[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
अशारीतीने काळ जात असता एके दिवशी राजाचा पुत्र रोहित हा मुलांसमवेत वाराणसीजवळच पण गावाच्या बाहेर खेळावयास गेला. खेळ संपल्यावर त्याने विचार केला, आपल्या धन्यासाठी कोवळे, लहान लहान मुळे असलेले दर्भ अग्रासह उपटून न्यावेत. असा निश्चय करून आपल्या शक्तीप्रमाणे जास्तीत जास्त घेऊन जावेत म्हणून तो महत्प्रयासाने दोन्ही हातांनी वेगाने दर्भ उपटू लागला. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सर्व लक्षणांनी युक्त अशा समिधा, दर्भ, इध्मा आणि पळसकाष्ठे हे सर्व अग्नीच्या होमात आवश्यक आहेत म्हणून अत्यंत आदराने ते रोहिताने आपल्या बरोबर घेतले. त्याचा एक भारा करून त्याने आपल्या मस्तकावर घेतला. पण त्याला ते ओझे जड झाले होते. तरीही अतिशय कष्टाने तो चालत होता. अशा स्थितीत तो एका जलाशयाजवळ प्राप्त झाला.
दमल्यामुळे व जड ओझ्यामुळे रोहिताला फारच तहान लागली होती. म्हणून त्याने आपल्या मस्तकावरील भारा तेथेच जवळ उतरवून ठेवला. यथेच्छ जल प्राशन केल्यावर त्याने थोडी विश्रांती घेतली आणि आता घरी जावे असा विचार करून तो उठला. भारा उचलून मस्तकावर घेणे सोयीचे व्हावे म्हणून एका वारुळावर त्याने भारा ठेवून तो मस्तकापर्यंत उचलला व आपल्या मस्तकावर धारण करू लागला. पण दुर्दैवाने त्याचा पाठपुरावा येथेही केलाच. विश्वामित्राच्या आज्ञेने त्या वारुळातून एक प्रचंड महाभयंकर, अत्यंत घोर व विषारी असा कृष्णसर्प त्वरेने बाहेर आला व त्या अर्भकाला त्या काळसर्पाने तीव्र दंश केला.
सर्पदंश होताच विकलांग होऊन रोहित भूमीवर कोसळला. रोहित मृत झाला आहे असे त्याबरोबरीच्या सर्व सोबत्यांनी अवलोकन करताच ती सर्व बालके त्वरेने रोहित रहात असलेल्या ब्राह्मणाच्या घरी आली व अत्यंत भीतीने व करुण अंतःकरणाने त्यांनी रोहिताच्या मातेला घडलेले सर्व वर्तमान निवेदन केले. ती मुले रोहिताच्या मातेला म्हणाली, "अगे विप्रदासी, तुझा पुत्र आमच्या समवेत खेळ खेळण्यासाठी गावाबाहेर आला होता. परत येत असता त्याला सर्पदंश झाला व तो भूमीवर कोसळून मृत झाला आहे. सांप्रत तो जलाशयाच्या जवळ पडला आहे."
त्या बालकांच्या तोंडचे ते शब्द ऐकताच राणीच्या मस्तकावर जणू वज्रप्रहार झाला. एखाद्या तोडलेल्या कर्दळीप्रमाणे ती उन्मळून भूमीवर मूर्च्छित होऊन कोसळली. तिने करुण किंकाळी फोडल्याने अत्यंत रागाने तो विप्र तेथे आला व क्रुद्ध होऊन त्याने तिच्या अंगावर जलसिंचन केले.
बर्याच वेळाने राणी सावध झाली. तेव्हा तो महाकोपी, दुष्ट, हृदयशून्य ब्राह्मण संतापाने म्हणाला, "अगे दुष्टे, तू समंजस असूनही माझ्या या शुभसदनात अभाग्याला उचित असे निंद्य रुदन का बरे करीत आहेस ? अशा रात्रीच्या वेळी हे योग्य नव्हे ! अगे चांडाळणी, तुला यत्किंचितही लाज कशी वाटत नाही ?"
त्या ब्राह्मणाचे हे कठोर शब्द ऐकून ती बिचारी स्त्री दीन झाली. पण काहीच बोलली नाही.
ती पुत्रशोकाने व्याकुळ झाली व अत्यंत करुणवदन होऊन ऐकणार्याला दया येईल असे रुदन करू लागली. तिचे मुखकमल अश्रूंनी भरून गेले. ती एकाएकी अनाथासारखी दिसू लागली. तिचे केस मोकळे सुटले होते. त्यामुळे ती अत्यंत निस्तेज दिसू लागली व एखाद्या अभाग्याप्रमाणे विलाप करू लागली.
तिचे करुणालाप ऐकून तो ब्राह्मणश्रेष्ठ अत्यंत संतप्त झाला व राणीला पुन्हा एकदा म्हणाला, "अगे पापिणी, तुझा धिक्कार असो. मी मूल्य देऊन तुला विकत घेतले आहे. तू माझी दासी असूनही सांप्रत माझे काम करीत नाहीस असे का ? तू माझे काम करण्यास असमर्थ झाली होतीस तर मजपासून द्रव्य का घेतलेस ?"
अशाप्रकारे तो क्रूर ब्राह्मण निष्ठुर होऊन कठोर शब्दांनी तिच्यावर प्रहार करू लागला. शेवटी मोठया कष्टाने व गहिवरून ती करुण वाणीने रडत रडत विप्राला म्हणाली, "अहो धनी, माझा एकमेव पुत्र आज सर्पदंशाने मृत झाला आहे. अनाथ होऊन तो नगराबाहेरील जलाशयाजवळ पडला आहे. माझ्या त्या सुकुमार पुत्राला अवलोकन करण्याकरता मी आता जात आहे. आपण कृपावंत होऊन मला जाण्याची आज्ञा द्या. कारण हे सदाचरणी द्विजश्रेष्ठा, आता यापुढे माझ्या पुत्राचे पुनरपि दर्शन होणार नाही. एकदा त्याला अखेरचे पाहून मी परत येईन."
असे विनंतीपूर्वक बोलून ती राणी हृदयद्रावक विलाप करू लागली. तिचे रडणे ऐकून तो ब्राह्मण रागाने त्या महाराणीला म्हणाला, "अगे दुष्टे, दुराचारिणी स्त्रिये, तू धन्याचे काम करीत नाहीस. धन्याची आज्ञा मोडल्याने केवढे घोर पातक लागते याची तुला कल्पना आहे काय ? खरोखर पूर्णपणे वेतनाचा स्वीकार करूनही जो सेवक धन्याचे कार्य वेळेवर करत नाही तो अखेर नरकात पडतो. तेथे महारौरवादि नरकात एक कल्पपर्यंत वास्तव्य केल्यावर तो पुढे कोंबडा होतो.
तुझ्यासारख्या दुष्टेला धर्मतत्त्वे सांगून उपयोग काय ? त्याच्याशी मला कर्तव्य नाही.
हे दुष्टे, पापरत, क्रूर, नीच, ठक व खोटा असा जो कोणी मूर्ख असतो त्याला असली धर्मतत्त्वे समजावून सांगणे म्हणजे नापीक माळजमिनीवर धान्य पेरण्याप्रमाणे निष्फळ आहेत. तेव्हा तुला ते व्यर्थ सांगून काही लाभ नाही.
हे पातकी स्त्रिये, तुला परलोकीच्या यातनांचे थोडे जरी भय असेल तर तू व्यर्थ आपला वेळ न दवडता सत्वर माझ्या घरातील कामे करण्यास चल."
असे अत्यंत कठोर वाणीने उच्चारलेले ते शब्द ऐकून ती स्त्री म्लान होऊन थरथर कापू लागली. अत्यंत भयग्रस्त मन झाल्याने ती व्याकुळ होऊन पुन्हा ब्राह्मणास म्हणाली, "हे प्रभो, यावेळी आपण मजवर दया करा. तूर्त तरी अशा प्रसंगी कृपावंत होऊन मला प्रसन्न व्हा. माझ्याकडे जरा तरी कृपादृष्टीने पहा.
हे महाभाग्यवान विप्रा, माझ्या लाडक्या पुत्रास एकच वेळ पाहून येईपर्यंत आपण मला दोन घटकांचा अवधी द्या. असे निष्ठुर होऊ नका हो !"
असे दीनवचन बोलून तिने आग्रहाने त्या ब्राह्मणाच्या चरणावर मस्तक ठेवले व ती त्याची करुणतेने प्रार्थना करू लागली. पुत्राच्या निधनाची वार्ता ऐकून दुःखी झालेल्या राणीने, "अरे पुत्रा, अरे रोहिता," म्हणून हंबरडा फोडला. पण त्या ब्राह्मणाला जराही दया आली नाही. उलट अधिकच संतप्त होऊन तो म्हणाला, "अगे, तुझा पुत्र मेला काय नि जगला काय, मला त्याच्याशी काय कर्तव्य आहे ? तू मुकाटयाने माझी आज्ञा पाळून माझ्या घरातील काम कर. नाहीतर चाबकाच्या फटकार्याने मला तुझी पाठ फोडून काढावी लागेल. अगे, तुला अजूनही माझा राग ठाऊक नाही म्हणजे आश्चर्य आहे."
त्या विप्राच्या भाषणाने भयभीत होऊन ती राणी अधोवदन होऊन मोठया धीराने मन घट्ट करून त्या विप्राच्या घरातील कामे करू लागली. त्याचे पाय दाबून झाल्यावर तेलासारखे स्निग्ध पदार्थ त्याच्या अंगाला लावून तिने त्याचे शरीर मर्दन केले. हे सर्व उरकेपर्यंत मध्यरात्र होऊन गेली होती. अखेर तो विप्र तिला म्हणाला, "अगे स्त्रिये, आता तू आपल्या पुत्राच्या शोधासाठी सत्वर जा आणि त्याचे दहन वगैरे विधि करून दिवस उगवण्याचे आत तू परत ये. माझे सकाळचे काम अडून रहाणार नाही याची काळजी घे. लवकर परत ये, जा."
अशा तर्हेने ब्राह्मणाची आज्ञा घेऊन ती राणी करुणालाप करीत वेगाने धावत धावतच, त्या भयाण मध्यरात्रीच्या वेळी एकटीच घराबाहेर पडली आणि जेथे तिचा पुत्र मरून पडला होता तेथे आली.
आपल्या पुत्राची ती अवस्था पहाताच तिला झालेल्या दुःखाचे वर्णन करणेच अशक्य. आपल्या कळपापासून चुकलेली हरिणी, वत्सरहित धेनु जशी शोकाने व्याकुळ होते अशी ती शोकमग्न झाली. वाराणसीच्या बाहेर निर्जन ठिकाणी आपला पुत्र मरून पडला, त्याला पहायला कोणी नाही, म्हणून ती अधिकच शोकग्रस्त झाली आणि आपल्या पुत्राला तिने मिठी मारली. तिचा पुत्र अनाथाप्रमाणे भूमीवरील लाकडे, दर्भ व गवत यावर निःश्चेष्ट होऊन पडला होता.
त्याला पहाताच अत्यंत कारुण्याने भरून जाऊन तिने अपार शोक केला. ती रडत रडत म्हणाली, "अरे माझ्या तान्ह्या बाळा, ये रे, माझ्याकडे धावत ये. अरे तू माझ्यावर का बाबा रागावलास ? माझ्या लाडक्या, सारखे अगे आई, अगे आई असे मला हाका मारीत तू माझ्यापुढे येत होतास ना ! अरे मग आताच का रे दूर गेलास ?"
असे म्हणून ती अडखळून पुत्राच्या शरीरावर मूर्च्छित होऊन कोसळली.
थोडया वेळाने ती सावध झाली. तिने आपल्या दोन्ही हातांनी त्या पुत्राला कवटाळून हृदयाशी धरले आणि त्याच्या निष्प्राण मुखावर आपले मुख ठेवून दीनवदनाने ती रडत रडत आक्रोश करू लागली. तिने आपले मस्तक, उर "हाय रे हाय" म्हणून दोन्ही हातांनी बडविले. ती म्हणाली, "अरे माझ्या बाळा, अरे तान्हुल्या, अरे वत्सा, अरे माझ्या गोजिरवाण्या पाडसा, ये रे, सत्वर ये."
असे ती सारख्या आपल्या पुत्राला हाक मारू लागली. ती मोठमोठयाने रडत म्हणाली, "अहो राजाधिराज, आपण अशावेळी कोठे गेलात हो ? अहो, आपल्या बालकाकडे एकदा तरी पहा हो ! हा प्राणापेक्षा प्रिय असलेला आपला हा सुपुत्र आज मृत होऊन भूमीवर पडला आहे. अहो एकदा याचे शेवटचे दर्शन घ्या."
असे म्हणून तिने शंकेने आपल्या पुत्राकडे निरखून पाहिले. तिला वाटले, आपला पुत्र अजूनही जिवंत असेल. पण नीट चाचपून पहाताच त्याचा देह निर्जीव होऊन पडला आहे हे तिच्या लक्षात आले आणि पुत्राच्या मृत्यूचे हे दुःख असह्य होऊन ती पुनः मूर्च्छित पडली.
काही वेळाने सावध झाल्यावर तिने आपल्या लाडक्या पुत्राचे मुख हातांनी वर उचलले व त्याची पटापट चुंबने घेत ती म्हणाली, "अरे माझ्या प्राणा, अरे माझ्या बाळा, आता झोपेचा त्याग कर, जागा हो रे माझ्या वत्सा. सांप्रतची रात्र भयावह आहे. या मध्यरात्री शेकडो भालू भयंकर आवाज काढीत आहेत. त्यामुळे भुते, प्रेते, पिशाच्च, डाकिनी इत्यादिकांच्या समुदायांनी सर्व आकाश व्यापून गेले आहे. त्यामुळे हा काळोख अधिकच भयंकर वाटत आहे. अरे पाडसा, तू येथे तुझ्या मित्रांबरोबर खेळायला आला होतास ना ! मग तुझे मित्र तर सूर्यास्त झाल्याबरोबर घराकडे परतले. पण तू एकटाच कसा रे येथे पडून राहिलास ? हे प्रिय पुत्रा, तुला माझी आठवण नाही का रे झाली ?
"हे तान्हुल्या, एकदा तरी माझ्याकडे येऊन मला "आई" म्हणून हाक मार रे. अरे माझ्या प्राणाच्या प्राणा, तू अनाथ होऊन येथे का बरे पडलास ? काळाने ही दुष्ट करणी कशी बरे केली ! हाय रे दुर्दैवा !"
असे म्हणत ती सुकुमार राणी पुन्हा पुन्हा आक्रोश करू लागली आणि ओक्साबोक्शी रडू लागली.
"अरे मुला, अरे माझ्या लहानग्या पुत्रा, हे वत्सा, अरे रोहिता, हे अनाथ पुत्रा, मला तू का बरे ओ देत नाहीस ? अरे, मी तुझी माता तुला हाका मारीत आहे. मला आज तू ओळखत नाहीस का रे ! अरे एकदा तू माझ्याकडे पहा रे ! अरे बाळा, आपण देशोधडीला लागलो. आपले राज्य गेले. तुझ्या पित्याने, त्या माझ्या नाथांनी आपल्याला विकून टाकले. मी दासी झाले. पण हे वत्सा, केवळ तुझ्याचसाठी मी आजवर जिवंत राहिले होते.
हे बाळा, तुझ्या जन्माच्या वेळच्या आठवणी आता येत आहेत. ब्राह्मणांनी तुझे भविष्य चांगले वर्तवले होते. तू दीर्घायुषी होऊन या पृथ्वीचे राज्य उपभोगशील, पुत्रपौत्रादींनी तू संपन्न होशील. शौर्य, दान, क्रीडा, बल यांनी युक्त आणि देव, गुरु व ब्राह्मण यांचा तू पूजक होशील, तसेच तू सत्यवचनी व मातापितरांच्या इच्छा पूर्ण करशील, तू जितेंद्रिय होऊन अजातशत्रू होशील असे तुझे भविष्य वर्तवले होते. ते सर्व आज खोटे ठरले आहे.!
अरे पुत्रा, तुझ्या हातावर चक्र असून मत्स्य, छत्र, श्रीवत्स, स्वस्तिक, ध्वज, घट व चामर ही चिन्हे असून आणखीही कित्येक शुभ चिन्हांनी तुझा हात युक्त आहे. पण हे राजपुत्रा, ही सर्व शुभलक्षणे आज व्यर्थ झाली का रे !
हरहर ! महाराज, हे पृथ्वीपते, आपण कसे राज्यभ्रष्ट झालो हो ! आपले मंत्रीगण कोणीकडे गेले आहेत ! ते सिंहासन, ती छत्रचामरे, त्या तलवारी, ते विपुल धन आज कुठे बरे गुप्त झाले ? अहो, ती अतिविशाल अयोध्यानगरी, ती उंच उंच गोपुरे, ते विस्तृत प्रासाद, आपले हत्ती, घोडे, रथ आणि महाराज, आपल्यावर निरतिशय प्रेम करणारे ते आपले प्रजाजन-सगळे कुठल्या कुठे निघून गेले हो ? आता तर हे पुत्रा, तूही मला न सांगता दूर गेलास ना ?
अहो प्राणनाथ, अहो राजाधिराज, या हो, आता तरी सत्वर या. बालवयात रांगत जाऊन जो तुमच्या वक्षस्थलावर विराजमान झाला आणि ज्याने तुमचे विशाल वक्षस्थल कुंकुमाने तांबडे लाल केले तो हा बालक ! हे राजेश्वरा, धुळीने माखल्यावरही जो तुमच्या शरीरावर खेळत होता त्या धुळीने तुमचेही शरीर मलीन करीत होता, तो तुमचा हा प्रिय पुत्र अनाथ होऊन आज कसा पडला आहे पहा !
हे भूपेंद्रा, ज्या बालकाने बालवयात लाडाने तुमच्या कपाळावरील कस्तुरी तिलक विद्रूप केला होता, ज्या बालकाचे चिखलाने माखलेले मुख आपण प्रेमाने चुंबिले होते, त्याचे हे मुख आज क्षुल्लक अधम किडयामुंग्यांनी व माश्यांनी भरून गेले आहे. हे राजेश्वरा, आपण या आणि एखाद्या दरिद्रयाप्रमाणे भूमीवर मरून पडलेल्या या आपल्या पुत्राला अवलोकन करा.
अरे दैवा, मी पुर्वजन्मी कोणते पातक केले होते ? खरोखरच, त्या कर्माच्या फलातून सुटण्यास आता दुसरा मार्गच नाही. हे वत्सा, हे बाळा, हे पुत्रा, अरे माझ्या कोमल रमणीय राजकुमारा, काय रे तुझी ही दशा ! आता कोठे असशील रे माझ्या राजा !"
अशाप्रकारे राणी मोठमोठयाने मध्यरात्री विलाप करीत होती. तिच्या त्या करुण स्वराने नगरपाल जागृत झाले आणि त्या स्वराच्या अनुरोधाने ते सत्वर तेथे आले. ते नगरपाल तेथे येताच विस्मयचकित झाले आणि सहानुभूतीने गोड शब्दात म्हणाले,
"हे सुकुमारी, तू कोण आहेस ? हा कुणाचा पुत्र आहे ? तुझा पति सांप्रत कोठे गेला आहे ? अशा या भयाण मध्यरात्री तू एकटीच निर्भयपणे येथे का विलाप करीत आहेस ?"
पण राणी दुःखात चूर असल्याने नगरपालांचे प्रश्न तिला ऐकू आले नाहीत. तिचे तिकडे लक्ष नसल्यामुळे ती काहीच बोलली नाही.
नगरपालांनी पुन्हा पुन्हा तिला विचारले, पण ती सुंदरी काहीही न बोलता स्तब्ध बसून राहिली. दारुण दुःखाने तिच्या नेत्रातून घळघळा अश्रुप्रवाह वहात होता. हृदय भरून आले होते. कंठ दाटला होता. पण ती काहीच बोलत नसल्याने त्या एकचित्त असलेल्या स्त्रीकडे पाहून त्यांना वेगळीच शंका आली आणि ते नगरपाल घाबरून गेले. एकमेकांकडे शंकायुक्त चेहर्याने पाहू लागले. आपल्या हातातील आयुधे सरसावून ते आपापसात बोलू लागले,
"अहो, ही स्त्री तर काहीच हालचाल करीत नाही, बोलत नाही. तेव्हा खरोखरच ही मानवी स्त्री नसेल, ही कृत्या अथवा डाकिणी असेल. म्हणून या बालकाचा घात करणार्या या स्त्रीचा आपण सावधान राहून युक्तीने वध केला पाहिजे. अहो, ही जर चांगल्या मानवयोनीतील स्त्री असती तर एवढया भयानक वेळी एकटीच येथे स्वस्थ बसली नसती. हिने कोणाचे तरी मूल भक्षणासाठीच आणले असावे."
असे म्हणून ते हळूहळू पुढे सरसावले आणि सावधगिरीने त्यांनी तिच्यावर झडप घातली. काहींनी तिचे केस धरले. काहींनी हात पाय घटट धरले. काहींनी तिच्या गळ्याला पकडले. ते म्हणाले,
"ही डाकिणी सुटू देऊ नका. ही पळून जाईल, हिला घटट धरा. चला त्वरा करा." हातातील शस्त्रांच्या बलावर त्यांनी तिला ओढीत ओढीत त्या स्मशानभूमीजवळील चांडाळ वाडयात आणले आणि तेथील रक्षक वीरबाहू त्याच्या स्वाधीन केले.
ते त्या चांडाळाला म्हणाले, "हे चांडाळा, आम्हाला गावाबाहेर ही डाकिण दिसली. ही बालकांचा घात करणारी असून नुकताच तिने एका बालकाचा घात केला आहे. हिला दूर नेऊन तू सत्वर मारून टाक. हिची किंचितही उपेक्षा करू नकोस. हिचा वधच कर."
तिला पाहताच तो चांडाळ उत्साहाने पुढे आला. तो त्या नगरपालांना धन्यवाद देत म्हणाला, "अहो सभ्यगृहस्थांनो, खरोखरच ही डाकिण फार क्रूरकर्मा आहे. हिची प्रसिद्धी मी आजवर बरीच ऐकली आहे. पण यापूर्वी ही कोणाच्या दृष्टीस पडली नव्हती. हिने आतापर्यंत कित्येक बालकांचा वध करून त्याना भक्षण केले आहे. खरोखरच हे नगरपालांनो, आज तुम्ही फार पुण्य जोडले आहे. तुम्ही आज धैर्य दाखवून या पापिणीला पकडून दिलेत याबद्दल तुमची सर्वत्र ख्याती होईल. अनेक बालकांच्या माता तुम्हाला दुवा देतील. तुम्ही आता काहीही चिंता न करता निःशंक मनाने परत जा.
जो ब्राह्मण स्त्रिया, अर्भके व गायी यांचा घात करणारा असतो, सुवर्णाची चोरी करणारा, व्यर्थ आगी लावणारा, वाटमारी करून लुटमार करणारा, मद्यप्राशन करणारा, गुरुस्त्रीशी दुष्ट संबंध ठेवणारा, श्रेष्ठांना विनाकारण विरोध करणारा असा जो कोणी कुकर्मा पुरुष असतो, त्याचा वध निःसंशय पुण्यप्रद असतो. अशा ब्राह्मणाचा अथवा स्त्रीचा वध करण्याने महादोष प्राप्त होत नाही. म्हणून मीही हिचा वध करून पुण्याचीच जोड करीन."
असे म्हणून त्या क्रूर चांडाळाने त्या स्त्रीला जाडजूड दोरखंडांनी जखडून बांधले. तिचे केस ओढून त्याने तिला फारच ताडण केले. तिला फराफरा ओढीत तो हरिश्चंद्राकडे आला आणि म्हणाला,
"हे माझ्या सेवका, दास, कोणताही विचार या क्षणी न करता तू या स्त्रीला सत्वर मारून टाक. ही स्त्री दुष्ट आहे."
हरिश्चंद्र राजाला ती आज्ञा म्हणजे जणू वज्राघातच वाटला. आता आपणाला स्त्रीवधाचे पाप करावे लागणार या भीतीने तो थरथर कापू लागला. तो चांडाळास म्हणाला, "महाराज, आपला आज्ञाधारक सेवक हे पापकृत्य करण्यास धजणे शक्य नाही. म्हणून स्त्री हत्येचे हे कर्म आपण दुसर्या एखाद्या सेवकास सांगा. या उलट दुसरे कोणतेही असाध्य कर्म मला सांगा ते कितीही दुर्घट असले तरी मी पार पाडीन."
राजाचे हे भाषण ऐकून चांडाळ राजाला म्हणाला, "अरे तू भिऊ नकोस, कारण डाकिणीचा वध करणे पाप नाही. हे खङ्ग घे आणि सत्वर त्या स्त्रीचा वध कर. ही बालकांचा घात करणारी डाकिण असल्याने हिचा वध पुण्यकारक आहे. ते पुण्य तुला मिळेल. बालकघातकी स्त्रीचे रक्षण करणे हे पाप आहे."
राजा चांडाळास म्हणाला, "अहो धनी, स्त्रियांचे रक्षण करणे हे आवश्यक असून कितीही त्रास होत असला तरी स्त्रीचे रक्षण करणे सर्वथैव योग्य आहे. स्त्रियांची हिंसा कोणत्याही परिस्थितीत करू नये. धर्मशास्त्रवेत्ते जे मुनी आहेत त्यांनी स्त्रीवधाचे पातक सर्वात मोठे आहे असे सांगितले आहे. जाणते वा अजाणतेपणीही जो पुरुष स्त्रीचा वध करतो तो महारौरवात जाऊन नरकात खितपत पडतो असे शास्त्रवचन प्रमाण आहे."
चांडाळ राजाच्या भाषणाने रागावला व त्याच्यावर क्रुद्ध होऊन म्हणाला, "हे पंडिता, तू जास्त बोलू लागला आहेस. धन्याची आज्ञा तुला मानावी लागेल. ही घे तरवार. ही कशी विजेप्रमाणे चकचकीत असून पाणीदार व धारदार आहे. ती ही तरवार घे. अरे, जर एकाच्या वधामुळे सर्वांना सुख होत असेल तर त्या एकाचा वध करण्यात पापाची जोड होत नसून पुण्याचीच प्राप्ती होते. तेव्हा हिची हिंसा करण्यात तुला महापुण्य लाभणार आहे. ह्या स्त्रीने आजवर अनेक अर्भके भक्षण केली आहेत. म्हणून तू काहीही भय न मनात बाळगता हिला मारून टाक व हिच्या वधामुळे इतर जनांना सुखप्राप्तीचा लाभ करून दे. ते तुला पुण्यप्रद आहे."
राजा नम्रतापूर्वक हात जोडून म्हणाला,
"हे महाराज, मी स्त्रीहत्या, बालहत्या न करण्याचे व्रत घेतलेले आहे. तेव्हा ते व्रत मला मरेपर्यंत पाळावेच लागेल. म्हणून सांप्रत हा स्त्रीवध करण्यास मी सर्वथैव असमर्थ आहे. आपण मला खरोखरच क्षमा करावी."
राजाच्या भाषणाने चांडाळ फारच क्रुद्ध झाला. तो म्हणाला, "हे दुष्टा, अरे दुर्बुद्धे, धन्याच्या आज्ञेवाचून व धन्याने सांगितलेल्या कामावाचून तुझा आता अन्य व्रताशी किंचितही संबंध नाही. मूर्खा, तू माझा दास आहेस. माझ्याकडून तू वेतन घेतले असूनही आज तू माझे कार्य करीत नाहीस हे योग्य नव्हे. अरे, जे धन्यापासून वेतन स्वीकारल्यावर धन्याची आज्ञा मोडतात त्यांनी हजारो कल्पांपर्यंत नरकवास भोगूनही त्यांची त्यातून सुटका होत नाही. तेव्हा तू माझी आज्ञा सत्वर ऐक."
राजा करुणवचन होऊन म्हणाला, "हे चांडाळपालका, आपण मला दुसरे कोणतेही अवघड कृत्य करण्यास सांगा. तुमचा कोणी शत्रू असेल तर तसे सांगा. मी सत्वर जाऊन त्याचा वध करून स्वामीकार्य पार पाडीन आणि तुमच्या दुष्ट शत्रूचा नाश करून त्याची सर्व संपत्ती जिंकून तुम्हाला अर्पण करीन.
हे प्रभो, देव, सर्प, सिद्ध, गंधर्व यापैकी कुणाचाही अथवा प्रत्यक्ष इंद्राचाही संग्रामात सुतीक्ष्ण बाणांनी वध करून मी त्यांचा पराभव करीन आणि त्यांचे सर्व ऐश्वर्य आपल्या चरणावर आणून ठेवीन. पण स्त्रीवध करण्यास कृपा करून सांगू नका."
राजाच्या भाषणाने चांडाळ संतप्त होऊन थरथर कापू लागला. अतिशय रागावून तो हरिश्चंद्राला म्हणाला, "अरे नीच दासा, तू चांडाळाचे दास्यत्व पत्करले आहेस. असे असूनही वीराला शोभेल असे भाषण बोलतो आहेस. तू अत्यंत फाजील दिसतोस. उगाच जास्त बडबड तू करीत आहेस. आता तुला माझे म्हणणे ऐकावेच लागेल.
हे निर्लज्जा, हे अधम पुरुषा, अरे तू जेवढया फुशारक्या मारीत आहेस तेवढी तुझी योग्यता नाही. अरे दुर्बला, जर तुला पापपुण्याची भीती वाटत असती तर अधमातला अधम अशा माझे दास्यत्व तू का पत्करले असतेस ? एवढा तुझा पराक्रम होता तर तुला ही हीन लाचारी का करावी लागली असती ? चांडाळाच्या घरात येऊन तू का राहिला असतास ? आज तू चांडाळाचा दास झाला आहेस हे लक्षात ठेव आणि सेवकाला स्वतःची व्रते, अभिमान आणि स्वतःच्या इच्छा असत नाहीत. तेव्हा हे मूढमते, मुकाटयाने हे शस्त्र उचल आणि या स्त्रीचे शिरकमल सत्वर तोडून ते धडापासून वेगळे कर."
अशाप्रकारे चांडाळाने आपली आज्ञा राजावर लादली आणि हरिश्चंद्राच्या हातात ती तीक्ष्ण नग्न तरवार दिली.