपावेत अशी तिची अंगकांती तेजस्वी होती. तिचे स्वरूप म्हणजे एक कारुण्याचा अवतारच होता.
त्या जगाच्या पालनकर्त्या देवतेने आपले हे असे अतिविशाल, उदात्त विश्वरूप दाखविले आणि आपल्या अनंत नेत्रातून तिने हजारो जलधारा निर्माण केल्या व सर्वांवर जलवृष्टि केली. ही महावृष्टी नऊ दिवसपर्यंत चालू होती आणि तिच्या नेत्रातून हे जलप्रवाह अखंडपणे वहात होते. सर्व प्राणीमात्रांचे दुःख जणू काय तिच्या नेत्रातून पाझरत होते. सर्व लोकांना अत्यंत दुःखित स्थितीत अवलोकन करून जणू तिलाही दुःख अनावर होऊन तिच्या नेत्रांना अश्रूंच्या धाराच लागल्या होत्या. तिच्या नेत्रातून उत्पन्न झालेल्या जलवर्षावामुळे सर्व लोक व सर्व औषधी यांना तिने तृप्त केले होते.
त्या जलवर्षावामुळे पृथ्वीवर सर्व नद्या, विशाल नदी दुथडी भरून वाहू लागले. त्यामुळे सर्व सृष्टीला चैतन्य प्राप्त झाले. ते अवलोकन करून पर्वतांच्या गुहात व इतरत्र दडून वास्तव्य करून राहिलेले देवही बाहेर आले.
त्यानंतर देवांनी त्या ब्राह्मणांसह त्या नारायण देवीची एकत्र जमून मनापासून स्तुति केली. तिची प्रार्थना करण्याकरिता ते म्हणाले, "हे ब्रह्मस्वरूपिणी देवी, तुला आमचा नमस्कार असो. हे सर्व जग तूच आपल्या मायेने उत्पन्न करून आम्हावर कृपा केली आहेस. तुला आम्ही अखंड नमस्कार करतो. हे देवी, तू भक्तांना कल्पद्रुमासारखी आहेस व त्यांना इष्ट अशी वस्तू तू सत्वर देत असतेस. हे भुवनेश्वरी, या जगात तुझ्याबरोबरीने तुल्यबल असे काही नाही. तुला या त्रिभुवनात खरोखरीच उपमा नाही. म्हणून हे देवी, आम्ही तुलाच वंदन करतो. आमच्या सुखशांतीसाठी तू आज हजारो नेत्र धारण केले आहेस. म्हणून आम्ही तुला शताक्षी या नावाने हाक मारीत आहोत. तुझे नाव शताक्षी होवो. हे माते, आम्ही क्षुधेने अत्यंत पीडित झालो असून आज दुर्बळ झालो आहोत. म्हणून आम्हाला तुझी स्तुति करण्याचे सामर्थ्य नाही. हे माहेश्वरी, हे अंबे, आता तूच आमच्यावर कृपा कर आणि परम दयाळू होऊन तू आमचे गेलेले वेद आम्हाला परत आणून दे आणि दुष्टांचा नाश कर."
देवांनी व ब्राह्मणांनी अशाप्रकारे देवीची स्तुति केल्यावर त्या उदार अंतःकरणाच्या देवीने दयाळू होऊन आपल्या हातातील विपुल भाज्या, अनेक फळे, पुष्ट मुळे त्या क्षुधार्तांना भक्षण करण्यास दिली. तसेच नानाप्रकारची तृणे निर्माण करून त्या दयाळू देवीने भक्षणासाठी पशूंना व इतर प्राण्यांना उपलब्ध करून दिली. ती सर्व फळे, मुळे, तृणे अनेक इष्ट रसांनी परिपूर्ण होती आणि नवीन अन्न उत्पन्न होईपर्यंत पुरतील इतकी विपुल होती.
म्हणून त्या देवीला शाकंभरी असे नाव प्राप्त झाले.
त्या नवजीवन प्राप्तीमुळे सर्व लोक आनंदित झाले आणि सर्वांनी त्या देवतेच्या नावाचा जयघोष केला. त्या जयजयकाराने सर्व पृथ्वी नादमय होऊन गेली. दुर्गम दैत्यांच्या दूतांनी तो भयंकर ध्वनि ऐकताच ते सत्वर दुर्गमाकडे गेले व त्याला या प्रचंड नादाची वार्ता सांगितली. त्यामुळे दुर्गम दैत्य अत्यंत संतप्त झाला. तो क्रुद्ध होऊन प्रचंड सैन्य घेऊन युद्ध करण्याच्या उद्देशाने निघाला. त्याने आपले सैन्य अद्भुत शस्त्रांनी संपन्न केले होते. अशाप्रकारचे ते महाबली सशस्त्र सैन्य घेऊन तो आला. त्याचे सैन्य हजार अक्षौहिणी होते. तेथे येऊन त्याने वेगाने बाणांचा वर्षाव सुरू केला. त्याचवेळी देवही आपापली शस्त्रे घेऊन युद्धाच्या उद्देशाने सज्ज झाले व दानव सैन्यासमोर प्राप्त झाले. तेव्हा आपल्यासमोरच उभे राहिलेले देवसैन्य पाहून दुर्गमाने त्या सैन्याला संपूर्ण वेढा दिला. तसेच सर्व ब्राह्मणांनाही दुर्गमाच्या सैन्याने वेढून टाकले. अशाप्रकारे बंदिस्त झाल्यामुळे देवसैन्यात एकच गडबड उडून गेली. धावपळ सुरू झाली. सुटकेचा मार्ग मिळतो का हे देव शोधू लागले.
अखेर निराधार झाल्याप्रमाणे होऊन सर्व देव व ब्राह्मण भयाने व्याकुळ झाले आणि देवीला शरण गेले, ते म्हणाले, "हे देवी, हे कल्याणी, आता आमचे रक्षण कर."
देवीने ती देव-ब्राह्मणांची करुण वाणी ऐकून त्या भक्तांचे रक्षण व्हावे म्हणून देव व ब्राह्मण यांच्याभोवती एक तेजस्वी चक्र निर्माण केले व ती स्वतः त्या चक्राच्या बाहेर स्थिर राहिली.
देव व ब्राह्मण यांचे रक्षण होऊन तो बलाढय दुर्गम दैत्य व ती कल्याणी देवी यांच्यात प्रचंड युद्ध सुरू झाले. त्यावेळी दोन्हीकडून प्रचंड शरवर्षाव झाला. त्या शरवर्षावाने सर्व नभोमंडळ आच्छादून गेले. जणू काय अंधारच पडला आहे असे वाटू लागले. पण उभयतांकडील बाण एकमेकांवर आदळून त्यातून निर्माण होणार्या अग्नीमुळे तेथे प्रकाश पडला होता व सर्व युद्धभूमी दिसून येत होती. त्या भयानक टणत्कारामुळे सर्व दशदिशा व्याप्त झाल्या होत्या. आघात-प्रत्याघाताचा एकच कर्कश स्वर सर्वत्र घुमत होता. त्या भयंकर कठोर ध्वनीमुळे दिशा बधीर झाल्या होत्या.
अशाप्रकारे युद्ध बराच काळ चालू होते. शेवटी त्या देवीच्या शरीरापासून अकल्पितपणे अनेक दिव्य आणि तेजस्वी अशा तीव्र शक्ती बाहेर पडल्या.
कालिका, तारिणी, बाला, त्रिपुरा, भैरवी, रमा, बगला, मातंगी, त्रिपुरसुंदरी, कामाक्षी, देवी, तुलजा, जंभिनी, मोहिनी, छिन्नमस्ता अशा या नावाने त्या प्रसिद्ध शक्ती बाहेर पडल्या. त्या शक्तींबरोबर दहा हजार बाहू असलेली गुह्य काली शक्ती, तसेच दुसर्या बत्तीस शक्ती अवतीर्ण झाल्या. त्यानंतर आणखी चौसष्ट शक्ती तिच्या शरीरापासून निर्माण झाल्या. अशा तर्हेने या सर्व शक्ती उत्पन्न होताच त्या नानाप्रकारची रणवाद्ये वाजवू लागल्या.
मृदंग, शंख, वीणा ह्या वाद्यांच्या नादाने ते संपूर्ण रणांगण दुमदुमून गेले. त्या शक्तींनी त्या दैत्यसैन्याशी युद्ध करून दुर्गमाचे शंभर अक्षौहिणी सैन्य सत्वर मारून टाकले. त्यानंतर हा प्रकार पाहून क्रुद्ध झालेला तो सेनानी दुर्गम पुढे आला. त्याने त्या सर्व शक्तींबरोबर दहा दिवस युद्ध केले. ज्या भूमीवर युद्ध चालू होते तेथे एक रक्तवाहिनी नदी उत्पन्न झाली.
दुर्गमाच्या हजार अक्षौहिणी सैन्याचा त्या शक्तींनी दहा दिवसात नाश केला. नंतर अकरावा दिवस उगवला. तो फारच भयंकर होता. दुर्गमाने लाल वस्त्रे नेसली, सर्वांगाला लाल गंधाची उटी लावली आणि अत्यंत उत्साहाने तो रथारुढ झाला. त्या महाबलाढय दुर्गम दैत्यानं त्या सर्व शक्तींना जिंकले आणि तो महादेवीसमोर आला. त्याने आपला रथ देवीच्या जवळ नेला.
तो दुर्गम दैत्य व ती कल्याणी देवी यांच्यात अत्यंत भयंकर व मनस्ताप करणारे दारुण युद्ध झाले. दोन प्रहरपर्यंत हे युद्ध वेगाने चालू होते. अखेर शेवटी त्या सर्वशक्तिशाली देवीने अत्यंत तीक्ष्ण असे पंधरा बाण सोडले.
देवीने सोडलेल्या त्या बाणांपैकी चार बाणांनी दुर्गमाचे चार अश्व मारले. एका बाणाने सारथ्याचा वध केला. दोन बाण दुर्गमाच्या नेत्रात घुसले व त्याचे डोळे फुटले. दोन बाणांनी त्याचे दोन्ही हात तोडले. एकाने ध्वज फाडला. पाच बाण त्याच्या हृदयात घुसले. अशाप्रकारे त्या जगदंबेने त्या क्रूर दैत्याचा वध केला. तो दैत्य रक्त ओकून त्या जगज्जीवनी देवीसमोर मृत्यु पावला.
तो दैत्य मृत्यु पावल्यावर त्याचे तेज त्या महादेवीच्या स्वरुपात विलीन झाले. अशारीतीने त्या महाबलाढय दुर्गम नावाच्या दैत्याचा वध झाल्यावर सर्व त्रिभुवनात शांतता निर्माण झाली. सर्वजण महान संकटातून मुक्त झाले. त्यामुळे ब्रह्मदेवासह सर्व त्रिभुवनात शांतता निर्माण झाली. सर्वजण सर्व देव त्या जगदंबेची स्तुति करु लागले.
सर्व देवांनी विष्णु व शंकर यांना पुढे केले. व मोठया भक्तिभावाने तिच्यापुढे नम्र होऊन सद्गदित वाणीने त्यांनी तिची भावमय प्रार्थना केली.
देव म्हणाले, "हे परमेश्वरी देवी, तूच या जगभ्रमरुप विश्वाचे प्रमुख कारण आहेस यात संशय नाही. हे शाकंभरी, हे शिवे, हे शतलोचने, तुला सदैव नमस्कार असो. सर्व उपनिषदांमध्ये तुझेच वर्णन केले आहे. तूच दुर्गमासुराचा नाश केल्याने आम्हाला सुख प्राप्त करून दिले आहेस.
हे माहेश्वरी, तूच अन्नमयादि पाच कोशातील अंतर्भागात नित्य रहात असतेस. हे शिवे महान मुनीश्वर निर्विकल्प अंतःकरणाने तुझेच नित्य ध्यान करीत असतात. तुझे रूप म्हणजे प्रणवाचा अर्थच आहे.
हे भुवनेश्वरी, आम्ही सर्वजण तुझीच उपासना करीत असतो. हे देवी, तूच अनंतकोटिब्रह्मांडांना उत्पन्न करतेस. तुझी आकृति अत्यंत तेजोमय व दिव्य आहे. तूच ब्रह्मदेव व विष्णु इत्यादि देवांची जननी आहेस. म्हणून सर्व भक्तिभावांनी आम्ही तुझ्यापुढे अत्यंत नम्र होत असतो.
अहो, या दयेने परिपूर्ण असलेल्या परमेश्वरी शताक्षी मातेवाचून दुसरे कोण बरे सर्वेश्वर आमचे रक्षण करण्यास समर्थ आहे ?"
अशाप्रकारे ब्रह्मदेव, विष्णु, महेश्वर वगैरे देवांनी विनम्र होऊन त्या देवीची अपार स्तुति केली. त्यांनी विविध प्रकारची द्रव्ये घेऊन तिची सुंदर पूजा केली. तेव्हा ती देवी परम संतुष्ट झाली.
देवी अतिशय प्रसन्न होऊन तिने गेलेले वेद परत आणले व ब्राह्मणांच्या स्वाधीन केले. त्यानंतर कोकिलरवाप्रमाणे सुमधुर भाषण करणारी ती देवी ब्राह्मणांना उद्देशून गंभीर आवाजाने म्हणाली - "ब्राह्मणांनो, ही माझी उत्कृष्ट अशी वेदरूप तनूच मी तुमच्या स्वाधीन करीत आहे. तिचे तुम्ही निष्ठेने पालन करा. कारण ही माझी तनू जर सुरक्षित नसेल तर केवढा प्रचंड अनर्थ निर्माण होतो हे तर तुम्ही आता प्रत्यक्ष अनुभवले आहे. तुम्हाला मी सर्वदा पूज्य व सेव्य अशीच आहे. म्हणून तुमच्या कल्याणासाठी मी दुसरे काही सांगत नाही.
माझे हे सर्वोत्तम महात्म्य सर्वकाल पठण करणारास मी अत्यंत संतुष्ट होऊन त्याच्या विपत्तींचा सत्वर नाश करीन.
दुर्गम नावाच्या दैत्याला मी युद्धात ठार मारल्यामुळे माझे नाव दुर्गा व शताक्षी असे पडले आहे. माझी ही नावे जो उच्चारतो तो मायेचा भेद करून परमेश्वररूप परमपदाला जाऊन पोहोचतो.
हे देवांनो, आता विनाकारण जास्त बोलून काय उपयोग आहे ? मी खरे जे सार आहे तेच सांगते. या सर्व वेदांचे सार ते मीच आहे, सुरासुर व मानव यांनी नित्य माझी सेवा करावी."
देवीचे असे महात्म्य सांगून व्यास पुढे म्हणाले, "हे राजा, याप्रमाणे देवांना वेदांचे सार कथन करून सर्वांना अत्यंत संतुष्ट करणारी ती सच्चिदानंदरूपिणी देवी त्या सर्व देवांसमक्ष अंतर्धान पावली.
हे जनमेजया, सर्वात श्रेष्ठ असलेले हे रहस्य सांप्रत मी तुला सांगितले आहे. हे सर्वदा कल्याणकारक असून तू ते गुप्त ठेव.
जो कोणी हा अध्याय भक्तियुक्त अंतःकरणाने श्रवण करील त्याच्या सर्व मनोकामना परिपूर्ण होऊन सूरलोकांमध्येही त्याला मानाचे स्थान प्राप्त होईल."